सत्वनिष्ठा राखणारे राष्ट्र
“वेशी उघडा म्हणजे सत्याचे पालन करणारे धार्मिक राष्ट्र आत येईल.”—यशया २६:२.
१. ‘धार्मिक राष्ट्राविषयीचे’ यशयाचे विधान आश्चर्यकारक का आहे?
आज सर्व प्रकारची राष्ट्रे आहेत. काही लोकशाहीची तर काही हुकुमशाही असलेली. काही श्रीमंत तर काही गरीब. एक गोष्ट मात्र त्यांच्या सारखीच दिसते: ते सर्व, ज्याचा देव सैतान आहे त्या जगाचे भाग आहेत. (२ करिंथकर ४:४) यावरुन, यशयाचे शब्द एखाद्याला आश्चर्याचे वाटतील कारण तो म्हणतो: “वेशी उघडा म्हणजे सत्याचे पालन करणारे धार्मिक राष्ट्र आत येईल.” (यशया २६:२) एक धार्मिक राष्ट्र? होय, ते एक धार्मिक राष्ट्र आहे, कारण हा भविष्यवाद धार्मिक राष्ट्राच्या अस्तित्वाला सूचित करतो. या असामान्य राष्ट्राला कसे ओळखता येऊ शकते बरे?
२. “धार्मिक राष्ट्र” काय आहे? ते आपल्याला कसे माहीत होते?
२ न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन यामध्ये यशया २६:२ चा अनुवाद “विश्वासू आचरण ठेवणारे” राष्ट्र, असा केला आहे. पं. रमाबाई भाषांतर त्याचा अनुवाद “न्यायी राष्ट्र सत्य पाळते” असा करते. दोन्ही वर्णन योग्यच आहेत. वस्तुतः, धार्मिक राष्ट्राला सहज ओळखता येते कारण पृथ्वीच्या पाठीवर केवळ हेच एक राष्ट्र ख्रिस्त राजाच्या अधीन असणारे आहे आणि म्हणूनच ते सैतानाच्या जगाचा भाग नाही. (योहान १७:१६) अशाप्रकारे, त्याचे सदस्य ‘परराष्ट्रीयांत आपले आचरण चांगले ठेवण्याच्या बाबतीत’ परिचित आहेत. देवाची महिमा करणारी जीवन शैली ते अनुसरतात. (१ पेत्र २:१२) शिवाय, जगात कोठेही असले तरी “सत्याचा स्तंभ व पाया अशी जी जिवंत देवाची मंडळी आहे” तिचा ते भाग आहेत. (१ तीमथ्य ३:१५) सत्याला पुष्टी देत, ते ख्रिस्ती धर्मजगताने शिकवलेले मूर्तिपूजक तत्त्वज्ञान नाकारतात आणि वचनाच्या—देवाचे वचन बायबलच्या “निऱ्या दुधाची” बाजू घेतात. (१ पेत्र २:२) आणखी, ते “आकाशाखालच्या सर्व सृष्टीत” आवेशाने राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करतात. (कलस्सैकर १:२३) हे राष्ट्र ‘देवाचे इस्राएल’ यांच्या शेषांनी, अभिषिक्त ख्रिश्चनांच्या मंडळीचे मिळून तयार झाले आहे यात काही संशय आहे का? कदापि नाही!—गलतीकर ६:१६.
राष्ट्राचा जन्म होतो
३. ‘धार्मिक राष्ट्राचा’ जन्म कसा झाला याचे स्पष्टीकरण द्या.
३ ‘धार्मिक राष्ट्राचा’ जन्म केव्हा झाला? त्याच्या सुरवातीविषयी यशयाच्या पुस्तकात भविष्यवाणी केली होती. यशया ६६:७, ८ मध्ये आपण वाचतो: ‘वेणा येण्यापूर्वीच ती [सीयोन] प्रसूत झाली, वेदना होण्यापूर्वीच तिला पुत्र झाला. . . . सीयोनेने वेणा दिल्या, तिने आपली मुले प्रसवली.’ अतिशय असाधारण रीतीने, सीयोन म्हणजे देवाची स्वर्गीय संघटना वेदना होण्यापूर्वीच “पुत्र” प्रसवणार होती. १९१४ मध्ये मशीही राज्य स्वर्गात उदयास आले. (प्रकटीकरण १२:५) त्यानंतर पहिल्या महायुद्धाने अधिकाधिक राष्ट्रांना गोवले. अभिषिक्त ख्रिश्चनांना तीव्र यातना आणि छळ सहन करावा लागला. सरतेशेवटी, १९१९ मध्ये पृथ्वीवर आध्यात्मिक राष्ट्र, “पुत्र” उदयास आणले गेले. अशाप्रकारे सीयोनेने ‘आपली मुले’—नव्या ‘धार्मिक राष्ट्राचे’ अभिषिक्त सदस्य यांना जन्म दिला—आणि यांना सतत वाढत असलेल्या साक्षकार्यासाठी संघटित करण्यात आले.—मत्तय २४:३, ७, ८, १४; १ पेत्र २:९.
४. देवाच्या धार्मिक राष्ट्राला सत्वनिष्ठा राखण्यासाठी का झटावे लागले?
४ त्याची सुरवात झाल्यापासून, या राष्ट्राला सत्वनिष्ठेच्या कडक परीक्षांना तोंड द्यावे लागले आहे. का बरे? स्वर्गीय राज्याचा जन्म झाल्यावर, सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांना स्वर्गातून खाली पृथ्वीवर टाकण्यात आले. एका मोठ्या वाणीने घोषणा केली: “आता आमच्या देवाने सिद्ध केलेले तारण, त्याचे सामर्थ्य व त्याचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार ही प्रगट झाली आहेत; कारण आमच्या बंधूंना दोष देणारा आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्यांच्यावर दोषारोप करणारा, खाली टाकण्यात आला आहे. त्याला त्यांनी कोकऱ्याच्या रक्तामुळे व आपल्या साक्षीच्या वचनामुळे जिंकले; आणि त्यांच्यावर मरावयाची पाळी आली तरी त्यांनी आपल्या जिवावर प्रीति केली नाही.” सैतानाने या बदललेल्या परिस्थितीवर क्रोधाविष्ट होऊन प्रतिक्रिया दाखवली आणि “देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूविषयी साक्ष देणारे तिच्या [स्त्रीच्या] संतानापैकी बाकीचे जे लोक होते त्यांच्याबरोबर लढाई करण्यास तो निघून गेला.” सैतानाच्या घोर हल्ल्याचा सामना करताना अभिषिक्त ख्रिस्ती दृढ राहिले. आजपर्यंत, देवाच्या धार्मिक राष्ट्राचे आवेशी सदस्य खंडणी मिळवून देणाऱ्या येशूच्या रक्तावर विश्वास प्रदर्शित करत आहेत आणि “मरावयाची पाळी आली तरी” सत्वनिष्ठा राखण्याद्वारे, यहोवाच्या निंदकाला उत्तर देण्यासाठी त्याला सतत मदत करत आहेत.—प्रकटीकरण १२:१, ५, ९-१२, १७; नीतीसूत्रे २७:११.
५. आधुनिक दिवसातील साक्षीदारांच्या कोणत्या उत्तम मनोवृत्तीने त्यांना सचोटी राखण्यास मदत केली?
५ देवाच्या राज्याबद्दल आधुनिक दिवसातील साक्ष १९१९ मध्ये सुरु झाल्यावर बायबल विद्यार्थी म्हटले जाणारे यहोवाचे साक्षीदार संख्येने कमी होते, पण त्यांचा विश्वास दृढ होता. ‘तारण त्याचे कोट व तट त्याचा पाया असलेल्या तटबंदी केलेल्या नगराचे ते पाया’ बनतात. त्यांचा भाव “याह यहोवा [जो] सनातन दुर्ग आहे,” त्यावर होता. (यशया २६:१, ३, ४, NW) प्राचीन काळातील मोशेप्रमाणे, त्यांनी म्हटले: “मी परमेश्वराच्या [यहोवा, NW] नावाची घोषणा करीन; आमच्या देवाची महति वर्णा. तो दुर्ग आहे; त्याची कृति परिपूर्ण आहे; त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत; तो विश्वसनीय देव आहे, त्याच्या ठायी अनीति नाही; तो न्यायी व सरळ आहे.”—अनुवाद ३२:३, ४.
६. यहोवाने त्याच्या लोकांना या शेवटल्या दिवसांमध्ये कोणत्याप्रकारे आशीर्वादित केले आहे?
६ तेव्हापासून, देवाच्या राज्य व्यवस्थेच्या वेशी उघडलेल्याच आहेत. त्यामध्ये प्रथम १,४४,००० अभिषिक्त ख्रिश्चनांमधील शेषांना गोळा केले गेले आणि आता “दुसरी मेंढरे” यांचा मोठा लोकसमुदाय यहोवाच्या राज्य उद्देशांची घोषणा करण्यात सामील होत आहेत. (योहान १०:१६) अशाप्रकारे, हर्षाने अशी घोषणा केली जाऊ शकते: “तू राष्ट्राची वाढ केली आहे, हे परमेश्वरा [यहोवा, NW] तू राष्ट्राची वाढ केली आहे; तू आपला महिमा दाखविला आहे; तू देशाच्या चतुःसीमा वाढविल्या आहेत.” (यशया २६:१५) आज आपण जगातील क्षेत्राकडे पाहिल्यावर ते शब्द किती खरे ठरतात हे पाहतो! पवित्र आत्म्याच्या शक्तीद्वारे ख्रिस्ताच्या आगामी राज्याची साक्ष “पृथ्वीच्या शेवटापर्यंत” दिली गेली आहे. (प्रेषितांची कृत्ये १:८) त्या वाढीच्या विस्ताराची मोजणी, १९९४ च्या सेवा वर्षातील यहोवाच्या साक्षीदारांच्या जगव्याप्त अहवालाच्या १९९४ च्या सेवा वर्षावरून करता येऊ शकेल. याचा अहवाल १२ ते १५ पृष्ठांवर आहे.
प्रचारकांचे नवे शिखर
७, ८. (अ) देवाच्या लोकांनी ‘त्यांच्या डेऱ्याच्या राहुट्यांची कनाथी पसरवली’ याचा काय पुरावा आहे? (ब) १९९४ च्या सेवा वर्षाच्या अहवालाकडे पाहिल्यावर तुम्हाला कोणती क्षेत्रे आपली ‘सीमा वाढवत’ आहेत असे ठळकपणे दिसून येते?
७ या अहवालातील काही ठळक गोष्टींचा विचार करा. क्षेत्रातील राज्य प्रचारकांचा उच्चांक ४९,१४,०९४ पर्यंत पोहंचला! ‘सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारा . . . असा शुभ्र झगे परिधान केलेला . . . राजासनासमोर व कोकऱ्यासमोर उभा राहिलेला मोठा लोकसमुदाय’ याचे सतत होणारे एकत्रीकरण पाहणे किती हर्षदायक आहे! होय, यांनी देखील सचोटी रक्षक असल्याचे शाबीत केले आहे. “ह्यांनी आपले झगे कोकऱ्याच्या रक्तात धुऊन शुभ्र केले आहेत.” येशूच्या खंडणी बलिदानावर विश्वास ठेवल्यामुळे त्यांना धार्मिक घोषित केले गेले आहे.—प्रकटीकरण ७:९, १४.
८ विशेषपणे १९१९ पासून यहोवाच्या संघटनेला आज्ञा कळवली गेली आहे: “आपल्या डेऱ्यांची जागा वाढीव, आपल्या राहुट्यांच्या कनाथी पसरू दे; अटकाव करू नको; आपल्या दोऱ्या लांब कर, मेखा पक्क्या ठोक.” (यशया ५४:२) याच्या प्रतिसादात, प्रचारकार्य अलास्काच्या सरहद्दीवरील बर्फाच्छादित युकॉन, येथे देखील जोराने चालू आहे. तेथे थंडीला न जुमानणारा पायनियरांचा समूह, कधी कधी काही आठवड्यांपर्यंत ४५ ते ५० सेल्सियसपर्यंतचे तापमान सहन करतो. अलीकडील वर्षांमध्ये यहोवाच्या सत्वनिष्ठा राखणाऱ्या राष्ट्रात लोकसमुदाय जोराने एकत्र येत आहे. ख्रिस्ती धर्मजगताबाहेरील आशियातील देशांमधून, भूतपूर्व कम्युनिस्ट वर्चस्व असलेल्या राष्ट्रांमधून, पुष्कळ आफ्रिकेतील देशांमधून व इटली, स्पेन, पोर्तूगाल आणि दक्षिण अमेरिका यासारख्या कॅथलिक प्रदेशांतून आलेल्यांचे स्वागत करण्यासाठी वेशी विस्तृत उघडल्या आहेत. निर्वासित केलेल्या लोकांनी आणखी एक क्षेत्र उघडले आहे. उदाहरणार्थ, इंग्लंडमध्ये यहोवाचे साक्षीदार १३ विदेशी भाषा बोलणाऱ्या जातीय गटांना मदत करीत आहेत.
“स्मरणार्थ हे करा”
९. (अ) १९९४ ची स्मारक विधीची उपस्थिती काय दर्शविते? (ब) कोणती अशी रा आहेत ज्यांची स्मारक विधीची उपस्थिती सामान्यपणे अधिक आहे?
९ वार्षिक अहवालातील आणखी एक ठळक गोष्ट म्हणजे, स्मारक विधीची उपस्थिती होय. येशूने आपल्या मृत्युच्या थोडे आधी, आपला स्मरणोत्सव करण्यासाठी स्मारक विधीची स्थापना केली. तसेच आपल्या अनुयायांना त्याने सांगितले: “माझ्या स्मरणार्थ हे करा.” (१ करिंथकर ११:२४) त्या आज्ञेचे पालन करण्यासाठी १९९४ मध्ये १,२२,८८,९१७ जणांना—क्रियाशील प्रचारकांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा अधिकांना—सहभाग घेणारे किंवा पालन करणारे या नात्याने एकत्र आलेले पाहणे किती हर्षदायक होते! काही देशांमध्ये स्मारक विधीसाठी उपस्थित असलेल्यांचे प्रमाण प्रचारकांच्या प्रमाणापेक्षा अधिक होते. एस्तोनिया, लतव्हिया आणि लिथुआनिया येथील ४,०४९ प्रचारक, स्मारकविधीसाठी १२,८७६ उपस्थितांबद्दल आनंदित होते, ती संख्या प्रचारकांच्या संख्येपेक्षा तीन पटीने अधिक होती. तसेच बेनिनमध्ये, स्मारक विधीसाठी १६,७८६ जण उपस्थित असलेल्या लोकांनी प्रचारकांच्या संख्येला जवळपास पाच पटीने प्रतिनिधीत्व केले. सुमारे ४५ प्रचारक असलेल्या एका मंडळीत ८३१ लोक उपस्थित होते!
१०. (अ) स्मारक विधीची उच्च उपस्थिती आपल्यावर कोणती जबाबदारी लादते? (ब) स्मारकविधीला उपस्थित असणाऱ्याला आणखी मदत मिळाल्यावर काय होऊ शकते याचे स्पष्टीकरण द्या.
१० त्या मंगल प्रसंगी अनेक आस्थेवाईक लोक यहोवाच्या साक्षीदारांना येऊन मिळाल्यामुळे ते आनंदी आहेत. आता अशा लोकांनी त्यांच्या समजबुद्धीत आणि सत्याबद्दलच्या प्रीतीत आणखी प्रगती करण्यासाठी त्यांची मदत करण्याची इच्छा आहे. काही लोक रशियातील ऑलॉ हिच्यासारखा प्रतिसाद देतील. ऑलॉ, एका खास पायनियर बहिणीसोबत अभ्यास करीत होती, पण तिने अल्प प्रगती केल्यामुळे अभ्यास थांबवला गेला. तथापि, स्मारक विधीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण ऑलॉने स्वीकारले. अधिक महत्त्वपूर्ण असलेल्या त्या सभेचा तिच्यावर बराच प्रभाव पडला. घरी परतल्यावर तिने आपल्या सर्व मूर्त्या फेकून दिल्या आणि मदतीसाठी यहोवाला प्रार्थना केली. दोन दिवसांनी त्या पायनियर बहिणीने ऑलॉला स्मारक विधीचा आनंद कसा वाटला याची विचारणा करण्यासाठी भेट दिली. त्याचा परिणाम फलदायी चर्चेत झाला. ऑलॉचा अभ्यास परत सुरु करण्यात आला. लवकरच ती साक्ष कार्यात सहभाग घेऊ लागली. हा अनुभव, स्मारक विधीला उपस्थित राहणाऱ्यांचा मागोवा घेण्याच्या मूल्यास दाखवतो. बहुधा, ऑलॉसारखाच प्रतिसाद अनेक लोक दर्शवतील.
‘आपले एकत्र मिळणे सोडू नये’
११-१३. (अ) धार्मिक राष्ट्राच्या विश्वासू आचरणाचा एक भाग कोणता आहे? (ब) खऱ्या ख्रिश्चनांनी सभांना उपस्थित राहण्याची गरज का आहे?
११ यहोवाच्या साक्षीदारांच्या दिनदर्शिकेत स्मारक विधीची सभा सर्वात महत्त्वपूर्ण आहे, पण केवळ तीच एक सभा नाही. प्रेषित पौलाच्या शब्दांच्या आज्ञांकित राहून प्रत्येक आठवडी यहोवाचे साक्षीदार एकत्र येतात: “आणि प्रीति व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकास बोध करावा, आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसतसा तो अधिक करावा.” (इब्रीयांस १०:२४, २५) ते, विश्वासू आचरणाद्वारे ओळखल्या जाणाऱ्या यहोवाच्या धार्मिक राष्ट्राच्या सहवासात आहेत. विश्वासू आचरणात, सभांना विश्वासूपणे उपस्थित राहण्याचा समावेश होतो.
१२ फिलिपाईन्समधील पुराव्यावरुन हे समजू शकते. त्या देशात रविवारच्या सभेसाठी सरासरी उपस्थिती प्रचारकांच्या संख्येच्या १२५ टक्के असते. अर्जेंटिनामध्ये देखील साक्षीदारांचा समूह तसेच आस्थेवाईक लोकांकडून ऐकणे हे चांगल्याप्रकारे समजते. ते राज्य सभागृहापासून २० किलोमीटर दूरवर राहतात. तरीही, आजारपणाशिवाय त्यांच्यातील एकही जण कधी सभा चुकवत नसल्याचा अहवाल विभागीय पर्यवेक्षक देतात. ते टांग्यातून किंवा घोड्यावरुन ४ तासांचा प्रवास करतात आणि हिवाळ्यात ते रात्रीच्या काळोखातून घरी जातात.
१३ या सद्य व्यवस्थीकरणाचा अंत जवळ येत आहे तसे, जीवन अधिकच खडतर होत चालले आहे, समस्या वाढत आहेत आणि सभांना नियमित उपस्थित राहणे जणू मोठे आव्हान बनते. परंतु अशा परिस्थितींमध्ये, आध्यात्मिक अन्न आणि उबदार सहवासाची गरज पूर्वीपेक्षा आज अधिक आहे. या गोष्टी आपल्याला केवळ अशाप्रकारे एकत्र आल्यावरच सापडतात.
“त्यात तत्पर ऐस”
१४. यहोवाच्या साक्षीदारांना त्यांच्या सेवेबद्दल तत्परतेची गरज का वाटते आणि कोणते परिणाम याची स्पष्टता देतात?
१४ गत वर्षी, इटलीमधील कॅथलिक चर्चने यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्याचा उल्लेख, “रानटी पद्धतीने धर्मांतर करणे” असा केला. तथापि, खरे पाहिल्यास साक्षीदार करीत असलेल्या कार्यात रानटीपणाचे असे काहीही नाही. उलटपक्षी, त्यांची सेवा शेजाऱ्यांवरील त्यांच्या गाढ प्रीतीचे वक्तव्य आहे. ही गोष्ट पौलाच्या शब्दांना आज्ञाधारकपणा दाखविल्याचा पुरावा देखील आहे: “वचन गाजीव, सुकाळी अकाळी त्यात तत्पर ऐस.” (२ तीमथ्य ४:२, पं. र. भाषांतर) तत्परतेची जाणीव यहोवाच्या साक्षीदारांना त्यांच्या सेवेत आवेशी राहण्यात प्रवृत्त करते. हीच गोष्ट १९९४ मध्ये त्यांनी आपल्या शेजाऱ्यांना प्रचार करण्यात, पुन:र्भेटी देण्यात आणि ४७,०१,३५७ बायबल अभ्यास घेण्यात खर्च केलेल्या एकूण १,०९,६०,६५,३५४ तासांवरुन दिसून येते. अनेक जण पायनियर कार्यात भाग घेऊ शकले, त्यावरुन पायनियर आत्मा जिवंत आणि सक्रिय असल्याचा प्रत्यय मिळाला. जगभरातील पायनियरांच्या ६,३६,२०२ सरासरीने हे शाबीत केले.
१५, १६. (अ) तरुण आणि वृद्ध या दोहोंनी पायनियर आत्मा कसा प्रदर्शित केला आहे? (ब) १९९४ सेवा वर्षाच्या अहवालातील प्रत्येक राष्ट्राकडे पाहताना तुम्हाला पायनियरांची विलक्षणीय संख्या कोठे दिसून येते?
१५ त्या पायनियरांमध्ये अनेक किशोरवयीन आहेत. अमेरिकेतील काही जण आता माध्यमिक विद्यालयात असताना नियमित पायनियर या नात्याने सेवा करत आहेत. वर्ग हे त्यांचे प्रमुख क्षेत्र आहे. या युवकांना, त्या देशातील अनेक शाळांमध्ये सर्वत्र आढळणारे मादक पदार्थ, अनैतिकता आणि हिंसाचार यापासून संरक्षण मिळण्याचा उत्तम मार्ग, पायनियरींग असल्याचा प्रत्यय आला आहे. शाळा सोडल्यावर अनेक युवक, पायनियरींग हे त्यांचे प्रमुख ध्येय ठेवतात. युक्रेनमधील एरिनाने, आपल्या पदवीदान परीक्षेनंतर पायनियरींगसाठी तयार व्हावे म्हणून माध्यमिक शाळेत असतानाच सहायक पायनियरींग केली. शाळा संपल्यावर तिचे कुटुंब तिच्या आर्थिक गरजा पुरवण्यासाठी तयार झाले जेणेकडून ती नियमित पायनियर कार्यात त्यांचे प्रतिनिधीत्व करु शकली. आर्थिकदृष्ट्या काही गोष्टी करणे युक्रेनमध्ये सोपे नाही. परंतु एरिना म्हणते: “मला माहीत आहे की जे कार्य मी करते आणि ते केवळ मलाच नव्हे तर ज्यांना मी प्रचार करते त्यांच्यासाठी देखील त्याचा अर्थ जीवन आहे.” आज, एरिनाप्रमाणेच विचार करत असलेल्या अनेक युवकांना पाहणे, खरेच हर्षदायक आहे. ‘आपल्या तारुण्याच्या दिवसात आपल्या महान सृष्टीकर्त्याला स्मरणे’ यापेक्षा कोणता उत्तम मार्ग असू शकतो?—उपदेशक १२:१.
१६ पुष्कळ पायनियर वयस्कर आहेत. एक व्यक्ती अहवाल देते की, दुसऱ्या महायुद्धात लढत असताना तिचे वडील आणि एक भाऊ मारले गेले आणि आई व बहीण गेटोमध्ये गोळीबारात ठार झाले. त्यानंतर तिच्या मुलाला तिने गमावले. आता, तिच्या उतारवयात आणि आजारपण सहन करीत असताना यहोवाने तिने गमावलेल्या कुटुंबापेक्षा ख्रिस्ती मंडळीत अधिक मोठे कुटुंब दिले आहे. तसेच नियमित पायनियर या नात्याने इतरांना मदत करण्याचा आनंद ती लुटते.
१७, १८. आपल्यातील प्रत्येक जण, मग तो पायनियर असो किंवा नसो, पायनियर आत्मा कसा प्रदर्शित करू शकतो?
१७ अर्थातच, प्रत्येक जण पायनियर होऊ शकत नाही. आपल्या स्वतःच्या बाबतीत कसेही असले, तरी आपण जे काही उत्तम देऊ शकतो त्या पूर्ण दशमांशाचा स्वीकार करण्यास यहोवा खूष असतो. (मलाखी ३:१०) आपण सर्वजण या आवेशी पायनियरांसारखा आत्मा विकसित करु शकतो आणि सुवार्तेच्या प्रचारात वाढ करण्यासाठी आपली परिस्थिती अनुमती देते त्याप्रमाणे आपण सर्व काही केले पाहिजे.
१८ उदाहरणार्थ ऑस्ट्रेलियात, रस्त्यावरील साक्षकार्यासाठी एप्रिल १६ तारखेचा खास दिवस निश्चित केला होता. याला प्रचारक आणि पायनियर या दोहोंनी चांगला प्रतिसाद दिला आणि हे त्या महिन्यातील ५८,७८० प्रचारकांच्या उच्चांकातून शाबीत झाले. शिवाय, मागच्या वर्षाच्या त्याच महिन्यात आणखी ९०,००० नियतकालिकांचे वितरण करण्यात आले. खास दिवसादरम्यान, एका बहिणीने एका मनुष्याला नियतकालिके दिली व त्याने दाखवलेल्या आस्थेचा मागोवा घेण्यासाठी त्याचे नाव आणि पत्ता लिहून घेत असताना तिला समजले की तो तिचा नातलाग लागत होता! तो तिच्या मोठ्या मावशीचा मुलगा असल्याचे आढळले, या दोघांनी ३० वर्षे एकमेकांना पाहिलेले नव्हते. यामुळे निश्चितच काही आनंदी पुनःभेटीस वाव मिळाला.
शेवटपर्यंत सत्वनिष्ठा राखा
१९. यहोवाच्या धार्मिक राष्ट्राने शेवटपर्यंत सत्वनिष्ठा राखून ठेवणे निकडीचे का आहे?
१९ सैतानाचे जग त्याच्या रसातळाला पोहंचत असता देवाच्या धार्मिक राष्ट्रातील सर्वांनी सत्वनिष्ठा राखणे अतिशय निकडीचे आहे. लवकरच, यहोवाचे पवित्र राष्ट्र ही हाक ऐकेल: “चला, माझ्या लोकांनो, आपआपल्या खोल्यात जा, दारे लावून घ्या; क्रोधाचा झपाटा निघून जाईपर्यंत थोडा वेळ लपून राहा.” हे रक्तदोषी जग नक्कीच ईश्वरी न्यायाचा सामना करील. “कारण पाहा, परमेश्वर [यहोवा, NW] पृथ्वीवरील रहिवाश्यांना त्यांच्या पापास्तव शासन करण्यास आपल्या स्थानाहून निघाला आहे; शोषलेले रक्त पृथ्वी प्रगट करील, वधिलेल्यांस ती यापुढे झाकून ठेवावयाची नाही.” (यशया २६:२०, २१) आपण प्रत्येक जण, यहोवाच्या धार्मिक राष्ट्रासोबत सहवास असलेल्या सचोटी राखणाऱ्या ख्रिश्चनाप्रमाणे दृढ उभे राहू या. त्यानंतर आपल्याला ख्रिस्ताच्या राज्यातील पृथ्वीवरील किंवा स्वर्गातील सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यास आनंद वाटेल.
तुम्हाला आठवते का?
▫ ‘धार्मिक राष्ट्राचा’ जन्म कधी झाला?
▫ देवाच्या लोकांना या शेवटल्या दिवसांमध्ये धीराची आवश्यकता का आहे?
▫ १९९४ सेवा वर्षाच्या अहवालात दिसते त्याप्रमाणे प्रचारकांच्या मोठ्या संख्येवरून आणि सेवा कार्यात खर्च केलेल्या तासांवरुन काय प्रदर्शित होते?
▫ हे जग त्याच्या अंताजवळ जात असता सभांना उपस्थित राहणे इतके महत्त्वाचे का आहे?
▫ देवाच्या धार्मिक राष्ट्रासोबत सहवास राखणाऱ्या सर्वांनी सत्वनिष्ठा राखणे जरूरीचे का आहे?
[१२-१५ पानांवरील तक्ता]
(For fully formatted text, see publication)
यहोवाच्या साक्षीदारांचा १९९४ चा जगव्याप्त सेवा वर्ष अहवाल
[१८ पानांवरील चित्रं]
यहोवाच्या धार्मिक राष्ट्रातील सत्वनिष्ठा राखणाऱ्यांना पूर्णत्वाचे सार्वकालिक जीवन प्राप्त होईल