यहोवावर आपल्या सर्व चिंता टाका
“देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, ह्यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करावे. त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो.”—१ पेत्र ५:६, ७.
१. आपल्यावर चिंतांचा परिणाम कसा होऊ शकतो व याचे उदाहरण कसे देता येऊ शकते?
चिंता आमच्या जीवनावर खोलवर प्रभाव पाडू शकतात. याची तुलना रेडिओतून ऐकू येणाऱ्या मधुर संगीताला कधीकधी वातावरणातील विद्युत प्रभावामुळे निर्माण होणारा व्यत्यय यासोबत करता येऊ शकते. रेडिओ लहरींमध्ये जर काही व्यत्यय आले नाहीत तर आल्हाददायक संगीताचा आनंद लुटता येतो, जे ऐकणाऱ्यांसाठी प्रसन्नतेची स्थिती असू शकते. परंतु वातावरणातील विद्युत प्रवाहाचा खरखराट आवाज, सुमधुर संगीताला बेसूर करू शकतो ज्यामुळे चिडचिड आणि हिरमोड होऊ शकतो. चिंतेमुळे देखील आमच्या प्रसन्नतेवर अशाप्रकारचा परिणाम होऊ शकतो. ते आम्हाला इतके खिन्न करू शकते की आम्ही महत्त्वपूर्ण गोष्टींकडे सुद्धा लक्ष देऊ शकत नाही. निश्चितच, “मुनष्याचे मन चिंतेने दबून जाते, परंतु गोड शब्द त्याला आनंदित करितो.”—नीतीसूत्रे १२:२५.
२. “जीवनाच्या चिंता” याबद्दल येशू ख्रिस्ताने काय म्हटले?
२ येशू ख्रिस्त, अतिशय चिंतेमुळे विचलित होण्याच्या धोक्याविषयी बोलला होता. त्याने शेवटल्या दिवसांबद्दलच्या त्याच्या भविष्यवाणीत आर्जविले: “तुम्ही सांभाळा, नाहीतर कदाचित अधाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता ह्यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुम्हावर पाशाप्रमाणे अकस्मात येईल; कारण तो अवघ्या पृथ्वीच्या पाठीवर राहणाऱ्या सर्व लोकांवर त्याप्रमाणेच येईल. तुम्ही तर होणाऱ्या ह्या सर्व गोष्टी चुकवावयास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहावयास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा.” (लूक २१:३४-३६) ज्याप्रमाणे अधाशीपणा आणि दारूबाजी मानसिक स्थितीला मंद करू शकते; त्याचप्रमाणे “संसाराच्या चिंता” ह्यांनी खिन्न झाल्यामुळे ते आपली मानसिक समजबुद्धी गमावण्यास कारणीभूत ठरू शकते, ज्याचे परिणाम अतिशय दुःखद होऊ शकतात.
चिंता काय आहे
३. “चिंता” याची व्याख्या कशी करण्यात आली आहे आणि त्याची काही कारणे कोणती आहेत?
३ “चिंता” याची व्याख्या, “होऊ घातलेल्या किंवा अपेक्षित अशा वाईट गोष्टींबद्दल मनाला वाटणारी दुःखदायक किंवा भयभीत अस्वस्थता” अशी करण्यात येते. ती, “इंद्रियविज्ञानाची लक्षणे (जसे की घाम येणे, तणाव व नाडीच्या ठोक्यातील वाढ), वास्तविकतेबद्दल व धोक्याच्या प्रकाराबद्दल शंका आणि त्यांचा सामना करण्यासाठी स्वतःच्या क्षमतेबद्दल वाटणारी स्व-शंका यांनी चिन्हित असलेली भयभीत असण्याची अवाजवी व दडपलेली संवेदना” तसेच “भयभीत काळजी किंवा आस्था आहे.” (वेबस्टर्स नाईन्थ न्यू कॉलिजिएट डिक्शनरी) यास्तव, चिंता एक किचकट समस्या होऊ शकते. आजारपण, वृद्धावस्था, गुन्हेगारीचे भय, नोकरी गमावणे, तसेच एखाद्याच्या कुटुंबाच्या कल्याणाची चिंता ही सर्व कारणे त्यातील आहेत.
४. (अ) लोक आणि त्यांच्या चिंतांबद्दल काय आठवणीत ठेवणे चांगले आहे? (ब) आपण चिंतांचा सामना करीत असल्यास, काय केले जाऊ शकते?
४ स्पष्टतः, विविध परिस्थिती किंवा प्रसंग ज्याप्रकारे चिंतेला कारणीभूत ठरू शकतात त्याचप्रकारे चिंतेचे विविध प्रमाण आहे. सर्वच लोक एखाद्या परिस्थितीस सारखाच प्रतिसाद देत नाहीत. यास्तव, आम्ही हे जाणून घेणे आवश्यक आहे, की एखाद्या गोष्टीचा आम्हाला त्रास होत नसला तरी तीच गोष्ट आमच्यासोबत यहोवाची उपासना करणाऱ्या सहउपासकांच्या गंभीर चिंतेला कारणीभूत ठरू शकते. परंतु जर ही चिंता अशा एका टोकाला येऊन पोहंचली, की ज्यामुळे आम्हाला देवाच्या वचनातील गोड व आल्हाददायक सत्यावर एकाग्र होता येत नसल्यास त्यावर काय इलाज आहे? चिंतेमुळे आपण इतके पीडित होतो की यहोवाच्या सार्वभौम सत्तेवर आणि ख्रिस्ती सत्वनिष्ठेच्या वादविषयांवर आपले लक्ष केंद्रित करू शकत नाही, तेव्हा काय? आम्हाला आपल्या परिस्थितीत कदाचित बदल करता येणार नाही. उलट, आपल्याला शास्त्रवचनीय मुद्यांकडे पाहिले पाहिजे जे आपल्याला जीवनाच्या कष्टमय समस्यांमुळे होणाऱ्या फाजील चिंतेचा सामना करण्यास मदत करील.
मदत उपलब्ध आहे
५. आपण स्तोत्र ५५:२२ च्या एकवाक्यतेत कसे कार्य करु शकतो?
५ ख्रिश्चनांना जेव्हा आध्यात्मिक साहाय्याची गरज हवी असते व ते चिंतेच्या भाराखाली दबून जातात तेव्हा ते देवाच्या वचनातून सांत्वन प्राप्त करू शकतात. ते विश्वसनीय मार्गदर्शन पुरवते आणि आपण यहोवाचे निष्ठावान सेवक या नात्याने एकटे नाही अशी अनेक खात्रीची विधाने देते. उदाहरणार्थ, स्तोत्रकर्त्या दाविदाने ह्याप्रकारे गायिले: “तू आपला भार परमेश्वरावर [यहोवा, NW] टाक म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल; नीतिमानाला तो कधीहि ढळू देणार नाही.” (स्तोत्र ५५:२२) या शब्दांच्या एकवाक्यतेत आपण कसे कार्य करू शकू? आपल्या प्रेमळ स्वर्गीय पित्यावर आपल्या सर्व चिंता, काळजी, भय आणि निराशा सोपवून देण्याकरवी. यामुळे आपल्याला सुरक्षिततेची भावना आणि अंतःकरणाची शांतता मिळण्यास मदत होईल.
६. फिलिप्पैकर ४:६, ७ यानुसार, प्रार्थना आपल्यासाठी काय करु शकते?
६ यहोवावर जर आपण आपल्या चिंतासह सर्व भार टाकू इच्छितो तर त्यासाठी नियमित अंतःकरणपूर्वक प्रार्थनेची आवश्यकता आहे. यामुळे आपल्याला आंतरिक शांती मिळेल, कारण प्रेषित पौलाने लिहिले: “कशाविषयीहि चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा; म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलिकडे असलेली देवाने दिलेली शांति तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.” (फिलिप्पैकर ४:६, ७) ‘देवाने दिलेली ही अतुलनीय शांती’ म्हणजे, यहोवाचे समर्पित सेवक सर्वात बिकट परिस्थितीतही आनंद घेत असलेली असामान्य स्थिरचित्तता आहे. ती देवासोबत आपल्या जवळच्या व्यक्तिगत नातेसंबंधामुळे मिळते. आपण पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करतो व त्याला आपणास प्रवृत्त करू देतो, तेव्हा आपण जीवनाच्या सर्व समस्यांतून मुक्त होत नाही परंतु आत्म्याचे फळ शांती याचा अनुभव घेऊ शकतो. (लूक ११:१३; गलतीकर ५:२२, २३) आम्ही चिंतेमुळे भारावून जात नाही, कारण आपल्याला हे ठाऊक आहे, की यहोवा त्याच्या सर्व विश्वासू लोकांना “एकांतात निर्भय” ठेवतो व कायमची इजा होईल अशी कोणतीही गोष्ट घडू देणार नाही.—स्तोत्र ४:८.
७. ख्रिस्ती वडील चिंतांचा सामना करण्यास मदत देण्यामध्ये कोणती भूमिका पार पाडू शकतात?
७ परंतु आपण शास्त्रवचनांवर मनन करतो व प्रार्थनेत तत्पर असतो तरीही चिंता आपला पिच्छा सोडत नसल्यास काय? (रोमकर १२:१२) आपल्याला आध्यात्मिक मदत देण्यासाठी मंडळीतील नियुक्त वडील देखील यहोवाने पुरविलेली एक तरतूद आहे. ते आपल्याला देवाच्या वचनाचा वापर करून तसेच आपल्यासोबत व आपल्यासाठी प्रार्थना करून सांत्वन व मदत देऊ शकतात. (याकोब ५:१३-१६) प्रेषित पेत्राने त्याच्या सहवडिलांना देवाच्या कळपाचे पालन स्वेच्छेने, उत्सुकतेने व कित्ता होतील अशाप्रकारे करण्याचे आर्जविले. (१ पेत्र ५:१-४) या पुरुषांना आपल्या हिताबद्दल प्रामाणिक आस्था आहे व ते आपल्याला मदत करू इच्छितात. एक गोष्ट मात्र निश्चित की, वडिलांकडून येणाऱ्या मदतीचा पूर्ण फायदा घेण्यासाठी व मंडळीत उत्तम आध्यात्मिकता राखण्यासाठी आपल्या सर्वांना पेत्राच्या सल्ल्याचे अनुकरण करणे आवश्यक आहे: “तरुणांनो, वडिलांच्या अधीन राहा. तुम्ही सर्व जण एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्रतारूपी कमरबंद बांधा; कारण देव गर्विष्ठांना विरोध करितो, आणि लीनांवर कृपा करितो.”—१ पेत्र ५:५.
८, ९. पहिले पेत्र ५:६-११ मधून कोणते सांत्वन मिळू शकते?
८ पेत्राने आणखी पुढे म्हटले: “देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, ह्यासाठी की, त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करावे. त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो. सावध असा, जागे राहा; तुमचा शत्रु सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधीत फिरतो; त्याच्याविरूद्ध विश्वासात दृढ असे उभे राहा; कारण तुम्हाला माहीत आहे की, जगातील तुमच्या बंधु वर्गाला अशीच दुःखे भोगावी लागत आहेत. आपल्या सार्वकालिक गौरवात यावे म्हणून ज्याने ख्रिस्तामध्ये तुम्हास पाचारण केले तो सर्व कृपेचा देव तुम्ही थोडा वेळ दुःख सोसल्यावर, स्वतः तुम्हास पूर्ण, दृढ व सबळ करील; त्याचा पराक्रम युगानुयुग आहे. आमेन.”—१ पेत्र ५:६-११.
९ आपण ‘देवावर आपल्या सर्व चिंता टाकू शकतो कारण तो आपली काळजी घेतो’ हे जाणणे किती सांत्वनदायक आहे! आपल्यावर छळ आणि इतर दुःखे आणून यहोवासोबतचा आपल्या नातेसंबंधाचा नाश करण्याच्या दियाबलाच्या प्रयत्नाकडून आपल्यावर काही चिंता येत असल्या तरी, शेवटी सचोटी रक्षक म्हणून आपण यशस्वी होऊ हे जाणणे आश्चर्याचे नाही का? होय, थोडा वेळ दुःख सोसल्यावर, अपात्री कृपेचा देव आपल्या ह्या प्रशिक्षणाच्या काळाचा अंत करून आपल्याला दृढ आणि बळकट करील.
१०. पहिले पेत्र ५:६, ७ चिंतांचा सामना करण्यास मदत करू शकणाऱ्या कोणत्या तीन गुणांचा उल्लेख करते?
१० पहिले पेत्र ५:६, ७ आपल्याला चिंतांचा सामना करण्यास मदत करू शकणाऱ्या तीन गुणांचा उल्लेख करते. एक आहे नम्रता किंवा “मनाची दीनता.” ६ वे वचन, सहनशीलतेची आवश्यकता आहे हे दर्शवून “योग्य वेळी” या शब्दांनी संपते. ७ वे वचन दाखवते, की आपण पूर्ण आत्मविश्वासाने देवावर आपला सर्व भार टाकू शकतो, कारण ‘तो आपली काळजी घेतो.’ शिवाय हे शब्द यहोवावर पूर्ण भाव ठेवण्याचे उत्तेजन देतात. यास्तव, नम्रता, सहनशीलता आणि देवावर पूर्ण भाव आपल्याला चिंतांना कमी करण्यास कशी मदत करू शकतील ते आपण पाहूया.
नम्रता कशी मदत करू शकते
११. चिंताचा सामना करण्यासाठी नम्रता कशी मदत करु शकते?
११ आपण नम्र असल्यास, देवाच्या कल्पना आपल्या विचारांपासून अतिशय उच्च असल्याचे कबूल करू. (यशया ५५:८, ९) नम्रता आपल्याला यहोवाच्या सर्वव्यापी समजबुद्धिच्या तुलनेत आपल्या विचार करण्याच्या क्षमतेची मर्यादा ओळखण्यास मदत करते. आपण आकलन करू शकत नाही अशा दृष्टिकोनातून तो पाहतो. हे, धार्मिक गृहस्थ ईयोबाच्या उदारहणातून दाखवले आहे. (ईयोब १:७-१२; २:१-६) स्वतःला “देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन” केल्याने आपण सर्वश्रेष्ठ सार्वभौम याच्या तुलनेतील आपले क्षुद्र स्थान मान्य करतो. याच्या परिणामस्वरुपात, तो अनुमती देत असलेल्या परिस्थितींचा सामना करण्यास हे आपल्याला मदत करते. आपली अंतःकरणे लगेच मुक्तता मिळवण्याची ओढ धरु शकतील परंतु यहोवाचे गुण पूर्णपणे संतुलित असल्यामुळे आमच्या वतीने कधी व कसे कार्य करावयाचे हे त्याला असंदिग्धपणे माहीत आहे. यास्तव, यहोवा आपल्या चिंताचा सामना करण्यास आपल्याला मदत करील असा भरवसा बाळगून, यहोवाच्या सामर्थ्यवान हाताला बालकांप्रमाणे नम्रतेने धरुन राहूया.—यशया ४१:८-१३.
१२. आपण नम्रतेने इब्रीयांस १३:५ चा अवलंब केल्यास, भौतिक सुरक्षिततेबद्दलच्या चिंतांवर काय परिणाम होऊ शकतो?
१२ देवाच्या वचनातील सल्ल्याचा स्वेच्छेने अवलंब करण्याचा समावेश नम्रतेमध्ये होतो, ज्यामुळे अनेकदा चिंता कमी केल्या जातात. उदाहरणार्थ, भौतिक वस्तूंचा पाठलाग करण्यात पूर्णपणे अडकल्यामुळे आपल्याला चिंता वाटत असल्यास, आपण पौलाच्या सल्ल्यावर मनन करणे चांगले ठरु शकते: “तुमची वागणूक द्रव्यलोभावाचून असावी, जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे; कारण त्याने [देवाने] स्वतः म्हटले आहे, ‘मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही.’” (इब्रीयांस १३:५) या सल्ल्याचा नम्रतेने अवलंब करुन, भौतिक सुरक्षिततेविषयी असलेल्या मोठ्या चिंतांपासून अनेकांनी स्वतःला मुक्त केले आहे. त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा झालेली नसली, तरी ही गोष्ट त्यांच्या आध्यात्मिक हानीबद्दल त्यांच्या विचारावर वर्चस्व गाजवीत नाही.
धीराची भूमिका
१३, १४. (अ) ईयोब या गृहस्थाने धीराच्या सहनशीलतेचे कोणते उदाहरण मांडले? (ब) यहोवावर सहनशीलतेने थांबून राहणे आपल्यासाठी काय करु शकते?
१३ पहिले पेत्र ५:६ मधील “योग्य वेळी,” हा वाक्प्रचार धीराने सहन करण्याच्या गरजेला सुचवतो. कधीकधी समस्या काही काळापर्यंत टिकून असतात व त्यामुळे चिंता बळावल्या जाऊ शकतात. अशा परिस्थितीत, ही गोष्ट आपण यहोवाच्या हातात सोपविण्याची गरज आहे. शिष्य याकोबाने लिहिले: “ज्यांनी सहन केले त्यांना आपण धन्य म्हणतो, तुम्ही ईयोबाच्या धीराविषयी ऐकले आहे, आणि त्याच्याविषयीचा प्रभूचा [यहोवा, NW] जो हेतू होता तो तुम्ही पाहिला आहे, ह्यावरुन प्रभु [यहोवा] फार कनवाळू आहे व दयाळू आहे हे तुम्हास दिसून आले.” (याकोब ५:११) ईयाबाने आर्थिक हानी सोसली, दहा मुलांना मृत्यूत गमावले, किळसवाणा आजार सहन केला व भिकार सांत्वनदात्यांकडून अन्यायाने त्याचा निषेध केला गेला. अशा परिस्थितीमध्ये काही प्रमाणात चिंता असणे साधारण असू शकते.
१४ काही झाले तरी, ईयोब धीराने सहन करण्यात उदाहरणीय होता. आपण विश्वासाच्या खडतर परीक्षांचा सामना करत असल्यास, आपल्याला देखील सुटकेसाठी त्याच्याप्रमाणेच थांबून राहावे लागेल. पण देवाने ईयोबाच्या वतीने कार्य केले, सरतेशेवटी त्रासातून सुटका करुन त्याला भरपूर प्रमाणात प्रतिफळ दिले. (ईयोब ४२:१०-१७) धीर धरुन यहोवावर थांबून राहिल्याने आपली सहनशीलता विकसित होते व त्याला आपण देत असलेल्या भक्तीची गहनता प्रकट होत असते.—याकोब १:२-४.
यहोवावर भाव ठेवा
१५. आपण यहोवावर पूर्णपणे भाव का ठेवला पाहिजे?
१५ पेत्राने सहविश्वासूंना आर्जविले की, ‘देवावर तुम्ही आपल्या सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो.’ (१ पेत्र ५:७) यास्तव, आपण देखील यहोवावर पूर्ण भाव ठेवू शकतो व ठेवला पाहिजे. नीतीसूत्रे ३:५, ६ म्हणते: “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर [यहोवा, NW] भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको; तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.” गतकाळातील अनुभवामुळे चिंताग्रस्त लोकांना इतर मानवांवर भरवसा ठेवण्यास कठीण वाटते. पण आपणाजवळ जीवनाचा उगम व ते टिकवून ठेवणाऱ्या आमच्या निर्माणकर्त्यावर भरवसा ठेवण्याची कारणे नक्कीच आहेत. काही विशिष्ट बाबतीत आपण स्वतःच्या प्रतिक्रियेवर भाव ठेवत नसलो, तरी आमच्या सर्व विपत्यांमधून मुक्त करण्यासाठी आपण नेहमीच यहोवावर अवलंबून राहू शकतो.—स्तोत्र ३४:१८, १९; ३६:९; ५६:३, ४.
१६. येशू ख्रिस्ताने भौतिक गोष्टींच्या चिंताबद्दल काय म्हटले?
१६ यहोवावर भाव ठेवण्यात त्याचा पुत्र, येशू ख्रिस्त ज्याने पित्याकडून शिकलेल्या गोष्टी शिकवल्या त्याच्या आज्ञांचे पालन करणे समाविष्ट आहे. (योहान ७:१६) येशूने आपल्या शिष्यांना आर्जवले, की यहोवाची सेवा करण्याद्वारे ‘स्वर्गात आपली संपत्ती साठवा.’ पण भौतिक गरजा जसे की अन्न, वस्र व निवाऱ्याबद्दल काय? “चिंता करीत बसू नका,” असा येशूने सल्ला दिला. त्याने दर्शवले, की देव पक्षांना देखील अन्न पुरवितो. तो फुलांना सुंदरतेचा पोषाख घालतो. या सर्वांपेक्षा देवाचे मानवी सेवक श्रेष्ठ नाहीत का? नक्कीच ते श्रेष्ठ आहेत. या कारणास्तव, येशूने आर्जवले: “तुम्ही पहिल्याने त्याचे [देवाचे] राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटत राहा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याहि सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील.” येशू पुढे म्हणाला: “ह्यास्तव, उद्याची चिंता करीत बसू नका, कारण उद्याची चिंता उद्याला; ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे.” (मत्तय ६:२०, २५-३४) होय, आपल्याला अन्न, पाणी, वस्र व निवाऱ्याची गरज आहे; पण आपण यहोवावर भाव ठेवल्यास, या गोष्टींबद्दल अनावश्यकपणे चिंतातूर होणार नाही.
१७. आपण राज्यास प्रथम मिळवण्याच्या गरजेला कसे स्पष्ट करु शकतो?
१७ पहिल्याने राज्य मिळवण्यास झटण्यासाठी, आपण देवावर भाव ठेवला पाहिजे व आमच्या प्राधान्यतांचा उचित क्रम ठेवला पाहिजे. एखादा पाणबुड्या श्वासोच्व्छासाचे उपकरण न घेता, शिंपल्यांमध्ये असणारा मोती शोधण्यासाठी पाण्यात बुडी मारील. त्याच्या कुटुंबाचे पोषण करण्यासाठी त्याचे हेच साधन आहे. खरोखर, एक उच्च प्राधान्यता! पण अधिक महत्त्वाचे काय आहे? हवा! हवा घेण्यासाठी त्याने वेळोवेळी पाण्याबाहेर आले पाहिजे. अशाप्रकारे, हवा अधिक उच्च प्राधान्यता ठरते. या रीतीने, जीवनावश्यक गोष्टी प्राप्त करण्यासाठी आपल्यालाही या सद्य व्यवस्थिकरणात काही अंशी स्वतःला गुंतवावे लागेल. तथापि, आपल्या घराण्याचे जीवनच आध्यात्मिक गोष्टींवर अवलंबून असल्यामुळे त्या गोष्टी प्रथम असल्या पाहिजेत. भौतिक गरजांबद्दलची अनावश्यक चिंता टाळण्यासाठी, यहोवावर आपला पूर्ण भाव असला पाहिजे. शिवाय, ‘प्रभूच्या कामात करण्यासाठी पुष्कळ असल्यामुळे’ चिंता कमी करण्यास ते मदत करु शकते, कारण “परमेश्वराविषयीचा [यहोवा, NW] जो आनंद” तोच आपला आश्रयदूर्ग ठरतो.—१ करिंथकर १५:५८; नहेम्या ८:१०.
आपल्या चिंता यहोवावर टाकत राहा
१८. आमच्या सर्व चिंता यहोवावर टाकल्याने आपल्याला खरोखर मदत मिळू शकते, यासाठी काय पुरावा आहे?
१८ आध्यात्मिक गोष्टींवर नेहमीच केंद्रित असण्यासाठी, आपण आपल्या सर्व चिंता यहोवावर टाकत राहिले पाहिजे. तो आपल्या सेवकांची काळजी घेतो ही आठवण आपण नेहमीच ठेवली पाहिजे. उदाहरणार्थ, एका ख्रिस्ती स्त्रीचा पती तिच्यासोबत विश्वासू नसल्यामुळे तिची चिंता इतकी विकोपाला गेली, की तिला झोपणे अशक्य झाले. (पडताळा स्तोत्र ११९:२८.) तथापि, झोपताना ती स्वतःच्या सर्व चिंता यहोवावर टाकत असे. तिला व तिच्या दोन लहान मुलींना सहन करावे लागत होते त्याबद्दल ती आपले अंतःकरण देवापुढे रिते करत असे. तिला निरंतर प्रार्थनेत दुःखविमोचनासाठी मोठ्याने आक्रोश केल्यावर नेहमीच झोप लागत असे, कारण यहोवा तिची आणि तिच्या मुलींची काळजी घेईल असा भाव तिने त्याच्यावर ठेवला होता. शास्त्रवचनीय दृष्ट्या घटस्फोट घेतलेली ही स्त्री आता आनंदाने एका वडिलाशी विवाहबद्ध झाली आहे.
१९, २०. (अ) आपल्याला चिंतांचा सामना करता येण्यासाठी काही मार्ग कोणते आहेत? (ब) आमच्या सर्व चिंतांविषयी आपण काय करीत राहण्यास हवे?
१९ यहोवाचे लोक या नात्याने चिंतांचा सामना करण्यासाठी आपल्याजवळ विविध मार्ग आहेत. देवाच्या वचनाचा अवलंब करणे खासपणे साहाय्यकारी आहे. देव “विश्वासू व बुद्धिमान दास” यांच्याकरवी आपल्याला पौष्टिक आध्यात्मिक अन्न पुरवत आहे, यामध्ये टेहळणी बुरुज व सावध राहा! मध्ये प्रकाशित केलेल्या साहाय्यकारी व तजेला देणाऱ्या लेखांचाही समावेश होतो. (मत्तय २४:४५-४७) आपल्याला देवाच्या पवित्र आत्म्याचे साह्य आहे. नियमित व कळकळीने केलेली प्रार्थना अधिक लाभाची ठरते. नियुक्त ख्रिस्ती वडील आध्यात्मिक मदत व सांत्वन देण्यासाठी नेहमीच तयार आणि इच्छूक असतात.
२० आपली स्वतःची नम्रता व सहनशीलता, पाठपुरावा केलेल्या चिंतांचा सामना करण्यास अधिक लाभदायक ठरतात. यहोवावरील पूर्ण भाव विशेषपणे महत्त्वाचा आहे, कारण त्याच्या मदतीचा तसेच मार्गदर्शनाचा जसा अनुभव घेतो तसतसा आमच्या विश्वासाचा विकास होत राहतो. या बरोबरच देवावरील विश्वास अनावश्यकपणे अस्वस्थ होण्यापासून आपल्याला दूर ठेवू शकतो. (योहान १४:१) राज्य मिळवण्यास झटण्यासाठी तसेच प्रभूच्या हर्षदायक कार्यात व्यग्र राहण्याकरता विश्वास आपल्याला चालना देऊ शकतो, ज्यामुळे चिंतांचा सामना करण्यास मदत होऊ शकते. अशा कार्यामुळे जे देवाची स्तुती सर्वकाळाकरता करतील अशा लोकांमध्ये आपल्याला सुरक्षित ठेवले जाते. (स्तोत्र १०४:३३) यास्तव, आपण आपल्या सर्व चिंता यहोवावर टाकत राहूया.
तुम्ही कसा प्रतिसाद द्याल?
▫ चिंता याची व्याख्या कशी केली जाऊ शकते?
▫ चिंताचा सामना करता येऊ शकण्याचे काही मार्ग कोणते आहेत?
▫ चिंता कमी करण्यास नम्रता आणि सहनशीलता कशी मदत करु शकतात?
▫ चिंताचा सामना करताना, यहोवावर पूर्ण भाव असणे का महत्त्वाचे आहे?
▫ आपण आपल्या सर्व चिंता यहोवावर का टाकत राहिल्या पाहिजेत?
[२४ पानांवरील चित्रं]
“चिंता करीत बसू नका,” असे येशूने का म्हटले हे तुम्हाला माहीत आहे का?