आर्थिकतेच्या कठीण काळात सडेपणा
“मी २५ वर्षांचा होतो तेव्हा मला विवाह करायचा होता,” असे पश्चिम आफ्रिकेमध्ये राहणाऱ्या चूक्सने म्हटले. “माझ्या पाहण्यात एक मुलगी होती व तिला माझ्यासोबत विवाह करण्याची इच्छा होती. परंतु समस्या पैशांची होती. माझे वडील व मोठा भाऊ यांना नोकरी नव्हती व माझी धाकटी बहीणभावंडे शाळेत शिकत होती. कुटुंबाला मी आधार द्यावा म्हणून सर्वजण माझ्यावर अवलंबून होते. मग, याहूनही बिकट परिस्थिती आली कारण माझे पालक आजारी पडले आणि याचा अर्थ मला वैद्यकीय खर्च भागवण्यासाठी आणखी पैसा आणावा लागणार होता.”
चूक्स या यहोवाच्या साक्षीदाराला, पत्नीला संभाळता न येणाऱ्या स्थितीत विवाह बंधनात स्वतःला जखडून घ्यावयाचे नव्हते. त्याला १ तीमथ्य ५:८ मध्ये आढळणाऱ्या पौलाच्या शब्दांची जाणीव होती: ‘जर कोणी स्वकीयांची व विशेषकरून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही, तर त्याने विश्वास नाकारला आहे; तो माणूस विश्वास न ठेवणाऱ्या माणसापेक्षा वाईट आहे.’
चूक्स पुढे सांगतो, “मी फार कष्ट केले, परंतु पैसा नेहमीच अपुरा पडत असे. परिणामतः, आमच्या विवाहाच्या योजना वारंवार पुढे ढकलाव्या लागत होत्या. शेवटी मला त्या मुलीकडून पत्र मिळाले व त्यात तिने म्हटले, कोणा दुसऱ्या व्यक्तीने तिच्या वडिलांकडे तिच्यासाठी मागणी घातली होती. तिचे वडील तयार झाले. काही दिवसांनंतर तिचे पत्र आले, त्यांच्या कुटुंबाने मागणीचा समारंभ केला होता.”
चूक्सप्रमाणे, पुष्कळ ख्रिस्ती पुरुषांनी बिकट आर्थिक परिस्थितींमुळे आपल्या विवाहाच्या योजना विस्कळीत झालेल्याचा किंवा त्यांना पुढे ढकलले जाण्याचा अनुभव घेतला असेल. पुष्कळ देशांमध्ये, अवास्तव चलनवाढ आहे. उदाहरणार्थ, एका मध्य आफ्रिकी देशात, एका वर्षामध्ये ८,३१९ टक्क्यांनी किंमती वाढल्या! काही देशांमध्ये नोकऱ्या मिळवणे कठीण आहे. बहुधा, पगार इतके कमी असतात की, एखाद्या पुरुषाला स्वतःचाच खर्च भागवणे कठीण असते तर बायका पोरांची गोष्ट सोडूनच द्या. नायजेरियामधील एक तरुण दुःखाने सांगतो की, त्याला एका कंपनीत दिलेली पूर्ण वेळेची नोकरी महिन्याला केवळ १७ डॉलर पगार देत होती—कामाच्या ठिकाणी ये-जा करण्यात बससाठी लागणाऱ्या महिन्याच्या खर्चापेक्षाही हा पगार कमी होता!
पुष्कळ अविवाहित ख्रिस्ती स्त्रियांना देखील आढळते की, आर्थिक समस्यांमुळे त्यांच्या विवाहाच्या योजना विफल होत आहेत. बहुधा त्यांना कुटुंबाच्या सदस्यांना आधार देण्यासाठी नोकरी करावी लागते. ही परिस्थिती पाहिल्यावर, काही अविवाहित पुरुष त्यांच्याबरोबर विवाह करण्यास मागेपुढे करतात, त्यांना याची जाणीव होते की अशा परिस्थितींमध्ये विवाह करणाऱ्या पुरुषाला केवळ बायकोलाच नव्हे तर तिच्या कुटुंबाला देखील सांभाळण्यासाठी पुष्कळ कमवावे लागेल. आयो, ही महाविद्यालयीन पदवीधर मुलगी स्वतःला, तिच्या आईला व तिच्या धाकट्या बहीणभावंडांना आधार देण्यासाठी फार झटते. ती दुःखातिशयाने म्हणते, “मला विवाह करायचा आहे, पण इतर येऊन माझ्या मागे लटांबर [आर्थिक जबाबदाऱ्या] असलेले पाहून पळ काढतात.”
आर्थिक अडचणी असतानाही, पुष्कळ अविवाहित ख्रिश्चनांना नातेवाईकांकडून आणि इतरांकडून विवाह करण्यास व मुले होऊ देण्यास दबाव आणला जातो. काहीवेळा हा दबाव उपहासाचे रूप धारण करतो. उदाहरणार्थ, आफ्रिकेच्या काही भागांमध्ये, अभिवादन करताना, त्याच्या किंवा तिच्या विवाह सोबत्याची व मुलांची विचारपूस करण्याची रीत आहे. काही वेळा ही अभिवादने अविवाहित व्यक्तींची टिंगल करण्यास वापरली जातात. चाळिशीच्या उत्तरार्धात असणारे जॉन म्हणतात, “‘तुझी बायको कशी आहे?’ असे खिजवून लोक बोलतात तेव्हा मी उत्तर देतो, ‘ती येत आहे.’ सत्य हे आहे की, मी बायकोला सांभाळू शकत नाही तर मी तिला आणणार कसा?”
जॉन व त्यांच्यासारख्या अगणित लोकांसाठी, एका योरुबा म्हणीद्वारे या परिस्थितीचे वर्णन सारांशात असे केले जाते: “घाईघाईने विवाह करणे फुशारकी मारण्याची गोष्ट नव्हे; कुटुंबाचे पालनपोषण करणे ही समस्या आहे.”
तुमच्या परिस्थितीचा उत्तम लाभ घ्या
आपण ज्या गोष्टीची मनसा बाळगतो ती न मिळाल्यास आपण लवकर दु:खित होतो. नीतीसूत्रे १३:१२ म्हणते: “आशा लांबणीवर पडली असता अंतःकरण कष्टी होते.” तुम्हाला विवाह करण्याची मनसा असते पण आर्थिकरित्या तुम्ही तो करू शकत नसाल, तर तुम्हाला कदाचित असेच वाटत असेल. विशेषतः, पौलाने ज्यांचे वर्णन ‘वासनेने जळणारे’ असे केले आहे त्यांच्याबाबतीत हे खरे आहे.—१ करिंथकर ७:९.
मात करणे सोपे नसेल, पण सहन करण्यासाठी व तुमच्या परिस्थितीत आनंद देखील मिळवण्यासाठी तुम्ही काही गोष्टी करू शकता. येशू ख्रिस्त या अविवाहित मनुष्याने एक व्यावहारिक बायबल तत्त्व दिले जे, तुम्हाला अपेक्षित गोष्ट पुढे ढकलल्याने होणाऱ्या निराशेवर मात करण्यास मदत करू शकते. तो म्हणाला: “घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता आहे.”—प्रेषितांची कृत्ये २०:३५.
तुमच्या कुटुंबासाठी व मंडळीतील इतरांसाठी चांगल्या गोष्टी करून तुम्ही हे लागू करू शकता. कदाचित तुम्ही ख्रिस्ती सेवाकार्यातील आपली सेवा देखील वाढवू शकता. तुम्ही निःस्वार्थीपणाने देण्यात स्वतःला गुंतवले तर, ‘तुम्ही अंतःकरणाने स्थिर आहात, तुम्हाला आपल्या इच्छेवर ताबा आहे,’ असे आढळेल.—१ करिंथकर ७:३७.
आणखी एक अविवाहित पुरुष, प्रेषित पौल याने हा मदतदायी सल्ला लिहिला: “म्हणून अज्ञानासारखे नव्हे तर ज्ञानासारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला. वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत.” (इफिसकर ५:१५, १६) प्रार्थनेने, देव वचनाचा अभ्यास केल्याने व ख्रिस्ती सभांमध्ये सहभाग घेतल्याने यहोवाजवळ येण्यासाठी आपल्या वेळेचा उपयोग केल्यामुळे पुष्कळ अविवाहित ख्रिश्चनांना ‘आपल्या जिवास विसावा मिळाला आहे.’ (मत्तय ११:२८-३०) तुम्ही तसे केल्यास, एखाद्या कठीण आर्थिक परिस्थितीला अधिक यशस्वीपणे तोंड देऊ शकाल. ही गोष्ट तुम्हाला अधिक आध्यात्मिकता प्रदर्शित करण्यास देखील मदत करील, व कालांतराने तुम्ही विवाह केल्यास, तुम्हाला उत्तम पती किंवा पत्नी बनवील.
यहोवा त्याची सेवा करणाऱ्या सर्वांची काळजी घेतो हे विसरू नका. तुम्ही सहन करत असलेल्या समस्या व अडचणी यांची त्याला जाणीव आहे. दीर्घ पल्ल्यात, तुमच्यासाठी आध्यात्मिकरित्या व भावनिकरित्या काय उत्तम आहे हे देखील आपल्या प्रेमळ स्वर्गीय पित्याला माहीत आहे. तुम्ही धीर धरून त्याच्या वचनाची तत्त्वे तुमच्या दररोजच्या जीवनात लागू केलीत तर तो त्याच्या योग्य वेळी दिलासा देईल व तुमच्या सर्वकाळाच्या भल्यासाठी असेल अशा प्रकारे तुमच्या गरजा व इच्छा तृप्त करील. बायबल खात्री देते: “जे सात्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्यावाचून तो राहणार नाही.”—स्तोत्र ८४:११.
गोष्टींची सकारात्मक बाजू पाहा
सडे राहण्यामध्ये निश्चित लाभ आहेत हे देखील लक्षात ठेवा. प्रेषित पौलाने लिहिले: “जो आपल्या कुमारिकेचे लग्न करून देतो तो बरे करितो; पण जो लग्न करून देत नाही तो अधिक बरे करितो.”—१ करिंथकर ७:३८.
सडेपणा विवाहापेक्षा ‘अधिक बरा’ का आहे? पौलाने स्पष्ट केले: “अविवाहित पुरुष, प्रभूला कसे संतोषवावे अशी प्रभूच्या गोष्टींविषयीची चिंता करितो; परंतु विवाहित पुरुष आपल्या पत्नीला कसे संतोषवावे, अशी जगाच्या गोष्टींविषयीची चिंता करितो येणेकरून त्याचे मन द्विधा झालेले असते. जी अविवाहित किंवा कुमारी आहे ती आपण शरीराने व आत्म्यानेहि पवित्र व्हावे, अशी प्रभूच्या गोष्टींविषयीची चिंता करिते, परंतु जी विवाहित आहे ती आपण आपल्या पतीला कसे संतोषवावे अशी जगाच्या गोष्टींविषयीची चिंता करिते.”—१ करिंथकर ७:३२-३४.
दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, विवाहित ख्रिस्ती योग्य आहे त्याप्रमाणे त्यांच्या सोबत्यांच्या आवडीनिवडींबद्दल चिंतित असतात. परंतु सडे ख्रिस्ती यहोवाच्या सेवेत अधिक एकाग्रतेने लक्ष देऊ शकतात. विवाहितांशी तुलना केल्यास, सडे ख्रिस्ती “प्रभूची सेवा एकाग्रतेने” करण्याच्या चांगल्या स्थितीत असतात.—१ करिंथकर ७:३५.
सडे ख्रिस्ती व्यक्तीला विचलित करणाऱ्या कोणत्याही गोष्टी नाहीत असे पौल म्हणत नाही. तुमच्यावर आर्थिक समस्यांचे ओझे असल्यास, तुमच्या सेवेपासून विचलित करणाऱ्या पुष्कळ गोष्टी आहेत असे तुम्हाला कदाचित वाटेल. तरीसुद्धा, विवाहितांपेक्षा अविवाहित पुरुष किंवा स्त्रियांना देवाची सेवा करण्यामध्ये व्यक्तिगत स्वातंत्र्य बहुधा अधिक असते.
सडेपणाचा मार्ग अधिक बरा आहे असे सुचवताना, विवाह करणे चुकीचे आहे असे प्रेषित पौल म्हणाला नाही. त्याने लिहिले: “तथापि, तू लग्न केलेस म्हणून पाप केलेस असे होत नाही.” तरीसुद्धा, त्याने सावध केले: “तरी पण [लग्न करणाऱ्यांना] संसारात हालअपेष्टा भोगाव्या लागतील.”—१ करिंथकर ७:२८.
असे म्हणण्याचा त्याचा काय अर्थ होता? विवाहामुळे काही चिंता येतात. आर्थिकतेच्या कठीण समयी, अशा संकटांमध्ये, एखाद्या पित्याला आपल्या बायको व मुलांचे पालनपोषण करण्याची चिंता असण्याचा समावेश असेल. आजार देखील कुटुंबावर आणखी आर्थिक व भावनात्मक बोजा आणू शकतो.
तर मग तुमची परिस्थिती तुम्हाला हवी तशी नसली तरी, विवाहित असून मुलाबाळांचे पालनपोषण करण्याची जबाबदारी तुम्हावर असण्याऐवजी तुम्ही आता चांगल्या स्थितीत असाल. तुम्ही तोंड देत असलेल्या अडचणी तात्पुरत्या आहेत; देवाच्या नवीन व्यवस्थेमध्ये त्या काढून टाकल्या जातील—कदाचित त्यातील काही यापेक्षाही लवकर नाहीशा होतील.—पडताळा स्तोत्र १४५:१६.
तुम्ही तुमची सेवा वाढवू शकता का?
सर्वजण तसे करू शकत नसले, तरी काहींना आर्थिक समस्या असतानाही पूर्ण वेळेच्या सेवेत उतरणे शक्य झाले आहे. सुरवातीला उल्लेखिलेला चूक्स आपल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी लेखन साहित्य घेऊन त्याची विक्री करू लागला. त्याच्या विवाहाच्या योजना विफल ठरल्या त्याचवेळी त्याला वॉचटावर सोसायटीच्या स्थानिक शाखा दप्तरामध्ये बांधकामाकरता तात्पुरते कामावर येण्यासाठी पत्र मिळाले. पैशाची काळजी असल्याने, त्याच्या मोठ्या भावाने त्याला न जाण्यासाठी सांगितले. तथापि, यहोवाने त्याला त्याचा लेखन साहित्याचा व्यापार प्रस्थापित करण्यात मदत केली होती, यास्तव चूक्सने राज्य आस्था प्रथम ठेवून देवाच्या सांभाळ करण्याच्या क्षमतेवर भरवसा केला पाहिजे असा तर्क केला. (मत्तय ६:२५-३४) त्याशिवाय, ते केवळ तीन महिन्यांसाठी होते असा विचार त्याने केला.
चूक्सने आमंत्रण स्वीकारले व त्याचा व्यापार आपल्या भावाला चालवावयास दिला. आता सहा वर्षांनंतर देखील चूक्स पूर्ण वेळेच्या सेवेमध्येच आहे, ख्रिस्ती मंडळीत वडील आहे व तो आता आर्थिकरित्या विवाह करण्याच्या स्थितीत आहे. त्याच्या जीवनात जे घडले त्याबद्दल त्याला वाईट वाटते का? चूक्स म्हणतो: “मला विवाह करावयाचा होता त्यावेळी मी करू शकलो नाही याचे मला वाईट वाटते, परंतु जे काही घडले ते माझ्या भल्यासाठीच घडले. मी सेवेच्या पुष्कळ आनंदांचा व विशेषाधिकारांचा अनुभव घेतला आहे. माझा विवाह झाला असता व कुटुंब असते, तर मला या गोष्टी अनुभवण्यास मिळाल्या नसत्या.”
भवितव्यासाठी सुरक्षितता
कठीण समयी, पुष्कळ जण भवितव्यातील आर्थिक अडचणींपासून संरक्षण मिळावे म्हणून विवाहाच्या सुरक्षेचा आडोसा घेतात. कर्जाचा बोजा असलेले देश वृद्ध लोकांसाठी थोडीशी किंवा काहीच मदत देत नाहीत. यास्तव, पालक बहुधा त्यांच्या कुटुंबांवर, विशेषकरून त्यांच्या मुलांवर वृद्धापकाळातील आधारासाठी विसंबून असतात. परिणामस्वरूप, आर्थिक परिस्थिती अनिश्चित असली, तरीही सडे पुरुष व स्त्रियांवर लग्न करण्यास व मुले होण्यास दबाव आणला जातो.
परंतु विवाह व मुलांचे संगोपन सुरक्षिततेची हमी देत नाहीत. काही जगीक मुले आपल्या वृद्ध पालकांची काळजी घेऊ इच्छित नाहीत, इतरांना ते करणे शक्य नाही, तर आणखी इतर, स्वतः त्यांच्या पालकांआधी मरण पावतात. “मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही” हे देवाचे अभिवचन लक्षात ठेवून, ख्रिस्ती इतर ठिकाणी प्रामुख्याने सुरक्षिततेसाठी लक्ष देतात.—इब्रीयांस १३:५.
यहोवाची पूर्ण वेळ सेवा करण्यासाठी ज्यांनी आपला विवाह लांबवला आहे त्यांना सोडून देण्यात येणार नाही. ख्रिसीयाना अविवाहित आहे व ती ३२ वर्षांची आहे. गेल्या नऊ वर्षांपासून तिने नायजेरियामध्ये नियमित पायनियर या नात्याने सेवा केली आहे. ती म्हणते: “मी यहोवावर भरवसा ठेवते, तो त्याच्या सेवकांना कधीच सोडणार नाही, अशी आपल्याला खात्री देतो. त्याचे अभिवचन हाच माझा आत्मविश्वास आहे. यहोवा आध्यात्मिकरित्या तसेच भौतिकरित्या माझी काळजी घेतो. तो उदार पिता ठरला आहे. उदाहरणार्थ, साक्षीदारांची अधिक गरज होती अशा क्षेत्रात मी पायनियरींग करण्यासाठी स्थानांतर केले. तेथे कमी सुखसोयी असल्या तरी मी जुळवून घेण्यास शिकले आहे. मला टायफस झाल्यावर इस्पितळात दाखल करण्यात आले तेव्हा, माझ्या पूर्वीच्या मंडळीतील बांधव माझी काळजी घेण्यासाठी धावून आले.
“मी पूर्ण वेळेच्या सेवेत खूप समाधानी आहे. विश्वाच्या निर्माणकर्त्यासोबत तसेच जगातील इतर अनेक बांधव व बहिणींसोबत कार्य करणे याला मी एक महान विशेषाधिकार समजते. पुष्कळ तरुण त्यांच्याभोवती घडणाऱ्या गोष्टींमुळे निराश व आशाहीन झालेले मला दिसून येतात. परंतु, माझ्यासाठी माझे जीवन अर्थपूर्ण आहे; मी भवितव्याकडे आत्मविश्वासाने पाहते. मला ठाऊक आहे की, यहोवाच्या निकट असणे हा आपण तोंड देत असलेल्या समस्यांवरील सर्वात उत्तम उपाय आहे.”
तुम्हाला विवाह करण्याची इच्छा आहे परंतु आर्थिक अडचणींमुळे तुम्ही करू शकत नसल्यास, निरुत्साहित होऊ नका! तुम्ही एकटेच नाही. यहोवाच्या मदतीने पुष्कळ जण अशाच परीक्षांना तोंड देत आहेत. इतरांकरता चांगल्या गोष्टी करून व तुमची आध्यात्मिकता सुधारून तुमच्या परिस्थितीचा चांगला उपयोग करा. देवाच्या निकट जा; तो तुम्हाला मदत करील कारण तो खरोखर तुमची काळजी करतो.—१ पेत्र ५:७.