तुमच्या व्यापारामुळे तुम्हाला कोणती किंमत मोजावी लागेल?
दक्षिण अमेरिकी देशाच्या राष्ट्रपतीच्या पत्नीवर, तिच्या कुटुंबाच्या सदस्यांनी स्थापन केलेल्या बनावट व्यापार करारात लाखो डॉलर गुंतवल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. भारतात, थाटामाटाचा बंगला आणि २९ मोटार गाड्यांचा मालक असलेला ३८ वर्षांचा एक रोखे दलाल, १.६ महापद्म डॉलर्रचा बँक व्यवसाय आणि शेअर बाजार लोकापवादात अभिकथित गोवल्यामुळे, त्याला अटक करण्यात आली. फिलीपाईन्समध्ये, एका बेटावर राहणारे हजारो रहिवासी बेकायदेशीर बंदुका बनवून निर्वाह करतात. या लाभप्रद व्यापारात राहण्यासाठी, अधिकाऱ्यांनी त्यांच्या विरूद्ध काही कारवाई करू नये म्हणून ते त्यांना वेळच्यावेळी लाच देत राहतात, असा अहवाल दिला जातो.
होय, व्यापारातील बेईमानी आणि लबाडी संपूर्ण जगात बोकाळत आहे. बहुधा त्यासाठी लोकांना त्यांचा हुद्दा, नावलौकिक आणि पैशाची किंमत मोजावी लागली.
तुमच्याबद्दल काय? तुमचा व्यापार आहे का? किंवा तुम्ही सुरू करण्याच्या विचारात आहात का? तुम्हाला त्यासाठी कोणती किंमत द्यावी लागेल? अपरिहार्यपणे, व्यापारामध्ये थोडीतरी खोट होतेच. हे आक्षेपार्य नाही. परंतु, कोणताही व्यापार सुरू करण्याआधी किंवा आधीपासूनच तुमचा व्यापार असल्यास त्याच्या संदर्भात काही निर्णय घेण्याआधी खर्चाचा अंदाज करणे सुज्ञपणाचे ठरेल. (लूक १४:२८) किंमत मोजावी लागेल अशा काही गोष्टी तुम्हाला विचारात घ्याव्याशा वाटतील त्या पृष्ठ ३१ वरील चौकोनात दिल्या आहेत.
स्पष्ट सांगायचे म्हणजे व्यापार करणे इतके सोपे नाही. एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीला आध्यात्मिक आणि नैतिक जबाबदाऱ्यांचा विचार करावा लागतो. तुम्ही ती किंमत मोजून आध्यात्मिक समतोल राखू शकता का? काही किंमती तुमच्या नैतिक स्वीकारापलीकडच्या आहेत का? कोणत्या किंमती स्वीकारयोग्य आहेत आणि कोणत्या नाहीत हे ठरवण्यास तुम्हाला मदत करणारी काही तत्त्वे कोणती आहेत?
पैशाला त्याच्या जागीच ठेवा
एखादा व्यापार चालवण्यासाठी पैशाची गरज लागते आणि अशी आशा केली जाते, की त्या व्यापारामुळे एखाद्याच्या कुटुंबाचा निर्वाह करण्यासाठी पुरेसा पैसा मिळेल. परंतु पैशाबाबतच्या ध्येयांचा सहजपणे विपर्यास केला जाऊ शकतो. लोभ एक कारण होऊ शकते. पुष्कळ लोकांच्या बाबतीत पाहता, पैसे गोवलेले असतात तेव्हा बाकीच्या सर्व गोष्टी दुय्यम स्थानाच्या होतात. तरीसुद्धा, नीतीसूत्रे या बायबल पुस्तकाचा लेखक आगूरने असे म्हटले तेव्हा समतोल दृष्टिकोन व्यक्त केला की, “दारिद्र्य किंवा श्रीमंती मला देऊ नको; मला आवश्यक तेवढे अन्न खावयास दे.” (नीतीसूत्रे ३०:८) उपजीविकेसाठी पुरेशा पैशात समाधानी राहण्याचे मूल्य त्याने ओळखले होते—धंदेवाईक म्हणतात त्याप्रमाणे त्याला “पुष्कळ संपत्ती मिळवायची” नव्हती.
परंतु एखादी तथाकथित सुवर्ण संधी चालून येते तेव्हा लोभामुळे एखादा हे तत्त्व विसरू शकतो. एका विकसनशील राष्ट्रात यहोवाच्या साक्षीदारांच्या एका फिरत्या सेवकाने अशाच एका घटनेचा अहवाल दिला. गुंतवणूक भांडवल हवे असलेल्या एका विशिष्ट कंपनीने असे भासवले, की गुंतवणूक करणारे त्यांचे पैसे लवकरात लवकर कदाचित काही महिन्यातच दुप्पट करू शकतात. झटकीपट श्रीमंत होण्याच्या या संधीने पुष्कळांना गुंतवणूक करण्यास निरवले. प्रवासी सेवकाने म्हटले: “काही जण त्यामध्ये गोवण्यासाठी फारच उतावळे झाले होते. त्यांनी त्याच्याबद्दलची जास्त माहितीच घेतली नाही व [गुंतवणूक करण्यासाठी] पैसे उसने घेतले.”
याच्या विरूद्धतेत, दोन व्यक्ती गुंतवणूक करण्याआधी या कंपनीच्या कार्यालयाची चौकशी करण्यास गेल्या. उत्पादन सुविधा पाहण्याबद्दलची त्यांची विनंती नाकारण्यात आली. यामुळे त्यांना त्या कंपनीच्या लौकिकतेचा संशय आला. ते त्यांना संरक्षणात्मक ठरले कारण काही आठवड्यांमध्येच स्पष्ट बनावट कारस्थाने उघड करून लोकांना अटक करण्यात आली. ज्यांनी आधी चौकशी केली नाही त्यांना कोणती किंमत द्यावी लागली त्याचा जरा विचार करा. त्यांनी पैसे तर गमावलेच शिवाय ही योजना निष्फळ ठरल्यामुळे त्यांनी ज्या मित्रांकडून पैसे उधार घेतले त्यांना पैसे पुन्हा देता न आल्यामुळे ते मित्रही गमावले. पैशाच्या बाबतीत नीतीसूत्रे २२:३ मध्ये दिलेल्या तत्त्वाचे अवलंब करणे किती सुज्ञपणाचे ठरेल ज्यामध्ये म्हटले आहे: “चतुर मनुष्य अरिष्ट येता पाहून लपतो; भोळे पुढे जातात आणि हानि पावतात.”
तुमच्या शब्दाप्रमाणे रहा
तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुम्हाला तुमच्या धंद्यात फायदे मिळत नसल्यास काय? स्वतःच्या शब्दाप्रमाणे वागल्याने काही फायदा होणार नाही असे ज्या व्यक्तीला माहीत आहे आणि तरीदेखील ती दिलेल्या शब्दाप्रमाणे वागते अशा व्यक्तीची स्तोत्र १५:४ प्रशंसा करत म्हणते: “आपण वाहिलेल्या शपथेने स्वतःचे अहित झाले तरी ती मोडीत नाही.” व्यापाराची भरभराट होत असताना दिलेल्या शब्दाप्रमाणे वागणे सोपे असते. परंतु जेव्हा एखाद्याला आर्थिक तोटा होतो तेव्हा तेथे सत्वनिष्ठेची परीक्षा होते.
यहोशवाच्या काळातील बायबलमधील एका उदाहरणाची आठवण करा. गिबोनच्या रहिवाश्यांनी कपटाची युक्ती योजली जेणेकरून इस्राएलचे सरदार त्यांच्याबरोबर करार करतील आणि त्यांना ठार मारणार नाहीत. खरे पाहता, ते अशा एका राष्ट्राचे भाग होते जे इस्राएल राष्ट्रासाठी घातक होते. ही कुयुक्ती उजेडात आली तेव्हा, “इस्राएल लोकांनी त्यांना मारून टाकले नाही, कारण मंडळीच्या सरदारांनी इस्राएलचा देव परमेश्वर ह्याची शपथ घेतली होती.” (यहोशवा ९:१८) हा गट शत्रूच्या क्षेत्रातून आला असला तरी, सरदारांना त्यांचा शब्द ठेवणे अधिक महत्त्वपूर्ण वाटले. आणि त्यानंतरच्या घटना दाखवून देतात की यामुळे यहोवा प्रसन्न झाला.—यहोशवा १०:६-११.
तुम्ही अपेक्षिल्याप्रमाणे गोष्टी होत नसल्या तरी, तुम्ही तुमच्या व्यापारी करारांनुसार आणि संविदाप्रमाणे राहाल का?a असे केल्याने तुम्ही अधिकरीत्या यहोवाचे गुण विकसित कराल कारण तो आपल्या शब्दाप्रमाणे वागतो.—यशया ५५:११.
प्रामाणिक असा
आजच्या व्यापारी जगामध्ये प्रामाणिकपणाचा लोप होत नसला तरी तो धोक्यात असणाऱ्या जातीसारखा आहे. तुमच्यासारखा व्यापार करणारे त्यांची कमाई वाढवण्यासाठी अप्रामाणिक मार्गांचे अवलंबन करतील. जाहीरात करताना ते अप्रामाणिक असतील. स्वतःच्या उत्पादनावर दुसऱ्या कंपनीचे नाव छापून ते आपलेच म्हणून खपवतील. किंवा एखादी हलकी वस्तू उच्च प्रतीची भासवून विकतील. हे सर्व अप्रामाणिकतेचे प्रकार आहेत. त्यांच्याप्रमाणे वागणारे “दुर्जन” आहेत व असे दिसते, की एका लबाड मार्गाने आसाफाने सांगितल्याप्रमाणे, ते “सर्वदा स्वस्थ असून धनसंचय करीत असतात.“—स्तोत्र ७३:१२.
तुम्ही ख्रिस्ती या नात्याने बेकायदेशीर पद्धतींचा वापर कराल का? त्याऐवजी, “आम्ही कोणावर अन्याय केला नाही; कोणाला बिघडविले नाही, कोणाचा गैरफायदा घेतला नाही;” “आम्ही लाजिरवाण्या गुप्त गोष्टी वर्ज्य केल्या आहेत, आम्ही कपटाने चालत नाही;” “वजनावजनात फरक असणे याचा परमेश्वराला वीट आहे, आणि खोटी तागडी बरी नाही” या बायबल तत्त्वांनुसार तुम्ही वागाल का? (२ करिंथकर ४:२; ७:२; नीतीसूत्रे २०:२३) लक्षात ठेवा की, अप्रामाणिकतेचा जनक दुसरा कोणी नसून “लबाडीचा बाप,” दियाबल सैतान हाच आहे.—योहान ८:४४.
काही जण आक्षेप घेऊन म्हणतील: ‘इतरांप्रमाणे अप्रामाणिक पद्धती न वापरता व्यापार करणे अतिशय कठीण आहे.’ येथेच तर एखादा ख्रिस्ती यहोवावरील त्याचा विश्वास प्रदर्शित करू शकतो. काही किंमत मोजावी लागते तेव्हा प्रामाणिकपणाला परीक्षेत उतरवले जाते. अप्रामाणिकतेविना एक व्यक्ती जगू शकत नाही असे म्हणणे, देवावर प्रीती करणाऱ्यांची तो काळजी घेत नाही असे म्हणण्याच्या बरोबरीचे आहे. यहोवावर पूर्ण विश्वास बाळगणाऱ्याला माहीत आहे, की देव त्याच्या सेवकांना कोणत्याही राष्ट्रात व कोणत्याही परिस्थितीत पुरवू शकतो. (इब्रीयांस १३:५) हे खरे, की एखाद्याला अप्रामाणिक व्यक्तीपेक्षा कमी मिळकतीत समाधानी राहावे लागेल, परंतु देवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी ही किंमत देणे योग्य नव्हे का?
लक्षात असू द्या, अप्रामाणिकपणा बूमरँगप्रमाणे (वाकडा सोटा) आहे जे फेकल्यानंतर फेकणाऱ्याकडे पुन्हा येते. एखादा व्यापारी अप्रामाणिक असल्याचे दिसून आल्यास, ग्राहक आणि पुरवठाकार त्याला सोडून देतील. तो त्यांना एकदाच फसवू शकेल परंतु पुन्हा तो तसे करू शकणार नाही. दुसऱ्या बाजूला पाहता, प्रामाणिक व्यापारी बहुधा इतरांकडून आदर मिळवतो. ‘सगळे लोक करतात म्हणून आपल्यालाही तसे करायला काही हरकत नाही,’ अशा खोट्या तर्काच्या प्रभावापासून दूर राहा. बायबलचे तत्त्व आहे, “दुष्कर्म करण्यास प्रवृत्त होणाऱ्या बहुजनसमाजास अनुसरू नको.”—निर्गम २३:२.
समजा तुमच्यासोबत व्यापार करणारा तुमचा जुना साथीदार सहख्रिस्ती नाही आणि बायबल तत्त्वांप्रमाणे नेहमीच वागत नाही. काही अशास्त्रवचनीय कृत्ये केली जातात तेव्हा तुमच्या स्वतःच्या जबाबदारीला टाळण्यासाठी तुम्ही ही सबब सांगणे उचित ठरेल का? आदाम आणि शौलाची उदाहरणे लक्षात आणा. पाप टाळण्याऐवजी ते इतरांच्या दबावाखाली आले आणि मग त्यांनी त्यांच्या सोबत्यांवर दोष ढकलून दिला. त्यांना किती मोठी किंमत मोजावी लागली!—उत्पत्ती ३:१२, १७-१९; १ शमुवेल १५:२०-२६.
सहविश्वासूंबरोबर योग्य व्यवहार करा
यहोवाच्या सहउपासकांसोबत व्यापाराचा व्यवहार करण्याआधी विचार करण्याजोगे नुकसान आहे का? संदेष्टा यिर्मयाने अनाथोथात नावाच्या आपल्या मूळ गावी त्याच्या चुलत भावाकडून शेत विकत घेतले तेव्हा त्याने त्याला केवळ पैसे देऊन हस्तांदोलन केले नाही. तर तो म्हणाला: “मी खरेदारीखतावर सही केली, त्यावर शिक्का मारिला व साक्षी बोलावून त्यास पैसा तागडीने तोलून दिला.” (यिर्मया ३२:१०) असे लेखी करार, काही काळानंतर परिस्थितीत काही बदल झाल्यास गैरसमजूती टाळतील.
परंतु एखादा ख्रिस्ती बांधव तुमच्यासोबत धंद्यामध्ये अनुचित वागला असेल तर काय? तुम्ही त्याला कोर्टात खेचाल का? बायबल या बाबतीत अगदी स्पष्ट आहे. पौलाने विचारले: “तुमच्यापैकी कोणाएकाचा दुसऱ्याबरोबर वाद असला, तर त्याचा निकाल लावून घेण्यासाठी तो आपले प्रकरण पवित्र जनांपुढे न आणता अनीतिमानांपुढे नेण्याचे धाडस करीत आहे काय?” परंतु एखाद्या समस्येचे तात्काळ समाधानपूर्वक निरसन झाले नसेल तर? पौल पुढे म्हणतो: “तुम्ही एकमेकांवर खटले भरता ह्यांत सर्व प्रकारे तुमची हानीच आहे; त्यापेक्षा तुम्ही अन्याय का सहन करीत नाही? त्यापेक्षा नाडणूक का सोसून घेत नाही?” खरे ख्रिस्ती कोर्टात येऊन त्यांच्या समस्या सोडवतात हे जर बाहेरच्या लोकांनी ऐकले तर विचार करा यामुळे ख्रिस्ती संघटनेवर किती मोठी काळिमा फासली जाईल! अशा बाबतींमध्ये द्रव्यप्रीती बंधुप्रीतीपेक्षा अधिक प्रबळ होईल का? किंवा एखाद्याबद्दलची प्रतिष्ठा कमी होते व मनामध्ये सूड भावना प्रथम येते? पौलाचा सल्ला दाखवतो, की अशा घटनांमध्ये कोर्टात जाण्याऐवजी हानी सहन करणे उचित ठरेल.—१ करिंथकर ६:१, ७; रोमकर १२:१७-२१.
मंडळीमध्येच असे वाद हाताळण्यासाठी शास्त्रवचनीय मार्ग आहेत हे नक्की. (मत्तय ५:३७; १८:१५-१७) वादामध्ये गोवलेल्या बांधवांना सुचवलेल्या पावलांनुसार चालण्यास मदत करतेवेळी, ख्रिस्ती पर्यवेक्षक या समस्येशी संबंधित असणाऱ्या सर्वांना उपयोगी सल्ला देतील. अशा चर्चांदरम्यान तुम्हाला बायबल तत्त्वांशी सहमती दर्शवण्यास सोपे वाटेल, परंतु नंतर तुम्ही हे दाखवून द्याल का, की दिलेल्या सल्ल्याचे अनुकरण करून तुम्ही सर्व काही ऐकले आहे? देव आणि आपल्या सहख्रिश्चनांबद्दलची प्रीती आपल्याला असे करण्यास प्रवृत्त करील.
व्यापार करताना तुम्हाला काहीतरी किंमत मोजावी लागेलच हे निश्चित आहे. अशी आशा केली जाते, की तुम्हाला द्यावी लागणारी किंमत वाजवी असेल. जेव्हा तुम्हाला काही निर्णय घ्यावे लागतात किंवा कोणत्याही संशयास्पद परिस्थितीतून जावे लागते तेव्हा, जीवनामध्ये पैशापेक्षा आणखी पुष्कळ गोष्टी कैकपटीने बहुमूल्य आहेत ही गोष्ट ध्यानात ठेवा. पैशाला त्याच्या जागी ठेवणे, दिलेल्या शब्दाप्रमाणे वागणे, प्रामाणिक असणे व व्यापारातील सहकाऱ्यांबरोबर ख्रिस्ती पद्धतीने वागणे यामुळे आपण खात्री करून घेतो, की जरूरीपेक्षा अधिक वेळ आणि पैसा खर्च होणार नाही आणि यासोबतच आपण आपले मित्रत्व, चांगले अंतःकरण आणि यहोवासोबत उत्तम नातेसंबंध टिकवून ठेवू शकतो.
[तळटीपा]
a धंद्यामध्ये स्वतःच्या शब्दाप्रमाणे वागण्याच्या आधुनिक दिवसातील उदाहरणासाठी “माय वर्ड माय बॉन्ड“ हा मे ८, १९८८ सावध राहा!, पृष्ठ ११-१३ वरील लेख पहा.
[३१ पानांवरील चौकट]
तुमच्या व्यापारामुळे तुम्हाला मोजाव्या लागणाऱ्या किंमती
वेळ: स्वतःचा व्यापार करण्यात बहुधा, एखाद्या कंपनीसाठी कामगार म्हणून काम करण्यापेक्षा अधिक वेळ खर्च होतो. तो तुमच्या आराखड्याच्या आड येऊन त्यामुळे तुमच्याकडे महत्त्वपूर्ण आध्यात्मिक कार्यांसाठी कमी वेळ शिल्लक राहतो का? सकारात्मक पैलूंकडे पाहता, देवाची इच्छा करण्यात जास्त वेळ खर्च करण्यासाठी तुम्हाला तुमच्या कारभाराची व्यवस्था करता येईल का? असे आहे तर फारच छान. परंतु सांभाळा! करण्यापेक्षा बोलणे सोपे असते.
पैसा: पैसे कमवण्यासाठी हातात पैसे लागतात. तुमच्या व्यापारासाठी तुम्हाला किती गुंतवणूक करावी लागेल? तुमच्याकडे रोख रक्कम आहे का? की तुम्हाला उसने घ्यावे लागेल? पैशांचे नुकसान तुम्हाला परवडेल का? किंवा तुमच्या अपेक्षेनुसार गोष्टी घडल्या नाहीत तर झालेले नुकसान तुमच्या ऐपतीच्या पलीकडले असेल का?
मित्र: दररोजच्या व्यापारातील समस्यांमुळे, अनेक संयोजकांनी त्यांचे मित्र गमावले. मित्र बनवण्याची शक्यता असली तरी, तणावपूर्ण नातेसंबंध संभवनीय आहे. हे मित्र आपले ख्रिस्ती बंधू असल्यास काय?
चांगला विवेक: आजच्या जगामध्ये व्यापार करण्याची सर्वसामान्य पद्धत “निष्ठुर स्पर्धा“ किंवा “माझा फायदा कसा होईल?“ अशी आहे. एका युरोपियन निरीक्षणात जवळजवळ ७० टक्के विद्यार्थ्यांनी प्रतिपादले, की नीतीशास्त्राला व्यापारी जीवनामध्ये थोडेसे किंवा काहीच स्थान नाही. लबाडी, अप्रामाणिकपणा व शंकास्पद व्यापार सर्वसामान्य बनले आहेत यात काही आश्चर्य नाही. तुम्हाला देखील इतरांप्रमाणे वागण्याचे प्रलोभन होईल का?
यहोवासोबतचा तुमचा नातेसंबंध: देवाच्या नियमांच्या आणि तत्त्वांच्या विरूद्ध असलेले व्यापारातील कोणतेही कृत्य, मग ते व्यापारी व्यवहारात सर्वसामान्य असले तरी, एखाद्या व्यक्तीचा निर्माणकर्त्यासोबतच्या तिच्या नातेसंबंधाचा नाश करील. यामुळे ती व्यक्ती अनंतजीवनाची तिची आशा गमावू शकते. भौतिक लाभ कितीही होत असला तरी, स्पष्टपणे एका एकनिष्ठ ख्रिश्चनाला इतकी मोठी किंमत मोजावी लागणार नाही का?
[३१ पानांवरील चित्रं]
नंतरच्या गैरसमजूती टाळण्यास काय मदतदायी ठरेल? हस्तांदोलन की लेखी करार?