वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 ९/१५ पृ. ५-६
  • ईर्ष्येने माझे जीवन जवळजवळ उद्‌ध्वस्त केले

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईर्ष्येने माझे जीवन जवळजवळ उद्‌ध्वस्त केले
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • मिळती जुळती माहिती
  • प्रीती अयोग्य ईर्ष्येवर विजय मिळवते
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • यहोवाच्या शुद्ध उपासनेसाठी ईर्ष्यावान
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • ईर्ष्येविषयी तुम्हाला काय माहीत असले पाहिजे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • ख्रिश्‍चनांनी ईर्षावान असावे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 ९/१५ पृ. ५-६

ईर्ष्येने माझे जीवन जवळजवळ उद्‌ध्वस्त केले

माझा विवाह मार्कa या माझ्या दुसऱ्‍या पतीशी झाला त्या वेळी ईर्ष्येचा माझ्यावर अतिशय वाईट परिणाम होऊ लागला. आम्हाला काही सावत्र मुलांची काळजी घ्यावी लागत होती व आमच्या पूर्वीच्या सोबत्यांशी व्यवहार ठेवावा लागत होता. परिस्थिती काहीवेळा असह्‍य होती. जेव्हा कधी कुटुंबांचे समोरा-समोर येणे होत असे त्या वेळी मार्क मला कधीच पाठिंबा देत नव्हता असे मला वाटे. त्याचे आपल्या पूर्वीच्या बायकोवर अजूनही प्रेम आहे असे मला वाटू लागले. ईर्ष्येला काबूत ठेवण्याऐवजी तिला माझ्या जीवनावर ताबा मिळवण्यास मी वाव दिला. मार्कची आधीची बायको जवळपास असली तर मला धोका जाणवत असे.

मी सतत मार्कवर पहारा ठेवत असे, तो कोठे पाहत आहे हे पाहण्यासाठी त्याच्या नजरेवर देखील लक्ष ठेवत होते. त्याची नजर पाहून मी अशा गोष्टी गृहीत धरल्या ज्या तशा नव्हत्या. काहीवेळेस तर, तो आपल्या पहिल्या बायकोच्या प्रेमात अद्यापही आहे असा मी त्यावर उघडपणे दोषारोप करीत असे. एके प्रसंगी, तो याबद्दल इतका दुःखित झाला की तो एका ख्रिस्ती संमेलनातून उठून निघून गेला. मला यहोवासमोर दोषी असल्याचे वाटले. मी माझ्या कुटुंबाचे जीवन देखील दुःखी केले कारण शेवटी त्याचा परिणाम माझ्या मुलांवरही होऊ लागला. मी जे काही करत होते त्यासाठी मला स्वतःचा तिटकारा वाटत होता, परंतु मी कितीही प्रयत्न केला, तरी माझ्या ईर्ष्येवर मी ताबा ठेवू शकतच नव्हते.

माझी मदत करण्याऐवजी मार्कही तसाच वागू लागला. मी त्यावर दोषारोप केल्यास, “जळकुंडी, तू माझ्यावर जळतेस,” असे तो माझ्यावर ओरडत असे. मला ईर्ष्या वाटावी म्हणून तो मुद्दामहून काही करत असे. त्यामुळे माझी ईर्ष्या कमी होईल असे कदाचित त्याला वाटले असावे परंतु, त्यामुळे सर्वकाही आणखीनच बिकट झाले. तो इतर स्त्रियांकडे पाहून त्या किती सुंदर दिसतात त्याविषयी बोलू लागला. यामुळे मला अधिकच कमीपणा व मी नकोशी आहे असे वाटू लागले. ही गोष्ट इतक्या थराला पोहंचली की द्वेष—या आणखी एका भावनेने तिचे किळसवाणे डोके वर केले. त्या क्षणी, मी इतकी गोंधळून गेले होते, की माझ्या जीवनातून तो व त्याचे कुटुंब निघून जावे एवढेच मला हवे होते.

“मत्सराने [ईर्ष्येने] हाडे कुजतात,” असे बायबल म्हणते ते अगदी खरे आहे. (नीतिसूत्रे १४:३०) आता माझ्या प्रकृतीवर याचा परिणाम होऊ लागला. माझ्या पोटात क्षत निर्माण होऊ लागले व ते बरे होण्यास बराच अवधी लागला. मार्क करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचा संशय करून मी माझे जीवन आणखीनच दुःखित केले. मी त्याचे खिसे चाचपत असे, व मला कोणतेही दूरध्वनी क्रमांक सापडले, तर फोनवर कोण बोलते हे पाहण्यासाठी मी त्या क्रमांकांवर फोन करत असे. मनातल्या मनात, माझी मलाच लाज वाट होती; त्यामुळे मी यहोवासमोर रडत असे. तरीपण मी स्वतःला रोखू शकले नाही. मी स्वतःचीच सर्वात वाईट शत्रू होते.

माझ्या आध्यात्मिकतेवर इतका परिणाम झाला की मी प्रार्थना करू शकत नव्हते. माझे यहोवावर प्रेम होते व माझ्यासाठी काय उचित होते ते मला खरोखर जाणून घ्यावयाचे होते. पती व पत्नींना लागू होणारी सर्व शास्त्रवचने मला ठाऊक होती परंतु मी त्यांचा अवलंब करू शकले नाही. माझी सुंदर मुले होती, तरी मी यापुढे जगू नये असे माझ्या जीवनात मला पहिल्यांदा वाटले.

मंडळीतील वडील खूप प्रोत्साहन देणारे ठरले आणि माझी मदत करण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. परंतु त्यांनी माझ्या ईर्ष्येचा विषय काढला, तर त्याविषयी लाज वाटत असल्यामुळे मी ते नाकारत असे व मला अशी समस्या होती असे मला कबूल करावेसे वाटत नव्हते.

कालांतराने, माझी प्रकृती इतकी ढासळली की शस्त्रक्रिया करण्यासाठी मला इस्पितळात जावे लागले. तेथे असताना मला जाणवले की जीवन पुढे असेच चालू शकत नाही. मार्क व मी भावनात्मकरित्या एकदुसऱ्‍यांमध्ये इतके गोवले न जाता आमची परिस्थिती कशी होते ते पाहण्यास तीन महिन्यांकरता विभक्‍त होण्याचे ठरवले. या दरम्यान एक चांगली घटना घडली. सावध राहा! नियतकालिकात “मद्यपी लोकांच्या प्रौढ मुलांकरता मदत” या विषयाचा लेख आला.b

माझी आई मद्यपी होती. मला शारीरिकरित्या गैरवागणूक देण्यात आली नव्हती, तरी माझ्या पालकांनी माझ्याबद्दल किंवा एकमेकांबद्दल कधीही शारीरिकरित्या आपुलकी व्यक्‍त केली नाही. माझ्या आईने मला कधी कवटाळलेले किंवा प्रेम करत असल्याचे सांगितलेले मला आठवत नाही. यामुळे मी प्रत्यक्षात, प्रेम कसे करावे किंवा यासारखेच महत्त्वाचे म्हणजे, इतरांकडून प्रेम केली जाणारी व्यक्‍ती कसे बनावे हे खरोखर न जाणताच लहानाची मोठी झाले.

माझी आई बहुतेकवेळा मला माझ्या वडिलांच्या प्रेमसंबंधांविषयी व ती त्यांच्यावर भरवसा करू शकत नव्हती हे सांगत असे. म्हणून सामान्यपणे, पुरुषांवर भरवसा न ठेवण्याची मनोवृत्ती बाळगूनच मी लहानाची मोठी झाले. माझ्या अशा संगोपनामुळे, मला नेहमी इतरांसमोर विशेषतः इतर स्त्रियांसमोर कमीपणा वाटत होता. सावध राहा! चा तो लेख वाचल्याने मला या गोष्टींचे महत्त्व समजून घेण्यास मदत मिळाली. जीवनात प्रथम, माझ्या ईर्ष्येच्या समस्येच्या मूळ कारणांबद्दल मला समजले.

मी तो सावध राहा! मधील लेख माझा पती, मार्क यांना दाखवला व यामुळे मला समजून घेण्यास त्यांनाही मदत मिळाली. त्यानंतर लगेचच, ते व मी, विभक्‍त होण्याचा विचार करत असणाऱ्‍या जोडप्यांकरता असलेला बायबलचा सल्ला अनुसरू शकलो. आम्ही दोघांनीही आपसात समेट केला. (१ करिंथकर ७:१०, ११) आता आमचा विवाह पूर्वीपेक्षा अधिक चांगला आहे. आम्ही दोघेही, बहुतेक कार्ये एकत्र मिळून करतो विशेषकरून ख्रिस्ती कार्यहालचाली समाविष्ट असतात तेव्हा. मार्क जास्त समभावना दाखवतो. जवळजवळ प्रत्येक दिवशी त्याचे माझ्यावर किती प्रेम आहे हे तो सांगतो व आता मी त्यावर खरोखर विश्‍वास ठेवते.

आम्ही मार्कच्या पहिल्या पत्नीला भेटणार आहोत असे कळते तेव्हा, मी यहोवाकडे सामर्थ्यासाठी प्रार्थना करते व मला प्रौढ ख्रिस्ती पद्धतीने वागण्यास मदत देण्याची विचारणा करते. त्याचा फायदा होतो. तिच्याविषयी मला वाटणारा द्वेष देखील आता नाहीसा होत आहे. मी आता नकारात्मक गोष्टींचा विचार करत नाही किंवा कल्पना करणे देखील मर्यादेपलीकडे जाऊ देत नाही.

मला अद्यापही ईर्ष्येच्या काही अयोग्य भावना होतात. केवळ देवाच्या नवीन जगातील जीवनच माझ्यातून यांना पूर्णपणे काढून टाकील. या दरम्यान, ईर्ष्येला माझ्यावर ताबा करू देण्याऐवजी मी ईर्ष्येला कह्‍यात ठेवण्याचे शिकले आहे. होय, ईर्ष्येने माझे जीवन जवळजवळ उद्‌ध्वस्त केले होते, परंतु यहोवा व त्याच्या संघटनेमुळे मी आता अधिक आनंदी व्यक्‍ती आहे व माझी प्रकृती आता पुन्हा पूर्वीसारखी चांगली झाली आहे. पुन्हा एकदा माझा देव, यहोवा याजबरोबर माझा दृढ नातेसंबंध आहे.— सौजन्याने.

[तळटीपा]

a नाव बदलण्यात आले आहे.

b मे २२, १९९२ चे अवेक! पृष्ठे ८-१२ पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा