‘ही सेवा आम्हाला देण्यात आली आहे म्हणून आम्ही हार मानत नाही’
रोनाल्ड टेलर यांनी निवेदन केल्याप्रमाणे
मी १९६३ च्या उन्हाळ्यामध्ये जिवंत राहण्यासाठी झगडत होतो. मी समुद्र किनाऱ्यावरून फेरफटका मारत असताना माझे पाऊल न दिसणाऱ्या पोकळीमध्ये पडले आणि अनपेक्षितपणे मी पाण्यात खोलवर गेलो. मला पोहता येत नव्हते आणि किनाऱ्यापासून काही मीटर अंतरावरच बुडण्याच्या बेतात होतो. मी तीन वेळा गटांगळ्या देखील खालल्या होत्या आणि मोठ्याप्रमाणात समुद्राचे पाणी गिळले परंतु मित्राने माझी दैन्यावस्था पाहिल्यानंतर मला किनाऱ्यावर खेचून आणले. तत्काळ कृत्रिम श्वासोच्छवासामुळे मी बचावलो.
आशाहीन वाटत असले तरी देखील—कधीही हार न मानण्याच्या महत्त्वाची गुणग्राहकता बाळगण्याची ही माझी पहिलीच वेळ नव्हती. मला बालपणापासूनच आध्यात्मिक जीवनासाठी लढा द्यावा लागला.
दुसऱ्या जागतिक युद्धातील ते विषण्णतेचे दिवस होते आणि तेव्हा ख्रिस्ती सत्याबरोबर माझा पहिल्यांदा संपर्क आला. बॉम्बच्या अनपेक्षित हल्ल्यांच्या धोक्यापासून सुरक्षिततेसाठी लंडनमधून हलविण्यात आलेल्या हजारो मुलांपैकी मी एक होतो. मी १२ वर्षांचा असल्याकारणामुळे युद्धाचा माझ्यासाठी विशेष अर्थ नव्हता; माझ्यासाठी ती एक शौर्यगाथा होती.
इंग्लडच्या नैर्ऋत्येस असणाऱ्या वेस्टन-सुपर-मेअर येथील एका वयस्कर जोडप्याने माझी काळजी घेतली. मी त्या जोडप्याच्या घरी पोहंचल्यानंतर लगेचच काही पायनियर सेवकांनी आम्हाला भेट देण्यास सुरवात केली. ते हॉरग्रीव्हझ् यांचे कुटुंब होते; त्यापैकी चारही जण—रेज, मॅब्स्, पमेला आणि वॅलरी खास पायनियर होते. माझ्या मानलेल्या पालकांनी सत्याचा स्वीकार केला आणि मी देखील देवाचे तंतुवाद्य (इंग्रजी) या पुस्तकाचा अभ्यास केल्यानंतर यहोवाची सेवा करण्याचा निर्णय घेतला. केवळ सहा सप्ताहांनंतर प्रचार कार्यात सहभागी होण्यासाठी मला आमंत्रण देण्यात आले.
मला अजूनही क्षेत्र कार्यातील तो पहिला दिवस आठवतो. कोणतीही तयारी नसताना मला काही पुस्तिका देण्यात आल्या आणि “तू रस्त्याच्या त्या बाजूला कार्य कर,” असे सांगण्यात आले. अशाप्रकारे प्रचारातील माझा पहिला दिवस पार पडला. त्यावेळी अनेकदा आम्ही ग्रामोफोन तबकड्यातील परिणामकारक प्रस्तावनांच्या साहाय्याने प्रचार केला. ग्रामोफोनवरील भाषणे ऐकवणे आणि तो घरोघर वाहून नेणे हे माझ्यासाठी अत्यानंदाचे क्षण होते. अशाप्रकारचे कार्य करणे हे माझ्यासाठी खरोखरच विशेषाधिकार आहे असे मला वाटले.
मी शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात साक्षकार्य केले आणि बायबल विषयांवर आधारित पुस्तकांचा संच प्राचार्यांना सादर केल्याचे देखील मला आठवते. मी वयाच्या १३ व्या वर्षी बाथ येथील नजीकच्या संमेलनामध्ये बाप्तिस्मा घेतला. युद्ध काळाच्या दरम्यान म्हणजेच १९४१ मध्ये लिसेस्टर येथील डी मॉन्टफोर्ट सभागृहात पार पडलेल्या अधिवेशनाचे देखील मला कधीही विस्मरण होणार नाही. मी मुले (इंग्रजी) या पुस्तकाची माझी प्रत घेण्यासाठी व्यासपीठावर गेलो आणि त्यामध्ये वॉचटावर संस्थेचे तेव्हाचे अध्यक्ष बंधू रदरफोर्ड यांचा वैयक्तिक संदेश समाविष्ट होता. उपस्थित असणाऱ्या सर्व तरुणांना दिलेल्या प्रेरणात्मक भाषणाने यहोवाची सेवा सर्वकाळ करण्याच्या माझ्या इच्छेला प्रबळ केले.
अशाप्रकारे माझी ही दोन आनंदी वर्षे मानलेल्या पालकांबरोबर सत्यामध्ये प्रगती करण्यात गेली. परंतु १४ वर्षांचा असताना मला लंडनला परत यावे लागले आणि माझ्या चरितार्थासाठी कामास सुरवात करावी लागली. माझ्या कुटुंबामध्ये मी पुन्हा आलो असलो तरी घरातील कोणीही माझ्या विश्वासामध्ये सहभागी न झाल्याने आध्यात्मिकरित्या मला माझ्या पायावर उभे राहावे लागले. यहोवाने मला आवश्यक असणारी मदत लवकरच पुरवली. मला लंडन येथे येऊन फक्त तीन आठवडेच झाले होते आणि एक बंधू मला स्थानिक राज्य सभागृहात नेण्यासाठी माझ्या बाबांची परवानगी घेण्याकरीता माझ्या घरी आले. ते सध्या यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाचे सदस्य असलेले बंधू जॉन बार होते. किशोरावस्थेच्या त्या कठीण वर्षांमध्ये ते माझ्या आध्यात्मिक “वडिलांपैकी” एक झाले.—मत्तय १९:२९.
लंडन बेथेल गृहाच्या जवळच असणाऱ्या क्रेव्हन टेरस येथील पॅडिंग्टन मंडळीमध्ये उपस्थित राहण्यास मी सुरवात केली. मी आध्यात्मिकरित्या पोरका होतो त्यामुळे माझी खास काळजी घेण्यासाठी वयस्कर आणि अभिषिक्त बंधू “पप्पा” हमफ्रेज यांना नियुक्त करण्यात आले. त्या मंडळीमध्ये सेवा करणाऱ्या अनेक अभिषिक्त बंधू आणि भगिनींबरोबर सहवास करण्यास मिळणे हा निश्चितच फार मोठा आशीर्वाद होता. आमच्यापैकी पृथ्वीवरील आशा असलेले—यानोदाब म्हटलेले—अल्प होते. वास्तविकपणे, मी उपस्थित होत असलेल्या मंडळीच्या पुस्तक अभ्यासामध्ये फक्त मी एकटाच “योनादाब” होतो. मला समवयस्कांचा अधिक सहवास लाभला नसला तरी प्रौढ बांधवांच्या मौल्यवान संगतीने मला अनेक उपयोगी धडे शिकविले. यहोवाच्या सेवेला कधीही सोडू नये हा कदाचित त्यातील प्रमुख होता.
त्या दिवसांमध्ये आम्ही संपूर्ण सप्ताहांत प्रचार कार्यासाठी राखून ठेवत होतो. “सांऊड कार” हिची काळजी घेण्यासाठी माझी नियुक्ती करण्यात आली होती आणि ती खरोखरच एक तीनचाकी होती कारण ध्वनिवर्धक साहित्य आणि गाडीची बॅटरी बसविण्यासाठी तिच्यामध्ये थोडाफार फेरफार करण्यात आला होता. प्रत्येक शनिवारी मी या तीनचाकीने प्रवास करून विविध मार्गांच्या कडेला जात होतो; तेथे आम्ही काही वेळ संगीत लावत होतो आणि त्यानंतर बंधू रदरफोर्ड यांचे एखादे भाषण ऐकवत होतो. शनिवारी देखील आमच्या नियतकालिकांच्या पिशव्यांच्या साहाय्याने मार्ग कार्य करत होतो. रविवार हे घरोघरचे कार्य, पुस्तिका आणि बांधणी पुस्तके सादर करण्यासाठी राखून ठेवण्यात आले होते.
आवेशी वयस्कर बांधवांबरोबरील सहवासामुळे पायनियर होण्याची इच्छा माझ्यामध्ये जागृत झाली. प्रांतीय अधिवेशनांमध्ये मी पायनियरांसाठी असणारी भाषणे ऐकली तेव्हा ती इच्छा प्रबळ झाली. अर्लस् कोर्ट, लंडन येथे १९४७ मध्ये पार पडलेल्या अधिवेशनाने माझ्या जीवनावर मोठा परिणाम केला. दोन महिन्यानंतर मी पायनियर सेवेस सुरवात केली आणि हा “पायनियर आत्मा” आतापर्यंत विकसित करण्यासाठी प्रयत्न केला आहे. प्रगतीशील बायबल अभ्यास चालविण्याद्वारे मी आनंद संपादन केला आणि यामुळे हा योग्य निर्णय होता याची खात्री पटली.
स्पेनची पत्नी आणि स्पेनची नियुक्ती
मी १९५७ मध्ये पॅडिंग्टन मंडळीसह पायनियरींग करत असताना माझी भेट रॅफेला नामक स्पेनच्या एका सुंदर बहिणीबरोबर झाली. काही महिन्यानंतर आम्ही विवाह केला. एकत्रित पायनियरींग करणे हे आमचे उद्दिष्ट होते; परंतु पहिल्यांदा मी रॅफेलाच्या पालकांना भेटण्यासाठी मॅडरिड येथे गेलो. या भेटीने माझे जीवन परिवर्तन केले. आम्ही मॅडरिड येथे होतो तेव्हा बंधू रे ड्यूझीनबरे स्पेन शाखा पर्यवेक्षकांनी, स्पेनमध्ये अनुभवी बंधुंची प्रचंड गरज होती अशा ठिकाणी सेवा करण्याबद्दल आम्ही विचार का करु नये असे मला विचारले.
आम्ही या आमंत्रणाला नकार कसा देऊ शकलो असतो? अशाप्रकारे, स्पेनमध्ये आम्ही पूर्ण-वेळेची सेवा १९५८ मध्ये एकत्रितपणे सुरू केली. त्यावेळी देश फ्रँकोच्या अधिपत्याखाली होता आणि आमच्या कार्याला सरकार मान्यता नसल्यामुळे आमचे प्रचार कार्य फारच अवघड झाले होते. शिवाय, सुरवातीच्या काही वर्षांमध्ये स्पॅनिश भाषा शिकण्यासाठी मला कठीण परिश्रम करावे लागले. मंडळीतील बांधवांबरोबर दळणवळण करता येत नसल्याने आलेल्या संपूर्ण नैराश्यामुळे मी अनेकदा रडलो आणि ही एक पुन्हा हार न मानण्याची बाब ठरली.
पर्यवेक्षकांची नितांत गरज होती आणि त्यामुळे मी तुटपुंजे स्पॅनिश बोलू शकत होतो तरी देखील मी एका महिन्यामध्ये छोट्या गटाची काळजी घेऊ लागलो. आमचे कामाचे स्वरूप गुप्त असल्याकारणाने आम्हाला १५ ते २० प्रचारकांच्या छोट्या गटांमध्ये संघटित करण्यात आले होते आणि त्यांनी कमी-अधिक प्रमाणात छोट्या मंडळ्याप्रमाणे कार्य केले. सुरवातीला, मला श्रोत्यांच्या उत्तरांचे आकलन नेहमीच होत नसल्यामुळे सभांना चालविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागली. तथापि, माझी पत्नी मागे बसत असे आणि मी गोंधळात पडल्याचे तिच्या लक्षात येताच उत्तर बरोबर आहे याची खात्री पटविण्यासाठी ती होकारार्थी मान हालवत असे.
मला भाषा अवगत करण्याची नैसर्गिक देणगी नाही आणि त्यामुळे अनेकदा मी इंग्लडला परतण्याचा विचार केला जेथे मी सर्वकाही अगदी सहजपणे करू शकत होतो. तथापि, सुरवातीपासूनच आपल्या प्रिय स्पॅनिश बंधू आणि भगिनींच्या प्रेमाने आणि मित्रत्त्वाने भाषेच्या बाबतीतील माझी नैराश्येची पोकळी भरून काढली. यहोवाने मला खास विशेषाधिकारांनी आशीर्वादित केले आणि या सर्व प्रयत्नांचे सार्थक झाल्याचे मला वाटले. मला १९५८ मध्ये न्यूयॉर्क येथील आंतरराष्ट्रीय अधिवेशनाला स्पेनचा प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. त्यानंतर १९६२ मध्ये टॅन्जीअर, मोरोक्को येथे आमच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्य सेवा प्रशालेमार्फत मला अनमोल प्रशिक्षण प्राप्त झाले.
भाषेशिवाय दुसऱ्या समस्येचा मी सामना केला आणि ती पोलिसांकडून अटक होण्याची कायम भीती ही होती. परदेशी असल्याने अटक म्हणजेच आपोआप हद्दपार होणे हे मला ठाऊक होते. धोका टाळण्यासाठी आम्ही दोघादोघांनी कार्य केले. एक साक्षकार्य करत असताना दुसरा धोक्याच्या चिन्हाकडे लक्ष देत असे. बहुतेकवेळा अपार्टमेंटच्या वरच्या मजल्यावरील एक किंवा दोन घरांना भेटी दिल्यानंतर आम्ही दोन-तीन ब्लॉक सोडून पुढील दोन वा तीन घरांना भेटी देत होतो. आम्ही बायबलचा जास्तीत जास्त वापर केला आणि आम्ही फक्त काही पुस्तिका कोटाच्या आतील बाजूला लपवून आस्थेवाईकांना सादर करण्यासाठी नेत होतो.
मॅडरिड येथील एका वर्षानंतर आमची नियुक्ती एकही साक्षीदार नसलेल्या स्पेनच्या वायव्येकडील वायगो या मोठ्या शहरामध्ये करण्यात आली. पहिल्या किंवा काही महिन्यापर्यंत माझ्या पत्नीने, आम्ही पर्यटक या नात्याने भेटी देत आहोत असे भासवून—अधिकांश साक्षकार्य करावे अशी शिफारस संस्थेने केली होती. गाजावाजा न होणे हा हेतू असताना देखील आमच्या प्रचाराने लक्ष वेधले. एका महिन्यामध्येच कॅथलिक पाळकांनी रेडिओच्या माध्यमाने आमच्यावर दोषारोप करण्यास सुरवात केली. एक विवाहित दांपत्य घरोघरी जाते आणि बायबल—त्याकाळातील निर्बंधनात्मक पुस्तक याबद्दल बोलते याची त्यांच्या प्रदेशात राहणाऱ्यांना त्यांनी ताकीद दिली. “पाहिजे असणारे जोडपे” ज्यामध्ये परदेशी आणि प्रामुख्याने संभाषण करणारी त्याची पत्नी होती!
या भयंकर जोडप्याबरोबर केवळ बोलणे पाप असून ते पाळकाला तत्काळ कबूल केले तरच त्याची क्षमा होईल अशाप्रकारचा हुकुमनामा पाळकांनी काढला. अपेक्षा केल्याप्रमाणे आम्ही एका महिलेबरोबर आनंदमय संभाषण केले आणि तिने दिलगिरीने हे व्यक्त केले, की पाप कबूल करण्यासाठी तिला जावे लागेल. आम्ही तिच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तिला चर्चकडे घाईने जाताना आम्ही पाहिले.
हद्दपार
वायगो येथे पोहंचून नुकतेच दोन महिने झाले होते आणि पोलिसांनी आम्हाला अनपेक्षितपणे गाठले. आम्हाला अटक करणाऱ्या पोलिसाकडे सहानुभूती असल्यामुळे पोलिस ठाण्यात नेताना त्याने आम्हाला हातबेड्या घातल्या नाहीत. ठाण्यामध्ये आम्हाला परिचयाचा चेहरा दिसला; ती एक टायपिस्ट होती आणि तिला अलीकडेच आम्ही साक्ष दिली होती. आम्हाला गुन्हेगारांप्रमाणे वागणूक देत असल्याचे पाहून ती खूपच अस्वस्थ झाली आणि तिने आमची फिर्याद नोंदविली नाही हे सांगण्यासाठी तिने त्वरा केली. तथापि, “स्पेनची आध्यात्मिक एकता” धोक्यात आणण्याचा आरोप आमच्यावर ठेवण्यात आला आणि सहा सप्ताहानंतर आम्हाला हद्दपार करण्यात आले.
ती एक माघार होती; परंतु हार मानण्याचा आमचा विचार नव्हता. आयबेरिअन पेनिन्सूला येथे अजूनही पुष्कळ कार्य करण्याचे बाकी होते. टॅन्जिअर येथील तीन महिन्यानंतर आमची नियुक्ती जिब्राल्टर—कार्य न झालेल्या आणखी एका क्षेत्रामध्ये करण्यात आली. प्रेषित पौल म्हणतो त्याप्रमाणे आपण सेवेचे मोल जाणले तर आपण सेवा कायम करीत राहू आणि आपल्याला त्याचे प्रतिफळ मिळेल. (२ करिंथकर ४:१, ७, ८) आमच्या बाबतीत हे खरे ठरले. जिब्राल्टर येथे आम्ही पहिल्याच घरी भेट दिली आणि संपूर्ण कुटुंबासमवेत बायबल अभ्यास सुरु केला. लवकरच आम्ही प्रत्येकी १७ बायबल अभ्यास संचालित करीत होतो. आमच्या बरोबर अभ्यास करणाऱ्यांपैकी अनेकजण साक्षीदार झाले आणि दोन वर्षांनतर तेथे २५ प्रचारकांची एक मंडळी होती.
परंतु वायगो प्रमाणे येथे देखील पाळकांनी आमच्या विरूद्ध एक मोहीम सुरु केली. जिब्राल्टर येथील अँग्लिकन बिशप याने पोलिसांच्या प्रमुखास ताकीद दिली, की आम्ही “अमान्य” आहोत आणि त्याच्या ह्या प्रभावाचे अवांतर परिणाम उमटले. आम्हाला जानेवारी १९६२ मध्ये जिब्राल्टर मधून हद्दपार करण्यात आले. त्यानंतर आम्ही कोठे जाणार होतो? स्पेनमध्ये अजूनही फार मोठी निकड असल्यामुळे आमची मागील पोलिस कार्यवाही स्थगित झाली असेल या आशेने आम्ही परत आलो.
निरभ्र सेवीली हे आमचे नवे घर होते. दुसरे एक पायनियर जोडपे रे आणि पॅट कॅरक्प यांच्यासह काम करण्याद्वारे आम्हाला आनंद मिळाला. सेवीली हे शहर पाच लाख लोकसंख्येचे असले तरी तेथे केवळ २१ प्रचारक होते म्हणून तेथे करण्यासाठी पुष्कळ कार्य होते. आता तेथे १५ मंडळ्या आणि १,५०० प्रचारक आहेत. एका वर्षानंतर आम्हाला आनंदाचा धक्काच बसला कारण बारसिलोना क्षेत्रामध्ये प्रवासी कार्यात सेवा करण्यासाठी आम्हाला निमंत्रण देण्यात आले होते.
आमच्या विभागीय कार्याची कायदेशीररीत्या नोंद घेण्यात न येणाऱ्या प्रदेशामध्ये कार्य करणे असामान्यच होते. प्रत्येक सप्ताहामध्ये आम्ही लहान गटांना भेटी दिल्या आणि बहुसंख्य गटांमध्ये पात्र असणारे बांधव फारच अल्प होते. या कठीण परिश्रम करणाऱ्या बांधवांना संपूर्ण प्रशिक्षणाची आणि आधाराची गरज होती आणि आम्ही ती भागवू शकत होतो. आम्ही या नियुक्तीवर प्रेम केले! थोडकेच किंवा एकही साक्षीदार नसलेल्या क्षेत्रांमध्ये पुष्कळ वर्षे काम केल्यानंतर अनेक विभिन्न बंधू आणि भगिनींना भेटी देण्याद्वारे आम्हाला आनंद प्राप्त झाला. शिवाय, बारसिलोना मधील प्रचार कार्य सहज होते आणि अनेक लोकांना बायबल अभ्यास करण्याची इच्छा होती.
नैराश्याला लढा देणे
तथापि, केवळ सहा महिन्यांनंतर माझे जीवन नाट्यमयरीत्या बदलले. सुरवातीला वर्णन केल्याप्रमाणे माझा अपघात झाला तेव्हा समुद्रकिनाऱ्यावरील आमचा सुट्टीचा पहिला दिवस शोककारकच ठरला. बुडण्याच्या भीतीने बसलेला धक्क्यातून मी शारीरिकरीत्या लवकरच सावरलो परंतु या अपघाताने माझ्या चेता संस्थेवर स्थायी परिणाम केला.
विभागीय कार्य कायम ठेवण्यासाठी काही महिने मी सर्वंकष प्रयत्न केला; परंतु अखेरीस वैद्यकीय उपचारासाठी मला इंग्लडला परतावे लागले. दोन वर्षांनंतर मी पुरेसा बरा झाल्यानंतर आम्ही स्पेनला परत आलो आणि तेथे आम्ही पुन्हा एकदा विभागीय कार्यास सुरवात केली. तथापि, हे अगदी अल्प काळासाठी ठरले. माझ्या पत्नीचे पालक गंभीररीत्या आजारी पडले आणि आम्हाला त्यांची काळजी घेण्यासाठी इच्छा नसताना पूर्ण-वेळची सेवा सोडून द्यावी लागली.
माझी चेतासंस्था १९६८ मध्ये पूर्णपणे निकामी झाल्याने जीवन आणखीनच कठीण होऊन बसले. मी केव्हाही बरा होणार नाही असे त्यावेळी रॅफेलाला आणि मला अनेकदा वाटले. मी पुन्हा बुडत असल्याप्रमाणे हे होते; परंतु एका वेगळ्याप्रकारे! नकारात्मक भावनांनी मी अगदी ग्रासून गेलो होतो त्याशिवाय नैराश्याने माझी संपूर्ण शक्ती हिरावून घेतली. मला अतिशय थकव्याने त्रास झाला आणि त्यामुळे नियमितपणे विश्राम घेण्यास मला भाग पडले. यावेळी सर्वच बांधवांना या समस्येचे आकलन झाले नाही; परंतु यहोवाला याची जाणीव होती हे मला ठाऊक होते. टेहळणी बुरुज आणि सावध राहा! या नियतकालिकातील विस्मयकारक लेख वाचणे माझ्यासाठी फारच समाधानाचे ठरले आहे कारण निराश असणाऱ्यांना उत्तमपणे समजण्यास आणि मदत करण्यास ते उपयुक्त आहेत.
या संपूर्ण कठीण काळात माझी पत्नी प्रोत्साहनाचा कायम स्रोत होती. समस्येला एकत्र मिळून तोंड देण्याद्वारे विवाहाचे बंधन खरोखरच मजबूत होते. रॅफेलाचे पालक मरण पावले आणि १२ वर्षांनंतर आम्ही पूर्ण-वेळेच्या सेवेत पुन्हा जाऊ शकू असे वाटण्याइतपत माझी प्रकृती सुधारली. आनंदाची आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आम्हाला १९८१ मध्ये पुन्हा एकदा विभागीय कार्यासाठी बोलावण्यात आले.
आमच्या गत प्रवासी सेवेच्या अनुभवानंतर आता स्पेनमध्ये मोठ्या प्रमाणात ईश्वरशासित बदल झाले होते. प्रचारास आता मोकळीक होती आणि म्हणून मला नवीन परिस्थितीशी परिचित व्हावे लागले. तथापि, विभागीय पर्यवेक्षक या नात्याने सेवा करणे हा पुन्हा एकदा मिळालेला मोठा विशेषाधिकार होता. आम्ही कठीण परिस्थिती असताना देखील पायनियरींग करत राहिल्यामुळे समस्याग्रस्त पायनियरांना उत्तेजन देण्यास आम्हाला शक्य झाले. पायनियरच्या दर्जांमध्ये येण्यासाठी इतरांना आम्ही वारंवार मदत केली.
मॅडरिड आणि बारसिलोना येथील ११ वर्षांच्या प्रवासी कार्यानंतर पुन्हा एकदा आमच्या ढासळत्या प्रकृतीने नियुक्तीमध्ये बदल घडविण्यास भाग पाडले. आम्हाला सॅलेमॅनका शहरामध्ये खास पायनियर म्हणून नियुक्त करण्यात आले आणि तेथे मी वडील या नात्याने उपयोगी होतो. सॅलेमेनका येथील बांधवांनी आमचे तत्काळ स्वागत केले. एका वर्षानंतर आणखी एका कठीण प्रसंगाने आमच्या सहनशीलतेची परीक्षा घेतली.
रॅफेला दुर्बोधरीत्या अतिशय अशक्त झाली आणि चाचणी केल्यानंतर तिला मोठ्या आतड्याचा कर्क असल्याचे निष्पन्न झाले. आता मला बळकट होण्याची आणि माझ्या पत्नीला शक्य होईल तेवढा आधार देण्याची गरज होती. आम्ही पहिल्यांदा यावर विश्वासच ठेवला नाही आणि त्यानंतर आम्हाला फारच भीती वाटली. रॅफेला यातून बचावली का? अशाप्रकारच्या प्रसंगांमध्ये, यहोवावरील पूर्ण विश्वास आपल्याला सेवा कायम करत राहण्यास मदत करतो. मला हे सांगण्यास आनंद होतो, की रॅफेलाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि कर्क पुन्हा उद्भवणार नाही अशी आमची आशा आहे.
स्पेनमध्ये घालविलेल्या ३६ वर्षांमध्ये आम्ही अनेक चढ-उतार पाहिले; तरीदेखील या आध्यात्मिक वाढीच्या समयामध्ये जगणे हे आनंदाचे ठरले आहे. आम्ही १९५८ मध्ये सुमारे ८०० प्रचारकांच्या लहान गटाची आज १,००,००० पेक्षा अधिक प्रचारकांच्या मोठ्या संख्येपर्यंत वृद्धी झाल्याचे पाहिले आहे. आमचा आनंद—इतरांना सत्य स्वीकारण्यास आणि आध्यात्मिकतेत प्रौढ होण्यास मदत करणे, पती आणि पत्नी या नात्याने एकत्र कार्य करणे आणि आमचे जीवन सर्वोत्तम पद्धतीने व्यतीत केल्याची भावना, यामुळे आमच्या समस्या नामोहरम झाल्या.
पौल करिंथकरांना लिहिलेल्या त्याच्या दुसऱ्या पत्रात म्हणतो: “आम्हावर झालेल्या दयेनुसार ही सेवा आम्हाला देण्यात आली आहे, म्हणून आम्ही धैर्य सोडीत नाही.” (२ करिंथकर ४:१) सिंहावलोकन केल्यानंतर, हार मानण्याचे टाळण्यासाठी माझ्या जीवनामध्ये अनेक घटक होते यावर माझा विश्वास आहे. विश्वासू अभिषिक्त बांधवांच्या उदाहरणाने माझ्या विकासाच्या वर्षांमध्ये आस्था घेण्याद्वारे उत्तम पाया घातला. समान आध्यात्मिक ध्येयामध्ये सहभागिता करणारा सोबती लाभणे ही एक उत्तम मदत आहे; जेव्हा मला निराश झाल्याचे वाटत होते तेव्हा रॅफेला मला उत्तेजन देत होती आणि मी देखील तिच्याबाबतीत हेच केले. हास्यजनक रस हा देखील प्रमुख घटक आहे. बांधवांबरोबर हसणे—आणि स्वतःवर हसणे हे शक्य झाल्यामुळे जेमतेम समस्यांची गंभीरता तरी कमी होते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, परीक्षांना तोंड देताना सहनशील असण्यासाठी यहोवाच्या सामर्थ्याची आवश्यकता आहे. मला पौलाचे शब्द नेहमी आठवतात: “मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे.” यहोवा आपल्या बाजूने असताना आपल्याला कधीही हार मानण्याची गरज नाही.—फिलिप्पैकर ४:१३.
[२३ पानांवरील चित्रं]
रोनाल्ड आणि रॅफेला टेलर १९५८ मध्ये
[२४ पानांवरील चित्रं]
बंदी असताना स्पेनमध्ये (१९६९) एकत्रित होणे