वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 १२/१ पृ. २०-२४
  • जीवनाचा उद्देशपूर्ण मार्ग

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जीवनाचा उद्देशपूर्ण मार्ग
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • माझी आयुष्यभराची नेमणूक
  • खेळ जीवनाचा मार्ग झाला
  • खेळापासून वेगळा असा उद्देश
  • दृढनिश्‍चयानुसार कार्य
  • शाखा दप्तरातील सेवा
  • उद्देशपूर्ण जीवनाचा अखंड मार्ग
  • बेथेल सेवा—अधिक स्वयंसेवकांची आवश्‍यकता
    आमची राज्य सेवा—१९९५
  • हे तुमच्याकरता सर्वात उत्तम करियर असू शकेल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • तुम्ही स्वतःला उपलब्ध करू शकाल का?
    आमची राज्य सेवा—२००३
  • सर्वांसाठी एक निमंत्रण!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 १२/१ पृ. २०-२४

जीवनाचा उद्देशपूर्ण मार्ग

मेल्वा ए. विलॅन्ड यांनी सांगितल्याप्रमाणे

मार्च १९४० मध्ये माझ्या बाप्तिस्म्याच्या काही महिन्यांनंतर माझी धाकटी बहीण फिलीस, माझ्या जवळ आली आणि मला विचारले: “तू पायनियरींग का करत नाहीस?” “पायनियरींग? तुझं म्हणणं पूर्ण वेळेसाठी, जवळजवळ दररोजच प्रचार करायचा?” मी विचारले.

‘मी पायनियर कशी होऊ शकेन? कारण माझ्याकडे तर बायबलचे पुरेसे ज्ञान नव्हते. शिवाय बँकेतही कमी शिल्लक पैसे होते’ असा माझ्या मनात विचार आला. तरीसुद्धा, फिलीसच्या प्रश्‍नावर मी विचार करू लागले. त्याविषयी मी पुष्कळ वेळा प्रार्थनाही केल्या.

शेवटी मग मला वाटले, ‘देव जर आपल्याला, त्याचे राज्य पहिल्याने मिळवण्यास झटल्यावर आपली काळजी घेण्याचे अभिवचन देतो तर मी त्याच्यावर का भाव ठेवू शकत नाही?’ (मत्तय ६:३३) यास्तव, जून १९४० मध्ये मी माझे शिंप्याचे काम सोडून देण्याची नोटिस दिली. त्यानंतर मी ऑस्ट्रेलियातील वॉचटावर संस्थेच्या शाखा दप्तराला, पायनियर या नात्याने नेमणूक देण्याविषयी पत्र लिहिले.

माझी आयुष्यभराची नेमणूक

काही आठवड्यांनंतर, मला माझ्या पत्राचे उत्तर मिळाले. मला असे कळवण्यात आले की ऑस्ट्रेलियाचे सर्वात मोठे उपनगर सिडनी येथील स्ट्रॅथफिल्डमध्ये यहोवाच्या साक्षीदारांच्या मुख्यालयाच्या पटांगणात होणाऱ्‍या अधिवेशनानंतर मला नेमणूक दिली जाईल. अधिवेशन झाल्यानंतर लागलीच दुसऱ्‍या दिवशी सकाळी मी माझी नेमणूक घेण्यासाठी कार्यालयात हजर होते.

कार्यातील एका व्यक्‍तीने मला म्हटले: “आम्ही आता सध्या लॉन्ड्रीत अतिशय व्यग्र आहोत. तर तुम्ही काही आठवड्यांसाठी येथेच राहून आम्हाला मदत करू शकाल का?” ही ऑगस्ट १९४० ची गोष्ट होती—आणि अजूनही मी लॉन्ड्रीतच काम करत आहे! त्यावेळी मुख्यालय कुटुंबात केवळ ३५ सदस्य होते; आता २७६ जण आहेत.

परंतु तुम्हाला कदाचित वाटत असेल की मी ५० वर्षांपासून करत आलेल्या लॉन्ड्रीतल्या या कामाला “जीवनाचा उद्देशपूर्ण मार्ग” का समजते. त्याचे कारण सांगण्याआधी मला माझ्या पूर्वीच्या ध्येयांबद्दल सांगू द्या.

खेळ जीवनाचा मार्ग झाला

मी मेल्बर्न येथे जानेवारी १, १९१४ रोजी जन्मले. पाच मुलांमधली मी ज्येष्ठकन्या होते. आमचे पालक अतिशय प्रेमळ होते जे उच्च तत्त्वांनुसार चालत होते व गरज लागेल तेव्हा शिस्तही लावत. आमचे नावापुरते धार्मिक संगोपन झाले होते कारण आमचे पालक नियमितपणे चर्चला जाणाऱ्‍यांपैकी नव्हते. तरीसुद्धा, आम्ही मुलांनी चर्च ऑफ इंग्लंडच्या संडे स्कूलच्या वर्गात उपस्थित राहावे अशी ते नेहमी आम्हाला गळ घालत होते.

मी १९२८ मध्ये माझी शाळा सोडल्यावर व शिवण काम करून उपजीविका करत असताना, माझा बहुतेक फावला वेळ खेळात घालवण्याचे मी ठरवले. मला वाटले की निदान यामुळे तरी मी माझ्या लाजऱ्‍या स्वभावावर मात करू शकेन. मी एका टेनिस क्लबमध्ये माझे नाव नोंदवले व वर्षातील बाराही महिने खेळण्यास जात होते. मी हिवाळ्यात देखील बास्केटबॉल आणि बेसबॉल खेळत होते, आणि उन्हाळ्यात स्त्रियांच्या क्रिकेट संघात खेळत होते. क्रिकेट माझा आवडता खेळ झाला, आणि मी आंतरराज्य खेळात सर्वात वेगवान गोलंदाज होण्यासाठी माझ्या ह्‍या कलेत निपुण होण्याचे अतिशय प्रयत्न केले.

खेळापासून वेगळा असा उद्देश

मी लहान होते तेव्हा, वाईट कामे करणाऱ्‍या लोकांना प्रीतीचा देव सर्वकाळासाठी नरकात यातना देतो या शिकवणीमुळे अतिशय विचलित झाले. मला हे योग्य वाटले नाही. म्हणून बायबलमधून “नरक” याचा खरा अर्थ अनपेक्षितपणे शिकल्यावर मला किती आनंद झाला त्याची कल्पना करा. त्याचे असे झाले:

माझी बहीण फिलीस माझ्यापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे. तिलाही खेळण्यात आवड होती आणि आम्ही दोघी एकाच स्त्रियांच्या क्रिकेट संघात होतो. १९३६ मध्ये आमच्या संघातील एका सहकाऱ्‍याने फिलीसची ओळख जिम नावाच्या एका तरुणासोबत करून दिली. तो अतिशय धार्मिक होता असे समजले जात होते. लवकरच जिम फिलीस बरोबर बायबलच्या शिकवणींबद्दल बोलू लागला. तिची जिज्ञासा वाढू लागली. ती मला सांगत असे, “ते किती तर्कशुद्ध आणि न्याय्य आहे.”

त्या वेळी आमच्या घरात फिलीस आणि मी एका खोलीत राहत होतो, आणि जिम तिला देवाच्या राज्याबद्दल जे काही सांगत असे ते ती मला सांगे आणि माझी आस्था जागृत करण्याचा प्रयत्न करी. ती मला आनंदाने म्हणाली, “मानवी सरकार जे करू शकले नाही त्या गोष्टी हे राज्य करणार आहे.” परंतु मी तिच्यासोबत वाद घालत की आपल्याला गोंधळवून टाकणारा हा आणखी एक धर्म आहे आणि खरे म्हणजे, भवितव्याबद्दल कोणालाच माहीत नाही. परंतु फिलीसने चिकाटी सोडली नाही, मी एक ना एक दिवस वाचेन ह्‍या आशेने तिने आमच्या खोलीत अनेक ठिकाणी प्रकाशने ठेवली.

फिलीस ह्‍या नव्या विश्‍वासाबद्दल इतकी उत्साहित का झाली हे मला जाणून घ्यायचे होते. म्हणून एके दिवशी मी एक पुस्तिका उचलली. येथूनपुढे (इंग्रजी) असे त्याचे शीर्षक कुतूहल निर्माण करणारे होते. मी ती पुस्तिका चाळत होते तेव्हा “नरक” हा शब्द पाहिल्यावर मी माझे कान टवकारले. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे, बायबलमधला “नरक” हा शब्द वास्तविकरीत्या मानवजातीच्या सर्वसाधारण कबरेला सूचित करतो व तेथे चांगले आणि वाईट दोन्ही लोक जातात हे मला कळले. नरक हे यातनेचे ठिकाण नाही; मृत बेशुद्ध असतात व त्यांना कसलीही भावना नसते हेही मी शिकले.—उपदेशक ९:५, १०; स्तोत्र १४६:३, ४.

एका प्रेमळ आणि समर्थ देवाने, पुनरूत्थान असे नाव असलेल्या चमत्काराद्वारे मृतांना पुन्हा जिवंत करण्याचे अभिवचन दिले आहे याचे त्या पुस्तिकेने विशेषतः स्पष्टीकरण दिले हे पाहिल्यावर यामध्ये काही तरी तथ्य आहे असे मला वाटले. (योहान ५:२८, २९) जिम फिलीसला आणखी ज्या गोष्टी सांगत होता त्या सर्व मला जाणून घ्यायच्या होत्या. माझ्या बाबांनी मी लहान असताना मला दिलेले लहानसे किंग जेम्स वर्शन सापडल्यावर त्या पुस्तिकेतील सर्व शास्त्रवचने मी उघडून पाहिली. नरकाबद्दल आणि मृतांच्या स्थितीबद्दल त्या पुस्तिकेत जे काही म्हटले होते ते सर्व बायबलमधून उघडून पाहिल्यावर मला त्याची खात्री पटली.

देवाचे व्यक्‍तिगत नाव यहोवा आहे हे जाणल्यावर मला आणखी एक लोभस आश्‍चर्य वाटले. (स्तोत्र ८३:१८) मला असे दिसून आले की देव ज्या गोष्टी करतो किंवा होण्यास अनुमती देतो त्या सर्व गोष्टींबद्दल त्याचा काही ना काही तरी उद्देश असतो किंवा कारण असते. यामुळे मी स्वतःला विचारले, ‘माझ्या जीवनात खरोखर काय उद्देश आहे?’ तेव्हापासून मी नेहमी विचार करू लागले की जीवनातील इतर सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून खेळांना इतके महत्त्व देणे माझ्याकरता लाभाचे ठरेल का.

दृढनिश्‍चयानुसार कार्य

जीवनाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला याची जिम आणि फिलीसला जरा देखील कल्पना नव्हती, परंतु एकदा जेव्हा आमच्या कुटुंबाला एका मित्राच्या घरी पार्टीला बोलवले होते तेव्हा त्यांना ते कळून आले. त्या काळी, अशा प्रसंगी उपस्थित असलेले सर्व उभे राहून इंग्लंडच्या राजाला टोस्ट देत, म्हणजे पूज्यभाव दर्शविण्यासाठी दारूचे पेले उंच करून दारू पीत असत. परंतु मीही जिम आणि फिलीससोबत बसून राहण्याचे ठरवले. मी अजूनही बसून होते हे पाहून त्या दोघांना त्यांच्या डोळ्यांवर विश्‍वासच बसत नव्हता! आमचा अनादर दाखवण्याचा हेतू नव्हता हे नक्की, परंतु ख्रिस्ती या नात्याने आम्हाला वाटले की आम्ही तटस्थ राहावे आणि अशा राष्ट्रीय समारंभात भाग घेऊ नये.—योहान १७:१६.

परंतु, माझे पालक आणि आमच्या कुटुंबातील इतर जण आमच्यावर खूप चिडले. आम्ही बेईमान, आणि वेडे आहोत असे ते म्हणाले! त्यानंतर, मग फिलीस आणि मी स्त्रियांच्या क्रिकेट संघासाठी असलेल्या वार्षिक बक्षीस वितरणासाठी उपस्थित होतो तेव्हा राष्ट्रीय समारंभादरम्यान अशाचप्रकारची एक गोष्ट घडली. परिणाम असा झाला की आम्ही दोघींनी त्या संघाला राजीनामा दिला. मी विचार केला त्याप्रमाणे ते इतके कठीण नव्हते, कारण मला हे समजले होते की माझी भक्‍ती आणि निष्ठा आता देवाच्या स्वर्गीय राज्याचा राजा ख्रिस्त येशू याला द्यावयाची होती.

फिलीसने आता मला दर्शवून दिले, की मला आणखी बायबल ज्ञानाद्वारे माझ्या विश्‍वासाची उभारणी करण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना नियमितरित्या उपस्थित राहण्याची आवश्‍यकता आहे. त्यावेळेला मेल्बर्न येथे केवळ एकच मंडळी होती, म्हणून मी प्रत्येक रविवारी दुपारी सभांना उपस्थित राहू लागले. हीच देवाची खरी पार्थिव संघटना आहे याची मला लवकरच खात्री पटली.

त्यानंतर लगेचच मला मंडळीच्या घरोघरच्या प्रचार कार्यात भाग घेण्याचे आमंत्रण मिळाले. सुरवातीला मी जरा कांकूं केली, परंतु एके रविवारी प्रचार कसा केला जातो हे फक्‍त पाहण्यासाठी मी त्यांच्यासोबत जाण्याचा निश्‍चय केला. मला एका अनुभवी साक्षीदार बहिणीसोबत काम करण्यास सांगितल्यामुळे अतिशय आनंद झाला. या बहिणीने पहिल्याच घरात आत्मविश्‍वासाने बोलणी केली आणि घरमालकाकडूनही तिला चांगला प्रतिसाद मिळाला. मी मनातल्या मनात विचार केला, ‘हे कार्य काय इतके अवघड नाही, पण मला तिच्यासारखे बोलण्यासाठी पुष्कळ मेहनत करावी लागेल.’ मी पुन्हा प्रचार कार्यात गेले आणि आता मला झालेल्या आश्‍चर्याची जरा कल्पना करा जेव्हा या बहिणीने मला पहिल्याच घरी म्हटले, “आता तुला स्वतःच्या हिंमतीने प्रचार करता येईल.”

“स्वतःच्या हिंमतीने?” मी विचारले, मला धक्काच बसला! “तुम्ही उगाच माझी मस्करी करू नका! जर कोणी मला प्रश्‍न विचारला आणि मला त्याचे उत्तर देता आले नाही तर मी काय बोलू?” परंतु तिने मला आग्रह केला. मग मी एकटीच बोलण्यास गेले तेव्हा अक्षरशः थरथरत होते. मी एकाबाजूला गेले आणि ती रस्त्याच्या दुसऱ्‍या बाजूला लोकांना साक्ष देण्यासाठी गेली. त्या माझ्या पहिल्या सकाळी मी कशीतरी निभावले.

तेव्हापासून मी प्रत्येक रविवारी प्रचार कार्यात जाऊ लागले. जर कोणी मला दारावर काही प्रश्‍न विचारला ज्याचे उत्तर मला माहीत नसले की मी म्हणत असे, “या विषयावर मी संशोधन करीन आणि मग तुम्हाला पुन्हा भेटीन.” आनंदाची गोष्ट अशी की, यहोवा मला माझे नवे उद्देशपूर्ण जीवन पुढे चालू ठेवण्यास सतत बळ आणि धैर्य देत राहिला. मी माझे जीवन त्याला समर्पित केले व ऑक्टोबर १९३९ मध्ये मेल्बर्न शहरातील सार्वजनिक पोहण्याच्या टाकीत माझा बाप्तिस्मा झाला. आता पर्यंत फिलिसचा विवाह जिमसोबत झाला होता आणि यावेळेसच तिने मला, मी पायनियरींग का करत नाही असे विचारले.

शाखा दप्तरातील सेवा

मी जानेवारी १९४१ मध्ये बेथेलमध्ये, ज्याला आपण शाखा दप्तर म्हणतो तेथे, काम करण्यास चालू केल्यानंतर लगेचच ऑस्ट्रेलियात यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यावर बंदी आली. काही काळानंतर लष्कराने स्ट्रॅथफिल्ड येथील आमचे बेथेल गृह ताब्यात घेतले, आणि मला शहराच्या बाहेर ४८ किलोमीटर्स दूरवर असलेल्या इंग्लबर्न येथील संस्थेच्या शेतात पाठवण्यात आले. जून १९४३ मध्ये न्यायालयाने वॉचटावर संस्थेला निर्दोष ठरवून तिच्यावरची बंदी उठवली. त्या वर्षाच्या शेवटापर्यंत, आम्हापैकी २५ जणांना स्ट्रॅथफिल्ड बेथेल येथे पुन्हा बोलवण्यात आले. तेथे मी लॉन्ड्रीत काम करू लागले आणि त्यासोबत बेथेल गृहातील इतरही कामे करीत होते.

त्यानंतरचे दशक फार लवकर निघून गेल्यासारखे वाटले. १९५६ मध्ये, मी टेड विलॅन्ड, एका बेथेल सहकर्मचाऱ्‍यासोबत विवाह केला. टेड अतिशय शांत, सहनशील व्यक्‍ती होता, आणि आम्हा दोघांना पती पत्नी म्हणून बेथेलमध्ये राहण्याची परवानगी मिळाली तेव्हा आम्हाला अतिशय आनंद झाला. आम्हा दोघांना आमच्या उद्देशपूर्ण जीवनाची जोपसना करून, ऑस्ट्रेलिया शाखेत सेवा करण्याचा सुहक्क मिळाला होता म्हणून आम्ही आनंदी होतो. अर्थात, आमच्या बेथेल कार्यासोबत आम्हाला ख्रिस्ताचे अनुयायी होण्यास इतरांना मदत करण्यास एकत्र मिळून काम करण्याचा देखील आनंद मिळाला. आम्ही ज्यांना मदत केली त्या वीक्स कुटुंबाचा तुम्ही ऑक्टोबर २२, १९९३ च्या सावध राहा! अंकात अनुभव वाचू शकता.

बेथेलमधील माझ्या सुरवातीच्या ३० वर्षांदरम्यान, राज्य प्रचाराच्या एकसारख्या वाढीकरता आमच्या कर्मचारी वर्गात आणखी केवळ १० ते १२ व्यक्‍तींची गरज होती. परंतु १९७० च्या दशकामध्ये आम्ही येथेच टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिके छापण्यास सुरवात केली तेव्हा परिस्थितीत अगदी झटपट बदल झाला. जानेवारी १९७२ मध्ये नव्या छापखान्याचे बांधकाम चालू झाले. त्यानंतर लगेचच जपानहून ४० टन वजनाचे मुद्रणालय आले, व १९७३ पर्यंत आम्ही प्रत्येक महिन्याला जवळजवळ ७,००,००० नियतकालिके छापत होतो. आमच्या बेथेल कुटुंबाची खरोखरच वाढ होऊ लागली होती.

१९७० च्या दशकात माझ्यावर व्यक्‍तिगत दुःख कोसळले. पहिल्याने, माझे प्रिय पती टेड, १९७५ मध्ये वयाच्या ८० व्या वर्षी मरण पावले. त्यानंतर, एका वर्षाच्या आतच, माझे वृद्ध वडील देखील मृत्युत झोपी गेले. मला यहोवा, आणि त्याचे वचन बायबल यामधून तसेच माझ्या आध्यात्मिक बंधू आणि भगिणींकडूनही पुष्कळ सांत्वन मिळाले. माझ्या जीवनातील या अतिशय दुःखद प्रसंगी देखील मी बेथेलमध्ये माझ्या उद्देशपूर्ण कार्यात व्यग्र राहिल्यामुळे मला त्याचा बराच लाभ झाला.

तथापि, माझ्या जीवनाचा गाडा चालला आहे व मी विधवा झाले तरी समाधान आणि आशीर्वादांचा अनुभव घेऊ लागले. १९७८ मध्ये, मी लंडन, इंग्लंड येथील अधिवेशनाला उपस्थित राहिले, व त्यानंतर ब्रुकलिन न्यूयॉर्क येथील वॉचटावर संस्थेच्या जागतिक मुख्यालयाला भेट दिली. ब्रुकलिन बेथेलमध्ये माझ्या शेकडो बंधू आणि भगिणींना आनंदाने काम करताना पाहिल्यामुळे ते आजर्यंत माझ्यासाठी स्फूर्तीदायक ठरले आहे.

१९७० च्या दशकाचा अंत होत आला तसे आम्हाला सांगण्यात आले की ऑस्ट्रेलिया बेथेल कॉम्प्लेक्सचा आणखी विस्तार करण्याचे ठरवले आहे. परंतु, हा विस्तार स्ट्रॅथफिल्डमध्ये होणार नव्हता कारण आम्हाला आधीच तेथे जागा अपुरी पडत होती. त्याऐवजी, १९४० च्या दशकाच्या सुरवातीला बंदी आणण्यात आली होती त्यावेळेला मी जेथे काम केले त्या इंग्लबर्न येथील आमच्या जागेत एक नवे, व मोठे कॉम्प्लेक्स बांधण्यात येणार होते.

उद्देशपूर्ण जीवनाचा अखंड मार्ग

जानेवारी १९८२ मध्ये आम्ही आमच्या नव्या सुविधांमध्ये राहावयास गेलो तेव्हा काय आनंदीआनंद होता! सुरवातीला आम्हाला आमचा हा ओळखीचा परिसर सोडावयास थोडेसे वाईट वाटले, पण मग ७३ सुंदर बेडरूमस्‌ असलेले आमचे नवे गृह पाहून आम्ही रोमहर्षित झालो. वीटांच्या भिंतींकडे व उपनगरी रस्त्यांकडे पाहण्याऐवजी आम्ही सगळीकडे हिरवळ असलेली शेती आणि वृक्ष, चरत असलेली गुरे, व वैभवी सूर्योदय आणि सूर्यास्त पाहतो—सर्वात रमणीय देखावा.

मार्च १९, १९८३ रोजी, शरदऋतुच्या सुंदर सूर्यप्रकाशात आमच्या नव्या कॉम्प्लेक्सचे समर्पण झाले. यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाचे सदस्य ल्यॉईड बॅरी यांनी एक प्रेरक समर्पणाचे भाषण दिले. ते व त्यांची पत्नी समर्पणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यामुळे मला व्यक्‍तिगतरीत्या अतिशय आनंद झाला, कारण आम्ही सर्वजण तरुण असताना मी त्यांच्यासोबत स्ट्रॅथफिल्ड बेथेलमध्ये काम केले होते.

राज्य प्रचार कार्याच्या सतत वाढीमुळे इंग्लबर्न येथील आमच्या सुविधांचा आणखी विस्तार करावा लागला. १९८७ मध्ये कार्यालय विस्तारण्यात आले. आणि मग नोव्हेंबर २५, १९८९ रोजी एका नव्या पाच मजली निवास इमारतीचा आणि तीन मजली नव्या कारखान्याचे समर्पण झाले. मी माझे सेवाकार्य चालू केले तेव्हा आम्ही ४,००० पेक्षा कमी प्रचारक ऑस्ट्रेलियात होतो आणि आता आमची संख्या जवळजवळ ५९,००० इतकी झाली आहे, केवढी ही अवाढव्य वाढ!

आता अलिकडेच, ऑस्ट्रेलियाच्या शाखा दप्तराला जपान आणि जर्मनीसोबत संस्थेची तीन प्रादेशिक अभियांत्रिकी कार्यालयातील एक म्हणून बनवण्यात आले. यामुळे बेथेल कॉम्प्लेक्सचा आणखी विस्तार करण्याची गरज पडली. आत्ताच तीन मजली कार्यालय इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आणि पाच मजली निवास इमारतीचे काम थोड्याच दिवसांनी पूर्ण होईल. या इमारतीत आमच्या सतत वाढत्या कुटुंबासाठी आणखी ८० खोल्या असतील.

लॉन्ड्रीमध्ये, आमच्याकडे काम करण्यासाठी मोठा कर्मचारी वर्ग आहे, परंतु मला नेहमी ऑगस्ट १९४० चा तो दिवस आठवतो जेव्हा मला दोन आठवड्यांसाठी या विभागात मदत करण्याचे निमंत्रण दिले होते. ते दोन आठवडे ५० पेक्षा अधिक वर्षांपर्यंत लांबले व यहोवा देवाने जीवनाच्या अशा एका उद्देशपूर्ण मार्गावर माझ्या पावलांना मार्गदर्शित केले त्याबद्दल ती खूप कृतज्ञ आहे.

[२१ पानांवरील चित्रं]

मी २५ वर्षांची होते तेव्हा

[२३ पानांवरील चित्रं]

१९५६ मध्ये आमचा लग्नाचा दिवस

[२४ पानांवरील चित्रं]

१९३८ मध्ये माझी बहीण व मी खेळामध्ये अतिशय गुंतलेलो होतो, परंतु आता माझे जीवन आता अधिक उत्पादक आहे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा