राज्य घोषकांचा वृत्तांत
“सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल”
पहिल्या शतकात, इफिसमध्ये, जाहीरपणे जादूची पुस्तके जाळण्याद्वारे ‘जादूटोण्यावर’ विश्वास ठेवणाऱ्यांनी ख्रिस्ती संदेशाबद्दल प्रतिक्रिया दाखवली. (प्रेषितांची कृत्ये १९:१९) या सर्व पुस्तकांची एकूण किंमत ही ५०,००० चांदीची नाणी होती. जर पवित्र शास्त्र अहवाल याचा उल्लेख दीनार, रोमी चांदीचे नाणे असा करत असेल तर त्यांची किमान किंमत ३७,००० डॉलर एवढी असली असती!
एकेकाळी भूतविद्येशी संबंधित साहित्य बाळगणाऱ्यांनी; आता प्राचीन इफिसकरांप्रमाणे निर्धार प्रगट केला. कॅनडा येथील पुढील अनुभवाकडे लक्ष द्या.
सुमारे पाच वर्षांपूर्वी, यहोवाच्या साक्षीदारांपैकी एक बहीण घरोघरचे प्रचारकार्य करत होती. त्यावेळी नोरा या स्त्रीशी दरवाजात बोलताना तिने तिला अक्षरशः आपल्या घरात खेचले. प्रदीर्घ वर्षांच्या आध्यात्मिक संशोधनानंतर, नोराने शेकडो धार्मिक आणि पिशाच्चवादी पुस्तकांचा संग्रह केला होता. पण, मृतांसाठी आशा या विषयी पवित्र शास्त्र काय सांगते, हे जाणून घेण्याची तिची इच्छा होती. साक्षीदार सेविकेने तिला मृत प्रिय जनांसाठी कोणती आशा? ही पत्रिका सादर केली. नोराच्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली, तसेच तिने टेहळणी बुरुज आणि अवेक! या नियतकालिकांसाठी वर्गणी सुद्धा स्वीकारली.
तिच्या स्थानांतरामुळे तिचा यहोवाच्या साक्षीदारांशी असलेला संपर्क तुटला. तथापि, तिला टपालाद्वारे तिच्या नवीन पत्त्यावर नियतकालिके नियमितपणे मिळत होती. नियतकालिकांमध्ये उल्लेखलेल्या काही पवित्र शास्त्रीय आधारित प्रकाशनांसाठी सुद्धा तिने मागणी केली. कालांतराने, यहोवाच्या साक्षीदारापैकी एक बहीण तिच्या घरी आली. बहिणीने, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे थेटपणे पवित्र शास्त्रातून दिल्यानंतर नोरा प्रभावीत झाली आणि पुढील चर्चेसाठी तिने बहिणीला पुन्हा येण्याचे निमंत्रण दिले.
परंतु, बहिणीला तिच्याशी पुन्हा भेट घेणे कठीण गेले. आठवड्यातून आणि दिवसातून वेगवेगळ्या वेळेस भेटी देऊनही काहीही यश मिळाले नाही. अखेरीस, तिच्या अथक परिश्रमास प्रतिफळ आणि उत्तम परिणाम मिळाले. पवित्र शास्त्राचा नियमित अभ्यास सुरू करण्यात आला आणि नोराच्या आग्रहामुळे तो बहुतेकवेळा आठवड्यातून तीन वेळेस होत होता. शिकत असलेल्या गोष्टींनी तिला मित्रांसोबत आणि कुटुंबातील सदस्यांसोबत बोलण्यासाठी प्रवृत्त केले. परिणामी, त्यांच्यापैकी तिघांनी पवित्र शास्त्राभ्यास घेण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांना विनंती केली.
अभ्यासाद्वारे नोराने हे स्वीकारले की, अनेक खोटे धर्म आणि संदेष्टे आहेत; परंतु जीवनाकडे निरवणारा मार्ग केवळ एकच आहे. तिच्या प्रश्नांची उत्तरे ती खोट्या धर्मात शोधत होती परंतु पवित्र शास्त्र पिशाच्चांविषयी काय सांगते; हे जाणून घेतल्यानंतर तिने प्रेषितांची कृत्ये १९:१९ मध्ये उद्धृत प्राचीन इफिसकरांप्रमाणे कृती केली. तिने तिचे पुस्तकालय स्वच्छ केले आणि काही दिवसात खोट्या धर्माच्या शिकवणींशी संबंधित असलेल्या हजारो पुस्तकांचा नाश केला. नाश केलेल्या प्रकाशनांपैकी चार पुस्तके असलेल्या एका संचाची किंमत ८०० डॉलरपेक्षाही अधिक होती!
अर्थातच, नोराच्या कार्यामुळे असंतुष्ट होऊन पिशाच्चांनी तिला जवळजवळ दोन आठवडे छळले. तरीही, नियमित पवित्र शास्त्राभ्यास आणि आधुनिक काळातील यहोवाच्या संघटनेबरोबर सहवास यापासून तिला परावृत्त करण्यास दुरात्म्यांना शक्य झाले नाही.
अशाप्रकारचे अनुभव पवित्र शास्त्रीय शब्दांच्या सत्यास अधिक स्पष्ट करतात: “म्हणून देवाच्या अधीन व्हा; आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल.”—याकोब ४:७.