वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 ४/१५ पृ. ३-६
  • धार्मिक सत्य साधण्याजोगे आहे का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • धार्मिक सत्य साधण्याजोगे आहे का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • तत्त्वज्ञान आणि सत्य
  • सत्याच्या प्रकटीकरणाची गरज आहे का?
  • धर्म आणि सत्य
  • ‘गहू आणि निदण’
  • ख्रिस्ती आत्म्याने व सत्याने उपासना करतात
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • सत्याचा शोध का घ्यावा?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • सत्याच्या देवाचे अनुकरण करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • “सत्य तुम्हाला बंधमुक्‍त करील”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 ४/१५ पृ. ३-६

धार्मिक सत्य साधण्याजोगे आहे का?

विश्‍वविद्यालय असलेल्या स्वीडनच्या उपसाला शहरात, आध्यात्मिकतेबद्दल उत्सुक एक मनुष्य होता ज्याने त्याच्या शहरातील विविध धर्माच्या विश्‍वासांचा अभ्यास करण्याचे, त्यांच्या उपासना स्थळांना जाऊन भेटी देखील देण्याचे ठरवले. त्याने त्यांच्या पाळकांचा उपदेश ऐकला आणि काही सदस्यांची मुलाखत घेतली. त्याला असे दिसून आले, की केवळ यहोवाच्या साक्षीदारांनाच “सत्य मिळाल्याची” खात्री पटली होती. त्याच्या मनात विचार आला, की आज इतके विविध धार्मिक मत अस्तित्वात असताना देखील साक्षीदार असा दावा कसा करू शकतात.

धर्माच्या बाबतीत सत्य साध्य करणे शक्य आहे असे तुम्हाला व्यक्‍तिगतरीत्या वाटते का? ज्याला परम सत्य म्हटले जाते ते ठरवणे देखील शक्य होईल का?

तत्त्वज्ञान आणि सत्य

तत्त्वज्ञानाचा अभ्यास केलेल्यांनी असा दृष्टिकोन विकसित केला आहे, की परम सत्य मानवाला साध्य करता येत नाही. तुम्हाला कदाचित माहीत असेल, की तत्त्वज्ञानाची व्याख्या, “अस्तित्वाच्या आणि जीवनाच्या उगमाचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करणारे विज्ञान” अशी करण्यात आली आहे. परंतु वास्तविकतेत ते तसे करत नाही. फिलोसोफिन्स्‌ हिस्टोरिया (तत्त्वज्ञानाचा इतिहास) मध्ये, स्विडीश लेखक ऑल्फ ऑल्बर्ग यांनी लिहिले: “अनेक तत्त्वज्ञानी प्रश्‍न अशा स्वरूपाचे आहेत की त्यांचे निश्‍चित उत्तर देणे शक्य नाही. . . . अनेकांचे मत आहे की [पहिल्या मूळ आणि स्वयंसिद्ध तत्त्वांशी संबंधित] असलेल्या सर्व तत्त्वज्ञानविषयक समस्या . . . याच गटातील आहेत.”

परिणामी, ज्या लोकांनी तत्त्वज्ञानाद्वारे जीवनाच्या महत्त्वपूर्ण प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला ते शेवटी असमाधानी किंवा दुःखी झाले. स्विडीश लेखक गनर ऑस्पलिन यांनी त्यांच्या टँकेलीन्यर ओक ट्रुसफॉर्मर (विचारांची आणि धार्मिक विश्‍वासांची रचना) या पुस्तकात असे म्हटले: “एक गोष्ट आपण पाहतो की निसर्गाला, फुलपाखरू आणि डासापेक्षा मानवजातीमध्ये काहीच आस्था नाही. . . . विश्‍वात आणि आमच्या आंतरिक जगात निसर्गाच्या शक्‍ती परस्परांवर ज्या क्रिया करतात त्यांच्यासमोर आपण शक्‍तिहीन होय, दुर्बल आहोत. जीवनाबद्दलचा हा दृष्टिकोन या शतकाच्या अंतामधील साहित्यांमध्ये अनेकदा दिसून आला आहे ज्यामध्ये मनुष्यांनी आपला भरवसा त्यांच्या प्रगतीवर ठेवला आहे आणि चांगल्या जगाचे स्वप्न पाहिले आहे.”

सत्याच्या प्रकटीकरणाची गरज आहे का?

केवळ मानवी प्रयत्नांनी जीवनाविषयीचे सत्य शोधण्यात यश मिळवले नाही किंवा ते तसे कधीच करू शकणार नाहीत असे दिसते. म्हणूनच कोणत्या तरी ईश्‍वरी प्रकटीकरणाची गरज आहे असा निष्कर्ष काढण्यास योग्य कारण आहे. पुष्कळ जण ज्याला निसर्गाचे पुस्तक म्हणतात तेच काही प्रकटीकरण पुरवते. ते, जीवनाच्या उगमाची निर्णायक माहिती देत नसले तरीही, जीवनाबद्दल पूर्णपणे भौतिक स्पष्टीकरणापेक्षा अधिक समाधानकारी काही तरी असल्याचे ते दाखवते. गवताचे पातं निसर्गाच्या नियमानुसार वाढते परंतु एका खड्ड्यात खडकांच्या तुकड्यांनी जमलेला ढीग एका वेगळ्याच नियमामुळे रचला जातो. निसर्गातील सजीव गोष्टी स्वतःची वाढ आणि व्यवस्था स्वतःहून करतात त्याप्रमाणे निर्जीव गोष्टी करू शकत नाहीत. याचकारणामुळे, कायदा आणि धर्माच्या एका प्रख्यात विद्यार्थ्याला असा समारोप करण्यास आधार मिळाला: “सृष्टीच्या निर्मितीपासून [देवाच्या] अदृश्‍य गोष्टी . . . निर्मिलेल्या पदार्थांवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत.”—रोमकर १:२०.

या बांधणी आणि व्यवस्थेमागे कोण आहे हे शोधून काढण्यासाठी आपल्याला आणखी प्रकटीकरणाची गरज आहे. अशाप्रकारचे प्रकटीकरण अस्तित्वात असावे अशी आपण अपेक्षा करू नये का? पृथ्वीवरील जीवनाला जबाबदार असणाऱ्‍याने त्याच्या प्राण्यांसमोर स्वतःला प्रकट करण्याची अपेक्षा केली हे तर्कशुद्ध नव्हे का?

बायबल अशाप्रकारचे प्रकटीकरण आहे असा दावा ते करते. या नियतकालिकात आम्ही हा दावा स्वीकारण्यास उत्तम कारणे सादर केली आहेत आणि अनेकांनी ती स्वीकारली आहेत. बायबलचे लिखाण केलेल्या लोकांना त्यांनी जे काही लिहिले ते त्यांचे विचार नाहीत याचे स्पष्टीकरण देण्यास उत्सुकता लागली होती ही वस्तुस्थितीच उल्लेखनीय आहे. तीनशेपेक्षा अधिक वेळा बायबलच्या संदेष्ट्यांनी, “परमेश्‍वर म्हणतो,” असे म्हटल्याचे आपल्याला दिसून येते. (यशया ३७:३३; यिर्मया २:२; नहूम १:१२) तुम्हाला बहुधा माहीतच असेल की जे पुरूष किंवा महिला पुस्तके किंवा लेख लिहितात त्यांना सामान्यपणे त्यांच्या लिखाणावर त्यांची स्वाक्षरी द्यावयास आवडते. परंतु, ज्यांनी बायबलचे लिखाण केले त्यांनी स्वतःला अप्रसिद्ध ठेवले; काही बाबतीत तर बायबलच्या काही विशिष्ट भागांचे लिखाण कोणी केले हे ओळखणे अतिशय कठीण आहे.

बायबलचा आणखी एक उल्लेखनीय पैलू, त्याचे आंतरिक सामंजस्य होय. बायबलची ६६ पुस्तके लिहिण्यासाठी जवळजवळ १,६०० वर्षे लागली याचा विचार करताना हे खरोखरच लक्षणीय वाटते. समजा, तुम्ही एका सार्वजनिक ग्रंथालयात गेला आणि ६६ धार्मिक पुस्तके निवडली ज्यांना लिहिण्यासाठी सुमारे १६ शतके लागली होती. मग तुम्ही ती वेगवेगळी पुस्तके घेऊन त्यांचा एक खंड बनवला. तर त्या खंडात तुम्हाला एकच विषय आणि सुसंगत संदेश मिळेल अशी तुम्ही अपेक्षा करू शकाल का? मुळीच नाही. ते चमत्कारानेच होऊ शकेल. पण याचा विचार करा: बायबलच्या पुस्तकांचा एकच विषय आहे आणि ते एकमेकांना पुष्टी देतात. यावरून हेच प्रदर्शित होते, की बायबल ज्यांनी लिहिले त्यांना मार्गदर्शन करणारी कोणी एकच बुद्धिमान व्यक्‍ती किंवा लेखक असावा.

परंतु, इतर गोष्टींपेक्षा बायबलच्या ईश्‍वरी उगमाला शाबीत करणारे आणखी एक वैशिष्ट्य तुम्हाला दिसून येईल. भविष्यवाद—भवितव्यात नक्की काय घडणार आहे याची आगाऊ लिहून ठेवलेली माहिती. “त्या समयी असे होईल” आणि “शेवटल्या दिवसात असे घडेल की,” या अभिव्यक्‍ती बायबलमध्ये अद्वितीय आहेत. (यशया २:२; ११:१०, ११; २३:१५; यहेज्केल ३८:१८; होशेय २:२१-२३; जखऱ्‍या १३:२-४) येशू ख्रिस्त पृथ्वीवर येण्याच्या शेकडो वर्षांआधी, इब्री शास्त्रवचनातील भविष्यवादांनी त्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या जीवनाविषयी सविस्तर माहिती दिली. बायबल जीवनाच्या सत्याचे उगम आहे याशिवाय इतर कोणताही तर्कशुद्ध समारोप यातून निघत नाही. येशू स्वतः याची खात्री देऊन म्हणतो: “तुझे वचन हेच सत्य आहे.”—योहान १७:१७.

धर्म आणि सत्य

बायबलवर विश्‍वास असल्याचा दावा करणारे कित्येक लोक देखील मानतात, की पूर्ण सत्य साध्य करण्याजोगे नाही. अमेरिकेच्या जॉन एस. स्पाँग या पाळकाने असे विवेचन मांडले: “आमच्या जवळ सत्य आहे असा आपला विचार . . . आपण बदलला पाहिजे आणि परम सत्य सर्वांच्या आकलनाच्या पलीकडे आहे हे जाणून इतरांनी आपल्या दृष्टिकोनाप्रत यावे.” एक रोमन कॅथलिक लेखक, ख्रिस्टोफर डेरीक, सत्य मिळण्याच्या अशा नकारात्मक दृष्टिकोनांचे एक कारण देतात: “धर्माच्या ‘सत्याचा’ कोणताही उल्लेख, माहीत असल्याचा कोणता तरी दावा ध्वनित करतो . . . तुम्ही हे सूचित करता की कदाचित कोणा दुसऱ्‍याची चूक असेल; आणि हे मुळीच स्वीकारयोग्य नाही.”

परंतु, एक विचारी व्यक्‍ती या नात्याने, काही योग्य प्रश्‍नांचा विचार करणे तुमच्याकरता लाभदायक ठरेल. सत्य साध्य करण्याजोगे नसते, तर येशू ख्रिस्ताने असे का म्हटले असते: “तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्‍त करील?” शिवाय येशूच्या एका प्रेषिताने असे का म्हटले असते, की “सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहंचावे” अशी देवाची इच्छा आहे? ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांमध्ये विश्‍वासाच्या संबंधी “सत्य” हा शब्द शंभरापेक्षा अधिक वेळा का आला आहे? होय, सत्य असाध्य असते, तर असे का आहे?—योहान ८:३२; १ तीमथ्य २:३, ४.

खरे पाहता, सत्य साध्य करण्याजोगे आहे हे येशूने आपल्याला केवळ दाखवूनच दिले नाही तर, देवाने आपली उपासना स्वीकारण्यासाठी त्याचा शोध करणे जरूरीचे असल्याचेही त्याने दर्शवून दिले. एक शोमरोनी स्त्री उपासनेचा खरा प्रकार—जरूशलेममधील यहुदी करत असलेला की गरिज्जीम डोंगरावर शोमरोनी करत असलेला उपासनेचा प्रकार—कोणता असावा याविषयी बुचकळ्यात पडली तेव्हा सत्य साध्यण्याजोगे नाही असे येशूने उत्तर दिले नाही. याउलट त्याने म्हटले: “खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करितील . . . कारण आपले उपासक असे असावे अशीच पित्याची इच्छा आहे. देव आत्मा आहे; आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे.”—योहान ४:२३, २४.

अनेक लोक दावा करतात, की ‘बायबलचा अनेक मार्गांनी अर्थ लावता येतो यास्तव, सत्य नेमके काय आहे याची कदाचित कोणालाच खात्री नसेल.’ परंतु बायबलचे लिखाण इतके संदिग्ध आहे का, की ते कसे समजून घ्यावे याची तुम्हाला निश्‍चितता नसेल? काही विशिष्ट भविष्यसूचक आणि लाक्षणिक भाषा आकलनास कठीण असतील हे कबूल. उदाहरणार्थ, देवाने दानीएल संदेष्ट्याला सांगितले, की अधिक भविष्यसूचक भाषाशैलीचे त्याचे पुस्तक “अंतसमयापर्यंत” पूर्णपणे समजले जाणार नव्हते. (दानीएल १२:९) विशिष्ट दाखल्यांचा आणि चिन्हांचा अर्थ सांगण्याची गरज आहे हे उघड आहे.

तरीसुद्धा, सत्याने देवाची उपासना करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या मूळ ख्रिस्ती शिकवणी आणि नीतीमूल्यांच्या बाबतीत बायबल अगदी सडेतोड आहे हे स्पष्ट आहे. ते परस्पर विरोधी प्रतिपादनांना अनुमती देत नाही. इफिसकरांना लिहिलेल्या पत्रात ख्रिस्ती विश्‍वास “एकच” असल्याचे म्हटले आहे, व पुष्कळ विश्‍वास नसावेत हे दाखवून देते. (इफिसकर ४:४-६) कदाचित तुम्ही विचार कराल, ‘बायबलचा अनेक वेगवेगळ्या मार्गांनी यथायोग्यपणे अर्थबोध लावता येत नाही तर इतके विविध “ख्रिस्ती” पंथ का आहेत?’ आपण मागे जाऊन येशूचे प्रेषित निर्वतल्यानंतर लगेचच खऱ्‍या ख्रिस्ती विश्‍वासात निर्माण झालेल्या धर्मत्यागाच्या काळाकडे पाहिल्यावर आपल्याला या प्रश्‍नाचे उत्तर मिळते.

‘गहू आणि निदण’

येशूने या धर्मत्यागाबद्दल गहू आणि निदणाच्या त्याच्या दृष्टांतात भाकीत केले. येशूने स्वतः स्पष्टीकरण दिले, की “गहू” खऱ्‍या ख्रिश्‍चनांना आणि “निदण” खोट्या किंवा धर्मत्यागी ख्रिश्‍चनांना चित्रित करते. येशूने म्हटले, “लोक झोपेत असताना” एक “वैरी” गव्हाच्या शेतात निदण पेरील. प्रेषित मृत्यूमध्ये झोपी गेल्यानंतर ही पेरणी चालू झाली. दृष्टांत दाखवतो, की खऱ्‍या आणि खोट्या ख्रिश्‍चनांमधील हा गोंधळ ‘युगाच्या समाप्तीपर्यंत’ चालू राहील. अशाप्रकारे, अनेक शतकांपासून, धार्मिक शेतामध्ये नामधारी ख्रिश्‍चनांचे वर्चस्व असल्यामुळे खऱ्‍या ख्रिश्‍चनांची ओळख अस्पष्ट झाली आहे. परंतु, “युगाच्या समाप्तीस” एक बदल होणार होता. खोट्या ख्रिश्‍चनांना खऱ्‍या ख्रिश्‍चनांपासून वेगळे करण्यासाठी ‘मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठवणार होता.’ याचा अर्थ प्रेषितांच्या काळी ख्रिस्ती मंडळीचे जे स्थान होते तेच असून तिला सहजपणे ओळखता येणार होते.—मत्तय १३:२४–३०, ३६–४३.

यशया आणि मीखा या दोघांचे भविष्यवाद ‘शेवटल्या दिवसातील’ खऱ्‍या उपासकांच्या अशा पुर्नएकत्रीकरणाबद्दल भाकीत करतात. यशया म्हणतो: “शेवटल्या दिवसात असे होईल की परमेश्‍वराच्या मंदिराचा डोंगर पर्वताच्या माथ्यावर स्थापण्यात येईल, आणि सर्व डोंगराहून तो उंच होईल; त्याकडे सर्व राष्ट्रातील लोक लोटतील. देशादेशातील लोकांच्या झुंडी जातील व म्हणतील, चला आपण परमेश्‍वराच्या पर्वतावर याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे चढून जाऊ; तो आम्हास आपले मार्ग शिकवो, म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालू.” वस्तुस्थितींकडे सरळ दृष्टिकोन, यशयाचा भविष्यवाद आपल्या काळात पूर्ण होत असल्याचे दाखवून देतो.—यशया २:२, ३; मीखा ४:१–३.

परंतु, ख्रिस्ती मंडळीची वाढ, मानवी प्रयत्नांमुळे होत नाही. येशूने भाकीत केले की एकत्रीकरणाचे कार्य करण्यासाठी तो आपल्या “दूतांना पाठवील.” त्याने त्याच्यासाठी एक खास उद्देश देखील सूचित केला: “तेव्हा नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील.” (मत्तय १३:४३) यावरून असे दिसते, की ख्रिस्ती मंडळी संपूर्ण विश्‍वभरात ज्ञानप्रसाराचे किंवा शैक्षणिक कार्य करील.

यहोवाचे साक्षीदार या भविष्यवादांची पूर्तता आज २३२ देशांमध्ये जे शैक्षणिक कार्य ते करत आहेत त्यामध्ये पाहतात. साक्षीदारांचा विश्‍वास, वर्तणूकीचे दर्जे व संघटना याची तुलना बायबलसोबत केल्यावर कोणताही पक्ष न घेणाऱ्‍या लोकांना दिसून येईल, की या सर्व गोष्टी पहिल्या शतकातील मंडळीतील गोष्टींबरोबर सुसंगत आहेत. साक्षीदार त्यांच्या विश्‍वासाला “सत्य” असे संबोधतात, परंतु ते व्यक्‍तिगत श्रेष्ठत्वाच्या कल्पनेने प्रवृत होऊन असे बोलत नाहीत; तर त्यांनी देवाचे वचन बायबलचा विस्तारितपणे अभ्यास केला आहे आणि धर्माचे योग्यपणे मूल्यमापन करता येईल असे एकमेव प्रमाण या नात्याने ते त्याचे पालन करतात म्हणून ते असे बोलतात.

सुरवातीच्या ख्रिश्‍चनांनी त्यांच्या विश्‍वासाला “सत्य” असे संबोधले. (१ तीमथ्य ३:१५; २ पेत्र २:२; २ योहान १) त्यांच्यासाठी जे सत्य होते तेच सत्य आज आपल्यासाठी देखील असले पाहिजे. यहोवाचे साक्षीदार सर्वांना व्यक्‍तिगतपणे बायबलचा अभ्यास करून याची खात्री करून घेण्याचे आमंत्रण देतात. आम्हाला आशा आहे की असे केल्याने, तुम्ही केवळ इतरांपेक्षा श्रेष्ठ धर्म मिळाल्यानेच नव्हे तर सत्य सापडल्यामुळे आनंद अनुभवाल.

[५ पानांवरील चौकट]

काही तत्त्वज्ञान विरूद्ध सत्य

प्रत्यक्षप्रमाणवाद: धार्मिक स्वरूपाच्या सर्व कल्पना सत्यता सिद्ध न करण्याजोग्या निरर्थक आहेत आणि प्रत्यक्ष विज्ञानांना एक बनवण्याचा तत्त्वज्ञानाचा उद्देश आहे हा दृष्टिकोन.

अस्तित्ववाद: ह्‍याचे समर्थक दुसऱ्‍या जागतिक युद्धाच्या भीतीजनक घटनांनी प्रभावीत झाले होते आणि अशाप्रकारे जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन नैराश्‍यपूर्ण झाला. मृत्यू आणि जीवनाच्या निरर्थकपणाच्या अस्तित्वात मनुष्याच्या दु:खाचे परीक्षण करण्यावर हा वाद जोर देतो. अस्तित्ववादी लेखक झॉन–पॉल सारट्रे म्हणाले, की देव नसल्यामुळे मनुष्य त्यागलेला आहे आणि तो पूर्णपणे उदासीन विश्‍वात अस्तित्वात आहे.

संशयवाद: याचा असा विश्‍वास आहे की परिक्षण आणि तर्काद्वारे अस्तित्वाबद्दल कोणत्याही उद्देशाप्रत, सार्वत्रिक ज्ञानाप्रत—कोणत्याही सत्याप्रत—पोहंचणे अशक्य आहे.

फलप्रमाण्यवाद: शिक्षण, नीतीमूल्ये आणि राजनीतीला पुर्नआकार देण्यामध्ये ज्या मानवी आस्था आहेत या सारख्यांसोबत आपल्या मतांचा जो व्यावहारिक संबंध आहे केवळ त्यावरूनच त्यांच्या खऱ्‍या मूल्याचा अंदाज लावते. स्वतः सत्याचे काही मूल्य असेल असे ते मुळीच मानत नाही.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा