डोमिनिकन प्रजासत्ताक शोध लावण्यास अजूनही खुले
ख्रिस्टोफर कोलंबस या तरुणाने, समुद्राच्या जीवनाची सुरवात केली ज्याने कालांतराने त्याला आज वेस्ट इंडिज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेटांचा शोध लावण्यास निरवले. डिसेंबर १४९२ मध्ये सांता मरीया नावाचे त्याचे प्रमुख दर्यासारंगाचे जहाज, हैती आणि डोमिनिकन प्रजासत्ताक यांमध्ये विभागून घेतलेले ज्याला आज हिस्पॅनीओलाचे बेट असे म्हटले जाते त्या एस्पानोला बेटाच्या उत्तरेकडील किनाऱ्याला लागले. तेथे कोलंबसने घाईघाईने एक गड बांधून त्याला ला नाविदाद हे नाव देऊन पहिली युरोपियन वसाहत स्थापन केली. हे बेट त्याच्या पुढील संशोधनाचे केंद्र ठरले.
कोलंबसला दिसून आले की या बेटावर देखणी, विश्वासू आणि आदरातिथ्य करणारी वेगळीच लोक, टायनो इंडियन्स राहत होती. त्यावेळी त्यांची लोकसंख्या अंदाजे १,००,००० इतकी होती. परंतु, सोने शोधून काढण्याचा मुख्य हेतू असलेल्या हल्लेखोरांच्या कठोर वागणूकीमुळे त्या देशाची लोकसंख्या जलदगतीने घटत गेली. १५७० पर्यंत अहवालानुसार केवळ ५०० टायनो इंडियन्स उरले होते.
आज, डोमिनिकन प्रजासत्ताकामध्ये अनेक जातीच्या आणि रंगाच्या लोकांनी वस्ती केली आहे. या लोकांचे पूर्वज येथे राहण्यासाठी आले होते. तरीदेखील, त्यांच्यामध्ये टायनो लोकांची पुष्कळ उत्तम लक्षणे आहेत जसे की, ते मूलतः स्नेही व सुखासीन लोक आहेत. त्यासोबत त्या लोकांना देवावर प्रामाणिक विश्वास व बायबलसाठी आदर असल्यामुळे या देशात यहोवाच्या साक्षीदारांचे प्रचाराचे आणि शिकवण्याचे कार्य यशस्वी होत आहे.
दुसऱ्या एका जातीचा शोध
लेनर्ट व वर्जिनिया जॉनसन हे वॉचटावरचे पहिले मिशनरी त्रूहीयो हुकुमशहाच्या कारकीर्दीत डोमिनिकन प्रजासत्ताकात आले. आनंदाची गोष्ट म्हणजे, त्यांच्या बायबल संदेशाला अनेकांनी फार लवकर आणि सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे त्यांना दिसून आले. परंतु, ही गोष्ट तेथील अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या धार्मिक सल्लागारांना आनंदविणारी नव्हती. लगेचच छळाची लाट उसळली आणि त्या सुरवातीच्या डोमिनिकन साक्षीदारांच्या विश्वासाची कडक परीक्षा घेण्यात आली. मृत्यूपर्यंत त्यांनी दाखवलेली निष्ठा आणि विश्वास याविषयी आजही बोलले जाते.
त्या देशातील १६,००० यहोवाचे साक्षीदार सुपरिचित आहेत. काही काळाआधी, संपूर्ण राष्ट्रातील पाच टेलिव्हिजन केंद्रांनी जेहोवाज विटनेसस—द ऑर्गनायझेशन बिहाईंड द नेम हा व्हिडिओ कार्यक्रम प्रसारित केला.a
यामुळे साक्षीदारांच्या कार्याला केवळ मोठमोठ्या शहरांमध्येच नव्हे तर लहान शहरे आणि काही ग्रामीण क्षेत्रांमध्ये देखील बरीच प्रसिद्धी मिळाली. त्या लोकांप्रत पुन्हा पोहंचण्यासाठी आणि राज्याची सुवार्ता या दूर क्षेत्रांमध्ये घेऊन जाण्याकरता एका खास मोहिमेची त्यांनी व्यवस्था केली.
लोकांपर्यंत पोहंचल्याबद्दल आशीर्वाद
अनेक उत्साही आणि आवेशी तरुण साक्षीदारांनी स्वयंसेवक म्हणून दोन महिन्यांसाठी या दूरच्या क्षेत्रांमध्ये प्रचार केला. त्यांच्या प्रयत्नांना खूप चांगले प्रतिफळ मिळाले. एका क्षेत्रात दोन साक्षीदारांना असामान्य आस्था आढळून आली. येशूच्या मृत्यूचा वार्षिक स्मारक दिन साजरा करण्याचा समय आल्यामुळे, त्यांनी त्याची व्यवस्था केली आणि लोकांना उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले. ते ज्या सभागृहात जमले होते तो अगदी गच्च भरला आणि त्यांनी सभा घेतली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सभा संपल्यावर त्यांना दिसून आले की, सभागृहाबाहेर आणखी पुष्कळ लोक आत येण्यासाठी थांबून राहिले होते. यास्तव त्यांनी त्यांना आत येण्यास आमंत्रण दिले आणि तो कार्यक्रम पुन्हा एकदा साजरा केला. आता त्या क्षेत्रामध्ये एक मंडळी आहे.
लोकांचा उदार आणि स्नेही स्वभाव त्यांना, ते जे बायबल सत्य शिकत आहेत त्याची सहभागिता त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि इतरांसोबत करण्यास प्रवृत्त करतो. एक बायबल विद्यार्थी घरोघरच्या कार्यामध्ये भाग घेण्यास पात्र ठरला तेव्हा त्याचा आनंद ओसंडू लागला. तो आधीच त्याच्या शेजारीपाजारी पाच बायबल अभ्यास चालवत होता, परंतु सेवेत आणखी भाग घेण्यास तो आनंदी होता.
पुष्कळ क्षेत्रांमध्ये राज्य प्रकाशक नियमितरीत्या जाऊ शकत नसल्यामुळे, बसमधील लोकांना व शहरांमध्ये व्यापार करण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी येणाऱ्या लोकांना प्रचार करण्याचा प्रयत्न चालू आहे. यामुळे पुष्कळ आनंदविणारे परिणाम मिळाले. त्याचे उदाहरण शाखा दप्तराला मिळालेल्या एका पत्रातील अनुभवातून पाहता येते. ते पत्र ग्रामीण क्षेत्रातील दोन पुरूषांचे होते ज्यांनी बायबलच्या अभ्यासाची विनंती केली होती. एक साक्षीदार जेव्हा त्यांना भेटावयास गेला तेव्हा ते “पुरूष” १० आणि ११ वर्षांचे असल्याचे आढळून आले. परंतु त्यांना बायबल अभ्यासाच्या व्यवस्थेबद्दल कोठून समजले? त्याच गावातील एक माणूस व्यापारासाठी राजधानीत आला होता. तो रस्त्यावर एका साक्षीदाराला भेटला ज्याने त्याला एक पत्रिका दिली आणि मोफत गृह बायबल अभ्यास सादर केला. त्याच्या गावी पुन्हा आल्यावर त्या मनुष्याने ती पत्रिका त्याच्या शेजाऱ्याच्या एका १२ वर्षीय मुलीला दिली आणि तिला बायबल अभ्यासाच्या व्यवस्थेबद्दल सांगितले. आणि त्या मुलीने, ही माहिती या मुलांना सांगितली ज्यांनी लगेचच पत्र लिहिले. ती दोन मुले, ती मुलगी, तो माणूस आणि त्याची दोन मुले यांच्याबरोबर एक बायबल अभ्यास चालू करण्यात आला.
तरुणांकडून उत्तम प्रतिसाद
सत्यामध्ये वाढलेले आणि इतर तरुण, देवाची उपासना गंभीरतेने करतात असे दिसते हे निश्चित. उदाहरणार्थ, तामार आणि तिची बहीण केला या दोघींचा बाप्तिस्मा, त्या १० वर्षांच्या असताना झाला आणि ११ व्या वर्षी त्यांनी पूर्ण वेळेच्या सेवेत प्रवेश केला. वेंन्डी कॅरोलिना १२ वर्षांची होती तेव्हा तिने पाण्याने बाप्तिस्मा घेऊन समर्पण केले आणि दोन वर्षांनंतर म्हणजे १९८५ मध्ये नियमित पायनियरींग चालू केली. आज ती एक प्रभावी शिक्षक असून पूर्ण वेळेच्या सेवेचा अजूनही आनंद घेत आहे. तरुण होवनीने १० वर्षांचा असताना बाप्तिस्मा घेतला, ११ व्या वर्षी नियमित पायनियर बनला आणि आता तो चार गृह बायबल अभ्यास चालवत आहे. यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेली एक पुस्तिका, वापरलेली जुनी पुस्तके विकणाऱ्याकडे असल्याचे १० वर्षांचा रे याला समजल्यावर, ती पुस्तिका त्याच्यासाठी विकत घेण्यास त्याने त्याच्या आईला गळ घातली. त्याने ती पुस्तिका अथपासून इथिपर्यंत वाचून काढली. आणखी बायबल साहित्य मिळवण्यासाठी त्याने कालांतराने शाखा दप्तराशी संपर्क साधला. आज तो पूर्ण वेळेच्या सेवेचा आनंद घेत आहे आणि त्याची आई देखील देवाची सेवा करत आहे.
या आणि इतर तरुणांना आध्यात्मिक गोष्टींचे मूल्य समजण्यास कशाने मदत केली? अनेक बाबतीत, योग्य पालकीय मार्गदर्शनाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ही गोष्ट होस्वाच्या बाबतीत होती. त्याचे ख्रिस्ती पालक शाळेमध्ये शिक्षक आहेत. पालकांनी त्यांच्या मुलातील एकाला तरी पूर्ण वेळेची सेवा करण्यास मदत देण्याचे प्रवासी पर्यवेक्षकांनी सुचवले तेव्हा त्यांनी होस्वाकडे त्यांचे लक्ष वळवले. होस्वा एक उल्लेखनीय विद्यार्थी असल्यामुळे त्याला अभियांत्रिकीचा अभ्यास करण्यासाठी सरकारी स्कॉलरशीपची परवानगी मिळाली. विद्यापीठातील दीड वर्षानंतर त्याने डोमिनिकन प्रजासत्ताक येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या मुख्यालय कॉम्प्लेक्समध्ये बांधकाम प्रकल्पात दाखल होण्याचे आमंत्रण स्वीकारले. त्याच्या पालकांनी, यहोवाच्या सेवेसाठी त्यांचा मुलगा दिल्याबद्दल पूर्ण समाधान व्यक्त केले.
इतर देशातील “संशोधक”
“पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत” हे येशूचे शब्द येथील क्षेत्राला उचितपणे लागू करता येऊ शकतात. (मत्तय ९:३७) या मोठ्या गरजेमुळे आणि उत्तम प्रतिसादामुळे इतर देशातील साक्षीदारांना त्या क्षेत्रातील प्रामाणिक सत्य शोधक—म्हणजेच आधुनिक दिवसातील वास्तविक ठेवा शोधण्यात सहभाग घेण्यासाठी प्रवृत्त केले आहे.
शेजारच्या प्वेर्त रीकोमधून साक्षीदार कुटुंबे आली आहेत आणि त्यांना डोमिनिकन प्रजासत्ताकाच्या विविध क्षेत्रांमध्ये सेवा केल्यामुळे खरे समाधान मिळाले. एका कुटुंब प्रमुखाने म्हटले: “ज्या लोकांना ऐकण्याची इच्छा आहे अशांना तुमचा विश्वास आणि आशा व्यक्त करू शकल्यामुळे सत्य आणखी जिवंत होते!” येथे किती गरज आहे हे समजल्यावर स्वीडनमधून सिसिलिया आणि अमेरिकेतील निया या दोघी इतर पुष्कळ पूर्ण वेळेच्या सेवकांसोबत काम करण्यासाठी आल्या. ते अशा अंतरभागात कार्य करीत आहेत जे समुद्रसपाटीपासून उंच असून तेथे सौम्य हवामान असल्याचे त्यांना दिसून आले. त्याचप्रमाणे, पाईन वृक्षांनी झाकलेल्या थंड डोंगरांवरील दोन कॅनडीयन कुटुंबे अमेरिकेतून आलेल्या एका डोमिनिकन कुटुंबाला जाऊन मिळाले. ते एका लहानशा मंडळीचे भाग आहेत आणि दहा वर्षांसाठी यहोवाचे साक्षीदार ज्या लोकांना भेटी देऊ शकले नाहीत अशा लोकांपर्यंत जाऊ शकतात.
अल्फ्रेडो आणि लर्डस् व त्यांची पाच मुले न्यूयॉर्क शहरातून पुन्हा आले आणि आता ते एका छोट्याशा मंडळीसोबत सहवास ठेवून आहेत जी सर्वात रमणीय पर्यटन पुळणी असलेल्या गावात आहे. प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना शोधण्यात व मंडळीची वाढ होण्यासाठी मदत करण्यात सहभाग घेऊ शकत असल्यामुळे त्यांना अतिशय आनंद होतो. ऑस्ट्रियातील कम्प्युटर ऑपरेटर रोलंड आणि त्याची पत्नी युता हे दोघे त्या देशाच्या दक्षिणेकडील उष्ण, कोरड्या भागात येऊन स्थायिक झाले. ते तेथे आल्यानंतर त्यांना एका नव्या मंडळीची स्थापना झाल्याचे पाहण्याचा आनंद मिळाला. शेजारच्या एका गावात, तीन पायनियर बहिणींचा एक गट आणि कॅलिफोर्नियातील एका जोडप्याने कळवले की, त्यांच्याकडे बायबल अभ्यासासाठी इतक्या विनंत्या होत्या की ते इतके सर्व अभ्यास चालवू शकत नव्हते. यास्तव त्यांनी आस्थेवाईक लोकांना स्थानिक राज्य सभागृहात होणाऱ्या सभांना उपस्थित राहण्याचे आणि बायबल अभ्यासासाठी तयार केलेल्या प्रतिक्षा यादीत त्यांचे नाव नोंदविण्याचे उत्तेजन दिले. युताचा भाऊ स्टीफन, ईशान्येकडील सुंदर समाना गावातील एका छोट्याशा मंडळीत विश्वासूपणे सेवा करीत आहे. केवळ दोन वर्षात, तेथे राज्य प्रचारकांची संख्या दुप्पट झाली आहे.
मदत करण्यासाठी आलेल्या या व इतरांनी दाखवलेली प्रीती आणि आवेश खरोखर प्रशंसनीय आहे. त्यांनी वेगवेगळ्या संस्कृती आणि रितीरिवाज असलेल्या एका नव्या देशात केवळ पुर्नवसन करण्याचे आव्हान स्वीकारले नाही तर अनेक वेळा, मेंढरासमान लोकांच्या आध्यात्मिक गरजांची काळजी घेण्यासाठी नवीन भाषा शिकण्याचे देखील आव्हान स्वीकारले आहे. त्यांच्या प्रयत्नांना स्थानिक लोकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
काही डोमिनिकन कुटुंबांनी मोठमोठ्या शहरांमधील सुखसोयी सोडून ते ग्रामीण भागात रहावयास गेले आहेत. त्या सर्वांना प्रामाणिक सत्य शोधकांचा खरा ठेवा शोधून काढल्याच्या आनंदाद्वारे समृद्ध प्रतिफळ मिळाले.
पंधराव्या शतकात खनिजे शोधण्यासाठी आलेल्यांनी त्या देशाच्या टायनो लोकांवर आशीर्वाद नव्हे तर दास्यत्व आणि अपरिमित दुःख आणले. स्वतः कोलंबसला देखील त्या पश्चिमेकडील गोलार्धातील खनिजांचा लाभ झाला नाही. कालांतराने त्याला अटक करण्यात आली आणि त्याने शोध लावलेल्या बेटावरून हाकलून स्पेनला कैदी म्हणून पाठवले.
आज एक वेगळ्याप्रकारचे संशोधन चालू आहे आणि सर्वात मौल्यवान ठेवा सापडत आहे. यहोवाचे लोक राज्याच्या सुवार्तेला प्रतिसाद देणाऱ्या नम्र हृदयाच्या लोकांना शोधण्यात मग्न आहेत. त्याचा परिणाम असा आहे की सतत वाढणारा एक लोकसमुदाय, केवळ देवाचे वचन आणू शकते अशा स्वातंत्र्याचा आनंद लुटत आहेत. (योहान ८:३२) ते त्या काळाची आतुरतेने वाट पाहत आहेत जेव्हा पर्वत, मनोहर पाण्याचे धबधबे, सुंदर पुळण आणि आकर्षित करणाऱ्या गुहा केवळ नंदनवनाचे एक बेटच होणार नाही तर संपूर्ण पृथ्वीला आच्छादून टाकणाऱ्या नव्या जगाचा भाग बनतील.—२ पेत्र ३:१३.
[तळटीपा]
a वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीने तयार केलेले.
[२४ पानांवरील नकाशा]
(For fully formatted text, see publication)
डोमिनिकन प्रजासत्ताक
[२४, २५ पानांवरील चित्रं]
तरुण लोकांना पूर्ण वेळेच्या सेवेचा पाठलाग करून आध्यात्मिक गोष्टींच्या मूल्याचा शोध लागतो