वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 १०/१५ पृ. १२-१५
  • येशूने देवावर विश्‍वास ठेवला असेल का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • येशूने देवावर विश्‍वास ठेवला असेल का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • विश्‍वासाविना प्रार्थना?
  • ‘आपल्या विश्‍वासाचा पूर्ण करणारा’ परिपूर्ण केला गेला
  • त्याने देवाच्या वचनावर विश्‍वास ठेवला नाही का?
  • येशू, अनुकरण करण्यास विश्‍वासाचा नमुना
  • देवाच्या अभिवचनांवर विश्‍वास ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • तुम्हाला सुवार्तेवर खरोखर विश्‍वास आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • विश्‍वास—आपल्याला बळ देणारा गुण
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • “आमचा विश्‍वास वाढवा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 १०/१५ पृ. १२-१५

येशूने देवावर विश्‍वास ठेवला असेल का?

त्रैक्यवाद्याची एक जटिल समस्या

“येशूने देवावर विश्‍वास ठेवलाच कसा असेल? तो देव आहे; कोणावरही विसंबून न राहता त्याला सर्व काही माहीत आहे व सर्व काही दिसते. इतरांवर अवलंबून असणे व अमूर्त गोष्ट स्वीकारणे यालाच विश्‍वास म्हणतात तेव्हा देव-येशूने विश्‍वास करणे अशक्य आहे.”

हे कॅथलिक धर्मातील प्रमुख मत आहे असे फ्रेंच ईश्‍वरशास्त्रवेत्ता झॉक गीये म्हणतात. या स्पष्टीकरणाने तुम्ही अचंबित झालात का? तुम्हाला कदाचित वाटले असेल की, येशू सर्व गोष्टींमध्ये ख्रिश्‍चनांसाठी एक उदाहरण असल्यामुळे, विश्‍वासाच्या बाबतीतही त्याने एक नमुना असले पाहिजे. तुम्हाला तसे वाटल्यास, ख्रिस्ती धर्मजगतातील त्रैक्याच्या शिकवणीचा तुम्ही विचारच केला नाही.

येशूच्या विश्‍वासाचा प्रश्‍न कॅथलिक, प्रोटस्टंट आणि कर्मठ ईश्‍वरशास्त्रवेत्त्यांसाठी एक गूढ आहे कारण ते, त्रैक्य “ख्रिस्ती विश्‍वास आणि जीवनाचे केंद्रीय गूढ” आहे असा विश्‍वास बाळगतात.a परंतु सर्वच लोक ख्रिस्ताच्या विश्‍वासाला नाकारत नाहीत. झॉक गीये ठामपणे म्हणतात की, “येशूकडे विश्‍वास होता हे न ओळखणे अशक्य आहे,” तरीही गीये कबूल करतात की, त्रैक्य शिकवणीनुसार हे “विरोधाभासयुक्‍त विधान” आहे.

फ्रेंच जेसूट झॉन गॅलो आणि त्याच्यासारखे बहुतेक ईश्‍वरशास्त्रवेत्ता, उघडपणे म्हणतात की, “खरा देव आणि खरा मानव असताना, . . . ख्रिस्त स्वतःमध्ये विश्‍वास करू शकत नाही.” “स्वतःमध्ये नव्हे तर दुसऱ्‍यावर भाव ठेवणे याला विश्‍वास म्हणतात,” अशी ला सिविल्टा कॅटोलिका नावाचे नियतकालिक नोंद करते. तर मग त्रैक्याची शिकवण येशूच्या विश्‍वासाला ओळखण्यास बांध घालणारी अडचण आहे, कारण या दोन्ही कल्पना स्पष्टपणे एकमेकांचे खंडन करतात.

ईश्‍वरशास्त्रवेत्त्यांचे म्हणणे आहे की, “शुभवर्तमाने कधीही येशूच्या विश्‍वासाविषयी सांगत नाहीत.” वस्तुतः, ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांमध्ये वापरलेल्या पिसटियो (मानणे, विश्‍वास ठेवणे) व पिसटिस (विश्‍वास) या संज्ञा, येशूचा त्याच्या स्वर्गीय पित्यावरील विश्‍वासाऐवजी, सर्वसामान्यपणे देव किंवा ख्रिस्तावरील शिष्यांच्या विश्‍वासाला सूचित करतात. मग यावरून आपण असा निष्कर्ष काढावा का की, देवाच्या पुत्राठायी विश्‍वासच नव्हता? त्याने जे काही केले व म्हटले त्यातून आम्ही काय समजावे? शास्त्रवचने काय म्हणतात?

विश्‍वासाविना प्रार्थना?

येशू, निरंतर प्रार्थना करणारा व्यक्‍ती होता. त्याने प्रत्येक प्रसंगी प्रार्थना केली—त्याचा बाप्तिस्मा झाला तेव्हा (लूक ३:२१); त्याचे १२ शिष्य निवडण्याआधी संपूर्ण रात्र (लूक ६:१२, १३); तसेच पेत्र, योहान आणि याकोब या प्रेषितांसोबत असताना डोंगरावरील त्याचे चमत्कारिकरीत्या रुपांतर होण्याआधी त्याने प्रार्थना केली. (लूक ९:२८, २९) तो प्रार्थना करत असताना त्याच्या शिष्यांपैकी एकाने त्याला विचारले, ‘आम्हाला प्रार्थना कशी करावी ते शिकवा.’ यास्तव त्याने त्यांना प्रभूची प्रार्थना (“आमच्या स्वर्गातील बापा”) शिकवली. (लूक ११:१-४; मत्तय ६:९-१३) तो एकटाच व पहाटे खूप वेळपर्यंत (मार्क १:३५-३९); संध्याकाळी, त्याच्या शिष्यांना घरी पाठवल्यावर एका डोंगरावर (मार्क ६:४५, ४६); त्याच्या शिष्यांसोबत आणि त्याच्या शिष्यांसाठी प्रार्थना केली. (लूक २२:३२; योहान १७:१-२६) होय, प्रार्थना येशूच्या जीवनाचा प्रमुख भाग होती.

चमत्कार करण्याआधी उदाहरणार्थ, त्याचा मित्र लाजारचे पुनरूत्थान करण्याआधी त्याने प्रार्थना केली: “हे बापा, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे आभार मानतो; मला माहीत आहे की, तू सर्वदा माझे ऐकतोस, तरी जो लोकसमुदाय सभोवती उभा आहे त्याच्याकरिता मी बोललो; ह्‍यासाठी की, तू मला पाठविले आहे असा त्यांनी विश्‍वास धरावा.” (योहान ११:४१, ४२) त्याचा पिता त्याच्या प्रार्थनेचे उत्तर देईल ह्‍या त्याच्या खात्रीवरून त्याच्या विश्‍वासाचे सामर्थ्य सूचित होते. देवाला प्रार्थना आणि त्याच्यावर विश्‍वास बाळगण्यामधील संबंध हा, ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना काय म्हटले त्यातून स्पष्ट दिसतो: “तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्‍वास धरा.”—मार्क ११:२४.

जर येशूकडे विश्‍वासच नव्हता तर त्याने देवाला प्रार्थना का केली? येशू एकाच वेळी मानव आणि देव होता ही ख्रिस्ती धर्मजगताची त्रैक्याची अशास्त्रवचनीय शिकवण बायबलच्या संदेशाला दुर्बोध करते. बायबलची सरळता आणि सामर्थ्य समजून घेण्यापासून ती लोकांना परावृत्त करते. मनुष्य येशूने कोणाचा धावा केला? स्वतःचा? तो देव होता हे त्याला माहीत नव्हते का? शिवाय जर तो देव होता आणि त्याला ते माहीत होते, तर त्याने प्रार्थना का केली?

येशूने त्याच्या पार्थिव जीवनाच्या शेवटल्या दिवशी केलेल्या प्रार्थना आम्हाला त्याच्या स्वर्गीय पित्यावरील त्याच्या दृढ विश्‍वासाची खोल सूक्ष्मदृष्टी प्रदान करतात. आशा प्रकट करून व खात्रीदायक अपेक्षेसह त्याने विनवणी केली: “तर आता हे माझ्या बापा, जग होण्यापूर्वी जे माझे गौरव तुझ्याजवळ होते त्याच्यायोगे तू आपणाजवळ माझे गौरव कर.”—योहान १७:५.

त्याच्या सर्वात कठीण परीक्षा आणि त्याचा मृत्यू अगदी जवळ येऊन ठेपलेला आहे हे माहीत असल्यामुळे, त्या रात्री तो जैतूनाच्या डोंगरावरील गेथशेमाने बागेत होता तेव्हा “तो खिन्‍न व अति कष्टी होऊ लागला,” व म्हणाला: “माझा जीव मरणप्राय, अति खिन्‍न झाला आहे.” (मत्तय २६:३६-३८) मग त्याने गुडघे टेकून प्रार्थना केली: “हे माझ्या बापा, होईल तर हा प्याला माझ्यावरून टळून जावो; तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” त्यानंतर ‘स्वर्गातून एक देवदूत आला आणि त्याने त्याला शक्‍ती दिली.’ देवाने त्याची प्रार्थना ऐकली. त्याच्या भावनांची तीव्रता आणि परीक्षेच्या असह्‍यतेमुळे “रक्‍ताचे मोठमोठे थेंब भूमीवर पडावे असा त्याचा घाम पडत होता.”—लूक २२:४२-४४.

येशूचे दुःख, त्याला शक्‍तीची गरज असणे आणि त्याच्या विनवण्या काय सूचित करतात? झॉक गीये लिहितात, “एक गोष्ट निश्‍चित आहे की, येशूने प्रार्थना केली आणि प्रार्थना त्याच्या जीवनातील व त्याच्या कृत्यांचा सर्वात महत्त्वपूर्ण पैलू आहे. लोक प्रार्थना करतात त्याप्रमाणेच त्याने प्रार्थना केली, शिवाय त्याने लोकांप्रीत्यर्थ प्रार्थना केल्या. मनुष्याच्या प्रार्थना विश्‍वासाविना अकल्पनीय आहेत, तेव्हा येशूच्या प्रार्थना विश्‍वासाविना कल्पनीय असू शकतात का?”

येशूच्या मृत्यूच्या काही काळाआधी वधस्तंभावर खिळलेले असताना, त्याने मोठ्याने दाविदाच्या एका स्तोत्राचा संदर्भ घेतला. मग, विश्‍वासाने, मोठमोठ्याने ओरडून शेवटची विनवणी केली: “हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो.” (लूक २३:४६; मत्तय २७:४६) एक इटालियन अंतरसांप्रदायिक भाषांतर, पॉरोलॉ डेल सिन्योरे म्हणते की, येशूने ‘त्याचे जीवन’ पित्याला सोपविले.

झॉक गीये असे विवेचन मांडतात की, “इस्त्राएलच्या स्तोत्रांच्या संदर्भाद्वारे त्याच्या पित्याकडे आकान्त करणाऱ्‍या वधस्तंभावर खिळलेल्या ख्रिस्ताची माहिती देऊन शुभवर्तमानाचे लेखक आम्हाला याची खात्री देतात की तो आक्रोश, त्या एकुलत्या एका पुत्राचा आक्रोश तो यातनामय आक्रोश, पूर्ण भरवश्‍याचा आक्रोश, विश्‍वासाचा आक्रोश, विश्‍वासातील मृत्यूचा तो आक्रोश आहे.”

विश्‍वासाचा हा स्पष्ट आणि नाट्यमय पुरावा समोर असताना, काही ईश्‍वरशास्त्रवेत्ता विश्‍वास आणि “भरवसा” या दोहोंमध्ये फरक करण्याचा प्रयत्न करतात. परंतु असा फरक शास्त्रवचनांवर आधारलेला नसतो.

परंतु येशूने, ज्या कठीण परीक्षांचा सामना केला त्यातून त्याच्या विश्‍वासाबद्दल नक्की काय प्रकट होते?

‘आपल्या विश्‍वासाचा पूर्ण करणारा’ परिपूर्ण केला गेला

प्रेषित पौलाने इब्रीकरांना लिहिलेल्या त्याच्या पत्राच्या ११ व्या अध्यायात, ख्रिस्त-पूर्व काळातील विश्‍वासू पुरूष आणि स्त्रियांच्या जमावाचा उल्लेख केला. तो विश्‍वासाचा सर्वात महान आणि परिपूर्ण उदाहरण असलेल्या येशूकडे निर्देश करून अशी समाप्ती करतो: “आपण आपल्या विश्‍वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्‍याच्याकडे पाहत असावे; जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला . . . तुमची मने खचून तुम्ही थकून जाऊ नये म्हणून ज्याने आपणा विरूद्ध पातक्यांनी केलेला इतका विरोध सहन केला, त्याच्याविषयी विचार करा.”—इब्रीयांस १२:१-३.

बहुसंख्य ईश्‍वरशास्त्रवेत्ते म्हणतात की हे वचन “येशूच्या व्यक्‍तिगत विश्‍वासासंबंधी” काहीच सांगत नाही, तर “विश्‍वासाचा जनक किंवा संस्थापक” या नात्याने त्याच्या भूमिकेविषयी सांगते. या वाक्यात येणारी टेलियोटस्‌ ही ग्रीक संज्ञा, परिपूर्ण करणारा कोणीतरी, काही तरी जाणणारा किंवा पूर्ण करणारा याला सूचित करते. “पूर्ण करणारा” या नात्याने, येशूच्या पृथ्वीवर येण्याने बायबल भविष्यवाण्यांची पूर्णता झाली व अशाप्रकारे विश्‍वासासाठी आणखी भक्कम पाया उभारला या अर्थाने त्याने विश्‍वास पूर्ण केला. परंतु याचा अर्थ असा होता का की त्याच्याजवळ विश्‍वास नव्हता?

तुम्हाला पृष्ठ १५ वरील इब्रीयांस लिहिलेल्या पत्राचा चौकोन दिसतो त्यावरून काहीच शंका राहत नाही. येशू त्याच्या दुःखाद्वारे आणि त्याच्या आज्ञाधारकतेद्वारे परिपूर्ण केला गेला. परिपूर्ण असतानाही, त्याच्या अनुभवांनी त्याला परिपूर्ण आणि सर्व गोष्टींमध्ये तसेच खऱ्‍या ख्रिश्‍चनांच्या उद्धारासाठी तो प्रमुख याजक म्हणून पात्र होण्यास विश्‍वासात देखील समग्र केले. त्याने त्याच्या पित्याला, “मोठा आक्रोश करीत व अश्रु गाळीत” विनवले, तो देवाला “विश्‍वसनीय” होता, आणि त्याच्याजवळ ‘ईश्‍वरी भय’ होते. (इब्रीयांस ३:१, २; ५:७-९) तो “सर्व प्रकारे” अगदी “आपल्याप्रमाणे पारखलेला होता,” असे इब्रीयांस ४:१५ म्हणते, म्हणजे कोणत्याही विश्‍वासू ख्रिश्‍चनाच्या विश्‍वासाची परीक्षा होते त्याप्रमाणे त्याची देखील ‘नाना प्रकारच्या परीक्षांमध्ये’ पारख झाली. (याकोब १:२, ३) येशूला त्याच्या शिष्यांच्या “प्रमाणेच” त्याच्या विश्‍वासाची पारख न करता परीक्षा घेतली असेल असे समजणे तर्कशुद्ध आहे का?

विनवण्या, आज्ञाधारकता, दुःख, परीक्षा, विश्‍वासूपणा आणि ईश्‍वरी भय, या सर्व गोष्टी येशूच्या संपूर्ण विश्‍वासाला साक्षांकित करतात. तो स्वतःच्या विश्‍वासामध्ये पूर्ण झाल्यावर ‘आमच्या विश्‍वासाचा पूर्ण करणारा’ झाला असे ते सूचित करतात. स्पष्टतः, त्रैक्याची शिकवण दावा करते त्याप्रमाणे तो देव जो पुत्र नव्हता.—१ योहान ५:५.

त्याने देवाच्या वचनावर विश्‍वास ठेवला नाही का?

त्रैक्याची शिकवण ईश्‍वरशास्त्रवेत्त्यांच्या विचारसरणीला अशारीतीने आकार देते की, ते अगदी एका आत्यंतिक दृष्टिकोनाला येऊन पोहंचतात व म्हणतात की, “देवाचा शब्द या नात्याने येशू केवळ त्या शब्दाची घोषणा करू शकतो” व म्हणूनच तो, “देवाच्या वचनावर आणि त्यातील संदेशावर विश्‍वास करू शकत नाही.”—झीझु एल सिन्योर, ख्रिस्ती चर्चविषयक संमती असलेले अँजिलो अमॉटो यांचे पुस्तक.

तरीही, येशूने वारंवार शास्त्रवचनांचा संदर्भ घेतला यावरून काय दिसून येते? त्याची परीक्षा होत असताना, त्याने तीन वेळा शास्त्रवचनांचा संदर्भ घेतला. त्याच्या तिसऱ्‍या उत्तराने सैतानाला सांगितले की, येशू केवळ देवाची उपासना करीत होता. (मत्तय ४:४, ७, १०) पुष्कळ प्रसंगी येशूने स्वतःस लागू होणाऱ्‍या भविष्यवाण्या, त्या पूर्ण होतील असा विश्‍वास ठेवून वर्तिल्या. (मार्क १४:२१, २७; लूक १८:३१-३३; २२:३७; पडताळा लूक ९:२२; २४:४४-४६.) या सर्व परीक्षणावरून आम्ही असा निष्कर्ष काढू शकतो की येशूला त्याच्या पित्याने प्रेरित केलेल्या शास्त्रवचनांची माहिती होती, त्याने विश्‍वासाने त्यांचे पालन केले व त्याला त्याच्या परीक्षा, दुःख, मृत्यू आणि पुनरुत्थानाविषयीच्या भविष्यवाण्यांच्या पूर्णतेवर पूर्ण भाव होता.

येशू, अनुकरण करण्यास विश्‍वासाचा नमुना

येशूला त्याच्या पित्यासोबत निष्ठा कायम राखण्यासाठी व ‘जगाला जिंकण्यासाठी’ शेवटपर्यंत विश्‍वासासंबंधीचे सुयुद्ध लढावे लागले. (योहान १६:३३) विश्‍वासाविना अशाप्रकारचा विजय प्राप्त करणे अशक्य आहे. (इब्रीयांस ११:६; १ योहान ५:४) त्या विजयी विश्‍वासामुळे, तो त्याच्या विश्‍वासू शिष्यांसाठी एक नमुना होता. त्याचा सत्य देवावर निश्‍चितच विश्‍वास होता.

[तळटीपा]

a त्रैक्य शिकवणीच्या निराधारतेची आणखी विस्तारित चर्चा वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्यूयॉर्क, इंका. ने प्रकाशित केलेल्या तुम्ही त्रैक्य मानावे का? या माहितीपत्रकात मिळू शकेल.

[१५ पानांवरील चौकट]

“पूर्ण करणारा” येशू, परिपूर्ण केला गेला

इब्रीयांस २:१०: “कारण ज्याच्यासाठी सर्व काही आहे व ज्याच्याद्वारे सर्व काही आहे, त्याने पुष्कळ पुत्रांना गौरवात आणताना त्यांच्या तारणाचा जो उत्पादक त्याला दुःखसहनाच्या द्वारे परिपूर्ण करावे हे त्याला उचित होते.”

इब्रीयांस २:१७, १८: “म्हणून त्याला सर्व प्रकारे आपल्या ‘बंधूसारखे’ होणे अगत्याचे होते, ह्‍यासाठी की, लोकांच्या पापांबद्दल प्रायश्‍चित्त करण्याकरिता त्याने स्वतः देवासंबंधीच्या गोष्टींविषयी दयाळू व विश्‍वसनीय प्रमुख याजक व्हावे. कारण ज्याअर्थी त्याने स्वतः परीक्षा होत असता दुःख भोगिले त्याअर्थी ज्यांची परीक्षा होत आहे त्यांना साहाय्य करावयास तो समर्थ आहे.”

इब्रीयांस ३:२: “जसा, मोशे देवाच्या सबंध घरात विश्‍वसनीय होता तसा तोहि त्याला ज्याने नेमिले त्याच्याशी विश्‍वसनीय होता.”

इब्रीयांस ४:१५: “आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूति वाटत नाही, असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता तरी निष्पाप राहिला.”

इब्रीयांस ५:७-९: “आपल्याला मरणातून तारावयास जो समर्थ आहे त्याच्याजवळ त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसात, मोठा आक्रोश करीत व अश्रु गाळीत प्रार्थना व विनवणी केली, आणि ती त्याच्या सद्‌भक्‍तीमुळे ऐकण्यात आली; तो पुत्र असूनहि त्याने जे दुःख सोसले तेणेकरून तो आज्ञाधारकपणा शिकला; आणि परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्‍या सर्वांचा युगानुयुगीच्या तारणाचा कर्ता झाला.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा