धर्माची चर्चा केल्याने काय फायदा आहे?
पालक त्यांच्या बाळाचे पहिले शब्द ऐकण्यास उत्सुक असतात. “आई” किंवा “बाबा” असे ते नव्यानेच बोलू लागते तेव्हा त्यांचे हृदय आनंदाने उचंबळून येते. लगेचच, ते त्यांच्या मित्रांना आणि शेजाऱ्यांना त्याबद्दल सांगतात. बाळाचे पहिले बोलणे खरोखरच आनंदविणारी सुवार्ता आहे.
त्या चिमुकल्याचे ज्ञानेन्द्रिय, आवाज, दृष्टी आणि सुवास याला प्रतिसाद देतात. अर्थात, प्रतिसाद वेगवेगळे असतात. परंतु, काही काळानंतर एखादे बाळ या उद्दीपनाच्या प्रतिसादाला साद देत नसल्यास त्यांच्या बाळाची वाढ कदाचित दुर्बल होऊ शकते अशी पालकांना यथायोग्यपणे काळजी वाटेल.
लहान मुले त्यांच्या ओळखीच्या लोकांना उत्तम प्रतिसाद देतात. जेव्हा आई आपल्या बाळाला कुरवाळते तेव्हा अनेकदा ते मनमोकळेपणाने हसते. परंतु, भेट देण्यास आलेल्या एखाद्या नातेवाईकाने त्याला हात लावल्यास लगेचच त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात किंवा त्याला घेण्याचा प्रयत्न केला तर ते लगेचच प्रतिकार करते. बहुतेक नातेवाईकांना असा अनुभव आल्यास ते त्याच्याजवळ जाण्याचे थांबवत नाहीत. ते बाळ त्यांना जसजसे ओळखू लागते तसे अनोळखीपणाचे अडखळण नाहीसे होऊन बाळ त्यांच्याकडे बघून हसू लागते.
त्याचप्रकारे, पुष्कळ प्रौढ त्यांच्या धार्मिक विश्वासांची चर्चा केवळ तोंड ओळख असणाऱ्यांसोबत उघडपणे करण्यास मागे पुढे करतात. एक परकी व्यक्ती त्यांच्यासोबत व्यक्तिगत बाब असलेल्या—धर्माची चर्चा का करू इच्छिते हे त्यांना कळणार नाही. याच्या परिणामात ते त्यांच्यामध्ये आणि निमार्णकर्त्याविषयी त्यांच्याशी बोलणाऱ्यामध्ये अडखळण येऊ देतात. मानवजातीचा जन्मसिद्ध गुण म्हणजेच, उपासना करण्याची इच्छा याविषयी चर्चा करण्यास देखील ते शेवटी नकार देतात.
खरे पाहता, आपण आपल्या निर्माणकर्त्याविषयी शिकण्यात रस घेतला पाहिजे आणि इतरांबरोबर त्याची चर्चा केल्यानेच आपण शिकू शकतो. हे असे आहे कारण, देवाचा उघडपणे संभाषण करण्याशी संबंध आहे. ते कसे आपण पाहू या.
‘ऐका आणि शिका’
देवाचे एदेन बागेतील एका मानवासोबत, आदामासोबत पहिले दळणवळण होते. आदाम आणि हव्वेने पाप केल्यानंतर देखील देवाने त्यांना बोलावले व तो त्यांच्याबरोबर पुढे दळणवळण करू इच्छित होता, पण तेव्हा ते लपून राहिले. (उत्पत्ती ३:८-१३) परंतु बायबलमध्ये, देवासोबतचे दळणवळण स्वीकारलेल्या पुरूष आणि महिलांच्या सविस्तर माहितीची नोंद करून ठेवली आहे.
देवाने नोहाला त्याच्या दिवसातील दुष्ट जगाच्या जवळ येऊन ठेपलेल्या नाशाबद्दल सांगितले आणि त्यानंतर नोहा “नीतिमत्त्वाचा उपदेशक” झाला. (२ पेत्र २:५) नोहाने त्याच्या पिढीसमोर देवाचा प्रवक्ता या नात्याने केवळ मनुष्यासोबत देवाच्या व्यवहारावर विश्वास प्रकट केला नाही, तर स्वतः यहोवाच्या बाजूने असल्याचे जाहीरपणे घोषित केले. याबाबतीत नोहाने लोकांकडून कोणता प्रतिसाद पाहिला? दुःखाची गोष्ट म्हणजे, त्याच्या बहुतेक समकालिन लोकांना ‘जलप्रलयाने येऊन त्या सर्वांस वाहवून नेईपर्यंत समजले नाही.’ (मत्तय २४:३७-३९) परंतु आपल्यासाठी आनंदाची बातमी, कारण नोहाच्या कुटुंबाच्या सात सदस्यांनी ऐकले; देवाच्या सूचनांचे पालन केले व विश्वव्यापी जलप्रलयातून बचावले. आज जिवंत असलेले सर्व मानव त्यांच्यापासून उत्पन्न झाले आहेत.
नंतर, देवाने लोकांचे एक संपूर्ण राष्ट्र, प्राचीन इस्राएलसोबत दळणवळण राखले. मोशेद्वारे देवाने त्यांना दहा आज्ञा आणि त्यासारखे ६०० इतर बंधनकारक नियम दिले. इस्राएलांनी त्या सर्वांचे पालन करावे अशी यहोवाने अपेक्षा केली. मोशेने सुचवले, की दर सात वर्षांच्या अखेरीस, वार्षिक मांडवाच्या सणादरम्यान देवाचे नियमशास्त्र मोठ्याने वाचले जावे. त्याने म्हटले, “सर्व लोकांना म्हणजे पुरुष, स्त्रिया, बालके आणि तुझ्या नगरातला उपरी ह्यांना जमव.” कोणत्या उद्देशास्तव? “म्हणजे ते ऐकून शिकतील आणि तुमचा देव परमेश्वर [यहोवा, NW] ह्याचे भय धरतील आणि ह्या नियमशास्त्रातील सर्व वचने काळजीपूर्वक पाळतील.” सर्वांना ऐकायचे व शिकायचे होते. ते जे ऐकत त्याची चर्चा करण्यात त्यांना किती आनंद होत असेल याची जरा कल्पना करा!—अनुवाद ३१:१०-१२.
पाच पेक्षा अधिक शतकांनंतर, यहुदी राजा यहोशफाटने यहोवाची शुद्ध उपासना पुन्हा चालू करण्याच्या मोहिमेसाठी राजपुत्र आणि लेवीयांची व्यवस्था केली. हे लोक यहुदाच्या शहरांमधून सर्व रहिवाश्यांना यहोवाच्या नियमांविषयी शिकवत प्रवास करीत होते. या नियमांची सार्वजनिक चर्चा करण्याद्वारे राजाने खऱ्या उपासनेबद्दल त्याचे धैर्य प्रदर्शित केले. त्याच्या प्रजेला मात्र ऐकायचे व शिकायचे होते.—२ इतिहास १७:१-६, ९.
चर्चेद्वारे साक्ष देणे
देवाने त्याचा स्वतःचा पुत्र, येशूला त्याचा प्रवक्ता म्हणून पृथ्वीवर पाठवले. (योहान १:१४) येशूचे रूपांतर झाले तेव्हा तीन शिष्यांनी त्याला प्रत्यक्षात पाहिले आणि त्यांनी देवाच्या स्वतःच्या वाणीला असे घोषित करताना ऐकले की: “हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, ह्याविषयी मी संतुष्ट आहे; ह्याचे तुम्ही ऐका.” (मत्तय १७:५) त्यांनी खुशीने आज्ञा मानली.
त्याचप्रकारे, येशूने त्याच्या प्रेषितांस इतरांना देवाच्या उद्देशांबद्दल सांगण्याचे निर्देशन दिले. परंतु पृथ्वीवर त्याची केवळ सहा महिन्यांची सेवा राहिली होती तेव्हा येशू म्हणाला, की स्वर्गीय राज्याचे प्रचारकार्य इतके प्रचंड होते, की आणखी शिष्यांची गरज लागणार होती. त्याने ७० लोकांना देवाच्या राज्याची चर्चा अनोळख्यांबरोबर कशी करावी ते शिकवले आणि तो संदेश जाहीर करण्यासाठी त्यांना पाठवून दिले. (लूक १०:१, २, ९) स्वर्गातील त्याच्या पित्याकडे जाण्याच्या काही काळाआधी, येशूने त्याच्या शिष्यांना या संदेशाविषयी इतरांसोबत बोलणी करण्यास पुढाकार घेण्यास आर्जवले आणि त्यांना अशी आज्ञा देखील दिली: “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकास शिष्य करा; . . . जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यास पाळावयास शिकवा.” (मत्तय २८:१९, २०) संपूर्ण विश्वभर, खरे ख्रिस्ती आज, त्यांच्या शेजाऱ्यांसोबत देवाच्या राज्याच्या सुवार्तेची चर्चा करून ही नेमणूक पूर्ण करत आहेत. या चर्चा त्यांना निर्माणकर्ता यहोवा याच्या सत्याची साक्ष देण्यास बळकट करतात.—मत्तय २४:१४.
शांतीदायक, उभारणीकारक चर्चा
येशूच्या शिष्यांना इतरांसोबत त्यांच्या विश्वासांची चर्चा कशाप्रकारे करावयाची होती? त्यांना विरोध करणाऱ्यांना चिरडीस आणावयाचे नव्हते किंवा त्यांच्यासोबत वादही घालावयाचा नव्हता. उलट, जे सुवार्ता स्वीकारतात अशांना शोधायचे होते आणि मग ते त्याला आधार म्हणून शास्त्रवचनीय पुरावा सादर करत असत. निश्चितच, देव त्याच्या पुत्राच्या शिष्यांशी ज्यांचा संपर्क आला त्या लोकांची प्रतिक्रिया पाहत होता, शिवाय येशू म्हणाला: “जो तुम्हास स्वीकारितो, तो मला स्वीकारितो आणि जो मला स्वीकारितो तो ज्याने मला पाठविले त्याला स्वीकारितो.” (मत्तय १०:४०) येशूच्या बहुतेक समकालीन लोकांनी त्याचा संदेश नाकारला म्हणजेच तो देवाचा किती तीव्र नकार होता!
ख्रिस्ती प्रेषित पौलाने सल्ला दिला, “प्रभूच्या दासाने भांडू नये,” तर “त्याने सर्वांबरोबर सौम्य, शिकविण्यात निपुण, सहनशील, विरोध करणाऱ्यांना सौम्यतेने शिक्षण देणारा, असे असावे; कदाचित देव त्यांना सत्याचे ज्ञान होण्यासाठी पश्चात्तापबुद्धि देईल.” (२ तीमथ्य २:२४, २५) अथेन्स्, ग्रीसमधील लोकांना सुवार्तेचा प्रचार करण्याची पौलाची पद्धत उत्तम उदाहरण पुरवते. त्याने यहुद्यांबरोबर त्यांच्या सभास्थानात युक्तीवाद केला. बाजारात “जे त्याला आढळत त्यांच्याबरोबर” तो दररोज बोलत असे. काहींना केवळ नव्या कल्पना ऐकावयास आवडत असल्या तरी पौल त्यांच्याशी थेट व प्रेमळपणे बोलला यात काही शंका नाही. त्याने त्याचे ऐकणाऱ्यांबरोबर देवाच्या संदेशाची चर्चा केली ज्यामुळे ते पश्चात्ताप करण्यास प्रवृत्त झाले. त्यांची प्रतिक्रिया काहीशी आजच्या लोकांप्रमाणेच होती. “कित्येक थट्टा करू लागले. कित्येक म्हणाले, ह्याविषयी आम्ही तुमचे पुन्हा आणखी ऐकू.” पौल त्याची चर्चा लांबवण्याचा आग्रह करत नव्हता. त्याच्या संदेशाचा प्रचार केल्यानंतर तो “त्यांच्यामधून निघून गेला.”—प्रेषितांची कृत्ये १७:१६-३४.
नंतर, पौलाने इफिसमधील ख्रिस्ती मंडळीच्या सदस्यांना सांगितले, की त्याने ‘जे हितकारक ते सांगण्यात आणि चार लोकांत व घरोघरी शिकविण्यात कसूर केली नाही.’ शिवाय त्याने ‘पश्चात्ताप करून देवाकडे वळणे व प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे ह्यासंबंधाने यहुदी व हेल्लेणी ह्यांस साक्ष दिली.’—प्रेषितांची कृत्ये २०:२०, २१.
ही शास्त्रवचनीय उदाहरणे बायबलच्या काळातील देवाच्या विश्वासू सेवकांनी धर्माची चर्चा कशी केली ते प्रकट करतात. यास्तव, आज यहोवाचे साक्षीदार त्यांच्या शेजाऱ्यांबरोबर आज्ञाधारकपणे धर्माची चर्चा करतात.
फलदायी चर्चा
‘देवाचे वचन ऐका.’ ‘त्याच्या आज्ञांकडे लक्ष द्या.’ बायबलमध्ये अशाप्रकारचे प्रबोधन कितींदा पाहण्यास मिळते! यहोवाचे साक्षीदार पुढील वेळी तुमच्यासोबत बोलतील तेव्हा तुम्ही या बायबलच्या मार्गदर्शनांना प्रतिसाद देऊ शकता. ते तुमच्याकडे बायबलचा संदेश आणतात तेव्हा त्यांचे ऐका. हा संदेश राजकीय नसून ते देवाचे राज्य म्हणजे एका स्वर्गीय सरकाराचे समर्थन करते. सध्याच्या दिवसातील झगड्यांना कारणीभूत असलेल्या गोष्टींना काढून टाकण्याचे ते देवाचे एक माध्यम आहे. (दानीएल २:४४) त्यानंतर स्वर्गातून देवाचे हे शासन, संपूर्ण पृथ्वीला एदेन बागेसारख्या परादीसमध्ये रूपांतर करण्याची व्यवस्था करील.
पूर्वी एक गुप्त पोलिस, यहोवाचे साक्षीदार त्याच्याबरोबर बायबलबद्दल बोलण्यास येत तेव्हा तो नेहमी त्यांचे ऐकण्यास नकार देत असे. परंतु वाढत्या गुन्हेगारीचा सामना करावा लागत असल्यामुळे तो जीवनाच्या वस्तुस्थितींमुळे निराश झाला. यास्तव पुढील वेळी एक साक्षीदार त्याच्याबरोबर बोलण्यासाठी आला तेव्हा त्याने त्याला सांगितले, की तो बायबलच्या संदेशाच्या पुराव्याची तपासणी करील. त्यानंतर नियमितपणे चर्चा होऊ लागल्या. त्या पोलिसाने पुष्कळ वेळा त्याचे घर बदलले तरी प्रत्येक वेळा साक्षीदारांनी चर्चा चालू ठेवण्यासाठी त्याचे नवीन घर आनंदाने शोधून काढले. शेवटी त्या अधिकाऱ्याने कबूल केले: “मी जो पुरावा शोधत होतो तो ठीक पवित्र शास्त्रवचनातच होता. त्या साक्षीदारांनी माझ्यासोबत बोलत राहण्याचा यत्न केलाच नसता तर मी अजूनही जगामध्ये जीवनाचा काय अर्थ आहे याचा विचार करत राहिलो असतो. वास्तविक पाहता, मला सत्य समजले आहे आणि माझ्याप्रमाणेच जे लोक देवाचा शोध करीत आहेत अशांना शोधण्यास मी माझे उरलेले सर्व आयुष्य व्यतीत करणार आहे.”
आस्थेने ऐकणाऱ्यांना खरोखरच आणखी जाणून घ्यायची इच्छा असते. सादर केलेल्या विश्वासांच्या कारणांची ते यथायोग्यपणे अपेक्षा करतात. (१ पेत्र ३:१५) एखादे लहान मूल जसे त्याच्या पालकांवर प्रश्नांचा बडिमार करून त्यांच्याकडून उत्तराची अपेक्षा करते, त्याचप्रमाणे साक्षीदारांकडून तुम्ही देखील ठोस उत्तरांची यथायोग्यपणे अपेक्षा करा. ते तुमच्याकडे पुन्हा येतील आणि बायबलच्या संदेशाची चर्चा तुमच्यासोबत करतील याची तुम्ही खात्री बाळगू शकता.
तुम्हाला कदाचित बायबलविषयी आधीच थोडीशी माहिती असेल. तुम्हाला जाणवेल, की देव तुमच्याकडून जे अपेक्षितो ते तुमच्या जीवनात काही बदल करण्यास तुम्हाला भाग पाडेल. देवाच्या इच्छेनुरूप बदल केल्याने तुम्हाला पुष्कळ त्याग करावा लागेल अशी भीती मनात ठेवून माहिती घेत राहण्यासाठी काकू करू नका. ह्या माहितीमुळे तुम्हाला खरा आनंद प्राप्त होईल. एका वेळी एक असे पाऊल उचलत तुम्ही जशी प्रगती करत जाता तसे तुम्हाला हे समजू लागेल.
पहिल्यांदा, यहोवा कोण आहे, तो तुमच्याकडून काय अपेक्षितो आणि तो तुम्हाला काय देणार आहे याचा विचार करा. याविषयी बायबल काय म्हणते ते साक्षीदारांना दाखवण्यास सांगा. ते जे काही सांगतात ते तुमच्या बायबलमधून पडताळून पहा. साक्षीदार धर्माबद्दलचे सत्य सादर करण्यात योग्य आहेत हे एकदा तुम्हाला कळाल्यावर, तुमच्यासोबत ते शास्त्रवचनातून ज्या गोष्टींचा सहभाग करू शकतील अशा उत्तम गोष्टी खोदून काढाव्याशा तुम्हाला वाटतील यात शंकाच नाही.—नीतीसूत्रे २७:१७.
साक्षीदारांना भेटण्याचे स्थानिक ठिकाण, म्हणजेच राज्य सभागृहात त्यांचे परीक्षण करण्यासाठी तुमचे स्वागत असो. तेथे तुम्हाला देवाच्या वचनातील फायदेकारक चर्चा ऐकावयास मिळतील. तेथे उपस्थित असलेले एकमेकांसोबत देवाच्या उद्देशांबद्दल बोलण्यासाठी कसे आनंदी आहेत हे तुम्हाला पाहावयास मिळेल. आज आमच्याबद्दल देवाची इच्छा काय आहे त्याचे सत्य तुम्हाला शिकवण्यासाठी साक्षीदारांना अनुमती द्या. खऱ्या उपासनेची चर्चा करण्याच्या देवाच्या आमंत्रणाला प्रतिसाद द्या आणि मग त्याचे स्वीकृतीचे स्मित, तसेच परादीसमधील चिरकालिक जीवन प्राप्त करा.—मलाखी ३:१६; योहान १७:३.
[५ पानांवरील चित्रं]
नोहा, देवाच्या उद्देशांबद्दल उघडपणे बोलला
[७ पानांवरील चित्रं]
पौलाने प्राचीन अथेन्समध्ये केल्याप्रमाणे, यहोवाचे साक्षीदार इतरांना बायबलचे सत्य शिकवतात