वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 ७/१ पृ. ५-८
  • सत्याचा शोध का घ्यावा?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सत्याचा शोध का घ्यावा?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • सापेक्षतावादाची किंमत
  • सत्य काय आहे?
  • सत्यास कार्यात उतरविणे
  • अमूल्य योग्यतेचा ठेवा
  • ख्रिस्ती आत्म्याने व सत्याने उपासना करतात
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • “मी तुझ्या सत्यमार्गाने चालेन”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
  • सत्याच्या देवाचे अनुकरण करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • ‘सत्याच्या मार्गावर चालत राहा’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 ७/१ पृ. ५-८

सत्याचा शोध का घ्यावा?

अनेक धार्मिक संस्था त्यांच्याकडे सत्य असल्याचा दावा करतात आणि इतरांना ते सत्य आतुरतेने सादरही करतात. परंतु त्यांच्या आपापसातच “सत्यांची” गोंधळवून टाकणारी विपुलता असते. सर्व सत्य सापेक्ष आहे, पूर्ण सत्य कोठेच नाही याचा हा आणखी एक पुरावा आहे का? नाही.

काहीवेळा बुद्धिमान लोकही सत्य सापेक्ष आहे असे म्हणतात याबद्दल प्राध्यापक वी. आर. रुजेरो विचार करण्याची कला (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात आश्‍चर्य व्यक्‍त करतात. त्यांनी असा तर्क केला, “जर प्रत्येकाने स्वतःच्या मताप्रमाणे सत्य ठरवले तर मग कोणत्याही व्यक्‍तीची कल्पना दुसऱ्‍यापेक्षा चांगली ठरू शकणार नाही. सर्व सारखेच असले पाहिजेत. आणि जर सर्व कल्पना सारख्याच आहेत तर मग कोणत्याही विषयावर संशोधन करण्याची गरजच काय आहे? पुराणवस्तुशास्त्राच्या प्रश्‍नांची उत्तरे मिळवण्यासाठी जमीन खोदत बसण्याची काय गरज आहे? मध्य पूर्वेतील तंग वातावरणांच्या कारणांची इतकी बारीक तपासणी करण्याची काय गरज आहे? कर्करोगावर उपाय शोधण्याची काय गरज आहे? आकाशगंगेचा शोध करण्याची काय गरज आहे? काही उत्तरे इतरांपेक्षा चांगली असली, सत्य व्यक्‍तिगत दृष्टिकोनांपासून वेगळे व प्रभावीत झालेले नसले तरच, वर नमूद केलेल्या कार्यहालचालींचा काही अर्थ होतो.”

वास्तविक पाहता, सत्य नाही असा कोणी खरोखरच विश्‍वास करत नाही. परंतु औषधे, गणित किंवा भौतिकशास्त्राचे नियम यासारख्या शारीरिक वास्तविकतांच्या बाबतीत मात्र सर्वात कट्टर सापेक्षतावादी देखील काही गोष्टी सत्यच आहेत असा विश्‍वास करतील. वायुगतिशास्त्राचे नियम पूर्ण सत्य आहेत असा आपण विचार केला नसता तर आपल्यातील कोणी विमानात बसण्यास धजले असते का? यथार्थ सत्य अस्तित्वात आहे; ते आपल्या अवतीभोवती आहे आणि आपण त्याच्यावर अवलंबून राहतो.

सापेक्षतावादाची किंमत

परंतु नैतिक क्षेत्रात सापेक्षतावादाच्या चुका अधिक स्पष्ट आहेत, कारण याच क्षेत्रात अशा प्रकारच्या विचारांनी जास्त हानी केली आहे. “ज्ञान किंवा खरे सत्य मानवी रीतीने साध्य करण्याजोगे आहे यावर गंभीरपणे शंका व्यक्‍त केली जाते . . . परंतु, सत्य किंवा ज्ञान हे दोन नमुने, काल्पनिक किंवा हानीकारक म्हणून धिक्कारली जातात तेव्हा मानवी समाजाचा ऱ्‍हास होत जातो हे मात्र निश्‍चित आहे” अशा प्रकारे द एन्सायक्लोपिडिआ अमेरिकाना हा मुद्दा स्पष्ट करतो.

तुम्ही कदाचित हा ऱ्‍हास होत असताना पाहिला असेल. उदाहरणार्थ, लैंगिक अनैतिकता चुकीची आहे अशा बायबलच्या नैतिक शिकवणी स्पष्टपणे सांगतात तेव्हा या शिकवणी आता सत्य म्हणून समजल्या जात नाहीत. स्थिती नीतिशास्त्र—“तुमच्यासाठी काय उचित आहे ते तुम्ही ठरवा”—आजच्या दिवसांतील मत आहे. अशा सापेक्षतावाद दृष्टिकोनामुळे सामाजिक ऱ्‍हास झाला नाही असा कोणी दावा करू शकेल का? निश्‍चितच, जगव्याप्त लैंगिक संक्रमित आजार, विस्कळीत झालेली घरे आणि किशोरवयीन गरोदरपण, नैतिकतेचा ऱ्‍हास झाल्याचा भरपूर पुरावा देते.

सत्य काय आहे?

यास्तव, आपण सापेक्षतावादाचे ते गढूळ पाणी सोडून देऊ आणि बायबल ज्या सत्याच्या शुद्ध पाण्याचे वर्णन करते त्याचे संक्षिप्त रूपात परीक्षण करू. (योहान ४:१४; प्रकटीकरण २२:१७) बायबलमधील “सत्य,” तत्त्वज्ञानी ज्या गूढ, अनाकलनीय शिकवणीवर वादविवाद करीत राहतात त्यासारखे नाही.

येशूच्या जीवनाचा पूर्ण उद्देश सत्याची साक्ष देण्याचा आहे असे त्याने म्हटले तेव्हा, तो विश्‍वासू यहुद्यांनी अनेक शतकांपासून ज्याचे मोल जाणले त्याबद्दल बोलत होता. यहुद्यांनी त्यांच्या पवित्र लिखाणांमध्ये, सैद्धांतिक नव्हे तर खरे “सत्य” याबद्दल अनेक वर्षांपासून वाचले होते. बायबलमध्ये, “ʼएमिथʹ,” या इब्री शब्दाचे भाषांतर “सत्य” असे आहे जे, दृढ, बळकट आणि कदाचित सर्वांहून विश्‍वसनीय याला सूचित करते.

सत्याला त्या दृष्टिकोनातून पाहण्यासाठी यहुद्यांकडे चांगले कारण होते. त्यांनी त्यांचा देव यहोवा याला “सत्यस्वरूप देवा” असे संबोधले. (स्तोत्र ३१:५) कारण यहोवा जे करणार असे म्हणत होता ते सर्व तो पूर्ण करत होता. तो जेव्हा वचन देई तेव्हा तो ते पाळत होता. त्याने जेव्हा भविष्यवाण्या प्रेरित केल्या तेव्हा त्या पूर्ण झाल्या. त्याने अंतिम न्यायदंड घोषित केले तर ते अंमलात आणले जात होते. लाखो इस्राएल लोक या वास्तविकतांचे साक्षी होते. बायबलच्या प्रेरित लेखकांनी त्या वास्तविकता इतिहासाच्या निर्विवाद वास्तविकता म्हणून लिहून ठेवल्या. पवित्र मानल्या जाणाऱ्‍या इतर पुस्तकांपासून भिन्‍न, बायबलची पार्श्‍वभूमी एक मिथ्या किंवा दंतकथा नाही. ते यथार्थ पुराव्यांवर—ऐतिहासिक, पुराणवस्तुशास्त्र, वैज्ञानिक आणि समाजशास्त्रविषयक वास्तविकतांवर दृढपणे आधारलेले आहे. “तुझे नियमशास्त्र सत्य आहे. . . . तुझ्या सर्व आज्ञा सत्य आहेत. . . . तुझे वचन संपूर्णपणे सत्य आहे” असे स्तोत्रकर्त्याने यहोवाबद्दल म्हटले यात काही नवल नाही!—स्तोत्र ११९:१४२, १५१, १६०.

“तुझे वचन हेच सत्य आहे” अशी यहोवाला प्रार्थना करताना येशूने स्तोत्राच्या त्या शब्दांना पुनः उच्चारले. (योहान १७:१७) त्याचा पिता जे काही बोलत असे ते पूर्णपणे अढळ आणि विश्‍वसनीय होते हे येशूला ठाऊक होते. अशाच प्रकारे, येशू “सत्य ह्‍यांनी परिपूर्ण” होता. (योहान १:१४) त्याचे सर्व अनुयायी तो जे काही बोलत होता ते विश्‍वसनीय, सत्य आहे हे प्रत्यक्षात पाहून शिकले आणि ते भावी पिढींसाठी लिहून ठेवले.a

परंतु, येशू पृथ्वीवर सत्य सांगण्यासाठी आला होता असे त्याने पिलाताला सांगितले तेव्हा त्याच्या मनात एक विशिष्ट सत्य होते. “तू राजा आहेस काय?” असा प्रश्‍न पिलाताने येशूला विचारल्यावर त्याचे उत्तर देताना तो हे बोलला होता. (योहान १८:३७) येशू पृथ्वीवर होता तेव्हा, देवाचे राज्य आणि त्या राज्याचा राजा या नात्याने त्याची भूमिका, त्याच्या शिकवणीचा विषय, त्याच्या शिकवणीचा गाभा होता. (लूक ४:४३) हे राज्य यहोवाच्या नावाचे गौरव करील, त्याच्या सार्वभौमत्वाचे समर्थन करील आणि विश्‍वासू मानवजातीला चिरकालिक, आनंदी जीवन पुन्हा देईल हेच “सत्य” आहे ज्याची सर्व प्रामाणिक ख्रिश्‍चनांना आशा आहे. देवाच्या अभिवचनांच्या पूर्णतेमध्ये येशूची इतकी प्रमुख भूमिका असल्यामुळे आणि देवाच्या सर्व भविष्यवाण्या त्याच्यामुळे “आमेन” किंवा खऱ्‍या झाल्यामुळे, “मार्ग, सत्य व जीवन मीच आहे” असे येशू खात्रीने म्हणू शकला.—योहान १४:६; २ करिंथकर १:२०; प्रकटीकरण ३:१४.

या सत्याला पूर्णपणे विश्‍वसनीय समजणे, ख्रिश्‍चनांसाठी आज खूप अर्थपूर्ण आहे. त्याचा अर्थ, देवावरील त्यांचा विश्‍वास आणि त्याच्या अभिवचनांवरील त्यांची आशा वस्तुस्थितींवर, वास्तविकतांवर आधारित आहे असा होतो.

सत्यास कार्यात उतरविणे

बायबल सत्याला कृतीसोबत सांधते यात काही नवल नाही. (१ शमुवेल १२:२४; १ योहान ३:१८) देव-भिरू यहुद्यांसाठी, सत्य तत्त्वज्ञान दृष्टीने विचार करण्याचा विषय नव्हता; तो त्यांचा जीवन मार्ग होता. “सत्य” याकरता असलेल्या इब्री शब्दाचा अर्थ “विश्‍वासूपणा” असा देखील होऊ शकतो आणि तो भरवसालायक व्यक्‍तीचे वर्णन करण्याकरता वापरला जात होता. येशूने आपल्या शिष्यांना त्याच्या दृष्टिकोनातून सत्याकडे पाहण्यास शिकवले. त्याने परूश्‍यांच्या दांभिकपणाला, त्यांच्या स्वधार्मिक शब्दांतील आणि त्यांच्या अधार्मिक कृत्यांतील दरा यांना तीव्रपणे कमी लेखले. तो जे सत्य शिकवत होता त्याच्यानुसार वागून त्याने स्वतःचे उदाहरण मांडले.

तेच ख्रिस्ताच्या सर्व अनुयायांच्या बाबतीत असले पाहिजे. त्यांच्यासाठी, देवाच्या वचनाचे सत्य, येशू ख्रिस्ताच्या आधिपत्याखालील देवाच्या राज्याची उल्हासित करणारी सुवार्ता केवळ माहितीपेक्षा अधिक आहे. ते सत्य त्यांना कृती करण्यास प्रवृत्त करते, त्यानुसार वागण्यास आणि इतरांना सांगण्यास भाग पाडते. (पडताळा यिर्मया २०:९.) पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळीने ख्रिस्ताचे अनुयायी या नात्याने, जो जीवन मार्ग अंगिकारला होता त्याला काही वेळा केवळ ‘सत्य’ किंवा ‘सत्याचा मार्ग’ असे ओळखले जात असे.—२ योहान ४; ३ योहान ४, ८; २ पेत्र २:२.

अमूल्य योग्यतेचा ठेवा

देवाच्या वचनाचे सत्य स्वीकारल्यामुळे आपल्याला काही किंमत द्यावी लागते हे मात्र खरे आहे. पहिली किंमत म्हणजे, सुरवातीला सत्य शिकणे हा एक जबरदस्त अनुभव असू शकतो. “सत्य बहुधा अप्रिय असते कारण ते कलुषितपणा किंवा मिथ्याला समर्थन देण्यात अपयशी ठरते” असे द एन्सायक्लोपिडिआ अमेरिकाना निरीक्षण करतो. आपले विश्‍वास खोटे असल्याचे उघड झाल्यावर, विशेषकरून आपल्याला विश्‍वासू धार्मिक नेत्यांकडून शिक्षण प्राप्त झाले असल्यास, आपला भ्रमनिरास होऊ शकतो. काही जण या अनुभवाची तुलना, विश्‍वासू पालक खरे पाहता गुप्त गुन्हेगार आढळून आले याजशी करतील. परंतु मग चुकीच्या समजुतीखाली जीवन जगण्यापेक्षा धार्मिक सत्य शोधून काढणे बरे नव्हे का? लबाडीचे गुलाम होण्यापेक्षा वस्तुस्थिती जाणून घेणे चांगले नव्हे का?b—पडताळा योहान ८:३२; रोमकर ३:४.

धार्मिक सत्यानुसार वागावे लागत असल्यामुळे, पूर्वी जे आपले मित्र होते त्यांना गमावणे ही दुसरी किंमत आहे. “देवाच्या खरेपणाची लबाडीशी अदलाबदल” करणाऱ्‍या बहुतांश लोकांच्या या जगात, देवाच्या वचनाच्या सत्यानुसार वागणारे लोक वेगळेच दिसतात आणि काही वेळा त्यांना धिक्कारले जाते किंवा त्यांच्याबद्दलची गैरसमजूत होते.—रोमकर १:२५; १ पेत्र ४:४.

परंतु सत्य या दुहेरी किंमतीच्या योग्यतेचे आहे. सत्य समजल्यावर आपण लबाडी, गैरसमज आणि अंधश्रद्धा यांच्यापासून मुक्‍त होतो. आणि आपण त्याच्यानुसार वागतो तेव्हा, सत्य आपल्याला संकटे सहन करण्यास बळकट करते. देवाचे सत्य इतके विश्‍वसनीय आणि समर्थनीय आहे, तसेच ते आपल्यामध्ये इतकी आशा उत्तेजित करते, की आपल्याला परीक्षेच्या काळात दृढ राहण्यास मदत करते. म्हणूनच तर, प्रेषित पौलाने सत्याची तुलना, युद्धाच्या समयी सैनिक जो पसरट, चिवट चामडी पट्टा किंवा मेखला वापरत असे त्याच्याशी केली!—इफिसकर ६:१३, १४.

बायबलमधील नीतीसूत्र म्हणते: “सत्य, सुज्ञता, शिक्षण व समंजसपणा ही विकत घे, विकू नको.” (नीतीसूत्रे २३:२३) सत्याला सापेक्ष किंवा अस्तित्वात नाही असे म्हणून नाकारणे म्हणजे, जीवन जे सर्वात थरारक आणि पूर्ण होणारे ध्येय सादर करते त्याला मुकणे होय. सत्य मिळवणे म्हणजे आशा मिळवणे; ते जाणून घेऊन त्यावर प्रीती करणे म्हणजे विश्‍वाच्या निर्माणकर्त्याला आणि त्याच्या एकुलत्या एका पुत्राला जाणणे व प्रीती करणे; त्याच्यानुसार वागणे म्हणजे, आता आणि चिरकालासाठी उद्देशयुक्‍त आणि मनाच्या शांतीने जीवन जगणे होय.—नीतीसूत्रे २:१-५; जखऱ्‍या ८:१९; योहान १७:३.

[तळटीपा]

a शुभवर्तमानाच्या अहवालांमध्ये ७० ठिकाणी, येशूने त्याच्या शब्दांच्या सत्यतेवर जोर देण्यासाठी एक असामान्य अभिव्यक्‍ती वापरली आहे. एखादे वाक्य बोलण्याआधी तो नेहमी “आमेन” (“खरोखर,” NW) म्हणत असे. त्याच्या तत्सम इब्री शब्दाचा अर्थ “निश्‍चित, खरे” असा होता. द न्यू इंटरनॅशनल डिक्शनरी ऑफ द न्यू टेस्टमेंट थिओलॉजी अशी नोंद करते: “आमेनने शब्दांची सुरवात करण्याद्वारे येशूने, ते निश्‍चित आणि विश्‍वसनीय असल्याचे दाखवून दिले. तो त्यांच्याप्रमाणे वागला आणि त्याने स्वतःसाठी व त्याचे ऐकणाऱ्‍यांसाठी त्या शब्दांना बंधनकारक बनवले. ते त्याच्या ऐश्‍वर्याच्या व अधिकाराच्या अभिव्यक्‍ती आहेत.”

b “सत्य” यासाठी असलेला ग्रीक शब्द अ·लेʹथि·आ, “झाकलेले नाही” असा अर्थ असलेल्या शब्दातून येतो; म्हणून सत्यामध्ये, पूर्वी गुप्त असलेल्या गोष्टींचे प्रकट होणे गोवलेले आहे.—पडताळा लूक १२:२.

[६ पानांवरील चौकट]

सत्य कधी बदलते का?

वी. आर. रुजेरो यांनी विचार करण्याची कला (इंग्रजी) या त्यांच्या पुस्तकात वरील मनोरंजक प्रश्‍न विचारला होता. त्यांनी नाही असे उत्तर दिले. ते सविस्तर रीतीने असे म्हणतात: “काही वेळा ते बदलल्यासारखे वाटेल खरे परंतु त्याचे जवळून परीक्षण केल्यानंतर असे दिसते, की ते बदललेले नाही.”

ते म्हणतात, “बायबलचे पहिले पुस्तक उत्पत्ती याच्या लेखकत्वाचीच गोष्ट विचारात घ्या.” अनेक शतकांपर्यंत ख्रिस्ती आणि यहुद्यांचे मत होते, की या पुस्तकाचा एकच लेखक होता. कालांतराने या दृष्टिकोनावर शंका घेतली जाऊ लागली आणि सरतेशेवटी उत्पत्तीचे लिखाण करण्यासाठी पाच लेखकांनी हातभार लावला होता हा दृष्टिकोन बदलला. मग १९८१ मध्ये, उत्पत्तीच्या भाषेसंबंधीच्या ५ वर्षांच्या पृथक्करणाचा निकाल प्रकाशित करण्यात आला, ज्यामध्ये पूर्वी विचार केल्याप्रमाणे एकच लेखक असण्याची ८२ टक्के शक्यता आहे असे लिहिण्यात आले होते.

“उत्पत्तीच्या लेखकत्वाबद्दलचे सत्य बदलले का? नाही. केवळ आमचे विचार बदलले आहेत. . . . आपल्या ज्ञानाने किंवा अज्ञानाने सत्य कधीच बदलले जाणार नाही.”

[७ पानांवरील चौकट]

सत्यासाठी आदर

“सत्यासाठी असलेला आदर आमच्या युगाचा कृत्रिम दुष्टपणा नाही जो सर्वकाही उघड करण्याचा प्रयत्न करतो अशा विश्‍वास ठेवून, की कोणीही त्यांच्याजवळ सत्य असल्याचा प्रामाणिकपणे दावा करू शकत नाही. सत्य खरोखर मिळू शकते या आनंदी आत्मविश्‍वासाचा कधीही व कोठेही आढळणाऱ्‍या सत्याला दाखवलेली नम्रतापूर्वक अधीनता याजशी मेळ घालणारी ती मनोवृत्ती आहे. जे लोक सत्य देवाची उपासना करतात अशांना सत्याच्या बाबतीत मोकळ्या मनाचे असावयास हवे; उलटपक्षी, सत्याचा आदर केल्याने एखादा मानव त्याच्या शेजाऱ्‍यांसोबत व्यवहार करताना त्याच्या बोलण्यात आणि कृतीत इमानदार असेल अशी खात्री मिळते. आपण पाहिलेल्या या मनोवृत्तीला जु[ना] करार आणि न[वा] करार साक्ष देतात.”—द न्यू इंटरनॅशनल डिक्शनरी ऑफ द न्यू टेस्टमेंट थिओलॉजी, खंड ३, पृष्ठ ९०१.

[७ पानांवरील चित्रं]

वैज्ञानिक प्रगती ही वैज्ञानिक सत्यांना प्रकट करण्यावर आधारलेली आहे

[८ पानांवरील चित्रं]

सत्यामध्ये राज्य आणि त्याच्या आशीर्वादांचा समावेश होतो

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा