यहोवाविषयीचा आनंद आपला आश्रयदुर्ग आहे
“आजचा दिवस परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र आहे; तुम्ही उदास राहू नका; कारण परमेश्वराविषयीचा [यहोवा, NW] जो आनंद तोच तुमचा आश्रयदुर्ग होय.”—नहेम्या ८:१०.
१, २. (अ) आश्रयदुर्ग काय आहे? (ब) दाविदाने यहोवामध्ये आश्रय घेतल्याचे कसे प्रदर्शित केले?
यहोवा हा अतुलनीय आश्रयदुर्ग आहे. आश्रयदुर्ग म्हणजे काय आहे? ते सुरक्षितता किंवा बचावाचे तटबंदी केलेले ठिकाण आहे. प्राचीन इस्राएलच्या दाविदाने देवाला आपला आश्रयदुर्ग मानले. उदाहरणार्थ, “परमेश्वराने [यहोवा, NW] . . . त्याच्या सर्व वैऱ्यांच्या हातून व [इस्राएलचा राजा] शौलाच्या हातून सोडविले त्या दिवशी” दाविदाने परात्पराला उद्देशून केलेल्या गीताचा विचार करा.—स्तोत्र १८, मायना.
२ दाविदाने त्या उद्दीपित करणाऱ्या गीताची सुरवात या शब्दात केली: “हे परमेश्वरा, [यहोवा, NW] माझ्या सामर्थ्या, मी तुझ्यावर प्रेम करितो. परमेश्वर माझा दुर्ग, माझा गड, मला सोडविणारा, माझा देव, माझा खडक आहे, त्याचा आश्रय मी करितो; तो माझे कवच, माझ्या रक्षणाचे बळकट साधन, माझा उंच बुरूज आहे.” (स्तोत्र १८:१, २) एखादी व्यक्ती एखाद्या विपत्तीपासून वाचण्यासाठी तटबंदी केलेल्या एका ठिकाणी पळून जाईल, त्याचप्रमाणे शौल राजाने अन्यायाने विधि बहिष्कृत केल्यावर व पिच्छा केल्यावर सरळ मनाच्या दाविदाने यहोवामध्ये आश्रय घेतला.
३. एज्राच्या दिवसातील यहुद्यांनी “मोठा आनंद” का अनुभवला?
३ त्याच्या मार्गात सचोटी राखणारे या नात्याने चालणाऱ्यांना यहोवा जो आनंद देतो तो न ढळणारा आश्रयदुर्ग आहे. (नीतीसूत्रे २:६-८; १०:२९) अर्थात, देवाने दिलेला आनंद असण्यासाठी लोकांनी ईश्वरी इच्छा आचरली पाहिजे. या बाबतीत, सा. यु. पू. ४६८ मध्ये जेरूसलेममध्ये काय झाले त्याचा विचार करा. नक्कलाकार एज्रा व इतरांनी नियमशास्त्राच्या अर्थपूर्ण वाचनाद्वारे समज दिली. त्यानंतर लोकांना आर्जवण्यात आले: “जा, मिष्टान्नाचे सेवन करा, गोडगोड पेये प्या व ज्यांच्या घरी काही तयार नसेल त्यांस वाढून पाठवा; कारण आजचा दिवस परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र आहे; तुम्ही उदास राहू नका; कारण परमेश्वराविषयीचा जो आनंद तोच तुमचा आश्रयदुर्ग होय.” यहुद्यांनी प्राप्त केलेले ज्ञान अवलंबिल्यावर व मांडवांचा आनंददायक सण साजरा केल्यावर “मोठा आनंद [NW]” परिणामित झाला. (नहेम्या ८:१-१२) ज्यांना ‘यहोवाविषयीचा आनंद त्यांचा आश्रयदुर्ग असा होता’ त्यांनी त्याच्या उपासनेसाठी व सेवेसाठी शक्ती एकवटली. यहोवाचा आनंद त्यांचा आश्रयदुर्ग असल्यामुळे, देवाच्या लोकांनी आज देखील आनंदी असण्याची अपेक्षा आपण केली पाहिजे. तर मग, सद्य काळातील त्यांच्या आनंदाची काही कारणे कोणती आहेत?
“अत्यानंद”
४. यहोवाच्या लोकांसाठी आनंदाचा एक उल्लेखनीय उगम कोणता आहे?
४ यहोवा एकत्र मिळण्यासाठी जी तरतूद करतो ते आनंदाचे एक उल्लेखनीय कारण आहे. वार्षिक सण साजरे केल्यावर ज्याप्रमाणे इस्राएल लोकांच्या अंतःकरणांना आनंद प्राप्त होत असे त्याचप्रमाणे आज यहोवाच्या साक्षीदारांची संमेलने आणि अधिवेशनांमुळे त्यांनाही आनंद मिळतो. इस्राएल लोकांना सांगण्यात आले होते: “जे स्थान [यहोवा] निवडील तेथे तू आपला देव [यहोवा] ह्याच्याप्रीत्यर्थ सात दिवस [मांडवांचा] सण पाळावा, कारण तुझे सर्व उत्पन्न व तू हाती घेतलेली कामे ह्यात तुझा देव [यहोवा] ह्याने तुला बरकत दिल्यामुळे तुला अत्यानंद होईल.” (अनुवाद १६:१३-१५) होय, त्यांना ‘अत्यानंद व्हावा’ अशी देवाची इच्छा होती. ख्रिश्चनांबद्दलही हीच गोष्ट खरी आहे, कारण प्रेषित पौलाने सह-विश्वासूंना आर्जवले: “प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा म्हणेन, आनंद करा!”—फिलिप्पैकर ४:४.
५. (अ) आनंद काय आहे आणि ख्रिस्ती तो कसा मिळवतात? (ब) परीक्षा असताना देखील आपण आनंदी कसे असू शकतो?
५ आपण आनंदी असावे अशी यहोवाची इच्छा असल्यामुळे, त्याच्या पवित्र आत्म्याचे एक फळ म्हणून तो आपल्याला आनंद प्रदान करतो. (गलतीकर ५:२२, २३) आणि आनंद काय आहे? ती, चांगल्याची अपेक्षा आणि संपादन केल्याने मिळणारी सुखदायक भावना आहे. आनंद ही खऱ्या हर्षाची स्थिती किंवा अत्यानंद देखील आहे. देवाच्या पवित्र आत्म्याचे हे फळ परीक्षेच्या वेळी आपल्याला टिकवून ठेवते. “जो आनंद त्याच्यापुढे [येशूपुढे] होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला, आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे.” (इब्रीयांस १२:२) शिष्य याकोबाने लिहिले: “माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हास ठाऊक आहे की, तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो.” परंतु आपल्याला एखाद्या विशिष्ट परीक्षेमध्ये काय करावे हे माहीत नसल्यास काय? मग तिचा सामना करण्यासाठी आपण खात्रीने बुद्धीसाठी प्रार्थना करू शकतो. स्वर्गीय बुद्धीच्या एकवाक्यतेत कार्य केल्याने, आपल्याला यहोवाचा आनंद न गमावता समस्या सोडवण्यास किंवा चिरस्थायी परीक्षांना तोंड देण्यासाठी मदत मिळते.
६. आनंद आणि खरी उपासना यामध्ये कोणता संबंध आहे?
६ यहोवा देत असलेला आनंद, आपल्याला खरी उपासना वाढवण्यासाठी बळकट करतो. नहेम्या आणि एज्राच्या काळात हेच घडले. यहोवाविषयीचा आनंद ज्यांचा आश्रयदुर्ग होता असे त्या काळातील यहुदी खऱ्या उपासनेची आस्था वाढवण्यासाठी बळकट झाले. त्यांनी यहोवाच्या उपासनेला हातभार लावला तसा त्यांचा आनंद वाढला. आजही हेच खरे आहे. यहोवाचे उपासक या नात्याने आपल्याला अधिक आनंद करण्यासाठी कारण आहे. आनंद करण्यासाठी आपल्याकडे असलेल्या आणखी काही कारणांचा आपण आता विचार करू या.
ख्रिस्ताद्वारे देवासोबतचे नातेसंबंध
७. यहोवाच्या बाबतीत, ख्रिश्चनांना आनंदासाठी कोणते कारण आहे?
७ यहोवाबरोबरील आपला निकटचा नातेसंबंध आपल्याला पृथ्वीवरील सर्वात आनंदी लोक बनवतो. आपण ख्रिस्ती बनण्याआधी, ‘बुद्धी अंधकारमय झालेल्या आणि देवाच्या जीवनाला पारखे झालेल्या’ अधार्मिक मानवी संस्थेचा भाग होतो. (इफिसकर ४:१८) आपण आता यहोवापासून पारखे झालेलो नाही यासाठी आपण किती उल्लसित आहोत! अर्थात, त्याच्या कृपेत राहण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आपण ‘विश्वासात स्थिरावलेले व अढळ राहता त्या सुवार्तेच्या आशेपासून ढळू नये.’ (कलैस्सकर १:२१-२३) येशूच्या स्वतःच्या शब्दांनुरूप यहोवाने आपल्याला त्याच्या पुत्राकडे आकर्षिले आहे याबद्दल आपण आनंद करू शकतो: “ज्याने मला पाठविले त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीहि माझ्याकडे येऊ शकत नाही.” (योहान ६:४४) ख्रिस्ताद्वारे देवाबरोबरील मौल्यवान नातेसंबंधाची आपण खरोखरच गुणग्राहकता बाळगत असल्यास, तो बिघडून टाकणाऱ्या कोणत्याही गोष्टीबद्दल आपण सावध राहू.
८. येशूने आपल्या आनंदी स्थितीला कसा हातभार लावला आहे?
८ येशूच्या खंडणी बलिदानावर विश्वास ठेवण्याकरवी पापांची क्षमा होणे हे आनंदाचे मोठे कारण आहे कारण यामुळेच देवासोबत आपला नातेसंबंध शक्य होतो. आपला पूर्वज आदाम याने स्वेच्छेने पापाचे मार्गाक्रमण केल्याने, सबंध मानवजातीवर मृत्यू ओढवला. तथापि, प्रेषित पौलाने असे स्पष्ट केले: “देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला.” पौलाने असेही लिहिले: “जसे एकाच अपराधामुळे सर्व माणसांना दंडाज्ञा होते, तसे नीतिमत्त्वाच्या एकाच निर्णयाने सर्व माणसांना जीवनदायी नीतिमत्त्व प्राप्त होते. कारण जसे त्या एकाच मनुष्याच्या आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरले होते, तसे ह्या एकाच मनुष्याच्या आज्ञापालनाने पुष्कळ जण नीतिमान ठरतील.” (रोमकर ५:८, १८, १९) जे अशा प्रेमळ तरतूदीचा उपयोग करतात त्या आदामाच्या संततीची सुटका करण्यासाठी देव संतुष्ट आहे याबद्दल आपण किती आनंदी असू शकतो!
धार्मिक स्वातंत्र्य आणि प्रज्वलितपणा
९. आपण धार्मिक दृष्टिकोनातून आनंदी का आहोत?
९ खोट्या धर्माचे जागतिक साम्राज्य, मोठी बाबेल, हिच्यातून स्वातंत्र्य मिळणे हे आनंदी असण्यासाठी आणखी एक कारण आहे. ईश्वरी सत्यानेच आपल्याला मुक्त केले आहे. (योहान ८:३२) आणि या धार्मिक वेश्येपासून स्वातंत्र्य मिळणे म्हणजे, तिच्या पापात आपण सहभागी नाही, तिच्या पीडा आपण अनुभवणार नाही व परिणामस्वरूप तिच्यासोबत नाश पावणार नाही. (प्रकटीकरण १८:१-८) त्या सर्व गोष्टींना चुकवण्यात दुःखाची कोणतीच गोष्ट नाही!
१०. यहोवाचे लोक या नात्याने आपण कोणता प्रज्वलितपणा उपभोगतो?
१० जीवनात देवाचे वचन समजणे आणि लागू करणे ही अधिक आनंद करण्याची कारणे आहेत. खोट्या धर्माच्या प्रभावापासून मुक्त असल्यामुळे, आपण ‘विश्वासू व बुद्धिमान दासाकरवी’ आपल्या स्वर्गीय पित्याने पुरवलेल्या व अधिकाधिक स्पष्ट होणाऱ्या आध्यात्मिक सूक्ष्मदृष्टीचा आनंद अनुभवतो. (मत्तय २४:४५-४७) पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व लोकांपैकी, केवळ यहोवाला एकनिष्ठतेने समर्पित असलेल्यांनाच त्याचा पवित्र आत्मा आहे आणि त्याच्या वचनाची व इच्छेची आशीर्वादित समज प्राप्त होते. ते पौलाने म्हटल्यानुसार आहे: ‘देवाने त्या [त्याच्यावर प्रीती करणाऱ्यांसाठी त्याने सिद्ध केलेल्या गोष्टी] आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रगट केले, कारण आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या गहन गोष्टींचाहि शोध घेतो.’ (१ करिंथकर २:९, १०) “धार्मिकांचा मार्ग मध्यान्हापर्यंत उत्तरोत्तर वाढणाऱ्या उदयप्रकाशासारखा आहे,” या नीतीसूत्रे ४:१८ च्या शब्दात सूचित केलेली प्रगतीशील समजूत आपण उपभोगत आहोत याबद्दल आपण कृतज्ञ आणि आनंदी देखील असू शकतो.
राज्य आशा आणि चिरकालिक जीवन
११. राज्याच्या आनंदी आशेची इतरांसोबत सहभागिता कशी करण्यात आली आहे?
११ आपली राज्य आशा देखील आपल्याला आनंदी बनवते. (मत्तय ६:९, १०) यहोवाचे साक्षीदार या नात्याने, देवाचे राज्य ही सर्व मानवजीतीसाठी एकमेव आशा आहे अशी घोषणा आपण बऱ्याच काळापासून केली आहे. उदाहरणार्थ, १९३१ या वर्षाचा विचार करा. त्यावेळी, सबंध जगभरात ५१ अधिवेशनांमध्ये आनंदाने जयघोष करून आपण एका ठरावाद्वारे यहोवाचे साक्षीदार हे नाव धारण केले होते. (यशया ४३:१०-१२) तो ठराव आणि (वॉचटावर संस्थेचे त्यावेळचे अध्यक्ष) जे. एफ. रदरफोर्ड यांचे अधिवेशनातील एक महत्त्वपूर्ण भाषण राज्य, जगाची आशा (इंग्रजी) या पुस्तिकेत प्रकाशित करण्यात आले होते. यामध्ये त्या अधिवेशनात स्वीकारलेला आणखी एक ठराव समाविष्ट होता. तो ख्रिस्ती धर्मजगतावर तिच्या धर्मत्यागाचा आणि यहोवाचा सल्ला तुच्छ लेखल्याबद्दलचा आरोप होता. त्याने असेही घोषित केले: “जगाची आशा देवाचे राज्य आहे, आणि त्याशिवाय इतर कोणतीही आशा नाही.” काही महिन्यातच, यहोवाच्या साक्षीदारांनी पृथ्वीच्या सर्व भागात या पुस्तिकेच्या ५० लाखापेक्षा अधिक प्रतींचे वितरण केले. तेव्हापासून आपण राज्य हीच मानवाची एकमेव आशा असल्याचे निग्रहाने सांगत आलो आहोत.
१२. यहोवाची सेवा करणाऱ्यांसमोर कोणती आनंदी जीवनाची भवितव्ये राखली आहेत?
१२ राज्य सत्तेखाली चिरकालिक जीवनाच्या भवितव्याबद्दलही आपल्याला आनंद होतो. अभिषिक्त ख्रिश्चनांच्या ‘लहान कळपाला’ आनंदी स्वर्गीय आशा आहे. प्रेषित पेत्राने लिहिले, “आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन मिळण्यासाठी, त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतातून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला . . . ते वतन स्वर्गात राखून ठेवले आहे.” (लूक १२:३२; १ पेत्र १:३, ४) आज, यहोवाच्या साक्षीदारांची मोठी संख्या, राज्यामध्ये नंदनवनातील सार्वकालिक जीवनाची उत्सुकतेने वाट पाहत आहे. (लूक २३:४३; योहान १७:३) पृथ्वीवरील इतर कोणत्याही लोकांकडे आपल्या आनंदी भवितव्यांसोबत तुलना करण्याजोगे काहीच नाही. त्यांना आपण कसे हृदयात जतन केले पाहिजे!
एक आशीर्वादित बंधुत्व
१३. आपल्या आंतरराष्ट्रीय बंधुत्वाला आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहावे?
१३ एकमात्र देव-स्वीकृत आंतरराष्ट्रीय बंधुत्वाचा भाग असणे देखील मोठ्या आनंदाचा उगम आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे, आपल्याला पृथ्वीवरील सर्वात इष्ट सोबती आहेत. स्वतः यहोवा देवाने आपल्या दिवसाकडे विशेषकरून लक्ष आकर्षिले व म्हटले: “मी सर्व राष्ट्रांस हालवून सोडीन म्हणजे सर्व राष्ट्रातील निवडक वस्तु येतील; आणि मी हे मंदिर वैभवाने भरीन.” (हाग्गय २:७) हे खरे की, सर्व ख्रिस्ती अपरिपूर्ण आहेत. तथापि, यहोवाने अशा व्यक्तींना येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याजवळ आणले आहे. (योहान १४:६) यहोवाने त्याला इष्ट वाटणाऱ्या व्यक्तींना जवळ केल्यामुळे, आपण त्यांना बंधुत्वाचे प्रेम दाखवले, त्यांची प्रशंसा केली, धार्मिक कार्यहालचालींमध्ये त्यांना सहयोग दिला, परीक्षेच्या काळी आधार दिला आणि त्यांच्याप्रीत्यर्थ प्रार्थना केली तर आपला आनंद वाढेल.
१४. आपण १ पेत्र ५:५-११ मधून कोणत्या उत्तेजनाचे अनुमान काढू शकतो?
१४ या सर्व गोष्टी आपल्या आनंदात अधिक भर टाकतील. खरेच, यहोवाविषयीचा आनंद हेच संपूर्ण पृथ्वीवरील आपल्या आध्यात्मिक बंधुत्वाचे आश्रयदुर्ग आहे. होय, आपण सर्वजण संकट आणि इतर कष्ट सहन करतो. परंतु पृथ्वीवरील देवाच्या एकाच खऱ्या संघटनेचा भाग या नात्याने या गोष्टींनी आपल्याला एकत्र आणले पाहिजे आणि एकतेची भावना निर्माण केली पाहिजे. पेत्राने म्हटल्यानुसार, आपण देवाच्या सामर्थ्यशाली हाताखाली लीन झाले पाहिजे आणि तो आपली काळजी घेईल हे जाणून आपल्या सर्व चिंता त्यावर टाकल्या पाहिजेत. दियाबल आपल्याला फाडून खाण्यास पाहत असल्यामुळे आपण सावध असले पाहिजे. परंतु असे करण्यात आपण एकटे नाही, कारण पेत्र म्हणतो: “त्याच्याविरुद्ध विश्वासात दृढ असे उभे राहा; कारण तुम्हाला माहीत आहे की, जगातील तुमच्या बंधुवर्गाला अशीच दुःखे भोगावी लागत आहेत.” तसेच हे आनंदी आंतरराष्ट्रीय बंधुत्व कधीच ढासळणार नाही कारण ‘आपण थोडा वेळ दुःख सोसल्यावर, देव स्वतः आपणास पूर्ण, दृढ व सबळ करील,’ ही खात्री आपल्याला आहे. (१ पेत्र ५:५-११) याचा विचार करा. आपले आनंदी बंधुत्व सर्वकाळासाठी टिकेल!
उद्देशयुक्त जीवन
१५. यहोवाच्या साक्षीदारांचे जीवन उद्देशपूर्ण आहे असे का म्हटले जाऊ शकते?
१५ आपले उद्देशपूर्ण जीवन असल्यामुळे या त्रस्त जगात आपल्याला आनंद प्राप्त होतो. आपल्याला अशी सेवा बहाल करण्यात आली आहे जी आपल्याला तसेच इतरांना आनंदी बनवते. (रोमकर १०:१०) देवाचे सह-कामकरी असणे हा निश्चितच एक आनंदी विशेषाधिकार आहे. याबाबत पौलाने म्हटले: “अपुल्लोस कोण? आणि पौल कोण? ज्यांच्या द्वारे तुम्ही विश्वास ठेवला असे ते सेवक आहेत; ज्याला त्याला प्रभूने दिल्याप्रमाणे ते आहेत. मी लावले, अपुल्लोसाने पाणी घातले, पण देव वाढवीत गेला. म्हणून लावणारा काही नाही आणि पाणी घालणाराहि काही नाही; तर वाढविणारा देव हाच तो काय आहे. लावणारा व पाणी घालणारा हे एकच आहेत, तरी प्रत्येकाला आपआपल्या श्रमाप्रमाणे आपआपली मजुरी मिळेल. कारण आम्ही देवाचे सहकारी आहो; तुम्ही देवाचे शेत, देवाची इमारत असे आहा.”—१ करिंथकर ३:५-९.
१६, १७. यहोवाच्या लोकांचे उद्देश असलेले आनंदी जीवन आहे हे सिद्ध करण्यासाठी कोणती उदाहरणे दिली जाऊ शकतात?
१६ विश्वासू राहून यहोवाची सेवा केल्याने आपल्याला आनंदाने भरून टाकणारे उद्देशपूर्ण जीवन संभवते हे दाखवण्यासाठी पुष्कळ उदाहरणे देता येतील. हे एक नमुनेदार विधान आहे: “मी भरलेल्या सभागृहावर [त्याच्या समर्पण कार्यक्रमाच्या दिवशी] एक नजर फिरवली आणि माझ्या कुटुंबातील आठ सदस्यांना उपस्थित असल्याचे पाहू शकलो. त्यात मी व माझी पत्नी, आमची तीन मुले व त्यांचे सोबती समाविष्ट होते. . . . देवाच्या सेवेत मी व माझ्या पत्नीने खरोखरच एक आनंदी, उद्देशपूर्ण जीवन व्यतीत केले आहे.”
१७ एखादी व्यक्ती कोणत्याही वयात यहोवाच्या सेवेत खऱ्या उद्देशाचे आनंदी जीवन सुरु करू शकते हे जाणणे देखील उल्लसित करणारे आहे. उदाहरणार्थ, एका शुश्रूषा गृहात बायबल सत्य शिकलेल्या एका स्त्रीने वयाच्या १०२ व्या वर्षी यहोवाची साक्षीदार या नात्याने बाप्तिस्मा घेतला. अशाप्रकारे तिने आनंदी उद्देशाने, ‘देवाचे भय धरून व त्याच्या आज्ञा पाळून’ तिचे जीवन पूर्ण केले.—उपदेशक १२:१३.
अढळ आश्रयदुर्ग
१८. निराशेवर मात करण्यासाठी आणि आपला आनंद वाढवण्यासाठी काय केले जाऊ शकते?
१८ यहोवाविषयीचा आनंद विश्वासू जणांकरता अढळ आश्रयदुर्ग आहे. तथापि, हा आनंद असण्याचा अर्थ, येशूला गेथशेमानेमध्ये, “माझ्या जिवाला मरणप्राय अति खेद झाला आहे,” असे म्हणण्यास प्रवृत्त केलेला दुःखाचा काळ आपल्यावर कधीच येणार नाही असा होत नाही. (मार्क १४:३२-३४) स्वार्थी ध्येयांना आपण बळी पडल्यामुळे निराशा परिणामित झाली असेल असे समजा. मग आपण आपली जीवन-शैली बदलू या. आपण निःस्वार्थाने आध्यात्मिक जबाबदाऱ्यांचा भारी बोजा वाहत असल्यामुळे आपला आनंद नाहीसा झाला असेल, तर कदाचित तणाव कमी करणाऱ्या आणि आपला आनंदी आत्मा पुन्हा स्थापित करणाऱ्या तडजोडी आपण करू शकतो. त्याशिवाय, आपण पापी शरीराचा, दुष्ट जगाचा आणि दियाबलाचा जोराने प्रतिकार करून यहोवाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला तर तो आपल्याला आनंद लाभण्याचा आशीर्वाद देईल.—गलतीकर ५:२४; ६:१४; याकोब ४:७.
१९. देवाच्या संघटनेत आपल्याला असणाऱ्या विशेषाधिकारांबद्दल आपण कोणता दृष्टिकोन बाळगावा?
१९ आपण चर्चिलेल्या तसेच इतर अनेक कारणांसाठी आपल्याला आनंद होतो. आपण मंडळीतील प्रचारक असलो किंवा पूर्ण-वेळेच्या इतर कोणत्याही प्रकारात सहभागी असलो तरी आपल्या सर्वांजवळ प्रभूच्या कार्यात पुष्कळ करण्याजोगे आहे व हे नक्कीच आपल्या आनंदात भर टाकील. (१ करिंथकर १५:५८) यहोवाच्या संघटनेत आपल्याजवळ जे काही विशेषाधिकार आहेत त्याबद्दल आपण आभारी राहू या आणि हर्षाने आपल्या प्रेमळ, आनंदी देवाची पवित्र सेवा करीत राहू या.—१ तीमथ्य १:११.
२०. आपला सर्वात मोठा विशेषाधिकार कोणता आहे आणि आपण कशाबद्दल निश्चित असू शकतो?
२० यहोवाचे साक्षीदार या नात्याने त्याचे महान नाम धारण करण्याचा विशेषाधिकार असण्याबद्दल आपल्याला आनंद करण्यास विशेष कारण आहे. होय, आपण अपरिपूर्ण आहोत आणि आपल्याला पुष्कळ परीक्षांना तोंड द्यावे लागते, परंतु यहोवाचे साक्षीदार या नात्याने आपले आश्चर्यकारक आशीर्वाद लक्षात ठेवू या. आणि हे आठवणीत ठेवा की, आपला प्रिय स्वर्गीय पिता आपल्याला कधीही निराश करणार नाही. यहोवाविषयीचा आनंद आपला आश्रयदुर्ग असल्यास, आपल्याला नेहमीच आशीर्वादित केले जाईल याची खात्री आपण बाळगू शकतो.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
▫ ‘यहोवाविषयीचा आनंद’ काय आहे?
▫ ख्रिस्ती खरा आनंद कसा प्राप्त करतात?
▫ यहोवाचे साक्षीदार आनंदी असल्याची काही कारणे कोणती आहेत?
▫ यहोवाविषयीचा आनंद एक अढळ आश्रयदुर्ग का आहे?