“शरणपुरात” राहा आणि जगा!
‘प्रमुख याजक मरेपर्यंत त्याला शरणपुरात राहावयाचे होते.’—गणना ३५:२८.
१. रक्ताचा सूड घेणारा कोण आहे आणि तो लवकरच कोणती कारवाई करील?
यहोवातर्फे रक्ताचा सूड घेणारा येशू ख्रिस्त, हल्ला करण्याच्या बेतात आहे. हा सूड घेणारा आपल्या देवदूतीय समूहासह पश्चात्ताप न केलेल्या सर्व रक्तपाती लोकांविरुद्ध लवकरच कारवाई करील. होय, वेगाने येत असलेल्या ‘मोठ्या संकटादरम्यान’ देवाचा दंडाधिकारी या नात्याने येशू कार्य करील. (मत्तय २४:२१, २२; यशया २६:२१) त्यावेळी मानवजात आपल्या रक्तदोषाच्या परिणामांपासून वाचणार नाही.
२. आश्रयाची एकमेव खरी जागा कोणती आहे आणि कोणत्या प्रश्नांना उत्तर देण्याची गरज आहे?
२ बचावाचा मार्ग म्हणजे प्रतिनमुनेदार शरणपुराच्या रस्त्यावरुन जीव वाचवण्यासाठी पळणे होय! नगरात दाखल झाल्यावर शरणार्थीला तेथेच राहावयाचे होते कारण हीच केवळ खऱ्या आश्रयाची जागा होती. परंतु तुम्हाला याचे नवल वाटेल की, ‘आपल्यातील अधिकांश लोकांनी कोणाला कधी ठार मारले नसताना, आपण खरोखर रक्तदोषी आहोत का? येशू रक्ताचा सूड घेणारा का आहे? आधुनिक दिवसातील शरणपुर काय आहे? ते कोणी कधी सुरक्षितपणे सोडू शकला का?’
आपण खरोखर रक्तदोषी आहोत का?
३. आपल्याला मोशेच्या नियमशास्राचे कोणते वैशिष्ट्य, पृथ्वीवरील कोट्यावधी लोक रक्तदोषी असल्याचे पाहण्यास मदत करील?
३ मोशेच्या नियमशास्राची वैशिष्ट्ये, पृथ्वीवरील कोट्यावधी लोक रक्तदोषी असल्याचे पाहण्यास आपली मदत करतील. देवाने इस्राएलावर रक्तपाताची समाईक जबाबदारी ठेवली. मारुन टाकलेला कोणी माणूस आढळला व खूनी अज्ञात असला तर न्यायाधीशांनी जवळचे शहर ठरवण्यासाठी सभोवतालच्या नगरांचे अंतर मोजायचे होते. दोषनिवारण करण्यासाठी त्या रक्तपाती नगराच्या वडीलवर्गाला नांगरणी पेरणी होत नसलेल्या खोऱ्यात कामास कधी न लाखेलेल्या कालवडीची मान मोडायची होती. हे कार्य लेवी याजकांसमोर केले जात होते ‘कारण प्रत्येक हिंसक कृत्यांचा निर्णय व्हावा म्हणून यहोवाने त्यांना निवडले होते.’ नगराच्या वडिलवर्गाने कालवडीवर आपले हात धुतले व म्हटले: “आमच्या हातून हा रक्तपात झाला नाही आणि आम्ही डोळ्यांनी पाहिला नाही. हे परमेश्वरा [यहोवा, NW] ज्या इस्राएल लोकांचा तू उद्धार केला आहेस त्यांना क्षमा कर; तुझ्या इस्राएल लोकांमध्ये निरपराध माणसांच्या हत्येचा दोष राहू देऊ नको.” (अनुवाद २१:१-९) इस्राएलची भूमी रक्ताने किंवा त्याच्या लोकांच्या समाईक रक्तदोषाने दूषित व्हावी, अशी यहोवा देवाची इच्छा नव्हती.
४. रक्तदोषाविषयी मोठ्या बाबेलचा काय अहवाल आहे?
४ होय, समाईक किंवा सामाजिक रक्तदोष अशी एक गोष्ट आहे. खोट्या धर्माचे जगव्याप्त साम्राज्य, मोठ्या बाबेलवर जो मोठा रक्तदोष आहे, त्याचा विचार करा. ती तर यहोवाच्या सेवकांच्या रक्ताने मस्त झाली आहे! (प्रकटीकरण १७:५, ६; १८:२४) ख्रिस्ती धर्मजगताचे धर्म, शांतीच्या राजपुत्राचे अनुकरण करण्याचा दावा करतात परंतु युद्धे, इन्क्विझिशन आणि प्राणघातक धर्मयुद्धे यामुळे ती देवासमोर रक्तदोषी बनली आहे. (यशया ९:६; यिर्मया २:३४) वस्तुतः, या शतकातील दोन जागतिक युद्धात कोट्यावधी लोक मरण पावल्यामुळे अधिकांश दोषास ती जबाबदार असली पाहिजे. यास्तव, खोट्या धर्माचे अनुयायी तसेच मानवी युद्धांना पाठिंबा देणारे आणि त्यात भाग घेणारे देवासमोर रक्तदोषी आहेत.
५. काही लोक इस्राएलातील चुकून मनुष्यवध करणाऱ्यांसारखे कसे ठरले आहेत?
५ काही लोकांनी जाणूनबुजून किंवा निष्काळजीपणामुळे मानवी मृत्यू घडवून आणले आहेत. ही देवाची इच्छा आहे अशी धार्मिक नेत्यांनी कदाचित चिथावणी दिल्यामुळे इतरांनी सामुदायिक कत्तलीत भाग घेतला आहे. आणखी इतरांनी देवाच्या सेवकांचा छळ केला व त्यांना ठार मारले आहे. तथापि, आपण अशा गोष्टी केल्या नसल्या तरी, गमावलेल्या मानवी जीवनाबद्दल सामाजिक जबाबदारीत आपण समाविष्ट आहोत कारण आपल्याला देवाचा नियम आणि इच्छा माहीत नव्हती. ‘ज्याने आपल्या शेजाऱ्याचा चुकून वध केला आणि ज्याचे त्याच्याशी पूर्व वैमनस्य नव्हते’ अशा चुकून मनुष्यवध करणाऱ्यासारखे आपण आहोत. (अनुवाद १९:४) अशा व्यक्तींनी दयेसाठी देवाकडे याचना केली पाहिजे आणि प्रतिनमुनेदार शरणपुरात पळून गेले पाहिजे. नाहीतर रक्ताचा सूड उगविणाऱ्यासोबत त्याचा प्राणघातक सामना होईल.
येशूच्या महत्त्वाच्या भूमिका
६. येशू हा मानवजातीचा जवळचा नातेवाईक आहे, असे का म्हटले जाऊ शकते?
६ इस्राएलात रक्ताचा सूड घेणारा, बळी पडलेल्या व्यक्तीचा जवळचा नातेवाईक होता. पृथ्वीवर मारण्यात आलेल्या सर्वांचा आणि विशेषपणे वध करण्यात आलेल्या यहोवाच्या सेवकांचा सूड घेण्यासाठी आधुनिक दिवसातील रक्ताचा सूड उगविणाऱ्याला सर्व मानवजातीचा जवळचा नातेवाईक व्हावे लागेल. ती भूमिका येशू ख्रिस्ताने पूर्ण केलेली आहे. त्याचा परिपूर्ण मानव असा जन्म झाला होता. त्याने आपले पापरहित जीवन खंडणी यज्ञार्पण या नात्याने मरणाद्वारे अर्पण केले आणि आपल्या पुनरुत्थानानंतर स्वर्गात आदामाच्या मरणोन्मुख पापी वंशजांकरता देवाला याचे मोल सादर केले. अशा प्रकारे, ख्रिस्त रक्ताचा सूड उगवणारा—मानवजातीचा मुक्तिदाता, आपला जवळचा नातेवाईक बनला. (रोमकर ५:१२; ६:२३; इब्रीयांस १०:१२) येशू, त्याच्या पावलांचे अनुसरण करणाऱ्या अभिषिक्त अनुयायांचा बंधू म्हणून ओळखला गेला आहे. (मत्तय २५:४०, ४५; इब्रीयांस २:११-१७) स्वर्गीय राजा या नात्याने तो, पार्थिव प्रजा म्हणून त्याच्या बलिदानापासून लाभ मिळवतील अशांचा “सनातन पिता” बनतो. ते अनंतकाल राहतील. (यशया ९:६, ७) यास्तव, यहोवाने रक्ताचा सूड उगविणारा या नात्याने, मानवजातीच्या या जवळच्या नातेवाईकाला समर्पकपणे नेमले आहे.
७. येशू, थोर प्रमुख याजक या नात्याने, मानवांसाठी काय करतो?
७ येशू हा पापरहित, पारखलेला आणि सहानुभूतीदायक प्रमुख याजक सुद्धा आहे. (इब्रीयांस ४:१५) या अधिकाराने तो पापाचे क्षालन करणाऱ्या त्याच्या बलिदानाची किंमत मानवजातीला लागू करतो. शरणपुरे “इस्राएल लोकांसाठी व त्यांच्यातल्या परक्यासाठी व उपऱ्यासाठी” नेमली होती. (गणना ३५:१५) म्हणून, थोर प्रमुख याजकाने आपल्या बलिदानाची किंमत प्रथम अभिषिक्त अनुयायी, “इस्राएल लोकांसाठी” लागू केली. आता प्रतिनमुनेदार शरणपुरातील ‘परके आणि उपऱ्यांसाठी’ ती लागू केली जात आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची ही “दुसरी मेंढरे” पृथ्वीवर राहण्याची आशा बाळगतात.—योहान १०:१६; स्तोत्र ३७:२९, ३४.
आजचे शरणपूर
८. प्रतिनमुनेदार शरणपूर कोणते आहे?
८ प्रतिनमुनेदार शरणपूर काय आहे? ते लेव्यांच्या सहा शरणपुरांपैकी असलेल्या अथवा इस्राएलाच्या प्रमुख याजकाचे घर असलेल्या हेब्रोनसारखे एखादे भौगोलिक ठिकाण नाही. आजचे शरणपूर, रक्ताच्या पावित्र्याबद्दल देवाच्या आज्ञेचे उल्लंघन केल्यामुळे मृत्यूपासून आपले संरक्षण करणारी देवाची तरतूद आहे. (उत्पत्ति ९:६) जाणूनबुजून अथवा चुकून असले, तरी त्या आज्ञेचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येकाने देवाची क्षमा आणि पापाचे क्षालन प्रमुख याजक, येशू ख्रिस्त याच्या रक्तावर विश्वास ठेवून केले पाहिजे. स्वर्गीय आशा असलेले अभिषिक्त ख्रिश्चन आणि पार्थिव भवितव्य असलेला “मोठा लोकसमुदाय” यांनी पापाचे क्षालन करणाऱ्या यज्ञार्पणाने स्वतःचा फायदा करुन घेतला आहे आणि ते प्रतिनमुनेदार शरणपुरात आहेत.—प्रकटीकरण ७:९, १४; १ योहान १:७; २:१, २.
९. तार्सच्या शौलाने रक्ताबद्दल देवाच्या आज्ञेचे उल्लंघन कसे केले पण त्याने बदललेली मनोवृत्ती कशी दाखवली?
९ ख्रिस्ती होण्याआधी प्रेषित पौलाने, रक्ताविषयीच्या आज्ञेचे उल्लंघन केले होते. तार्सचा शौल म्हणून त्याने येशूच्या अनुयायांचा छळ केला होता आणि त्यांचा खून करण्यासही मान्यता दर्शवली होती. पौलाने म्हटले, “तरी मी जे केले ते न समजून अविश्वासामुळे केले, म्हणून माझ्यावर दया झाली.” (१ तीमथ्य १:१३; प्रेषितांची कृत्ये ९:१-१९) शौलाची पश्चात्तापी वृत्ती असल्याचे नंतरच्या विश्वासाच्या अनेक कृत्यांनी शाबीत झाले. परंतु, प्रतिनमुनेदार शरणपुरात प्रवेश करण्यासाठी खंडणीवरील विश्वासापेक्षा अधिक गोष्टींची आवश्यकता आहे.
१०. चांगला विवेक प्राप्त करणे कसे शक्य आहे आणि तो राखण्यासाठी काय केले पाहिजे?
१० चुकून मनुष्यवध करणाऱ्याने, रक्तपातासंबंधाने देवासमोर त्याचा चांगला विवेक होता हे शाबीत केल्यावरच तो इस्राएलाच्या शरणपुरांपैकी एकामध्ये राहू शकत होता. चांगला विवेक प्राप्त करण्यासाठी आपण येशूच्या बलिदानावर विश्वास प्रदर्शित केला पाहिजे, आपल्या पापाबद्दल पश्चात्ताप केला पाहिजे आणि आपला मार्ग बदलला पाहिजे. ख्रिस्ताद्वारे प्रार्थनापूर्वक समर्पणाने चांगल्या विवेकासाठी आपण देवाकडे विनंती करण्याची गरज आहे व हे पाण्याचा बाप्तिस्मा घेऊन चिन्हांकित केले पाहिजे. (१ पेत्र ३:२०, २१) हा चांगला विवेक, यहोवासोबत शुद्ध नातेसंबंध प्राप्त करण्याची आपल्याला अनुमती देतो. चांगला विवेक राखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे, आश्रयनगरातील आश्रितांना ज्याप्रमाणे नियमशास्राचे पालन करुन आपली नियुक्त कार्ये पूर्ण करावयाची होती त्याचप्रमाणे देवाच्या अपेक्षांनुसार वागणे आणि प्रतिनमुनेदार शरणपुरात आपल्याला दिलेले कार्य करणे होय. यहोवाच्या लोकांसाठी आज, राज्याचा संदेश घोषित करणे हे प्रमुख कार्य आहे. (मत्तय २४:१४; २८:१९, २०) ते कार्य केल्याने, आधुनिक दिवसाच्या शरणपुरातील उपयुक्त रहिवाश्यांप्रमाणे होण्याची मदत आपल्याला मिळेल.
११. आजच्या शरणपुरात सुरक्षित राहण्यासाठी आपण काय टाळले पाहिजे?
११ आजचे शरणपूर सोडणे म्हणजे स्वतःला नाशात ढकलण्यासारखे आहे, कारण रक्ताचा सूड उगविणारा लगेच रक्तदोषी असणाऱ्यांविरुद्ध त्वरेने कार्य करील. ही वेळ, या संरक्षणात्मक शहराच्या बाहेर किंवा या शहराच्या गायरानाच्या सीमेजवळ असलेल्या धोकादायक क्षेत्रात पकडले जाण्याची नाही. जर आपण पापाचे क्षालन करणाऱ्या प्रमुख याजकाच्या बलिदानावरील विश्वास गमावला, तर प्रतिनमुनेदार शरणपुराबाहेर असू. (इब्रीयांस २:१; ६:४-६) आपण जगीक मार्ग पत्करले, यहोवाच्या संघटनेच्या कड्यावरच थांबलो किंवा आपल्या स्वर्गीय पित्याच्या नीतिमान दर्जांपासून दूर गेलो तरीही सुरक्षित राहणार नाही.—१ करिंथकर ४:४.
शरणपुरातून मुक्त
१२. प्रतिनमुनेदार शरणपुरात पूर्वी रक्तदोषी असलेल्यांनी किती काळ राहिले पाहिजे?
१२ इस्राएलातील चुकून मनुष्यवध करणाऱ्याला “मुख्य याजक मरेपर्यंत” शरणपुरात राहावयाचे होते. (गणना ३५:२८) यास्तव, पूर्वीच्या रक्तपाती व्यक्तींनी प्रतिनमुनेदार शरणपुरात किती काळ राहिले पाहिजे? त्यांना प्रमुख याजक, येशू ख्रिस्ताच्या सेवेची गरज भासणार नाही तोवर. पौलाने म्हटले: “ह्याच्या द्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे.” (इब्रीयांस ७:२५) जोवर पापाचे कोणतेही दूषण व आधीचा रक्तपात होत राहील, तोवर प्रमुख याजकाच्या सेवेची आवश्यकता आहे जेणेकडून अपरिपूर्ण मानवांची देवासमोर उत्तम भूमिका राहू शकते.
१३. आधुनिक दिवसातील ‘इस्राएल लोक’ कोण आहेत व त्यांनी “शरणपुरात” किती काळ राहिले पाहिजे?
१३ प्राचीन शरणपुरांची प्रस्थापना “इस्राएली लोकांसाठी,” परक्यांसाठी व उपऱ्यांसाठी करण्यात आली होती, हे लक्षात घ्या. ‘इस्राएल लोक’ आध्यात्मिक इस्राएली आहेत. (गलतीकर ६:१६) या पृथ्वीवर जिवंत राहतील तोवर त्यांना प्रतिनमुनेदार शरणपुरात राहिले पाहिजे. का बरे? कारण ते अजूनही अपरिपूर्ण देहात आहेत आणि म्हणून त्यांना त्यांच्या स्वर्गीय प्रमुख याजकाच्या क्षालन करणाऱ्या किंमतीची गरज आहे. परंतु, या अभिषिक्त ख्रिश्चनांचा मृत्यू होऊन त्यांचे आत्मिक जीवनाकरता स्वर्गात पुनरुत्थान होते तेव्हा त्यांना प्रमुख याजकाच्या क्षालन करणाऱ्या सेवांची आवश्यकता असणार नाही; त्यांनी आपला देह व त्याजशी संबंधित असणाऱ्या रक्तदोषाला सर्वकाळाकरता सोडलेले असेल. अशा पुनरुत्थित अभिषिक्त जनांकरता, प्रमुख याजक क्षालन करणारा आणि संरक्षणात्मक या नात्याने तो मरण पावलेला असेल.
१४. स्वर्गीय भवितव्य असणाऱ्यांनी आजच्या शरणपुरात राहण्यासाठी आणखी कशाची आवश्यकता आहे?
१४ मानवी स्वभाव असल्यामुळे ‘ख्रिस्ताबरोबर सोबतीचे स्वर्गीय वारीस’ होतील अशांना प्रतिनमुनेदार शरणपुरात त्यांचे पार्थिव कार्य विश्वासूपणे मृत्यूत संपवेपर्यंत राहण्याची आवश्यकता आहे. ते मरतील तेव्हा, मानवी स्वभावाचा त्याग करतील. (रोमकर ८:१७; प्रकटीकरण २:१०) येशूचे बलिदान मानवी स्वभाव असणाऱ्यांनाच लागू होते. या कारणास्तव, “ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी” म्हणून स्वर्गात अनंतकाळ राहतील अशा आध्यात्मिक इस्राएलांचे, आत्मिक प्राणी या नात्याने पुनरुत्थान होते तेव्हा त्यांच्यासाठी प्रमुख याजकाचा मृत्यू होतो.—२ पेत्र १:४.
१५. आधुनिक दिवसातील ‘परके’ आणि ‘उपरे’ कोण आहेत आणि थोर प्रमुख याजक त्यांच्यासाठी काय करील?
१५ आधुनिक दिवसातील ‘परक्यांना’ आणि ‘उपऱ्यांना’ प्रतिनमुनेदार शरणपूर सोडण्याची अनुमती मिळावी म्हणून प्रमुख याजकाचा ‘मृत्यू’ केव्हा होईल? हे मोठ्या लोकसमुदायातील सदस्य मोठ्या संकटानंतर लगेच या शरणपुरातून बाहेर येऊ शकत नाहीत. का नाही बरे? कारण ते अजूनही त्यांच्या अपरिपूर्णावस्थेत, पापमय देहात असतील आणि त्यांना प्रमुख याजकाच्या संरक्षणात राहण्याची गरज असेल. हजार वर्षांच्या राजपद आणि याजकपदाच्या दरम्यान, त्याच्या क्षालन करण्याच्या सेवांपासून फायदा करुन घेण्याद्वारे ते मानवी परिपूर्णतेप्रत पोहंचतील. सैतान व त्याच्या दुरात्म्यांना थोडा वेळ मुक्त करण्याद्वारे, येशू त्यांची अंतिम, सर्वकाळाकरता निर्णायक सत्त्वपरीक्षा घेण्यासाठी मग त्यांना देवाकडे सोपवून देईल. ईश्वरी मान्यतेसह या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यामुळे, यहोवा त्यांना नीतिमान घोषित करील. अशारीतीने, ते मानवी परिपूर्णतेप्रत पूर्ण अर्थाने पोहचतील.—१ करिंथकर १५:२८; प्रकटीकरण २०:७-१०.a
१६. मोठ्या संकटातून बचावणाऱ्यांना क्षालन करणाऱ्या प्रमुख याजकाच्या सेवेची आणखी आवश्यकता का लागणार नाही?
१६ या कारणास्तव, मोठ्या संकटातून बचावलेल्यांना ख्रिस्ताच्या हजार वर्षीय राजवटीच्या अंतापर्यंत प्रतिनमुनेदार शरणपुरात राहण्याद्वारे चांगला विवेक राखावा लागेल. परिपूर्ण मानव या नात्याने, येथून पुढे त्यांना प्रमुख याजकाच्या क्षालन करणाऱ्या सेवेची आवश्यकता भासणार नाही आणि त्याच्या संरक्षणातून ते मुक्त होतील. मग येशू, प्रमुख याजक या नात्याने त्यांच्यासाठी मरेल कारण त्याच्या बलिदानाच्या शुद्ध करणाऱ्या रक्ताने त्यांच्यावतीने कार्य करण्याची गरज भासणार नाही. त्यावेळी ते प्रतिनमुनेदार शरणपूर सोडतील.
१७. ख्रिस्ताच्या हजार वर्षीय राजवटीदरम्यान पुनरुत्थितांना प्रतिनमुनेदार शरणपुरात प्रवेश करुन तेथे राहण्याची आवश्यकता का असणार नाही?
१७ हजार वर्षीय राजवटीदरम्यान पुनरुत्थित झालेल्यांनी प्रतिनमुनेदार शरणपुरात जाऊन प्रमुख याजक मरेपर्यंत राहिले पाहिजे का? नाही, कारण मरणामुळे त्यांनी त्यांच्या पापाची शिक्षा भोगली. (रोमकर ६:७; इब्रीयांस ९:२७) तथापि, प्रमुख याजक परिपूर्णतेप्रत पोहंचण्यास त्यांना मदत करील. हजार वर्षांनंतर ते परीक्षेत यशस्वीपणे उत्तीर्ण झाल्यास, देव त्यांना पृथ्वीवर अनंतकाळच्या जीवनाच्या हमीसह नीतिमान असे देखील घोषित करील. अर्थातच, देव अपेक्षा करतो त्याप्रमाणे करण्यात अपयश आल्यास, सचोटी रक्षक या नात्याने झालेल्या अंतिम परीक्षेत जे मानव उत्तीर्ण होणार नाहीत अशा सर्वांवर दोषी ठरवणारा न्यायदंड आणि नाश येईल.
१८. येशूचे राजपद आणि याजकपद यांविषयी, मानवजातीजवळ कोणती गोष्ट सर्वकाळ राहील?
१८ इस्राएली प्रमुख याजक शेवटी मरण पावले. परंतु येशू “मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे युगानुयुगीचा प्रमुख याजक झालेला” आहे. (तिरपे वळण आमचे.) (इब्रीयांस ६:१९, २०; ७:३) यास्तव, मानवजातीसाठी मध्यस्थी करणारा प्रमुख याजक या नात्याने त्याच्या अधिकारातील खंडामुळे त्याच्या जीवनाचा अंत होत नाही. राजा व प्रमुख याजक या नात्याने त्याच्या सेवेचे चांगले परिणाम मानवजातीवर चिरकाल राहतील आणि या योग्यतेत सेवा केल्यामुळे मानव सर्वकाळ त्याचे ऋणी असतील. याशिवाय, येशू अनंतकाळापर्यंत यहोवाच्या शुद्ध भक्तीसाठी पुढाकार घेईल.—फिलिप्पैकर २:५-११.
आपल्यासाठी मोलवान धडे
१९. शरणपुरांच्या तरतूदीपासून द्वेष व प्रेमाबद्दल कोणता धडा शिकला जाऊ शकतो?
१९ आज आपण शरणपुरांच्या तरतूदींपासून विविध धडे शिकू शकतो. उदाहरणार्थ, बळी पडणाऱ्याचा द्वेष बाळगून खून करणाऱ्या कोणाही व्यक्तीला शरणपुरात राहण्याची अनुमती दिली जात नव्हती. (गणना ३५:२०, २१) अशा रितीने, प्रतिनमुनेदार शरणपुरात राहणारा एखादा त्याच्या अंतःकरणात आपल्या भावाबद्दल द्वेषाची भावना विकसित करण्याची अनुमती कशी देऊ शकतो बरे? प्रेषित योहानाने लिहिले, “जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करितो तो नरहिंसक आहे; आणि कोणाही नरहिंसकाच्या ठायी सार्वकालिक जीवन राहत नाही, हे तुम्हास माहीत आहे.” यास्तव, “आपण लोकांवर प्रीति करावी, कारण प्रीति देवापासून आहे.”—१ योहान ३:१५; ४:७.
२०. रक्ताचा सूड घेणाऱ्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी प्रतिनमुनेदार शरणपुरातील लोकांनी काय केले पाहिजे?
२० रक्ताचा सूड उगवणाऱ्यापासून संरक्षण मिळण्यासाठी, चुकून मनुष्यवध करणाऱ्यांना शरणपुरात राहावयाचे होते आणि त्याच्या गायरानापासून दूर जायचे नव्हते. प्रतिनमुनेदार शरणपुरात असलेल्यांविषयी काय? रक्ताचा सूड घेणाऱ्या थोरापासून संरक्षण मिळण्यासाठी त्यांनी शहर सोडू नये. वस्तुतः, त्यांनी गायरानाजवळ जाण्याच्या प्रलोभापासून दक्ष राहण्याची गरज आहे, असे म्हटले जाऊ शकते. सैतानी जगाबद्दल त्यांनी आपल्या अंतःकरणात प्रेम विकसित न करण्याची खबरदारी घेतली पाहिजे. यासाठी प्रार्थना आणि प्रयत्नांची गरज आहे, परंतु, यावरच त्यांचे जीवन आधारित आहे.—१ योहान २:१५-१७; ५:१९.
२१. आजच्या शरणपुरात लोकांकडून कोणते फलदायी कार्य केले जात आहे?
२१ प्राचीन शरणपुरातील चुकून मनुष्यवध करणाऱ्यांना फलदायी कर्मचारी असावयाचे होते. अशाच रितीने, ‘इस्राएल लोकांच्या’ अभिषिक्तांनी कापणी करणारे व राज्याचे उद्घोषक या नात्याने उत्तम उदाहरण मांडले आहे. (मत्तय ९:३७, ३८; मार्क १३:१०) आजच्या शरणपुरात “परके” आणि ‘उपरी’ म्हणून पार्थिव भवितव्य असणाऱ्या ख्रिश्चनांना, अद्याप पृथ्वीवर असलेल्या अभिषिक्तांसोबत हे जीवन वाचवणारे कार्य करण्याचा विशेषाधिकार आहे. हे कार्य किती प्रतिफलदायक आहे! प्रतिनमुनेदार शरणपुरात विश्वासूपणे सेवा करणारे रक्ताचा सूड घेणाऱ्याच्या हातून सार्वकालिक मृत्यू होण्यापासून वाचतील. उलटपक्षी, ते देवाचा थोर प्रमुख याजक या नात्याने केलेल्या त्याच्या सेवेपासून अनंतकाळचे फायदे मिळवतील. तुम्ही शरणपुरात वस्ती करून सर्वकाळ जिवंत राहाल का?
[तळटीपा]
a टेहळणी बुरूज डिसेंबर १५, १९९१ (इंग्रजी), पृष्ठ १२, परिच्छेद १५, १६ पाहा.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
◻ पृथ्वीवरील अब्जावधी लोक रक्तदोषी असल्याचे का म्हटले जाऊ शकते?
◻ मानवजातीसंबंधाने येशू कोणत्या भूमिका पूर्ण करतो?
◻ प्रतिनमुनेदार शरणपूर काय आहे आणि एखादा त्यात कसा प्रवेश करतो?
◻ लोक प्रतिनमुनेदार शरणपुरातून केव्हा मुक्त होतील?
◻ शरणपुरांच्या तरतूदीपासून आपण कोणते मोलवान धडे शिकू शकतो?
[१६ पानांवरील चित्रं]
येशू ख्रिस्त कोणत्या महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?