प्रीती अयोग्य ईर्ष्येवर विजय मिळवते
“प्रीति हेवा [ईर्ष्या] करीत नाही.”—१ करिंथकर १३:४.
१, २. (अ) प्रीतीविषयी येशूने त्याच्या शिष्यांना काय सांगितले? (ब) प्रेमळ तसेच ईर्ष्यावान असणे शक्य आहे का, आणि तुम्ही असे उत्तर का देता?
प्रीती खऱ्या ख्रिश्चनांचे ओळख चिन्ह आहे. “तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा,” असे येशू ख्रिस्त म्हणाला. (योहान १३:३५) ख्रिस्ती नातेसंबंधांवर प्रीतीने कसा प्रभाव करावा हे स्पष्ट करण्यास प्रेषित पौल प्रेरित झाला होता. इतर गोष्टींपैकी, त्याने लिहिले, “प्रीति हेवा [ईर्ष्या] करीत नाही.”—१ करिंथकर १३:४.
२ पौलाने ते शब्द लिहिले त्या वेळी अशी ईर्ष्या किती अयोग्य आहे हे तो दाखवत होता. त्याच ग्रीक शब्दाचा सकारात्मक अर्थ वापरून त्याने नंतर म्हटले: “देवाला जशी तुमच्याविषयी ईर्ष्या वाटते तशीच मलाही वाटते.” (२ करिंथकर ११:२, कॉमन लँग्वेज) त्याची ‘ईश्वरी ईर्ष्या,’ मंडळीमधील काही व्यक्ती भ्रष्ट प्रभाव पाडणाऱ्या असल्यामुळेच निर्माण झाली. याने पौलाला करिंथच्या ख्रिश्चनांना अधिक प्रेमळ सल्ला असलेले दुसरे प्रेरित पत्र लिहिण्यास प्रवृत्त केले.—२ करिंथकर ११:३-५.
ख्रिश्चनांमधील ईर्ष्या
३. करिंथकर ख्रिश्चनांमध्ये ईर्ष्येची समस्या कशी निर्माण झाली?
३ करिंथकरांना लिहिलेल्या पहिल्या पत्रात, नवोदित ख्रिश्चनांचे एकमेकांशी पटत नव्हते त्या समस्येचे निरसन पौलाला करायचे होते. ते विशिष्ट लोकांना अधिक महत्त्व देत होते व ‘एकासाठी दुसऱ्यावर फुगत होते.’ यामुळे मंडळीत विभाजन झाले व विविध जण, “मी पौलाचा, मी अपुल्लोसाचा, मी केफाचा” असे म्हणू लागले. (१ करिंथकर १:१२; ४:६) पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली, प्रेषित पौल समस्येचे मूळ शोधून काढू शकला. करिंथकर ‘आध्यात्मिक माणसांप्रमाणे’ नव्हे, तर दैहिक मनोवृत्ती असलेल्या माणसांप्रमाणे वागत होते. यास्तव, पौलाने लिहिले: “तुम्ही अजूनहि दैहिक आहा; ज्याअर्थी तुमच्यामध्ये हेवा व कलह आहेत, त्याअर्थी तुम्ही दैहिक आहा की नाही?”—१ करिंथकर ३:१-३.
४. एकमेकांबद्दलचा उचित दृष्टिकोन राखण्यासाठी आपल्या बांधवांची मदत करण्यास पौलाने कोणते उदाहरण वापरले, आणि आपण यातून कोणता धडा शिकू शकतो?
४ पौलाने मंडळीतील विविध जणांच्या क्षमता व कुवत यांच्याबाबत योग्य दृष्टिकोनाची गुणग्राहकता बाळगण्यास करिंथकरांना मदत केली. त्याने विचारले: “तुला निराळेपण कोणी दिले? आणि जे तुला दिलेले नाही असे तुझ्याजवळ काय आहे? तुला दिलेले असता, दिलेले नाही असा अभिमान तू का बाळगतोस?” (१ करिंथकर ४:७) पहिले करिंथकर अध्याय १२ मध्ये, मंडळीचे सदस्य, हात, डोळा व कान यासारख्या मानवी शरीराच्या विविध अवयवांसारखे होते असे पौलाने स्पष्ट केले. देवाने शरीराच्या अवयवांना अशा प्रकारे बनवले जेणेकरून ते एकमेकांची काळजी घेऊ शकतात हे त्याने दाखवून दिले. पौलाने असेही लिहिले: “एका अवयवाचा सन्मान झाला तर त्याच्याबरोबर सर्व अवयव आनंदित होतात.” (१ करिंथकर १२:२६) आज, देवाच्या सर्व सेवकांनी एकमेकांसोबतच्या नातेसंबंधात हे तत्त्व लागू केले पाहिजे. देवाच्या सेवेत दुसऱ्या व्यक्तीची नेमणूक किंवा तिच्या कार्यपूर्तीबद्दल ईर्ष्यावान होण्याऐवजी आपण त्या व्यक्तीसोबत आनंद मानला पाहिजे.
५. याकोब ४:५ मध्ये काय प्रकट केले आहे, आणि शास्त्रवचने या शब्दांचे सत्य कसे ठळकपणे दाखवतात?
५ करण्यापेक्षा बोलणे सोपे जाते हे कबूल आहे. ‘मत्सर वाटण्याची प्रवृत्ती’ प्रत्येक पापी मानवामध्ये असते याची आठवण बायबलचा लेखक याकोब आपल्याला करून देतो. (याकोब ४:५) काईन अयोग्य ईर्ष्येच्या आहारी गेल्यामुळे पहिला मानवी मृत्यू घडला. पलिष्ट्यांनी इसहाकाला छळले कारण ते त्याच्या वाढत्या संपन्नतेची ईर्ष्या करू लागले. आपल्या बहिणीला मुले होतात यामुळे राहेलला तिची ईर्ष्या वाटू लागली. आपला धाकटा भाऊ योसेफ हा अधिक आवडता असल्यामुळे याकोबाचे पुत्र त्याविषयी ईर्ष्या बाळगू लागले. गैर-इस्राएली भावजय असल्यामुळे मिर्यामला तिची ईर्ष्या वाटू लागली हे उघड होते. कोरह, दाथान व अबीराम ह्यांनी हेव्याने मोशे व अहरोन यांच्याविरुद्ध कट रचला. दावीदाने सैन्यात यश मिळवल्यामुळे शौल राजाला ईर्ष्या वाटली. ईर्ष्येमुळेच येशूचे शिष्य वारंवार त्यांच्यामध्ये कोण श्रेष्ठ होता यावर वादविवाद करत होते यात कोणतीही शंका नाही. वास्तविकता अशी आहे की, कोणताही पापी मानव ‘हेवा वाटण्याच्या प्रवृत्तीपासून’ पूर्णपणे मुक्त नाही.—उत्पत्ति ४:४-८; २६:१४; ३०:१; ३७:११; गणना १२:१, २; १६:१-३; स्तोत्र १०६:१६; १ शमुवेल १८:७-९; मत्तय २०:२१, २४; मार्क ९:३३, ३४; लूक २२:२४.
मंडळीत
६. हेवा वाटण्याच्या प्रवृत्तीवर वडील नियंत्रण कसे राखू शकतात?
६ सर्व ख्रिश्चनांनी हेवा व अयोग्य ईर्ष्येपासून सावध राहिले पाहिजे. यामध्ये देवाच्या लोकांच्या मंडळ्यांची देखभाल करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या वडील वर्गांचा समावेश होतो. एखाद्या वडिलांकडे मनाची लीनता असल्यास, ते महत्त्वकांक्षेने इतरांपेक्षा वरचढ होण्याचा प्रयत्न करणार नाहीत. दुसऱ्या बाजूला पाहता, एखाद्या वडिलांना संयोजक किंवा जाहीर वक्ता म्हणून उल्लेखनीय क्षमता असल्यास, इतरजण याबद्दल आनंद करतील व ते त्या मंडळीकरता आशीर्वाद आहेत असे समजतील. (रोमकर १२:१५, १६) एक बांधव उत्तम प्रगती करत असेल व आपल्या जीवनात देवाच्या आत्म्याची फळे उत्पादित करत असल्याचा पुरावा देत असेल. त्याच्या पात्रता विचारात घेण्यामध्ये, सेवा सेवक वा वडील होण्यास त्याची शिफारस न करण्याचे कारण देण्यासाठी एखाद्या साधारण चुकीचा ऊहापोह करण्याबद्दल वडिलांनी काळजी घेतली पाहिजे. यावरून प्रीतीचा व समंजसपणाचा अभाव प्रदर्शित होईल.
७. एका ख्रिश्चनाला एखादी ईश्वरशासित नेमणूक मिळते तेव्हा कोणती समस्या उद्भवू शकते?
७ कोणा एकाला ईश्वरशासित नेमणूक किंवा आध्यात्मिक आशीर्वाद प्राप्त झाल्यास, मंडळीतील इतरांनी हेवा न करण्याबद्दल दक्षता बाळगण्याची गरज आहे. उदाहरणार्थ, ख्रिस्ती सभांमध्ये प्रात्यक्षिके सादर करण्यास एका कार्यक्षम बहिणीला दुसऱ्या बहिणीपेक्षा अधिक वेळा उपयोगात आणले जात असेल. यामुळे काही बहिणींना याबद्दल ईर्ष्या वाटू शकते. फिलिप्पै मंडळीतील युवदीया व सुंतुखेमध्ये अशाच प्रकारची समस्या उद्भवली असावी. आधुनिक दिवसाच्या अशा स्त्रियांना नम्र असण्यास आणि “प्रभूच्या ठायी एकचित्त” होण्यास वडिलांकडून नम्र उत्तेजनाची गरज असेल.—फिलिप्पैकर २:२, ३; ४:२, ३.
८. ईर्ष्या कोणत्या पापी कृत्यांकडे नेऊ शकते?
८ मंडळीमध्ये विशेषाधिकार असणाऱ्या व्यक्तीच्या गतकाळातील चुकांबद्दल एका ख्रिश्चनाला माहीत असेल. (याकोब ३:२) ईर्ष्येमुळे, इतरांना याविषयी सांगावेसे आणि मंडळीतील त्या व्यक्तीच्या नेमणुकीचा विरोध करावासा वाटेल. हे प्रीतीच्या विरुद्धतेत असेल जी “पापांची रास झाकून टाकते.” (१ पेत्र ४:८) ईर्ष्यायुक्त भाषणाने मंडळीतील शांतीचा भंग होऊ शकतो. “तुमच्या मनात तीव्र मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे तर ताठा मिरवू नका, व सत्याविरुद्ध लबाडी करू नका. हे ज्ञान वरून उतरत नाही; तर ते ऐहिक, इंद्रियजन्य, सैतानाकडले आहे.”—याकोब ३:१४, १५.
तुमच्या कुटुंबात
९. वैवाहिक सोबती ईर्ष्येच्या भावनांवर ताबा कसा ठेवू शकतात?
९ अयोग्य ईर्ष्येमुळे अनेक विवाह अपयशी ठरले आहेत. वैवाहिक सोबत्यावर भरवसा न ठेवणे प्रेमळपणाचे नाही. (१ करिंथकर १३:७) दुसऱ्या बाजूला पाहता, दुसरा सोबती दाखवत असलेल्या ईर्ष्येला एक सोबती असंवेदनशील असेल. उदाहरणार्थ, विरुद्ध लिंगाच्या दुसऱ्या व्यक्तीकडे पती लक्ष देत असल्यामुळे पत्नीला ईर्ष्या वाटेल. किंवा पत्नी एका गरजवंत नातेवाईकाची काळजी घेण्यात अधिक वेळ घालवत असल्यामुळे पतीला ईर्ष्या वाटू शकते. अशा भावनांमुळे अस्वस्थता वाटून, वैवाहिक सोबती त्याविषयी बोलणार नाहीत आणि इतर मार्गांद्वारे त्यांची निराशा व्यक्त करतील ज्यामुळे समस्या अधिक कठीण होते. त्याऐवजी, ईर्ष्या वाटणाऱ्या सोबत्याने दळणवळण राखले पाहिजे व त्याच्या किंवा तिच्या भावना प्रामाणिकपणे व्यक्त केल्या पाहिजेत. दुसरीकडे पाहता, दुसऱ्या सोबत्याने समजूतदारपणा दाखवण्याची आणि त्याच्या किंवा तिच्या प्रेमाची पुन्हा खात्री पटवून देण्याची गरज आहे. (इफिसकर ५:२८, २९) ईर्ष्येच्या भावना ज्यामुळे उद्भवतात त्या परिस्थितींना टाळून त्या भावना दूर करण्याची गरज दोघांनाही असेल. काहीवेळेस ख्रिस्ती पर्यवेक्षक आपल्या पत्नीला हे समजण्यास मदत करू शकतात की, देवाच्या कळपाचा मेंढपाळ या नात्याने आपली जबाबदारी पूर्ण करण्याकरता ते विरुद्ध लिंगाच्या सदस्यांकडे मर्यादित व योग्य लक्ष देत आहेत. (यशया ३२:२) अर्थात, ईर्ष्या निर्माण होण्यास कोणतीही संधी न देण्याबद्दल वडिलांनी दक्ष असावे. यासाठी समतोलपणाची गरज आहे व त्याचा स्वतःचा वैवाहिक नातेसंबंध बळकट करण्यास तो वेळ देतो याची खात्री त्याने बाळगली पाहिजे.—१ तीमथ्य ३:५; ५:१, २.
१०. ईर्ष्येच्या भावनांचा सामना करण्यास पालक त्यांच्या मुलांना मदत कशी देऊ शकतात?
१० पालकांनी देखील आपल्या मुलांना अयोग्य ईर्ष्येची कल्पना समजून घेण्यास मदत केली पाहिजे. मुले बहुधा क्षुल्लक कारणांसाठी भांडणे करतात परंतु ती मारामाऱ्यांमध्ये परिणीत होतात. पुष्कळ वेळा त्याचे मूळ कारण ईर्ष्या असते. प्रत्येक मुलाच्या विशिष्ट गरजा असल्यामुळे मुलांना एकसारखी वागणूक दिली जाऊ शकत नाही. शिवाय, प्रत्येकाची कुवत व कमजोरी वेगवेगळी असते याची मुलांना समज झाली पाहिजे. एका मुलाला दुसऱ्याप्रमाणे करण्याचे नेहमीच उत्तेजन दिल्यास, एकामध्ये हेवा व दुसऱ्यामध्ये गर्व निर्माण होऊ शकतो. यास्तव, मुलांनी त्यांची प्रगती एक दुसऱ्याशी स्पर्धा करून नव्हे, तर देवाच्या वचनातील उदाहरणांचा विचार करून पाहावी असे पालकांनी त्यांना प्रशिक्षण दिले पाहिजे. बायबल म्हणते: “आपण पोकळ अभिमान बाळगणारे, एकमेकांना चीड आणणारे व एकमेकांचा हेवा करणारे होऊ नये.” त्याउलट, “प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या कामाची परीक्षा करावी म्हणजे त्याला दुसऱ्यांच्या संबंधाने नव्हे, तर केवळ स्वतःसंबंधाने अभिमान बाळगण्यास जागा मिळेल.” (गलतीकर ५:२६; ६:४) अधिक महत्त्वाचे म्हणजे, ख्रिस्ती पालकांनी त्यांच्या मुलांना नियमित बायबल अभ्यासाद्वारे मदत करण्याची व देवाच्या वचनातील चांगली तसेच वाईट उदाहरणे ठळकपणे दाखवून देण्याची गरज आहे.—२ तीमथ्य ३:१५.
ईर्ष्येवर ताबा मिळवण्याची उदाहरणे
११. ईर्ष्या हाताळण्यात मोशे उत्तम उदाहरण कसा होता?
११ “मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्यांपेक्षा नम्र होता;” तो अधिकाराची हाव असणाऱ्या या जगातील नेत्यांप्रमाणे नव्हता. (गणना १२:३) एकट्या मोशेला इस्राएलांचे नेतृत्व करणे कठीण झाले तेव्हा यहोवाने ७० इतर इस्राएलांवर त्याच्या आत्म्याचे कार्य होऊ दिले व मोशेला मदत करण्यास त्यांना सामर्थ्य बहाल केले. यांतील दोघे जण संदेष्ट्यांप्रमाणे वागू लागले तेव्हा मोशेच्या नेतृत्वाला अयोग्यपणे कमी लेखण्यात येत असल्याचे यहोशवाला वाटले. यहोशवाला त्या पुरुषांना थांबवायचे होते परंतु मोशेने नम्रतेने अशी कारणमीमांसा केली: “माझ्या प्रतिष्ठेसाठी तू त्यांचा हेवा करितोस काय? परमेश्वराचे सर्वच लोक संदेष्टे असते आणि परमेश्वराने आपला आत्मा त्या सर्वांवर ठेविला असता तर किती बरे झाले असते!” (गणना ११:२९) होय, इतरांना सेवेचे विशेषाधिकार प्राप्त झाल्यावर मोशेला आनंद झाला होता. स्वतःला गौरव मिळावा अशी इच्छा त्याने ईर्ष्येने बाळगली नाही.
१२. ईर्ष्येच्या भावना टाळण्यास योनाथानाला कशाने मदत दिली?
१२ प्रीती, ईर्ष्येच्या संभाव्य अयोग्य भावनांपेक्षा वरचढ कशी ठरते याचे उत्तम उदाहरण इस्राएली राजा शौलाच्या पुत्राने, योनाथानाने मांडले. आपल्या पित्यानंतर योनाथानला सिंहासनाचा वारसा मिळावयाचा होता, परंतु यहोवाने इशायाचा पुत्र, दावीद यास नंतरचा राजा होण्यास निवडले होते. योनाथानाच्या जागी असणाऱ्या पुष्कळांनी दावीदाचा हेवा केला असता व त्याला प्रतिस्पर्धी असे समजले असते. तथापि, योनाथानाची दावीदावर प्रीती असल्यामुळे त्यावर वर्चस्व गाजवण्याची भावना त्याच्या मनात कधीच आली नाही. योनाथानाच्या मृत्यूविषयी कळल्यावर, दावीद म्हणू शकला: “माझ्या बंधो, योनाथाना, मी तुझ्याकरिता विव्हळ होत आहे तू मजवर फार माया करीत असस तुझे मजवर विलक्षण प्रेम होते, स्त्रियांच्या प्रेमाहूनहि ते अधिक होते.”—२ शमुवेल १:२६.
सर्वात उल्लेखनीय उदाहरणे
१३. ईर्ष्येच्या बाबतीत सर्वात उत्तम उदाहरण कोणाचे आहे आणि का?
१३ योग्य ईर्ष्येवर देखील ताबा असणाऱ्याचे सर्वात उल्लेखनीय उदाहरण यहोवा देवाचे आहे. अशा भावनांना तो अगदी पूर्ण नियंत्रणात ठेवतो. ईश्वरी ईर्ष्येचे कोणतेही शक्तिशाली प्रदर्शन नेहमी देवाची प्रीती, न्याय व बुद्धी यांच्या एकवाक्यतेत असते.—यशया ४२:१३, १४.
१४. सैतानाच्या विरुद्धतेत येशूने कोणते उदाहरण मांडले?
१४ ईर्ष्येच्या भावनांवर ताबा असल्याचे दाखवणाऱ्याचे दुसरे उल्लेखनीय उदाहरण देवाचा प्रिय पुत्र येशू ख्रिस्त याचे आहे. येशू “देवाच्या स्वरूपाचा असूनहि देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही.” (फिलिप्पैकर २:६) दियाबल सैतान झालेल्या महत्त्वकांक्षी देवदूताने निवडलेल्या मार्गाच्या हे किती विरुद्धतेत आहे! ‘बाबेलच्या राजाप्रमाणे’ सैतानाने ईर्ष्येने यहोवाच्या विरुद्ध स्वतःला प्रतिस्पर्धी देव बनवून “परात्परासमान” होण्याची इच्छा बाळगली. (यशया १४:४, १४; २ करिंथकर ४:४) आपल्या “पाया पडून [येशूला] नमन” करावयास लावण्याचाही सैतानाने प्रयत्न केला. (मत्तय ४:९) परंतु, यहोवाच्या सार्वभौमत्वाला अधीन राहण्याच्या नम्र मार्गाक्रमणापासून कोणतीही गोष्ट येशूला परावृत्त करू शकली नाही. सैतानाच्या अगदी विरुद्धतेत येशूने “स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले; आणि मनुष्यप्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण, आणि तेहि वधस्तंभावरचे मरण सोसले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले.” येशूने त्याच्या पित्याच्या आधिपत्याच्या नीतिमत्त्वाला उंचावले व दियाबलाचा गर्व व हेव्याचा मार्ग पूर्णपणे नाकारला. येशूच्या विश्वासूपणासाठी, “देवाने त्याला अत्युच्च केले, आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले; ह्यात हेतू हा की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा, आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभु आहे असे कबूल करावे.”—फिलिप्पैकर २:७-११.
तुमच्या ईर्ष्येवर ताबा मिळवणे
१५. ईर्ष्येच्या भावनांवर संयम राखण्याबद्दल आपण काळजीपूर्वक का असले पाहिजे?
१५ ख्रिस्ती जन, देव व ख्रिस्ताप्रमाणे नाहीत तर अपरिपूर्ण आहेत. पापी असल्यामुळे, ते काहीवेळेस पापी ईर्ष्येने प्रवृत्त होऊ शकतात. तथापि, एका सह-विश्वासूच्या काही क्षुल्लक कमीपणामुळे किंवा कल्पना केलेल्या दोषामुळे टीका करण्यास ईर्ष्येने स्वतःला प्रवृत्त होऊ देण्याऐवजी या प्रेरित शब्दांवर आपण मनन करावे हे महत्त्वपूर्ण आहे: “फाजील धार्मिक होऊ नको; मर्यादेबाहेर शहाणपण मिरवू नको; तू आपला नाश का करून घ्यावा?”—उपदेशक ७:१६.
१६. या नियतकालिकाच्या मागील अंकात ईर्ष्येविषयी कोणता उत्तम सल्ला देण्यात आला होता?
१६ ईर्ष्येसंबंधाने, मार्च १५, १९११ च्या वॉचटावरने असा इशारा दिला: “आपण प्रभूसाठी अतिशय आवेशी व अतिशय ईर्ष्यावान असले पाहिजे, तरी ती व्यक्तिगत बाब नाही याची आपल्याला खात्री असली पाहिजे; तसेच आपण ‘दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ’ करणारे आहोत का याचा विचार केला पाहिजे. त्यानंतर, वडिलांनी हे हाताळणे योग्य असेल, का वडिलांकडे जाणे हे आपले कर्तव्य आहे की नाही हे देखील आपण विचारात घेतले पाहिजे. प्रभूसाठी आणि प्रभूच्या कार्यासाठी आपल्या सर्वांना अतिशय ईर्ष्या असली पाहिजे, परंतु ती कटू प्रकारची नाही याबद्दल दक्ष असले पाहिजे, दुसऱ्या शब्दात सांगायचे, तर ती दुसऱ्याबद्दलची ईर्ष्या नव्हे तर दुसऱ्यासाठी असणारी ईर्ष्या, म्हणजे, त्याचे हेतू व कल्याणाबाबत ईर्ष्या आहे याची आपण खात्री बाळगली पाहिजे.”—१ पेत्र ४:१५.
१७. ईर्ष्येच्या पापी कृत्यांना आपण कसे टाळू शकतो?
१७ आपण ख्रिस्ती या नात्याने गर्व, ईर्ष्या व हेवा कसा टाळू शकतो? आपल्या जीवनात देवाच्या पवित्र आत्म्याला मुक्तपणे संचारू देणे हाच उपाय आहे. उदाहरणार्थ, देवाच्या आत्म्यासाठी व चांगली फळे प्रदर्शित करण्यामध्ये मदत मिळण्यासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे. (लूक ११:१३) ज्या ख्रिस्ती सभांची सुरवात प्रार्थनेने होते व देवाचा आत्मा आणि आशीर्वाद त्यांच्यावर असतो त्या सभांना आपण उपस्थित राहिले पाहिजे. शिवाय, आपल्याला देवाकरवी प्रेरित झालेल्या बायबलचा अभ्यास करण्याची गरज आहे. (२ तीमथ्य ३:१६) तसेच, आपल्याला यहोवाच्या पवित्र आत्म्याच्या शक्तीने होणाऱ्या राज्य-प्रचाराच्या कार्यात भाग घेण्याचीही आवश्यकता आहे. (प्रेषितांची कृत्ये १:८) एखाद्या वाईट अनुभवाने भरडले गेलेल्या सह-ख्रिश्चनांना मदत करणे हा देखील देवाच्या आत्म्याच्या चांगल्या प्रभावाला अधीन होण्याचा दुसरा मार्ग आहे. (यशया ५७:१५; १ योहान ३:१५-१७) या सर्व ख्रिस्ती जबाबदाऱ्या आवेशाने पूर्ण केल्याने ईर्ष्येच्या पापी मार्गांपासून सुरक्षित राहण्यास आपल्याला मदत मिळेल कारण देवाचे वचन म्हणते: “आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही.”—गलतीकर ५:१६.
१८. ईर्ष्येच्या अयोग्य भावनांशी आपल्याला नेहमीच झगडावे का लागणार नाही?
१८ देवाच्या पवित्र आत्म्याच्या फळांमध्ये प्रीतीचा उल्लेख सर्वात प्रथम केला आहे. (गलतीकर ५:२२, २३) प्रीती प्रदर्शित केल्याने आपल्याला आता पापी प्रवृत्तीला ताब्यात ठेवण्यास मदत मिळेल. परंतु भवितव्याबद्दल काय? यहोवाच्या लाखो सेवकांना भावी पार्थिव परादीसमध्ये जीवनाची आशा आहे, तेथे मानवी परिपूर्णता मिळवण्याची ते वाट पाहू शकतात. त्या नवीन जगात प्रीती सगळीकडे वास करील आणि कोणी ईर्ष्येच्या अयोग्य भावनांना वश होणार नाहीत कारण, “सृष्टीहि स्वतः नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्त मुक्तता” मिळेल.—रोमकर ८:२१.
मनन करण्यासाठी मुद्दे
◻ ईर्ष्येच्या विरुद्धतेत प्रयत्न करण्यात मदत होण्यासाठी पौलाने कोणते उदाहरण उपयोगात आणले?
◻ ईर्ष्या, मंडळीतील शांतीचा भंग कशी करू शकते?
◻ ईर्ष्येचा सामना करण्यास पालक त्यांच्या मुलांना कसे शिकवू शकतात?
◻ ईर्ष्येच्या पापी कृत्यांना आपण कसे टाळू शकतो?
[१६ पानांवरील चित्रं]
ईर्ष्येला मंडळीतील शांतीचा भंग करण्यास अनुमती देऊ नका
[१७ पानांवरील चित्रं]
पालक आपल्या मुलांना ईर्ष्येच्या भावनांचा सामना करण्याचे प्रशिक्षण देऊ शकतात