राज्य घोषकांचा वृतांत
युवाजन आफ्रिकेत सुवार्तेची घोषणा करतात
येशूच्या पुनरुत्थानाच्या काही काळानंतरच एक आफ्रिकी मनुष्य जेरुसलेमेस भेट देत होता. बायबल त्याचे नाव कळवत नाही. तो “कुशी लोकांची राणी कांदके, हिचा मोठा अधिकारी होता व त्याच्या हाती सर्व भांडार होते,” इतकेच त्याच्याविषयी वर्णन आहे. बायबलमध्ये त्याचा उल्लेख का करण्यात आला आहे? कारण त्याला “येशूविषयीची सुवार्ता,” सांगण्यासाठी देवदूताने ख्रिस्ती सुवार्तिक फिलिप्पाला मार्गदर्शित केले होते. ख्रिस्ती मंडळीचा सदस्य झाल्याची नोंद करण्यात आलेला हा कूशी षंढ पहिला आफ्रिकी होता.—प्रेषितांची कृत्ये ८:२६-३९.
आज, आफ्रिकेत लाखो यहोवाचे साक्षीदार आहेत. येशूविषयीच्या सुवार्तेची इतरांबरोबर सहभागिता करण्यात ते प्रत्येक संधीचा फायदा घेतात. आफ्रिकेतील तरुणांची देखील यामध्ये भूमिका असल्याचे खालील अनुभव दाखवून देतात.
◻ सॅन्डी आणि प्रिआ या ११ वर्षांच्या दोन मुली केनियातील नायरोबी येथे एकमेकांच्या शेजारी राहत होत्या. एकत्र खेळणे आणि आपसात गोष्टींच्या पुस्तकांची देवाण-घेवाण करणे त्यांना आवडत असे. प्रिआच्या पालकांनी यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करण्यास सुरवात केली. प्रिआला आता तिने जमा केलेल्या पुस्तकांमध्ये भर घालण्यासाठी नवीन पुस्तके मिळाली होती; त्यामध्ये वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीने प्रकाशित केलेले थोर शिक्षकाचे ऐका, या तिच्या सर्वात आवडत्या पुस्तकाचा देखील समावेश होता. प्रिआने थोर शिक्षक या तिच्या पुस्तकाची सहभागिता तिची मैत्रीण सॅन्डी हिच्याबरोबर केल्यानंतर या दोन मुलींनी या पुस्तकाचा नियमितपणे अभ्यास करण्यास सुरवात केली.
तथापि, सॅन्डीची आई युना, अँग्लिकन चर्चला जात असे त्यामुळे तिच्या मुलीने यहोवाच्या साक्षीदारांकडील पुस्तके वाचणे तिला आवडत नव्हते. आईचा विरोध असतानाही अभ्यास चालू होता. एके दिवशी सॅन्डीने तिच्या आईला आर्जवले की, केवळ एकदाच तिने त्यांची चर्चा ऐकावी. त्या दिवशी मुलींनी जो पाठ वाचला त्याचे शीर्षक “वाढ दिवस साजरा करणारे दोघे पुरूष,” हे होते. युनाने तो पाठ ऐकला आणि ती फारच प्रभावीत झाली. ती लगेचच प्रिआच्या आईकडे गेली आणि तिला बायबल संबंधाने अनेक प्रश्न विचारले.
युनासोबत बायबल अभ्यास करण्यासाठी प्रिआच्या आईने एका साक्षीदाराची व्यवस्था केली. लवकरच युना स्वतः, जे काही शिकत होती त्याविषयीची सहभागिता तिच्यासह काम करणाऱ्या डॉलीबरोबर करु लागली. तोपर्यंत ११ वर्षांच्या प्रिआने प्रगती करणे कायम ठेवले आणि यहोवाच्या साक्षीदारांच्या एका प्रांतीय अधिवेशनामध्ये यहोवा देवाला समर्पणाचे द्योतक म्हणून पाण्याचा बाप्तिस्मा घेण्याचा निर्णय घेतला. याच अधिवेशनामध्ये युना आणि डॉलीने सुद्धा बाप्तिस्मा घेतला त्यामुळे प्रिआच्या आनंदात भर पडली!
◻ यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्याला मान्यता नसणारी काही आफ्रिकी राष्ट्रे आहेत. अशाच प्रकारच्या एका प्रदेशामध्ये साक्षीदारांची धार्मिक कार्ये आणि त्यांचे विश्वास याबाबत सहिष्णुतेचे सामान्य वातावरण आहे. या प्रदेशातील एका शाळेमध्ये सात वर्षांचा एक मुलगा आणि त्याचा सहा वर्षांचा भाऊ—साक्षीदारांची मुले—यांना धार्मिक प्रार्थनांच्या वेळी गैरहजर राहण्यास अनुमती देण्यात आली होती.
एके दिवशी नवीन आलेल्या शिक्षकांनी इतर मुलांसह प्रार्थनेत सहभागी होण्यासाठी या मुलांवर सक्ती केली. थोरल्या मुलाने असे करण्यास नकार दिल्यामुळे शिक्षकांनी त्याला मारले. शॅडरक या त्याचा धाकट्या भावाने प्राचार्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना भेटण्याचा आग्रह धरला. तो इतरांसोबत प्रार्थनेत का सहभागी होत नाही, असे प्राचार्यांनी आणि नव्या शिक्षकांनी त्याला विचारले. त्याचे पालक त्याला मारतील याची त्याला भीती वाटते का, असे त्यांनी त्याला विचारले. त्याने अगदी उत्तम अरबी भाषेत उत्तर दिले: “नाही, मी ज्या देवाची उपासना करतो तो अव्यवस्थेचा नव्हे तर व्यवस्थेचा देव आहे. घरात मी एक यहोवाचा साक्षीदार आणि शाळेत दुसऱ्या एका धर्माचा, असे मी करु शकत नाही!” परिणामी त्याला मुभा देण्यात आली.
प्रेषितांची कृत्ये या पुस्तकामध्ये वर्णन केलेला कूशी षंढ बाप्तिस्मा घेतल्यानंतर “आपल्या वाटेने हर्ष करीत चालला.” (प्रेषितांची कृत्ये ८:३९) त्याचप्रमाणे आजही, आफ्रिकेच्या विस्तृत खंडातील राज्याचे उद्घोषक, ‘येशूविषयीच्या सुवार्तेची घोषणा‘ करण्याच्या त्यांच्या विशेषाधिकारात आनंद करत आहेत.—प्रेषितांची कृत्ये ८:३५.