निर्वासित असतानाही, देवाची सेवा करण्यात आनंदी
युद्धे, अन्नटंचाई, संकटे आणि अशांतता. काही लोकांसाठी ह्या गोष्टी केवळ ठळक बातम्या आहेत. इतर अनेकांसाठी त्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहेत. विश्वव्यापी ख्रिस्ती संघटनेचा एक भाग असल्यामुळे, यहोवाच्या साक्षीदारांना याची पूर्णपणे जाणीव आहे की एखादे युद्ध पेटले किंवा कोणते संकट कोसळले तर त्यांच्या आंतरराष्ट्रीय बंधुत्वाचा एखादा भाग तरी दुःखात असू शकतो. लोकांना त्यांचे जीव वाचवण्यासाठी पळावयाचे असते तेव्हा आमच्या बांधवांनाही कदाचित तेच करावे लागत असेल.
अनेक वर्षांपासून ॲफ्रिकेतील पुष्कळ राष्ट्रांतील साक्षीदारांना अशा अनुभवांचा सामना करावा लागला आहे. अनेकांना त्यांना जे काही सामान नेता येईल ते भरून दुसरीकडे कोठेतरी आश्रय घ्यावा लागला. थोडक्यांकडे परिवहनाची, कदाचित एखाद्या सायकलचीच सोय असेल, तरीसुद्धा, बहुतांश लोकांना—अनेक दिवस, आणि आठवडे—त्यांच्या इष्ट स्थानी पोहंचण्यासाठी चालत राहावे लागले.
एक असेच इष्ट स्थान, सेंट्रल ॲफ्रिकन रिपब्लीक मधील म्बोकी नावाचे लहानसे गाव होते. अनेक वर्षांपासून पुरूष व स्त्रिया, तरुण आणि वृद्ध हजारोंच्या संख्येने आले आहेत. त्यांच्यामध्ये आमचे पुष्कळ ख्रिस्ती बंधू आणि भगिणी आणि आस्थेवाईक जणही होते. अर्थात, सेंट्रल ॲफ्रिकन रिपब्लीकची राजधानी, बांगुई येथील वॉचटावर संस्थेच्या शाखा दप्तरातील सहख्रिश्चनांची या निर्वासितांना मदत देण्यासाठी त्यांना भेटण्याची फार इच्छा होती. संस्थेच्या एका प्रतिनिधीला पाच वेळा १,१३० किलोमिटर दूर असलेल्या बांगुई येथील उदार मनाच्या साक्षीदारांनी पुरवेलेले पैसे, अन्न, वस्त्र आणि औषधेही घेऊन जाण्यासाठी पाठवले गेले. उदार मनाने मदत पुरवणारे बांधव गरीब होते तरीही, त्यांना जे काही देता येत होते त्याबद्दल ते संतुष्ट होते.
म्बोकीकडे प्रस्थान
आणखी काही करता येते का, व निर्वासितांना आध्यात्मिक मदत कशी देता येईल हे शाखा दप्तरातील बांधवांना पाहावयाचे होते. यास्तव, मी व माझ्या पत्नीने चार चाकी लँड क्रुसरने आमचा प्रवास सुरू केला. आमच्यासोबत खास पायनियर सिंप्फोऱ्यन आणि त्याची पत्नी देखील होते. सिंप्फोऱ्यनला रस्ता चांगला माहीत होता व तो म्बोकीतील निर्वासितांची झांडे भाषा चांगली बोलतो. तेथे पोहंचण्यासाठी आम्हाला दगदगीचे पूर्ण चार दिवस लागले.
शेवटचा ४०० किलोमीटरचा रस्ता, ग्रामीण परिसर आणि उंच बाओबाब वृक्षांच्या रम्य भागामधून जातो. आम्ही अनेक लहानलहान खेड्यांतून अनेकवेळा पार झालो. या रस्त्यावरून जाताना, माझ्या पत्नीने पूर्ण ५० पूल मोजले—त्यांच्यातील बहुतेक पूल अगदीच दयनीय स्थितीत होते व काहींवरून जाणे तर अशक्यच होते. आम्ही लाकडे आणि कुजलेल्या तुळईंच्या साहाय्याने काही पूल दुरूस्त करून, खेचयंत्राला कार जोडली, प्रार्थना केली आणि काळजीपूर्वकतेने पूल ओलांडण्यास सुरवात केली. जवळपास एखादे लहानसे खेडे असल्यास, थोडे पैसे मिळतील म्हणून तरुण मुले मदत करण्यासाठी धावत येत. आम्हाला आश्चर्य वाटत असे की, त्यांच्या जवळ नेहमी पुलावरून खाली गवतात व झुडपांमध्ये पडलेले ओंडके आणि फळ्या होत्या. हे ओंडके आणि फळ्या त्यांनीच कदाचित पुलावरून काढून गरजू प्रवाश्यांसाठी बाजूला ठेवल्या तर नसतील असे आम्हाला वाटले.
तीन प्रसंगी आम्ही त्या तरुणांची मदत घेतली नाही, कारण ते पूल ओलांडण्यासाठी अतिशय घातक होते. म्हणून आम्ही आमची गाडी खाडीतून, खडकांवरून, चढांवरून नेत पुन्हा रस्त्यावर आणली. तेव्हा कोरडे हवामान होते म्हणून बरे, नाहीतर आम्हाला आमचा प्रवास हेलिकॉप्टर शिवाय करताच आला नसता!
म्बोकी कशाप्रकारचा देश असेल? अनंत “पिस्ट” वरून जाताना आमच्या मनात सारखा हा विचार येत होता. “पिस्ट” हा फ्रेंच शब्द, मध्य ॲफ्रिकन प्रजासत्ताकात, रस्ता, किंवा रेती, खडक, व दगडविटांच्या तुकड्यांनी बनवलेल्या व हजार खड्डे असलेल्या मार्गासाठी वापरला जातो.
चौथ्या दिवशी, सहज दुपारी सिंप्फोऱ्यनने काही गवताच्या झोपड्या दाखवल्या ज्यांच्या आजूबाजूला पोपईची झाडे आणि कासावाची शेती होती. “वोइलॉ! इथूनच तर म्बोकी सुरू होते,” असे तो ओरडून म्हणाला. आम्ही जे पाहिले त्याचा आमच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. “हेच का म्बोकी? मग छावण्या कोठे आहेत?” आम्ही विचारले. कारण आम्ही जे पाहत होतो त्या काही छावण्या नव्हत्या, फक्त आजूबाजूला घरे होती. त्या लहानलहान पण गवताच्या छताच्या स्वच्छ झोपड्या होत्या. शिवाय सगळीकडे झाडेझुडपेही होती. तेथील लोक त्यांच्या घराजवळच शेती करतात. आम्ही अपेक्षिले होते त्यासारख्या छावण्या म्बोकीत नव्हत्या; ते जवळजवळ ३५ किलोमीटर लांबीचे एक मोठे खेडे होते.
बांधवांना भेटणे
आम्ही येणार असल्याचे म्बोकीतील बांधवांना ठाऊक होते. परंतु आम्हाला प्रवास करायला पाच दिवस लागतील असे त्यांना वाटले होते. आमची कार आल्याचा आवाज त्यांना ऐकू आल्यावर ते धावतपळत आले. पुरूष, स्त्रिया आणि मुले त्यांच्या झोपड्यातून, अंगणातून व शेतातून आमचे स्वागत करावयास धावत आले. सर्वजण स्मित करत, हसत होते आणि शक्य असल्यास पुष्कळ वेळा हस्तांदोलन करत होते. काखेत मुले घेऊन आया देखील आल्या होत्या. ते सर्वजण आम्हाला नमस्ते करू इच्छित होते, त्या सर्वांनी आमचे खरोखर मनःपूर्वक स्वागत केले.
माझी पत्नी आणि मी त्या क्षणी भाषेच्या अडथळ्यामुळे जास्त काही बोलू शकलो नाही. आम्ही तुटकी फ्रेंच, सांगो, थोडी इंग्रजी आणि अरेबिक बोलायचा प्रयत्न करत होतो. आमच्या बहुतेक बांधवांना झांडे भाषा, बोलता तसेच लिहिता व वाचता येते. आमच्या भेटीच्या उद्देशाचा कार्यक्रम सिंप्फोऱ्यनला भाषांतरीत करावा लागला.
आणखी थोड्या अंतरावर पुढे गेल्यावर आम्ही राज्य सभागृहात गेलो. म्बोकी येथील कोणत्यातरी धर्माच्या निर्वासितांनी बांधलेले ते पहिले “चर्च” होते. तेथे आणखी दुसऱ्या बांधवांनी, त्यांच्या मुलांनी व आस्थेवाईकांनी आम्हाला हस्तांदोलन केले. शेजारची मुले देखील बांधवांसोबत, आम्हाला हस्तांदोलन करण्यासाठी आली.
आमच्या बांधवांनी त्यांच्या पाहुण्यांसाठी म्हणजे, आमच्यासाठी दोन लहानशी घरे बनवली होती. ती खूपच स्वच्छ होती. आमच्यासाठी स्वच्छ पाण्याने भरलेल्या बादल्या तयार ठेवल्या होत्या. आम्ही आमच्यासोबत स्वतःचे अन्न आणि पिण्याचे पाणी आणले होते, कारण आम्हाला वाटले, की तेथे या गोष्टींची कदाचित टंचाई असेल, शिवाय आमच्या बांधवांना त्रास द्यायची आमची इच्छा नव्हती. गाडीतले सामान उतरवत असताना, एका तरुण मुलीने आम्हाला येऊन विचारले की त्या रात्री जेवणाला आम्हाला कोंबडी भाजलेली की सॉसमध्ये शिजवलेली हवी? आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला कारण आम्ही त्याची अपेक्षा केली नव्हती. ते त्यासोबत काय खाणार याची आम्ही विचारपूस केली असताना उत्तर मिळाले: कासावा. तेव्हा आम्ही मसालेदार सॉसमध्ये शिजवलेली कोंबडी खायचे ठरवले. त्या रात्री आम्हाला लागलेली कडकडून भूक तृप्त झाली. परंतु ते आम्हाला दररोज—दुपारी आणि संध्याकाळी काही ना काही तरी खावयास देतच होते. त्यांच्या स्वतःसाठीच पुरेसे नव्हते तरीही हे निर्वासित आमची इतकी काळजी घेऊन आम्हाला खावयास देतात यावर आमचा विश्वासच बसेना.
छोटीशी आनंदी मंडळी
येथे आम्ही एका एकाकी ठिकाणी आलो होतो परंतु आमच्यासोबत २१ बांधव होते. सुरवातीला येथे बाप्तिस्मा प्राप्त केवळ दोन बांधव आले होते. इतर जण आस्थेवाईक होते. त्यांनी अभ्यास चालू ठेवला आणि मागील दोन वर्षांमध्ये बाप्तिस्मा घेतला होता. आमच्या भेटीदरम्यान जवळच असलेल्या नदीत आणखी चार जणांचा बाप्तिस्मा झाला.
सर्वात विलक्षणीय उदाहरण फॉस्टिनोचे आहे. म्बोकीत येण्याआधी, त्याने एका मित्राकडून बायबल सत्याच्या मूलभूत गोष्टी शिकून घेतल्या. फॉस्टिनो जे काही शिकत होता त्याचे महत्त्व त्याने समजले. लवकरच तो व त्याचा मित्र इतरांना या गोष्टी सांगू लागले. परंतु तेव्हा त्यांना विरोध झाला व त्यांनी आपल्या धर्मामुळे “लोकांच्या भावना चेतविल्या” या आरोपाखाली त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. तुरुंगात असताना, फॉस्टिनोच्या मित्राने भीतीपोटी प्रचाराचे कार्य सोडून दिले आणि त्याची सुटका झाली. दोन महिन्यांनंतर फॉस्टिनोची कोर्टात चौकशी करण्यात आली. परंतु त्याच्यावर लावलेले आरोप खोटे होते हे स्पष्ट झाल्यावर त्याची सुटका झाली. त्याच्या भागात युद्ध चालू झाले तेव्हा फॉस्टिनो मध्य ॲफ्रिकन प्रजासत्ताक, येथे पळून आला व तेथे तो बांधवांना भेटला आणि त्याने त्याचा बायबल अभ्यास पुढे चालू केला. जुलै १९९१ मध्ये त्याचा बाप्तिस्मा झाला आणि १९९२ मध्ये त्याने नियमित पायनियर म्हणून पूर्ण वेळेची सेवा स्वीकारली.
म्बोकी येथील त्या छोट्याशा आनंदी आणि स्नेही मंडळीत आता एक खास पायनियर आणि २१ प्रचारक आहेत. इंग्रजी बोलणारे दोन बांधव वडील म्हणून कार्य करतात व बांगुई येथील शाखा दप्तरासोबत चांगल्याप्रकारे संपर्क साधू शकतात. आमचे निर्वासित बांधव अतिशय वाईट, दयनीय स्थितीत असतील अशी आम्ही अपेक्षा केली होती; परंतु येथे तर तसे काही नव्हते. भौतिकरीत्या हे बांधव गरीब असले तरी कोणतीही तक्रार, चिंता वा कुरकूर करत नव्हते. बांधव येथे राहावयास आल्यापासून त्यांनी त्यांच्या झोपड्या व घरे बांधली आणि शेती व कुकूटपालन चालू केले. त्यांच्याकडे पूर्वीपेक्षा आता कमी असले तरी ते जिवंत व सहख्रिश्चनांसोबत आहेत.
म्बोकी येथे १७,००० व २०,००० च्या आसपास निर्वासित आहेत, शिवाय प्रत्येक महिन्याला आणखी येतच राहतात. यास्तव, आमच्या बांधवांना क्षेत्रसेवेसाठी विस्तृत क्षेत्र आहे. आम्ही त्यांच्यासोबत प्रचारकार्याला गेलो आणि ते खरोखरच मनोरंजक होते. ते बहुतेकवेळा झांडे भाषेतील बायबल वापरतात. या बायबलच्या भाषांतरात इब्री शास्त्रवचनात आणि ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनाच्या पुष्कळ ठिकाणी देवाचे नाव आहे. या लोकांसाठी देव केवळ “म्बोली” (झांडेमध्ये “देव”) नव्हे तर देवाचे व्यक्तीगत नाव ते उच्चारतात त्याप्रमाणे “येकोवॉ” आहे. “म्बोली येकोवॉ” ही एक सर्वसामान्य अभिव्यक्ती आहे. दुसऱ्या अनेक ॲफ्रिकन भाषांतील प्रोटस्टंट भाषांतर हे योग्य अनुवाद पाळत नाहीत; उलट “यहोवा” ऐवजी “न्झॉपॉ,” “न्झाँबे,” किंवा देवासाठी असलेली इतर ॲफ्रिकन नावे वापरतात.
येशूच्या भविष्यवाणीच्या एकवाक्यतेत, राज्याची सुवार्ता संपूर्ण जगभरात, म्बोकीमध्ये सुद्धा प्रचार केली जात आहे. (मत्तय २४:१४) त्या मंडळीला आता त्यांना हव्या असलेल्या सर्व भाषांमध्ये बायबल, पुस्तके, नियतकालिके, पुस्तिका आणि पत्रिकांच्या साठ्यांचा पुरवठा केला जातो. कदाचित भविष्यात, झांडे भाषेत आणखी प्रकाशने उपलब्ध होतील.
कायमस्वरूपी घराची वाट पाहणे
पहिल्या संध्याकाळी, आम्ही “पूर्व युरोपातील आनंदी प्रतिनिधी यहोवाची स्तुती करतात” हा संस्थेचा स्लाईड शो कार्यक्रम सादर केला. त्यानंतरच्या रात्री “अंतसमयात पुष्कळांना धार्मिकतेकडे आणणे” हा कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम, निरभ्र आकाश व रूपेरी चंद्राखाली राज्य सभागृहाच्या जवळील उघड्या मैदानावर झाला. वातावरण किती छान होते! ह्या स्लाईडज् पाहण्यासाठी शेकडो लोक आले आणि आमच्या बांधवांना अतिशय आनंद झाला व लोकांसाठी काही तरी खास सादर करण्यास अभिमान वाटत होता.
सोमवारी आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाची तयारी केली. हा आणखी चार दिवसांचा प्रवास त्याच रस्त्यावरून आणि तेच ५० पूल पार करून करावा लागणार होता. एका बहिणीने प्रवासासाठी काही अन्न—लसणाची फोडणी दिलेल्या भाजलेल्या आणखी दोन कोंबड्या—तयार करण्याचा आग्रह धरला. लँड क्रुसरमधून प्रवास करताना त्यांचा काय खमंग वास येत होता. दुपारी आम्ही एका झुडपाखाली ती भाजलेली कोंबडी खाण्यासाठी बसलो. खाता खाता, म्बोकीतील आमच्या बांधवांचा आम्ही विचार करत होतो. निर्वासित असे राहावयास भाग पडत असले तरी ते यहोवाची सेवा विश्वासाने करत आहेत व देवाने अभिवचन दिलेल्या नव्या पृथ्वीवर कायमस्वरूपी शांतीच्या घराची वाट पाहत आहेत. (२ पेत्र ३:१३)—सौजन्याने.