सत्य मिळालेल्यांसाठी आनंद राखलेला आहे
फिनलँडच्या एका माणसाला त्याच्या घराच्या माळ्यावर युगांची ईश्वरी योजना (इंग्रजी) नावाचे पुस्तक सापडले. त्याने ते सापडताच वाचण्यास सुरवात केली व स्वतःला म्हणाला, ‘हेच, होय हेच सत्य आहे.’ माळ्यावरून खाली उतरल्यावर त्याने आपल्या पत्नीला सांगितले, “मला खरा धर्म मिळाला आहे.”
या माणसाला ज्याप्रकारे सत्य मिळाले त्यामुळे हा अनुभव विलक्षण वाटतो खरा परंतु, पुष्कळ यहोवाचे साक्षीदार अशीच प्रतिक्रिया दाखवल्याचे सांगतील. सत्य मिळाल्यावर जो आनंद होतो त्याबद्दल सर्वजण तुम्हाला सांगू शकतात. पुढील अनुभव ही गोष्ट ठळकपणे मांडतात.
बायबलच्या खऱ्या शिकवणी आनंद आणतात
मार्ग्रेटा कोनीगर, दुसऱ्या जागतिक युद्धादरम्यान म्युनिक, जर्मनीत लहानाची मोठी झाली. बाँम्बचा मारा झालेल्या आणि जळत्या घरांचे दृश्य नेहमीचेच होते. तिचा भाऊ युद्धात ठार झाला. ती कॅथलिक चर्च सेवेला उपस्थित राही तेव्हा जर्मन सैनिक आणि नेता हिटलरसाठी केलेल्या प्रार्थना ऐकत असे. युद्धानंतर तिला, विद्यार्थी–बदली कार्यक्रमाचा एक भाग म्हणून अमेरिकेतील एका महाविद्यालयात शिकण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली. लोक तिच्याबरोबर स्नेही असल्याचे तिला दिसून आले. म्हणून ती विचार करू लागली की शांतीने राहण्याची लोकांची स्वाभाविक इच्छा असताना देखील, युद्धात एकमेकांशी अविश्वासू बनण्यास आणि द्वेष करण्यास ते कशामुळे प्रवृत्त होत असावेत. म्युनिकमध्ये पुन्हा आल्यावर तिचा यहोवाच्या साक्षीदारांसोबत संपर्क आला आणि त्यांच्याबरोबर बायबलच्या अभ्यासाद्वारे तिला तिच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली. ती म्हणते: “या सर्व गोष्टींमध्ये दुरात्मिक शक्तींचा समावेश असल्याचे मला बायबलमधून दाखवण्यात आले . . . बायबल त्यांना ‘जगाचे अधिकारी’ असे संबोधते आणि वास्तविकतेत म्हणते, की सैतान ‘संपूर्ण जगाला ठकवित आहे.’ . . . राष्ट्र आणि लोकांचे अभक्त, राक्षसी कृत्य पाहता हे उत्तर किती तर्कशुद्ध आणि समाधानकारक आहे!—इफिसकर ६:१२; प्रकटीकरण १२:९.
मार्ग्रेटा पुढे म्हणते: ”पृथ्वीच्या समस्या सोडवण्याकरता देवाच्या तरतुदीविषयी शिकून घेतल्याने मला भरपूर आनंद मिळाला. त्या समस्यांचे निरसन, जगीक शिक्षकांनी सुचवलेल्या कोणत्या मानवी कल्पना किंवा प्रशासनाद्वारे होणार नाही. तर, एक नवे स्वर्गीय सरकार पृथ्वीचा कारभार आपल्या ताब्यात घेईल असे बायबल दर्शवते. . . . येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना: ‘तुझे राज्य येवो’ अशी प्रार्थना करावयास शिकवले. . . . मला दिसून आले, की हे राज्य खरोखरचे सरकार आहे आणि केवळ याच्याचद्वारे खरी, जागतिक शांती साध्य करता येईल.” सुमारे ३० वर्षांमध्ये, मार्ग्रेटाने जवळजवळ पाच आफ्रिकन राष्ट्रांमध्ये मिशनरी म्हणून कार्य केले—शेवटली १९ वर्षे तिने वागाडुगू, बुर्किना फॉसो येथील नम्र लोकांना सत्याची घोषणा करण्यात घालवली.
मार्ग्रेटाचा अनुभव असामान्य नाही. युद्धातील दोन्ही विरूद्ध बाजूंकडील ख्रिस्ती धर्मजगताचे पाळक देवाकडे विजय मिळावा म्हणून प्रार्थना करत असल्याचे पाहिल्यावर अनेकांनी अशाचप्रकारे सकारात्मक प्रतिक्रिया दाखवली. मानवी युद्धांमध्ये देवाचा काहीच सहभाग नाही, तर “सगळे जग त्या दुष्टाला वश” झाल्यामुळे ही युद्धे वाढतात हे बायबलचे स्पष्टीकरण तर्कशुद्ध असल्याचे प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना दिसून येते. या सत्य शोधकांना समजते, की खऱ्या ख्रिश्चनांना ‘जगाचा भाग व्हावयाचा नाही’ तर सर्व कारभारात तटस्थ राहायचे आहे. यहोवाच्या साक्षीदारांनी असा पावित्रा घेतला आहे हे जाणल्यावर नव्याने आस्था घेणाऱ्या या लोकांना याची खात्री पटते, की त्यांना सत्य सापडले आहे. देवाने दुष्टाईला अनुमती का दिली आणि तो लवकरच त्याच्या राज्याकरवी या पृथ्वीवर शांतीमय आणि धार्मिक परिस्थिती कशी आणील याबद्दलचे अधिक ज्ञान प्राप्त केल्यावर असे लोक आशेत आणि आनंदात वाढत जातात.—१ योहान ५:१९; योहान १७:१६; मत्तय ६:९, १०.
बायबलची खरी तत्त्वे आनंद आणतात
इक्वादोरच्या दानीएल रोजरो याला वाटले की जीवन अर्थहीन आहे, म्हणून तो मद्यपान करू लागला. तो ज्या चर्चला उपस्थित राहत असे तेथे त्याला शिकवण्यात आले की त्याच्या भविष्यात केवळ मृत्यू आणि ज्वालामय नरक आहे. त्याने म्हटले, “मी नाहीतरी जळून मरणार आहे तर मग मला पिऊ द्या!” त्याच्या कुटुंबात आठ सदस्य होते आणि तो त्यांना काहीच पुरवत नव्हता, शिवाय, तो नेहमी त्याची बायको डेल्यॉ हिच्यासोबत भांडत असे. एके रविवारी सकाळी यहोवाच्या साक्षीदारांनी भेट देऊन त्यांच्याशी बायबलचा अभ्यास चालू केला तेव्हा त्यांना नवे वळण देणारा क्षण आला. दानीएल पहिल्यांदाच यहोवाच्या साक्षीदारांच्या विभागीय संमेलनाला उपस्थित राहिला तेव्हा त्याने ओळखले की त्याला सत्य मिळाले होते. तो म्हणतो: “ती संघटना पाहून मी भारावून गेलो. पुष्कळ लोक एकमेकांसोबत मिळूनमिसळून होते. त्या समुदायात तुम्हाला प्रेम दिसून येत होते. कोणीही धुम्रपान केले नाही. कोणीही गलिच्छ भाषा बोलत नव्हते. . . . ‘हेच सत्य आहे!’ असा मी तेव्हा विचार केल्याचे मला आठवते. मृत्यूचे किंवा जगाच्या अंताच्या भयाने मला भावनिकरीत्या प्रवृत्त केले नाही. तर या संघटनेच्या स्वच्छतेने मला प्रवृत्त केले.”
संपूर्ण रोजरो कुटुंब यहोवाचे साक्षीदार बनले. त्यांनी बायबलची तत्त्वे जसजशी लागू केली तसे त्यांच्या कौटुंबिक जीवनात आणि आर्थिक परिस्थितीत सुधारणा होत गेली. डेल्यॉ रोजरो म्हणते: “मला माहीत आहे की माझ्या जीवनात जितक्या सुधारणा झाल्या त्याबद्दल मी बायबलच्या सत्याची ऋणी आहे. देवाचे वचन नसते तर कोणास ठाऊक माझी मुले आज कुठे असती? ते सातही जण आज बाप्तिस्मा घेतलेले आणि स्थिर आहेत. माझ्यासाठी सत्याचा अर्थ, एक पूर्णपणे नवे जीवन, नवा आनंद ठरला आहे.”
रोजरो कुटुंबाचा अनुभव असामान्य नाही. आपल्या दिवसात अनेकजण समस्यांनी पीडित आहेत. याचे एक कारण हे आहे की, पूर्वीच्या पिढ्यांमध्ये बायबलच्या नैतिक दर्जांना जो आदर दिला जात होता तो आज दिला जात नाही. अनेक धर्मांनी सहिष्णुतेच्या नावाखाली किंवा बदलणाऱ्या काळात जुनी नीतिमूल्ये जुन्या पध्दतीची झाली असे त्यांना वाटत असल्यामुळे ही रीत अनुसरली आहे. म्हणूनच इतरांप्रमाणे, रोजरो कुटुंब बायबलच्या मार्गदर्शनाविना चाचपडत होते. परंतु, जेव्हा अशा नम्र लोकांना नीतिमूल्ये आणि कौटुंबिक जीवनाबद्दलचा देवाचा दृष्टिकोन समजतो, तेव्हा विलंब न लावता ते शिकलेल्या गोष्टींचे अनुकरण करतात. असे केल्यामुळे मिळणारे चांगले प्रतिफळ आपल्याला त्यांच्या कहाणीतून दिसून येतात.
आनंद विकसित केला पाहिजे
तथापि, याचा अर्थ असा होत नाही की एखादा ख्रिस्ती कायम अत्यानंदाच्या स्थितीत असतो. सर्वसामान्यपणे लोक ज्या समस्यांचा सामना करतात जसे की बेरोजगारी, आजारपण आणि मृत्यू यांचा ख्रिश्चनांवर देखील परिणाम होतो. ख्रिश्चनांना देखील त्यांच्या स्वतःच्या अपरिपूर्णतेविरूद्ध आणि दुर्बलतेविरूद्ध सतत लढत द्यावी लागते. बायबलचा वृत्तांत म्हणतो, की लोट सदोम शहरातील ‘अधर्मी लोकांच्या कामातुर वर्तनाने विटला’ होता. अशी दुष्ट परिस्थिती फोफावत असल्याचे पाहताना विश्वासू ख्रिस्ती देखील अशा भावना टाळू शकत नाहीत.—२ पेत्र २:७, ८.
परंतु ज्यांना सत्य मिळाले आहे त्यांना एक फायदा आहे. उदाहरणार्थ, एखादा विश्वासू कोणा प्रिय व्यक्तीच्या मृत्यूमुळे दुःखित झाला असेल, तर त्याला ‘ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखा खेद’ वाटण्याची गरज नाही. त्याचे दुःख कायम नसेल. हीच गोष्ट इतर समस्यांच्या बाबतीतही खरी आहे. ज्या व्यक्तीला सत्य मिळाले आहे तिला माहीत आहे की सध्याची कठीण परिस्थिती तात्पुरती आहे. आशा, ही कठीण काळात सर्व काही सहन करण्यास सोपे करते. शिवाय, समतोल जीवनचर्या देखील मदतदायी ठरते.—१ थेस्सलनीकाकर ४:१३.
पौलाने ख्रिश्चनांना आर्जवले: “प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा; पुन्हा म्हणेन, आनंद करा.” (फिलिप्पैकर ४:४) यावरून हेच दिसते की जर आम्हा सर्वांना आनंद मिळवता येतो तर आनंद न मिळवण्याची देखील शक्यता आहे. या जुन्या व्यवस्थिकरणाच्या चिंता एक अडखळण बनू शकतात. तसेच, बायबल आपल्याला देवाच्या आत्म्याच्या फळातील एक म्हणजेच, आनंद विकसित करण्याची गरज आहे असे सांगते. (गलतीकर ५:२२) तुम्ही सत्याचे ज्ञान सतत घेतले आणि त्यामुळे मिळालेल्या व अजूनही मिळत असलेल्या आध्यात्मिक समृद्धीची आठवण स्वतःला करून दिली, तर तुमचा आनंद कमी होणार नाही. देव जेव्हा लोकांच्या “डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील” व “ह्यापुढे . . . शोक, रडणे व कष्ट” राहणार नाही त्या समयाच्या आपण जसजसे जवळ जातो तसा हा आनंद अधिक बळकट होईल.—प्रकटीकरण २१:४.
[८ पानांवरील चित्रं]
यहोवाच्या साक्षीदारांच्या संमेलनातील आनंद आणि उत्तम व्यवस्था पाहून पुष्कळजण प्रभावीत होतात