वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 ६/१५ पृ. २४-२७
  • हिमालयापेक्षा उंच पर्वत चढणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • हिमालयापेक्षा उंच पर्वत चढणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • उपशिर्षक
  • नेपाळ—पर्वतांचे राज्य
  • लहान सुरवात
  • समस्या असतानाही विस्तार
  • आजचा नेपाळ
  • हिमालयापेक्षा उंच चढा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 ६/१५ पृ. २४-२७

हिमालयापेक्षा उंच पर्वत चढणे

हिमालय! तो शब्द तुमच्या मनासमोर कोणते चित्र उभे करतो? विस्मयकारक, बर्फाच्छादित शिखरे व वादळी वारा? पृथ्वीवरील सर्वात उंच पर्वतावर उभे राहण्याच्या पराक्रमाची शिरशिरी? आपल्यापैकी बहुतेकांना, नेपाळमधील हिमालय पर्वतांमध्ये एव्हरेस्ट पर्वत चढणे अशक्य कोटीतील गोष्ट असेल. तथापि, आज, नेपाळमध्ये अनेक लोक हिमालयापेक्षा उंच पर्वतावर चढत आहेत! या भव्य पर्वतावरील प्रवासाची माहिती करून घेण्याआधी, आपण नेपाळच्या लहानशा परंतु रम्य राज्यावर एक नजर टाकू या.

नेपाळ—पर्वतांचे राज्य

नेपाळचे राज्य असामान्य आहे कारण, जगातील उरलेल्या क्वचित राजसत्ताक राज्यांपैकी ते एक आहे; तसेच ते निधर्मी नसून धार्मिक राज्य आहे. नेपाळ हे जगातील एकमेव हिंदू राष्ट्र आहे. त्याच्या दोन करोड रहिवाश्‍यांपैकी बहुतांश लोक हिंदू आहेत. तथापि, तेथील लोकांच्या जातीय उगमांमध्ये अतिशय भिन्‍नता आहे. उत्तरेच्या डोंगराळ भागातील रहिवाशी, मुख्यतः मूळचे टिबेटो-बर्मन आहेत व दक्षिणेच्या सपाट प्रदेशातील लोक प्रामुख्याने इंडो-आर्यन पार्श्‍वभूमीचे आहेत. नेपाळी ही त्या देशातील अधिकृत भाषा व ६० टक्के लोकांची मातृभाषा आहे. उर्वरित लोक १८ पेक्षा अधिक जातींच्या भाषा बोलतात.

नेपाळचा आकार काहीसा काटकोनी आहे, पूर्व ते पश्‍चिमेपर्यंत ८८० किलोमीटर आणि उत्तर ते दक्षिणेपर्यंत २०० किलोमीटर असे त्याचे आकारमान आहे. उत्तरेची सीमा असणाऱ्‍या विस्मयप्रेरक हिमालयामध्ये एव्हरेस्ट पर्वत देखील समाविष्ट आहे. तो ८,८४८ मीटर असलेल्या व ८,००० मीटरपेक्षा अधिक उंच असणाऱ्‍या आठ इतर शिखरांपेक्षा जगातील सर्वात उंच शिखर आहे. मध्य नेपाळमध्ये कमी उंचीचे पर्वत, सरोवरे व दऱ्‍या आहेत. भारताची सीमा असणाऱ्‍या दूरवरील दक्षिणेकडे, तरायचा सुपीक व मुख्य शेतीचा प्रदेश आहे.

मध्य भागात वसलेली काठमांडू ही राजधानी, खरोखर पर्यटकांसाठी रम्य ठिकाण आहे. तेथून विमानात बसून या वैभवशाली पर्वतांवरून उड्डाण करावयास, वन्यजीवन अभयारण्यांची सफर करण्यास व अनेक स्थानिक स्थळे पाहण्यास मिळतात. नेपाळला कधीकधी दैवतांची दरी असे संबोधण्यात येते कारण धर्म तेथील लोकांच्या जीवनात मोठी भूमिका पार पाडते. धर्मामुळे देखील लाखो जण हिमालयापेक्षा उंच “पर्वतावर” चढत आहेत.

सुमारे २,७०० वर्षांआधी, “शेवटल्या दिवसात . . . परमेश्‍वराच्या मंदिराचा डोंगर पर्वताच्या माथ्यावर स्थापण्यात येईल . . . लोकांच्या झुंडी जातील व म्हणतील, चला, आपण परमेश्‍वराच्या पर्वतावर . . . चढून जाऊ, तो आम्हास आपले मार्ग शिकवो, म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालू,” असे भाकीत करण्यास इब्री संदेष्टा यशया प्रेरित झाला होता. (यशया २:२, ३) येथे विश्‍वाचा निर्माणकर्ता व सार्वभौम अधिपती, यहोवा याच्या उंचावलेल्या शुद्ध उपासनेची तुलना इतर सर्व पर्वतासमान उपासनेच्या प्रकारांपेक्षा उंच असलेल्या पर्वताशी केली आहे. तो जागतिक शैक्षणिक कार्याचा विषय आहे जो सत्यासाठी भुकेलेल्या लोकांना यहोवाच्या मार्गांबद्दल शिकण्यास मदत करतो. या कार्याची सुरवात नेपाळमध्ये कशी झाली?

लहान सुरवात

दुसऱ्‍या महायुद्धाच्या वेळी, ब्रिटीश लष्करातील एक सैनिक खऱ्‍या धर्माचा शोध घेत होता. त्याच्या नेपाळी-हिंदू पालकांनी कॅथलिक पंथात धर्मांतर केले होते. तो मोठा होत गेला तसे, त्याला मूर्तिपूजेतील मूर्खपणा दिसला, त्याने नरकाग्नीच्या सिद्धांतासारख्या शिकवणींचा धिक्कार केला आणि प्रोटेस्टंट चर्चच्या विश्‍वासांचे परीक्षण करण्यास सुरवात केली. परंतु त्याला समाधान मिळाले नाही.

जपानी लोकांनी या सैनिकाला त्यावेळी रंगून, बर्मा या नावाने ओळखल्या जाणाऱ्‍या ठिकाणी नेल्यावर, त्याने मजूरी कराव्या लागणाऱ्‍या कॅम्पमधील कठोरतेपासून वाचण्यास प्रार्थना केली जेणेकरून तो खऱ्‍या उपासनेचा आपला शोध पुढे चालू ठेवू शकत होता. काही काळानंतर, तो कैद केलेल्यांच्या तावडीतून सुटून गेला आणि त्याला एका शाळा मास्तरांनी मदत केली व त्याच्याच घरात त्याला जे. एफ. रदरफोर्ड यांनी लिहिलेली मृत कोठे आहेत? (इंग्रजी) ही पुस्तिका सापडली. सत्याचा निनाद ओळखल्यावर, यहोवाच्या साक्षीदारांनी १९४७ मध्ये रंगून येथे त्याला भेट दिल्यावर तो उत्सुकतेने अभ्यास करण्यास तयार झाला. काही महिन्यातच, त्याचा बाप्तिस्मा झाला व त्याच्या पाठोपाठ त्याच्या तरुण पत्नीचा देखील बाप्तिस्मा झाला. भारतात येऊन, ईशान्येकडील पर्वतांमधील कॅलींगपाँग येथे, आपल्या मायदेशी स्थिरावण्याचा निर्णय त्यांनी घेतला. येथे त्यांना दोन मुले झाली व मुलांनी येथेच शिक्षणही घेतले. मार्च १९७० मध्ये त्यांनी काठमांडू येथे स्थानांतर केले.

नेपाळच्या राज्य कायद्यानुसार धर्मांतर करण्यास मनाई होती. तथाकथित परकीय धर्माचा प्रसार करताना कोणी सापडल्यास त्याला सात वर्षांसाठी कैद करण्यास पात्र ठरवले जाई व अशा धर्माचा स्वीकार करणाऱ्‍या व्यक्‍तीवर तीन वर्षांची कैद त्याचप्रमाणे भारी दंड देखील लादला जाऊ शकत होता. यास्तव, प्रचार कार्य सावधगिरीने करावयाचे होते. घरोघरचे सेवाकार्य म्हणजे, एका घरी भेट दिल्यावर दुसऱ्‍या क्षेत्रात जाऊन तेथील एखाद्या घरात भेट देणे असे होते. सुवार्तेचा प्रचार करण्यात अनौपचारिक साक्षकार्याची मोठी भूमिका होती हे समजण्याजोगे आहे.

प्रगती फारच हळुवारपणे होत होती. एक करोड लोकसंख्या असून, क्षेत्र अतिशय निरुत्साहित करणारे वाटत होते. या एकट्या कुटुंबाने मित्र, परिचित व्यक्‍ती, नोकरीवरील मालक, सहकामगार यांना साक्ष दिली आणि अशा प्रकारे सत्याचे बीज पेरले गेले. ते आपल्या घरात नियमित सभा चालवू लागले व त्यांनी आस्थेवाईकांना त्यांच्याकडे येण्यास आमंत्रण दिले. शेवटी, मार्च १९७४ मध्ये, चार वर्षांपर्यंत लागोपाठ पेरणी केल्यावर व पाणी घातल्यावर नेपाळमध्ये पहिले फळ उत्पन्‍न झाले—ते देखील असंभवनीय उगमाकडून!

एका घरी भेट देत असताना, प्रचारक एका श्रीमंत व्यक्‍तीशी बोलत होता व ती व्यक्‍ती एका राजेशाही घराण्यातील सदस्याची चिटणीस होती. तो मनुष्य म्हणाला, “माझ्या मुलाशी बोला.” तो मुलगा बायबल अभ्यास करण्यासाठी तयार झाला. तो एका जुगाराच्या अड्ड्यावर कामाला असल्यामुळे त्याने आपले काम कालांतराने बदलले. त्याचे पिता, अतिशय धार्मिक हिंदू व्यक्‍ती असून त्याला विरोध करू लागले. तरीसुद्धा, या तरुण व्यक्‍तीने यहोवासाठी आपला पावित्रा घेतला. याचा परिणाम? नंतर, त्याच्या वडिलांनी त्याला विरोध करण्याचे सोडून दिले आणि त्याच्या काही जवळच्या नातेवाईकांनी बायबलचे सत्य स्वीकारले. तो आता ख्रिस्ती मंडळीत वडील या नात्याने कार्य करतो.

आध्यात्मिकरित्या दृढ होण्याकरता व एकमेकांसोबत मिळण्याचे सोडून न देण्याची शास्त्रवचनीय आज्ञा पाळून, काठमांडूमधील हा लहान गट एका खाजगी घरात नियमित सभा चालवत होता. परंतु, अधिककरून या बांधवांना विराट मेळाव्यांना उपस्थित राहणे शक्य नव्हते. ज्यांची ऐपत होती ते संमेलनांकरता भारतामध्ये येत होते—हा पर्वतरांगांमधील लांबचा व खर्चीक प्रवास होता.

सबंध प्रांतीय अधिवेशनाचा कार्यक्रम, ते सभा भरवत असलेल्या ठिकाणी सादर करण्यात आला तेव्हा तो प्रसंग किती आनंदमय होता! चार बंधू व त्यांच्यासोबत भारताच्या शाखेचे सदस्य देखील सबंध कार्यक्रम हाताळत असल्याची कल्पना करा! बायबलवरील नाटक देखील सादर करण्यात आले? कसे? भारतामध्ये नाटकाची रंगीत तालीम घेत असताना स्लाईड्‌स घेण्यात आल्या होत्या. नेपाळमध्ये, या स्लाईड्‌स पडद्यावर दाखवल्या व त्यासोबत टेप केलेले संवाद लावले. श्रोतागणाला ते फारच आवडले. श्रोतागण किती होता? अठरा जणांचा!

प्रचार कार्यासाठी देशाच्या बाहेरून येणारी मदत फार मर्यादित होती. मिशनरी कार्य तर अशक्यच होते आणि परदेशीयांना ऐहिक काम मिळणे कठीण होते. तथापि, दोन भारतीय साक्षीदारांना वेगवेगळ्या समयी नेपाळमध्ये नोकरी मिळाली, त्यांनी काठमांडूमध्ये अनेक वर्षे घालवली व नव्याने स्थापलेल्या मंडळीला बळकट करण्यास मदत दिली. सन १९७६ पर्यंत काठमांडूमध्ये १७ प्रचारक होते. सन १९८५ मध्ये बांधवांनी स्वतःचे राज्य सभागृह बांधले. तो बांधून पूर्ण झाल्यावर, वार्षिक प्रांतीय अधिवेशने तसेच इतर संमेलने तेथे नियमितपणे घेतली जाऊ लागली. त्या एकांत, डोंगराळ क्षेत्रात ते सभागृह खरोखर शुद्ध उपासनेचे केंद्र होते.

समस्या असतानाही विस्तार

त्या प्रारंभिक वर्षांमध्ये, अधिक सावधगिरीने केलेल्या प्रचार कार्याकडे अधिकाऱ्‍यांचे इतके लक्ष गेले नाही. परंतु, १९८४ च्या उत्तरार्धात प्रतिबंध घालण्यात येऊ लागले. एक बांधव व तीन बहिणींना अटक करून चार दिवसांसाठी कोठडीत डांबण्यात आले व सोडून देण्याआधी त्यांना आपल्या कार्यहालचाली पुढे चालू ठेवू नयेत असा ईशारा देण्यात आला. एका गावात, स्वतःच्या घरात बायबल अभ्यास घेत असताना नऊ लोकांना अटक करण्यात आली. सहा जणांना ४३ दिवसांसाठी तुरुंगात ठेवण्यात आले. इतर अनेकदा अटक करण्यात आली परंतु कोणतीही कायदेशीर कार्यवाही करण्यात आली नाही.

अगदी अलीकडेच म्हणजे, १९८९ मध्ये, एका मंडळीच्या पुस्तक अभ्यासातील सर्व बांधव व बहिणींना अटक करण्यात आली व तीन दिवसांकरता कैद करून त्यांना सोडून देण्यात आले. काहीवेळेस, ते प्रचार करणार नाहीत असे सांगणाऱ्‍या कागदावर त्यांना सही करण्यास सांगण्यात आले. त्यांनी नकार दिला. काहींना, प्रचार करताना पकडण्यात आले तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील अशा विधानावर सही दिल्यावरच सोडण्यात आले.

अशा अडचणी असतानाही, बांधव राज्याच्या सुवार्तेचा प्रचार आवेशाने करीत होते. उदाहरणार्थ, १९८५ मध्ये, सरकार दखल घेऊ लागल्यावर प्रचार करणाऱ्‍यांच्या संख्येमध्ये २१ टक्क्यांची वाढ झाली. तेथील ३५ प्रचारकांनी इतरांसोबत शुद्ध उपासनेविषयी बोलण्यास दर महिन्याला सरासरी २० तास खर्च केले.

काही समयानंतर, नेपाळमध्ये, राजनैतिक घडामोडी होऊ लागल्या. सरकारी अधिकाऱ्‍यांना समजले की, त्यांच्याकरता यहोवाच्या साक्षीदारांकडून धोका नव्हता. वास्तविकतेत, त्यांच्या बायबलच्या शैक्षणिक कार्याचा लोकांवर उभारणीकारक प्रभाव पडत होता व ते त्यांना चांगले नागरिक बनवत होते. अधिकाऱ्‍यांनी निरीक्षिले की, यहोवाचे उपासक होण्यासाठी प्रामाणिकपणा, परिश्रम व चांगली नैतिक वर्तणूक हे गुण मूलभूत गरजा आहेत म्हणून त्यांच्यावर जोर दिला जात होता.

पूर्वी अतिशय धार्मिक असलेली हिंदू स्त्री साक्षीदार बनली व तिने रक्‍त संक्रमण घेण्याचे नाकारल्यावर उत्तम साक्ष देण्यात आली. तिने निश्‍चयाने व माहिती असल्यामुळे जो पावित्रा घेतला होता त्यावर डॉक्टर आश्‍चर्यचकित झाले. या स्त्रीला भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा! या माहितीपत्रकाकरवी सत्य शिकण्यास मदत केली होती. तिच्या कुटुंबाकडून विरोध आणि उपहास असताना देखील तिने १९९० मध्ये ७० व्या वर्षात पदार्पण करत असताना बाप्तिस्मा घेतला. काही काळानंतर तिच्या पायाचे हाड मोडले व इतरही काही समस्या असल्यामुळे तिच्यावर मोठी शस्त्रक्रिया करावी लागली. दोन आठवड्यांपर्यंत, रक्‍त न घेण्यासाठी ती डॉक्टर व नातेवाईकांकडील दबावाला तोंड देत राहिली. शेवटी, शस्त्रक्रिया करणाऱ्‍या गटाने यशस्वीरित्या तिच्यावर रक्‍ताविना शस्त्रक्रिया केली. आता अधिक हालचाल करू शकत नसली, तरी ही विश्‍वासू बहीण दररोज सकाळी तिच्या गेटजवळ बसते, वाटसरूंना तिच्याजवळ बसण्यास व काही सुखकारक सुवार्ता ऐकण्यास बोलावते.

आजचा नेपाळ

आज नेपाळमधील परिस्थिती कशी आहे? यहोवाचे साक्षीदार त्यांच्या जगभरातील इतर बांधवांप्रमाणेच उपासनेचे स्वातंत्र्य उपभोगत आहेत. एक किंवा दोन गिर्यारोहकांनी खऱ्‍या उपासनेच्या पर्वतावर चढणाऱ्‍यांना साथ दिल्यापासून अधिकाधिक लोक, ‘चला आपण यहोवाच्या पर्वतावर चढून जाऊ’ असे म्हणत आहेत. सन १९८९ पर्यंत, प्रत्येक महिन्याला प्रचार कार्यात भाग घेणाऱ्‍यांची सरासरी ४३ होती व त्या वर्षी २०४ जण ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारक विधीला उपस्थित होते.

नंतर, अभिवचनाप्रमाणे, यहोवा त्याच्या मंडपात सत्याच्या शोधकांना एकत्र करण्याचे कार्य त्वरेने घडवून आणू लागला. (यशया ६०:२२) काही समयापूर्वीच काठमांडूमध्ये दुसरी मंडळी स्थापण्यात आली आणि आता राजधानीच्या बाहेर दोन एकाकी गट आहेत. एप्रिल १९९४ मध्ये, १५३ ख्रिश्‍चनांनी प्रचार कार्याचा अहवाल दिला—पाचपेक्षा कमी वर्षांमध्ये ३५० टक्क्यांची वाढ! त्यांनी ३८६ आस्थेवाईक लोकांसोबत गृह बायबल अभ्यास चालवले. सन १९९४ च्या स्मारक विधीला ५८० जणांची रोमांचकारी उपस्थिती होती. एका खास संमेलन दिवसाला, सभागृह ६३५ जणांनी गच्च भरले होते व २० जणांनी स्वतःला बाप्तिस्म्यासाठी सादर केले. अशा प्रकारे यहोवाचे साक्षीदार जगभरात ज्या वाढींचा आनंद घेतात त्या आता छोट्याश्‍या नेपाळमध्ये देखील होत आहेत.

अलीकडील वर्षांमध्ये, नेपाळी भाषेत अधिक साहित्य छापण्यात येत आहे व यामुळे नम्र जणांना सत्यावर दृढ पकड धरण्यास मदत मिळत आहे. भारतातील शाखा दप्तरात भाषांतराच्या कौशल्याविषयी व संगणकाच्या उपयोगाविषयी प्रशिक्षण दिलेले भाषांतरकार आता काठमांडू येथे पूर्ण-वेळ सेवा करत आहेत. विस्तार करण्यासाठी सज्ज असून, नेपाळचे ईश्‍वरशासित गिर्यारोहक प्रगतीपथावर आहेत!

हिमालयापेक्षा उंच चढा

तुम्ही देखील हिमालयापेक्षा उंच असणाऱ्‍या पर्वतावरील प्रवास करण्याचा आनंद लुटू शकता. असे केल्याने, तुम्ही केवळ नेपाळमधल्याच नव्हे तर ‘सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणाऱ्‍यांना’ साथ द्याल. (प्रकटीकरण ७:९) त्यांच्यासोबत तुम्हीसुद्धा, नेपाळमध्ये आहेत त्यासारख्या वैभवशाली पर्वतांच्या निर्माणकर्त्याद्वारे शिकवले जाण्याचा आनंद लुटाल. निर्माणकर्ता “इन्साफ करील” हे तुम्हाला दिसून येईल आणि तुम्ही शुद्ध केलेल्या व सुंदर बनवलेल्या पृथ्वीवर सर्वकाळ जगण्याची वाट बघू शकाल.—यशया २:४.

[२४ पानांवरील नकाशा]

(For fully formatted text, see publication)

काठमांडू

एव्हरेस्ट पर्वत

[२५ पानांवरील चित्रं]

काठमांडूमध्ये सभागृहाच्या बाहेर

[२६ पानांवरील चित्रं]

पुष्कळ नेपाळी लोक बायबल अभ्यासांकरवी लाभ मिळवत आहेत

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा