“हे लहान कळपा, भिऊ नको”
“हे लहान कळपा, भिऊ नको; कारण तुम्हास ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे.” —लूक १२:३२.
१. “हे लहान कळपा, भिऊ नको” या येशूच्या शब्दांचा कोणता आधार होता?
‘देवाचे राज्य मिळवण्यास झटा.’ (लूक १२:३१) येशूने त्याच्या शिष्यांना असे सांगितले तेव्हा, त्याच्या दिवसापासून आता आपल्या दिवसांपर्यंत, खिश्चनांच्या विचारशक्तीस मार्गदर्शित केलेले तत्त्व त्याने व्यक्त केले. देवाच्या राज्याला आपल्या जीवनात सर्वात प्रथम स्थान असले पाहिजे. (मत्तय ६:३३) तथापि, लूकच्या अहवालात, येशू खिश्चनांच्या एका खास गटाला प्रेमपूर्ण आणि धीर देणारे शब्द उद्गारतो. तो म्हणाला: “हे लहान कळपा, भिऊ नको; कारण तुम्हास ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे.” (लूक १२:३२) उत्तम मेंढपाळ या नात्याने, आपल्या जिवलग शिष्यांना पुढे कठीण दिवस असतील हे येशूला ठाऊक होते. परंतु देवाचे राज्य मिळवण्यास ते झटत राहिल्यास त्यांना भयाचे काहीच कारण नव्हते. यास्तव, येशूचे आर्जवणे कठोर आज्ञा नव्हती. त्याउलट, आत्मविश्वास आणि धैर्याला प्रेरित करणारे ते एक प्रेमळ अभिवचन होते.
२. लहान कळप कोणाचा मिळून बनला आहे आणि ते विशेषकरून सुहक्क प्राप्त झालेले का आहेत?
२ येशू त्याच्या शिष्यांशी बोलत होता आणि त्याने त्यांना ‘लहान कळप’ असे संबोधले. यहोवा ज्यांना ‘राज्य देईल’ अशांसोबतही तो बोलत होता. नंतर येशूला स्वीकारणाऱ्या मोठ्या समुदायांच्या तुलनेत, या गटाची संख्या निश्चितच कमी होती. त्यांची निवड एका विलक्षणीय भवितव्यासाठी म्हणजेच राजकीय सेवेत वापरण्यासाठी करण्यात आली होती म्हणून त्यांना बहुमोल देखील समजले गेले. त्यांचा पिता, महान मेंढपाळ यहोवा, लहान कळपाला खिस्ताच्या मशीही राज्याच्या संदर्भात स्वर्गीय वारसा मिळवण्याच्या हेतूने बोलावतो.
लहान कळप
३. योहानाने लहान कळपाचा कोणता भव्य दृष्टांत पाहिला?
३ असे सुंदर भवितव्य असणारा हा लहान कळप कोणाचा मिळून बनला आहे? पवित्र आत्म्याने अभिषेक प्राप्त होणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या अनुयायांचा. (प्रेषितांची कृत्ये २:१-४) त्यांच्या हातात वीणा असून त्यांना स्वर्गीय गायक या नात्याने पाहून, प्रेषित योहानाने लिहिले: “नंतर मी पाहिले, तो पाहा, कोकरा सीयोन डोंगरावर उभा राहिलेला दृष्टीस पडला; त्याच्याबरोबर त्याचे नाव व त्याच्या पित्याचे नाव कपाळावर लिहिलेले एक लक्ष चव्वेचाळीस हजार इसम होते. स्त्रीसंगाने मलीन न झालेले ते हेच आहेत, ते शुद्ध आहेत. जेथे कोठे कोकरा जातो तेथे त्याच्यामागे जाणारे ते हे आहेत. ते देवासाठी व कोकऱ्यासाठी प्रथमफळ असे माणसातून विकत घेतलेले आहेत. त्यांच्या तोंडात असत्य आढळलेले नाही; ते निष्कलंक आहेत.”—प्रकटीकरण १४:१, ४, ५.
४. आज लहान कळपाची पृथ्वीवर काय भूमिका आहे?
४ सा. यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टपासून, आत्म्याने अभिषेक झालेल्या या अभिषिक्त जणांनी पृथ्वीवर खिस्ताच्या वतीने वकील म्हणून सेवा केली आहे. (२ करिंथकर ५:२०) आज, त्यांच्यातील केवळ शेष उरलेले आहेत. ते विश्वासू व बुद्धिमान दास या नात्याने एकत्र मिळून सेवा करीत आहेत. (मत्तय २४:४५; प्रकटीकरण १२:१७) विशेषतः, १९३५ या वर्षापासून, त्यांच्यासोबत “दुसरी मेंढरे”, म्हणजेच ज्यांची संख्या लाखोंमध्ये आहे ते पार्थिव आशा बाळगणारे खिस्ती येऊन मिळालेले आहेत. ते सबंध पृथ्वीवर सुवार्तेचा प्रचार करण्यात मदत करतात.—योहान १०:१६.
५. लहान कळपाच्या उर्वरित जणांची मनोवृत्ती काय आहे आणि त्यांना भिण्याची गरज का नाही?
५ अद्याप पृथ्वीवर असणाऱ्या लहान कळपातील या शेष जणांची मनोवृत्ती काय आहे? त्यांना “न हालणारे राज्य” प्राप्त होणार आहे हे जाणून असल्यामुळे, ते ईश्वरी भय आणि आदरयुक्त भयासह आपली पवित्र सेवा करतात. (इब्रीयांस १२:२८, पं. र. भाषांतर) ते नम्रपणे याची जाणीव राखतात की, त्यांचा मूल्यमापन करता न येण्याजोगा महान विशेषाधिकार आहे व तो असीमित हर्षामध्ये परिणामित होतो. येशूने राज्याविषयी बोलणी केली तेव्हा, त्याने उल्लेखिलेला “अति मोलवान मोती” त्यांना सापडला आहे. (मत्तय १३:४६) मोठे संकट जवळ येते तसे, देवाचे अभिषिक्त जण निडरतेने उभे राहतात. ‘परमेश्वराच्या महान व प्रसिद्ध दिवशी’ मानवजातीच्या जगावर काही गुदरणार असतानाही त्यांना भविष्याबद्दल अस्वस्थ करणारे भय नाही. (प्रेषितांची कृत्ये २:१९-२१) त्यांना ते का असावे?
संख्या घटते
६, ७. (अ) अद्याप पृथ्वीवर असणाऱ्या लहान कळपाची संख्या अल्प का आहे? (ब) प्रत्येक वैयक्तिकाने स्वतःच्या आशेबद्दल कोणता दृष्टिकोन बाळगावा?
६ अलीकडील वर्षात, अद्याप पृथ्वीवर असणाऱ्या लहान कळपाची संख्या खूपच अल्प झाली आहे. हे १९९४ च्या स्मारक विधीच्या अहवालावरून सिद्ध झाले. यहोवाच्या लोकांच्या सुमारे ७५,००० मंडळ्यांमध्ये मात्र ८,६१७ जणांनी बोधचिन्हांमध्ये सहभाग घेऊन शेषाचे सदस्य असण्याची आपली कबुली प्रदर्शित केली. (मत्तय २६:२६-३०) त्याउलट, एकूण उपस्थिती १,२२,८८,९१७ इतकी होती. याची अपेक्षा करावयाची आहे हे अभिषिक्त ख्रिस्ती ओळखतात. यहोवाने लहान कळपासाठी १,४४,००० ही मर्यादित संख्या ठेवली आहे. तसेच तो सा. यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टपासून त्यांना एकत्र करीत आला आहे. तर्कशुद्धपणे, लहान कळपाचे बोलावणे त्याची संख्या पूर्णत्वास आल्यावर संपणार होते. तसेच पुरावा असा आहे की, १९३५ मध्ये या खासपणे आशीर्वादित जणांचे हे मुख्य एकत्रीकरण समाप्तीस आले. तथापि, शेवटल्या काळात, दुसरी मेंढरे “सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा . . . मोठा लोकसमुदाय” होणार होती अशी भविष्यवाणी केली होती. सन १९३५ पासून, यहोवा जे मुख्य एकत्रीकरण करत आहे ते याच मोठ्या लोकसमुदायाचे आहे. त्यांची आशा नंदनवनमय पृथ्वीवरील सार्वकालिक जीवन आहे.—प्रकटीकरण ७:९; १४:१५, १६; स्तोत्र ३७:२९.
७ अद्याप पृथ्वीवर असणाऱ्या लहान कळपातील लोक आता ७०, ८० आणि ९० वर्षां दरम्यानच्या वयोमानाचे आहेत. काहींनी त्यांच्या जीवनाचे शतक ओलांडले आहे. या सर्वांना, त्यांचे वय कितीही असले तरी, स्वर्गीय पुनरुत्थानाद्वारे ते शेवटी येशू ख्रिस्ताला जाऊन मिळतील आणि त्याच्या भव्य राज्यात त्याच्यासोबत राज्य करतील हे माहीत आहे. मोठ्या लोकसमुदायातील लोक ख्रिस्त राजाची पार्थिव प्रजा असतील. यहोवाने त्याच्यावर प्रीती करणाऱ्या प्रत्येकासाठी जे राखले आहे त्याबद्दल प्रत्येकजण आनंद करो. कोणती आशा बाळगावी याची निवड करणे आपल्यावर सोपवून दिलेले नाही. ते यहोवाने ठरवायचे आहे. स्वर्गीय राज्यातील किंवा त्या राज्याखालील नंदनवनमय पृथ्वीवरील आपल्या आनंदी भवितव्याच्या आशेबद्दल दोन्ही गट हर्षित असू शकतात.—योहान ६:४४, ६५; इफिसकर १:१७, १८.
८. एक लक्ष चव्वेचाळीस हजार यांच्यावर शिक्का मारण्याचे काम किती जवळ आले आहे आणि ते पूर्ण झाल्यावर काय घडेल?
८ एक लक्ष चव्वेचाळीस हजार लोकांच्या निश्चित संख्येचा लहान कळप ‘देवाचे इस्राएल’ आहे. याने देवाच्या उद्देशांसाठी स्वाभाविक इस्राएलाची जागा घेतली आहे. (गलतीकर ६:१६) यास्तव, शेष जण अद्याप पृथ्वीवर असणाऱ्या त्या आध्यात्मिक राष्ट्राचा उर्वरित भाग बनतात. अशा उर्वरित लोकांवर यहोवाच्या अंतिम स्वीकृतीसाठी शिक्का मारण्यात येतो. एका दृष्टांतात प्रेषित योहानाने हे घडत असल्याचे पाहिले आणि असा अहवाल दिला: “मी आणखी एक देवदूत सूर्योदयाच्या दिशेने वर चढताना पाहिला, त्याच्याजवळ जिवंत देवाचा शिक्का होता; ज्या चार देवदूतांकडे पृथ्वीला व समुद्राला उपद्रव करण्याचे काम सोपविले होते त्यांना तो उच्च स्वराने म्हणाला, ‘आमच्या देवाचे जे दास आहेत त्यांच्या कपाळावर आम्ही शिक्का मारीपर्यंत पृथ्वीला, समुद्राला व झाडांना उपद्रव करू नका.’ ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली; [आध्यात्मिक] इस्राएल लोकांच्या सर्व वंशापैकी एक लक्ष चव्वेचाळीस हजारांवर शिक्का मारण्यात आला.” (प्रकटीकरण ७:२-४) आध्यात्मिक इस्राएलावर शिक्का मारण्याचे हे काम स्पष्टतः समाप्तीस येत असल्यामुळे, लवकरच घडणाऱ्या आनंदविणाऱ्या घटना दाखवल्या आहेत. एक गोष्ट म्हणजे, नाशाचे चार वारे पृथ्वीवर सोडल्यावर, ‘मोठे संकट’ खूपच नजीक असेल.—प्रकटीकरण ७:१४.
९. मोठ्या लोकसमुदायाच्या वाढत्या संख्येकडे लहान कळप कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो?
९ एकत्र केलेल्या मोठ्या लोक समुदायाच्या लोकांची संख्या लाखोंमध्ये आहे. हे शेष जणांच्या अंतःकरणाला किती उत्साह देते! अद्याप पृथ्वीवर असणाऱ्या लहान कळपातील लोकांची संख्या कमी होत असली, तरी देवाच्या वाढत्या पार्थिव संघटनेच्या जबाबदाऱ्या घेण्यासाठी त्यांनी मोठ्या लोकसमुदायातील लोकांना प्रशिक्षित केले आहे आणि योग्य पुरुष तयार केले आहेत. (यशया ६१:५) येशूने दाखवल्याप्रमाणे, मोठ्या संकाटातून बचावणारे लोक असतील.—मत्तय २४:२२.
“भिऊ नको”
१०. (अ) देवाच्या लोकांवर कोणते आक्रमण केले जाणार आहे आणि ते कोठे निरविल? (ब) आपल्या प्रत्येकाला कोणते प्रश्न विचारण्यात आले आहेत?
१० सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांना पृथ्वीच्या सान्निध्यात टाकण्यात आले आहे. यहोवाच्या लोकांवर पूर्ण आक्रमण करण्यासाठी त्याच्या व त्याच्या टोळीच्या मनात घातले जात आहे. बायबलमध्ये भाकीत केलेले हे आक्रमण मागोगच्या गोगचे आक्रमण असे वर्णिण्यात आले आहे. दियाबल खासकरून त्याचा हल्ला कोणावर केंद्रित करतो? तो लहान कळपातील शेवटल्या सदस्यांवर, देवाच्या आध्यात्मिक इस्राएलावर जे “पृथ्वीच्या मधल्या प्रदेशी” शांतीत वास करीत आहेत त्यांच्यावर करण्यात येत नाही का? (यहेज्केल ३८:१-१२) होय, सैतानाचे आक्रमण यहोवाद्वारे एक ‘अपूर्व कार्य, विलक्षण कृती’ कशी घडवून आणेल हे विश्वासू अभिषिक्त वर्गाचा शेष आपल्या निष्ठावान सोबत्यांबरोबर म्हणजेच दुसरी मेंढरे यांच्याबरोबर मिळून पाहील. तो त्याच्या लोकांच्या संरक्षणास्तव, हस्तक्षेप करील आणि हे “परमेश्वराचा महान व भयंकर दिवस” सुरू होण्यास कारणीभूत ठरेल. (योएल २:३१) आज, विश्वासू व बुद्धिमान दास एक अत्यावश्यक, जीवन बचावणारे कार्य करीत आहे आणि या यहोवाकडील येणाऱ्या हस्तक्षेपाबद्दल इशारा देत आहे. (मलाखी ४:५; १ तीमथ्य ४:१६) तुम्ही सक्रियतेने त्या सेवेला पाठिंबा देण्यास, यहोवाच्या राज्याची सुवार्ता प्रचार करण्यात सहभाग घेत आहात का? निडर राज्य उद्घोषक या नात्याने तुम्ही तसे करीत राहाल का?
११. आज धीट मनोवृत्ती अत्यावश्यक का आहे?
११ सद्य जगाच्या परिस्थितीला लक्षात ठेवून, लहान कळपाला येशूने उद्देशून म्हटलेले, “हे लहान कळपा, भिऊ नको” हे शब्द ऐकणे किती समयोचित आहे! यहोवाच्या उद्देशाच्या एकवाक्यतेत जे काही साध्य केले जात आहे त्याला अनुलक्षून अशी धीट मनोवृत्ती आवश्यक आहे. व्यक्तिगतपणे, लहान कळपातील प्रत्येकाला शेवटपर्यंत टिकून राहण्याच्या गरजेची जाणीव आहे. (लूक २१:१९) लहान कळपाचा प्रभू व गुरु या नात्याने येशू ख्रिस्त जसे आपले पार्थिव जीवन पूर्ण होईपर्यंत टिकून राहिला आणि विश्वासू राहिला तसेच शेषातील प्रत्येकाने टिकून राहिले पाहिजे आणि विश्वासू राहिले पाहिजे.—इब्रीयांस १२:१, २.
१२. पौलाने येशूप्रमाणे, अभिषिक्त ख्रिश्चनांना भय न बाळगण्यासाठी कसे आर्जवले?
१२ प्रेषित पौलाप्रमाणे सर्व अभिषिक्त जणांचा तोच दृष्टिकोन असला पाहिजे. पुनरुत्थानाचा अभिषिक्त जाहीर उद्घोषक या नात्याने त्याचे शब्द भय बाळगू नये या येशूच्या आर्जवण्याच्या सुसंगतीत कसे आहेत याकडे लक्ष द्या. पौलाने लिहिले: “माझ्या सुवार्तेप्रमाणे मेलेल्यातून उठविलेला दावीदाच्या संतानातील येशू ख्रिस्त, ह्याची आठवण ठेव. ह्या सुवार्तेमुळे मी दुष्कर्म करणाऱ्यासारखा बेड्यांचे देखील दुःख सोशीत आहे; तरी देवाच्या वचनाला बेडी पडलेली नाही. ह्यामुळे निवडलेल्या लोकांनाहि ख्रिस्त येशूमधील तारण युगानुयुगाच्या गौरवासह प्राप्त व्हावे म्हणून मी त्यांच्याकरिता सर्व काही धीराने सोसतो. हे वचन विश्वसनीय आहे की, जर आपण त्याच्याबरोबर मेलो तर त्याच्याबरोबर जिवंतहि राहू. जर आपण धीराने सोसतो, तर त्याच्याबरोबर राज्यहि करू; आपण त्याला नाकारू तर तोहि आपल्याला नाकारील; आपण अविश्वासी झालो तरी तो विश्वसनीय राहतो, कारण त्याला स्वतःविरुद्ध वागता येत नाही.”—२ तीमथ्य २:८-१३.
१३. लहान कळपाच्या सदस्यांची कोणती निश्चित मते आहेत आणि ही गोष्ट त्यांना काय करण्यास प्रवृत्त करते?
१३ प्रेषित पौलाप्रमाणे, अभिषिक्त लहान कळपाचे उर्वरित सदस्य देवाच्या वचनात दिलेला शक्तीशाली संदेश घोषित करत असताना दुःख भोगण्यास तयार आहेत. तारणाच्या आणि ते मरणापर्यंत विश्वासू राहिल्यास, त्यांना “जीवनाचा मुगूट” दिला जाण्याच्या ईश्वरी अभिवचनांवर ते नेहमी भरवसा ठेवतात तसे त्यांची निश्चित मते खोलवर मुळावलेली असतात. (प्रकटीकरण २:१०) निमिषात होणारे पुनरुत्थान आणि बदल यांचा अनुभव घेतल्याने, ते ख्रिस्तासोबत राजे या नात्याने राज्य करण्यास त्याच्या ऐक्यतेत आणले जातील. जगावर विजय मिळवलेले या नात्याने त्यांच्या सत्वनिष्ठेच्या मार्गक्रमणाबद्दल हा किती मोठा जय!—१ योहान ५:३, ४.
अद्वितीय आशा
१४, १५. लहान कळपाच्या पुनरुत्थानाची आशा अद्वितीय कशी आहे?
१४ लहान कळपाला असणारी पुनरुत्थानाची आशा अद्वितीय आहे. कोणत्या प्रकारे? एक गोष्ट म्हणजे, ते ‘नीतिमान व अनीतिमान’ यांच्या सामान्य पुनरुत्थानाआधी घडते. (प्रेषितांची कृत्ये २४:१५) पहिले करिंथकर १५:२०, २३ येथे, “तरी पण ख्रिस्त मेलेल्यातून उठविला गेला आहेच; तो महानिद्रा घेणाऱ्यातले प्रथमफळ असा आहे. पण प्रत्येक आपआपल्या क्रमाप्रमाणे, प्रथमफळ ख्रिस्त; मग जे ख्रिस्ताचे ते त्याच्या आगमनकाळी” या शब्दांवरून हे स्पष्टपणे सिद्ध होते की, अभिषिक्त जणांचे पुनरुत्थान एका विशिष्ट महत्त्वाच्या क्रमात येते. येशूने प्रदर्शित केलेला धीर आणि विश्वास स्वतःजवळ असल्यामुळे, लहान कळप आपले पार्थिव जीवन पूर्ण करतात तसे विशेषतः, खरा प्रभू आपल्या मंदिरात १९१८ मध्ये न्यायासाठी आल्यापासून त्यांच्यासाठी काय राखले आहे हे त्यांना माहीत आहे.—मलाखी ३:१.
१५ हे पुनरुत्थान अद्वितीय असण्याच्या दृष्टीने पाहण्यासाठी पौल आपल्याला आणखी एक कारण देतो. पहिले करिंथकर १५:५१-५३ मध्ये नमूद केल्याप्रमाणे, त्याने लिहिले: “पाहा! मी तुम्हास एक रहस्य सांगतो: आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तरी आपण सर्व जण बदलून जाऊ; क्षणात निमिषात, शेवटला कर्णा वाजेल तेव्हा . . . कारण हे जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान करावे, आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे हे आवश्यक आहे.” हे शब्द ख्रिस्ताच्या उपस्थितीत मरण पावणाऱ्या लहान कळपातील जणांना लागू होतात. मृतावस्थेत दीर्घ काळासाठी झोपून न राहता त्यांना “क्षणात, निमिषात” अमरत्व दिले जाते.
१६, १७. पुनरुत्थानाच्या त्यांच्या आशेबद्दल आज अभिषिक्त ख्रिस्ती विशेषतः आशीर्वादित कसे आहेत?
१६ या समजूतीच्या प्रकाशात, आपण प्रकटीकरण १४:१२, १३ मध्ये आढळणाऱ्या योहानाच्या शब्दांचा अर्थ समजू शकतो. त्याने लिहिले: “‘देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूवरील विश्वासाला धरून राहणारे पवित्र जन ह्याचे धीर धरण्याचे अगत्य ह्यातच आहे.’ तेव्हा स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली; ती म्हणाली: ‘लिही; प्रभूमध्ये मरणारे आतापासून धन्य आहेत. आत्मा म्हणतो, खरेच, आपल्या कष्टांपासून सुटून त्यांना विसावा मिळेल; त्यांची कृत्ये तर त्यांच्याबरोबर जातात.’”
१७ लहान कळपाच्या शेषांसाठी किती अद्वितीय मोबदला राखून ठेवण्यात आला आहे! त्यांचे पुनरुत्थान लगेच होईल, ते मेल्यावर तत्काळ ते होईल. आत्मिक क्षेत्रात आपली नेमणूक घेताना ते किती विलक्षणीय बदल अनुभवतील! लहान कळपाचा असा गौरव होत असताना आणि अधिकांश बायबल भविष्यवाण्या पूर्ण होण्याच्या बेतात असताना, लहान कळपाच्या शेवटल्या उरलेल्या सदस्यांना खरोखरच ‘भिण्याची’ गरज नाही. त्यांची निडरता मोठ्या लोकसमुदायातील लोकांना उत्तेजन देते. पृथ्वीला कधीही अनुभव न आलेल्या त्रासाच्या सर्वात महान काळात मुक्ततेची वाट पाहून असताना शेषांनी अशाच निडरतेची मनोवृती विकसित केली पाहिजे.
१८, १९. (अ) आपण जगतो ती वेळ निकडीची का आहे? (ब) अभिषिक्त आणि दुसरी मेंढरे या दोघांनीही भय का बाळगू नये?
१८ लहान कळपाच्या कार्यांना वर्णिल्याने त्यांना तसेच मोठ्या लोकसमुदायाला खऱ्या देवाचे भय धरण्यास बळकटी मिळते. त्याच्याकडील न्यायाचा काळ आला आहे आणि उरलेली अनुकूल वेळ मोलवान आहे. निश्चितच, इतरांना कार्य करण्यास फारच मर्यादित वेळ आहे. तथापि, देवाचा उद्देश निष्फळ ठरेल असे भय आपल्याला नाही. ते निश्चितच सफल होईल!
१९ आधीच, स्वर्गातील मोठ्या वाणी असे म्हणताना ऐकण्यात आल्या आहेत: “जगाचे राज्य आमच्या प्रभूचे व त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे; आणि तो युगानुयुग राज्य करील.” (प्रकटीकरण ११:१५) निश्चितच, महान मेंढपाळ यहोवा त्याच्या सर्व मेंढरांना ‘आपल्या नावासाठी नीतीमार्गांनी’ मार्गदर्शित करतो. (स्तोत्र २३:३) लहान कळपाला न चुकता त्यांच्या स्वर्गीय बक्षीसाकडे निरवले जात आहे. तसेच दुसऱ्या मेंढरांना ख्रिस्त येशूच्या अधिपत्याखालील देवाच्या भव्य राज्याच्या पार्थिव क्षेत्रात चिरकालिक जीवन लुटण्यासाठी मोठ्या संकटातून सुरक्षितपणे वाचवले जाईल. यास्तव, येशूचे शब्द लहान कळपाला उद्देशून असले, तरी पृथ्वीवरील देवाच्या सर्व सेवकांना त्याच्या, “भिऊ नको” या शब्दांना ऐकण्याचे कारण आहे.
तुम्ही स्पष्टीकरण देऊ शकता का?
▫ लहान कळपाची संख्या कमी होण्याची अपेक्षा आपण का करावी?
▫ आज अभिषिक्त शेषांची काय स्थिती आहे?
▫ ख्रिश्चनांवर मागोगच्या गोगकडून हल्ला होणार असला तरी त्यांनी भय का बाळगू नये?
▫ आज विशेषतः १,४४,००० जणांच्या पुनरुत्थानाची आशा अद्वितीय का आहे?