ईर्ष्येविषयी तुम्हाला काय माहीत असले पाहिजे
ईर्ष्या काय आहे? ती एका व्यक्तीला उत्साहीत, दुःखित किंवा क्रोधित करणारी तीव्र भावना आहे. आपल्याव्यतिरिक्त इतर कोणाला एखादे काम करण्यात यश मिळाल्यास आपल्याला ईर्ष्या वाटू शकते. किंवा एका मित्राला आपल्यापेक्षा अधिक स्तुती मिळाल्यास आपल्याला ईर्ष्या वाटू शकते. परंतु ईर्ष्यावान असणे नेहमीच चुकीचे आहे का?
ईर्ष्येची भावना असलेल्या लोकांना भावी प्रतिस्पर्ध्यांविषयी संशयी असण्याची प्रवृत्ती असते. प्राचीन काळातील शौल राजा याचे उदाहरण होता. सुरवातीला, त्याला आपला शस्त्रवाहक, दावीद यावर अतिशय प्रेम होते; यामुळे त्याने त्यास योद्ध्यांवरही नेमले. (१ शमुवेल १६:२१; १८:५) मग, एके दिवशी, शौल राजाने स्त्रियांना या शब्दात दावीदाची प्रशंसा करत असल्याचे ऐकले: “शौलाने हजारो वधिले, दाविदाने लाखो वधिले.” (१ शमुवेल १८:७) शौलाने या गोष्टीचा परिणाम दावीदाबरोबरील त्याच्या चांगल्या नातेसंबंधावर होऊ द्यायला नको होता. परंतु, त्याचे मन दुखावले. “त्या दिवसापासून पुढे शौलाने दाविदावर डोळा ठेविला.”—१ शमुवेल १८:९.
कदाचित, ईर्ष्यावान व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचे नुकसान व्हावे अशी इच्छा बाळगणार नाही. त्याला किंवा तिला केवळ सहचराच्या यशाबद्दल चीड येईल आणि स्वतःजवळ तेच गुण किंवा परिस्थिती असण्याची लालसा असेल. दुसऱ्या बाजूला पाहता, मत्सर हा ईर्ष्येचा विशेषतः नकारात्मक प्रकार आहे. मत्सरी व्यक्ती स्वतःला ईर्ष्या आणणाऱ्या व्यक्तीपासून गुप्तपणे एखादी चांगली गोष्ट रोखून धरील किंवा त्या व्यक्तीचे नुकसान व्हावे अशी इच्छा बाळगील. काहीवेळा, मत्सरी व्यक्ती आपल्या भावना लपवू शकत नाही. शौल राजाने दावीदाचा वध करण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे ती व्यक्ती उघडरितीने दुसऱ्याला इजा करण्यास उठेल. अनेक प्रसंगी, शौलाने, दावीदाला “भिंतीशी खिळावे” म्हणून भाला फेकला.—१ शमुवेल १८:११; १९:१०.
‘परंतु मी ईर्ष्यावान व्यक्ती नाही,’ असे कदाचित तुम्ही म्हणाल. हे खरे की, ईर्ष्येचा तुमच्या जीवनावर ताबा नसेल. परंतु, काही प्रमाणात, आपल्या सर्वांवर ईर्ष्येचा परिणाम होतो—जसे, आपल्या स्वतःच्या आणि इतरांच्या ईर्ष्यायुक्त भावनांचा. आपण इतरांमध्ये ईर्ष्या शोधून काढण्यात पटाईत असलो, तरी आपल्या स्वतःमध्ये ती पाहण्यास आपण धिमे असू.
‘मत्सर वाटण्याची प्रवृत्ती’
देवाचे वचन, बायबल, यामध्ये प्रकट केलेल्या पापी मानवी प्रवृत्तीचा अहवाल बहुधा मत्सराने घडणारी पातके ठळकपणे मांडतो. तुम्हाला काइन व हाबेलचा वृत्तान्त आठवतो का? आदाम व हव्वेच्या या दोन्ही पुत्रांनी देवाला यज्ञार्पण वाहिले. हाबेल विश्वास बाळगणारा मनुष्य असल्यामुळे त्याने यज्ञार्पण वाहिले. (इब्रीयांस ११:४) पृथ्वीसंबंधाने देवाचा महान उद्देश पूर्ण करण्याची ताकद देवाकडे होती असा त्याचा विश्वास होता. (उत्पत्ति १:२८; ३:१५; इब्रीयांस ११:१) भावी पार्थिव परादीसमध्ये देव विश्वासू मानवांना जीवनाचे बक्षीस देईल असा देखील विश्वास हाबेलने केला. (इब्रीयांस ११:६) अशा प्रकारे, देवाने हाबेलच्या यज्ञाबद्दल पसंती व्यक्त केली. काइनाने त्याच्या भावावर खरोखर प्रेम केले असते, तर देवाने हाबेलला आशीर्वाद दिल्याबद्दल त्याला आनंद वाटला असता. त्याऐवजी, काइन, “संतापला.”—उत्पत्ति ४:५.
काइनाला देखील आशीर्वाद मिळावा म्हणून त्याने चांगले ते करावे असे देवाने त्यास आर्जवले. त्यानंतर देवाने ताकीद दिली: “पण तू बरे केले नाही तर दाराशी पाप टपूनच आहे; त्याचा रोख तुजवर आहे, करिता तू त्यास दाबात [ठेवशील का]?” (उत्पत्ति ४:७) दुःखाची गोष्ट म्हणजे, काइनाने त्याच्या ईर्ष्येने निर्माण झालेल्या क्रोधाला दाबात ठेवले नाही. या ईर्ष्येने आपल्या नीतिमान भावाचा खून करण्यास भाग पाडले. (१ योहान ३:१२) तेव्हापासून, झगड्यांनी व युद्धांनी करोडो जीव घेतले आहेत. “अधिक जमिनीची अभिलाषा, अधिक धनसंपत्तीची अभिलाषा, अधिक शक्तीची अभिलाषा, किंवा सुरक्षिततेची अभिलाषा, ही युद्धाची काही मूळ कारणे असू शकतात,” असे द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिया स्पष्टीकरण करते.
खरे ख्रिस्ती या जगाच्या युद्धांमध्ये भाग घेत नाहीत. (योहान १७:१६) तथापि, दुःखाची गोष्ट अशी आहे की, काहीवेळेस ख्रिस्ती व्यक्तिगतरित्या शाब्दिक भांडणात गुंतले जातात. मंडळीतील इतर सदस्य यात भाग घेऊ लागले, तर या भांडणांचे परिवर्तन हानीकारक शाब्दिक युद्धांमध्ये होऊ शकते. “तुम्हामध्ये लढाया व भांडणे कशातून उत्पन्न होतात?” असे याकोब या बायबल लेखकाने सह-विश्वासू जणांना विचारले. (याकोब ४:१) त्यांच्या भौतिकतेचा लोभ उघडकीस आणून त्याने त्या प्रश्नाचे उत्तर दिले, व पुढे म्हटले, “तुम्ही . . . हेवा करिता” किंवा “ईर्ष्यावान” बनता. (याकोब ४:२, तळटीप, NW) होय, भौतिकवादामुळे, उत्तम परिस्थितींचा आनंद उपभोगणाऱ्यांचा हेवा किंवा त्यांच्याविषयी ईर्ष्या बाळगली जाऊ शकते. याच कारणास्तव, याकोबाने, ‘[मत्सर] वाटण्याच्या’ मानवी प्रवृत्तीविरुद्ध इशारा दिला.—याकोब ४:५.
इर्ष्येची कारणे पडताळून पाहण्यामध्ये काय लाभ आहे? हे आपल्याला, प्रामाणिक असण्यास आणि इतरांसोबत चांगले नातेसंबंध राखण्याची चालना देण्यास मदत करू शकते. ते आपल्याला अधिक समजूतदार, सहनशील व क्षमाशील असण्यासही मदत करू शकते. सर्वात उत्तम म्हणजे, ते पापी मानवी प्रवृत्तींपासून देवाच्या तारणाच्या प्रेमळ तरतुदीबद्दल व बचावाबद्दल मानवाची निकडीची गरज ठळकपणे मांडते.—रोमकर ७:२४, २५.
पापी ईर्ष्येविना असलेले जग
मानवी दृष्टिकोनातून, पापी ईर्ष्येविना असलेले जग अशक्य वाटेल. रॉम लॅन्डाऊ या लेखकांनी कबूल केले: “अनेक पिढ्यांची जमा केलेली बुद्धी व त्यासोबत त्या विषयाबद्दल तत्त्ववेत्त्यांनी . . . व मानसशास्त्रज्ञांनी म्हटलेले सर्वकाही ईर्ष्येने पीडित असलेल्या मनुष्याला काही मार्गदर्शन देत नाही. . . . कोणा डॉक्टरने कधी ईर्ष्येने पेटलेल्या मनुष्याला बरे केले आहे का?”
परंतु, देवाचे वचन एका नवीन जगात परिपूर्ण मानवी जीवन प्राप्त करण्याची आशा देते जेथे कोणीही या भक्तिहीन ईर्ष्येने किंवा मत्सराने पीडित होणार नाही. शिवाय, अशी दुष्ट विशेष लक्षणे दाखवणाऱ्या लोकांकरवी त्या नवीन जगाच्या शांतीचा भंग होणार नाही.—गलतीकर ५:१९-२१; २ पेत्र ३:१३.
तरीसुद्धा, सर्वच प्रकारची ईर्ष्या अयोग्य नाही. वास्तविकतेत, बायबल म्हणते की, यहोवा “ईर्ष्यावान देव आहे.” (निर्गम ३४:१४) त्याचा काय अर्थ होतो? तसेच बायबल योग्य ईर्ष्येविषयी काय म्हणते? त्याच वेळी, एक व्यक्ती अयोग्य ईर्ष्येला दाबात कशी ठेवू शकते? पुढील लेख पाहा.