राज्य घोषकांचा वृतान्त
“सुवार्तिकाचे काम कर”
सुवार्तिक असणे याचा अर्थ काय होतो? हा शब्द यु·ॲग.गे.लि.स्टेसʹ, या ग्रीक शब्दाचे भाषांतर आहे, ज्याचा यु.ॲग.गेʹली.ऑन, म्हणजे “सुवार्ता” या शब्दाशी जवळचा संबंध आहे. म्हणूनच, सुवार्तिक, हा सुवार्तेचा प्रचारक किंवा संदेशवाहक आहे.
सर्व खरे ख्रिस्ती, सुवार्तिक आहेत कारण ते देव राज्याची सुवार्ता घोषित करतात. यथायोग्यपणे, प्रेषित पौलाने तीमथ्याला बोध केला की, “सुवार्तिकाचे काम कर.” तीमथ्याने आपले काम गंभीरपणे घ्यायचे होते. पौलाने त्यास ‘सर्व गोष्टींविषयी सावध असण्यास’ व ‘सोपविलेली सेवा पूर्ण करण्यास’ अर्जविले.—२ तीमथ्य ४:५.
सुवार्तिक या नात्याने आपणही आपली सेवा गंभीरपणे घेतो आणि प्रत्येक प्रसंगी सुवार्तेची सहभागिता करण्यास ‘सावध असतो’, किंवा तत्पर असतो. यहोवाच्या साक्षीदारांनी अनौपचारिक परिस्थितीत संपर्क साधल्यानंतर अनेकांनी यहोवाबद्दल व त्याच्या अभिवचनांबद्दल जाणून घेतले आहे. बार्बाडोसमधील सेमोर नामक एका मनुष्याच्या बाबतीत अगदी हेच घडले.
सेमोर हा एका सार्वजनिक शाळेत शिक्षक होता. त्याच शाळेतील चार्ल्स नावाचा एक अर्ध-वेळ काम करणारा शिक्षक, यहोवाचा साक्षीदार असून एक तत्पर सुवार्तिक होता. तो पूर्ण वेळेचा सेवक किंवा पायनियर होता व सुवार्तेची सहभागिता इतरांबरोबर करण्यासाठी तो प्रत्येक संधीचा फायदा करून घेत होता. चार्ल्सच्या अनौपचारिक साक्षीद्वारेच सेमोरने राज्याचा संदेश प्रथमच ऐकला होता.
लवकरच सेमोरनेही बायबलच्या सत्यांची सहभागिता होता होईल तितक्या अधिक लोकांबरोबर करण्याचा निश्चय केला. म्हणूनच त्याने आपल्या नौकरीच्या ठिकाणी असलेल्या लोकांबरोबर व विशेषतः आपल्या विद्यार्थ्यांबरोबर अनौपचारिक संभाषण करण्यास सुरू केले. काही राष्ट्रांमध्ये धर्म हा विषय सार्वजनिक शाळांमध्ये शिकवायचा नव्हता तरी ह्या मनुष्याला धार्मिक व नैतिक मूल्ये शिकवण्यास नेमले होते. पण आता बायबल बद्दल मिळविलेल्या नवीन ज्ञानाने या विषयांवरील सेमोरच्या जुन्या दृष्टिकोनांची जागा घेतली होती. मधल्या सुट्टीत तो त्याच्या विद्यार्थ्यांशी नव्या जगाबद्दलच्या देवाने दिलेल्या अभिवचनांबद्दल आणि सार्वकालिक जीवनाच्या आशेबद्दल बोलत असे.
मुलांनी कशी प्रतिक्रिया दाखवली? पुष्कळांनी यहोवाच्या राज्याच्या सुवार्तेबद्दल खरी आस्था दाखवली. काही वेळातच, सेमोर त्याच्या १३ विद्यार्थ्यांबरोबर बायबल अभ्यास चालवू लागला. त्यांची आस्था इतकी होती, की आठवड्यातून दोनदा बायबलचा अभ्यास करण्याचे त्यांनी योजले. सरतेशेवटी, त्यांच्यापैकी पुष्कळ, यहोवाच्या साक्षीदारांच्या स्थानिक सभागृहामध्ये ख्रिस्ती सभेसाठी उपस्थित राहू लागले. आतापर्यंत त्यांच्यातील नऊ जण यहोवाचे समर्पित आणि बाप्तिस्मा घेतलेले साक्षीदार बनले आहेत. सेमोरबद्दल म्हणायचे तर बार्बाडोसमधील यहोवाच्या साक्षीदारांच्या एका मंडळीमध्ये नियमित पायनियर व वडील या नात्याने सेवा करून तो त्याला सोपविलेली सेवा आता पूर्ण करत आहे.
सबंध जगभरामध्ये यहोवाचे साक्षीदार अनौपचारिक साक्षीकार्यात सहभागी होऊन काही अंशी ‘सुवार्तिकांचे काम’ कसे करतात याचे हे केवळ एक उदाहरण आहे. बायबलमध्ये कलस्सैकर ४:५, ६, मध्ये दिलेला बोध ते अनुसरतात जे म्हणते: “बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञतेने वागा; संधि साधून घ्या. तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यावयाचे हे तुम्ही समजावे.”