विसाव्या शतकात देवाचा नकार
“लोक देवाच्या अनुपस्थितीची कल्पना स्वीकारत आहेत परिणामांचा विचार न करता, तसेच देवाला मध्ये न घेता त्यांच्या जीवनाला ते स्वतंत्रपणे संघटित करत आहेत.” —देवाबद्दलचा शंभर वर्षांपासूनचा वाद—आधुनिक नास्तिकवादाचे स्रोत.
एक उत्तुंग वृक्ष, पहिल्यांदा प्रभावकारी असला तरी काही काळाने त्याच्याकडे सामान्य दृष्टिकोनाने पाहिले जाते. त्याची उपस्थिती परिचित असते; त्यानंतर त्याची उंची पाहून कोणालाही आश्चर्य वाटत नाही.
नास्तिकवादाच्या बाबतीत असेच आहे. १९ व्या शतकामध्ये त्याने पुष्कळ वादविवाद चेतवले असले, तरी आज देवाच्या अस्तित्वाचा नकार धक्कादायक किंवा शांतता भंग करणारा देखील नाही. सहिष्णुतेच्या एका शकाने, नास्तिकवादाला आस्तिकवादासोबत शांतीने एकत्र राहण्याची अनुमती दिली आहे.
याचा अर्थ असा होत नाही की, पुष्कळ लोक देवाचा पूर्णपणे नकार करतात; उलटपक्षी अमेरिका, युरोप आणि आशिया अशा ११ राष्ट्रांमधून घेतलेल्या मतनोंदणीतून असे दिसून आले की, सरासरी २ पेक्षा जरा अधिक प्रतिशत लोक नास्तिक असल्याचा दावा करतात. तरीही, नास्तिकवादाचा आत्मा सगळीकडे दिसून येतो—देव अस्तित्वात आहे असा विश्वास करणाऱ्यांमध्ये देखील तो दिसून येतो. ते कसे शक्य आहे?
देवाच्या अधिकाराला नाकारणे
“काही वेळा नास्तिकवाद, देवाला केवळ व्यावहारिकपणे धिक्कारणे, टाळणे किंवा या दोघांना सूचित करतो,” अशी नोंद द एन्सायक्लोपिडिया अमेरिकाना करतो. याचकारणास्तव, द न्यू शॉटर ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी “नास्तिक” व्यक्तीची पुढीलप्रमाणे दुसरी व्याख्या देते: “देवाला नैतिकरीत्या नाकारणारी व्यक्ती; एक निरीश्वर व्यक्ती.”—तिरपे अक्षर आमचे.
होय, नास्तिकवादामध्ये देवाच्या अस्तित्वाचा नकार किंवा त्याच्या अधिकाराचा वा या दोन्हींचा समावेश असू शकतो. बायबल तीत १:१६ मध्ये या नास्तिकवादी आत्म्याचा उल्लेख करते. ते म्हणते: “आपण देवाला ओळखतो असे ते बोलून दाखवितात; परंतु कृत्यांनी त्याला नाकारितात.”—द न्यू इंग्लिश बायबल; पडताळा स्तोत्र १४:१.
देवाच्या अधिकाराचा त्याग पहिल्या मानवी जोडप्याने केला होता हे पुराव्यानिशी सिद्ध करता येते. हव्वेने देवाचे अस्तित्व कबूल केले; तरीही, तिला “देवासारखे बरेवाईट जाणणारे” व्हायचे होते. यावरून हाच अर्थ ध्वनित होतो की ती ‘स्वतःची स्वामिनी होऊन’ स्वतःचे नैतिक नियम बनवू शकते. नंतर आदाम, देवाच्या अधिकाराचा त्याग करण्यास हव्वेला जाऊन मिळाला.—उत्पत्ती ३:५, ६.
ही मनोवृत्ती आज सर्वत्र दिसून येते का? होय. स्वातंत्र्याच्या शोधार्थ मार्मिक नास्तिकवाद स्पष्ट होतो. “लोकांना देवाच्या पाळतीखाली राहण्याचा कंटाळा आला आहे. त्यांना . . . स्वातंत्र्यात राहणे आवडते,” असे निरीक्षण देवाबद्दलचा शंभर वर्षांपासूनचा वाद—आधुनिक नास्तिकवादाचे स्रोत (इंग्रजी) हे पुस्तक करते. बायबलचे नैतिक नियम अव्यावहारिक, अविश्वसनीय आहेत असे म्हणून नाकारले जातात. अनेक लोकांची विचारसरणी ईजिप्तच्या फारोसारखी आहे ज्याने उद्धटपणे म्हटले: ‘हा कोण यहोवा आहे की ज्याचे मी ऐकावे? मी त्या यहोवाला जाणत नाही.’ त्याने यहोवाचा अधिकार नाकारला.—निर्गम ५:२, NW.
ख्रिस्ती धर्मजगताने केलेला देवाचा नकार
देवाच्या अधिकाराचा सर्वात धक्कादायक नकार ख्रिस्ती धर्मजगताच्या पाळकवर्गाकडून येतो. त्यांनी शुद्ध बायबल सत्याबदली मनुष्य निर्मित सांप्रदाय आपल्यात घेतले आहेत. (पडताळा मत्तय १५:९.) शिवाय, त्यांनी २० व्या शतकातील सर्वात रक्तपाती युद्धांना पाठिंबा दिला आहे. अशाप्रकारे, त्यांनी खरी प्रीती दाखवण्याच्या बायबलच्या आज्ञेचा धिक्कार केला आहे.—योहान १३:३५.
पाळकवर्गाने देवाच्या नैतिक दर्जांकडे पाठ फिरवून त्याला नाकारले आहे. याचा पुरावा पुढील उदाहरणातून दिसतो. या पाळकवर्गावर मुलांना लैंगिक विकृतीचे बळी पाडल्याचे एकापाठोपाठ एक खटले सिद्ध झाले आहेत. ख्रिस्ती धर्मजगताची परिस्थिती प्राचीन इस्राएल आणि यहूदाच्या अनुरूप आहे. “देश रक्तपाताने भरला आहे आणि शहर कपटाने पूर्ण आहे, कारण ते म्हणतात, यहोवाने देशाचा त्याग केला आहे, यहोवा पाहत नाही,” असे यहेज्केलला सांगण्यात आले. (यहेज्केल ९:९, NW; पडताळा यशया २९:१५.) यास्तव, अनेकांनी ख्रिस्ती धर्मजगताच्या चर्चला जाण्याचे पूर्णपणे सोडून दिले आहे यात काही आश्चर्य करण्यासारखे नाही! परंतु त्यामुळे त्यांनी देवावरील विश्वासाचा त्याग करावा का?
नास्तिकवादाची साधार कारणे?
अनेक नास्तिकवाद्यांनी धर्मांतील दांभिकपणा पाहिला असला किंवा नसला तरी, ते देवावर विश्वास ठेवण्यास तयार होऊ शकत नाहीत कारण ते जगात होणारे दुःख पाहत असतात. सिमोन डी बीयुवोईर नावाच्या या स्त्रीने एकदा असे म्हटले: “जगातील सर्व विसंगततेचे ओझे घेतलेल्या सृष्टिकर्त्यापेक्षा सृष्टिकर्ता नसलेल्या एका जगाचा विचार करणे अधिक स्वीकारयोग्य आहे असे मला दिसून आले.”
जगातील सर्व अन्याय—ज्यामध्ये दांभिक धार्मिकवाद्यांनी चेतवलेल्या अन्यायाचा देखील समावेश होतो—देव अस्तित्वात नसल्याचे शाबीत करतात का? समजा: जर एका चाकूचा वापर धाक दाखवण्यासाठी, इजा पोहंचवण्यासाठी किंवा कदाचित एखाद्या निष्पाप व्यक्तीचा खून करण्यासाठी केला जातो तेव्हा त्या चाकूला बनवणारा कोणी नव्हता असे त्यावरून शाबीत होते का? उलट त्या वस्तुचा गैरवापर करण्यात आला असेच यावरून दिसून येत नाही का? त्याचप्रमाणे, देवाने मानवांना दिलेल्या क्षमतांचा तसेच पृथ्वीचा ते गैरवापर करत आहेत याचाच पुरावा मानवी दुःख शाबीत करते.
परंतु, काहींना असे वाटते की आपण देवाला पाहू शकत नसल्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवणे तर्कशुद्ध नाही. पण मग हवा, ध्वनिलहरी आणि गंध याबद्दल काय? यातील कोणतीही गोष्ट आपण पाहू शकत नाही, तरीही आपल्याला माहीत आहे की त्या गोष्टी अस्तित्वात आहेत. आपले फुफ्फुस, कान आणि नाक आपल्याला त्याची जाणीव करून देतात. निश्चितच, आपल्याजवळ पुरावा असला तर आपण पाहू न शकणाऱ्या गोष्टींवर देखील विश्वास ठेवतो.
भौतिक पुराव्यांवर—यामध्ये विद्युत परमाणु, धनवीजक, अणु, अमीनो ॲसीड व जटिल मेंदू यांचा देखील समावेश आहे—विचार केल्यावर सृष्टिवैज्ञानिक इरवीन विल्यम नोब्लॉक यांना असे म्हणावयास प्रेरणा झाली: “मी देवावर विश्वास ठेवतो कारण, मला असे वाटते की सर्व गोष्टी अशाप्रकारे का आहेत याचे उत्तर केवळ त्याचे ईश्वरी अस्तित्व हेच एकमात्र तर्कशुद्ध स्पष्टीकरण आहे.” (पडताळा स्तोत्र १०४:२४.) त्याचप्रकारे, शरीरक्रियाशास्त्रज्ञ मॉर्लिन बुक्स क्रिडर म्हणतात: “सर्वसाधारण मानव प्राणी तसेच वैज्ञानिक अभ्यास आणि संशोधनाला आपले जीवन वाहिलेला एक पुरूष या नात्याने मला देवाच्या अस्तित्वाबद्दल मुळीच शंका येत नाही.”
जगात केवळ हीच माणसे देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात असे नाही. भौतिकशास्त्राचे प्राध्यापक हेन्री मॉरग्नो यांचे असे म्हणणे आहे की: “तुम्ही सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञांमध्ये पाहिले तर त्यांच्यामध्ये फार कमी लोक नास्तिक असल्याचे तुम्हाला दिसून येईल.” विज्ञानाची प्रगती किंवा धर्माचे अपयश यातील कोणतीही गोष्ट सृष्टिकर्त्यावरील आपला विश्वास सोडून देण्यास कारणीभूत ठरू नये. ते का याचे आपण परीक्षण करू या.
खऱ्या धर्मातील फरक
१८०३ मध्ये, अमेरिकेचे राष्ट्रपती थॉमस जेफरसन यांनी लिहिले: “स्वतः ख्रिस्ताच्या प्रामाणिक उपदेशांचा नव्हे तर; ख्रिस्ती विश्वासाच्या भ्रष्टतेला माझा खरोखरच विरोध आहे.” होय, ख्रिस्ती धर्मजगतामध्ये आणि ख्रिस्ती विश्वासामध्ये फरक आहे. ख्रिस्ती धर्मजगताचे पुष्कळ सिद्धांत माणसांच्या सांप्रदायांवर आधारलेले आहेत. त्याच्या विरूद्धतेत, खरा ख्रिस्ती विश्वास त्याच्या सर्व शिकवणी पूर्णपणे बायबलवर रचतो. यामुळे पौलाने पहिल्या शतकातील कलस्सैकरातील लोकांना लिहिले की त्यांनी “अचूक ज्ञान,” “बुद्धी” आणि “आध्यात्मिक समज” प्राप्त करावी.—कलस्सैकर १:९, १०, NW.
हीच गोष्ट आपण खऱ्या ख्रिश्चनांकडून अपेक्षिली पाहिजे, कारण येशूने त्याच्या शिष्यांना आज्ञा दिली: ‘सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा बाप्तिस्मा द्या . . . , जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यास पाळावयास शिकवा.’—मत्तय २८:१९, २०.
आज, यहोवाचे साक्षीदार संपूर्ण जगात २३१ राष्ट्रांमध्ये ह्या आज्ञेचा प्रचार करीत आहेत. त्यांनी बायबलचे भाषांतर १२ भाषांमध्ये केले आहे व जवळजवळ ७,४०,००,००० प्रती छापल्या आहेत. शिवाय, गृह बायबल अभ्यास कार्यक्रमाद्वारे, ते आता सध्या ४५,००,००० पेक्षा अधिक व्यक्तींना ‘येशूने आज्ञापिलेल्या गोष्टी पाळावयास’ मदत करत आहेत.
या शैक्षणिक कार्यक्रमाचे दूरगामी परिणाम होत आहेत. हा कार्यक्रम खरा ज्ञानप्रसार देतो कारण तो मनुष्यांच्या विचारांवर नव्हे तर देवाच्या बुद्धीवर आधारित आहे. (नीतीसूत्रे ४:१८) शिवाय, हा कार्यक्रम सर्व राष्ट्रांच्या व वंशाच्या लोकांना, मानवी “ज्ञानप्रसार” जे साध्य करू शकले नाही—ते “नवे मनुष्यत्व” धारण करण्यास मदत करते. या ‘नव्या मनुष्यत्वामुळे’ त्यांना एकमेकांसाठी खरी प्रीती विकसित करता येते.—कलस्सैकर ३:९, १०.
खरा धर्म आपल्या २० व्या शतकात विजयी होत चालला आहे. तो देवाचा—त्याच्या अस्तित्वाचा किंवा त्याच्या अधिकाराचाही नकार करत नाही. याचे तुम्ही स्वतः परीक्षण करून पाहावे यासाठी आम्ही आपल्याला यहोवाच्या साक्षीदारांच्या एखाद्या राज्य सभागृहास भेट देण्याचे आमंत्रण देतो.
[६ पानांवरील चौकट]
नास्तिकवादाची मुळे बळकट करणे
१८ व्या शतकाच्या मध्यात, डनी डिडरॉट नावाच्या तत्त्वज्ञान्याला इंग्रजीतून फ्रेंच भाषेत एक खंडाचा विश्वकोश भाषांतर करण्याची नेमणूक देण्यात आली. परंतु त्याने त्याच्या मालकाने त्याच्याकडून जी अपेक्षा केली त्यापेक्षाही अधिक साध्य केले. डिडरॉटने एन्सेक्लोपेडी, हा २८ खंडाचा विश्वकोश संकलित करण्यासाठी तीन दशके खर्च केली. इतिहासातील तो ज्या काळात राहात होता त्या काळात हा ग्रंथ उठून दिसत होता.
त्या एन्सेक्लोपेडी मध्ये बरीच व्यावहारिक माहिती असली तरी, तो पूर्णपणे मानवी बुद्धिवर जोर देत होता. मानवाची महान युगे (इंग्रजी) या संग्रहानुसार त्या विश्वकोशाने, “[तत्त्वज्ञान्याच्या] पराकाष्ठेचे हे मत मांडण्याचे धैर्य केले की मनुष्याने त्याचे मार्गदर्शक तत्त्व म्हणून विश्वासाऐवजी बुद्धि वापरली तर तो त्याचे भाग्य सुधारू शकतो.” त्यामध्ये विशेषकरून देवाचा उल्लेख केलेलाच नाही. आधुनिक वारसा (इंग्रजी) हे पुस्तक म्हणते, “त्यांच्या प्रतिपाद्य विषयानुसार, संपादकांनी हे स्पष्ट केले की मानवांना धर्माबद्दल जाणून घ्यायची गरज नाही.” यात काही आश्चर्य नाही, की चर्चने एन्सेक्लोपेडी याला दाबून टाकण्याचा प्रयत्न केला. सरकारा तर्फे मुख्य वकीलाने, तो शब्दकोश राजकारण, नैतिकता आणि धार्मिकतेला पालथे पाडणारा आहे असा दोषारोप लावला.
त्याचे इतके विरोधक असताना देखील, सुमारे ४,००० लोकांनी डिडरॉटच्या एन्सेक्लोपेडी ची मागणी केली. त्याची बेसुमार किंमत लक्षात घेता ही थक्क करून सोडणारी संख्या होती. परंतु नास्तिकतेचे हे अदृश्य विरूद्ध मतप्रवाह लवकरच संपूर्णतः देवाचा नकार यात वाढेल हे निश्चित आहे.