येशूप्रमाणे तुम्ही शिकवता का?
“लोकसमुदाय त्याच्या शिक्षणावरून थक्क झाले; कारण तो त्यांना त्यांच्या शास्त्री लोकांसारखा नव्हे तर अधिकारवाणीने शिकवीत होता.”—मत्तय ७:२८, २९.
१. गालीलमध्ये शिकवताना येशूचे अनुसरण कोणी केले व येशूची प्रतिक्रिया काय होती?
येशू जेथे जेथे गेला तेथे तेथे लोकांचे थव्यांचे थवे त्याच्यामागे गेले. “येशू यहूदी लोकांच्या सभास्थानात सुवार्तेची घोषणा करीत व राज्याची सुवार्ता गाजवीत आणि लोकांचे सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरी करीत गालीलभर फिरला.” त्याच्या कार्याचा अहवाल पसरला तसे “गालील, दकापलीस, यरुशलेम, यहूदीया व यार्देनेच्या पलीकडचा प्रदेश ह्यांतून लोकांचे थव्यांचे थवे त्याच्यामागे चालले.” (मत्तय ४:२३, २५) त्यांना पाहून, “त्याचा त्याला कळवळा आला, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे, ते गांजलेले व पांगलेले होते.” तो त्यांना शिकवू लागला तसे त्यांच्यासाठी असलेली दया किंवा ममतेची जाणीव त्यांना होऊ लागली; ती त्यांच्या जखमेवर जणू दुःख शमविणाऱ्या मलमासारखी होती.—मत्तय ९:३५, ३६.
२. येशूच्या चमत्काराव्यतिरिक्त, मोठ्या समुदायाला त्याच्याकडे कोणत्या गोष्टीने आकर्षित केले?
२ येशूने किती चमत्कारिकरीत्या लोकांना बरे केले—कुष्ठरोग्यांना शुद्ध केले, बहिऱ्यांना, आंधळ्यांना, लंगड्यांना बरे केले तसेच मृतांना परत जिवंत केले! नक्कीच, येशूद्वारे कार्य करणाऱ्या यहोवाच्या शक्तीच्या या चित्तवेधक प्रदर्शनामुळे लोकांचे थवे येशूजवळ येत होते! परंतु केवळ चमत्कारामुळेच लोक येशूजवळ गेले नाहीत; येशू शिकवत होता, तेव्हा लोकांचा मोठासमुदाय आध्यात्मिकरित्या बरे होण्यासाठी त्याच्याकडे येत होता. उदाहरणार्थ, त्याचे डोंगरावरील प्रसिद्ध प्रवचन ऐकल्यावर त्यांच्या प्रतिसादाकडे लक्ष द्या: “येशूने हे सर्व बोलणे समाप्त केल्यावर असे झाले की, लोकसमुदाय त्याच्या शिक्षणावरून थक्क झाले; कारण तो त्यांना त्यांच्या शास्त्री लोकांसारखा नव्हे तर अधिकारवाणीने शिकवीत होता.” (मत्तय ७:२८, २९) त्यांच्या रब्बींनी आपल्या शिकवणीला पुष्टी देण्यासाठी प्राचीन रब्बीयांकडील तोंडी परंपरांना उद्धृत केले. येशूने देवाकडील अधिकारवाणीने त्यांना शिकवले: “जे काही मी बोलतो ते पित्याने मला सांगितल्याप्रमाणे बोलतो.”—योहान १२:५०.
त्याची शिकवण अंतःकरणाप्रत पोहंचली
३. शास्त्री व परुश्यांपेक्षा येशूच्या संदेशाची सादरता वेगळी कशी होती?
३ येशू व शास्त्री तसेच परुश्यांच्या शिकवणीत—देवाकडील सत्याच्या विरोधात मानवांकडील ओझ्यासमान तोंडी परंपरा हाच केवळ फरक नव्हता—तर त्या ज्याप्रकारे शिकवल्या जात होत्या याचा देखील समावेश होता. शास्त्री व परुशी उद्धट, कठोर, गर्विष्ठपणे उच्च पदांची मागणी करणारे होते व त्यांनी समुदायाला ‘शापित लोक’ समजून तिरस्काराने दूर केले. परंतु येशू नम्र, सौम्य, दयाळू, सहानुभूती असलेला व अनेकदा नमते घेणारा होता, तसेच त्यांची त्याला दया आली होती. येशूने केवळ सरळ शब्दांनीच शिकवले नाही, तर त्याच्या अंतःकरणातील अपीलकारक शब्दांनी देखील शिकवले जे ऐकणाऱ्यांच्या थेट अंतःकरणापर्यंत पोहंचले. त्याच्या हर्षदायक संदेशामुळे लोक त्याच्याकडे आकर्षित झाले; त्याचे ऐकण्यासाठी मंदिरात लवकर जाण्यास प्रवृत्त झाले, त्याचे जवळून अनुसरण करण्यास व आनंदाने त्याचे ऐकण्यास त्याच्याकडे आले. त्याचे ऐकण्यासाठी लोक मोठ्या संख्येने त्याच्याजवळ आले, व त्यांनी म्हटले: “कोणीहि मनुष्य त्याच्यासारखा कधी बोलला नाही.”—योहान ७:४६-४९; मार्क १२:३७; लूक ४:२२; १९:४८; २१:३८.
४. येशूच्या प्रचारात अनेक लोकांना विशेषपणे कोणत्या गोष्टीने आकर्षित केले?
४ लोक त्याच्या शिकवणीकडे आकर्षित होण्याच्या कारणांपैकी एक म्हणजे, दाखल्यांचा उपयोग हे होते. इतरांनी जे पाहिले तेच येशूने पाहिले; पण त्याने अशा गोष्टींचा विचार केला ज्या त्यांच्या मनात देखील कधी आल्या नव्हत्या. रानात वाढणारी भू-कमळे, आपली घरटी बनविणारे पक्षी, पेरणी करणारी माणसे, हरवलेली मेंढरे आणणारे मेंढपाळ, जुन्या कपड्यांना ठिगळे लावणाऱ्या स्त्रिया, बाजारात खेळणारी मुले, जाळे ओढणारे कोळी लोक—प्रत्येकजण पाहणाऱ्या या सामान्य गोष्टी होत्या—येशूच्या दृष्टीने कधीच साधारण नव्हत्या. त्याने पाहिलेली प्रत्येक गोष्ट, देव व त्याच्या राज्याला स्पष्ट मांडण्यासाठी किंवा मानवी समाजाला त्याच्याभोवती एक विषय बनविण्यासाठी तो काय करु शकतो, हे त्याने जाणले.
५. येशूने त्याचे दाखले कशाच्या आधारावर घेतले व त्याचे दृष्टांत कशाने परिणामकारी बनले?
५ येशूचे दाखले लोकांनी त्यांच्या रोजच्या जीवनात अनेकदा पाहिलेल्या गोष्टींवर आधारित होते व माहीत असलेल्या या गोष्टींसोबत सत्याची सांगड घातल्यावर, ऐकणाऱ्यांच्या मनात लगेच खोलवर त्याचे चित्र रेखाटले जाते. असे सत्य केवळ ऐकले जात नाही; तर ते मनचक्षूंनी पाहिले व पुन्हा सहज आठवले जाते. येशूचे दाखले साधे होते, त्यांच्या सत्याविषयीच्या समजेला खीळ घालणाऱ्या अनावश्यक साहित्याने गोंधळात टाकले नव्हते. उदाहरणार्थ, शेजारधर्माला जागणाऱ्या शोमरोनी मनुष्याच्या दाखल्याचा विचार करा. तेथे, एक चांगला शेजारी कसा असतो हे तुम्ही स्पष्टपणे पाहता. (लूक १०:२९-३७) त्यानंतर तुम्ही दोन पुत्रांचा दाखला पाहिला—पहिल्याने म्हटले तो द्राक्षमळ्यात जाऊन काम करील; पण तो गेला नाही, दुसऱ्याने म्हटले तो जाणार नाही पण तो गेला. त्यातून खऱ्या आज्ञाधारकपणाचे महत्त्व तुम्हाला लगेच दिसून येते—नेमून दिलेले कार्य करणे. (मत्तय २१:२८-३१) येशूच्या सजीव शिकवणीच्या प्रसंगी कोणालाही सुस्ती आली नाही किंवा कोणाचेही मन विचलित झाले नाही. लक्ष देऊन ऐकण्यात व पाहण्यात त्यांनी स्वतःला व्यग्र ठेवले होते.
प्रीती दाखवल्यावर येशूने नमते घेतले
६. समंजस किंवा नमते घेणे खासकरुन कधी साहाय्यकारी असते?
६ बायबल समंजस असण्याविषयी बोलते, तेव्हा तळटीप अनेकदा नमते असण्याचा अर्थ देते. गांभीर्य कमी करणाऱ्या परिस्थितीं असतात तेव्हा देवाकडील बुद्धी नमते घेणारी असते. कधी कधी आपण समंजस किंवा नमते घेणारे असले पाहिजे. प्रीती व योग्य पश्चात्ताप दाखविल्यास वडिलांनी नमते घेण्यास इच्छुक असले पाहिजे. (१ तीमथ्य ३:३; याकोब ३:१७) येशूने नमते घेण्याविषयीची उत्कृष्ट उदाहरणे मांडली. दयाळू किंवा कनवाळूपणा दाखवण्यात आला, तेव्हा त्याने सामान्य नियमांना अपवाद बनवले.
७. येशू नमते घेणारा होता याची काही उदाहरणे कोणती आहेत?
७ येशूने एकदा म्हटले: “जो कोणी माणसांसमोर मला नाकारील त्याला मीहि आपल्या स्वर्गांतील पित्यासमोर नाकारीन.” परंतु पेत्राने त्याला तीन वेळा नाकारले तरी त्याने त्याचा त्याग केला नाही. निश्चितच, येशूने गांभीर्य कमी करणाऱ्या परिस्थितींना लक्षात घेतले. (मत्तय १०:३३; लूक २२:५४-६२) रक्तस्राव होत असलेल्या स्त्रीने लोकसमुदायात येण्याद्वारे मोशेचा नियम तोडला तेव्हा देखील गांभीर्य कमी करणाऱ्या यासारख्या परिस्थिती होत्या. येशूने तिचा देखील धिक्कार केला नाही. त्याने तिची अत्यंत निराशेची स्थिती जाणली. (मार्क १:४०-४२; ५:२५-३४; तसेच लूक ५:१२, १३ देखील पाहा.) येशूने स्वतःची ओळख मशीहा म्हणून करु नये असे त्याच्या प्रेषितांना सांगितले असले तरी, विहिरीवरील शोमरोनी स्त्रीला त्याने स्वतःची ओळख करुन दिली तेव्हा त्या नियमाला काटेकोरपणे पाळले नाही. (मत्तय १६:२०; योहान ४:२५, २६) या सर्व बाबतीत प्रीती, दया, आणि कनवाळूपणाने नमते घेणे उचित बनविले.—याकोब २:१३.
८. शास्त्री व परूशी नियमांना कधी अनुकूल बनवीत व कधी बनवीत नव्हते?
८ शास्त्री आणि परुश्यांचे माफ करणे यापासून वेगळे होते. आपल्या बैलांना पाणी पाजण्यास नेण्यासाठी ते शब्बाथाची परंपरा स्वतःसाठी तोडत होते. किंवा त्यांचा बैल वा मुलगा विहिरीत पडल्यास, त्याला बाहेर काढण्यासाठी ते शब्बाथ तोडत असत. परंतु सामान्य लोकांना ते मुळीच माफ करीत नव्हते! “ती [आवश्यक गोष्ट] काढण्यास ते स्वतः बोटहि लावावयाचे नाहीत.” (मत्तय २३:४; लूक १४:५) येशूला पुष्कळ नियमांपेक्षा, लोक अधिक महत्त्वाचे होते; परुश्यांना लोकांपेक्षा, नियम अधिक महत्त्वाचे होते.
“आज्ञेचा पुत्र” होणे
९, १०. जेरुसलेमेमध्ये परतल्यावर, येशूच्या पालकांना तो कोठे सापडला व येशूचे प्रश्न विचारण्याचे महत्त्व काय होते?
९ येशूच्या बालपणाच्या केवळ एकाच प्रसंगाचा उल्लेख असल्यामुळे काही लोक खेद करतात. तरीही, अनेक लोक त्या घटनेचे महत्त्व समजून घेत नाहीत. ते आपल्यासाठी लूक २:४६, ४७ मध्ये नमूद केले आहे: “तीन दिवसांनंतर तो त्यांना मंदिरात गुरुजनांमध्ये बसून त्यांचे भाषण ऐकताना व त्यांस प्रश्न करताना सापडला. त्याचे बोलणे जे ऐकत होते, ते सर्व त्याच्या बुद्धीवरुन व उत्तरावरुन थक्क झाले.” किटल्स् थिओलॉजिकल डिक्शनरी ऑफ द न्यू टेस्टमेंट अशी कल्पना सादर करते, की ‘प्रश्न करणे’ यासाठी असलेल्या ग्रीक शब्दाचा अर्थ, केवळ एका लहान मुलाची कुतूहलता हा नव्हता. न्यायदानाचे परीक्षण, तपासणी, विरोधी प्रश्न विचारणे इतकेच नव्हे तर मार्क १०:२ व १२:१८-२३ मध्ये उद्धृत केल्यानुसार ‘परुशी व सदुकी लोकांनी त्याची परीक्षा पाहण्याचे व कावेबाज प्रश्न करण्याला’ देखील हा शब्द सूचित होऊ शकतो.
१० तीच डिक्शनरी पुढे सांगते: “या वापराच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास असे विचारले जाऊ शकते की . . . [लूक] २:४६ प्रश्न विचारण्याच्या बाबतीत मुलाच्या कुतूहलतेबद्दल अधिक सांगत नसून, त्याऐवजी त्याचा यशस्वी वादविवाद सूचित करते. [वचन] ४७ नंतरच्या दृष्टिकोनासोबत, म्हणजेच यशस्वी वादविवादाच्या एकवाक्यतेत असेल.”a रॉदरहॅम यांचे भाषांतर ४७ वचनाला नाट्यमयरीत्या तोंड देणे असे मांडते: “त्याचे सातत्याने बोलणे ऐकणारे सर्वजण त्याच्या बुद्धीवरुन व उत्तरावरुन थक्क झाले.” रॉबर्टसन यांचे नव्या करारातील शाब्दिक चित्र (इंग्रजी) हे असे सांगते की, त्यांच्या आश्चर्यचकीत होण्याचा अर्थ, “त्यांचे आश्चर्य इतके पराकोटीला गेले होते की जणू देहभान हरपून डोळे विस्फारुन ते पाहतच राहिले.”
११. मरीया आणि योसेफाने जे पाहिले व ऐकले त्यावर त्यांची प्रतिक्रिया काय होती व एक वेदान्तीय डिक्शनरी काय सुचवते?
११ येशूचे पालक शेवटी तेथे आल्यावर, “त्यांना आश्चर्य वाटले.” (लूक २:४८) रॉबर्टसन सांगतात की, या वाक्प्रचारातील ग्रीक शब्दाचा अर्थ, “धक्का बसणे, जोराचा टोला बसणे”, असा आहे. ते पुढे म्हणतात की, योसेफ व मरीया यांनी जे काही पाहिले व ऐकले याचा त्यांना “धक्काच बसला.” याचा अर्थ, येशू आधीच विस्मयकारक शिक्षक होता. मंदिरातील घटना पाहता, किटल्स् यांचे कार्य असा दावा करते की, येशूने “त्या विरोधकांना सरतेशेवटी शरण यावे लागेल, या झगड्याचा आरंभ बालवयातच केला.”
१२. धार्मिक नेत्यांसोबत येशूच्या चर्चेने काय चिन्हित केले?
१२ ते विरोधक शरण आले! अनेक वर्षांनंतर, येशूने असे प्रश्न विचारुन परुश्यांचा पराभव केला ज्यामुळे ते ‘आणखी प्रश्न करावयास धजले’ नाहीत. (मत्तय २२:४१-४६) अशाचप्रकारे, पुनरुत्थानावरील प्रश्नांमुळे सदुक्यांची तोंडे बंद झाली व “मग ते त्याला आणखी काहीहि विचारण्यास धजले नाहीत.” (लूक २०:२७-४०) शास्त्र्यांचेही काही चालले नाही. त्यांच्यातील एकाने येशूसोबत एका प्रश्नाची चर्चा केल्यावर, “त्याला आणखी काही विचारण्याचे कोणालाहि धैर्य झाले नाही.”—मार्क १२:२८-३४.
१३. येशूच्या जीवनातल्या मंदिरातील प्रसंगाला कशाने महत्त्वपूर्ण बनविले होते व ते पुढील जाणीवेबद्दल काय सुचवते?
१३ येशूच्या बालवयाची हकिकत पुन्हा सांगण्यासाठी, मंदिरात येशू व शिक्षक यांचा समावेश असणाऱ्या घटनेचीच निवड का केली? तो क्षण येशूच्या जीवनास नवे वळण देणारा होता. यहुदी लोक संज्ञा देत त्याप्रमाणे तो १२ वर्षांचा असताना, सर्व नियमांचे पालन करण्यास जबाबदार “आज्ञेचा पुत्र” बनला. मरीयेने तिला स्वतःला व योसेफाला मानसिक त्रास दिल्याची त्याला तक्रार केली, तेव्हा येशूने आपल्या उत्तरात त्याचा जन्म कसा झाला व त्याच्या मशीही भवितव्याबद्दलची जाणीव झाल्याचे तिला सुचवून दिले. त्याने देव त्याचा पिता असल्याचे थेटपणे सांगण्याद्वारे ते सुचविले: “तुम्ही माझा शोध करीत राहिला हे कसे? माझ्या पित्याच्या घरात मी असावे हे तुमच्या ध्यानात आले नाही काय?” येशूचे हेच प्रथम शब्द आहेत जे बायबलमध्ये नमूद करण्यात आले आहेत व ते त्याला पृथ्वीवर पाठविण्याच्या यहोवाच्या उद्देशाची जाणीव असल्याचे सूचित करतात. अशाप्रकारे ही खास घटना अधिक महत्त्वपूर्ण आहे.—लूक २:४८, ४९.
येशू प्रीती करतो व मुलांना समजून घेतो
१४. मंदिरातील तरुण येशूचा अहवाल, तरुणांना कोणत्या मनोरंजक मुद्यांची जाणीव करुन देतो?
१४ हा अहवाल, विशेषकरुन तरुणांना शिरशिरी भरविणारा असला पाहिजे. येशूने प्रौढतेप्रत जात असताना किती परिश्रमाने अभ्यास केला असावा हे तो अहवाल दाखवतो. १२ वर्षांचा ‘आज्ञेचा पुत्र’ याच्या बुद्धीमुळे मंदिरातील रब्बींना धक्काच बसला होता. असे असले तरी, तो योसेफासोबत सुताराच्या दुकानात काम करीत राहिला. तो योसेफाच्या व मरीयेच्या “आज्ञेत राहिला,” आणि “देवाच्या व माणसांच्या कृपेत” वाढत गेला.—लूक २:५१, ५२.
१५. येशू त्याच्या पार्थिव सेवेदरम्यान तरुणांना कशारितीने पाठिंबा देणारा ठरला व आज तरुणांसाठी त्याचा अर्थ काय होतो?
१५ येशू त्याच्या पार्थिव सेवेत असताना तरुणांना अधिक सहकार्य करणारा होता: “तेव्हा त्याने केलेले चमत्कार पाहून व ‘दाविदाच्या पुत्राला होसान्ना!’ असे मंदिरात गजर करणारी मुले पाहून मुख्य याजक व शास्त्री रागावले व त्याला म्हणाले: ‘ही काय म्हणतात हे तू ऐकतोस काय?’ येशूने त्यांस म्हटले: ‘हो, बाळके व तान्ही मुले ह्यांच्या मुखातून तू स्तुति पूर्ण करविली आहे हे तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय?’” (मत्तय २१:१५, १६; स्तोत्र ८:२) अशाचप्रकारे, तो आज सचोटी राखणाऱ्या व त्याची स्तुती करणाऱ्या शेकडो हजारो तरुणांना पाठबळ पुरवतो. त्यांच्यातील काहींनी तर आपल्या जीवनाची किंमत देऊन असे केले आहे!
१६. (अ) येशूने लहान बालकाला मध्ये उभे करुन आपल्या प्रेषितांना कोणता धडा शिकवला? (ब) येशूच्या जीवनातील कोणत्या निर्णायक काळात देखील त्याच्याकडे मुलांसाठी वेळ होता?
१६ प्रेषित त्यांच्यामध्ये सर्वांत श्रेष्ठ कोण आहे, असा वाद घालत असताना, येशूने त्या १२ प्रेषितांना म्हटले: “‘जर कोणी पहिला होऊ इच्छित असेल तर त्याने सर्वांत शेवटला व सर्वांचा सेवक झाले पाहिजे.’ मग त्याने एक बाळक घेऊन त्यांच्यामध्ये ठेवले व त्याला कवटाळून त्यांना तो म्हणाला: ‘जो कोणी माझ्या नावाने अशा बाळकांपैकी एकाला स्वीकारतो तो मला स्वीकारतो, व जो कोणी मला स्वीकारतो तो मला नाही तर ज्याने मला पाठविले त्याला स्वीकारतो.’” (मार्क ९:३५-३७) शिवाय आता शेवटल्या वेळी, जेरुसलेमेकडे परीक्षा व मृत्यूचा सामना करण्यासाठी जात असतानाही त्याने मुलांसाठी वेळ काढला: “बाळकांस माझ्याजवळ येऊ द्या; त्यांना मनाई करु नका, कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे.” मग त्याने “त्यांना कवटाळून व त्यांच्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला.”—मार्क १०:१३-१६.
१७. मुलाचे उदाहरण देणे येशूला सोपे का होते व मुलांनी त्याच्याविषयी काय आठवण ठेवावी?
१७ प्रौढांच्या जगात मुलासारखे असण्याचा अर्थ काय आहे हे, येशूला माहीत आहे. तो प्रौढांसोबत राहिला, त्याने त्यांच्याबरोबर कार्य केले, त्यांच्या अधीन राहण्याचा अनुभव त्याने घेतला, तसेच त्यांचे प्रेम त्याला जिव्हाळ्याचे, सुरक्षिततेचे वाटले. मुलांनो, हाच येशू तुमचा मित्र आहे; तो तुमच्यासाठी मरण पावला, त्याचे आज्ञापालन केल्यास तुम्ही अनंतकाल जगू शकाल.—योहान १५:१३, १४.
१८. आपण विशेषपणे तणावाच्या काळात किंवा संकटप्रसंगी, कोणता चित्तथरारक विचार लक्षात ठेवला पाहिजे?
१८ येशूच्या आज्ञांचे पालन करणे, आम्हाला वाटते त्याप्रमाणे कठीण नाही. तरुणांनो, तो तुमच्या तसेच प्रत्येकाच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर आहे, हेच आपण मत्तय ११:२८-३० मध्ये वाचतो: “अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जूं आपणावर घ्या [किंवा “माझ्यासोबत, माझ्या जूं खाली या,” तळटीप, NW] व माझ्यापासून शिका म्हणजे ‘तुमच्या जिवांस विसावा मिळेल;’ कारण माझे जूं सोयीचे व माझे ओझे हलके आहे.” याची कल्पना करा की, यहोवाची सेवा करत असताना येशू तुमच्या बाजूने आहे, तो तुमचे जूं सोयीचे व हलके बनवित आहे. हा विचार आपल्या सर्वांसाठी चित्तथरारक आहे!
१९. आपण येशूच्या शिकवणीच्या मार्गांविषयी कोणत्या प्रश्नांची उजळणी वेळोवेळी करु?
१९ येशूने शिकवलेल्या काही मार्गांची उजळणी केल्यावर, तो जसा शिकवत होता त्याप्रमाणे आपण शिकवतो असे आम्हाला वाटते का? शारीरिकरित्या आजारी असलेल्यांना किंवा आध्यात्मिकरित्या भुकेल्या लोकांना आपण पाहतो, तेव्हा त्यांना होता होईल तितकी मदत करण्यासाठी आपल्याला दया येते का? आपण इतरांना शिकवतो, तेव्हा देवाचे वचन शिकवतो, की परुश्यांसारखे आपल्या स्वतःच्या कल्पना शिकवत असतो? आपण आपल्या सभोवती दररोज पाहत असलेल्या गोष्टींचा आध्यात्मिक सत्य गोष्टींची समज वाढविण्यास, स्पष्टीकरणास, काल्पनिक चित्र उभे करण्यास, स्पष्टरुप धारण करण्याचा उपयोग करण्यासाठी दक्ष असतो का? काही नियमांच्या अवलंबाला नमते घेतल्यामुळे काही परिस्थितीत प्रीती व दया अधिक उचितपणे व्यक्त होतात तेव्हा विशिष्ट नियमांना निष्ठुरपणे लागू करण्याचे आपण टाळतो का? मुलांबद्दल काय? येशूप्रमाणे आपण त्यांना ही चांगली काळजी व प्रेमळ दया दाखवतो का? तुम्ही आपल्या मुलांना, येशूने मुलगा या नात्याने जसा अभ्यास केला तशाचप्रकारे अभ्यास करण्यासाठी उत्तेजन देता का? येशूप्रमाणे तुम्ही दृढपणे परंतु कोंबडी तिच्या पिलांना जशी आपल्या पंखाखाली घेते त्याप्रकारे पश्चात्तापी जनांचे तत्पर हार्दिक स्वागत कराल का?—मत्तय २३:३७.
२०. आपल्या देवाची सेवा करताना, कोणत्या हर्षदायक विचाराने आपण स्वतःचे सांत्वन करु शकतो?
२० येशूप्रमाणे आपण शिकवण्याचे परिश्रम केले, तर नक्कीच तो आपल्याला ‘त्याच्यासोबत त्याच्या जूं खाली घेईल.’—मत्तय ११:२८-३०.
[तळटीपा]
a अर्थातच, येशूने त्याच्यापेक्षा वयाने मोठे असलेल्यांसाठी, विशेषकरुन पिकलेल्या केसांना व याजकांना उचित आदर दाखवला असेल असा विश्वास आम्ही नक्कीच बाळगू शकतो.—पडताळा लेवीय १९:३२; प्रेषितांची कृत्ये २३:२-५.
तुम्हाला आठवते का?
◻ येशूकडे लोकांचा समुदाय का आला?
◻ येशूने कधी कधी काही नियमांबद्दल नमते का घेतले?
◻ मंदिरातील शिक्षकांना येशूच्या प्रश्न विचारण्यापासून आपण काय शिकू शकतो?
◻ मुलांसोबतच्या येशूच्या नातेसंबंधापासून आपण कोणते धडे शिकू शकतो?