वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ११/१५ पृ. २९-३१
  • तिला यहोवाची उदंड कृपा लाभली

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तिला यहोवाची उदंड कृपा लाभली
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • तिचा आश्‍चर्यकारक विशेषाधिकार
  • ती योसेफची पत्नी होते
  • मरीयेला इतर मुले होती
  • एक देव-भिरू माता
  • मरीया ही येशूची शिष्या
  • चिरकालिक विशेषाधिकार
  • “पाहा! मी प्रभूची दासी!”
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
  • “पाहा मी प्रभूची दासी!”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • तिने काळजावरील घाव सोसला
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
  • तिनं या सर्व गोष्टी आपल्या “अंतःकरणात ठेवल्या”
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ११/१५ पृ. २९-३१

तिला यहोवाची उदंड कृपा लाभली

“हे कृपा पावलेल्या स्त्रिये, कल्याण असो, प्रभु [यहोवा, NW] तुझ्याबरोबर असो.” वा, काय ते अभिवादन! ज्याने ते अभिवादन केले तो दुसरा कोणी नसून गब्रीएल देवदूत आहे. तो, नम्र अंतःकरण असलेल्या एका तरुण स्त्रीला उद्देशून हे म्हणतो. ती तरुण स्त्री, हेली नावाच्या एका माणसाची कन्या, मरीया होती. ते सा. यु. पूर्व ३ हे वर्ष, आणि ठिकाण नासरेथ शहर आहे.—लूक १:२६-२८.

मरीया, योसेफ या सुताराला वाग्दत्त आहे. यहुदी नियम आणि रीतीनुसार, तिला त्याची विवाहबद्ध पत्नी या दृष्टीनेच पाहिले जाते. (मत्तय १:१८) तिच्याप्रमाणेच त्याचीही सामाजिक स्थिती बेताचीच आहे. तर मग, कृपा पावलेल्या स्त्रिये असे वंदन देवदूत तिला का करतो?

तिचा आश्‍चर्यकारक विशेषाधिकार

गब्रीएल पुढे म्हणतो: “मरीये, भिऊ नको, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे; पाहा! तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल. त्याचे नाव येशू ठेव. तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील; आणि प्रभु [यहोवा, NW] देव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्‍यांचे राजासन देईल. आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करील व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.”—लूक १:२९-३३.

आश्‍चर्यचकित व गडबडून जाऊन मरीया विचारते: “हे कसे होईल. कारण माझा अद्याप पुरूषाशी समागम झाला नाही.” गब्रीएल उत्तर देतो: “पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील; ह्‍या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील.” आणखी शंका राहू नये म्हणून देवदूत पुढे म्हणतो: “पाहा, तुझ्या नात्यातली अलीशिबा हिलाहि म्हातारपणी पुत्रगर्भ राहिला आहे; आणि जिला वांझ म्हणत तिला हा सहावा महिना आहे; कारण देवाला काही अशक्य होणार नाही.”—लूक १:३४-३७, NW.

मरीया लगेचच हा आश्‍चर्यकारक विशेषाधिकार स्वीकारते. स्वखुषीने परंतु नम्रपणे ती म्हणते: “पाहा, मी प्रभूची [यहोवा, NW] दासी; आपण सांगितल्याप्रमाणे मला होवो.” त्यानंतर गब्रीएल निघून जातो. मरीया घाईघाईने डोंगराळ प्रदेशामधील यहूदातील एका गावास जाते. जखऱ्‍या याजक आणि त्याची पत्नी अलीशिबा ह्‍यांच्या घरी पोहंचल्यावर, देवदूताने ज्याप्रकारे वर्णन केले होते अगदी तीच परिस्थिती ती पाहते. मरीयेचे अंतःकरण आनंदाने किती उचंबळून येते! तिच्या मुखातून यहोवाची स्तुती बाहेर पडते.—लूक १:३८-५५.

ती योसेफची पत्नी होते

एका कुमारिकेला येशूचे मानवी शरीर वागवायचे होते, कारण अशाप्रकारच्या जन्माविषयी आधीच भाकीत केले होते. (यशया ७:१४; मत्तय १:२२, २३) परंतु एका वाग्दत्त कुमारिकेची काय गरज होती? कारण त्यामुळे मुलाला एक दत्तक पिता मिळाला असता जो त्याला राजा दाविदाच्या राजासनाचा कायदेशीर हक्क सांगू शकत होता. योसेफ आणि मरीया दोघेही यहूदाच्या वंशातील आहेत व ते राजा दाविदाचे संतान आहेत. याकारणास्तव येशूचा वारसा हक्क दोन्हीकडून प्रस्थापित होईल. (मत्तय १:२-१६; लूक ३:२३-३३) याच कारणामुळे देवदूत नंतर योसेफाला खात्री देतो की त्याने मरीयेला, ती गर्भवती असली तरी त्याची कायदेशीर पत्नी म्हणून स्वीकारण्यास माघार घेऊ नये.—मत्तय १:१९-२५.a

कैसर औगुस्त याने नावनिशी लिहिली जाण्याची आज्ञा काढल्यामुळे, योसेफ आणि मरीयेला बेथलेहेम गावी जाऊन ती करावीच लागते. तेथे ती तिच्या जेष्ठ पुत्राला जन्म देते. मेंढपाळ त्या बाळाला पाहण्यासाठी येतात, आणि ते त्याचा पिता, यहोवा याचे गौरव करतात. मोशेच्या नियमशास्त्रानुसार शुद्धीकरणाच्या ४० दिवसांनंतर, मरीया जरुशलेम येथील मंदिरात तिच्या पापांचे प्रायश्‍चित्त करण्यासाठी जाते. (लेवीय १२:१-८; लूक २:२२-२४) होय, तिची गर्भधारणा झाली तेव्हा ती निष्कलंक नव्हती आणि म्हणूनच तिच्या पापाच्या कलंकातून मुक्‍त नव्हती. प्रायश्‍चित अर्पणाद्वारे तिच्या नैसर्गिक अपूर्णतेबद्दल भरपाई देणे आवश्‍यक होते.—स्तोत्र ५१:५.

मरीया आणि योसेफ मंदिरातच असताना, वृद्ध शिमोन आणि वयोवृद्ध संदेष्ट्री हन्‍ना या दोघांना देवाच्या पुत्राला पाहण्याचा सुहक्क मिळतो. मरीया त्या दृश्‍याचा केंद्रभाग नव्हती. (लूक २:२५-३८) नंतर, मागी लोक तिला नव्हे तर येशूला नमन करतात.—मत्तय २:१-१२.

ईजिप्तला पळून गेल्यावर व दुष्ट राजा हेरोद याचा मृत्यू होईपर्यंत तेथेच राहण्याऐवजी, येशूचे पालक नासरेथ नावाच्या या लहानशा गावात परत येऊन स्थायिक होतात. (मत्तय २:१३-२३; लूक २:३९) येथेच योसेफ आणि मरीया येशूचे ईश्‍वरी कौटुंबिक परिस्थितीत संगोपन करतात.

मरीयेला इतर मुले होती

कालांतराने, मरीया आणि योसेफाने येशूच्या स्वाभाविक भाऊ आणि बहिणींना जन्म दिला. येशूची सेवा त्याला नासरेथ या त्याच्या मूळ गावी परत आणते तेव्हा त्याच्या बालवयाचे परिचित लोक त्याला ओळखतात. ते विचारतात, “हा सुताराचा पुत्र ना? ह्‍याच्या आईला मरीया म्हणतात ना? याकोब, योसेफ, शिमोन व यहूदा, हे ह्‍याचे भाऊ ना? ह्‍याच्या बहिणी, त्या सर्व आपणाबरोबर नाहीत काय?” (मत्तय १३:५५, ५६) हे नासरेथकर, योसेफ आणि मरीयेच्या भौतिक कुटुंबाविषयी बोलत होते, ज्यामध्ये तिची मुले आणि मुली यांचा समावेश होता ज्यांना ते येशूची स्वाभाविक भावंडे असे ओळखत होते.

ती येशूचे मावस किंवा चुलत भावंडे नव्हती. शिवाय ती त्याचे शिष्य किंवा आध्यात्मिक भावंडे देखील नव्हती. कारण योहान २:१२ या दोन गटातील फरक स्पष्टपणे दाखवते: “तो [येशू] त्याची आई, त्याचे भाऊ व त्याचे शिष्य खाली कफर्णहूमास गेले.” जरूशलेममध्ये अनेक वर्षांनंतर, प्रेषित पौलाने केफा किंवा पेत्राला पाहिले व म्हटले: “प्रेषितातील दुसरा कोणी माझ्या दृष्टीस पडला नाही; मात्र प्रभूचा बंधू याकोब माझ्या दृष्टीस पडला.” (गलतीकर १:१९, द जरूशलेम बायबल) शिवाय, योसेफाने “तिला [मरीयेला] पुत्र होईपर्यंत त्याने तिला जाणले नाही” या वाक्यावरून हेच सूचित होते, की येशूच्या दत्तक पित्याने काही काळानंतर तिच्यासोबत समागम केला ज्यामुळे तिला इतर मुले झाली. (मत्तय १:२५) त्यामुळेच, लूक २:७ येशूला तिचा “प्रथमपुत्र” असे संबोधते.

एक देव-भिरू माता

एक देव-भिरू माता या नात्याने, मरीया तिच्या मुलांना धार्मिकतेत प्रशिक्षण देण्यास योसेफाला सहकार्य देते. (नीतीसूत्रे २२:६) ती शास्त्रवचनांची अतिउत्साही अभ्यासक होती हे, अलीशिबाने तिचे अभिवादन केल्यावर तिच्या आध्यात्मिक समृद्ध आविर्भावावरून दिसते. त्या वेळेला येशूची आई, हन्‍नाच्या गीतांमधील भावनांना पुन्हा उच्चारते व स्तोत्रे, ऐतिहासिक आणि भविष्यवादीत लिखाणांतील तसेच मोशेच्या पुस्तकांतील ज्ञान प्रदर्शित करते. (उत्पत्ती ३०:१३; १ शमुवेल २:१-१०; नीतीसूत्रे ३१:२८; मलाखी ३:१२; लूक १:४६-५५) मरीयेने तिच्या अंतःकरणात भविष्यवादित घटनांना जोपासून ठेवले व सुवचने तोंडपाठ केली आणि त्यांच्यावर मनातल्या मनात चिंतन केले. याचकारणास्तव ती तिचा मुलगा येशू ह्‍याला पालकीय प्रशिक्षण देण्यात तरबेज आहे.—लूक २:१९, ३३.

उत्तमप्रकारे प्रशिक्षण प्राप्त केलेला १२ वर्षांचा येशू असे शास्त्रवचनीय ज्ञान प्रदर्शित करतो ज्यामुळे मंदिरातील ज्ञानी लोक अचंबित होतात. वल्हांडण सणाच्या काळात त्याच्या पालकांपासून त्याची चूकामूक झाल्यामुळे, त्याची आई त्याला म्हणते: “बाळा, तू आमच्याबरोबर असे का वागलास? पाहा तुझा बाप व मी कष्टी होऊन तुझा शोध करीत आलो.” तेव्हा येशू उत्तर देतो: “तुम्ही माझा शोध करीत राहिलात हे कसे? माझ्या पित्याच्या घरात मी असावे हे तुमच्या ध्यानात आले नाही काय?” या उत्तराचा अर्थ न समजल्यामुळे, मरीया ते आपल्या अंतःकरणातच ठेवते. नासरेथला पुन्हा गेल्यावर, येशू “ज्ञानाने, शरीराने आणि देवाच्या व माणसांच्या कृपेत” वाढत जातो.—लूक २:४२-५२.

मरीया ही येशूची शिष्या

कालांतराने मरीया येशूची एक भक्‍तीमान शिष्या व्हावे हे किती उचित आहे! ती नम्र आहे व तिला देवप्रणित नेमणूक मिळाली असली तरी, बढाई मारण्याचा तिचा मुळीच हेतू नाही. मरीयेला शास्त्रवचने माहीत आहेत. तुम्ही जर स्वतः शास्त्रवचने उघडून पाहिलीत तर तुम्हाला, तिच्या मागे कोणतेही प्रकाशवलय असल्याचे, “राज-माता” म्हणून राजासनावर बसवलेली व येशूच्या वैभवात न्हाऊन काढल्याचे वर्णन मिळणार नाही. उलट, ती मागे, प्रकाशझोताच्या अगदी बाहेर असल्याचे तुम्हाला आढळून येईल.—मत्तय १३:५३-५६; योहान २:१२.

येशूने त्याच्या शिष्यांमध्ये मरीयापूजक गोष्टीची वाढ होण्यापूर्वीच त्या गोष्टीचा नाश केला. एके प्रसंगी तो बोलत असताना, “लोकसमुदायातील कोणीएक स्त्री त्याला मोठ्या आवाजात म्हणाली, ‘ज्या उदराने तुझा भार वाहिला व जी स्तने तू चोखिली ती धन्य!’ ‘तेव्हा’ तो म्हणाला, ‘पण त्यापेक्षा जे देवाचे वचन ऐकतात व पाळतात तेच धन्य.’” (लूक ११:२७, २८, कॅथलिक बिब्लिकल असोसीएशन ऑफ अमेरिकाच्या सदस्यांनी भाषांतरीत केलेले द न्यू अमेरिकन बायबल) एका लग्नसमारंभाच्या वेळी येशू मरीयेला म्हणाला: “बाई, ह्‍याच्याशी तुझा माझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही.” (योहान २:४) इतर अनुवादांमध्ये ह्‍याप्रकारे आहे: “ते माझ्यावर सोपवून दे.” (वीमाऊथ) “मला काय करावे ते सांगण्याचा प्रयत्न करू नकोस.” (ॲन अमेरिकन ट्रान्सलेशन) होय, येशूने त्याच्या आईचा आदर केला हे निश्‍चित; परंतु त्याने तिचा देव्हारा माजवला नाही.

चिरकालिक विशेषाधिकार

मरीयेने किती विशेषाधिकारांचा आनंद उपभोगला! तिने येशूला जन्म दिला. त्यानंतर त्या लहान मुलाला मातेची ममता व प्रशिक्षण दिले. शेवटी, तिने विश्‍वास प्रकट केला आणि ख्रिस्ताची शिष्या आणि आध्यात्मिक बहीण झाली. मरीयेबद्दलच्या आमच्या शेवटल्या शास्त्रवचनीय ओझरत्या दर्शनात, आम्ही तिला जरुसलेममध्ये एका माडीवरच्या खोलीत पाहतो. ती तेथे एकत्र जमलेल्या येशूच्या शिष्यांसोबत, तिचे इतर मुलगे आणि काही विश्‍वासू स्त्रियांसोबत आहे. हे सर्व यहोवाचे उपासक आहेत.—प्रेषितांची कृत्ये १:१३, १४.

कालांतराने, मरीयेचे निधन होऊन तिचे शरीर मातीस मिळाले. तिच्या प्रिय पुत्राच्या सुरवातीच्या इतर अभिषिक्‍त शिष्यांप्रमाणेच ती देखील, स्वर्गातील अमर जीवनासाठी आत्मिक प्राणी म्हणून तिचे पुनरूत्थान करण्याचा देवाचा नियुक्‍त समय येईपर्यंत मृत्यूत झोपी गेली. (१ करिंथकर १५:४४, ५०; २ तीमथ्य ४:८) यहोवा देव आणि येशू ख्रिस्ताच्या उपस्थितीत ही “कृपा पावलेली” स्त्री आता किती आनंदित असेल!

[तळटीपा]

a मरीया जर कुमारिका नसती तर तिच्यासोबत विवाह करण्यास कोणी इच्छा दाखवली असती? यहुद्यांची अशी एक रीत होती की मुलीने तिचा विवाह होईपर्यंत कुमारिकाच राहिले पाहिजे.—अनुवाद २२:१३-१९; पडताळा उत्पत्ती ३८:२४-२६.

[३१ पानांवरील चित्रं]

मरीया येशूची आई या नात्याने कृपा पावलेली होती

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा