राज्य घोषकांचा वृत्तांत
खडतर काळात प्रचार करणे
प्रेषित पौलाने भाकीत केले, की “शेवटल्या काळी कठीण दिवस येतील.” (२ तीमथ्य ३:१) हे शब्द किती अचूक ठरले आहेत! मध्य अमेरिकेतील एल साल्वादोरचे लोक फार पूर्वीपासून ही कटू वस्तुस्थिती अनुभवत आहेत. एक दशकापेक्षा अधिक काळासाठी ते राष्ट्र यादवी युद्धात गोवले होते. या युद्धामुळे हजारो लोकांवर हालअपेष्टा आणि मृत्यू ओढवला. आता युद्ध समाप्त झाले असले, तरी हालअपेष्टा तशीच आहे. युद्धानंतर गुन्हेगारी भयंकर वाढली आहे. दूरचित्रवाणीच्या एका स्थानिक भाष्यकाराने अलिकडेच म्हटले: “हिंसा आणि चोरी दररोजच्या घटना बनल्या आहेत.”
यहोवाचे साक्षीदार हिंसेच्या या लाटेपासून बचावले नाहीत. अनेक राज्य सभागृहांमध्ये लुटारू घुसले आणि ध्वनिसाहित्य चोरून नेले. पुष्कळ प्रसंगी ख्रिस्ती सभा चालू असताना शस्त्रधारी तरुणांच्या टोळ्या राज्य सभागृहात शिरल्या आणि उपस्थित असलेल्यांकडून पैसे, घड्याळे आणि इतर मौल्यवान वस्तु चोरून नेल्या. पुष्कळ साक्षीदार त्यांची दैनंदिन कामे करत असताना चोरांकडून ठार मारले गेले.
इतकी अडखळणे असताना देखील, एल साल्वादोरमधील यहोवाचे साक्षीदार राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्यात परिश्रमाने कार्य करत आहेत. “प्रथम सर्व राष्ट्रात सुवार्तेची घोषणा झाली पाहिजे,” या शास्त्रवचनीय आज्ञेनुरूप ते तसे करतात. या देशातील पुष्कळ लोकांना बायबलमधील राज्य आशेची ओढ लागली आहे आणि साक्षीदार अशा प्रत्येकांपर्यंत पोहंचण्याचा प्रयत्न करत आहेत. अनौपचारिक साक्षकार्य प्रचाराची परिणामकारी पद्धत ठरत आहे.
एक साक्षीदार इस्पितळात वैद्यकीय उपचार घेत असताना, बायबलमध्ये भवितव्यासाठी मिळणाऱ्या देवाच्या अभिवचनांबद्दल इतर रुग्णांबरोबर बोलण्याच्या प्रत्येक संधीचा फायदा घेत होता. गंभीररीत्या आजारी असलेल्या एका रुग्णाने दुःखातिशयाने म्हटले: “मी फार लवकर मरणार आहे!” परंतु त्या रुग्णाचा निस्तेज चेहरा पाहिल्यावर देवाच्या राज्याची सुवार्ता त्याला सांगण्यास साक्षीदार निरूत्साहीत झाला नाही. तर त्याने त्याला यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल पुस्तकातून मोठ्याने वाचून दाखवले. तो माणूस त्याची शेवटली घटिका मोजत असेल असा विचार करून काही दिवसांनंतर साक्षीदाराने ते इस्पितळ सोडले.
चार वर्षांनंतर त्याच साक्षीदाराला एका दुसऱ्या इस्पितळात वैद्यकीय उपचार घ्यायचा होता. तो तेथे असताना एक रुग्ण त्याच्याकडे आला आणि म्हणाला: “मला ओळखलं का?” चार वर्षांपूर्वी मरणाच्या पंथास लागलेला तो मनुष्य साक्षीदाराला भेटला होता! त्या माणसाने साक्षीदाराला आलिंगन दिले व “मी पण आता यहोवाचा एक साक्षीदार आहे!” असे म्हटले तेव्हा ते किती आनंदाचे व आश्चर्यकारक होते. त्या मनुष्याने भविष्याबद्दलच्या बायबलमधील आशेचा स्वीकार केला, यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास केला आणि यहोवाला त्याचे जीवन समर्पित केले होते. तो केवळ एक साक्षीदारच नव्हता तर दोन वर्षांपासून नियमित पायनियर म्हणून पूर्ण वेळेच्या सेवेत भाग घेत होता.
या घटनेत, अनौपचारिक साक्षकार्यादरम्यान पेरलेले सत्याचे बीज प्रतिसादात्मक अंतःकरणापर्यंत पोहंचले होते. लोकांना सत्याच्या ज्ञानाप्रत आणण्याचा हा विशेषाधिकार खऱ्या ख्रिश्चनांना या ‘कठीण दिवसांमध्येही’ प्रचार कार्य करत राहण्यास भाग पाडते.