आपल्यामध्ये देवदूत आहेत का?
हे फारच लवकर घडले. मरिलिन भटकंती करण्यास रेल्वेच्या रूळांवरून चालण्यास निघाली; त्यावेळी ती आपल्याच विचारात मग्न होती आणि बाहेरील जगाची कोणतीही जाणीव तिला नव्हती. आणि अचानक, एक कर्कश आवाज तिला ऐकू आला. तिने समोर पाहिले आणि पाहते तर काय, समोरून येत असणाऱ्या रेल्वेच्या अगदी समोर ती उभी आहे! मरिलिन भीतीने थिजून गेल्यामुळे तिच्या शरीरात त्राणच उरले नाही. रेल्वे इतकी जवळ होती की, रेल्वे चालकाचे नीळे डोळे आणि त्याचा भीतीने काळवंडलेला चेहरा ती पाहू शकत होती. त्यानंतर जे काही घडले ते मरिलिन कधीही विसरली नाही. “जणू हे एखाद्या दानवाने मला मागील बाजूने ढकलल्याप्रमाणेच होते,” तिने म्हटले. “मी रूळांवरून उडत गेले आणि रूळांच्या अगदी जवळच असणाऱ्या कोळशाच्या अवशेषांवर जाऊन पडले.” तिला थोडासा मुका मार लागला; तिला वाचवणाऱ्याचे आभार मानण्यासाठी मरिलिन उठली—परंतु तिला कोणीच दिसले नाही! तिचा निष्कर्ष? “माझ्या रक्षणकर्त्या देवदूताने माझा जीव वाचविला,” मरिलिन म्हणते. “त्याच्या शिवाय दुसरा कोण असू शकला असता?”
संशयवादी जग देवदूतांच्या कल्पनांनी अचानकपणे पछाडल्याचे दिसते. अलीकडील वर्षांमध्ये, स्वर्गीय प्राणी दूरचित्रवाणी कार्यक्रम, चित्रपट आणि ब्रॉडवे खेळाचा देखील प्रमुख विषय झाले आहेत. देवदूतांबद्दलच्या पुस्तकांचा, मोठ्या प्रमाणात विक्री होणाऱ्या धार्मिक पुस्तकांच्या यादीमध्ये वर क्रमांक लागतो. शिवाय देवदूत क्लब, सभेचे वर्ग आणि बातमीपत्रकेही आहेत. तुमच्या मदतीसाठी कार्यशाळा स्थापण्यात आल्या आहेत आणि एक लेख म्हणतो त्याप्रमाणे “तुमच्या आंतरिक दिव्यदूतीय बळाला” मुक्त करावे हा त्यामागील उद्देश आहे.
देवदूत हालचालीचा सोईस्कर रीत्या लाभ उठवून, संधी-शोधक व्यापारी, उपभोक्ता उत्पादनांच्या अखंड प्रवाहाची मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी करत आहेत. अमेरिकेतील एका दुकानाची भागीदार असलेली मालकीण म्हणते, “ज्या कोणत्या वस्तूवर देवदूत आहे ती वस्तू उत्तम नफा मिळवून देणारी आहे.” ही मालकीण या पुस्तकांच्या महापूराशिवाय “देवदूतांच्या मूर्त्या, बिल्ले, बाहुल्या, टी-शर्ट, पोस्टर आणि शुभेच्छा पत्रांची” यादी देते—एक पत्रकार या पुंजीस “स्वर्गीय लाभ” असे संबोधतो.
परंतु ही केवळ एक लहर नव्हे, असे देवदूतांची वकिली करणारे आवर्जून सांगतात. त्यांच्या दाव्यास पाठबळ पुरवण्याकरता एकानंतर एक असे प्रमाणलेख—“वास्तविक जीवनात” देवदूतांशी भेट—सादर करतात. मानवी रूपात देवदूत पाहिल्याचे काही जण म्हणतात. इतरांनी प्रकाश पाहिला, आवाज ऐकला, अस्तित्वाचा अनुभव घेतला किंवा तीव्र इच्छा अनुभवली आणि हे देवदूतीय होते असा ते विश्वास ठेवतात. देवदूताने माझे जीवन वाचविले, असे मरिलिनप्रमाणे अनेक जण म्हणतात.
काय होत आहे? “हे आध्यात्मिकतेचे संजीवन आहे, असे मला वाटते,“ असे जोन वेस्टर अँडरसन म्हणतात ज्यांनी “अलौकिक” भेटींवर दोन पुस्तके लिहिली आहेत. अल्म डॅनिएल यांनी दुसरे पुस्तक लिहिण्यास मदत केली त्या याच्याही पुढे जातात. त्या म्हणतात, देवदूतांना “आता स्वतःस परिचित करून देण्याचा आदेश आहे ज्यामुळे जास्तीत-जास्त लोकांपर्यंत ते पोहंचू शकतील. आपण त्यांच्याविषयी इतके काही पाहतो कारण, असे व्हावे अशी त्यांची इच्छा आहे. देवदूत हे करत आहेत.”
असे खरोखरच आहे का? किंवा सध्याच्या देवदूतांबद्दल असणाऱ्या आकर्षणामागे आणखी काही आहे? याचा शोध घेण्यासाठी आपल्याला देवाच्या वचनाचे परीक्षण केले पाहिजे. बायबलमध्ये देवदूतांबद्दलचे सत्य आहे, आपण ते पाहू या.