सैतान आणि त्याच्या कार्यांवर विजय मिळवणे
“म्हणून देवाच्या अधीन व्हा; आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हांपासून पळून जाईल.”—याकोब ४:७.
१. आज मानवजातीवर ‘दुष्टांच्या हाताचा’ परिणाम कसा झाला?
ईयोबाने उचितपणे म्हटले: “पृथ्वी दुष्टाच्या हाती दिली आहे.” (ईयोब ९:२४) आपण आता मानवजातीच्या इतिहासातील सर्वात कठीण काळाचा सामना करीत आहोत. का बरे? कारण हे ‘शेवटले दिवस’ पृथ्वीवरील सैतानाच्या दुरात्मिक अंमलाचे आहेत. यात काही आश्चर्याचे नाही की, सैतानाच्या प्रेरणेमुळे, ‘दुष्ट व भोंदू माणसे दुसऱ्यांस फसवून व स्वतः फसून दुष्टपणात अधिक सरसावत आहेत.’ (२ तीमथ्य ३:१, १३) शिवाय, छळ, अन्याय, क्रूरता, गुन्हे, आर्थिक कष्ट, जुनाट आजार, वृद्धावस्थेच्या पीडा, भावनात्मक नैराश्य—या तसेच इतर गोष्टींचे दडपण कदाचित आपल्यावर येऊ शकते.
२. आज आपण सैतानाच्या हल्ल्याचा सामना कसा करु शकतो?
२ मोठा विरोधक, दियाबल सैतान मानवजातीवर आणि विशेषपणे देवाच्या खऱ्या उपासकांवर तीव्रतेने हल्ला चढवत आहे. सर्व संभाव्य सचोटी रक्षकांना देवाच्या विरोधात करण्याचा तसेच स्वतःसोबत आणि त्याच्या दुरात्मिक दूतांसोबत त्यांचा नाश करण्याचा त्याचा उद्देश आहे. असे असले तरी, आपण सत्वनिष्ठा राखल्यास दियाबल आपल्यापासून पळून जाईल, याची खात्री आपल्याला आहे. येशूप्रमाणे आपणही ज्या गोष्टी सहन करतो त्याद्वारे ‘देवाच्या अधीन राहण्याचे’ शिकू शकतो आणि त्याच्या अपात्री कृपेने सार्वकालिक जीवन मिळवू शकतो.—इब्रीयांस ५:७, ८; याकोब ४:७; १ पेत्र ५:८-१०.
३, ४. (अ) पौलाला बाहेरील कोणत्या परीक्षांसोबत झगडावे लागले? (ब) ख्रिस्ती वडील या नात्याने पौलाला कशाची काळजी होती?
३ प्रेषित पौलाच्या देखील पुष्कळ मार्गांनी परीक्षा घेतल्या गेल्या. ख्रिस्ताचा सेवक या नात्याने आपल्या अधिकारपत्रांविषयी सांगताना त्याने लिहिले: “मी अधिक प्रमाणात आहे (हे मी वेडगळासारखे बोलतो); श्रम करण्यात, कैद सोसण्यात, बेसुमार फटके खाल्ल्यामुळे व पुष्कळ वेळा मृत्यूच्या दाढेत पडल्यामुळे मी अधिक आहे. पाच वेळा मी यहूद्यांच्या हातून एकुणचाळीस फटके खाल्ले. तीन वेळा छड्यांचा मार खाल्ला. एकदा मला दगडमार झाला; तीन वेळा माझे गलबत फुटले व एक दिवस व एक रात्र मी समुद्रात घालविली; मी किती तरी प्रवास केला; नद्यांवरील संकटे, लुटारूंमुळे आलेली संकटे, माझ्या देशबांधवांनी आणलेली संकटे, परराष्ट्रीयांनी आणलेली संकटे, नगरातली संकटे, रानातली संकटे, समुद्रावरची संकटे, नामधारी बंधूंनी आणलेली संकटे; श्रम व कष्ट, किती तरी वेळा केलेली जागरणे, तहानभूक, पुष्कळ उपासतापास, थंडी व उघडावागडेपणा, ह्या सर्वांमुळे मी अधिक आहे.
४ “शिवाय ह्या व अशा इतर गोष्टींखेरीज माझ्या मनावरचे ओझे, म्हणजे सर्व मंडळ्यांविषयीची चिंता, ही आहे. एखादा दुर्बळ असला तर मी दुर्बळ होत नाही काय? आणि एखादा अडखळविला गेला तर मला संताप येत नाही काय?” (२ करिंथकर ११:२३-२९) अशाप्रकारे, बाहेरुन छळ आणि परीक्षांचा सामना करताना पौलाने सत्वनिष्ठा राखली. ख्रिस्ती वडील या नात्याने, मंडळीतील दुर्बळ बंधू आणि बहिणींना दृढ करण्याची त्याला काळजी होती तसेच, त्यांनी सत्वनिष्ठा राखावी म्हणून तो त्यांना मदत करत होता. आज ख्रिस्ती वडिलांसाठी हे किती उत्तम उदाहरण!
छळामध्ये सत्वनिष्ठा
५. थेट छळासाठी काय उत्तर आहे?
५ सत्वनिष्ठा तोडण्यासाठी सैतान कोणत्या साधनांचा वापर करतो? वर उद्धृत केल्याप्रमाणे, सैतानाच्या अधिक दुष्ट डावपेचांपैकी एक म्हणजे थेटपणे छळ होय, पण त्यासाठी एक उत्तर आहे. इफिसकर ६:१०, ११ आपल्याला असा सल्ला देते: “प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. सैतानाच्या डावपेचांपुढे [किंवा, “धूर्त कृत्ये,” तळटीप] तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री धारण करा.”
६. यहोवाचे साक्षीदार “महाविजयी” झाले आहेत हे कसे दाखविले जाऊ शकते?
६ या शेवटल्या काळात अनेकदा, यहोवाच्या साक्षीदारांना परीक्षांबरोबर लढावे लागले आहे. यास्तव, आपण पौलासोबत असे म्हणू शकतो: “उलटपक्षी, ज्याने आपणावर प्रीति केली त्याच्या योगे ह्या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो.” (रोमकर ८:३७) या गोष्टीला, १९३३ व १९४५ दरम्यान नात्सी कालखंडात जर्मनी, ऑस्ट्रिया, पोलंड आणि युगोस्लाव्हिया येथील छळ छावण्यातील, १९४५ आणि १९८९ दरम्यान पूर्व युरोपातील कम्युनिस्ट दबावाखाली तसेच अधिक अलीकडील काळात, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतील अनेक छळग्रस्त भागात असलेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या सचोटी अहवालाने शाबीत केले.
७. इथियोपियातून सत्वनिष्ठेच्या कोणत्या उद्दीपित करणाऱ्या उदाहरणांचा अहवाल दिला आहे?
७ इथियोपियातील यहोवाच्या साक्षीदारांनी १९७४ आणि १९९१ मध्ये सत्वनिष्ठेचे उद्दीपित करणारे उदाहरण पुरवले. राजकीय मनोवृत्तीच्या कैद करणाऱ्या मनुष्याने तुरुंगात असलेल्या बांधवाला सांगितले: “तुम्हाला सोडण्यापेक्षा प्राणीसंग्रहालयातून सिंहांना मुक्त करणे अधिक बरे आहे!” या क्रूर छळकर्त्यांनी यहोवाच्या साक्षीदारांना यातना दिल्या आणि काही वर्षांनंतर वरिष्ठ कोर्टाने देहदंडाची शिक्षा ठोठावली. दुसऱ्यांना इशारेवजा उदाहरण देण्यासाठी एका बांधवाचे शव सार्वजनिक ठिकाणी ठेवले गेले. मृत्युदंडाची शिक्षा सुनावलेल्या इतर बांधवांना कडक नसणाऱ्या न्यायालयाने मुक्त केले. यांच्यापैकीच्या काही विश्वासू ‘विजेत्यांचे’ आदीस अबाबा येथे १९९४ च्या पूर्वार्धात झालेल्या “ईश्वरी शिक्षण” या प्रांतीय अधिवेशनाच्या कार्यक्रमात भाग होते.a—योहान १६:३३; पडताळा १ करिंथकर ४:९.
८. सैतानाने “जातीय शुद्धीकरण” यापासून लाभ मिळवण्याचा प्रयत्न कसा केला?
८ या बंधू आणि बहिणींची सत्वनिष्ठा तोडण्यासाठी त्यांच्यावर थेटपणे केलेल्या हल्ल्यात सैतान अपयशी झाला. यास्तव, तो आणखी कोणत्या धूर्त युक्त्यांचा उपयोग करतो. प्रकटीकरण १२:१२ या शेवटल्या दिवसांबद्दल म्हणते: “पृथ्वी व समुद्र ह्यांवर अनर्थ ओढवला आहे, कारण सैतान आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुम्हाकडे आला आहे.” छळाद्वारे देवाच्या निष्ठावंत लोकांचा नाश करण्यात अपयश आल्यामुळे, निःसंशयपणे, इतर लोकांसोबत यहोवाच्या लोकांचा नाश करण्याच्या हेतूने तो आपल्या क्रोधात सर्व लोकांची कत्तल करण्याच्या प्रयत्नात आहे. अशाप्रकारे, भूतपूर्व युगोस्लाव्हियाच्या भागांमध्ये तथाकथित जातीय शुद्धीकरण करण्यात आले आहे आणि लायबेरिया, बुरुंडी व र्वांडा येथे जातीयसंहाराचा प्रयत्न करण्यात आला आहे.
९. सैतानाच्या युक्त्या अनेकदा का अपयशी होतात? उदाहरणे द्या.
९ असे असले तरी अनेकदा, सैतानाच्या युक्त्या त्याच्याच अंगावर उलटतात कारण सैतानी पीडा, प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना, यहोवाचे साक्षीदार आवेशाने घोषित करीत असलेल्या देवाच्या राज्यावर त्यांची आशा आधारित आहे याची जाणीव करून देते. (मत्तय १२:२१) खरोखर, आस्थेवाईक जण झुंडीने राज्याकडे येतात! उदाहरणार्थ, युद्धग्रस्त बॉसनिया आणि हर्जेगोव्हिना येथे येशूच्या मृत्यूच्या स्मारक विधीसाठी मार्च २६, १९९४ रोजी १,३०७ लोक उपस्थित होते, मागील वर्षापेक्षा २९१ लोक अधिक होते. साराजिवो (४१४), जेनित्सा (२२३), तुजलॉ (३३९) बॉन्या लूका (२५५) आणि इतर शहरात उपस्थितींच्या उच्चांकांची नोंद करण्यात आली. शेजारच्या क्रोशिया मध्ये ८,३२६ उपस्थितीचा नवा उच्चांक होता. सभोवताली होत असलेल्या हिंसाचाराने त्या देशातील यहोवाच्या साक्षीदारांना ‘प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करीत राहा’ ही आज्ञा पाळण्यापासून परावृत्त केले नाही.—१ करिंथकर ११:२६.
युद्धग्रस्त र्वांडात
१०, ११. (अ) तथाकथित ख्रिस्ती र्वांडात काय घडले आहे? (ब) विश्वासू मिशनऱ्यांनी स्वतःला कसे व्यक्त केले आहे?
१० र्वांडात १९९३ मध्ये झालेल्या “ईश्वरी शिक्षण” या अधिवेशनात २,०८० राज्य प्रचारकांना मिळून ४,०७५ जण उपस्थित होते आणि २३० जणांचा बाप्तिस्मा झाला. यांच्यातील १४२ जणांनी सहाय्यक पायनियर सेवेसाठी त्वरित अर्ज केला. १९९४ मध्ये संचालित करीत असलेले गृह बायबल अभ्यास ७,६५५ पर्यंत वाढले—स्पष्टच आहे की, सैतानाला ही वाढ आवडली नाही! अधिकांश लोक ख्रिस्ती असल्याचा दावा करीत असले तरी आपसात आंतरजमातीय कत्तल सुरू केली गेली. व्हॅटिकनच्या एल’ऑसरव्हटोर रोमानो याने कबूल केले: “हा संपूर्ण जातीसंहार आहे, कारण की दुर्दैवाने याला कॅथलिक देखील जबाबदार आहेत.” असा अंदाज केला जातो की पाच लाख पुरूष, स्त्रिया आणि मुले मरण पावली आणि अंदाजे २० लाख लोकांना बेघर बनविले गेले किंवा त्यांना पळून जाण्यास भाग पाडले. अहिंसेची ख्रिस्ती तटस्थता राखून, यहोवाच्या साक्षीदारांनी एकत्र राहण्याचा प्रयत्न केला. आपले शेकडो बंधू आणि भगिणी मारले गेले. ६५ राज्य प्रचारक असलेल्या मंडळीतील १३ प्रचारकांना ठार मारण्यात आले तरी ऑगस्ट १९९४ पर्यंत सभांची उपस्थिती १७० पर्यंत वाढली. इतर देशातील साक्षीदारांकडून भौतिक मदत सर्वात प्रथम प्राप्त झाली. आम्ही बचावलेल्यांसाठी प्रार्थना करीत आहोत.—रोमकर १२:१२; २ थेस्सलनीकाकर ३:१, २; इब्रीयांस १०:२३-२५.
११ त्या अतिभयंकर परिस्थितीतून र्वांडामधील तीन मिशनरी निसटले. ते लिहितात: “संपूर्ण जगभरातील आमच्या बांधवांना अशाचप्रकारच्या अथवा यापेक्षाही वाईट परिस्थितींना तोंड द्यावे लागले आहे, याची आम्हाला जाणीव आहे आणि ते या दुष्ट व्यवस्थीकरणाच्या शेवटल्या काळातील चिन्हाचा भाग असल्याचे आम्हाला माहीत आहे. तरीही, एखादा व्यक्तिशः समाविष्ट असल्यास, गोष्टींच्या वास्तविकतेबद्दल जाणीव करुन देते आणि जीवन किती बहुमोल आहे याची गुणग्राहकता बाळगावयाला लावते. विशिष्ट शास्त्रवचनांचा आपल्यासाठी नवीन अर्थ आहे आणि पुर्वीच्या गोष्टी कोणाच्याही स्मरणात राहणार नाहीत अशा काळाची आपण उत्सुकतेने वाट पाहत आहोत. परंतु, तोवर यहोवाच्या सेवेत आपण स्वतःला व्यग्र ठेवले पाहिजे.”
तरुण सचोटी रक्षक
१२, १३. (अ) एका तरुणीने सचोटी रक्षकाचे कोणते पाऊल उचलले? (ब) आज आपल्या किशोरवयीन मुलांना उत्तेजन कोठे मिळू शकते?
१२ येशूने सांगितले की, सत्यामुळे ज्या व्यक्तींच्या कौटुंबिक सदस्यांनी त्यांना सोडून दिले अशांना “शंभरपटीने” प्रतिफळ मिळेल. (मार्क १०:२९, ३०) ही गोष्ट उत्तर आफ्रिकेमधील दहा वर्षाची एन्टेल हिच्याबाबतीत खरी ठरली. देवाचे नाव—यहोवा हे ऐकल्यावर तिला ते आवडले. तिने यहोवाच्या साक्षीदारांसोबत अभ्यास केला सभेवरुन परतल्यावर विरोध करणारे तिचे कुटुंब अनेकदा तिला घरात घेत नव्हते असे असले तरी, ती सभांसाठी केवळ एकीकडचा प्रवास करण्यासाठी ९० मिनिटे चालत असते. १३ वर्षांची असताना तिने घरोघरच्या प्रचारकार्यास सुरवात केली आणि कौटुंबिक विरोध अधिकच तीव्र बनला. एके दिवशी नातेवाईकांनी तिचे हातपाय बांधून तिला सात तास रखरखीत उन्हात उभे करून अधूनमधून तिच्यावर घाण पाणी फेकत होते. त्यांनी खूप वाईट रीतीने तिला मारले, तिचा एक डोळा निकामी केला व शेवटी घरातून तिला हाकलून दिले. तथापि, तिला इस्पितळात नोकरी मिळाली व शेवटी ती परिचारिका होण्यास पात्र ठरली. वयाच्या २० व्या वर्षी तिचा बाप्तिस्मा झाल्यावर तिने लगेच सहाय्यक पायनियर म्हणून आपले नाव दाखल केले. तिच्या सत्वनिष्ठेमुळे प्रभावित होऊन तिच्या कुटुंबाने पुन्हा तिचा स्वीकार केला आणि त्यांच्यातील नऊ जणांनी गृह बायबल अभ्यास स्वीकारला.
१३ एन्टेल हिला स्तोत्र ११६ मधील विशेषपणे १-४ वचनांमधून पुष्कळ उत्तेजन मिळाले, ही वचने तिने वारंवार वाचली: “मी परमेश्वरावर [यहोवा, NW] प्रेम करितो कारण तो माझी विनवणी ऐकतो. त्याने आपला कान माझ्याकडे लाविला आहे, म्हणून मी जन्मभर त्याचा धावा करीन. मृत्यूच्या बंधनांनी मला वेष्टिले मला अधोलोकाच्या यातना झाल्या, मला उपद्रव व क्लेश झाले. तेव्हा मी परमेश्वराच्या [यहोवा, NW] नावाचा धावा करुन म्हणालो: ‘हे परमेश्वरा, [यहोवा] तुला मी विनवितो की माझा जीव मुक्त कर.’ यहोवा अशा प्रार्थनांचे उत्तर देतो!
१४. पोलीश साक्षीदारांनी उल्लेखनीय सत्वनिष्ठा कशारितीने दाखवली?
१४ येशूच्या दिवसाप्रमाणेच, सैतानाने छळाला चेतवण्यासाठी अनेकदा धर्मवेडेपणाचा वापर केला आहे—पण यात त्याला कोणतेही यश आलेले नाही. यहोवाच्या साक्षीदारांचा १९९४ चा वार्षिक अहवाल (इंग्रजी) या पुस्तकात पोलंडमधील बांधवांचे उदाहरण उल्लेखनीय आहे. किशोरवयीनांना देखील सचोटी रक्षक असल्याचे सिद्ध करावे लागले. १९४६ मध्ये अशा १५ वर्षांच्या मुलीला सांगण्यात आले: “केवळ कॅथलिकांच्या क्रूसाचे चिन्ह कर. नाहीतर तुला गोळी झाडून ठार करण्यात येईल!” सत्वनिष्ठा राखल्यामुळे, तिला जंगलात ओढून नेण्यात आले, असह्य यातना देऊन गोळी झाडून ठार मारले.—पडताळा मत्तय ४:९, १०.
सैतानाची इतर धूर्त साधने
१५, १६. (अ) सैतानाचे दुरात्मिक धोरण कोणते आहे आणि आपण त्याचा विरोध कसा करु शकतो? (ब) आपल्या तरुणांना ठेचकळण्याची गरज का नाही?
१५ खरोखर सैतानाचे दुरात्मिक धोरण, “राज्य करा किंवा नाश व्हा” हे आहे! त्याच्याजवळ अनेक क्रूर शस्त्रे आहेत. यामुळे प्रेषित पौल जो इशारा देतो त्यात काही आश्चर्य नाही: “कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्याबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे. ह्या कारणास्तव तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करिता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री घ्या.” (इफिसकर ६:१२, १३) भौतिकवादासंबंधीच्या आकांक्षा, हिणकस मनोरंजन आणि प्रचार, सैतानी संगीत, शाळेतील सोबत्यांकडील दबाव, मादक पदार्थांचा दुरूपयोग आणि दारुबाजी—यापैकी कोणत्याही गोष्टी आपल्या जीवनाचा नाश करु शकतात. या कारणास्तव प्रेषित पुढे असा सल्ला देतो: “ह्या सर्वांबरोबरच जिच्या योगे त्या दुष्टाचे सगळे जळते बाण तुम्हाला विझविता येतील, ती विश्वासाची ढाल हाती घ्या व उभे राहा.”—इफिसकर ६:१६.
१६ विचित्र संगीताच्या बाबतीत पाहता ही गोष्ट आज विशेषपणे अधिक आवश्यक आहे, कारण सैतान याद्वारे जगाला भरवून टाकत आहे. काही बाबतीत याचा थेट संबंध सैतानीपणासोबत आहे. सॅन डायगो कॉन्टी (अमेरिका) येथील शरीफ यांच्या कार्यालयाचा एक अहवाल म्हणतो: “आमच्याकडे एक संगीत जलसा होता, त्या गटात १५,००० लहान मुले इंग्रजी शब्द सेटन याला उलट रीतीने म्हणजेच ‘नाटास’ असे गुणगुणत होते.” सैतानीपणाचे वर्णन जमिनीत असलेल्या खड्डयाशी केलेले आहे जेथे तरुण ठेचकळतात “कारण ते निराशेत, क्रोधात आणि एकटे भटकत आले आहेत.” मंडळीतील तुम्ही किशोरवयीनांनो, तुम्हाला ठेचकळण्याची काहीही आवश्यकता नाही! सैतानाचे बाण कधीही लागणार नाहीत अशी आध्यात्मिक शस्त्रसामग्री यहोवा तुम्हाला पुरवत आहे.—स्तोत्र १६:८, ९.
१७. भावनात्मक नैराश्येवर कशी मात केली जाऊ शकते?
१७ सैतानाच्या जळत्या बाणांची रचना कह्यात ठेवण्यासाठी करण्यात आली आहे. आपला विरोधक जीवनातील दबाव, जसे की शारीरिक आजारपण किंवा गाढ नैराश्येची स्थिती याद्वारे काहींमध्ये अयोग्यतेची भावना आणण्यास कारणीभूत होऊ शकते. एखादी व्यक्ती देवाच्या सेवेत अधिक तास खर्च करु न शकल्यामुळे किंवा मंडळीच्या काही सभांना चुकविल्यामुळे निराश होऊ शकते. कठीण आघातावर विजय मिळविण्यासाठी वडिलांकडील प्रेमळ काळजी तसेच दयाळू अंतःकरणाच्या इतर बंधू बहिणींकडील प्रेमळ काळजी मदत करु शकते. यहोवा आपल्या विश्वासू सेवकांवर प्रीती करतो याची नेहमीच आठवण ठेवा. (१ योहान ४:१६, १९) स्तोत्र ५५:२२ म्हणते: “तू आपला भार परमेश्वरावर [यहोवा, NW] टाक म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल; नीतिमानाला तो कधीहि ढळू देणार नाही.”
१८. काहींना कोणत्या सैतानी योजनांसोबत झगडावे लागते?
१८ सैतानाच्या धूर्त “योजना” अलीकडे दुसऱ्या प्रकारात दिसून आल्या आहेत. काही देशांमध्ये, लहान असताना सैतानी तत्त्वप्रणालींद्वारे अतिक्रूरपणे गैरवागणूक देण्यात आली होती असा भारावून टाकणारा प्रभाव पुष्कळ प्रौढ लोकांनी अनुभवलेल्या भीतीदायक विचारांद्वारे देण्यात आला. या कल्पनांचा उगम कोठून झाला? विस्तृत प्रमाणात संशोधन करुन देखील, जगीक तज्ज्ञांची मते खूपच भिन्न आहेत. काही लोक असा दृष्टिकोन बाळगतात की असे विचार प्रत्यक्ष आठवणी आहेत, तर इतर जण त्या—संशयास्पद उपचारांमुळे निर्माण केलेल्या कल्पना आहेत असा विचार करतात तसेच इतर जण बालपणाच्या आघातामुळे होणारा एक प्रकारचा भ्रम या दृष्टीने त्याजकडे पाहतात.
१९. (अ) ईयोबाला कोणत्या विचारांचा सामना करावा लागला? (ब) वडील अलीहूच्या उदाहरणाचा अवलंब कशाप्रकारे करु शकतील?
१९ देवाचा सेवक, ईयोब याला सैतानाने अलीफज आणि सोफर यांच्याद्वारे कळविलेल्या ‘विचारलहरीशी’ झगडावे लागले, हे आस्थेचे आहे. (ईयोब ४:१३-१८; २०:२, ३) ईयोबाच्या मनाला पीडित करणाऱ्या ‘संकटांबद्दल त्याच्या मर्यादेबाहेर बोलण्यामुळे’ त्याला “खेद” झाला. (ईयोब ६:२-४; ३०:१५, १६) अलीहूने ईयोबाचे शांतपणे ऐकून घेतले आणि सर्व गोष्टींविषयी यहोवाचा सर्वज्ञ दृष्टिकोन पाहण्यास मनापासून मदत केली. अशाचप्रकारे, आज समजदार वडील जण पीडित लोकांवर अधिक “दबाव” न टाकण्याद्वारे त्यांची काळजी करत असल्याचे दाखवतील. उलटपक्षी, अलीहूप्रमाणे, ते धीराने त्यांचे ऐकतात आणि नंतर देवाच्या वचनाच्या सांत्वनदायक तेलाचा वापर करतात. (ईयोब ३३:१-३, ७; याकोब ५:१३-१५) या कारणास्तव, खऱ्या वा काल्पनिक आघातामुळे ज्यांच्या भावना त्रस्त होतात अथवा जे ईयोबाप्रमाणे ‘स्वप्ने . . . व दृष्टांताने घाबरे केल्यामुळे’ विचलित होतात अशांना मंडळीत आरामदायक शास्त्रवचनीय सांत्वन मिळू शकते.—ईयोब ७:१४; याकोब ४:७.
२०. पीडित ख्रिश्चनांना त्यांचा आध्यात्मिक समतोलपणा राखण्यासाठी कशी मदत दिली जाऊ शकते?
२० या किंवा त्या मार्गांनी, सैतान या भीतीजनक विचारांमागे आहे, याबद्दल एखादा ख्रिस्ती सध्या निश्चित होऊ शकतो. मंडळीतील काही जणांना जर अशाप्रकारे त्रास होत असेल, तर असा भीतीदायक मानसिक प्रभाव त्यांच्या आध्यात्मिक समतोलपणास निरूत्साहित करण्याचा सैतानाचा थेट हल्ला आहे हे ते सुज्ञपणे समजू शकतात. त्यांना सहनशीलतेच्या आणि अंतर्दृष्टी असलेल्या शास्त्रवचनीय आधाराची गरज आहे. प्रार्थनापूर्वक यहोवाकडे वळून आणि आध्यात्मिक मेंढपाळकत्वापासून लाभ घेण्याद्वारे दुःखाचा अनुभव घेत असलेले लोक सामर्थ्याच्या पराकोटीचा उपयोग करतील. (यशया ३२:२; २ करिंथकर ४:७, ८) अशाप्रकारे, ते विश्वासूपणे धीर धरू शकतील आणि मंडळीच्या शांतीवर परिणाम करणाऱ्या दुष्ट अनाहूत विचारांना अनुमती देण्याचे नाकारु शकतील. (याकोब ३:१७, १८) होय, “सैताना, चालता हो!” असे म्हणून येशूने ज्याप्रकारे आवेश दाखविला त्याप्रमाणेच तोच आवेश दाखवून ते देखील दियाबलास विरोध करु शकतील.—मत्तय ४:१०; याकोब ४:७.
२१. सैतानाच्या कावेबाज मार्गांबद्दल शास्त्रवचने कसा इशारा देतात?
२१ प्रेषित पौलाने २ करिंथकर ११:३ मध्ये इशारा दिल्याप्रमाणे, कोणत्या तरी मार्गाने आपली मने भ्रष्ट करण्याचे सैतानाचे ध्येय आहे: “तरी जसे सापाने कपट करून हव्वेला ठकविले तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताविषयीचे सरळपण व शुद्धता ह्यापासून भ्रष्ट होतील असे मला भय आहे.” सर्व देहांचा सध्याचा विध्वंस किंवा देवापासून परका असलेला मानवी समाज, आपल्याला नोहाच्या दिवसातील भ्रष्ट आणि हिंसक मिश्रजातीय “खाली पाडणारे” यांनी घडून आणलेल्या अवनतिची आठवण करुन देतो. (उत्पत्ती ६:४, १२, १३, NW तळटीप; लूक १७:२६) यासाठी, सैतान खासकरुन देवाच्या लोकांवर स्वतःचा क्रोध व्यक्त करण्यासाठी धूर्त कृत्यांचा आणि कावेबाज साधनांचा अवलंब करतो, हे आश्चर्याचे नाही.—१ पेत्र ५:८; प्रकटीकरण १२:१७.
२२. सैतान आपल्या मार्गात नसल्यावर, आपण कोणत्या आशीर्वादांची अपेक्षा करु शकतो?
२२ बायबलमधील ईयोबाच्या पुस्तकातील शेवटल्या अध्यायांमध्ये सैतानाचा उल्लेख देखील नाही. मानव देवाला सत्वनिष्ठा राखू शकत नाही या त्याच्या दुष्ट आव्हानाला ईयोबाच्या सत्वनिष्ठेने खोटे शाबीत केले. अशाचप्रकारे नजीकच्या भवितव्यात, सचोटी रक्षकांचा “मोठा लोकसमुदाय” नंदनवनमय पृथ्वीवरील आशीर्वादांचा आनंद घेण्यासाठी “मोठ्या संकटातून येतात,” तेव्हा सैतानाला अथांग डोहात बंद करण्यात येईल. ईयोबाला मिळालेल्या प्रतिफळापेक्षा उदात्त असणाऱ्या नंदनवनातील आशीर्वादांचा आनंद उपभोगण्यासाठी विश्वासू ईयोबासहित विश्वासू स्त्रिया आणि पुरूष ‘मोठ्या लोकसमुदायाला’ येऊन मिळतील!—प्रकटीकरण ७:९-१७; २०:१-३, ११-१३; ईयोब १४:१३.
[तळटीपा]
a यहोवाच्या साक्षीदारांचा १९९२ चा वार्षिक अहवाल यातील पृष्ठ १७७ पहा.
उजळणीतील प्रश्ने
▫ ईयोब, येशू व पौलाने सत्वनिष्ठेचे कोणते उत्तम उदाहरण मांडले?
▫ सचोटी रक्षक सैतानाचा सामना कसा करतात?
▫ तरुण जण सैतानाच्या धूर्त साधनांचा विरोध कसा करु शकतील?
▫ सैतानी युक्त्यांचा सामना करण्यासाठी काय केले जाऊ शकते?
[७ पानांवरील चित्रं]
इथियोपियात, मेसवत् आणि योअलन आता, वध झालेल्या त्यांच्या पित्याच्या उदाहरणाप्रमाणे यहोवाची पूर्ण वेळ सेवा करतात
[७ पानांवरील चित्रं]
एन्टेल, उत्तर आफ्रिकेतील एक तरुण सचोटी रक्षक