वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 ९/१ पृ. ८-१३
  • खोट्या दैवतांविरुद्ध साक्षीदार

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • खोट्या दैवतांविरुद्ध साक्षीदार
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • सत्यासाठी अब्राहामाची साक्ष
  • साक्षीदारांचे राष्ट्र
  • दैवतांची परीक्षा
  • ईश्‍वरी सार्वभौमत्वासाठी ख्रिस्ती साक्षीदार
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • “तुम्ही माझे साक्षी आहा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
  • ‘डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे नव्हे तर विश्‍वासाने चालणे’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • देवाने निवडलेल्या राष्ट्रात जन्मलेले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 ९/१ पृ. ८-१३

खोट्या दैवतांविरुद्ध साक्षीदार

‘यहोवा म्हणतो, तुम्ही माझे साक्षीदार आहा, तू माझा निवडलेला सेवक आहेस.’ —यशया ४३:१०, पंडिता रमाबाई भाषांतर.

१. खरा देव कोण आहे आणि आज उपासना केल्या जात असलेल्या अगणित दैवतांपेक्षा कोणत्या बाबतींमध्ये तो सर्वोच्च आहे?

खरा देव कोण आहे? आज, संपूर्ण मानवजात या अतिशय महत्त्वपूर्ण वादविषयाला तोंड देवून आहे. मानव असंख्य दैवतांची उपासना करत असले, तरी एकच देव आपल्याला जीवन आणि आनंदी भवितव्य देऊ शकतो. केवळ एकट्याविषयीच असे म्हटले जाऊ शकते: “आपण त्याच्या ठायी जगतो, वागतो व आहो.” (प्रेषितांची कृत्ये १७:२८) खरे म्हणजे, उपासना केली जाण्याचा हक्क केवळ एकाच देवाला आहे. प्रकटीकरण पुस्तकातील स्वर्गीय समूह म्हणतो त्यानुसार: “हे प्रभो [यहोवा] आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य ह्‍यांचा स्वीकार करावयास तू योग्य आहेस; कारण तू सर्व काही निर्माण केले, तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले.”—प्रकटीकरण ४:११.

२, ३. (अ) यहोवाची उपासना केल्या जाण्याच्या हक्काला सैतानाने लबाडीने आव्हान कसे दिले? (ब) हव्वेने केलेल्या पापाचा परिणाम तिच्यावर तसेच तिच्या मुलांवर कसा झाला आणि सैतानावर काय परिणाम झाला?

२ एदेन बागेत, उपासना केली जाण्याच्या यहोवाच्या हक्काला सैतानाने लबाडीने आव्हान दिले. त्याने सर्पाचा वापर करून हव्वेला सांगितले की जर तिने यहोवाच्या आज्ञेविरुद्ध बंडाळी केली व यहोवाने मना केलेल्या झाडाचे फळ खाल्ले, तर ती स्वतः देवासारखी होईल. त्याचे शब्द असे होते: “देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील, आणि तुम्ही देवासारखे बरेवाईट जाणणारे व्हाल.” (उत्पत्ति ३:५) हव्वेने सर्पावर विश्‍वास ठेवला आणि मना केलेले फळ खाल्ले.

३ अर्थातच, सैतानाने लबाडी केली. (योहान ८:४४) हव्वेने पाप केल्यावर, बरोबर आणि चूक काय हा यहोवाने ठरवण्याचा हक्क त्याच्यावर सोडण्याऐवजी तिने तो स्वतःकडे घेतल्यामुळे एक प्रकारे ती ‘देवासारखी’ झाली. सैतानाने लबाडी केली असली, तरी शेवटी तिचा मृत्यू झाला. यास्तव, हव्वेच्या पापाचा खरा लाभाधिकारी केवळ सैतान होता. हव्वेला पापाप्रत नेण्यामध्ये सैतानाचे अकथित ध्येय स्वतः एक दैवत होण्याविषयीचे होते. हव्वेने पाप केल्यावर ती त्याची पहिली मानवी अनुयायी बनली व लगेच आदाम तिला येऊन मिळाला. त्यांच्या बहुतेक मुलांचा जन्म केवळ ‘पापातच’ झाला नाही, तर ते सैतानाच्या प्रभावाखाली देखील आले आणि अगदी कमी काळातच, खऱ्‍या देवापासून अलिप्त झालेले संपूर्ण जग अस्तित्वात आले.—उत्पत्ति ६:५; स्तोत्र ५१:५.

४. (अ) या युगाचे दैवत कोण आहे? (ब) तातडीची गरज काय आहे?

४ त्या जगाचा जलप्रलयात नाश झाला. (२ पेत्र ३:६) जलप्रलयानंतर, यहोवापासून दुरावलेले दुसरे जग निर्माण झाले आणि ते अजूनही अस्तित्वात आहे. त्याबद्दल बायबल सांगते: “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” (१ योहान ५:१९) यहोवाच्या नियमाचा आशय आणि त्याचे खरे महत्त्व याविरुद्ध कार्य करण्याद्वारे हे जग सैतानाचे ध्येय पूर्ण करते. तो या जगाचे दैवत आहे. (२ करिंथकर ४:४) तरीही तो मुलतः एक दुर्बळ दैवत आहे. तो लोकांना आनंदी बनवू शकत नाही किंवा त्यांना जीवनही देऊ शकत नाही; केवळ यहोवाच हे करू शकतो. या कारणास्तव, अर्थपूर्ण जीवन आणि चांगले जग हवे असलेल्या लोकांनी, प्रथम यहोवा हा खरा देव आहे हे शिकण्यास हवे आणि मग त्याच्या इच्छेप्रमाणे करण्याचे शिकले पाहिजे. (स्तोत्र ३७:१८, २७, २८; उपदेशक १२:१३) अशा प्रकारे विश्‍वासू पुरुष आणि स्त्रियांनी यहोवाबद्दलची साक्ष देणे किंवा सत्याची घोषणा करणे ही निकडीची गरज आहे.

५. पौलाने कोणत्या ‘साक्षीरूपी मेघाचा’ उल्लेख केला? त्याने दिलेल्या यादीतील काही लोकांची नावे सांगा?

५ आरंभापासूनच, असे विश्‍वासू लोक जगामध्ये दिसून आले आहेत. प्रेषित पौल त्यांची मोठी यादी इब्रीयांच्या ११ व्या अध्यायात देतो आणि त्यांना ‘मोठा साक्षीरूपी मेघ’ असे संबोधतो. (इब्रीयांस १२:१) पौलाच्या यादीत आदाम व हव्वेचा दुसरा पुत्र हाबेल याचे नाव प्रथम होते. जलप्रलयापूर्वीच्या काळापासून हनोख आणि नोहाचा देखील उल्लेख आढळतो. (इब्रीयांस ११:४, ५, ७) यहुदी जातीचा पूर्वज, अब्राहाम हा उल्लेखनीय होता. “देवाचा मित्र” संबोधण्यात आलेला अब्राहाम “विश्‍वसनीय व खरा साक्षी,” असणाऱ्‍या येशूचा पूर्वज बनला.—याकोब २:२३; प्रकटीकरण ३:१४.

सत्यासाठी अब्राहामाची साक्ष

६, ७. यहोवाच खरा देव असण्याबद्दल अब्राहामाचे जीवन आणि कार्य कोणत्या मार्गांनी एक साक्ष होते?

६ अब्राहामाने साक्षीदार या नात्याने कसे कार्य केले? यहोवावर दृढ विश्‍वास ठेवून आणि निष्ठावान आज्ञाधारकता दाखवून त्याने असे केले. त्याला ऊर देश सोडण्यास आणि आपले उर्वरित आयुष्य दूरच्या देशात घालवण्याचे सांगितले तेव्हा, अब्राहामाने आज्ञापालन केले. (उत्पत्ति १५:७; प्रेषितांची कृत्ये ७:२-४) वन्य जमातील लोक, अनेकदा शहरातील अधिक सुरक्षित जीवनासाठी आपल्या भटक्या जीवनाचा त्याग करतील. या कारणास्तव, अब्राहामाने शहर सोडून तंबूतील जीवन पत्करले तेव्हा त्याने यहोवा देवावरील आपल्या भरवश्‍याचा बळकट पुरावा दिला. त्याची आज्ञाधारकता बघ्यांकरता एक साक्ष होती. अब्राहामाच्या विश्‍वासामुळे यहोवाने त्याला खूप आशीर्वादित केले. तंबूत राहून देखील अब्राहामाची भौतिकरित्या भरभराट झाली. लोट व त्याच्या कुटुंबाला बंदिवान करून नेले तेव्हा, पिच्छा पुरवण्यात यहोवाने अब्राहामाला यश दिले, ज्यामुळे तो त्यांना सोडवू शकला. अब्राहामाच्या पत्नीला वृद्धावस्थेत पुत्र झाला आणि अब्राहाम एका संततीचा पिता होईल, या यहोवाच्या अभिवचनाची पुष्टी दिली गेली. अब्राहामाद्वारे यहोवा हा जिवंत देव असल्याचे व तो आपल्या अभिवचनांची पूर्णता करतो हे लोकांना पाहण्यास मिळाले.—उत्पत्ति १२:१-३; १४:१४-१६; २१:१-७.

७ लोटाची सुटका करून परतत असताना अब्राहाम शालेमचा (नंतर जेरूसलेम म्हटलेल्या) राजा मलकीसदेकाला भेटला, ज्याने अब्राहामाचे स्वागत असे म्हणून केले: ‘परात्पर देवाचा अब्राम आशीर्वादित असो.’ सदोमचा राजा देखील त्याला भेटला व अब्राहामाला बक्षीस देण्याची त्याची इच्छा होती. अब्राहामाने ते नाकारले. का बरे? कारण त्याच्या आशीर्वादांच्या उगमाबद्दल कोणताही संशय असावा अशी त्याची इच्छा नव्हती. त्याने म्हटले: “परमेश्‍वर परात्पर देव, आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी याजसमोर मी बाहू उभारून सांगतो की, तुमचा एक सुतळीचा तोडा किंवा वहाणेचा बंद मी घेणार नाही; मी अब्रामास संपन्‍न केले असे म्हणावयास तुम्हाला कारण न मिळो.” (उत्पत्ति १४:१७-२४) अब्राहाम किती उत्तम साक्ष होता बरे!

साक्षीदारांचे राष्ट्र

८. मोशेने यहोवावर अधिक विश्‍वास कसा प्रदर्शित केला?

८ पौलाने दिलेल्या साक्षीदारांच्या यादीत अब्राहामाचा वंशज, मोशेचाही उल्लेख येतो. मोशेने इजिप्तमधील धनाकडे आपली पाठ फिरवली आणि इस्राएलाच्या मुलांची मुक्‍तता करण्यासाठी त्या जागतिक साम्राज्याच्या थोर शासकाला धैर्याने सामोरा गेला. हे धैर्य त्याला कशामुळे मिळाले? त्याच्या विश्‍वासामुळे. पौल म्हणतो: “जो अदृश्‍य आहे त्याला पाहत असल्यासारखा [मोशेने] धीर धरला.” (इब्रीयांस ११:२७) इजिप्तमधील दैवते दृश्‍य व स्पर्श करण्याजोगी होती. आजही त्यांच्या मूर्ती लोकांवर प्रभाव पाडतात. परंतु, यहोवा अदृश्‍य असला, तरी त्या सर्व खोट्या दैवतांपेक्षा मोशेसाठी अधिक वास्तविक होता. यहोवा अस्तित्वात असून आणि तो आपल्या उपासकांना प्रतिफळ देईल याबद्दल मोशेला कोणताही संशय नव्हता. (इब्रीयांस ११:६) मोशे एक उल्लेखनीय साक्षीदार बनला.

९. इस्राएल राष्ट्राने यहोवाची सेवा कशी करावयाची होती?

९ इस्राएलांचे मुक्‍ततेकडे नेतृत्त्व केल्यावर मोशे, यहोवा आणि अब्राहामाच्या वंशजांमधील कराराचा याकोबाद्वारे मध्यस्त बनला. यामुळे, इस्राएल राष्ट्र यहोवाची खास निधी बनले. (निर्गम १९:५, ६) पहिल्यांदा राष्ट्रीय साक्ष द्यावयाची होती. सुमारे ८०० वर्षांनंतर, राष्ट्र उदयास येण्याच्या आरंभापासून यहोवाचे यशयाद्वारेचे शब्द तात्त्विकरूपाने लागू झाले: “परमेश्‍वराचे [यहोवा] असे म्हणणे आहे की तुम्ही मला ओळखावे, मजवर भाव ठेवावा व मी तोच आहे, माझ्यापूर्वी कोणी देव नव्हता व माझ्यानंतरहि कोणी होणे नाही, हे तुम्हाला समजावे म्हणून तुम्ही माझे साक्षी [साक्षीदार] आहा, तू माझा निवडलेला सेवक आहेस.” (यशया ४३:१०) हे नवीन राष्ट्र यहोवाचे साक्षीदार या नात्याने कशी सेवा करणार होते? त्यांचा विश्‍वास व आज्ञाधारकता आणि यहोवाने त्यांच्याकरता जे कार्य केले आहे याद्वारे सेवा करील.

१०. इस्राएलाप्रीत्यर्थ यहोवाच्या शक्‍तिशाली कार्यांनी कशारितीने एक साक्ष दिली आणि याचा परिणाम काय झाला?

१० इस्राएल त्याच्या निर्माण होण्याच्या सुमारे ४० वर्षांनी, वाग्दत्त देशाचा ताबा घेण्याच्या मार्गावर होते. यरीहो शहराची टेहळणी करण्यासाठी हेर गेले व यरीहोची रहिवासी राहाबने त्यांचा बचाव केला. का बरे? तिने म्हटले: “तुम्ही मिसर देशाहून निघाला तेव्हा तुमच्यासमोर परमेश्‍वराने तांबड्या समुद्राचे पाणी कसे आटविले आणि यार्देनेपलीकडे राहणारे अमोऱ्‍यांचे दोन राजे सीहोन व ओग ह्‍यांचा तुम्ही कसा समूळ नाश केला हे आमच्या कानी आले आहे. हे ऐकताच आमच्या काळजाचे पाणीपाणी झाले आणि तुमच्या भीतीमुळे कोणाच्या जिवात जीव राहिला नाही; कारण तुमचा देव परमेश्‍वर [यहोवा] हाच वर स्वर्गात व खाली पृथ्वीवर देव आहे.” (यहोशवा २:१०, ११) यहोवाच्या शक्‍तिशाली कृत्यांमुळे राहाब व तिचे कुटुंब यरीहो व त्यातील खोटी दैवते सोडण्यास आणि इस्राएलासोबत यहोवाची उपासना करण्यास प्रवृत्त झाले. स्पष्टपणे, यहोवाने इस्राएलाद्वारे शक्‍तिशाली साक्ष दिली होती.—यहोशवा ६:२५.

११. साक्ष देण्याबाबतीत सर्व इस्राएली पालकांची कोणती जबाबदारी होती?

११ इस्राएली अजून इजिप्तमध्येच होते, तेव्हा यहोवाने मोशेला फारोकडे पाठवून असे म्हटले: “फारोकडे जा, कारण मी त्याचे व त्याच्या सेवकांचे मन कठीण केले आहे ते ह्‍यासाठी की, त्यांच्यामध्ये मी ही आपली चिन्हे प्रगट करावी. मी परमेश्‍वर [यहोवा] आहे हे तुम्हाला कळावे म्हणून मी मिसऱ्‍यांची कशी फजिती केली आणि त्यांच्यामध्ये काय काय चिन्हे प्रगट केली ते तुझ्या पुत्रपौत्रांच्या कानी जाऊ दे.” (निर्गम १०:१, २) आज्ञाधारक इस्राएल लोक आपल्या मुलांना यहोवाच्या शक्‍तिशाली कृत्यांबद्दल सांगत होते. ती मुले नंतर त्यांच्या मुलांना याबद्दल सांगत होती व असेच हे पिढ्यानपिढ्या चालले असेल. अशा प्रकारे, यहोवाची शक्‍तिशाली कृत्ये स्मरणात ठेवली जात होती. अशाच रीतीने आज देखील, आपल्या मुलांना साक्ष देण्याची पालकांची जबाबदारी आहे.—अनुवाद ६:४-७; नीतिसूत्रे २२:६.

१२. शलमोन आणि इस्राएलावरील यहोवाचा आशीर्वाद कशा प्रकारे एक साक्ष ठरला?

१२ इस्राएल राष्ट्र विश्‍वासू असताना त्यावरील यहोवाचा समृद्ध आशीर्वाद सभोवतालच्या राष्ट्रांकरता साक्ष ठरला. जसे, यहोवाने अभिवचन दिलेल्या आशीर्वादांचे कथन केल्यावर मोशेने म्हटले: “परमेश्‍वराचे [यहोवा] नाव तुला दिले आहे हे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे पाहतील तेव्हा त्यांना तुझा धाक वाटेल.” (अनुवाद २८:१०) शलमोनाला स्वतःच्या विश्‍वासामुळे बुद्धी आणि धनसंपत्ती देण्यात आली. त्याच्या आधिपत्याखाली राष्ट्राची भरभराट झाली आणि त्या राष्ट्राने दीर्घकाळापर्यंत शांतीचा आनंद घेतला. त्या काळाविषयी आपण वाचतो: “पृथ्वीवरील ज्या ज्या राष्ट्रांनी व ज्या ज्या राजांनी शलमोनाच्या शहाणपणाची कीर्ति ऐकली त्यांच्याकडून लोक त्याचे शहाणपण ऐकावयास येत असत.” (१ राजे ४:२५, २९, ३०, ३४) शलमोनाला भेट देणाऱ्‍यांपैकी शबाची राणी ही प्रमुख होती. राष्ट्र आणि त्याच्या राजावरील यहोवाचा आशीर्वाद स्वतः पाहिल्यावर तिने म्हटले: “धन्य आपला देव परमेश्‍वर [यहोवा]; त्याने आपणावर प्रसन्‍न होऊन आपल्या वतीने आपण राजा व्हावे म्हणून आपणाला आपल्या गादीवर स्थापिले आहे; आपल्या देवाने इस्राएलावर प्रेम करून त्याची कायमची स्थापना करण्याचे म्हणून न्यायाचे व धर्माचे पालन करण्यासाठी त्याने आपणाला राजा केले आहे.”—२ इतिहास ९:८.

१३. इस्राएलाची सर्वात प्रभावकारी साक्ष कोणती असेल आणि आपण त्यापासून अजूनही कसा लाभ मिळवतो?

१३ इस्राएलाची सर्वाधिक प्रभावकारी साक्ष कोणती होती याचा उल्लेख प्रेषित पौलाने केला. दैहिक इस्राएलाची चर्चा रोममधील ख्रिस्ती मंडळीसोबत करताना त्याने म्हटले: “देवाची वचने त्यांना सोपून दिली होती.” (रोमकर ३:१, २) यहोवाचे इस्राएलासोबतचे व्यवहार, तसेच त्याचे उपदेश, त्याचे नियम आणि त्याच्या भविष्यवाण्यांचा अहवाल लिहिण्यास विशिष्ट विश्‍वासू इस्राएली प्रेरित झाले होते, ज्यामध्ये मोशे पहिला होता. या लिखाणामुळे त्या प्राचीन शास्री लोकांनी—आज आपल्या पिढीसहित—भावी पिढ्यांना केवळ एकच सत्य देव असून त्याचे नाव यहोवा असल्याची साक्ष दिली.—दानीएल १२:९; १ पेत्र १:१०-१२.

१४. यहोवाची साक्ष दिलेल्या काहींनी छळ का सहन केला?

१४ इस्राएल लोक वारंवार विश्‍वास प्रदर्शित करण्यास अपयशी ठरले, हे दुःखाचे आहे त्यामुळे यहोवाला आपल्या स्वतःच्या राष्ट्राकरता साक्षीदार पाठवावे लागले. त्यांच्यातील अनेकांचा छळ करण्यात आला. पौलाने म्हटले की काहींची परीक्षा, “टवाळ्या, मारहाण, . . . आणि बंधने व कैद” याद्वारे झाली. (इब्रीयांस ११:३६) खरोखर विश्‍वासू साक्षीदार! अनेकदा यहोवाच्या निवडलेल्या राष्ट्रातील सह सदस्यांकडून त्यांचा छळ झाला हे किती दुःखाचे आहे! (मत्तय २३:३१, ३७) खरे पाहता, राष्ट्राचे पाप इतके झाले की, यहोवाने सा. यु. पू. ६०७ मध्ये बॅबिलोनी लोकांना जेरूसलेम आणि त्याच्या मंदिराचा नाश करण्यास व बचावलेल्या अधिकांश इस्राएलांना बंदिवासात आणले. (यिर्मया २०:४; २१:१०) यहोवाच्या नावाची ती राष्ट्रीय साक्ष तेथेच समाप्त झाली होती का? नाही.

दैवतांची परीक्षा

१५. बॅबिलोनच्या दास्यत्वात असताना देखील साक्ष कशी देण्यात आली?

१५ बॅबिलोनच्या दास्यत्वात असताना देखील, राष्ट्राच्या विश्‍वासू सदस्यांनी यहोवाचे देवत्व आणि सामर्थ्य यांविषयी साक्ष देण्यास कुचराई केली नाही. उदाहरणार्थ, दानीएलाने धैर्याने नबुखद्‌नेस्सराच्या स्वप्नांचा अर्थ सांगितला, बेलशेस्सराला भिंतीवरील लिखाणाचे स्पष्टीकरण दिले आणि प्रार्थनेच्या बाबतीत दारयावेशासमोर हातमिळवणी करण्याचे नाकारले. त्या तीन इब्री लोकांनी देखील मूर्तीसमोर नमन करण्याचे नाकारताना नबुखद्‌नेस्सराला अद्‌भुत साक्ष दिली.—दानीएल ३:१३-१८; ५:१३-२९; ६:४-२७.

१६. यहोवाने इस्राएलाचे त्याच्या देशाकडे परतण्याविषयीचे भाकीत कसे केले आणि या परतण्याचा उद्देश काय असावा?

१६ तथापि, इस्राएलाच्या भूमीला पुन्हा एकदा राष्ट्रीय साक्ष दिली जावी असे यहोवाने उद्देशिले. बॅबिलोनमधील बंदिवान यहुद्यांमध्ये भविष्यवाणी केलेल्या यहेज्केलने, उद्ध्‌वस्त ठिकाणाविषयी यहोवाच्या निश्‍चयाबद्दल लिहिले: “मी तुम्हावर मनुष्यांची, इस्राएलाच्या एकंदर सर्व घराण्याची, संख्या वाढवीन; नगरे वसतील, पडीत स्थळे बांधून काढितील.” (यहेज्केल ३६:१०) यहोवा असे का करणार होता? प्रामुख्याने, त्याच्या नावाची साक्ष याकरता. यहेज्केलद्वारे त्याने म्हटले: “हे इस्राएल घराण्या, मी हे तुम्हाप्रीत्यर्थ करीत नाही, तर तुम्ही राष्ट्राराष्ट्रांत जाऊन माझ्या पवित्र नामास बट्टा लाविला म्हणून माझ्या नामाप्रीत्यर्थ मी हे करीत आहे.”—यहेज्केल ३६:२२; यिर्मया ५०:२८.

१७. यशया ४३:१० मधील शब्दांचा संदर्भ काय आहे?

१७ बॅबिलोनच्या दास्यत्वातून इस्राएलाच्या परतण्याची भविष्यवाणी करते वेळी यशया संदेष्टा, यशया ४३:१० मधील शब्द लिहिण्यास प्रेरित झाला होता. त्याने असे म्हटले की, इस्राएल यहोवाचा साक्षीदार व त्याचा सेवक होता. यशया ४३ आणि ४४ मध्ये यहोवाचे वर्णन निर्माणकर्ता, घडणारा, देव, पवित्र प्रभू, उद्धार करणारा, सोडविणारा, राजा आणि उत्पन्‍नकर्ता असे केले आहे. (यशया ४३:३, १४, १५; ४४:२) यारितीने त्याची स्तुती करण्यात इस्राएल राष्ट्र वारंवार अपयशी झाल्यामुळे इस्राएल राष्ट्राला दास्यत्वात जाऊ दिले. तथापि, ते तेव्हाही त्याचे लोक होते. यहोवाने त्यांना म्हटले होते: “भिऊ नको; कारण मी तुला सोडविले आहे; मी तुला तुझ्या नावाने हाक मारिली आहे; तू माझा आहेस.” (यशया ४३:१) बॅबिलोनातील इस्राएलाचे दास्यत्व संपणार होते.

१८. बॅबिलोनमधून इस्राएलाच्या मुक्‍ततेने यहोवा हाच खरा देव असल्याचे कसे शाबीत केले?

१८ खरे म्हणजे, यहोवाने बॅबिलोनमधून इस्राएल लोकांच्या मुक्‍तीला दैवतांची एक परीक्षा बनवले. त्याने राष्ट्रांच्या खोट्या दैवतांना त्यांचे साक्षीदार आणण्याचे आव्हान केले आणि इस्राएलास त्याने आपला साक्षीदार असे नाव दिले. (यशया ४३:९, १२) इस्राएलांना मुक्‍त केल्यावर, बॅबिलोनमधील दैवते मुळात दैवते नव्हती आणि केवळ तोच एक खरा देव आहे, हे त्याने शाबीत केले. (यशया ४३:१४, १५) या घटनेच्या सुमारे २०० वर्षांआधी, यहुद्यांची सुटका करण्यात आपल्या सेवकाप्रमाणे असलेल्या पारसाच्या कोरेशचे नाव त्याने सांगितले आणि आपल्या देवत्वाचा आणखी एक पुरावा दिला. (यशया ४४:२८) इस्राएलाची मुक्‍तता केली गेली. का बरे? यहोवा सांगतो: “लोक [इस्राएल] माझे स्तवन करितील.” (यशया ४३:२१) साक्ष देण्यासाठी ते अधिक संधी देणार होते.

१९. कोरेशने इस्राएल लोकांना जरुसलेमला परतण्याचे निमंत्रण देण्याद्वारे तसेच ते परतल्यावर विश्‍वासू यहुद्यांच्या कार्यांद्वारे कोणती साक्ष दिली?

१९ वेळ आली तेव्हा, भविष्यवाणी केल्याप्रमाणेच पारसाच्या कोरेशने बॅबिलोनवर विजय मिळवला. कोरेश, मूर्तिपूजक असताना देखील, बॅबिलोनमधील यहुद्यांसाठी त्याने जाहीर निवेदन दिले तेव्हा यहोवाच्या देवत्वाची घोषणा केली: “त्याच्या सर्व लोकांपैकी जो कोणी तुमच्या मध्ये असेल—त्याजबरोबर त्याचा देव असो—त्याने यहूदातील यरुशलेमेस जाऊन इस्राएलाचा देव परमेश्‍वर [यहोवा] याचे मंदिर बांधावे; यरुशलेमेत जो आहे तोच देव होय.” (एज्रा १:३) अनेक यहुद्यांनी प्रतिसाद दिला. त्यांनी वाग्दत्त देशाला जाण्यासाठी दूरचा प्रवास केला आणि प्राचीन मंदिराच्या जागेवर वेदीची स्थापना केली. निरुत्साह आणि कटू विरोध असताना देखील अखेरीस ते मंदिर तसेच जेरूसलेम शहराची पुनःउभारणी करू शकले. “बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर [त्याच्या] आत्म्याने कार्यसिद्ध होईल,” असे यहोवाने स्वतः म्हटल्याप्रमाणेच हे सर्व काही घडून आले. (जखऱ्‍या ४:६) या साध्यतांनी यहोवा हा खरा देव असल्याचा आणखी पुरावा दिला.

२०. इस्राएलाच्या कमतरतांव्यतिरिक्‍त, प्राचीन जगात यहोवाच्या नावाची साक्ष दिल्याबद्दल काय म्हटले जाऊ शकते?

२० अशारितीने, इस्राएल राष्ट्र अपरिपूर्ण आणि बंडखोर लोकांचे असले, तरी यहोवा त्याचा उपयोग आपला साक्षीदार म्हणून करीत राहिला. ख्रिस्त पूर्व जगात त्या राष्ट्राने, त्याच्या मंदिर आणि याजकपदासह खऱ्‍या उपासनेच्या जगातील केंद्राचे प्रतिनिधीत्व केले. इब्री शास्रवचनांत इस्राएलासंबंधी असलेली यहोवाची कृत्ये, जो कोणी वाचतो त्याला, एकच खरा देव आहे आणि त्याचे नाव यहोवा असण्याबद्दल कोणताही संशय असू शकत नाही. (अनुवाद ६:४; जखऱ्‍या १४:९) तथापि, यहोवाच्या नावाची मोठ्या प्रमाणात साक्ष देण्याची गरज होती, याची चर्चा आपण पुढील लेखात करणार आहोत.

तुम्हाला आठवते का?

◻ अब्राहामाने यहोवा हा खरा देव असल्याची साक्ष कशी दिली?

◻ मोशेच्या कोणत्या उल्लेखनीय गुणाने त्याला विश्‍वासू साक्षीदार असण्यास समर्थ केले?

◻ इस्राएलाने कोणत्या मार्गांनी यहोवाविषयी राष्ट्रीय साक्ष दिली?

◻ बॅबिलोनमधून इस्राएलाची मुक्‍तता, यहोवा हाच केवळ खरा देव असल्याचे प्रदर्शन कसे होते?

[१० पानांवरील चित्रं]

अब्राहामाने आपला विश्‍वास आणि आज्ञाधारकता याद्वारे यहोवाच्या देवत्वाची उल्लेखनीय साक्ष दिली

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा