राज्य घोषकांचा वृत्तान्त
“देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला”
ख्रिस्ती मंडळीची स्थापना झाल्यानंतर, लवकरच तिची वाढ सुमारे १२० सदस्यांपासून ३,००० पेक्षा जास्त सदस्यांमध्ये झाली. (प्रेषितांची कृत्ये १:१५; २:४१) बायबल स्पष्टीकरण देते की, “देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला; यरुशलेमेत शिष्यांची संख्या फार वाढत गेली.” (प्रेषितांची कृत्ये ६:७) नव्याने स्थापित झालेली मंडळी, काही वर्षांनंतरच, आफ्रिका, आशिया आणि युरोपमध्ये ख्रिश्चनांची एक आंतरखंडीय संघटना बनली.
आजच्या ख्रिस्ती मंडळीत देखील, अशाच प्रकारे जलद वाढीचा अनुभव येत आहे. उदाहरणार्थ, मेक्सिकोमध्ये, केवळ पांच वर्षांतच, राज्य घोषकांची संख्या, १,३०,००० पेक्षा जास्त वाढून ४,४३,६४० पर्यंत गेली आहे! यहोवाचे साक्षीदार साजरा करत असलेल्या येशूच्या मृत्यूच्या स्मारक विधीस, १९९५ मध्ये मेक्सिको मधील दर ५९ लोकांपैकी १ जण, उपस्थित होता. तरीदेखील, त्या राष्ट्रातील आध्यात्मिक हंगाम पूर्ण झालेला नाही, जसे की पुढील अनुभवाद्वारे स्पष्ट होते.—मत्तय ९:३७, ३८.
चीऑपस नामक राज्यातील एका शहरात, यहोवाच्या साक्षीदारांनी त्या क्षेत्रात, सुमारे २० वर्षे सुवार्तेचा प्रचार करूनदेखील कोणीही त्यांच्याबरोबरील गृह बायबल अभ्यासाचा स्वीकार केला नव्हता. हे उघड होते की गावातील अनेक लोकांना, दांडगाईसाठी विख्यात असणाऱ्या एका माणसाची भीती वाटत होती. साक्षीदारांबरोबर ते बायबलचा अभ्यास करत आहेत, हे कळल्यानंतरच्या त्याच्या प्रतिक्रियेस ते घाबरत होते.
या ठिकाणी स्थानांतर झालेल्या दोन धैर्यशील साक्षीदारांनी, सरळ त्या माणसाबरोबर चर्चा करून, ही समस्या हाताळण्याचा निश्चय केला. ते त्याच्या घरी पोहंचले तेव्हा त्याची पत्नी दारात आली व तिने त्यांचा संदेश लक्षपूर्वक ऐकला. मुख्यतः, पृथ्वीवरील परादीसमध्ये जीवन व्यतीत करण्याबद्दल बायबल जे काही म्हणते, त्याविषयी तिला खूप आस्था वाटली. पण तिने हे मान्य केले की, जर तिने बायबलचा अभ्यास स्वीकारला तर तिचा पती तिच्यासाठी जीवन जगणे कठीण करील. साक्षीदारांनी तिला समजावून सांगितले की, बायबल काय म्हणते याचे तिने काळजीपूर्वक परिक्षण केल्याशिवाय, देवाची सेवा कशी करावी आणि भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल कसा लुटावा, हे ती कधीच शिकणार नाही. तिने बायबल अभ्यास स्वीकारला.
अपेक्षा केल्याप्रमाणे तिच्या या निर्णयामुळे तिचा पती प्रसन्न नव्हता. इतर कुठल्याही कामासाठी, तिच्या मोटार-गाडीचा वापर करण्यास त्याने तिला मुभा दिली असली, तरी ख्रिस्ती सभेला उपस्थित राहाण्यास मोटार-गाडीचा वापर करण्याचा त्याने निषेध केला होता. त्याचा विरोध असतानाही, ती नियमितपणे, सगळ्यात जवळ असलेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या सभागृहास पायी जात असे, जे दहा किलोमीटरच्या अंतरावर होते. लवकरच शहरातील इतरांनी तिच्या धैर्याचे व निश्चयीपणाचे अवलोकन केले. साक्षीदारांनी लोकांच्या घरी भेटी दिल्या तेव्हा ते त्यांचे ऐकू लागले. काही तर त्या स्त्रीबरोबर सभेलाही जाऊ लागले. थोड्याच काळानंतर, साक्षीदार, त्या शहरात जवळजवळ २० बायबल अभ्यास चालवीत होते!
या स्त्रीच्या एका मैत्रीणीने सुद्धा, आपल्या पतीचा विरोध असतानाही, बायबलचा अभ्यास करण्याचा निश्चय केला. तिला असे करण्यास, त्या पहिल्या स्त्रीच्या पतीनेच उत्तेजन दिले होते, हे आश्चर्याचे आहे. त्याने तिच्या पतीबरोबर विचारविनिमय केल्यानंतर हा विरोध थांबला. शेवटी २० वर्षांनंतर, बायबल सत्याच्या बीजाला अंकुर फुटला व सुवार्तेची घोषणा आता करणाऱ्या या दोन स्त्रियांचा समावेश करून, १५ पेक्षा अधिक व्यक्ती बायबलचा अभ्यास करून ख्रिस्ती सभांना उपस्थित राहू लागल्या.