वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 ९/१ पृ. १३-१८
  • ईश्‍वरी सार्वभौमत्वासाठी ख्रिस्ती साक्षीदार

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरी सार्वभौमत्वासाठी ख्रिस्ती साक्षीदार
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • खोटे साक्षीदार
  • ईश्‍वरी तत्त्वांनुरूप जगणे
  • साक्षीदार बायबल विद्यार्थी आहेत
  • यहोवाची सामर्थ्यशाली कार्ये
  • प्रचार करावा अशी सुवार्ता
  • खोट्या दैवतांविरुद्ध साक्षीदार
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • ‘सर्व राष्ट्रांना साक्ष’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • चांगल्याप्रकारे साक्ष देण्याचे प्रशिक्षण मिळालेले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • “प्रथम . . . सुवार्तेची घोषणा झाली पाहिजे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 ९/१ पृ. १३-१८

ईश्‍वरी सार्वभौमत्वासाठी ख्रिस्ती साक्षीदार

“ज्याने तुम्हास अंधकारातून काढून आपल्या अद्‌भुत प्रकाशात पाचारण केले त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे.”—१ पेत्र २:९.

१. यहोवाबद्दल पूर्व-ख्रिस्ती काळात कोणती प्रभावशाली साक्ष देण्यात आली होती?

यहोवा हाच खरा देव असल्याची धैर्याने साक्ष देणाऱ्‍या साक्षीदारांची पूर्व ख्रिस्ती काळात लांबलचक यादी आहे. (इब्रीयांस ११:४–१२:१) त्यांनी त्यांच्या विश्‍वासात दृढ राहून निर्भीडपणे यहोवाच्या नियमांचे पालन केले आणि उपासनेच्या बाबतीत हातमिळवणी करण्यास नकार दिला. त्यांनी यहोवाच्या सार्वभौमत्वाची एक जोरदार साक्ष दिली.—स्तोत्र १८:२१-२३; ४७:१, २.

२. (अ) यहोवाचा सर्वात महान साक्षीदार कोण आहे? (ब) यहोवाचा साक्षीदार म्हणून इस्राएल राष्ट्राची जागा कोणी घेतली? हे आपल्याला कसे माहीत होते?

२ सर्वात शेवटला आणि महान पूर्व–ख्रिस्ती साक्षीदार बाप्तिस्मा करणारा योहान होता. (मत्तय ११:११) निवडलेल्याच्या आगमनाची घोषणा करण्याचा सुहक्क त्याला प्राप्त झाला होता तसेच येशू वचनदत्त मशीहा आहे अशी त्याने त्याची ओळख करून दिली. (योहान १:२९-३४) येशू यहोवाचा “विश्‍वसनीय व खरा साक्षी,” सर्वात थोर साक्षीदार आहे. (प्रकटीकरण ३:१४) दैहिक इस्राएलने येशूला नाकारल्यामुळे यहोवानेही त्यांना नाकारले आणि त्याचे साक्षीदार होण्यासाठी एका नव्या राष्ट्राची म्हणजेच देवाच्या आध्यात्मिक इस्राएलाची नियुक्‍ती केली. (यशया ४२:८-१२; योहान १:११, १२; गलतीकर ६:१६) “तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहा; ह्‍यासाठी की ज्याने तुम्हास अंधकारातून काढून आपल्या अद्‌भुत प्रकाशांत पाचारण केले त्याचे गुण प्रसिद्ध करावे” असे पेत्राने म्हटले तेव्हा इस्राएलबद्दलच्या या भविष्यवाणीचा संदर्भ देत त्याने हे दाखवले की ती भविष्यवाणी ‘देवाच्या इस्राएलला,’ ख्रिस्ती मंडळीला लागू होते.—१ पेत्र २:९; निर्गम १९:५, ६; यशया ४३:२१; ६०:२.

३. देवाच्या इस्राएलची आणि ‘मोठ्या लोकसमुदायाची’ प्रमुख जबाबदारी कोणती आहे?

३ यहोवाच्या वैभवाची जाहीर साक्ष देणे ही देवाच्या इस्राएलची प्रमुख जबाबदारी आहे हे पेत्राचे शब्द दाखवून देतात. आपल्या दिवसांमध्ये या आध्यात्मिक राष्ट्राला साक्षीदारांचा एक “मोठा लोकसमुदाय” सामील झाला आहे जे देवाची जाहीरपणे महिमा वर्णितात. सर्वांना ऐकू येईल अशा मोठ्या आवाजाने म्हणतात: “राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकऱ्‍याकडून तारण आहे.” (प्रकटीकरण ७:९, १०; यशया ६०:८-१०) देवाचे इस्राएल आणि त्याचे सोबती त्यांची साक्ष कशा प्रकारे पूर्ण करू शकतील? त्यांचा विश्‍वास आणि आज्ञाधारकतेद्वारे.

खोटे साक्षीदार

४. येशूच्या दिवसांतील यहुदी खोटे साक्षीदार का होते?

४ विश्‍वास आणि आज्ञाधारकतेमध्ये, ईश्‍वरी तत्त्वांनुरूप जीवन व्यतीत करणे गोवले आहे. येशूने त्याच्या दिवसांतील धार्मिक यहुदी नेत्यांबद्दल काय म्हटले त्यावरून याचे महत्त्व दिसून येते. ह्‍या नेत्यांनी “मोशेच्या आसनावर” बसून स्वतःला नियमशास्त्राचे शिक्षक म्हणवून घेतले. त्यांनी ख्रिस्ती विश्‍वासात नसलेल्यांचे धर्मांतर करण्यासाठी मिशनऱ्‍यांना देखील पाठवले. तरीदेखील येशू त्यांना म्हणाला: “तुम्ही एक मतानुयायी मिळविण्यासाठी समुद्र व भूमि पालथी घालता आणि तो मिळाला म्हणजे तुम्ही त्याला आपणाहून दुप्पट असा नरकपुत्र करिता.” हे धर्मवादी खोटे साक्षीदार—उद्धट, दांभिक आणि निर्दयी होते. (मत्तय २३:१-१२, १५) एके प्रसंगी येशू काही यहुद्यांना म्हणाला: “तुम्ही आपला बाप सैतान ह्‍यापासून झाला आहा आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करावयास इच्छिता.” देवाच्या निवडलेल्या राष्ट्राच्या सदस्यांना तो असे का म्हणेल बरे? कारण ते यहोवाच्या थोर साक्षीदाराच्या शब्दांकडे लक्ष देत नव्हते.—योहान ८:४१, ४४, ४७.

५. ख्रिस्ती धर्मजगताने देवाबद्दलची खोटी साक्ष दिली आहे हे आपल्याला कसे माहीत होते?

५ त्याच प्रकारे, येशूच्या काळापासूनच्या शतकांदरम्यान, ख्रिस्ती धर्मजगतातील करोडो लोकांनी त्याचे शिष्य असल्याचा दावा केला आहे. परंतु, ते देवाच्या इच्छेनुसार वागले नाहीत व म्हणूनच येशूने त्यांना स्वीकारले नाही. (मत्तय ७:२१-२३; १ करिंथकर १३:१-३) ख्रिस्ती धर्मजगताने मिशनऱ्‍यांना पाठवले व त्यांच्यातील अनेक जण खरोखरच प्रामाणिक होते. तरीही, त्यांनी नरकाग्नीत पापी लोकांना जाळणाऱ्‍या त्रैक्य दैवताची उपासना करण्यास शिकवले आहे आणि त्यांचे पुष्कळ धर्मांतरीत लोक, ख्रिस्ती असल्याचा कोणताच पुरावा दाखवत नाहीत. उदाहरणार्थ, आफ्रिकेतील रवांडा देश रोमन कॅथलिक मिशनऱ्‍यांचे सुपीक क्षेत्र राहिले आहे. तरीही, त्या देशात अलीकडेच झालेल्या जातीय युद्धात रवांडन कॅथलिकांनी पूर्ण अंतःकरणाने भाग घेतला. मिशनरी क्षेत्राच्या फळावरून दिसून येते, की त्यास ख्रिस्ती धर्मजगताकडून खरी ख्रिस्ती साक्ष मिळाली नाही.—मत्तय ७:१५-२०.

ईश्‍वरी तत्त्वांनुरूप जगणे

६. योग्य वर्तन साक्ष देण्याचा एक महत्त्वपूर्ण भाग कशा प्रकारे आहे?

६ ख्रिस्ती असल्याचा दावा करणाऱ्‍यांच्या चुकीच्या वर्तनामुळे ‘सत्य मार्गावर’ कलंक येतो. (२ पेत्र २:२) खरा ख्रिस्ती ईश्‍वरी तत्त्वांनुरूप जीवन जगतो. तो चोरी करत नाही, खोटे बोलत नाही, ठकवत नाही किंवा अनैतिक जीवन व्यतीत करीत नाही. (रोमकर २:२२) तो नक्कीच त्याच्या शेजाऱ्‍याचा खून करत नाही. ख्रिस्ती पती त्यांच्या कुटुंबांची प्रेमळ देखरेख करतात. पत्नी त्या देखरेखीला आदराने पाठिंबा देतात. मुलांना त्यांचे पालक प्रशिक्षण देतात व अशा प्रकारे ते जबाबदार प्रौढ ख्रिस्ती व्यक्‍ती होण्यास तयार असतात. (इफिसकर ५:२१–६:४) आपण सर्व अपरिपूर्ण आहोत आणि चुका करतो हे खरे आहे. परंतु, एक खरा ख्रिस्ती बायबल दर्जांचा आदर करतो आणि त्यांना लागू करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. हे सर्वांना दिसून येते व त्यामुळे उत्तम साक्ष दिली जाते. काही वेळा, ज्यांनी पूर्वी सत्यास विरोध केला त्यांनी एखाद्या ख्रिस्ती व्यक्‍तीचे योग्य वर्तन पाहिले अशा प्रकारे त्यांना मिळवून घेण्यात आले.—१ पेत्र २:१२, १५; ३:१.

७. ख्रिश्‍चनांनी एकमेकांवर प्रीती करणे किती महत्त्वपूर्ण आहे?

७ “तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा” असे येशूने म्हटले तेव्हा त्याने ख्रिस्ती वर्तनाचा महत्त्वपूर्ण पैलू दाखवला. (योहान १३:३५) ‘अनीती, दुष्टपणा, लोभ, वाईटपणा, हेवा, खून, कलह, कपट, कुबुद्धी, चहाडखोर, निंदक, देवाला तिटकारा असलेले, उद्धट, गर्विष्ठ, बढाईखोर, कुकर्मकल्पक, मातापित्यांची अवज्ञा करणारे’ ही सर्व गुणलक्षणे सैतानाच्या जगाची आहेत. (रोमकर १:२९, ३०) अशा एका वातावरणात, ज्या संघटनेची वैशिष्ट्ये प्रीती आहे ती संघटना देवाचा आत्मा कार्यशील असल्याचा जोरदार पुरावा असेल—एक प्रभावशाली साक्ष. अशीच संघटना यहोवाच्या साक्षीदारांची मिळून बनलेली आहे.—१ पेत्र २:१७.

साक्षीदार बायबल विद्यार्थी आहेत

८, ९. (अ) देवाच्या नियमांचा अभ्यास आणि त्याचे मनन केल्याने स्तोत्रकर्त्याला कशा प्रकारे बळकटी मिळाली? (ब) कोणत्या प्रकारे बायबल अभ्यास आणि त्याचे मनन आपल्याला साक्ष देत राहण्यास बळकट करील?

८ उत्तम साक्ष देण्यात यश मिळण्यासाठी एका ख्रिस्ती मनुष्याला यहोवाची धार्मिक तत्त्वे ज्ञात असली पाहिजेत व ती आवडली पाहिजेत आणि त्याला जगाच्या भ्रष्टाचाराचा खरेपणाने वीट वाटला पाहिजे. (स्तोत्र ९७:१०) स्वतःच्या विचारांना चालना देण्यासाठी हे जग लोकांचे मन वळवत आहे व त्याच्या आत्म्याचा विरोध करणे कठीण असू शकते. (इफिसकर २:१-३; १ योहान २:१५, १६) योग्य मनोवृत्ती टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला काय मदत करू शकेल? बायबलचा नियमित व अर्थभरीत अभ्यास. स्तोत्र ११९ अध्यायाच्या लेखकाने यहोवाच्या नियमशास्त्रावर त्याचे प्रेम असल्याचे अनेकदा बोलून दाखवले. त्याने ते वाचले आणि सतत, “दिवसभर,” त्याच्यावर मनन केले. (स्तोत्र ११९:९२, ९३, ९७-१०५) त्यामुळेच तो लिहू शकला: “मी असत्याचा द्वेष करितो व त्याचा वीट मानितो; परंतु तुझे नियमशास्त्र मला प्रिय आहे.” इतकेच नव्हे तर, त्याच्या या गाढ प्रीतीने त्याला कार्य करण्यास भाग पाडले. तो म्हणतो: “तुझ्या न्याय्य निर्णयांसाठी मी दिवसांतून सात वेळा तुझे स्तवन करितो.”—स्तोत्र ११९:१६३, १६४.

९ याच प्रकारे, आपला देवाच्या वचनाचा नियमित अभ्यास आणि त्याचे मनन आपल्या हृदयाला स्पर्श करील व वारंवार, होय “दिवसांतून सात वेळा” त्याची स्तुती करण्यास—यहोवाची साक्ष देण्यास—आपल्याला प्रवृत्त करील. (रोमकर १०:१०) याच्या सुसंगतेत यहोवाच्या वचनांवर नियमितपणे मनन करणारा ‘पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या झाडाप्रमाणे होईल, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाहीत,’ असे पहिल्या स्तोत्राचा लेखक म्हणतो. (स्तोत्र १:३) प्रेषित पौलाने देखील देवाच्या वचनाचे सामर्थ्य दाखवून दिले जेव्हा त्याने लिहिले: “प्रत्येक परमेश्‍वरप्रेरित शास्त्रलेख सद्‌बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्‍यांकरिता उपयोगी आहे.”—२ तीमथ्य ३:१६, १७.

१०. या शेवटल्या दिवसांमध्ये यहोवाच्या लोकांबद्दल कोणती गोष्ट दिसून येते?

१० या २० व्या शतकातील खऱ्‍या उपासकांच्या संख्येची शीघ्र वाढ यहोवाचे आशीर्वाद असल्याचे सूचित करते. गट या नात्याने, ईश्‍वरी सार्वभौमत्वासाठी असलेल्या या आधुनिक दिवसांतील साक्षीदारांनी त्यांच्या अंतःकरणांमध्ये यहोवाच्या नियमांबद्दलची प्रीती विकसित केली आहे यात काही शंकाच नाही. स्तोत्रकर्त्याप्रमाणे तेही यहोवाच्या नियमांचे पालन करण्यास आणि “अहोरात्र” त्याच्या वैभवाची विश्‍वासूपणे साक्ष देण्यास प्रवृत्त होत आहेत.—प्रकटीकरण ७:१५.

यहोवाची सामर्थ्यशाली कार्ये

११, १२. येशू आणि त्याच्या अनुयायांनी केलेल्या चमत्कारांद्वारे काय साध्य करण्यात आले?

११ पहिल्या शतकामध्ये, पवित्र आत्म्याने विश्‍वासू ख्रिस्ती साक्षीदारांना चमत्कार करण्यासाठी शक्‍ती दिली ज्यामुळे त्यांची साक्ष खरी असल्याचा बळकट पुरावा मिळाला. बाप्तिस्मा करणारा योहान तुरुंगात होता तेव्हा “जे येणार आहेत ते आपणच की आम्ही दुसऱ्‍याची वाट पाहावी?” असे येशूला विचारण्यासाठी त्याने शिष्यांना पाठवले. येशूने तेव्हा होय किंवा नाही असे उत्तर दिले नाही. उलट तो म्हणाला: “जे तुम्ही ऐकता व पाहता ते योहानाला जाऊन सांगा; आंधळे पाहतात, पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठविले जातात व गरिबांस सुवार्ता सांगण्यात येते. जो कोणी माझ्यासंबंधाने अडखळत नाही तो धन्य होय.” (मत्तय ११:३-६) या महत्कृत्यांनी, ‘जो येणार आहे’ तो खरोखरच येशू असल्याची साक्ष योहानाला दिली.—प्रेषितांची कृत्ये २:२२.

१२ त्याच प्रकारे, येशूच्या काही अनुयायांनी रोग्यांना बरे केले आणि मेलेल्यांना देखील उठवले. (प्रेषितांची कृत्ये ५:१५, १६; २०:९-१२) हे चमत्कार त्यांच्याकरता स्वतः देवाकडून आलेली साक्ष याच्याप्रमाणे होते. (इब्रीयांस २:४) तसेच अशा प्रकारच्या कार्यांनी यहोवाचे सर्वशक्‍तिमान सामर्थ्य प्रकट केले. उदाहरणार्थ, “जगाचा अधिकारी” सैतानाकडे जीवे मारण्याचे माध्यम आहेत हे खरे आहे. (योहान १४:३०; इब्रीयांस २:१४) परंतु, पेत्राने दुर्कस नावाच्या एका विश्‍वासू स्त्रीचे पुनरुत्थान केवळ यहोवाच्या सामर्थ्यानेच केले असावे कारण तोच केवळ जीवन पुन्हा देऊ शकतो.—स्तोत्र १६:१०; ३६:९; प्रेषितांची कृत्ये २:२५-२७; ९:३६-४३.

१३. (अ) बायबलमधील चमत्कार अजूनही यहोवाच्या सामर्थ्याची साक्ष कशा प्रकारे देतात? (ब) एखाद्या भविष्यवाणीची पूर्णता कशा प्रकारे यहोवाचे देवत्वाचे शाबीत करण्यात प्रमुख भूमिका निभावते?

१३ आज मात्र ती चमत्कारिक कार्ये होत नाहीत. त्यांचा उद्देश साध्य झाला आहे. (१ करिंथकर १३:८) तरीदेखील, पुष्कळ प्रत्यक्ष पाहणाऱ्‍यांनी साक्ष दिली असे अहवाल बायबलमध्ये लिहून ठेवण्यात आले आहेत व ते आज आपल्याजवळ अजूनही आहे. आज ख्रिस्ती जन या ऐतिहासिक अहवालांकडे लक्ष आकर्षित करतात तेव्हा ही कार्ये अद्यापही यहोवाच्या सामर्थ्याची एक प्रभावशाली साक्ष देत आहेत. (१ करिंथकर १५:३-६) त्यासोबतच, यशयाच्या दिवसांमध्ये यहोवाने, तोच खरा देव आहे याचा एक उल्लेखनीय पुरावा म्हणून एका अचूक भविष्यवाणीकडे अंगुली दर्शवली. (यशया ४६:८-११) अनेक ईश्‍वरप्रेरित बायबल भविष्यवाण्या आज पूर्ण होत आहेत—त्यांच्यातील पुष्कळ ख्रिस्ती मंडळीच्या संबंधीच्या आहेत. (यशया ६०:८-१०; दानीएल १२:६-१२; मलाखी ३:१७, १८; मत्तय २४:९; प्रकटीकरण ११:१-१३) आपण “शेवटल्या काळी” राहात आहोत हे ठळकपणे मांडण्यासोबत या भविष्यवाणींची पूर्णता, यहोवा हाच एकमात्र खरा देव म्हणून त्याचे समर्थन करतात.—२ तीमथ्य ३:१.

१४. यहोवाच्या साक्षीदारांचा आधुनिक दिवसांतील इतिहास, यहोवा सार्वभौम प्रभू असल्याची जोरदार साक्ष कशा प्रकारे आहे?

१४ शेवटी, यहोवा अद्यापही त्याच्या लोकांकरता पुष्कळ महान आणि आश्‍चर्यकारक गोष्टी करतो. बायबल सत्यांवरील वाढता प्रकाश यहोवाच्या आत्म्याद्वारे मार्गदर्शित केला जातो. (स्तोत्र ८६:१०; प्रकटीकरण ४:५, ६) संपूर्ण जगभरात होत असलेल्या उल्लेखनीय वाढीचे अहवाल, यहोवा ‘हे योग्य समयी त्वरित घडवून आणत’ असल्याचा पुरावा आहे. (यशया ६०:२२) या शेवटल्या दिवसांदरम्यान एका राष्ट्रामागून दुसऱ्‍या राष्ट्रामध्ये कटू विरोधाची सुरवात झाली आहे तेव्हा पवित्र आत्म्याच्या बळकटी देणाऱ्‍या पाठिंब्यामुळेच यहोवाचे लोक धैर्याने सहनशीलता दाखवू शकतात. (स्तोत्र १८:१, २, १७, १८; २ करिंथकर १:८-१०) होय, यहोवाच्या साक्षीदारांचा आधुनिक दिवसांतील इतिहास हाच यहोवा सार्वभौम प्रभू असल्याची एक जोरदार साक्ष आहे.—जखऱ्‍या ४:६.

प्रचार करावा अशी सुवार्ता

१५. ख्रिस्ती मंडळीला कोणती अधिक साक्ष द्यावयाची होती?

१५ राष्ट्रांपुढे यहोवाचे साक्षीदार म्हणून त्याने इस्राएलला नियुक्‍त केले. (यशया ४३:१०) परंतु, केवळ काही इस्राएल लोकांनाच गैर-इस्राएली लोकांस जाऊन साक्ष देण्याची ईश्‍वरी आज्ञा देण्यात आली. यहोवाचे न्यायदंड पुकारण्यासाठी असे बहुधा केले जात होते. (यिर्मया १:५; योना १:१, २) तरीदेखील, इब्री शास्त्रवचनातील भविष्यवाण्या सूचित करतात, की यहोवा एक ना एक दिवस मोठ्या प्रमाणावर त्याचे लक्ष राष्ट्रांकडे वळवील व हे त्याने देवाच्या आध्यात्मिक इस्राएलद्वारे केले आहे. (यशया २:२-४; ६२:२) स्वर्गारोहण होण्याआधी येशूने त्याच्या शिष्यांना आज्ञा दिली: “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकास शिष्य करा.” (मत्तय २८:१९) “इस्राएलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढराकडे” येशूचे लक्ष केंद्रित असताना त्याच्या शिष्यांना ‘सर्व राष्ट्रांकडे’ आणि “पृथ्वीच्या शेवटापर्यंत” पाठवण्यात आले. (मत्तय १५:२४; प्रेषितांची कृत्ये १:८) सर्व मानवजातीने ख्रिस्ती साक्ष ऐकावयाची होती.

१६. पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळीने कोणती कामगिरी पूर्ण केली व किती प्रमाणात?

१६ पौलाला हे योग्यपणे समजले असे त्याने दाखवले. सा. यु. ६१ वर्षांपर्यंत ही सुवार्ता “सर्व जगातहि फळ देत व वृद्धिंगत होत चालली आहे” असे तो म्हणू शकला. ‘देवदूतांच्या उपासनेत’ गोवलेले राष्ट्र किंवा पंथाप्रमाणे ही सुवार्ता केवळ एकाच राष्ट्रापुरती किंवा पंथापुरती मर्यादित नव्हती. उलटपक्षी, ‘आकाशाखालच्या सर्व सृष्टीत तिची घोषणा झाली.’ (कलस्सैकर १:६, २३; २:१३, १४, १६-१८) अशा प्रकारे, पहिल्या शतकातील देवाच्या इस्राएलने “ज्याने [त्यांना] अंधकारातून काढून आपल्या अद्‌भुत प्रकाशात पाचारण केले ‘त्याचे गुण . . . प्रसिद्ध करावे’”, ही कामगिरी पूर्ण केली.

१७. कशा प्रकारे मत्तय २४:१४ मोठ्या प्रमाणात पूर्ण होत आहे?

१७ तरीसुद्धा, पहिल्या शतकातील प्रचार कार्य, शेवटल्या दिवसांमध्ये जे साध्य केले जाणार होते त्याची केवळ एक झलक होती. खासकरून आपल्या काळाकडे पाहून येशू म्हणाला: “सर्व राष्ट्रास साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.” (मत्तय २४:१४; मार्क १३:१०) ही भविष्यवाणी पूर्ण झाली आहे का? होय. सन १९१९ मध्ये लहानशी सुरवात होऊन सुवार्तेचा प्रचार २३० पेक्षा अधिक राष्ट्रांपर्यंत विस्तृत झाला आहे. गारठलेल्या उत्तरामध्ये आणि उष्णकटिबंधीय प्रदेशात साक्ष ऐकण्यात आली आहे. विशाल खंडांमध्ये साक्ष देण्यात आली आहे व दूरवरचे द्वीप शोधले जात आहेत जेणेकरून तेथील रहिवाश्‍यांना साक्ष मिळू शकेल. क्षोभित परिस्थितींमध्ये देखील, जसे की बॉस्निया व हेरेजगोविना येथे युद्ध चालू असतानाही सुवार्तेचा प्रचार होत आहे. पहिल्या शतकाप्रमाणेच, सुवार्ता “सर्व जगातहि” फळ देत आहे. सुवार्ता उघडपणे “आकाशाखालच्या सर्व सृष्टीत” घोषित केली जात आहे. त्याचा परिणाम? पहिला, देवाच्या इस्राएलच्या शेष जणांना “निरनिराळ्या भाषा बोलणारे, लोक व राष्ट्रे ह्‍यांमधून” एकत्र करण्यात आले आहे. दुसरा, ‘मोठ्या लोकसमुदायाच्या’ लाखोंना ‘सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे’ ह्‍यांच्यामधून आणण्यात येऊ लागले. (प्रकटीकरण ५:९; ७:९) मत्तय २४:१४ ची पूर्णता मोठ्या प्रमाणात होत चालली आहे.

१८. सुवार्तेच्या जगव्याप्त प्रचाराद्वारे कोणत्या गोष्टी साध्य केल्या जात आहेत?

१८ येशूची राजसी उपस्थिती चालू झाली आहे हे शाबीत करण्यासाठी सुवार्तेचा जगव्याप्त प्रचार मदत करतो. (मत्तय २४:३) शिवाय, ‘पृथ्वीच्या पिकाची’ होत असलेल्या कापणीचे हे एक मुख्य साधन आहे कारण ते, यहोवाचे राज्य मानवजातीसाठी एकमात्र खरी आशा असल्याचे लोकांना दाखवते. (प्रकटीकरण १४:१५, १६) केवळ खरे ख्रिस्तीच, सुवार्तेच्या प्रचार कार्यात भाग घेत असल्यामुळे, हे महत्त्वपूर्ण कार्य खऱ्‍या ख्रिश्‍चनांना खोट्या ख्रिश्‍चनांपासून ओळखण्यास मदत करते. (मलाखी ३:१८) अशा प्रकारे, जे प्रचार करतात आणि जे त्या प्रचाराला प्रतिसाद देतात अशांचे तारण यामुळे होते. (१ तीमथ्य ४:१६) सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे, सुवार्तेचा प्रचार करण्याची आज्ञा ज्याने दिली, जो या आज्ञेचे पालन करणाऱ्‍यांना मदत देतो व जो त्यास सफलता पुरवतो त्या यहोवा देवाचा सुवार्तेच्या प्रचाराने स्तुती आणि आदर होतो.—२ करिंथकर ४:७.

१९. सर्व ख्रिश्‍चन नव्या सेवा वर्षात पदार्पण करतात तसे त्यांना कोणता दृढनिश्‍चय करण्यास उत्तेजन दिले जाते?

१९ “मी सुवार्ता सांगितली नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार!” असे म्हणावयास प्रेषित पौल प्रवृत्त झाला यात काही आश्‍चर्य नाही. (१ करिंथकर ९:१६) ख्रिश्‍चनांना आज असेच वाटते. या अंधकारमय जगात “देवाचे सहकारी” होऊन सत्याचा प्रकाश झळकावणे हा एक महान विशेषाधिकार आणि एक मोठी जबाबदारी आहे. (१ करिंथकर ३:९; यशया ६०:२, ३) सन १९१९ मध्ये जे काम अल्प प्रमाणात चालू झाले होते ते आज आश्‍चर्यचकित प्रमाणापर्यंत पोहंचले आहे. जवळजवळ ५० लाख ख्रिस्ती लोक ईश्‍वरी सार्वभौमत्वासाठी साक्ष देत आहेत. इतरांपर्यंत तारणाचा संदेश आणण्यासाठी ते प्रत्येक वर्षी एक अब्जापेक्षा अधिक तास खर्च करीत आहेत. यहोवाच्या नावाचे पवित्रीकरण करणाऱ्‍या या कार्यात आपलाही भाग असणे किती आनंदविणारे आहे! आपण १९९६ सेवा वर्षांत पदार्पण करत असताना आपली गती मंदावणार नाही असा दृढनिश्‍चय करू या. त्याउलट, पौलाने तीमथ्याला लिहिलेल्या या शब्दांकडे आपण पूर्वीपेक्षा अधिक लक्ष देऊ, की “वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार राहा.” (२ तीमथ्य ४:२) असे करत असताना, यहोवा आपल्या सर्व प्रयत्नांवर आशीर्वाद देत राहील अशी आम्ही पूर्ण अंतःकरणाने प्रार्थना करतो.

तुम्हाला आठवते का?

◻ राष्ट्रांना यहोवाचा “साक्षी” म्हणून इस्राएलची जागा कोणी घेतली?

◻ ख्रिस्ती वर्तन साक्ष देण्याला कशा प्रकारे हातभार लावते?

◻ बायबलचा अभ्यास आणि त्याचे मनन ख्रिस्ती साक्षीदारासाठी आवश्‍यक का आहे?

◻ यहोवाच्या साक्षीदारांचा आधुनिक दिवसांतील इतिहास यहोवा हाच खरा देव आहे याचा पुरावा कशा प्रकारे देतो?

◻ सुवार्तेचा प्रचार केल्याने काय साध्य केले जाते?

[१५ पानांवरील चित्रं]

सुवार्तेचा प्रचार मर्यादित नसून ‘आकाशाखालच्या सर्व सृष्टीत तिची घोषणा होत आहे’

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा