“ज्याला कर द्यावयाचा त्याला तो द्या”
“या जगात मृत्यू आणि कर याशिवाय आणखी कोणतीही गोष्ट निश्चित नाही,” असे अमेरिकन मुत्सद्दी व संशोधक बेंजामिन फ्रँक्लीन यांनी म्हटले. त्याच्या या वारंवार उद्धृत केल्या जाणाऱ्या शब्दांवरून कर देणे केवळ अपरिहार्य आहे एवढेच नव्हे, तर त्याच्यामुळे जी धास्ती निर्माण होते ती देखील दिसून येते. पुष्कळ लोकांना, जसा मृत्यू त्याचप्रमाणे कर देणेही आवडत नाही.
कर देणे हे कितीही नकोसे वाटत असले, तरी ते असे बंधन आहे जे खरे ख्रिस्ती अत्यंत गंभीरपणे घेतात. प्रेषित पौलाने रोममधील ख्रिस्ती मंडळीला असे लिहिले: “ज्याला जे द्यावयाचे ते त्याला द्या; ज्याला कर द्यावयाचा त्याला तो द्या, ज्याला जकात द्यावयाची त्याला ती द्या, ज्याचा धाक धरावयाचा त्याचा धाक धरा व ज्याचा सन्मान करावयाचा त्याचा सन्मान करा.” (रोमकर १३:७) तसेच येशूने “कैसराचे ते कैसराला व देवाचे ते देवाला भरून द्या,” असे म्हटले तेव्हा तो खासपणे कर देण्याला सूचित करत होता.—मार्क १२:१४, १७.
यहोवाने सरकारी ‘वरिष्ठ अधिकाऱ्यांना’ अस्तित्वात असण्यास अनुमती दिली आहे आणि त्याच्या सेवकांनी त्यांना सापेक्षरितीने अधीन असावे असे तो इच्छितो. मग तो, देवाच्या उपासकांनी कर द्यावे असे आग्रहाने का सांगतो? पौल तीन मूळ कारणे देतो: (१) नियम तोडणाऱ्यांना शिक्षा देण्यात ‘वरिष्ठ अधिकाऱ्यांचा क्रोध;’ (२) कर देण्याबद्दल लबाडी केली तर एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीचा विवेक शुद्ध राहत नाही; (३) सेवा करणाऱ्या आणि सुव्यवस्था राखून ठेवण्याबद्दल या ‘सेवकांना’ मोबदला देण्याची गरज. (रोमकर १३:१-७) पुष्कळांना कर देणे आवडत नसेल. तरीसुद्धा, त्यांना पोलिस किंवा आगीसाठी सुरक्षा, रस्त्याला उत्तम स्थितीत टिकवून ठेवण्याची व्यवस्था, सार्वजनिक शाळा, टपालाची व्यवस्था या गोष्टी नसणाऱ्या देशात निश्चितच राहावयास आवडणार नाही. ऑलिवर वेन्डेल होम्स या अमेरिकन विधिवेत्त्यांनी एके वेळी असे म्हटले: “आपण सुसंस्कृत समाजासाठी कर भरतो.”
देवाच्या सेवकांसाठी कर देणे ही नवीन गोष्ट नाही. प्राचीन इस्राएलाचे रहिवाशी त्यांच्या राजाला पाठिंबा देण्यासाठी एक प्रकारचा कर देत असत. त्या शासकांपैकी काहींनी प्रजेवर अयोग्य कराचा पुष्कळ बोजा लादला. यहूद्यांनी, त्यांच्यावर वर्चस्व गाजवलेल्या ईजिप्त, पर्शिया, रोम यासारख्या परदेशीय शासनांना देखील जकात आणि कर दिले. यास्तव पौलाने कर देण्याचा उल्लेख केला तेव्हा त्याच्या दिवसातील ख्रिश्चनांना, तो कशाबद्दल बोलत होता याची चांगलीच जाणीव होती. ते कर रास्त होते किंवा नव्हते आणि सरकारने हे पैसे कसेही खर्च केले तरी जो कर द्यावयाचा होता तो दिलाच पाहिजे हे त्यांना माहीत होते. आजही, ख्रिश्चनांना हे लागू होते. तथापि, या कठीण काळात कर भरताना कोणती तत्त्वे आपल्याला मार्गदर्शन पुरवतील?
पाच मार्गदर्शक तत्त्वे
व्यवस्थेचे असा. ‘अव्यवस्था माजविणारा नव्हे तर जो शांतीचा देव’ आहे त्या यहोवाची आपण उपासना आणि अनुकरण करतो. (१ करिंथकर १४:३३; इफिसकर ५:१) कर देण्याची बाब येते तेव्हा व्यवस्थेचे असणे महत्त्वाचे आहे. तुमचे दस्तऐवज पूर्ण, अचूक आणि व्यवस्थित ठेवलेले आहेत का? बहुधा, त्यासाठी फार किंमतीच्या फाईलच्या व्यवस्थेची गरज नाही. तुम्ही प्रत्येक प्रकारच्या दस्तऐवजासाठी (जसे की विविध रक्कमा भरल्याच्या पावत्या) एक फाईल ठेवू शकता. प्रत्येक वर्षाचा संग्रह मोठ्या फाईलमध्ये करून ठेवणे पुरेसे असेल. सरकार गतकाळातील अहवाल तपासण्याचा निर्णय घेईल यासाठी पुष्कळ देशात या फाईल्स् काही वर्षांसाठी ठेवणे आवश्यक वाटेल. यास्तव येथूनपुढे त्याची गरज लागणार नाही अशी खात्री असल्याशिवाय काहीही फेकून देऊ नका.
प्रामाणिक असा. पौलाने लिहिले: “आमच्यासाठी प्रार्थना करीत राहा; सर्व बाबतीत चांगले वागण्याची आमची इच्छा असून आमचा विवेकभाव चांगला आहे अशी आमची खातरी आहे.” (इब्रीयांस १३:१८) आपले कर देत असताना, प्रामाणिक असण्याच्या मनःपूर्वक इच्छेने आपल्या प्रत्येक निर्णयाला मार्गदर्शन दिले पाहिजे. पहिली गोष्ट, कळवाव्या लागणाऱ्या उत्पन्नाच्या कराबद्दल पाहा. पुष्कळ देशात, बक्षीस, किरकोळ कामे, विक्री याद्वारे मिळणारे—अतिरिक्त उत्पन्न विशिष्ट प्रमाणापेक्षा अधिक झाल्यास त्यावर कर आकारले जातात. एखादा “विवेकभाव चांगला” असणारा ख्रिस्ती तो जेथे राहतो तेथे करपात्र उत्पन्न कोणते आहे हे शोधून काढील आणि त्यास लागू होणारा कर भरेल.
दुसरी, वजावटाची बाब आहे. सर्वसाधारणपणे आपल्या करपात्र उत्पन्नातून काही खर्चाची वजावट करण्यास सरकार करदात्यांना अनुमती देते. या अप्रामाणिक जगात, अशा वजावटीचा दावा करताना पुष्कळांना “अप्रामाणिक” किंवा “असत्य” असण्यात काहीच हरकत वाटत नाही. एका अहवालानुसार, अमेरिकेत एका मनुष्याने त्याच्या पत्नीसाठी एक महाग लोकरीचा कोट आणला मग त्यास एका दिवसासाठी आपल्या व्यापाराच्या ठिकाणी टांगला जेणेकरून कामाच्या जागेतील “शोभेची वस्तू” या नात्याने तो त्याची वजावट दाखवू शकला! आणखी एका व्यक्तीने त्याच्या मुलीच्या विवाहाचा खर्च व्यापारातील वजावट आहे असा दावा केला. दुसऱ्या एकाची पत्नी त्याच्यासोबत पुष्कळ महिन्यांसाठी दूरच्या पौर्वात्य देशांमध्ये मुख्यत्वेकरून सामाजिक कारणांसाठी आणि करमणूकीसाठी गेली होती तरी तिच्या प्रवासाच्या खर्चाची वजावट दाखवण्याचा प्रयत्न त्याने केला. अशा उदाहरणांचा काही अंतच नाही. स्पष्टपणे सांगायचे तर, जी गोष्ट व्यापाराची वजावट नाही त्यास तसे असल्याचे सांगणे एक प्रकारची लबाडी आहे—आपला देव, यहोवा ह्याला तिचा वीट आहे.—नीतीसूत्रे ६:१६-१९.
चतुर असा. येशूने त्याच्या शिष्यांना “सापांसारखे चतुर व कबुतरांसारखे निरुपद्रवी” असावयास सांगितले. (मत्तय १०:१६) तो सल्ला आपल्या कर देण्याच्या सवयींना उत्तमरितीने लागू होऊ शकतो. आजकाल विशेषतः विकसित राष्ट्रांमध्ये, अधिकाधिक लोक एखाद्या लेखा कंपनीला किंवा त्या पेश्यातील एखाद्याला त्यांचे कर ठरवण्यासाठी देतात. मग ते केवळ कागदपत्रांवर स्वाक्षरी करतात आणि चेक पाठवून देतात. अशा वेळी नीतीसूत्रे १४:१५ मधील सावधानतेच्या ईशाऱ्याकडे लक्ष देणे चांगले असेल: “भोळा प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवितो; शहाणा नीट पाहून पाऊल टाकितो.”
पुष्कळांनी एखाद्या अप्रामाणिक हिशेबनीसावर किंवा अननुभवी कर ठरवणाऱ्याच्या ‘प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवल्यामुळे’ त्यांना सरकारासोबत व्यवहार करताना बराच त्रास झाला. यास्तव चाणाक्ष असणे किती चांगले असेल बरे! कोणत्याही कागदपत्रावर स्वाक्षरी करण्याआधी काळजीपूर्वकतेने ते वाचून काढण्यास चतुर असा. कोणतीही नोंद, वगळलेली गोष्ट किंवा वजावट तुम्हाला विचित्र वाटत असल्यास, तुम्हाला ती बाब प्रामाणिक आणि कायदेशीर असल्याचे समाधान होईपर्यंत—आवश्यक असल्यास वारंवार—तिचे स्पष्टीकरण करून घ्या. हे खरे आहे, की पुष्कळ देशांमध्ये करासंबंधीचे नियम आता अधिकाधिक गुंतागुंतीचे होत चालले आहेत परंतु तुम्ही ज्यावर स्वाक्षरी देता ती गोष्ट होता होईल तितकी समजून घेणे सुज्ञतेचे ठरेल. काही बाबींमध्ये, कराबद्दलच्या नियमाशी परिचित असणारा एखादा सह-ख्रिश्चन तुम्हाला कदाचित काही समज देऊ शकेल. वकील या नात्याने, कराच्या बाबींना हाताळणाऱ्या एका ख्रिस्ती वडिलांनी स्पष्टपणे असे म्हटले: “तुमच्या हिशेबनीसाने अतिशयोक्ती करून एखादी गोष्ट सुचवली आहे असे तुम्हाला वाटले, तर ती संभवतः प्रामाणिक नाही.”
जबाबदार असा. “प्रत्येकजण आपले स्वतःचे ओझे वाहील,” असे प्रेषित पौलाने लिहिले. (गलतीकर ६:५) कर देण्याच्या बाबतीत, प्रत्येक ख्रिश्चनाने प्रामाणिक आणि नियम पाळणारे असण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. ही बाब अशी नाही जेथे मंडळीचे वडील कळपाला त्यांच्या देखरेखीखाली ठेवतील. (पडताळा २ करिंथकर १:२४.) समाजात लोकापवाद पसरल्याचे समाविष्ट असणारी कोणतीही गंभीर चूक त्यांच्या निदर्शनास आल्याशिवाय ते स्वतःला कराच्या बाबींमध्ये गोववत नाहीत. सर्वसाधारणतः, हे असे क्षेत्र आहे जेथे एखादा ख्रिस्ती शास्त्रवचनीय तत्त्वांना लागू करण्यात त्याच्या योग्यपणे प्रशिक्षित विवेकाचा उपयोग करण्यास जबाबदार आहे. (इब्रीयांस ५:१४) एखाद्या कराच्या कागदपत्रावर स्वाक्षरी दिल्यामुळे—मग ते कोणीही तयार केले असल्यास—तुम्ही ते कागदपत्र वाचले आहे आणि ते खरे असल्याचा विश्वास ठेवता असे एक कायदेशीर विधान मांडले जाते याची जाणीव असणे यात समाविष्ट आहे.a
निर्दोष असा. ख्रिस्ती पर्यवेक्षकांनी त्यांच्या स्थानासाठी पात्र असण्यास “निर्दोष” असले पाहिजे. त्याचप्रमाणे, देवाच्या नजरेत संपूर्ण मंडळीने निर्दोष असले पाहिजे. (१ तीमथ्य ३:२, पं. र. भाषांतर; पडताळा इफिसकर ५:२७.) यास्तव, कर देण्याच्या बाबतीतही ते समाजात एक चांगले नाव राखण्याचा प्रयत्न करतात. स्वतः येशू ख्रिस्ताने या बाबतीत एक उदारहण मांडले. येशूने मंदिराचा कर दिला का असे त्याचा शिष्य पेत्र ह्याला विचारण्यात आले. ती केवळ दोन रुपयांच्या नाण्याची बाब होती. खरे म्हणजे, येशू या करापासून मुक्त होता कारण ते मंदिर त्याच्या पित्याचे होते आणि कोणताही राजा आपल्याच मुलाकडून कर घेत नाही. येशूच्या बोलण्याचा तसा अर्थ होता, तरीही त्याने तो कर दिला. वस्तुतः, आवश्यक ते पैसे देण्यासाठी त्याने एक चमत्कारही घडवून आणला! तो ज्यापासून योग्यपणे मुक्त होता असा कर त्याने का द्यावा? येशूने स्वतःच म्हटल्यानुसार, “त्यांना अडथळा आणू नये म्हणून.”—मत्तय १७:२४-२७.b
देवास सन्मान आणणारी ख्याति राखणे
अशाचप्रकारे आज यहोवाचे साक्षीदार देखील इतरांना अडथळा न होण्याची काळजी घेतात. यामुळेच, संपूर्ण गट या नात्याने, जगभरात प्रामाणिक, कर देणारे नागरिक असे चांगले नाव त्यांना मिळते. उदाहरणार्थ, एल डीऑऱ्यो वॉस्को या स्पॅनीश वृत्तपत्राने स्पेनमध्ये मोठ्या प्रमाणात कर चुकवण्यावर काही विवेचन मांडले परंतु असे निरीक्षले: “यहोवाचे साक्षीदार हेच केवळ अपवाद [आहेत.] ते खरेदी किंवा विक्री करताना, [संपत्तीच्या] मूल्याचे जे विवरणपत्र देतात ते अगदी खरे असते.” त्याचप्रमाणे, सॅन फ्रॅन्सिस्को एक्झॅमीनर या अमेरिकेच्या वृत्तपत्राने काही वर्षांआधी असे निरीक्षिले: “तुम्ही [यहोवाच्या साक्षीदारांना] उदाहरणीय नागरिक असे मानू शकता. ते प्रामाणिकपणे कर देतात, आजारी लोकांची काळजी घेतात आणि निरक्षरतेविरुद्ध लढा देतात.”
कोणत्याही खऱ्या ख्रिश्चनाला या परिश्रमाने कमावलेल्या नावाला काळिमा फासणे आवडणार नाही. तुम्हाला निवड करावयाची असल्यास, केवळ काही पैसे वाचवण्यासाठी तुम्ही, कर देण्यात लबाडी करणारा ह्या नावाने ओळखले जाण्याचा धोका पत्कराल का? नाही. तुमचे चांगले नाव मातीत मिळवण्याऐवजी आणि तुमची मूल्ये व यहोवाच्या उपासनेवर प्रतिकूल प्रभाव पाडण्याऐवजी तुम्ही नक्कीच पैशांची कदर करणार नाही.
खरे म्हणजे, प्रामाणिक, प्रांजळ व्यक्ती या नात्याने नाव राखण्यासाठी तुम्हाला कदाचित पैशांची किंमत द्यावी लागेल. प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञानी प्लॅटो यांनी सुमारे २४ शतकांआधी निरीक्षल्याप्रमाणे: “आयकर द्यावयाचा असतो तेव्हा, प्रामाणिक मनुष्य अधिक कर भरेल आणि त्याच मिळकतीवर अप्रामाणिक मनुष्य कमी कर भरेल.” प्रामाणिक मनुष्याला प्रामाणिक असण्याची किंमत द्यावी लागल्यामुळे कधीच पश्चात्ताप होत नाही, असे त्यांनी म्हटले असते तर ते उचित ठरले असते. केवळ चांगले नाव असणे हे देखील द्याव्या लागणाऱ्या किंमतीच्या योग्य आहे. हे ख्रिश्चनांबद्दल निश्चितच खरे आहे. त्यांचे चांगले नाव त्यांच्यासाठी फार मोलाचे आहे कारण त्यामुळे त्यांच्या स्वर्गीय पित्याला आदर दिला जातो आणि इतरांना त्यांच्या जीवन-पद्धतीकडे तसेच त्यांचा देव, यहोवा याच्याकडे आकर्षित करण्यास मदत होऊ शकते.—नीतीसूत्रे ११:३०; १ पेत्र ३:१.
परंतु त्याहूनही अधिक म्हणजे, खरे ख्रिस्ती यहोवाबरोबरील त्यांचा नातेसंबंध फारच मूल्यवान असल्याचे समजतात. ते करत असलेल्या सर्व गोष्टी देव पाहतो आणि ते त्याला संतुष्ट करण्यास इच्छितात. (इब्रीयांस ४:१३) यास्तव, सरकारला फसवण्याचा प्रयत्न करणाच्या मोहास ते टाळतात. देव प्रामाणिक, शुद्ध आचरणाने खूष होतो ही गोष्ट ते जाणतात. (स्तोत्र १५:१-३) त्यांना यहोवाचे हृदय खूष करावयाचे असल्यामुळे, त्यांना द्यावयाचा तो सर्व कर ते देतात.—नीतीसूत्रे २७:११; रोमकर १३:७.
[तळटीपा]
a यामुळे जे ख्रिस्ती, ख्रिस्ती विश्वासात नसणाऱ्या वैवाहिक सोबतीबरोबर संयुक्त करपत्रक दाखल करतात अशांना एक आव्हान आहे. अशावेळी, ख्रिस्ती पत्नी, मस्तकपदाच्या तत्त्वाचा आणि कैसराच्या कराच्या नियमांना पाळण्याच्या गरजेचा समतोल राखण्याचा प्रामाणिकपणे यत्न करील. तथापि, जाणूनबूजून खोट्या कागदपत्रावर स्वाक्षरी केल्याने संभाव्य कायदेशीर परिणामांची तिला जाणीव असावयास हवी.—पडताळा रोमकर १३:१; १ करिंथकर ११:३.
b मनोरंजक गोष्ट अशी की, येशूच्या पार्थिव जीवनातील या घटनेची नोंद करणारा मत्तय हा एकमात्र शुभवर्तमानकार आहे. स्वतः एक कर गोळा करणारा असल्यामुळे या बाबतीतील येशूच्या मनोवृत्तीने तो प्रभावीत झाला यात काहीच शंका नाही.