वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 १०/१५ पृ. २७-३०
  • पेत्राची कबर—वॅटिकन मध्ये?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पेत्राची कबर—वॅटिकन मध्ये?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • पुराणवस्तुशास्त्राचे रहस्य
  • सापडलेल्या गोष्टींचे अर्थबोधन
  • एक ‘अविश्‍वसनीय परंपरा’
  • पेत्राचा मृत्यू रोममध्ये झाला का?
  • आपल्या मोलवान विश्‍वासाला धरून राहू!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • आपल्या गुरूकडून तो क्षमा करण्यास शिकला
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
  • तो आपल्या धन्याकडून क्षमा करण्याचा धडा शिकतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • पेत्रप्रमाणे हार न मानता प्रयत्न करत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 १०/१५ पृ. २७-३०

पेत्राची कबर—वॅटिकन मध्ये?

“प्रेषितांच्या राजपुत्राची कबर सापडली आहे.” वॅटिकन रेडिओ माध्यमाद्वारे पोप पायस बारावे यांनी ही विजयाची घोषणा केली. तो १९५० च्या शेवटाचा काळ होता व संत पेत्र बासिलिका येथील उत्खननाच्या किचकट मोहीमांची अलिकडेच पूर्णता झाली होती. काहींच्या मते, पुराणवस्तू संशोधकांच्या परीक्षणावरुन पेत्राला खरोखर वॅटिकन येथेच पुरले होते हे सिद्ध झाले. तथापि, याला सर्वांचेच सहमत नव्हते.

कॅथलिकांसाठी वॅटिकनमधील संत पेत्राच्या चर्चचे खास महत्त्व आहे. कॅथलिक मार्गदर्शक पुस्तक सांगते की, “रोमच्या यात्रेचा आवश्‍यक उद्देश म्हणजे, पेत्राच्या वारसाला भेटणे व त्याच्याकडून आशीर्वाद प्राप्त करणे होय, कारण पेत्र रोमला आला व तेथे त्याला पुरले गेले.” पण पेत्राला खरोखर रोममध्ये पुरले होते का? वॅटिकनमध्ये त्याची कबर आहे का? त्याच्या अस्थी सापडल्या आहेत का?

पुराणवस्तुशास्त्राचे रहस्य

उत्खनन १९४० ला सुरु होऊन दहा वर्षांपर्यंत चालले व हा वादाचा एक विषय झाला. पोपने नेमलेल्या पुराणवस्तू संशोधकांना काय सापडले? एक गोष्ट त्यांना सापडली व ती म्हणजे, अनेक कबरा असलेले एक स्मशान. त्यांच्यामध्यात आधुनिक दिवसातील पोपच्या वेदीखाली म्हणजेच इडिक्यूलॉ, तांबडे प्लॅस्टर केलेल्या व बाजूला दोन भिंती असलेले पुतळा किंवा मूर्ती ठेवण्याचे स्मारक त्यांनी ओळखले. शेवटी, अगदी रहस्यमयरित्या काही मानवांच्या अवशेषांचा देखील शोध लागला, जे बाजूच्या दोन भिंतीपैकी एका भिंतीच्या खाली सापडल्याचे म्हटले गेले.

येथूनच कल्पना लढवून अर्थ लावण्यास सुरवात झाली. अनेक कॅथलिक विद्वानांच्या मते, सापडलेल्या गोष्टी पेत्राच्या घराण्याच्या परंपरेला व रोममध्ये निरो राज्य करीत असताना सा. यु. ६४ मधील छळाच्या दरम्यान हुतात्मिक मरणाला पुष्टी देतात. असेही म्हटले गेले की, प्रेषिताचे हे अवशेष आहेत व त्यांना एका मतानुसार “पेत्र येथे आहे” या कोरीव लिखाणावरुन ओळखले जाऊ शकते. असे दिसून येते की, पोप पौल सहावे यांनी १९६८ मध्ये “शोध लागलेल्या संत पेत्राचे मर्त्य अवशेष, आपल्या भक्‍तीसाठी व पूज्य मानण्यासाठी योग्य आहेत” असे घोषित केले तेव्हा ते गृहीत प्रमेय म्हणून त्याला महत्त्व देत होते.

तथापि, अर्थ लावण्यासोबतच, तेथे विरोधात्मक वादविवाद देखील होता. वॅटिकन उत्खननात भाग घेतलेल्या कॅथलिक पुराणवस्तू संशोधक ॲन्टोनियो फरुऑ या जेसूईट व्यक्‍तीने असे अनेकदा निग्रहाने सांगितले की, त्याला या बाबतीत माहीत असलेल्या सर्व गोष्टींबद्दल ‘सांगण्यास अनुमती दिली गेली नाही.’ या माहितीने पेत्राचे अवशेष ओळखण्यात आले आहेत या दाव्याचा स्पष्टपणे विरोध केला असता. त्याशिवाय, रोमसाठी एक मार्गदर्शक हे पुस्तक कॅथलिक कारर्डिनल प्युपर यांनी संपादन करुन १९९१ मध्ये प्रकाशित केले. त्यात म्हटले होते की, “तांबड्या भिंतीच्या पायाखाली सापडलेल्या मानवी अस्थींच्या बाबतीत विज्ञानाने केलेले परीक्षण प्रेषित पेत्राविषयी काही पुरावा देतात असे वाटत नाहीत.” विलक्षण गोष्ट सांगावयाची म्हणजे, पुढील (१९९१ नंतरच्या) आवृत्तीत हे विधान गायब झाले व “एक खात्री: सेंट पीटर्स येथे पेत्र,” हे शीर्षक असलेल्या एका नवीन अध्यायाची त्यात भर घातली गेली.

सापडलेल्या गोष्टींचे अर्थबोधन

सापडलेल्या गोष्टीवर अर्थबोधन केले आहे व विभिन्‍न लोकांना त्याचा विविध अर्थबोध होतो हे उघड आहे. वस्तुतः, अधिकारी वर्गातील उच्च अधिकार असलेले कॅथलिक इतिहासकार ओळखतात की, “पेत्राचे रोममधील परिणामकारक हुतात्मिक मरण व त्याची कबर याविषयीची ऐतिहासिक समस्या संशयास्पद आहे.” अवशेष काय प्रकट करतात?

कॅथलिक परंपरेला उंचावून धरणाऱ्‍यांनुसार हे इडिक्यूलॉ स्मारक, तिसऱ्‍या शतकाच्या पूर्वार्धात राहणाऱ्‍या गायस या पाळकाने उल्लेखलेले हे “स्मारक” आहे. कैसरियातील चवथ्या शतकात असलेला चर्चविषयक इतिहासकार, इसुबियस यांच्या मते, गायसने म्हटले की, तो ‘वॅटिकन टेकडीवर पेत्राचे स्मारक ओळखू शकतो.’ या परंपरेला पुष्टी देणारे, “गायसचे स्मारक” म्हणून ओळखल्या जाणाऱ्‍या स्मारकाखाली प्रेषिताला पुरले होते असा दावा करतात. तथापि, इतर काही लोक उत्खननाच्या परिणामाचे अर्थबोधन वेगळ्याच प्रकारे करतात. त्यांनी निदर्शिले की, प्रथम ख्रिस्ती मृतांच्या कबरांकडे विशेष लक्ष देत नव्हते व पेत्राला जरी तेथे मारण्यात आले होते तरी, त्याचे शरीर परत मिळवणे जवळजवळ अशक्य कोटीतलेच आहे. (पृष्ठ २९ वरील पेटी पाहा.)

असे देखील काही आहेत ज्यांचे “गायसचे स्मारक” (ते सापडले असल्यास) ती एक कबर आहे याला सहमत नाही. ते असा पाठपुरावा देतात की, दुसऱ्‍या शतकाच्या उत्तरार्धात पेत्राच्या सन्मानाप्रीत्यर्थ हे एक स्मारक आहे व नंतर “स्मारक कबर म्हणून त्याला मानण्यात आले.” तथापि, पुराणवस्तू संशोधक ऑस्कर कुलमान यांच्या मतानुसार, “पेत्राची कबर वॅटिकन उत्खननात ओळखण्यात आलीच नाही.”

मग त्या अस्थींविषयी काय? अस्थी कोठून सापडल्या याचे स्पष्टीकरण देणे अवघड आहे असे म्हटले जाऊ शकते. आता वॅटिकन टेकडी असलेल्या ठिकाणावर पहिल्या शतकात मुर्तीपूजकांची विस्तीर्ण दफनभूमी असल्यामुळे, त्या भागात अनेक मानव शरीरांचे दफन केले होते व त्याचे अनेक अवशेष सापडले आहेत. काही लोक म्हणतात की, अर्धवट कोरीव अक्षरे, अवशेष सापडलेली जागा प्रेषितांच्या कबरेसारखीच असल्याची ओळख देतात. परंतु अर्धवट कोरीव अक्षरे (कदाचित चवथ्या शतकापर्यंतची तारीख असलेली) तेथे कदाचित “पेत्राच्या अस्थी आहेत असे गृहीत धरलेल्या गोष्टीला,” उचितपणे सूचित करु शकतात. अनेक कोरीव शिलालेख संशोधकांच्या मतानुसार त्या कोरीव अक्षरांचा अर्थ “पेत्र येथे नाही” असा देखील होऊ शकतो.

एक ‘अविश्‍वसनीय परंपरा’

इतिहासकार डी. डब्ल्यू. कोनॉर म्हणतात की, “आरंभीचा व अधिक विश्‍वसनीय उगम, पेत्राच्या हुतात्मिक मरणाच्या जागेबद्दल काही सांगत नाही; पण त्यानंतरचे व अल्प विश्‍वसनीय उगम मात्र ती जागा वॅटिकन क्षेत्रात होती, याच्याशी प्रत्यक्षात सहमत आहेत.” यास्तव, पेत्राच्या कबरेविषयीचे वॅटिकन येथील संशोधन अविश्‍वसनीय परंपरांवर आधारित आहे. ओकोनॉर पुष्टी देतात की, “अवशेष अधिक महत्त्वाचे झाले तेव्हा, पेत्राचे [स्मारक] त्याच्या कबरेची निश्‍चित जागा सांगत असल्याचा विश्‍वास ख्रिस्ती लोक प्रांजळपणे बाळगू लागले.”

या परंपरा अवशेषांना दाखविलेल्या अशास्त्रवचनीय पूज्यतेसोबतच विकसित झाल्या. तिसऱ्‍या व चवथ्या शतकांपासून, विविध चर्च केंद्रांनी—“आध्यात्मिक” सर्वाधिकार व स्वतःचा अधिकार प्राप्त करण्याच्या झगड्यात—आर्थिक फायद्यासाठी खऱ्‍या व खोट्या अवशेषांचा उपयोग केला. तद्वत, पेत्राच्या अवशेषात चमत्कारिक सामर्थ्य होते याची खात्री पटवल्यानंतर, त्याच्या गृहीत मानलेल्या कबरेपर्यंत यात्रेकरुंनी त्यांचा प्रवास केला. सहाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत भाविक, काळजीपूर्वक वजन केलेले कटपीस “कबरीवर” फेकू लागले. “विलक्षणीयपणे,” एका समकालीन अहवालाने म्हटले, “याचना करणाऱ्‍याचा विश्‍वास दृढ असल्यास, कबरेकडून परत मिळवलेले कापड पूर्णपणे ईश्‍वरी सद्‌गुणाचे असेल व त्याचे वजन पूर्वीपेक्षाही अधिक असेल.” ही गोष्ट त्यावेळेच्या अंधविश्‍वासाला सूचित करते.

शतकांपासून, अशाप्रकारच्या निराधार दंतकथा व परंपरांनी वॅटिकन बॅसिलिकाच्या प्रतिष्ठेच्या वाढीला बराच हातभार लावला. असे असले तरी, तीव्र मतभेद झाले होते. १२ व्या व १३ व्या शतकात, वॅल्डनसेस यांनी या अतिरेकाचा धिक्कार केला व बायबलच्या आधारावर पेत्र रोममध्ये कधीही आला नव्हता याचे स्पष्टीकरण दिले. काही शतकांनंतर प्रॉटेस्टंट सुधारकांच्या प्रतिनिधींनीही अशाचप्रकारे वाद मांडला. त्यानंतर १८ व्या शतकात प्रसिद्ध तत्त्वज्ञान्यांनी या परंपरेला ऐतिहासिकदृष्ट्या व शास्त्रवचनीयदृष्ट्या निराधार समजले. आजपर्यंत कार्यक्षम विद्वान, कॅथलिक व इतरांचा असाच दृष्टिकोन आहे.

पेत्राचा मृत्यू रोममध्ये झाला का?

गालीलमधील एक नम्र कोळी असलेल्या पेत्राने पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळीतील वडिलांवर सर्वाधिकार गाजविण्याच्या कल्पनेचा विचार निश्‍चितच मनात बाळगला नाही. उलट, त्याने स्वतःला “सोबतीचा वडील” असे संबोधले. (१ पेत्र ५:१-६) नम्र पेत्राच्या तुलनेत, बॅसिलिकाला भेट देणारा कोणीही गृहीत धरलेल्या त्याच्या कबरे सभोवतालचा भाग भपकेबाज वॅटिकन पाहू शकतो.

रोमन कॅथलिक चर्चने आपला सर्वाधिकार इतर ख्रिस्ती पंथांवर बजावण्यासाठी पेत्र काही काळ रोममध्ये वास्तव्य करुन होता असे सांगणाऱ्‍या ‘अलिकडील व अल्प विश्‍वसनीय’ परंपरेला अधिकार देण्याचा प्रयत्न केला. असे असले तरी, इतर प्राचीन परंपरांनी पेत्राची दफनभूमी वॅटिकन नसून रोममध्ये कोठेतरी असल्याचे समजले हे विलक्षणीय आहे. तरीही, पेत्राविषयीच्या माहितीचा एकमात्र उगम असणाऱ्‍या बायबलमध्ये नोंद केलेल्या वस्तुस्थितीला जडून का राहू नये? देवाच्या वचनावरुन हे स्पष्ट होते की, जेरुसलेममधील ख्रिस्ती मंडळीच्या नियमन मंडळाकडून मिळालेल्या मार्गदर्शनानुसार पेत्राने त्याचे कार्य बॅबिलॉनसहीत प्राचीन जगाच्या पूर्वेकडील भागात केले.—गलतीकर २:१-९; १ पेत्र ५:१३; पडताळा प्रेषितांची कृत्ये ८:१४.

रोममधील ख्रिश्‍चनांना सुमारे सा. यु. ५६ मध्ये लिहिताना, प्रेषित पौलाने मंडळीतील जवळपास ३० लोकांना शुभेच्छा पाठविल्या ज्यामध्ये पेत्राचा उल्लेख देखील नव्हता. (रोमकर १:१, ७; १६:३-२३) त्यानंतर, सा. यु. ६० व ६५ च्या दरम्यान पौलाने रोममधून सहा पत्रे लिहिली—पेत्राचा उल्लेख तेथे केला नाही—म्हणजेच तो तेथे नव्हता हे वास्तविकतेच्या पुराव्यावरून शाबीत होते.a (पडताळा २ तीमथ्य १:१५-१७; ४:११.) पौलाच्या रोममधील कार्याचे वर्णन प्रेषितांची कृत्ये पुस्तकाच्या समारोपास केले आहे; पण येथे देखील पेत्राविषयी एकदाही उल्लेख आढळत नाही. (प्रेषितांची कृत्ये २८:१६, ३०, ३१) परिणामतः, सर्व आगाऊ कल्पनांपासून मुक्‍त असलेले बायबलच्या पुराव्याचे वस्तुनिष्ठ परीक्षण, पेत्राने रोममध्ये प्रचार केला नाही, याच निष्कर्षाप्रत निरवू शकते.b

पोपची “सर्वश्रेष्ठता” अविश्‍वसनीय परंपरा व शास्त्रवचनाच्या विपर्यस्त अवलंबनावर आधारित आहे. ख्रिस्ती विश्‍वासाचा पाया पेत्र नसून येशू आहे. पौल म्हणतो की, “ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे.” (इफिसकर २:२०-२२; ५:२३) यहोवाने आशीर्वाद देण्यासाठी व विश्‍वास बाळगणाऱ्‍या सर्वांचा बचाव करण्यासाठी येशूला पाठविले होते.—योहान ३:१६; प्रेषितांची कृत्ये ४:१२; रोमकर १५:२९; तसेच १ पेत्र २:४-८ हेही पाहा.

यास्तव, पेत्राच्या ‘वारसाला भेटण्यासाठी’ पेत्राची कबर असल्याचा प्रामाणिकपणे विश्‍वास बाळगणारे लोक, ‘अविश्‍वसनीय परंपरांचा’ स्वीकार करावा की देवाच्या विश्‍वसनीय वचनावर विश्‍वास ठेवावा या समस्येचा सामना करतात. ख्रिश्‍चनांची भक्‍ती देवाला स्वीकारयोग्य असावी अशी त्यांची इच्छा असल्यामुळे, ते ‘विश्‍वास पूर्ण करणाऱ्‍या येशूकडे’ व अनुकरण करण्यासाठी त्याने मांडलेल्या परिपूर्ण उदाहरणाकडे पाहतात.—इब्रीयांस १२:२; १ पेत्र २:२१.

[तळटीपा]

a जवळपास सा. यु. ६०-६१ व्या वर्षी पौलाने इफिसकर, फिलिप्पैकर, कलस्सैकर, व इब्रीयांस यांना पत्रे लिहिली; सुमारे सा. यु. ६५ मध्ये त्याने तीमथ्याला दुसरे पत्र लिहिले.

b “पेत्र कधी रोममध्ये होता का?” या प्रश्‍नाची चर्चा नोव्हेंबर १, १९७२ च्या द वॉचटावर मधील ६६९-७१ पृष्ठांवर केली होती.

[२९ पानांवरील चौकट]

“इडिक्यूलॉच्या खाली केलेले उत्खनन कबरेबद्दल कसलाही मागमूस प्रकट करीत नाही; तसेच वध करणाऱ्‍यांकडून संत पेत्राच्या शरीराचे दफन करण्यासाठी ख्रिस्ती समाजाला ते परत मिळाल्याची निश्‍चित कोणतीच खात्री नाही. सामान्य घटनांमध्ये विदेशी (परग्रीʹनस) व्यक्‍तीचे शव व नियमानुसार सामान्य अपराध्यांना टायबरमध्ये टाकण्यात येत असे. . . . शिवाय, जवळ येऊन ठेपलेल्या जगाच्या अंतावरील विश्‍वासाचा ऱ्‍हास झाला व हुतात्म्यांच्या पूजापद्धतींची सुरवात झाली तेव्हा शरीराच्या अवशेषांना सुरक्षित ठेवण्यासाठी नंतर जितकी आस्था होती तितकी पूर्वी नसेल. यामुळे संत पेत्राचे शरीर दफन करण्यासाठी परत मिळाले नाही ही शक्यता खरी आहे असे वाटते.”—जॉस्लीन टॉयन्बी व जॉन वॉर्ड पर्किन्स यांचे संत पौलाचे पवित्र स्थान व वॅटिकन उत्खनन (इंग्रजी).

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा