यहोवाच्या शुद्ध उपासनेसाठी ईर्ष्यावान
“ज्या यहोवाचे, नाव ईर्ष्यावान आहे, तो ईर्ष्यावान देव आहे”.—निर्गम ३४:१४, NW.
१. देवाचा प्रमुख गुण कोणता आहे, व त्याचा ईर्ष्येशी काय संबंध आहे?
यहोवा स्वतःचे वर्णन “ईर्ष्यावान देव” असे करतो. ते का बरे, असा तुम्ही कदाचित विचार कराल कारण “ईर्ष्या” या शब्दाचे नकारात्मक अर्थ आहेत. अर्थात, देवाचा प्रमुख गुण प्रीती आहे. (१ योहान ४:८) यास्तव, त्याला मानवाच्या भल्यासाठीच ईर्ष्या वाटत असावी. खरे म्हणजे, देवाची ईर्ष्या, विश्वामधील शांती व सुसंगतता याकरता आवश्यक आहे हे आपण पाहणार आहोत.
२. “ईर्ष्या” यासाठी असलेल्या इब्री शब्दांचे भाषांतर करण्याचे काही मार्ग कोणते आहेत?
२ इब्री शास्त्रवचनांमध्ये “ईर्ष्या” यासाठी असलेले संबंधित इब्री शब्द ८० पेक्षा अधिक वेळा आढळतात. याचे जवळजवळ निम्मे संदर्भ यहोवा देवाला अनुलक्षून आहेत. जी. एच. लिवींगस्टोन स्पष्टीकरण देतात, “ईर्ष्येची कल्पना देवाला लागू होते तेव्हा ती विकृत भावनेचा अर्थ देत नाही, परंतु केवळ यहोवाच्या उपासनेच्या एकनिष्ठतेच्या आग्रहाचा अर्थ देते.” (पेंटाट्यूख आपल्या सांस्कृतिक वातावरणात, इंग्रजी) यास्तव, न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन काहीवेळेस “एकनिष्ठ भक्तीचा आग्रह” हे इब्री नाम देते. (यहेज्केल ५:१३) इतर उचित भाषांतरे “रोष” किंवा “आवेश” अशी आहेत.—स्तोत्र ७९:५; यशया ९:७.
३. काहीवेळेस ईर्ष्या कोणत्या प्रकारे चांगला उद्देश साध्य करू शकते?
३ मानवाला ईर्ष्या वाटण्याच्या क्षमतेसह निर्माण करण्यात आले होते, पण मानवजात पापात पडल्यामुळे ईर्ष्येचा विपर्यास झाला. तरीसुद्धा, मानवी ईर्ष्येने चांगला हेतू साध्य होऊ शकतो. प्रिय व्यक्तीला वाईट प्रभावांपासून सुरक्षित ठेवण्यास ते एखाद्याला प्रवृत्त करू शकते. त्या शिवाय, यहोवा व त्याच्या उपासनेकरता मानव उचितपणे ईर्ष्या प्रदर्शित करू शकतात. (१ राजे १९:१०) यहोवाबद्दलच्या ईर्ष्येची अचूक समज देण्याकरता इब्री नामाचे भाषांतर त्याच्यासोबत “कोणतीही स्पर्धा सहन न करणे” असे केले जाऊ शकते.—२ राजे १०:१६, NW.
सोन्याचे वासरू
४. देवाने इस्राएलला दिलेल्या नियमशास्त्रात नीतिमान ईर्ष्येविषयी कोणती मुख्य आज्ञा होती?
४ इस्राएलांना सिनाय पर्वतापाशी नियमशास्त्र मिळाल्यानंतर काय घडले हे नीतिमान ईर्ष्येचे उदाहरण आहे. त्यांनी मानव-निर्मित दैवतांची उपासना करू नये अशी ताकीद त्यांना वारंवार देण्यात आली होती. यहोवाने त्यांना सांगितले: “मी तुझा देव परमेश्वर [यहोवा] ईर्ष्यावान [आवेशी किंवा “एकनिष्ठ भक्ती अपेक्षिणारा देव”; (“कोणतीही स्पर्धा सहन न करणारा,” तळटीप) NW] देव आहे.” (निर्गम २०:५; पडताळा निर्गम २०:२२, २३; २२:२०; २३:१३, २४, ३२, ३३.) यहोवाने इस्राएलांशी करार केला व त्यांना आशीर्वादित करण्याचे तसेच वाग्दत्त देशात आणण्याचे अभिवचन दिले. (निर्गम २३:२२, ३१) तसेच लोक म्हणाले: “जे काही परमेश्वराने सांगितले आहे ते सर्व आम्ही करू आणि त्याच्या आज्ञेत राहू.”—निर्गम २४:७.
५, ६. (अ) सीनाय पर्वतापाशी डेरा केलेला असताना, इस्राएलांनी कशा प्रकारे घोर पाप केले? (ब) सीनायापाशी यहोवा व त्याच्या निष्ठावान उपासकांनी नीतिमान ईर्ष्या कशी दाखवली?
५ तरीसुद्धा, इस्राएल लोकांनी देवाविरुद्ध लागलीच पाप केले. ते अद्यापही सिनाय पर्वताच्या पायथ्याशीच डेरे करून होते. मोशे पुष्कळ दिवस पर्वतावरच होता, त्याला देवाकडून अधिक सूचना मिळत होत्या व लोकांनी मोशेचा भाऊ अहरोनावर दबाव आणून त्यांच्यासाठी एक दैवत तयार करण्यास सांगितले. अहरोनाने त्यांचे म्हणणे मान्य केले व लोकांनी त्याला दिलेल्या सोन्यातून एक वासरू तयार केले. ही मूर्ती यहोवाचे प्रतिनिधीत्व करत होती असा दावा केला होता. (स्तोत्र १०६:२०) दुसऱ्या दिवशी त्यांनी अर्पणे अर्पिली व त्याची “पूजाअर्चा” करीत राहिले. त्यानंतर त्यांनी ‘मौज केली.’—निर्गम ३२:१, ४, ६, ८, १७-१९.
६ इस्राएली उत्सव करीत असताना मोशे पर्वतावरून खाली आला. ही लज्जास्पद वर्तणूक पाहून, तो मोठ्याने म्हणाला: ‘यहोवाच्या पक्षाचा कोण आहे?’ (निर्गम ३२:२५, २६) लेवी वंशातील लोक मोशेजवळ जमा झाले व त्याने त्यांना तरवारी घेऊन मूर्तिपूजक चैनबाजी करणाऱ्यांचा वध करण्याची सूचना दिली. देवाच्या शुद्ध उपासनेबद्दल ईर्ष्या प्रकट करून त्या लेव्यांनी त्यांच्या जवळजवळ ३,००० दोषी बांधवांना ठार मारले. बचावलेल्यांवर मरी आणून यहोवाने त्याच्या कार्यवाहीला कुमक दिली. (निर्गम ३२:२८, ३५) मग देवाने पुन्हा आज्ञा दिली: “तुला दुसऱ्या कोणत्याहि देवाला नमन करावयाचे नाही; कारण ज्याचे नाव ईर्ष्यावान आहे, तो परमेश्वर [यहोवा] ईर्ष्यावान देव आहे.”—निर्गम ३४:१४.
बआलपौर
७, ८. (अ) बआलपौराच्या संबंधाने अनेक इस्राएल लोक घोर मूर्तिपूजा करण्यात कसे गोवले गेले? (ब) यहोवाकडील मरीचा अंत कसा झाला?
७ चाळीस वर्षांनंतर, इस्राएल राष्ट्र वाग्दत्त देशात प्रवेश करणार होते तेव्हा आकर्षक मवाबी व मिद्यानी स्त्रियांनी अनेक इस्राएलांना त्यांच्या पाहुणचाराचा आनंद लुटण्यास फुसलावले. खोट्या दैवतांच्या उपासकांसोबत जवळीक राखण्याचे या पुरुषांनी नाकारावयास हवे होते. (निर्गम ३४:१२, १५) त्याऐवजी, बैल वधण्यास जातात तसे ते गेले, त्या स्त्रियांसोबत व्यभिचार केला व त्यांच्यासोबत बआलपौराला नमन करू लागले.—नीतिसूत्रे ७:२१, २२; गणना २५:१-३.
८ या लज्जास्पद लैंगिक उपासनेत ज्यांनी भाग घेतला त्यांचा संहार करण्यासाठी यहोवाने मरी पाठवली. देवाने निरपराध इस्राएल लोकांना त्यांच्या बांधवांना ठार मारण्यासही आज्ञा दिली. निर्लज्जपणे अवज्ञा करून, जिम्री नामक इस्राएलाच्या सरदाराने एका मिद्यानी राजकुमारीला तिच्याशी संबंध ठेवण्यास आपल्या तंबूत आणले. हे पाहिल्यावर, देव-भिरू फीनहास याजकाने या अनैतिक जोडप्याची कत्तल केली. मग ही मरी थांबली व देवाने घोषणा केली: “फीनहास ह्याने . . . माझ्या ईर्ष्येने पेटून इस्राएल लोकांवरील माझा संताप दूर केला म्हणून मी आपल्या ईर्ष्येने त्यांचा संहार केला नाही.” (गणना २५:११) ते राष्ट्र नाश होण्यापासून वाचले, तरी कमीतकमी २३,००० इस्राएल लोक मरण पावले. (१ करिंथकर १०:८) वाग्दत्त देशात प्रवेश करण्याची दीर्घ काळापासून जतन केलेली त्यांची आशा त्यांनी गमावली.
इशारेवजा धडा
९. यहोवाच्या शुद्ध उपासनेकरता इस्राएल व यहुदाचे लोक ईर्ष्यावान नसल्यामुळे त्यांच्यावर काय ओढवले?
९ दुःखाची गोष्ट अशी की, इस्राएल लोक हे धडे लवकर विसरून गेले. यहोवाच्या शुद्ध उपासनेकरता ते ईर्ष्यावान ठरले नाहीत. त्यांनी “आपल्या कोरीव मूर्तींमुळे [देवाला] ईर्ष्या आणिली.” (स्तोत्र ७८:५८) परिणामस्वरूप, सा. यु. पू. ७४० मध्ये यहोवाने अश्शुरी लोकांना इस्राएलाच्या दहा वंशांना कैदी म्हणून घेऊन जाण्याची अनुमती दिली. यहूदाच्या उर्वरित दोन वंशीय राज्याला, त्यांचे मुख्य शहर, जेरूसलेम याचा सा. यु. पू. ६०७ या वर्षी नाश होत असताना अशीच शिक्षा मिळाली. पुष्कळ जणांना ठार मारण्यात आले, व बचावलेल्यांना बॅबिलोन येथे बंदिवान करून नेण्यात आले. आज सर्व ख्रिश्चनांकरता हे किती इशारेवजा उदाहरण!—१ करिंथकर १०:६, ११.
१०. अपश्चात्तापी मूर्तिपूजकांचे काय होईल?
१० पृथ्वीची एक तृतीयांश लोकसंख्या—जवळजवळ १९० कोटी लोक—आता ख्रिस्ती असल्याचा दावा करतात. (१९९४ ब्रिटॅनिकाचे वार्षिक पुस्तक) यातील पुष्कळ जण, ज्या चर्चेसच्या उपासनेत प्रतिमा, मूर्ती व क्रूसांचा उपयोग केला जातो त्यांचे सदस्य आहेत. ज्यांनी यहोवाला त्यांच्या मूर्तिपूजेद्वारे ईर्ष्येला पेटवले अशा आपल्या स्वतःच्या लोकांना देखील त्याने वाचवले नाही. तसेच जे भौतिक वस्तूंच्या साहाय्याने उपासना करतात त्या खोटा आव आणणाऱ्या ख्रिश्चनांना देखील तो वाचवणार नाही. “देव आत्मा आहे; आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे,” असे येशू ख्रिस्त म्हणाला. (योहान ४:२४) शिवाय, बायबल ख्रिश्चनांना मूर्तिपूजेपासून दक्ष राहण्याचा इशारा देते. (१ योहान ५:२१) अपश्चात्तापी मूर्तिपूजक, देव राज्याचे वतन न मिळवणाऱ्यांपैकी आहेत.—गलतीकर ५:२०, २१.
११. मूर्तीला नमन न करता एक ख्रिस्ती मूर्तिपूजा करण्याबद्दल दोषी कसा ठरेल, व अशी मूर्तिपूजा टाळण्यास एखाद्याला काय मदत करील? (इफिसकर ५:५)
११ खरा ख्रिस्ती, मूर्तीला कधीही नमन करणार नाही, तरी देवाच्या दृष्टिने जे मूर्तिपूजक, अशुद्ध व पापी आहे ते सर्वकाही त्याने टाळले पाहिजे. उदाहरणार्थ, बायबल इशारा देते: “पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ—ह्याला मूर्तिपूजा म्हणावे—हे जिवे मारा. त्यामुळे देवाचा कोप होतो.” (तिरपे वळण आमचे.) (कलस्सैकर ३:५, ६) या शब्दांना आज्ञाधारकता दाखवण्याकरता अनैतिक वागणूक नाकारली पाहिजे. असे करण्यासाठी, अशुद्ध, लैंगिक वासना चेतवण्याकरता तयार केलेले मनोरंजन टाळणे आवश्यक आहे. अशी वासना तृप्त करण्याऐवजी, खरे ख्रिस्ती देवाच्या शुद्ध उपासनेबाबत ईर्ष्यावान आहेत.
ईश्वरी ईर्ष्येची या नंतरची उदाहरणे
१२, १३. देवाच्या शुद्ध उपासनेबद्दल ईर्ष्या दाखवण्यात येशूने उल्लेखनीय उदाहरण कसे मांडले?
१२ देवाच्या शुद्ध उपासनेसाठी ईर्ष्या दाखवलेला मनुष्य, येशू ख्रिस्त याचे उदाहरण सर्वात उल्लेखनीय होते. त्याच्या सेवकपणाच्या पहिल्या वर्षी, मंदिराच्या अंगणात लोभी व्यापारी व्यापार करत असल्याचे त्याने पाहिले. बाहेरून येणाऱ्या यहुद्यांना, मंदिराचा कर म्हणून पत्करण्यात येणाऱ्या पैशांसाठी त्यांच्या विदेशी चलनाची बदली करणाऱ्या सराफांच्या सेवेची गरज असावी. त्यांना देवाच्या नियमशास्त्राच्या आवश्यकतेनुसार, बलिदाने अर्पण करण्यासाठी प्राणी व पक्षी खरेदी करण्याची देखील गरज होती. अशा प्रकारचा व्यापार मंदिराच्या अंगणाबाहेर केला जाण्यास हवा होता. याहूनही वाईट म्हणजे, हे व्यापारी भरमसाठ किंमत लावून त्यांच्या बांधवांच्या धार्मिक गरजांचा गैरफायदा घेत असल्याचे उघड होते. देवाच्या शुद्ध उपासनेच्या ईर्ष्येने पेटला जाऊन, येशूने मेंढरे व गुरे हाकलण्यासाठी चाबकाचा वापर केला. त्याने सराफांचे चौरंग देखील पालथे केले व म्हटले: “माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका”! (योहान २:१४-१६) अशा प्रकारे येशूने स्तोत्र ६९:९ मधील “तुझ्या मंदिराविषयीच्या आवेशाने [किंवा, “ईर्ष्येने,” बाईंग्टन] मला ग्रासून टाकिले आहे,” हे शब्द पूर्ण केले.
१३ तीन वर्षांनंतर, येशूने, यहोवाच्या मंदिरात लोभी व्यापाऱ्यांना व्यापार करत असल्याचे पुन्हा पाहिले. तो दुसऱ्या वेळी ते शुद्ध करणार होता का? आपले सेवकपण सुरू करण्याच्या वेळी देवाच्या शुद्ध उपासनेबद्दल त्याला जी ईर्ष्या होती ती या वेळी देखील तेवढीच तीव्र होती. त्याने विक्रेते व ग्राहक या दोघांना हाकून लावले. तसेच त्याने आपल्या कृत्यांसाठी आणखी दृढ कारण दिले व म्हटले: “‘माझ्या घराला सार्वराष्ट्रीय प्रार्थनामंदिर म्हणतील,’ असा शास्त्रलेख आहे ना? परंतु तुम्ही तर ही लुटारूंची गुहा करून टाकली आहे.” (मार्क ११:१७) ईश्वरी ईर्ष्या दाखवण्यात चिकाटीचे किती अद्भुत उदाहरण!
१४. शुद्ध उपासनेविषयी येशूच्या ईर्ष्येचा आपल्यावर कसा परिणाम झाला पाहिजे?
१४ आता गौरवी असलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे व्यक्तिमत्त्व बदललेले नाही. (इब्रीयांस १३:८) तो पृथ्वीवर असताना जसा आपल्या पित्याच्या शुद्ध उपासनेसाठी ईर्ष्यावान होता तसाच या २० व्या शतकात देखील आहे. येशूने सात मंडळ्यांना उद्देशून प्रकटीकरणाच्या पुस्तकात दिलेल्या संदेशांवरून हे दिसून येते. त्यांचा अधिकांश अवलंब आता म्हणजेच, ‘प्रभूच्या दिवसात,’ आहे. (प्रकटीकरण १:१०; २:१–३:२२) दृष्टान्तात प्रेषित योहानाने गौरवी येशू ख्रिस्ताला ‘अग्नीच्या ज्वालेसारखे डोळे’ असलेले पाहिले. (प्रकटीकरण १:१४) यहोवाच्या सेवेकरता मंडळ्या शुद्ध व स्वीकारणीय स्थितीत असल्याची खात्री करण्यासाठी ख्रिस्त परीक्षण करतो तेव्हा त्याच्या नजरेतून काहीच सुटत नाही असे यावरून सूचित होते. दोन धनी—देव व संपत्ती—यांची चाकरी करण्याचा प्रयत्न करण्याविरुद्ध येशूने दिलेला इशारा सध्याच्या ख्रिश्चनांनी लक्षात ठेवण्याची गरज आहे. (मत्तय ६:२४) लावदिकीया मंडळीतील भौतिकवादी सदस्यांना येशूने म्हटले: “तू . . . कोमट आहेस; म्हणजे उष्ण नाहीस, शीत नाहीस, म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. . . . आस्था बाळग आणि पश्चात्ताप कर.” (प्रकटीकरण ३:१४-१९) बोलण्याद्वारे व उदाहरणाद्वारे, मंडळीच्या नियुक्त वडिलांनी त्यांच्या सह-विश्वासूंना भौतिकवादाचा पाश टाळण्यास मदत केली पाहिजे. लैंगिक गोष्टींवर केंद्रित असलेल्या या जगाच्या नैतिक भ्रष्टाचारापासून देखील वडिलांनी कळपाला सुरक्षित ठेवले पाहिजे. शिवाय, देवाच्या लोकांनी मंडळीत ईजबेलीचा कोणताही प्रभाव सहन करण्याचे धाडस करू नये.—इब्रीयांस १२:१४, १५; प्रकटीकरण २:२०.
१५. यहोवाच्या उपासनेकरता ईर्ष्या दाखवण्यात पौलाने येशूचे अनुकरण कसे केले?
१५ प्रेषित पौल ख्रिस्ताचे अनुकरण करणारा होता. नवीन बाप्तिस्मा घेतलेल्या ख्रिश्चनांना आध्यात्मिकरित्या अहितकारक प्रभावांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी तो म्हणाला: “देवाला जशी तुमच्याविषयी ईर्ष्या वाटते तशीच मलाही वाटते”. (२ करिंथकर ११:२, कॉमन लँग्वेज) याच्या आधी, याच मंडळीतील एक अपश्चात्तापी व्यभिचारी व्यक्ती दूषित प्रभाव ठरत असल्यामुळे तिला बहिष्कृत करण्याची सूचना देण्यास पौलाच्या शुद्ध उपासनेबद्दलच्या ईर्ष्येने त्याला प्रवृत्त केले होते. आज, यहोवाच्या साक्षीदारांच्या ७५,५०० पेक्षा अधिक मंडळ्यांना शुद्ध राखण्याचा प्रयत्न करत असताना त्या प्रसंगी देण्यात आलेल्या प्रेरित सूचना वडिलांना पुष्कळ मदतदायक ठरल्या आहेत.—१ करिंथकर ५:१, ९-१३.
देवाची ईर्ष्या त्याच्या लोकांकरता लाभदायक ठरते
१६, १७. (अ) देवाने प्राचीन यहुदाला शिक्षा दिली तेव्हा राष्ट्रांनी कोणती मनोवृत्ती प्रकट केली? (ब) यहुदाच्या ७० वर्षांच्या बंदिवासानंतर यहोवाने जेरूसलेमबद्दल त्याची ईर्ष्या कशी प्रदर्शित केली?
१६ देवाने यहुदीयांना बॅबिलोनला बंदिवान करून घेऊन जाण्यास अनुमती देऊन त्यांना शिक्षा दिली त्या वेळी त्यांची थट्टा करण्यात आली. (स्तोत्र १३७:३) ईर्ष्यावान द्वेषाने, अदोमी लोकांनी बॅबिलोन्यांना देवाच्या लोकांवर विपत्ती आणण्यास मदत देखील केली, व यहोवाने याची नोंद घेतली. (यहेज्केल ३५:११; ३६:१५) बंदिवासात असताना, बचावलेल्यांनी पश्चात्ताप केला व ७० वर्षांनंतर यहोवाने त्यांचे त्यांच्या देशात पुनर्वसन केले.
१७ सुरवातीला, यहुदाचे लोक निराशजनक अवस्थेत होते. जेरूसलेमच्या शहराचा व त्याच्या मंदिराचा विध्वंस झाला होता. परंतु, शेजारच्या राष्ट्रांनी मंदिराच्या पुनर्बांधणीच्या सर्व प्रयत्नांचा विरोध केला. (एज्रा ४:४, २३, २४) याविषयी यहोवाला कसे वाटले? प्रेरित अहवाल असे सांगतो: “सेनाधीश परमेश्वर म्हणतो, यरुशलेम व सीयोन यांविषयी मी अतिशयित ईर्ष्यायुक्त झालो आहे. जी राष्ट्रे स्वस्थ आहेत त्यांवर माझा राग फार पेटला आहे; कारण मी थोडासा रागवलो होतो पण त्यांनी अरिष्ट वाढविले. यास्तव परमेश्वर म्हणतो, मी करुणायुक्त होऊन पुनः यरुशलेमेकडे वळत आहे; त्यात माझे मंदिर बांधितील असे सेनाधीश परमेश्वराचे म्हणणे आहे”. (जखऱ्या १:१४-१६) या अभिवचनाच्या एकवाक्यतेत, मंदिराची व जेरूसलेमच्या शहराची पुनर्बांधणी यशस्वीरित्या झाली.
१८. पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान खऱ्या ख्रिश्चनांनी कशाचा अनुभव घेतला?
१८ खऱ्या ख्रिस्ती मंडळीला २० व्या शतकात असाच अनुभव आला होता. पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान, यहोवाने त्याच्या लोकांना शिक्षा दिली कारण त्या जगिक झगड्यात ते पूर्णपणे तटस्थ राहिले नव्हते. (योहान १७:१६) देवाने राजनैतिक शक्तींना त्यांच्यावर जुलूम करण्यास वाव दिला व या विपत्तीबद्दल ख्रिस्ती धर्मजगताच्या पाळकांनी आनंद केला. त्या वेळी बायबल विद्यार्थी असे संबोधल्या जाणाऱ्या यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यावर बंदी आणण्यात राजनैतिक लोकांना प्रवृत्त करण्यास खरे पाहता पाळकांनी पुढाकार घेतला होता.—प्रकटीकरण ११:७, १०.
१९. सन १९१९ पासून यहोवाने आपल्या उपासनेविषयी ईर्ष्या कशी दाखवली आहे?
१९ तथापि, १९१९ या युद्धानंतरच्या वर्षी यहोवाने आपल्या उपासनेविषयी ईर्ष्या दाखवली व त्याच्या पश्चात्तापी लोकांना त्याच्या कृपापसंतीत पुन्हा आणले. (प्रकटीकरण ११:११, १२) परिणामतः, १९१८ मध्ये ४,००० पेक्षा कमी असलेल्या यहोवाच्या स्तुतीकर्त्यांची संख्या आज ५० लाखांपेक्षा अधिक वाढली आहे. (यशया ६०:२२) लवकरच, अनेक नाट्यमय मार्गांनी शुद्ध उपासनेबद्दल यहोवाची ईर्ष्या प्रकट केली जाईल.
ईश्वरी ईर्ष्येची भवितव्यातील कृत्ये
२०. शुद्ध उपासनेबद्दल त्याची ईर्ष्या दाखवण्यासाठी देव लवकरच काय करील?
२० ख्रिस्ती धर्मजगतातील चर्चेसनी शतकांपासून, यहोवाला ईर्ष्येला पेटवणाऱ्या धर्मत्यागी यहुद्यांचा मार्ग अनुसरला आहे. (यहेज्केल ८:३, १७, १८) संयुक्त राष्ट्र संघाच्या सदस्यांच्या मनात एक जहाल विचार घालून यहोवा देव लवकरच कार्य करील. यामुळे या राजनैतिक शक्ती, ख्रिस्ती धर्मजगताचा व बाकीच्या खोट्या धर्माचा नाश करण्यास प्रवृत्त होतील. (प्रकटीकरण १७:१६, १७) खरे उपासक त्या भीतीजनक ईश्वरी न्यायदंडाच्या बजावणीपासून बचावतील. “हालेलूया . . . ज्या मोठ्या कलावंतिणीने [खोटा धर्म] आपल्या जारकर्माने [तिच्या खोट्या शिकवणी व भ्रष्ट राजनीतीला दिलेला आधार] पृथ्वी भ्रष्ट केली तिचा न्यायनिवाडा त्याने केला आहे, आणि आपल्या दासांच्या रक्ताबद्दल तिचा सूड घेतला आहे,” असे म्हणणाऱ्या स्वर्गीय प्राण्यांच्या शब्दांना ते प्रतिसाद देतील.—प्रकटीकरण १९:१, २.
२१. (अ) खोट्या धर्माचा नाश झाल्यावर सैतान व त्याचे व्यवस्थीकरण काय करील? (ब) देव कसा प्रतिसाद दाखवील?
२१ खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्याचा नाश झाल्यावर काय घडेल? सैतान राजनैतिक शक्तींना यहोवाच्या लोकांवर सार्वत्रिक हल्ला चढवण्यास चेतवील. पृथ्वीवरून खऱ्या भक्तीचा अंत करण्याच्या सैतानाच्या प्रयत्नाला खरा देव कशी प्रतिक्रिया दाखविल? यहेज्केल ३८:१९-२३ आपल्याला सांगते: “मी [यहोवा] ईर्ष्येने [किंवा, रोषाने], क्रोधाग्नीने तप्त होऊन बोललो आहे की . . . मरी व रक्तपात यांनी मी त्याजबरोबर [सैतानाबरोबर] वाद मांडीन; त्याजवर, त्याच्या सैन्यांवर पाऊस, मोठ्या गारा, अग्नि व गंधक यांची धो धो वृष्टि मी त्याजबरोबर असलेल्या अनेक लोकसमूहांवर करीन. या प्रकारे मी आपला महिमा व पवित्रता प्रगट करीन, आणि बहुत राष्ट्रांस माझी प्रत्यक्ष ओळख होईल; तेव्हा त्यांस समजेल की मी परमेश्वर [यहोवा] आहे.”—सफन्या १:१८; ३:८ देखील पाहा.
२२. यहोवाच्या शुद्ध उपासनेसाठी आपण ईर्ष्यावान आहोत हे आपण कसे दाखवू शकतो?
२२ विश्वाचा सार्वभौम त्याच्या खऱ्या उपासकांची आवेशाने काळजी घेतो हे जाणणे किती सांत्वनदायक आहे बरे! यहोवा देवाच्या अपात्र कृपेच्या खोल गुणग्राहकतेने आपण त्याच्या शुद्ध उपासनेबद्दल ईर्ष्यावान राहू या. आपण आवेशाने, सुवार्तेचा प्रचार करीत राहू या आणि यहोवा त्याच्या थोर नावाचा गौरव करील व त्यास पवित्र करील त्या महान दिवसाची खात्रीने वाट पाहत राहू या.—मत्तय २४:१४.
मनन करण्यासाठी मुद्दे
◻ यहोवासाठी ईर्ष्यावान असण्याचा काय अर्थ होतो?
◻ प्राचीन इस्राएलांनी मांडलेल्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो?
◻ यहोवाला ईर्ष्येला चेतवण्याचे आपण कसे टाळू शकतो?
◻ देव व ख्रिस्ताने शुद्ध उपासनेसाठी ईर्ष्या कशी दाखवली आहे?
[१२ पानांवरील चौकट]
प्रीती हेवा करीत नाही
मत्सराविषयी, १९ व्या शतकातील बायबल तत्त्ववेत्ता अल्बर्ट बार्न्स यांनी असे लिहिले: “तो दुष्टपणा प्रदर्शित करण्याचा सर्वसामान्य गुण आहे आणि मनुष्याचे अति दुराचरण स्पष्टपणे दाखवतो.” ते पुढे म्हणाले: “सर्व युद्धे व झगडे व जगिक योजनांचे मूळ जो शोधून काढू शकत होता—ख्रिस्ती असल्याचा दावा करणाऱ्यांच्या धर्मावर इतका कलंक लावणाऱ्या व त्यांना जगिक विचारशैलीचे बनवणाऱ्या सर्व योजनांचा व उद्देशांचा खरा उगम तो शोधून काढू शकत होता तर—त्याला मत्सरामुळे पुष्कळ काही घडते हे पाहून आश्चर्य वाटले असते. इतरजण आपल्यापेक्षा अधिक उन्नती करतात हे पाहून आपल्याला दुःख होते; इतरांजवळ असणाऱ्या वस्तूंवर आपला हक्क नसला, तरी त्या आपल्याजवळ असाव्यात अशी इच्छा आपण बाळगतो; आणि यामुळेच त्या वस्तूंच्या आनंदाचा उपभोग कमी करण्यासाठी किंवा त्या स्वतः मिळवण्यासाठी, वा त्यांच्याकडे सामान्यपणे जितके असले पाहिजे तितके नाही हे दाखवण्यासाठी विविध सदोष पद्धती अनुसरल्या जातात. . . . अशा प्रकारे आपल्या हृदयातील मत्सराची तृप्ती केली जाईल.”—रोमकर १:२९; याकोब ४:५.
याच्या उलट, बार्न्स यांनी ‘हेवा करीत नसलेल्या’ प्रीतीविषयी एक मनोवेधक विधान केले. (१ करिंथकर १३:४) त्यांनी लिहिले: “प्रीती, इतर उपभोगत असलेल्या आनंदामुळे त्यांचा हेवा करीत नाही; ती त्यांच्या कल्याणामध्ये आनंद मानते; तसेच त्यांचा आनंद द्विगुणीत होतो तसे . . . , प्रीतीने प्रभावीत होणारे . . . त्यास कमी करणार नाहीत; लाभ मिळत असल्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू देणार नाहीत; त्या आनंदामुळे निंदा करणार नाहीत; स्वतःला इतकी कृपा न दाखवल्यामुळे ते कुरकुर किंवा धुसमुस करणार नाहीत. . . . आपण इतरांवर प्रीती केली—त्यांच्या आनंदात आनंद मानला, तर आपण त्यांचा हेवा करू नये.”
[१० पानांवरील चित्रं]
यहोवाच्या शुद्ध उपासनेसाठी फीनहास ईर्ष्यावान होता