वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 ११/१५ पृ. १०-१४
  • शरणपुरे —देवाची दयाळू तरतूद

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • शरणपुरे —देवाची दयाळू तरतूद
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • खुनी व्यक्‍तींसाठी आश्रयस्थान?
  • यहोवाची दयाळू तरतूद
  • आश्रयासाठी पलायन
  • मनुष्यघातकांची चौकशी होत असताना
  • शरणपुरातील जीवन
  • चिरस्थायी परिणाम
  • तुम्ही यहोवाचा आश्रय घेत आहात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • “शरणपुरात” राहा आणि जगा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • यहोवाचा आश्रय घ्या
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • ‘यहोवाच्या नावात आश्रय घ्या’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 ११/१५ पृ. १०-१४

शरणपुरे —देवाची दयाळू तरतूद

‘ही सहा नगरे एखाद्याने चुकून मनुष्यवध केला तर त्याने तिकडे पळून जावे म्हणून नेमली आहेत.’—गणना ३५:१५.

१. जीवन आणि रक्‍तपाताबद्दल देवाचा काय दृष्टिकोन आहे?

यहोवा देव मानवी जीवनाला पवित्र समजतो. कारण रक्‍तात जीवन आहे. (लेवीय १७:११, १४) तथापि, पृथ्वीवर जन्मलेला पहिला मानव काईन याने त्याचा भाऊ हाबेलचा खून केल्यावर रक्‍तदोष ओढवून घेतला. परिणामतः, देवाने काईनाला म्हटले: “तुझ्या भावाचे रक्‍त भूमीतून मजकडे ओरड करीत आहे.” खुनाच्या घटनास्थळी भूमीवर सांडलेल्या रक्‍ताने निर्दयीपणे खुंटवलेल्या जीवनाची जोरदार पण मूक साक्ष दिली. हाबेलच्या रक्‍ताने देवाकडे सुडाकरता ओरड केली.—उत्पत्ति ४:४-११.

२. जलप्रलयानंतर यहोवाचा जीवनाबद्दलचा आदर यावर कसा जोर देण्यात आला?

२ मानवी जीवनाबद्दल देवाच्या आदरावर, नीतिमान नोहा व त्याचे कुटुंब जगव्याप्त जलप्रलयातून उत्तरजीवी या नात्याने जहाजातून बाहेर पडले तेव्हा अधिक जोर देण्यात आला. त्यावेळी यहोवाने मानवजातीच्या आहारात प्राण्यांच्या मांसाचा देखील समावेश केला. पण या आहारात रक्‍ताचा समावेश नव्हता. त्याने अशी देखील आज्ञा दिली: “मी तुमच्या रक्‍ताबद्दल म्हणजे तुमच्या जिवाबद्दल झडती घेईन; प्रत्येक पशूची व मनुष्याची झडती घेईन; प्रत्येक मनुष्याची त्याच्या भावाच्या जिवाबद्दल झडती घेईन. जो कोणी मनुष्याचा रक्‍तपात करील त्याचा रक्‍तपात मनुष्याकडून होईल; कारण देवाने मनुष्य आपल्या प्रतिरूपाचा उत्पन्‍न केला आहे.” (उत्पत्ति ९:५, ६) बळी पडलेल्या व्यक्‍तीच्या जवळच्या नातेवाईकाला मनुष्यवध करणारा सापडल्यास त्याला जिवे मारावे या हक्काला यहोवाने मान्यता दिली.—गणना ३५:१९.

३. मोशेच्या नियमशास्राने जीवनाच्या पावित्र्यावर कसा जोर दिला?

३ इस्राएलांना मोशे संदेष्ट्याद्वारे देण्यात आलेल्या नियमशास्रात जीवनाबद्दलच्या पावित्र्यावर पुनःपुन्हा जोर देण्यात आला होता. उदाहरणार्थ, देवाने आज्ञापिले: “खून करू नको.” (निर्गम २०:१३) मोशेच्या नियमशास्रात गर्भवती स्रीचा समावेश असणाऱ्‍या प्राणहानीबद्दल जे सांगितले त्यात देखील जीवनाबद्दलचा आदर दिसत होता. नियमशास्राने दोन पुरुषांची आपसात मारामारी चालली असता तिला किंवा तिच्या गर्भाला प्राणघातक मार लागला तर न्यायाधीशांनी वस्तुस्थिती आणि बुद्धिपुरस्सरपणाची मर्यादा विचारात घ्यावयाची होती पण “जिवाबद्दल जीव,” किंवा प्राणाबद्दल प्राण अशी शिक्षा असू शकत होती हे स्पष्ट केले. (निर्गम २१:२२-२५) तथापि, एखादी इस्राएली खुनी व्यक्‍ती तिच्या हिंसक कृत्याच्या परिणामांपासून कशीतरी बचावली जाऊ शकत होती का?

खुनी व्यक्‍तींसाठी आश्रयस्थान?

४. गतकाळात, इस्राएलाच्या बाहेर कोणती आश्रयस्थाने अस्तित्वात होती?

४ इस्राएल राष्ट्राव्यतिरिक्‍त इतर राष्ट्रांमध्ये, खुनी व्यक्‍ती आणि इतर गुन्हेगारांकरता पवित्र स्थान किंवा आश्रयस्थानी राहण्याची मान्यता दिली. हीच गोष्ट, प्राचीन इफिसमधील आर्टिमिस्‌ देवताच्या मंदिरातील जागेच्या बाबतीत होती. यासारख्या ठिकाणांबद्दल, असा अहवाल दिला: “काही पवित्र स्थळांमुळे गुन्हेगारांच्या संख्येत वाढ होत होती; त्यामुळे अनेकदा आश्रयस्थानांची संख्या मर्यादित करण्याची आवश्‍यकता भासली. अथेन्समध्ये आश्रयस्थाने म्हणून केवळ काही विशिष्ट पवित्रस्थानेच कायद्याने मान्यता प्राप्त होते (उदाहरणार्थ, दासांकरता थेसियसचे मंदिर); टायबेरियसच्या काळात पवित्रस्थानातील गुन्हेगारांची टोळी इतकी धोकेदायक झाली की त्यामुळे (वर्ष २२ मध्ये) आश्रयस्थाने काही नगरांपुरतीच मर्यादित करण्यात आली.” (द ज्युईश एन्सायक्लोपिडीया, १९०९, खंड २, पृष्ठ २५६) नंतर, ख्रिस्ती धर्मजगताची चर्च आश्रयस्थाने बनली पण यामुळे नागरी अधिकाऱ्‍यांकडील अधिकार याजकपदाकडे आला आणि उचित न्यायदानाच्या विरूद्ध कार्य केले गेले. शेवटी, दुरुपयोगामुळे या व्यवस्थेचा अंत झाला.

५. कोणी ठार मारला गेल्यावर, निष्काळजीपणाचे कारण सांगून दयेची याचना करण्यासाठी नियमशास्राने अनुमती दिली नाही, याला काय पुरावा आहे?

५ इस्राएल लोकांमध्ये, जाणूनबुजून खून करणाऱ्‍याला पवित्रस्थानात किंवा आश्रयस्थानात अनुमती दिली जात नव्हती. कपटाने घात केल्यामुळे देवाच्या वेदीजवळ सेवा करणाऱ्‍या लेवी याजकाचा देखील वध केला जात असे. (निर्गम २१:१२-१४) याशिवाय, कोणाच्या निष्काळजीपणामुळे एखादी व्यक्‍ती जिवे मारली गेल्यास, दयेची याचना करण्याची अनुमती नियमशास्रात दिली नव्हती. उदाहरणार्थ, एखाद्या मनुष्याने नवीन घराच्या धाब्याला कठडा बांधावयाचा होता. नाहीतर, धाब्यावरुन पडून कोणी मरण पावल्यास त्या घरावर रक्‍तदोष येत होता. (अनुवाद २२:८) याशिवाय, समजा हुंदडणाऱ्‍या बैलाच्या मालकाला आधीच सूचना दिली असतानाही, त्याने त्याच्या बैलाला आवरले नाही व बैलाने एखाद्याला जिवे मारले, तर बैलाचा मालक रक्‍तदोषी असल्यामुळे त्याला जिवे मारले जाऊ शकत होते. (निर्गम २१:२८-३२) याशिवाय, एखादा घुसखोर चोरी करताना आढळला व ओळखला जाऊ शकत असताना कोणा व्यक्‍तीने त्या चोरावर दिवसा प्राणघातक हल्ला केल्यास ती व्यक्‍ती रक्‍तदोषी होती, यावरुन देवाची जीवनाबद्दलची विशेष कदर स्पष्टपणे दिसून येते. (निर्गम २२:२, ३) मग स्पष्टपणे, देवाचे पूर्णपणे संतुलित नियम जाणूनबुजून खून केलेल्या खुन्यांचा देहान्त शिक्षेपासून बचाव करीत नाहीत.

६. प्राचीन इस्राएलात, “जिवाबद्दल जीव” हा नियम कसा पूर्ण केला जात असे?

६ प्राचीन इस्राएलात, खून केला असल्यास, बळी पडलेल्याच्या रक्‍ताचा सूड घ्यावयाचा होता. खुनी व्यक्‍तीला ठार मारून ‘रक्‍ताचा सूड घेणाऱ्‍याकडून’ “जिवाबद्दल जीव” हा नियम पूर्ण केला जात असे. (गणना ३५:१९) सूड घेणारा, खून झालेल्या व्यक्‍तीचा जवळचा नातेवाईक असे. परंतु, चुकून मनुष्यवध करणाऱ्‍यांविषयी काय?

यहोवाची दयाळू तरतूद

७. एखाद्या व्यक्‍तीला कोणी चुकून जिवे मारल्यास अशांसाठी देवाने कोणती तरतूद केली होती?

७ कोणी नकळत अथवा चुकून कोणाला जिवे मारल्यास अशांकरता देवाने शरणपुरांची प्रेमळपणे व्यवस्था केली होती. यांच्याबद्दल मोशेला असे सांगण्यात आले होते: “इस्त्राएल लोकांना सांग: ‘यार्देन ओलांडून तुम्ही कनान देशात पोहंचाल तेव्हा तुमच्याकरिता शरणपुरे म्हणून काही नगरे ठरवा; म्हणजे कोणाच्या हातून चुकून मनुष्यवध झाला तर त्याने तेथे पळून जावे. सूड उगविणाऱ्‍यापासून आश्रयस्थानांदाखल ही नगरे तुमच्या उपयोगी पडतील, आणि खुनी मनुष्याचा मंडळीसमोर न्याय होईपर्यंत त्याला कोणी मारून टाकू नये. जी नगरे तुम्ही द्याल त्यांपैकी सहा तुमची शरणपुरे असावी. तीन नगरे यार्देनेच्या पूर्वेस द्यावी आणि तीन नगरे कनान देशात द्यावी; ही शरणपुरे होत. ही सहा नगरे . . . एखाद्याने चुकून मनुष्यवध केला तर त्याने तिकडे पळून जावे,’” यासाठी असतील.—गणना ३५:९-१५.

८. शरणपुरे कोठे वसलेली होती आणि चुकून मनुष्यवध झालेल्यांना तेथे पोहंचण्यास कशी मदत केली जात होती?

८ इस्राएल लोकांनी वाग्दत्त देशात प्रवेश केला तेव्हा त्यांनी आज्ञापालन करून सहा शरणपुरे प्रस्थापित केली. यांपैकी तीन नगरे—केदेश, शखेम आणि हेब्रोन—यार्देन नदीच्या पश्‍चिमेकडे होती. यार्देन नदीच्या पूर्वेकडे गोलान, रामोथ आणि बेसेर ही शरणपुरे होती. ही सहा शरणपुरे चांगल्या स्थितीत ठेवलेल्या रस्त्याच्या जवळपास सोईस्कर ठिकाणी होती. या रस्त्याच्या कडेला उचित ठिकाणी “शरण” असा शब्द असणारी चिन्हे होती. या चिन्हांनी शरणपुराची दिशा दाखवलेली होती व चुकून मनुष्यवध केलेली व्यक्‍ती जीवन वाचवण्यासाठी जवळच्या एका नगरात पळून जात होती. तेथे रक्‍तपाताचा सूड घेणाऱ्‍यापासून त्याला संरक्षण मिळत असे.—यहोशवा २०:२-९.

९. यहोवाने शरणपुरांची व्यवस्था का केली आणि कोणाच्या लाभास्तव ती पुरवण्यात आली होती?

९ देवाने शरणपुरांची तरतूद का केली होती? ही शरणपुरे, देश निर्दोष रक्‍तापासून भ्रष्ट होऊ नये आणि लोकांवर रक्‍तदोष येऊ नये म्हणून पुरवली गेली होती. (अनुवाद १९:१०) शरणपुरांची तरतूद कोणाच्या लाभाकरता करण्यात आली होती? नियमशास्रात असे म्हटले होते: “ही सहा नगरे इस्त्राएल लोकांसाठी व त्यांच्यातल्या परक्यासाठी व उपऱ्‍यासाठी आश्रयस्थाने म्हणून नेमिली आहेत; एखाद्याने चुकून मनुष्यवध केला तर त्याने तिकडे पळून जावे.” (गणना ३५:१५) अशाप्रकारे, यहोवा इस्राएल लोकांना दया दाखवत असताना प्रामाणिक असण्यास आणि न्यायाचे उद्देश पूर्ण करण्याकरता, चुकून मनुष्यवध करणारे (१) इस्राएल लोक, (२) इस्राएलातील परके किंवा (३) देशात राहत असलेल्या इतर देशातील उपऱ्‍यांकरता शरणपुरे वेगळी ठेवण्यास सांगितले.

१०. शरणपुरे यहोवाकडील दयाळुपणाची तरतूद होती, असे का म्हटले जाऊ शकते?

१० एखाद्या व्यक्‍तीकडून चुकून मनुष्यवध झाला असला, तरी ‘जो कोणी मनुष्याचे रक्‍त सांडतो त्याचेही रक्‍त मनुष्याकडून सांडले जाईल,’ या देवाच्या आज्ञेनुसार तिला जिवे मारले जावयाचे होते. या कारणास्तव, चुकून मनुष्यवध केलेली व्यक्‍ती केवळ यहोवाच्या दयाळू योजनेमुळे शरणपुरांमध्ये पळून जाऊ शकत होती. रक्‍तपाताचा सूड उगविणाऱ्‍यापासून पळणाऱ्‍या व्यक्‍तीविषयी लोकांना सर्वसामान्यपणे सहानुभूती वाटत होती हे उघड आहे; कारण त्या सर्वांना, त्यांच्या हातून असाच चुकून गुन्हा घडू शकेल आणि त्यांना देखील आश्रय व दयेची गरज लागेल याची जाणीव होती.

आश्रयासाठी पलायन

११. प्राचीन इस्राएलात, एखाद्या मनुष्याने आपल्या सह कर्मचाऱ्‍याला नकळत ठार मारले, तर तो काय करू शकत होता?

११ आश्रयासाठी देवाच्या दयाळू व्यवस्थेबद्दल एक दाखला तुमची गुणग्राहकता वाढवील. तुम्ही प्राचीन इस्राएलात लाकूड तोडणारे पुरुष आहात, अशी कल्पना करा. समजा, दांड्यातून कुऱ्‍हाड निसटून ती एखाद्या सह कर्मचाऱ्‍याला प्राणघातकरित्या लागली. तर तुम्ही काय कराल? नियमशास्रात या परिस्थितीकरता तरतूद केली होती. निःसंशये, देवाने पुरवलेल्या तरतूदीचा तुम्ही लाभ घ्याल: “मनुष्यवध करणाऱ्‍याने तेथे पळून जाऊन आपला प्राण वाचविण्याची केलेली सोय अशी: पूर्वीचे वैर नसताना जर कोणी चुकून आपल्या शेजाऱ्‍याला ठार मारिले, तर त्याने तेथे [शरणपुरात] जावे. उदाहरणार्थ, एखादा मनुष्य आपल्या शेजाऱ्‍याबरोबर लाकडे तोडावयाला रानात गेला आणि झाड तोडताना त्यावर त्याने कुऱ्‍हाडीचा घाव घातला व ती दांड्यातून निसटून त्याच्या शेजाऱ्‍याला लागली व तो मेला तर त्या माणसाने त्यातल्या एका नगरात पळून जाऊन आपला प्राण वाचवावा.” (अनुवाद १९:४, ५) तथापि, तुम्ही शरणपुरात गेला, तरी जे काही घडले त्याच्या जबाबदारीपासून पूर्णपणे मुक्‍त होणार नाही.

१२. चुकून मनुष्यवध करणारी व्यक्‍ती शरणपुरात पोहंचल्यावर कोणती कार्यपद्धती अनुसरली जात असे?

१२ तुम्हाला आदरातिथ्य दाखवून शरणपुरात घेण्यात आले असले तरी, शरणपुराच्या सीमेतील वडिलांजवळ तुम्हाला परिस्थिती सांगावी लागली असती. त्या शहरात प्रवेश केल्यावर, मारण्यात आलेल्या जागेवर ज्या नगराची अधिकारिता आहे तेथील सीमेवर इस्राएलाच्या मंडळीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्‍या वडिलांसमोर न्यायासाठी उभे राहण्यास पुन्हा पाठवले गेले असते. तेथे स्वतःला निर्दोष शाबीत करण्याची संधी तुम्हाला मिळाली असती.

मनुष्यघातकांची चौकशी होत असताना

१३, १४. मनुष्यवध करणाऱ्‍याच्या चौकशीत वडिलांना कोणत्या काही गोष्टींचा शोध करावासा वाटेल?

१३ अधिकारिता असलेल्या शहराच्या सीमेच्या वडिलांसमोरील चौकशी दरम्यान, तुमच्या गत काळातील वर्तनावर अधिक जोर दिल्याचे तुम्हाला कृतज्ञतेने पाहावयास मिळाले असते, यात शंका नाही. वडील, बळी पडलेल्यासोबतच्या तुमच्या नातेसंबंधाला काळजीपूर्वक तोलून पाहतील. तुम्ही त्या मनुष्याचा द्वेष करत होता, त्याच्या घातासाठी टपून बसला होता आणि जाणूनबुजून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता का? असे असल्यास, वडिलांना तुम्हाला रक्‍तपाताचा सूड घेणाऱ्‍याच्या स्वाधीन करावे लागेल आणि तुम्हाला जीवास मुकावे लागेल. या जबाबदार पुरुषांना, ‘निरपराध माणसाच्या हत्येचा दोष इस्राएलातून काढून टाकण्याच्या’ नियमशास्रातील आवश्‍यकतेची जाणीव असे. (अनुवाद १९:११-१३) तुलनात्मकरित्या, आज न्यायदानाच्या कारवाईत, ख्रिस्ती वडिलांना शास्रवचनांची चांगली माहिती असली पाहिजे व त्याच्या एकवाक्यतेत त्यांनी अपराध करणाऱ्‍या व्यक्‍तीची गत काळातील प्रवृत्ती आणि तिच्या वर्तनाचा विचार करून कार्य केले पाहिजे.

१४ नगराचे वडील, दयाळूपणे कसून तपासणी करुन तुम्ही ठार मारण्याच्या हेतूने बळी पडलेल्या व्यक्‍तीला मारले का, हे जाणून घेतील. (निर्गम २१:१२, १३) तुम्ही त्याच्यावर गुप्तपणे हल्ला केला का? (अनुवाद २७:२४) तुम्ही त्या व्यक्‍तीवर अतिशय क्रोधाविष्ट झाल्यामुळे घात करण्यासाठी कपटाने योजना केली होती का? तसे असल्यास, तुम्ही मृत्यूस पात्र ठराल. (निर्गम २१:१४) विशेषपणे, बळी पडलेली व्यक्‍ती आणि तुमच्यात काही वैर किंवा द्वेष असल्यास वडिलांना हे माहीत करुन घेण्याची गरज असेल. (अनुवाद १९:४, ६, ७; यहोशवा २०:५) वडिलांना तुम्ही निर्दोष असल्याचे आढळले आणि तुम्हाला शरणपुरात परत नेले असे आपण गृहीत धरू या. दाखवलेल्या दयेबद्दल तुम्ही किती कृतज्ञ असाल!

शरणपुरातील जीवन

१५. चुकून मनुष्यवध करणाऱ्‍यावर कोणत्या अटी लादल्या जात होत्या?

१५ चुकून मनुष्यवध केलेल्या व्यक्‍तीला शरणपुरात किंवा त्याच्या भिंतीच्या बाहेरील १,००० क्युबीट्‌स (सुमारे १,४५० फुट) अंतराच्या आत राहावे लागत असे. (गणना ३५:२-४) तो त्या सीमेच्या बाहेर गेल्यास, कदाचित त्याला रक्‍तपाताचा सूड उगविणाऱ्‍याला तोंड द्यावे लागेल. त्या परिस्थितींमध्ये, सूड घेणारा शिक्षा होण्याची भीती न बाळगता मनुष्यवध करणाऱ्‍याला ठार मारू शकत होता. परंतु, मनुष्यवध करणाऱ्‍याला बेड्या घातल्या जात नव्हत्या किंवा तुरुंगात टाकले जात नव्हते. शरणपुराचा रहिवाशी या नात्याने, त्याला एखादा उद्योग शिकायचा होता, कामगार होऊन समाजाचा उपयुक्‍त सदस्य व्हावयाचे होते.

१६. (अ) चुकून मनुष्यवध करणाऱ्‍याला शरणपुरात किती काळ राहावे लागत असे? (ब) प्रमुख याजकाचा मृत्यू, मनुष्यवध करणाऱ्‍याला शरणपूर सोडण्यास का शक्य करत होता?

१६ चुकून मनुष्यवध करणाऱ्‍याला शरणपुरात किती काळ राहावे लागत असे? शक्यतो, त्याचे उर्वरित आयुष्यभर. कोणतीही परिस्थिती असली, तरी नियमशास्रात असे म्हटले होते: “मुख्य याजक मरेपर्यंत त्या मनुष्यवध करणाऱ्‍याने शरणपुरातच राहावयाचे होते; पण मुख्य याजक मेल्यावर पाहिजे तर त्याने आपल्या वतनात परत जावे.” (गणना ३५:२६-२८) चुकून मनुष्यवध करणाऱ्‍याला प्रमुख याजकाच्या मृत्यूमुळे शरणपूर सोडण्याची अनुमती का दिली होती? राष्ट्रामध्ये, प्रमुख याजक, ही महत्त्वाची व्यक्‍ती होती. तिचा मृत्यू संस्मरणीय घटना असणार होती जी इस्राएलाच्या सर्व वंशात माहीत होणार होती. शरणपुरांतील सर्व आश्रित, रक्‍तपाताचा सूड घेणाऱ्‍यांकडील धोक्यापासून मुक्‍त होऊन आपल्या मायदेशी परतू शकत होते. का बरे? कारण देवाच्या नियमशास्राने, प्रमुख याजकाच्या मृत्यूमुळे सूड घेणाऱ्‍याची संधी संपते असे आज्ञापिले आणि हे सर्वांच्या परिचयाचे होते. यानंतर, जवळच्या नातेवाईकाने सूड घेतला तर तो खुनी होणार होता आणि शेवटी खूनाबद्दल त्याला भरपाई करावयाची होती.

चिरस्थायी परिणाम

१७. नकळत मनुष्यवध केलेल्यावर लादलेल्या बंधनांचे कोणते संभवनीय परिणाम होते?

१७ चुकून मनुष्यवध करणाऱ्‍यावर लादलेल्या बंधनांचे कोणते संभाव्य परिणाम होते? ही बंधने, त्याने कोणा एकाला ठार मारल्याची जणू आठवण होती. संभवतः, तो तेथून पुढे मानवी जीवन पवित्र आहे या दृष्टीने पाहील. याशिवाय, त्याला दयेने वागवले गेले, हे तो निश्‍चितच विसरणार नाही. दया दाखवल्यामुळे, इतरांसोबत दयाळू असण्याची त्याची नक्कीच इच्छा असेल. शरणपुरांसोबत त्यांच्या बंधनांच्या व्यवस्थेमुळे देखील सर्वसामान्य लोकांना फायदा होत असे. कशाप्रकारे? त्यांनी मानवी जीवनाबद्दल निष्काळजी किंवा बेपर्वा असू नये, याची छाप त्यांच्यावर निश्‍चितच पडली असेल. या संबंधात ख्रिश्‍चनांना याची आठवण करून दिली पाहिजे की त्यांनी अपघाती मृत्यू घडू शकेल अशा निष्काळजीपणाला टाळण्याची गरज आहे. तसेच, शरणपुरांच्या देवाच्या दयाळू तरतूदीने, उचित आहे तेथे, आपणांस दया दाखवण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे.—याकोब २:१३.

१८. देवाची शरणपुरांची व्यवस्था कोणत्या मार्गाने लाभदायक होती?

१८ यहोवा देवाची शरणपुरांची तरतूद, दुसऱ्‍या प्रकारे देखील लाभाची होती. चौकशीच्या आधी मनुष्यवध करणाऱ्‍याचा गुन्हा ग्राह्‍य समजून लोकांनी समाजहितवर्धिनी समित्या बनवल्या नाहीत. त्याऐवजी, जाणूनबुजून झालेल्या खूनाबद्दल तो निर्दोष असल्याचे ते समजत व सुरक्षित ठेवण्यास त्याला मदत देखील करीत. याशिवाय, शरणपुरांची तरतूद, आधुनिक दिवसातील व्यवस्थेत खुनी व्यक्‍तींना तुरुंगात टाकून जेथे त्यांचा जनतेकडून भौतिकरित्या निर्वाह होतो आणि अनेकदा इतर गुन्हेगारांच्या संगतीमुळे ते अधिक वाईट गुन्हेगार बनतात यापासून फारच वेगळी होती. ज्यातून पुष्कळ वेळा आत राहणारे पळून जातात, असे, भिंत व लोखंडी गज असलेले महागडे तुरुंग बांधणे, त्यांना सुस्थितीत व सुरक्षित ठेवणे हे शरणपुराच्या योजनेत अनावश्‍यक होते. परिणामतः, मनुष्यवध करणारा “तुरुंगात” जाऊन विशिष्ट काळादरम्यान तेथे राहत असे. तेथे त्याला सहमानवांच्या लाभासाठी काही करावे म्हणून कामगार देखील व्हावयाचे होते.

१९. शरणपुरांबद्दल कोणते प्रश्‍न उभे राहतात?

१९ इस्राएलाच्या शरणपुरांची यहोवाकडील व्यवस्था, चुकून मनुष्यवध झालेल्यांच्या संरक्षणासाठी खरोखर दयाळुपणाची होती. निश्‍चितच, या योजनेमुळे जीवनाबद्दल आदर दाखवण्यास प्रेरणा मिळत असे. तथापि, या २० व्या शतकात राहणाऱ्‍या लोकांकरता त्या प्राचीन शरणपुरांचा काही अर्थ आहे का? आपण यहोवा देवासमोर रक्‍तपाती होऊ शकतो व त्याच्या दयेची गरज असल्याचे आपल्या लक्षात येत नाही, असे होऊ शकते का? आपल्यासाठी इस्राएलाच्या शरणपुरांची आधुनिक दिवसात काही अर्थसूचकता आहे का?

तुम्ही कसे उत्तर द्याल?

◻ यहोवा मानवी जीवनाकडे कोणत्या दृष्टीने पाहतो?

◻ चुकून मनुष्यवध करणाऱ्‍यांकरता देवाने कोणती दयाळू तरतूद केली होती?

◻ मनुष्यवध करणाऱ्‍याला शरणपुरात प्रवेश कसा मिळत होता आणि तेथे त्याला किती काळ राहावे लागत होते?

◻ चुकून मनुष्यवध केलेल्यावर लादलेल्या बंधनांचे कोणते संभवनीय परिणाम होते?

[१२ पानांवरील नकाशा]

इस्राएलाची शरणपुरे सोयीच्या ठिकाणी होती

(For fully formatted text, see publication)

केदेश

गोलान

रामोथ

शखेम

बेसेर

हेब्रोन

यार्देन नदी

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा