यहोवा थकलेल्यांस सामर्थ्य देतो
“परमेश्वराची [यहोवा, NW] आशा धरून राहणारे नवीन शक्ति संपादन करितील; ते गरुडांप्रमाणे पंखांनी वर उडतील.”—यशया ४०:३१.
१, २. यहोवा त्याच्यावर भरवसा ठेवणाऱ्यांना काय देतो व आता आपण कशाचा विचार करणार आहोत?
गरुड, आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांपैकी सर्वात शक्तिमान आहेत. ते, त्यांचे पंख न फडफडता कितीतरी अंतर उडू शकतात. दोन मीटर लांबीचे पंख असणारा “पक्षांचा राजा” सोनेरी गरुड, “सर्व गरुडांपैकी जास्त प्रभावकारी आहे; तो टेकड्या आणि सपाट प्रदेशांवरून वर जात, पर्वतांच्या रांगांवरून कित्येक तासांसाठी पंख न फडफडता हवेत तरंगत घिरट्या मारत इतका वर जातो, की त्याचा फक्त एक काळा ठिपका दिसतो.”—द ऑडूबन सोसायटी एन्सायक्लोपिडिआ ऑफ नॉर्थ अमेरिकन बर्ड्स.
२ गरुडाच्या उडण्याच्या क्षमतेला मनात ठेवून यशयाने लिहिले: “[यहोवा] भागलेल्यास जोर देतो, निर्बलास विपुल बल देतो. तरुण थकतात, भागतात; भरज्वानीतले ठेचा खातात; तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ति संपादन करितील; ते गरुडांप्रमाणे पंखांनी वर उडतील; ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत.“ (यशया ४०:२९-३१) यहोवा, त्याच्यावर भरवसा ठेवणाऱ्यांना पुढे चालत राहण्यासाठी शक्ती देतो, जणू काय कधीही न थकणारे असे वाटत असलेल्या उंच उडणाऱ्या गरुडाचे पंख देतो हे माहीत असणे किती सांत्वनदायक आहे! तेव्हा आता, थकलेल्यांना शक्ती द्यावी म्हणून त्याने ज्या तरतुदी केल्या आहेत त्यांचा जरा विचार करा.
प्रार्थनेचे सामर्थ्य
३, ४. (अ) येशूने त्याच्या शिष्यांना काय करण्यास आर्जवले? (ब) आपल्या प्रार्थनांच्या उत्तरात आपण यहोवाकडून काय करण्याची अपेक्षा करू शकतो?
३ “सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये” असे येशूने त्यांच्या शिष्यांना आर्जवले. (लूक १८:१) यहोवाजवळ आपल्या मनातल्या सर्व गोष्टी सांगितल्याने, पुन्हा शक्ती मिळण्यास व भारावून टाकणारे असे वाटत असलेले दबाव येतात तेव्हा हार मानण्याचे टाळण्यास खरोखरीच मदत होऊ शकते का? होय, पण आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत अशा काही गोष्टी आहेत.
४ आपल्या प्रार्थनेचे उत्तर देताना, यहोवाने जे काही करावयाची आपण अपेक्षा करतो त्याविषयी यथार्थ असले पाहिजे. अगदीच निराशेत बुडालेल्या एका ख्रिस्ती महिलेने नंतर असे निरीक्षले: “इतर आजारांच्या बाबतीत असते तसे, यहोवा अशावेळी चमत्कार घडवून आणत नसतो. परंतु होईल तितक्या प्रमाणात त्यांना तोंड देण्यासाठी आणि या युगात बरे होण्यासाठी तो आपल्याला जरूर मदत करतो.” तिच्या प्रार्थनांमुळे फरक का पडला याचे स्पष्टीकरण देताना ती पुढे म्हणाली: “माझ्यासाठी यहोवाचा पवित्र आत्मा २४ तास उपलब्ध होता.” अशा प्रकारे, आपल्याला भारावून टाकणाऱ्या जीवनाच्या दबावांपासून यहोवा आपले पूर्ण रक्षण करीत नाही, तर “जे मागतात त्यांस तो . . . पवित्र आत्मा” देतो! (लूक ११:१३; स्तोत्र ८८:१-३) आपल्याला ज्या परीक्षा किंवा दबावांचा सामना करावा लागेल त्यांना तोंड देण्यास तो आत्मा आपल्याला समर्थ करू शकतो. (१ करिंथकर १०:१३) आवश्यकता असल्यास, नजीकच्या नवीन जगामध्ये देवाचे राज्य, सर्व तणावपूर्ण समस्यांना काढून टाकेपर्यंत तो आपल्याला “सामर्थ्याची पराकोटी” देऊ शकतो.—२ करिंथकर ४:७.
५. (अ) आपल्या प्रार्थना परिणामकारी होण्यासाठी कोणत्या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत? (ब) आपण शरीराच्या एखाद्या कमजोरीविरुद्ध लढत आहोत तर आपण कशा प्रकारे प्रार्थना करू शकतो? (क) आपल्या वारंवार आणि विशिष्ट प्रार्थना यहोवाला कोणती गोष्ट प्रदर्शित करतील?
५ पण आपल्या प्रार्थना परिणामकारक असण्यासाठी आपण अविरत आणि स्पष्ट प्रार्थना केल्या पाहिजेत. (रोमकर १२:१२) उदाहरणार्थ, तुमच्या एखाद्या शारीरिक कमजोरीविरुद्ध लढत देते वेळी तुम्ही कधीकधी निराश होता तेव्हा, संपूर्ण दिवसभर त्या विशिष्ट कमजोरीला वश न होण्यास मदतीसाठी यहोवाकडे दिवसाच्या सुरवातीलाच विनंती करा. अशा प्रकारे संपूर्ण दिवसभरात वारंवार आणि रोज रात्री झोपण्याआधी प्रार्थना करा. तुमची पीछेहाट झाली, तर यहोवाकडे क्षमा मागा आणि पुन्हा त्या कमजोरीच्या आहारी जाण्याचे काय कारण होते व भवितव्यामध्ये अशा प्रसंगांना टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता त्याविषयी त्याच्याशी बोला. अशा तुमच्या वारंवार आणि स्पष्ट प्रार्थना, या लढतीत विजय मिळवण्याची तुमची प्रामाणिक इच्छा आहे हे ‘प्रार्थना ऐकणाऱ्याला’ दर्शवून देतील.—स्तोत्र ६५:२; लूक ११:५-१३.
६. आपण प्रार्थना करण्यास अपात्र आहोत असे आपल्याला वाटत असले तरी यहोवाने आपल्या प्रार्थना ऐकाव्यात अशी योग्य अपेक्षा आपण का करू शकतो?
६ परंतु काहीवेळा निराश झालेल्या काहींना, प्रार्थना करण्यास ते अपात्र असल्यासारखे वाटेल. असे वाटलेल्या एका ख्रिस्ती भगिनीने नंतर असे निरीक्षले: “असा विचार करणे अतिशय घातक आहे, कारण मग त्याचा अर्थ आपण स्वतःचा न्याय करण्याचा अधिकार स्वतःजवळ घेतला आहे, पण खरे पाहता तो आपला हक्क नाही.” खरे म्हणजे, “देव स्वतः न्याय करणारा आहे.” (स्तोत्र ५०:६) ‘आपले मन स्वतःला दोषी ठरवत असले तरी आपल्या मनापेक्षा देव थोर आहे; त्याला सर्व काही कळते,’ अशी खात्री बायबल आपल्याला देते. (१ योहान ३:२०) आपण प्रार्थना करण्यास अपात्र आहोत असे ठरवत असलो, तरी यहोवाला आपल्याबद्दल तसे वाटत नाही हे जाणणे किती सांत्वनदायक आहे! तो आपल्याविषयी सर्व काही ‘जाणतो,’ होय, आपल्याला इतके अपात्र वाटण्यास कारणीभूत ठरलेल्या आपल्या जीवनातील प्रसंगांबाबत देखील तो जाणतो. (स्तोत्र १०३:१०-१४) त्याची दया आणि समजूतदारपणाची सखोलता त्याला ‘भग्न आणि अनुतप्त हृदयापासून केलेल्या’ प्रार्थना ऐकावयास प्रवृत्त करते. (स्तोत्र ५१:१७) “गरिबाची आरोळी ऐकून जो कानात बोटे घालितो” अशा लोकांचा तो स्वतःच धिक्कार करतो, तेव्हा आपण मदतीसाठी त्याला केलेल्या आपल्या याचना तो कशा काय ऐकण्यास नाकारेल?—नीतिसूत्रे २१:१३.
बंधुत्वाचा उबदारपणा
७. (अ) आपल्याला पुन्हा शक्ती प्राप्त करण्यासाठी यहोवाने केलेली दुसरी एक तरतूद कोणती? (ब) आपल्या बंधुत्वाबद्दल कोणती गोष्ट माहीत असणे बळकटी देणारे असू शकते?
७ आपली शक्ती पुन्हा मिळण्यासाठी यहोवाने केलेली आणखी एक तरतूद म्हणजे आपले ख्रिस्ती बंधुत्व होय. बंधू आणि भगिनींचे मिळून बनलेल्या जगव्याप्त कुटुंबाचे भाग होणे किती मौल्यवान सुहक्क आहे! (१ पेत्र २:१७) जीवनाचे दबाव आपल्याला भारावून टाकतात तेव्हा आपल्या बंधुत्वाचा उबदारपणा आपल्याला पुन्हा शक्ती मिळवण्यासाठी मदत करू शकतो. ते कसे? दबावपूर्ण आव्हानांना तोंड देणारे आपणच केवळ नाहीत हे माहीत असणे बळकटी देणारे असू शकते. आपल्या बंधू आणि भगिनींमध्ये काही असे आहेत की ज्यांनी आपल्या सारख्याच दबावांना किंवा परीक्षांना तोंड दिले आहे व कदाचित त्यांच्याही आपल्या सारख्याच भावना असतील यात काही शंका नाही. (१ पेत्र ५:९) आपण ज्या परिस्थितीतून गुजरत आहोत ती असामान्य नाही व आपल्या भावना निराळ्या नाहीत हे जाणणे हमी देणारे आहे.
८. (अ) आपल्या बंधुत्वामध्ये आपल्याला हवे तितके साहाय्य आणि सांत्वन कसे मिळू शकते हे कोणती उदाहरणे दाखवून देतात? (ब) कोणत्या प्रकारे तुम्हाला व्यक्तिगतरीत्या ‘खऱ्या मित्राकडून’ साहाय्य किंवा सांत्वन मिळाले?
८ बंधुत्वाच्या उबदारपणात आपल्याला ‘खरे मित्र,’ मिळू शकतात जे संकटकाळी आवश्यक असलेली पुष्कळ गरज आणि सांत्वन देऊ शकतात. (नीतिसूत्रे १७:१७) बहुतेक वेळा, त्यासाठी काही प्रेमळ शब्दांची किंवा विचारपूर्वक कार्यांची गरज असते. “माझ्या मनात असलेल्या नकारात्मक विचारांवर मात करण्यास मदत करण्यासाठी माझे असे काही स्नेही होते जे माझ्यासोबत माझ्या सकारात्मक गुणांबद्दल बोलत असत,” असे निरुपयोगीपणाच्या भावनांविरुद्ध लढलेल्या एका ख्रिस्ती भगिनीने आठवून सांगितले. (नीतिसूत्रे १५:२३) आपल्या धाकट्या मुलीच्या मृत्यूनंतर एका बहिणीला मंडळीतील सभांमध्ये राज्य गीते, विशेषकरून पुनरुत्थानाचा उल्लेख असलेली गीते गाण्यास कठीण वाटत होते. ती आठवून सांगते, “एकदा, शेजारच्या रांगेत बसलेल्या एका बहिणीने मला रडताना पाहिले. ती माझ्या जवळ आली, मला जवळ घेऊन गीत पूर्ण होईपर्यंत माझ्यासोबत गीत म्हटले. मला बंधू आणि बहिणींबद्दलचे ओतप्रोत प्रेम वाटू लागले व सभा आपल्यासाठी आहेत म्हणून आनंद झाला आणि राज्य सभागृहातच आपल्यासाठी मदत आहे हे मला जाणवले.”
९, १०. (अ) आपण आपल्या बंधुत्वाच्या उबदारपणाला हातभार कसा लावू शकतो? (ब) हितकारक संगतीची विशेषकरून कोणाला गरज आहे? (क) ज्यांना उत्तेजन हवे आहे अशांना मदत करण्यासाठी आपण काय करू शकतो?
९ अर्थात, ख्रिस्ती बंधुत्वाच्या उबदारपणाला हातभार लावण्यासाठी आम्हा प्रत्येकावर जबाबदारी आहे. यास्तव, आपल्या सर्व बंधू आणि भगिनींना सामावून घेण्यासाठी आपण आपले अंतःकरण “विशाल” केले पाहिजे. (२ करिंथकर ६:१३) आपल्याबद्दल बंधुत्वाची प्रीती थंडावली आहे असे निराश होऊन विचार करणाऱ्यांबद्दल किती दुःख वाटते! तरीपण, काही ख्रिश्चनांना एकाकी किंवा टाकून दिल्यासारखे वाटते. एक बहीण जिचा पती सत्याचा विरोध करतो तिने कबूल केले: “असा कोण आहे की ज्याला उभारणीकारक मैत्री, उत्तेजन आणि प्रेमळ सहवास नको असतो व त्याची गरज वाटत नाही? आपल्या बंधू आणि भगिनींना कृपया आठवण करून द्या, की आपल्याला त्यांची गरज आहे!” होय, खासकरून जे जीवनाच्या परिस्थितींमुळे भारावून गेले आहेत—ज्यांचे विवाह सोबती ख्रिस्ती विश्वासात नाहीत, एकटे पालक, दीर्घकाळापासून प्रकृतीच्या समस्या असलेले, वृद्धजन आणि इतर—त्यांना हितकारक सहवासाची गरज आहे. आपल्यातील काहींना याची आठवण करून द्यावी लागेल का?
१० मदत देण्यासाठी आपण काय करू शकतो? आपल्या प्रेमाचे प्रदर्शन करण्यात आपण विशाल होऊ या. आदरातिथ्य दाखवताना, ज्यांना उत्तेजनाची गरज आहे अशांना आपण विसरू नये. (लूक १४:१२-१४; इब्रीयांस १३:२) त्यांच्या परिस्थितींमुळे ते, आपले आमंत्रण स्वीकारत नाहीत असे गृहीत धरण्यापेक्षा त्यांना आमंत्रित का करू नये? मग यायचे की नाही हे त्यांना ठरवू द्या. त्यांनी हे निमंत्रण स्वीकारले नसले तरी, इतरांनी त्यांच्याबद्दल विचार केला, हे जाणून त्यांना निश्चितच उत्तेजन मिळेल. पुन्हा शक्ती प्राप्त करण्यासाठी कदाचित याचीच त्यांना गरज असेल.
११. भारावून गेलेल्यांना कोणत्या मार्गांनी साहाय्याची गरज लागेल?
११ भारावून गेलेल्या इतरांना दुसऱ्या मार्गांनी साहाय्य हवे असेल. उदाहरणार्थ, एका एकट्या माता पालकाला, पिता नसलेल्या तिच्या मुलामध्ये आस्था दाखवणाऱ्या कोणा प्रौढ बांधवाची कदाचित गरज वाटेल. (याकोब १:२७) गंभीर शारीरिक समस्या असलेल्या एखाद्या बंधू किंवा बहिणीला, बाजारहाट किंवा घरकामासाठी कोणाच्या तरी मदतीची गरज असू शकेल. एखाद्या वृद्ध व्यक्तीला थोड्याफार सहवासाची किंवा क्षेत्र सेवेत जाण्यासाठी साहाय्याची गरज वाटेल. अशा प्रकारच्या मदतीची कायम गरज भासते तेव्हा खरे पाहता आपल्या ‘प्रीतीला पडताळून पाहिले’ जाते. (२ करिंथकर ८:८) गरजवंत लोकांना मदत करण्यासाठी आपला पुष्कळ वेळ आणि परिश्रम खर्च करावा लागेल असा विचार करून त्यांच्यापासून दूर जाण्याऐवजी, आपण इतरांच्या गरजांबद्दल संवेदनाशील आणि प्रतिसादात्मक होण्याद्वारे ख्रिस्ती प्रीतीच्या परीक्षेतून पार होऊ या.
देवाच्या वचनाचे सामर्थ्य
१२. देवाचे वचन पुन्हा शक्ती प्राप्त करण्यासाठी आपली कशी मदत करू शकते?
१२ अन्नाचे सेवन करण्याचे सोडून देणारा मनुष्य लगेचच त्याचे बळ किंवा सामर्थ्य गमावेल. त्याचप्रमाणे, प्रगती करीत राहण्यासाठी यहोवा आपल्याला आणखी एका मार्गाने सामर्थ्य प्रदान करतो व तो म्हणजे आध्यात्मिकरीत्या आपली चांगली भरवणूक होत आहे त्याकडे पाहणे. (यशया ६५:१३, १४) त्याने आपल्याला कोणते आध्यात्मिक अन्न पुरविले आहे? मुख्यतः, त्याचे वचन, बायबल. (मत्तय ४:४; पडताळा इब्रीयांस ४:१२.) शक्ती पुन्हा प्राप्त करण्यासाठी ते आपली कशी मदत करू शकते? आपण सामना करीत असलेले दबाव आणि समस्या आपल्या शक्तीचा नाश करू लागतात तेव्हा, बायबल काळातील विश्वासू पुरुष आणि स्त्रियांबद्दलच्या भावना आणि वास्तविक जीवनातील लढतींविषयी वाचन करून आपण शक्ती मिळवू शकतो. ते लोक सचोटी राखणारे उल्लेखनीय उदाहरण असे होते तरी, ‘आपल्यासारख्याच स्वभावाचे’ ते मानव होते. (याकोब ५:१७; प्रेषितांची कृत्ये १४:१५) आपल्यासारख्याच परीक्षांचा आणि दबावांचा त्यांनी सामना केला. काही उदाहरणांचा विचार करा.
१३. कोणती शास्त्रवचनीय उदाहरणे दाखवून देतात की, बायबल काळातील विश्वासू पुरुष आणि स्त्रियांच्या देखील आपल्यासारख्याच भावना आणि अनुभव होते?
१३ कुलपिता अब्राहामाला पुनरुत्थानावर पूर्ण विश्वास होता तरी त्याच्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्याने खूप शोक केला. (उत्पत्ति २३:२; पडताळा इब्रीयांस ११:८-१०, १७-१९.) पश्चात्तापी दावीदाला वाटले, की त्याच्या पापांमुळे यहोवाची सेवा करण्यास तो अपात्र होता. (स्तोत्र ५१:११) मोशेच्या मनात अपुरेपणाच्या भावना होत्या. (निर्गम ४:१०) एका गंभीर आजारपणामुळे ‘ख्रिस्तसेवेतील’ आपले कार्य मर्यादित झाले आहे हे एपफ्रदीतला कळल्यावर तो खिन्न झाला. (फिलिप्पैकर २:२५-३०) पौलाला त्याच्या पापी देहाविरुद्ध लढत द्यावी लागली. (रोमकर ७:२१-२५) फिलिप्पै मंडळीतील दोन अभिषिक्त भगिनी, युवदीया आणि सुंतुखे या दोघींमध्ये काही समस्या होत्या असे दिसते. (फिलिप्पैकर १:१; ४:२, ३) या विश्वासू जणांच्या भावना आणि अनुभव आपल्यासारखेच होते तरीपण त्यांनी हार मानली नाही हे जाणणे किती उत्तेजनकारक आहे! शिवाय, यहोवाने देखील त्यांचा त्याग केला नाही.
१४. (अ) यहोवाने त्याच्या वचनातून शक्ती मिळवण्यास आपल्याला मदत व्हावी म्हणून कोणते साधन वापरले आहे? (ब) टेहळणीबुरूज व सावध राहा! नियतकालिकांमध्ये सामाजिक, कौटुंबिक आणि भावनात्मक विषय का छापण्यात आले?
१४ यहोवाच्या वचनातून शक्ती मिळवण्यासाठी तो आपल्याला निरंतर ‘यथाकाळी अन्न खावयास’ देण्यासाठी विश्वासू आणि बुद्धिमान दास वर्गाचा उपयोग करीत आहे. (मत्तय २४:४५) विश्वासू दासाने, बायबल सत्यांचे समर्थन करण्यासाठी व मानवाची एकमात्र आशा म्हणजेच देवाच्या राज्याची घोषणा करण्यासाठी अनेक वर्षांपासून टेहळणीबुरूज आणि सावध राहा! नियतकालिकांचा वापर केला आहे. विशेषकरून शेवटल्या काही दशकांमध्ये, देवाचे काही लोकही कधीकधी तोंड देतात त्या सामाजिक, कौटुंबिक आणि भावनात्मक आव्हानांवर समयोचित शास्त्रवचनीय लेख या नियतकालिकांमध्ये छापण्यात आले आहेत. कोणत्या उद्देशास्तव ही माहिती छापण्यात आली होती बरे? निश्चितच, अशा आव्हानांच्या सामोरे जाणाऱ्यांनी देववचनातून शक्ती आणि उत्तेजन प्राप्त करण्यास मदत मिळावी म्हणून छापण्यात आली. परंतु असे लेख, आपले बंधू आणि बहिणी कोणकोणत्या परिस्थितीतून गुजरत असतात याबद्दलची आपल्याला स्पष्ट समज मिळावी यासाठी देखील मदत करतात. अशा प्रकारे आपण पौलाच्या शब्दांकडे लक्ष देण्यास सुसज्ज होऊ की, “जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या; अशक्तांना आधार द्या, सर्वांबरोबर सहनशीलतेने वागा.”—१ थेस्सलनीकाकर ५:१४.
“वाऱ्यापासून आसरा” असे वडील
१५. वडील या नात्याने कार्य करणाऱ्यांबद्दल यशयाने काय भाकीत केले होते व यामुळे त्यांच्यावर कोणती जबाबदारी येते?
१५ आपण निराश होतो तेव्हा आपल्याला साहाय्यक ठरावी म्हणून यहोवाने आणखी एक मदत पुरवली आहे—मंडळीतील वडील. यांच्याबद्दल यशया संदेष्ट्याने लिहिले: “वाऱ्यापासून आसरा व वादळापासून निवारा असा मनुष्य होईल; रुक्ष भूमीत पाण्याचे नाले, तप्त भूमीत विशाळ खडकाची छाया असा तो होईल.” (यशया ३२:१, २) तेव्हा, यहोवाने वडिलांबद्दल जे भाकीत केले आहे त्यास पात्र ठरण्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे. त्यांनी इतरांसाठी सांत्वन आणि तजेला याचे उगम ‘असे होण्यास’ हवे आणि ‘एकमेकांची ओझी [किंवा, “त्रासदायक वस्तू” शब्दशः, “जड वस्तू”] वाहण्यास’ स्वेच्छेने तयार असले पाहिजे. (गलतीकर ६:२, तळटीप, NW) ते असे कसे करू शकतात?
१६. प्रार्थना करण्यास अपात्र वाटणाऱ्याला मदत करण्यासाठी वडील काय करू शकतात?
१६ आधी सांगितल्याप्रमाणे, काहीवेळा नाराज झालेल्या एखाद्या व्यक्तीला ती प्रार्थना करण्यास अपात्र असल्यासारखे वाटू लागेल. अशा वेळेस वडीलजन काय करु शकतात? ते त्या व्यक्तीसोबत आणि तिच्यासाठी प्रार्थना करू शकतात. (याकोब ५:१४) यहोवा तसेच इतर सर्व, निराश झालेल्या व्यक्तीवर किती प्रीती करतात हे तिला समजावून सांगण्यास मदत करावी, केवळ अशी मागणी निराश झालेल्या व्यक्तीसमक्ष यहोवाकडे केली तरी ते तिच्यासाठी सांत्वनदायक ठरू शकते. एखाद्या वडिलांची कळकळीने आणि हृदयापासून केलेली प्रार्थना ऐकल्याने, खिन्न झालेल्या व्यक्तीमधील आत्मविश्वास बळकट होऊ शकतो. तिच्यावतीने वडिलांनी केलेल्या प्रार्थनांना यहोवा उत्तर देईल असा भरवसा वडिलांना आहे तर मग त्याला किंवा तिला तो भरवसा वाटू लागेल असा तर्क करण्याची मदत त्याला किंवा तिला दिली जाऊ शकते.
१७. वडिलांनी समभावनेने ऐकणारे का असले पाहिजे?
१७ याकोब १:१९ म्हणते: “प्रत्येक माणूस ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा,” असला पाहिजे. निराश झालेल्या व्यक्तींना पुन्हा शक्ती प्राप्त करण्यास मदत करण्यासाठी वडिलांनी समभावनेने ऐकणारे असले पाहिजेत. काही बाबतींमध्ये मंडळीतील सदस्य, अशा समस्या किंवा दबावांशी झगडत असतील ज्यांना या व्यवस्थीकरणामध्ये सोडवता येऊ शकत नाहीत. अशा वेळी, त्यांना त्यांच्या समस्येला सोडवणारा उपाय नको असतो फक्त, चांगल्या प्रकारे ऐकणाऱ्याबरोबर बोलावयास त्यांना हवे असते—असा एखादा की जो त्यांना कसे वाटले पाहिजे हे सांगणार नाही तर कोणताही न्याय न करता त्यांचे ऐकून घेईल.—लूक ६:३७; रोमकर १४:१३.
१८, १९. (अ) वडिलांनी तत्परतेने ऐकणारे होण्यामुळे निराश झालेल्या व्यक्तीचे ओझे आणखी जड बनवण्याचे टाळण्यास कशी मदत होऊ शकते? (ब) वडीलजन “समसुखदुःखी” असतात तेव्हा काय होते?
१८ वडिलांनी तत्परतेने ऐकणारे होण्यामुळे, निराश झालेल्या व्यक्तीचे ओझे नकळत आणखी जड बनवण्याचे टाळण्यास आपली मदत होऊ शकेल. उदाहरणार्थ, एका बंधू किंवा भगिनीने काही सभा चुकवल्या असतील किंवा क्षेत्र सेवेमध्ये मंद झाले असतील तर त्याला किंवा तिला क्षेत्र सेवेमध्ये आणखी करण्यास किंवा सभांना नियमित येण्यासाठी सल्ल्याची खरोखरच आवश्यकता आहे का? कदाचित. परंतु तुम्हाला त्यांची एकंदर परिस्थिती ठाऊक आहे का? त्यांच्या आरोग्याच्या समस्या वाढत चालल्या आहेत का? त्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या अलीकडेच बदललेल्या आहेत का? त्याला किंवा तिला भारावून टाकणाऱ्या इतर परिस्थिती किंवा दबाव आहेत का? लक्षात ठेवा, त्या व्यक्तीला, ती आणखी करू शकत नसल्यामुळे आधीच खूप दोषी वाटत असेल.
१९ तेव्हा तुम्ही त्या बंधू किंवा बहिणीला कशी मदत करू शकता? निष्कर्ष काढण्याआधी व सल्ला देण्याआधी, ऐका! (नीतिसूत्रे १८:१३) विवेचक प्रश्न विचारून त्या व्यक्तीच्या अंतःकरणातील भावना ‘बाहेर काढा.’ (नीतिसूत्रे २०:५) अशा भावनांकडे दुर्लक्ष करू नका—त्यांना जाणून घ्या. निराश झालेल्या व्यक्तीला याची खात्री द्यावी लागेल, की यहोवा आपली काळजी वाहतो व काहीवेळा आपल्या परिस्थिती कदाचित आपल्यावर मर्यादा घालतात हे त्याला समजते. (१ पेत्र ५:७) वडीलजन जेव्हा अशा प्रकारे “समसुखदुःखी” असतात तेव्हा निराश व्यक्तीच्या “जिवास विसावा मिळेल.” (१ पेत्र ३:८; मत्तय ११:२८-३०) अशा प्रकारचा विसावा मिळाल्यावर त्यांना अधिक करण्याची गरज लागणार नाही; ते योग्यरीतीने यहोवाची जितकी सेवा करू शकतात तेवढी करण्यासाठी त्यांचे हृदय त्यांना प्रवृत्त करील.—पडताळा २ करिंथकर ८:१२; ९:७.
२०. या दुष्ट पिढीचा अंत इतक्या जवळ असताना आपण काय करण्याचा दृढनिश्चय केला पाहिजे?
२० खरेच, आपण सर्व मानव इतिहासातील सर्वात कठीण काळात जगत आहोत. आपण अंताच्या जसजसे जवळ येतो तसे सैतानाच्या जगात राहण्याचे दबाव आणखीनच वाढत राहतात. लक्षात ठेवा, शिकारीला निघालेल्या एखाद्या सिंहाप्रमाणे दियाबल, आपण निराश होऊन हार मानावी जेणेकरून तो आपल्याला सहजासहजी त्याचे सावज बनवू शकतो याची वाट पाहतोय. यहोवा थकलेल्यास सामर्थ्य देतो याबद्दल आपण यहोवाचे किती आभारी होऊ शकतो! असेच पुढे चालत राहण्यास आपल्यातील प्रत्येकाला सामर्थ्य मिळावे म्हणून तो ज्या तरतुदी पुरवतो, त्यांचा आपण पूर्ण फायदा घेऊ, जणू काय तो आपल्याला उंच भराऱ्या मारणाऱ्या गरुडाचे पंख देतो. या दुष्ट पिढीचा अंत इतका नजीक असताना, सार्वकालिक जीवनाच्या बक्षिसासाठी आपण ज्या शर्यतीत उतरलो आहोत त्यामध्ये थांबण्याची आता ही वेळ नाही.—इब्रीयांस १२:१.
तुमचे काय उत्तर आहे?
◻ आपल्या प्रार्थनेच्या उत्तराच्या अनुषंगाने यहोवाने काय करण्याची आपण अपेक्षा करू शकतो?
◻ कोणत्या मार्गांद्वारे आपण आपल्या ख्रिस्ती बंधुत्वापासून शक्ती मिळवू शकतो?
◻ देवाचे वचन पुन्हा शक्ती प्राप्त करण्यासाठी कशी मदत करते?
◻ निराश झालेल्यांना पुन्हा शक्ती प्राप्त करण्यास मदत करण्यासाठी वडील काय करू शकतात?
[१७ पानांवरील चित्रं]
आदरातिथ्य दाखवताना उत्तेजनाची गरज असलेल्यांना आपण विसरू नये
[१८ पानांवरील चित्रं]
निराश झालेल्यांना किती प्रेम केले जाते हे समजण्यास मदत करण्यासाठी वडीलजन यहोवाकडे प्रार्थना करू शकतात