आत्मिक क्षेत्रातील अधिपती
जगावर कोण आधिपत्य गाजवतो? अमानवी प्रकारची कोणती देखरेख आहे का? किंवा देवाने मानवांना वाऱ्यावर सोडले आहे का? या प्रश्नांची उत्तरे शोधताना, येशू ख्रिस्ताच्या पार्थिव सेवेत घडलेल्या प्रसंगाचा आपण प्रथम विचार करू या.
येशूच्या बाप्तिस्म्यानंतर लगेचच, दियाबल सैतान नावाच्या एका अदृश्य आत्मिक प्राण्याकरवी त्याची परीक्षा घेण्यात आली. त्यातील एका परीक्षेचा उल्लेख करून बायबल म्हणते: “सैतानाने [येशूला] एका अतिशय उंच डोंगरावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्ये व त्यांचे वैभव दाखविले.” (मत्तय ४:८) त्यानंतर सैतानाने येशूला म्हटले: “ह्यांवरचा सर्व अधिकार व ह्यांचे वैभव मी तुला देईन, कारण हे मला सोपून दिले आहे व माझ्या मनास येईल त्याला मी हे देतो. म्हणून तू मला नमन करशील तर हे सर्व तुझे होईल.”—लूक ४:६, ७.
सैतानाने या जगाच्या सर्व राज्यांवर किंवा सरकारांवर अधिकार असल्याचा दावा केला. येशूने या दाव्यास नाकारले का? नाही, खरे म्हणजे, त्याने दुसऱ्या एका प्रसंगी सैतानाला “जगाचा अधिकारी” असे संबोधून या गोष्टीला पुष्टी दिली.—योहान १४:३०.
बायबलनुसार, सैतान हा खूप शक्तिमान असा दुष्ट देवदूत आहे. ख्रिस्ती प्रेषित पौल सैतानाचा संबंध ‘दुरात्म्यांशी’ लावतो आणि ते या ‘काळोखातील जगाचे अधिपती’ आहेत असे त्यांच्याविषयी सांगतो. (इफिसकर ६:११, १२) त्याशिवाय, प्रेषित योहान म्हणाला, “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” (१ योहान ५:१९) बायबलमधील प्रकटीकरणाचे पुस्तक सांगते, की सैतान ‘सर्व जगाला ठकवीत आहे.’ (प्रकटीकरण १२:९) लाक्षणिक शब्दात, प्रकटीकरण सैतानाला अजगराच्या रूपातही दाखवते. तो जगाच्या राजनैतिक व्यवस्थेला “आपली शक्ति, आपले आसन व मोठा अधिकार” देतो.—प्रकटीकरण १३:२.
एक दुष्ट शक्ती सक्रिय आहे तसेच ती मानवांना एकमेकांची इजा करण्यास लावते असे देखील जगिक घडामोडी सिद्ध करतात. मानवी सरकारे, दुसऱ्या कोणत्या कारणासाठी शांतीला चालना देण्यास अपयशी ठरतात? आणखी कशामुळे लोक एकमेकांचा द्वेष व वध करतात? एका मुलकी युद्धामधील कत्तल आणि मृत्यू पाहून गांगरून गेलेल्या प्रत्यक्ष साक्षीदाराने म्हटले: “हे कसे घडले असेल हे मला कळत नाही. हा केवळ द्वेषच नाही तर त्यापेक्षाही अधिक आहे. कोणी दुष्ट आत्मा या मानवांना एकमेकांचा नाश करण्यास उपयोगात आणीत आहे.”
देवाच्या विरोधात असणारी खरी व्यक्ती
आज, अनेकजण दियाबल सैतान आहे असा विश्वास बाळगत नाहीत. तथापि, काहीजण विश्वास करतात त्याप्रमाणे, तो केवळ मानवामधील एक वाईट प्रवृत्ती नाही. बायबल तसेच जगिक घटना दाखवतात की, ती एक खरी व्यक्ती आहे. त्याशिवाय, सैतान, यहोवा देवाच्या अगदीच उलट आहे. अर्थात, सैतान हा देवाच्या बरोबरीचा नाही. यहोवा सर्वशक्तिमान निर्माणकर्ता असल्यामुळे, तो या निर्मितीचा यथायोग्य अधिपती आहे.—प्रकटीकरण ४:११.
देवाने स्वतःच्या विरोधात कोणा दुष्ट प्राण्याची निर्मिती केली नाही. त्याउलट, यथायोग्यपणे यहोवाच्या मालकीची असणारी उपासना स्वतःकरता घ्यावी म्हणून एका ‘देवकुमाराने’ स्वार्थी इच्छेला उत्पन्न केले. (ईयोब ३८:७; याकोब १:१४, १५) या इच्छेने त्याला देवाविरुद्ध बंड करण्याच्या मार्गाची सुरवात करण्याकडे नेले. बंड करून, या आत्मिक प्राण्याने स्वतःला सैतान (म्हणजे “विरोधक”) आणि दियाबल (म्हणजे “निंदक”) बनवले. हे सर्व लक्षात घेता, सैतानाला जगावर आधिपत्य गाजवण्यास अनुमती का देण्यात आली असा विचार तुम्ही कराल.
सैतानाला आधिपत्य गाजवण्यास अनुमती का देण्यात आली
पृथ्वीवरील आधिपत्याविषयी सैतानाने येशूला काय म्हटले हे तुम्हाला आठवते का? “ह्यांवरचा सर्व अधिकार . . . मी तुला देईन, कारण हे मला सोपून दिले आहे,” असे सैतान म्हणाला. (लूक ४:६) दियाबल सैतान, मात्र देवाच्या अनुमतीने अधिकार गाजवतो हे या विधानावरून दाखवले जाते. परंतु देव सैतानाचे सर्वकाही का सहन करून घेत आहे?
त्या प्रश्नाच्या उत्तराचा संबंध, एदेन बागेतील घटनांशी आहे. तेथे सैतानाने जगाचा अधिपती या नात्याने आपले मार्गाक्रमण सुरू केले. पहिला पुरुष व स्त्री, आदाम आणि हव्वा यांच्यापासून देव कोणती तरी चांगली गोष्ट लपवून वाईट पद्धतीने आधिपत्य करत होता असे सैतानाने तेथे सुचवले. सैतानाच्या मते, देवाने मना केलेले फळ त्यांनी खाल्ले, तर ते मुक्त होतील. आदाम व हव्वा यहोवापासून मुक्त व स्वतंत्र होतील. ते स्वतः देवासारखे होतील.—उत्पत्ति २:१६, १७; ३:१-५.
अशा प्रकारे लबाडी करून, हव्वेला फसवून व तिच्याकरवी आदामाला देवाचा नियम मोडण्यास प्रवृत्त करून, सैतानाने पहिल्या मानवी जोडप्याला आपल्या नेतृत्वाखाली व नियंत्रणामध्ये घेतले. अशा प्रकारे सैतान त्यांचा दैवत बनला, यहोवाच्या विरोधातील दैवत. तथापि, मुक्ततेऐवजी आदाम व हव्वेने सैतान, पाप व मृत्यूच्या दास्यत्वाचा अनुभव घेतला.—रोमकर ६:१६; इब्रीयांस २:१४, १५.
आपल्या परिपूर्ण न्यायानुसार, यहोवा तत्काळ सैतानाला आणि त्याच्या दोन नवीन अनुयायांना शिक्षा ठोठावू शकला असता. (अनुवाद ३२:४) परंतु, त्यामध्ये एक नैतिक वादविषय गोवला होता. सैतानाने यहोवाच्या आधिपत्य गाजवण्याच्या हक्काला आव्हान दिले होते. देवापासून स्वतंत्र होणे नाशकारक ठरू शकते हे सिद्ध करण्यासाठी देवाने आपल्या बुद्धिमत्तेनुसार वेळ उलटू दिला. यहोवाने त्या बंडखोरांना काही काळापर्यंत जगण्यास अनुमती दिली व आदाम आणि हव्वेला संतती होऊ दिली.—उत्पत्ति ३:१४-१९.
आदामाचे बहुतेक वंशज यहोवाच्या आधिपत्याला अधीन झाले नसले, तरी देवाने त्याच्या उपासकांसोबत केलेल्या व्यवहाराकरवी त्या आधिपत्याची श्रेष्ठता प्रदर्शित केली. यहोवाच्या अधिकाराला योग्यरीतीने ओळखल्याने आनंद व खरी सुरक्षितता मिळते. दुसऱ्या बाजूला पाहता, सैतानाच्या प्रभावाखालील मानवी आधिपत्यामुळे दुःख आणि असुरक्षितता परिणित झाली आहे. होय, ‘एका मनुष्याने दुसऱ्यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान केले आहे.’ (उपदेशक ८:९) सैतानाच्या अधिकाराधीन असलेल्या या जगात मानवी आधिपत्याखाली मानवांना खरी सुरक्षितता व कायमस्वरूपी आनंद प्राप्त झालेला नाही. तथापि, आशावादी असण्यासाठी खरे कारण आहे.
सैतानाचा काळ थोडा आहे!
पृथ्वीवरील सैतानाचा प्रभाव तात्पुरता आहे. यहोवा सैतानी आधिपत्याला आणखी सहन करणार नाही! लवकरच, सैतानाची हालचाल निकामी करण्यात येईल. एक नवीन अधिकारी, स्वतः देवाने निवडलेला नीतिमान राजा पृथ्वीचा ताबा घेईल. तो राजा येशू ख्रिस्त आहे. स्वर्गात त्याला राजासनाधिष्ठ करण्याविषयी, प्रकटीकरण म्हणते: “जगाचे राज्य आमच्या प्रभू [यहोवाचे] व त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे.” (प्रकटीकरण ११:१५) ही घटना १९१४ या वर्षी घडली असे बायबलचे कालगणनाशास्त्र त्याचप्रमाणे शास्त्रवचनीय भविष्यवाणीच्या पूर्णतेवरून सिद्ध होते.—मत्तय २४:३, ६, ७.
येशूला राजासनाधिष्ठ केल्यावर लगेचच काय घडले याचे वर्णन देखील बायबल करते. ते म्हणते: “स्वर्गात युद्ध सुरू झाले: मीखाएल [येशू ख्रिस्त] व त्याचे दूत अजगराबरोबर [दियाबल सैतान] युद्ध करण्यास निघाले, आणि त्यांच्याबरोबर अजगर व त्याचे दूत लढले, तरी त्यांचे काही चालले नाही, आणि स्वर्गात त्याचे ठिकाणहि उरले नाही. मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला म्हणजे सर्व जगाला ठकविणारा, जो दियाबल व सैतान म्हटलेला आहे तो जुनाट साप खाली पृथ्वीवर टाकण्यात आला, व त्याबरोबर त्याच्या दूतांस टाकण्यात आले.”—प्रकटीकरण १२:७-९.
स्वर्गातून सैतानाची हाकलपट्टी केल्यामुळे काय परिणाम होईल? स्वर्गात राहणारे आनंद करतील, परंतु पृथ्वीवरील रहिवाश्यांबद्दल काय? प्रकटीकरण १२:१२ म्हणते, “पृथ्वी व समुद्र ह्यांवर अनर्थ ओढवला आहे, कारण सैतान आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुम्हाकडे आला आहे.” अर्थात, सैतानाला स्वर्गातून पृथ्वीवर खाली टाकल्यावर अनर्थ ओढवला आहे. जगातील कोलंबियाचा इतिहास (इंग्रजी) असे म्हणते: “स्वतःच्याच मूर्खपणामुळे किंवा दुष्ट वृत्तीमुळे पाश्चिमात्य जग संस्कृतीला वाचवू शकले नाही, हे . . . १९१४-१९१८ मधील चार वर्षांच्या युद्धाच्या महासंकटाने दाखवून दिले. त्या तडाख्यानंतर पाश्चिमात्य जगाचे धैर्य खरोखर कधीच पुन्हा मिळवता आले नाही.”
या पिढीच्या अनर्थांची विशेष लक्षणे खचलेल्या धैर्यापेक्षाही अधिक आहेत. येशूने भविष्यवाणी केली होती: “राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल आणि जागोजागी दुष्काळ व भूमिकंप होतील.” त्याने मऱ्यांबद्दल देखील भविष्यवाणी केली. (मत्तय २४:७, ८; लूक २१:११) त्याशिवाय, बायबल म्हणते की, सैतानाच्या व्यवस्थीकरणाच्या “शेवटल्या काळी” पुष्कळ जण “स्वार्थी, धनलोभी . . . आईबापांस न मानणारी, . . . शांतताद्वेषी,” होतील असे बायबल म्हणते. ‘देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारे’ लोक देखील असतील.—२ तीमथ्य ३:१-५.
युद्धे, मऱ्या, दुष्काळ, भूकंप आणि नैतिक मूल्यांची अधोगती—या सर्व गोष्टी बायबलने भाकीत केल्याप्रमाणे १९१४ पासून अभूतपूर्व प्रमाणावर घडल्या आहेत. देव व मानवाचा क्रोधित झालेला शत्रू—दियाबल सैतान—स्वर्गातून काढून टाकण्यात आला आहे व त्याचा क्रोध तो केवळ पृथ्वीवरच व्यक्त करील असे त्या गोष्टी दाखवून देतात. परंतु, सैतानाला कार्य करण्यास अधिक काळ दिला जाणार नाही असे देखील बायबल दाखवते. हर्मगिदोनापर्यंत त्याचा फारच ‘थोडा काळ’ उरलेला आहे. देव त्यावेळी सैतानाच्या नियंत्रणाखालील जागतिक व्यवस्थेचा नाश करील.
सैतानाचे काय होईल? प्रेषित योहानाने लिहिले: “मी एका देवदूताला स्वर्गातून उतरताना पाहिले. त्याच्याजवळ अथांग डोहाची किल्ली होती व त्याच्या हाती एक मोठा साखळदंड होता. त्याने दियाबल व सैतान म्हटलेला जुनाट साप म्हणजे तो अजगर ह्यांस धरले, आणि त्याने एक हजार वर्षेंपर्यंत बांधलेल्या अवस्थेत पडून राहावे म्हणून त्याला त्या अथांग डोहात टाकून दिले. आणि . . . वरून बंद करून त्यावर शिक्का मारला.” (प्रकटीकरण २०:१-३) दुःखित मानवाकरता किती समाधान!
राज्य आधिपत्याखाली आनंद लुटणे
सैतानाला मार्गातून काढून टाकून, येशू ख्रिस्ताच्या अधिकाराखाली देवाचे राज्य मानवांच्या सर्व व्यवहारांचा ताबा घेईल. पृथ्वीवर अनेक सरकारे असण्याऐवजी, संपूर्ण पृथ्वी ग्रहावर केवळ एकच स्वर्गीय सरकार आधिपत्य गाजवण्याकरता टिकून राहील. युद्ध गतकाळातील गोष्ट होईल आणि सर्वत्र शांती असेल. देवाच्या राज्याच्या आधिपत्याखाली, सर्वजण प्रेमळ बंधुत्वामध्ये वास करतील.—स्तोत्र ७२:७, ८; १३३:१; दानीएल २:४४.
येशू कोणत्या प्रकारचा अधिपती असेल? पृथ्वीवर असताना, त्याने लोकांसाठी सखोल प्रीती प्रदर्शित केली. येशूने कनवाळुपणाने भुकेलेल्यांना अन्न दिले. त्याने आजाऱ्यांना बरे केले, अंधांना दृष्टी दिली, मुक्यांना वाचा दिली आणि लंगड्यांना बरे केले. येशूने मृतांना देखील पुन्हा जिवंत केले! (मत्तय १५:३०-३८; मार्क १:३४; लूक ७:११-१७) हे चमत्कार, तो राजा या नात्याने ज्या अद्भुत गोष्टी अद्याप करणार आहे त्याची पूर्वझलक होती. असा दयाळु अधिपती असणे किती चांगले असेल!
यहोवाच्या सार्वभौमत्वाला अधीन होणारे लोक अगणित आशीर्वादांचा अनुभव घेतील. शास्त्रवचने अभिवचन देतात: “तेव्हा अंधांचे नेत्र उघडतील, बहिऱ्यांचे कान खुले होतील. तेव्हा लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील, मुक्याची जीभ गजर करील.” (यशया ३५:५, ६) त्या महान दिवसाकडे अंगुली दर्शवून, प्रेषित योहानाने लिहिले: “मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली, ती अशी: ‘पाहा, देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे, त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करील; ते त्याचे लोक होतील, आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्यापुढे मरण नाही, शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.’”—प्रकटीकरण २१:३, ४.
आपला पुत्र, येशू ख्रिस्त याच्याद्वारे यहोवाच्या आधिपत्याने बहाल केलेले सुख, सैतानाचे वर्चस्व असलेल्या सद्य व्यवस्थीकरणात आपण अनुभवलेल्या कोणत्याही दुःखाची अधिक प्रमाणात भरपाई करील. देवाने अभिवचन दिलेल्या नवीन जगात, ‘खरोखर कोण राज्य करीत आहे?’ असा विचार लोक कधीही करणार नाहीत. (२ पेत्र ३:१३) यहोवा व ख्रिस्त, या आत्मिक क्षेत्रातील प्रेमळ आधिपतींच्या पार्थिव सत्तेमध्ये आज्ञाधारक मानवजात आनंदी व सुरक्षित असेल. त्यांच्या प्रजेपैकी एक असण्याच्या आशेचा स्वीकार का करू नये?
[७ पानांवरील चित्रं]
देव राज्याच्या पार्थिव सत्तेमध्ये मानवजात सुरक्षित असेल