सर्वात अधिक प्रगतीशील संघटनेसोबत सेवा करणे
रॉबर्ट हॉट्सफेल्ड यांच्याद्वारे
आज बहुतांश लोक संध्याकाळच्या बातम्या रंगीत टी.व्हीवर पाहण्यासाठी रिमोट कंट्रोलने तो चालू करतात. आज ही एक सामान्य गोष्ट समजली जाते. काही अल्प काळाआधी मी १२ वर्षांचा होतो तेव्हा, चित्रपटाच्या पडद्यावर, साधारण आकारापेक्षा एका मोठ्या व्यक्तीला मी आश्चर्याने पाहत होतो, आणि पाहतो तो काय, ती व्यक्ती बोलत होती!
तुम्हाला कदाचित वाटत असेल की ही बातमी इतकी महत्त्वपूर्ण नाही. परंतु, माझ्यासाठी १९१५ मध्ये मागे, निश्चितच तो, कृष्णधवल मूक चित्रपटाच्या सुरवातीच्या दिवसातील आधुनिक दिवसाचा चमत्कार होता. दाढी असलेली एक रूबाबदार व्यक्ती पडद्यावर आली व म्हणाली: “द फोटो ड्रामा ऑफ क्रिएशन, हा चित्रपट आय.बी.एस.ए., आंतरराष्ट्रीय पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांचे संघटन यांच्याद्वारे प्रस्तुत केला जात आहे.” पुढील दोन तासांसाठी, पवित्र शास्त्राचा वृत्तांत आमच्या डोळ्यांपुढे उलगडला. त्याचा शास्त्रवचनीय संदेश स्पष्ट व तजेला देणारा होता. तथापि, ते चलचित्र पारदर्शक चित्रांचे होते व त्याबरोबर जे भाषण दिले जात होते त्याने माझे लक्ष आकर्षित केले.
मी तेव्हा त्या गोष्टी जाणल्या नाहीत परंतु, त्या तांत्रिक महत्त्वाच्या गोष्टीसाठी असलेला माझा तारुण्यभरीत आवेश, पृथ्वीवरील सर्वात प्रगतीशील संघटनेसोबत जन्मभर सेवा करण्याच्या जीवनमार्गाचा प्रस्तावनेवजा प्राथमिक भाग होता.
सुरवातीचे दिवस
१८९१ मध्ये माझे वडील डिलेनबर्ग, जर्मनी येथून ॲलेघेनी, पेन्सिल्व्हानिया, अमेरिका येथील जर्मन वसाहतीत राहण्यास आले. नंतर तेथे त्यांना जर्मन कुटुंबातील एक तरुणी भेटली, आणि त्या दोघांनी विवाह केला. माझा जन्म जुलै ७, १९०३ मध्ये झाला व माझे संगोपन जर्मन व इंग्रजी भाषेत झाले. १९१४ मध्ये पहिले महायुद्ध सुरु होण्याच्या काही काळाआधी, माझे आईवडील क्षयरोगाच्या साथीमध्ये मरण पावले व मी अनाथ झालो. त्याच वेळी माझ्या आजोबांच्या मेंदुत रक्तस्त्राव होत असल्यामुळे ते बधिर होऊन त्यांचे देखील निधन झाले.
माझी धाकटी आत्या, मिना बुमर हिने मला तिच्या कुटुंबामध्ये अगदी सहानुभूतीपूर्वकतेने घेतले. ती म्हणाली, “मला पाच लेकरे आहेत, तेव्हा आणखी एकामुळे काही बिघडणार नाही.” मला माझ्या आईवडिलांची उणीव भासत असली तरी, मिना आत्याच्या कुटुंबाने मला खूप चांगले वागवले.
माझी आत्या खूप वर्षांपासून, पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांच्या (त्या दिवसात यहोवाच्या साक्षीदारांना ह्या नावाने ओळखले जात होते) ॲलेघेनी मंडळीची सदस्या होती. १९०९ च्या अगोदर, तेव्हाचे वॉचटावर संस्थेचे अध्यक्ष बंधू सी. टी. रसेल हे देखील या मंडळीत उपस्थित राहत होते. मिना आत्या मला सभांना घेऊन जात असे. आमच्या कुटुंबाने त्याकाळी अभ्यास करण्याचा किंवा प्रचार करण्याचा नियोजित प्रयत्न कधीच केला नसला तरी, सभांमध्ये आम्ही ज्या गोष्टी ऐकत होतो त्यांची सहभागिता आम्ही आमच्या आप्तेष्टांबरोबर औपचारिकरीत्या करत असू.
याच काळादरम्यान, “फोटो-ड्रामा” या चित्रपटाने मला अचंबित केले होते. माझा यांत्रिक गोष्टींकडे कल असल्यामुळे, मंद गतीचे चलचित्र जलद गतीचे आहे असे भासवणाऱ्या छायाचित्रणाने मला जसे मोहित केले त्याचप्रमाणे, नव्या छायाचित्रण कलेने व ध्वनी/चित्राच्या एकीकरणानेही मला मोहित केले. फुलांचे उमलणे पाहून किती रोमांचकारी वाटत होते!
१९१६ मध्ये बंधू रसेल यांच्या मृत्युने आम्हा सर्वांना खिन्न केले. आम्ही ॲलेघेनी येथेच राहत असल्यामुळे, कारनेगी हॉल येथील त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिलो. याच हॉलमध्ये बंधू रसेल यांनी १९०३ मध्ये ई. एल. ईटन यांच्यासोबत वाद घातला होता. मी ह्या मेथडिस्ट एपिस्कोपलियन सेवकाविषयीच्या गोष्टी ऐकल्या होत्या की त्यांनी, सी. टी. रसेल यांना सहा दिवसीय वादाचे आव्हान केले होते. त्यांची अशी आशा होती की ते, बंधू रसेल यांच्या पवित्र शास्त्राच्या ज्ञानाची अपकीर्ति करतील. परंतु, त्याऐवजी, असे म्हटले जाते की, रसेल यांनीच ‘नरकाची आग विझवली.’ पिटस्बर्ग मध्ये ज्ञात असलेली पूर्ण वेळेची सेविका, सारा केलिन या रसेल पति पत्नीला व्यक्तिगतरित्या ओळखत होत्या. अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांनी, मरीया रसेलला दफनपेटीवर फुले ठेवताना पाहिले होते. त्या फुलांसोबत एक लहानशी चिठ्ठी होती ज्यावर, “माझ्या प्रिय पतीसाठी” असे लिहिले होते. काही वर्षांआधीच मरीया, रसेल यांच्यापासून अलग झाल्या होत्या परंतु, तरीही त्या त्यांना त्यांचे पती म्हणूनच मानत होत्या.
वर्षे जसजशी जात होती तसे, मला माझ्या भावी जीवन मार्गाला उपयोगी ठरणाऱ्या तांत्रिक क्षमतांना प्राप्त करण्यासाठी पुष्कळ संधी होत्या. माझे मामा जे माझे कायदेशीर पालक होते ते, एक कंत्राटदार होते. माझ्या शाळेच्या सुट्यांमध्ये त्यांनी मला त्यांच्या वीजतंत्री लोकांसोबत जुन्या वाड्यातील वायुवर चालणाऱ्या दिव्यांऐवजी वीजेचे दिवे बसवण्याचे काम करण्यास पाठवले. १९१८ मध्ये आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी कला म्हणून, रेडिओ-टेलिग्राफ साहित्य बनवले. आम्ही संध्याकाळच्या वेळी अभ्यास करण्यासाठी व विद्युत आणि लोहाकर्षणशास्त्राचे व्यवहारिक प्रयोग करण्यासाठी भेटत होतो. १९२६ मध्ये मी आणि माझ्या एका मित्राने बालपणाचे स्वप्न—जहाजांवर काम करणे व संपूर्ण जगभराची सैर करणे हे, पूर्ण करण्याचा निश्चय केला. आम्ही दोघे रेडिओ-टेलिग्राफ चालकांसाठी असलेल्या रेडिओ कॉर्परेशन ऑफ अमेरिका या प्रशालेत आमचे नाव दाखल केले.
बेथेल येथे नवे जीवन
आम्ही ज्या रेडिओ प्रशालेत जात होतो ती शाळा न्युयॉर्क शहरात होती. यास्तव मी, नदी पार करून ब्रुकलिनला जात होतो. तेथे एका जुन्या मॅसोनिक मंदिराच्या भाड्याने घेतलेल्या प्रेक्षकस्थानात सभा होत होत्या. त्याकाळी अख्ख्या न्युयॉर्क शहराच्या महानगरात केवळ एकच मंडळी होती. बेथेलमधील (पवित्र शास्त्र विद्यार्थी कुटुंबाच्या मुख्यालयाचे गृह) बांधवांना, मी व्यापारी रेडिओ अधिकृत परवाना मिळण्यासाठी प्रशिक्षण घेत आहे असे कळल्यावर ते मला म्हणाले: “तुला जहाजांवर जाण्याची काय गरज आहे? आमच्याकडे येथे एक रेडिओ केंद्र आहे आणि आम्हाला ते चालवणारा एक चालक हवा आहे.” त्यांनी मला मुलाखत घेण्यासाठी कार्यालयात बोलवले. मला बेथेलविषयी काहीच माहीत नव्हते. फक्त इतकेच ठाऊक होते की, ते पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांचे मुख्यालय आहे.
बांधवांनी माझी मुलाखत घेतली व शिफारस केली की मी माझे प्रशिक्षण पूर्ण करावे, अधिकृत परवाना प्राप्त करावा आणि मग बेथेलला यावे. मला पदवी मिळाल्यावर मी, मुक्त सागराकडे जाणारे जहाज घेण्याऐवजी माझे काही कपडे भरले आणि बेथेलला जाण्यासाठी भुयारी मार्ग धरला. मी यहोवाला समर्पण केले होते आणि अनेक वर्षांसाठी प्रचार कार्यात भागही घेत होतो, परंतु बेथेलमध्ये आल्यावर दोन आठवड्यांनी म्हणजे, डिसेंबर १९२६ मध्ये माझा बाप्तिस्मा झाला. ही गोष्ट तेव्हा असामान्य नव्हती.
त्या दिवसांमध्ये केवळ १५० बेथेल सदस्य होते आणि म्हणूनच ते दाटीवाटीचे वाटत होते. प्रत्येक खोलीत चार बांधव राहत होते. लवकरच मी सर्वांबरोबर परिचित झालो, कारण सर्व जण एकाच इमारत समूहात जेवत होते, काम करत होते आणि झोपत होते, आणि हो, सर्व जण न्युयॉर्क शहरातील त्या एकाच मंडळीत उपस्थित राहत होते. १२४ कोलंबिया हाईटस् येथील नवे बेथेल गृह १९२७ मध्ये पूर्ण झाले, आणि तेव्हा आम्ही एका खोलीत दोघे असे राहू शकलो.
१९२७ मध्येच, ११७ ॲडम्स स्ट्रीट येथे नवा कारखाना उघडण्यात आला. ५५ काँकर्ड स्ट्रीट येथील जुन्या कारखान्यातील साहित्य नव्या कारखान्यात नेण्यासाठी, मी देखील हातभार लावला. रेडिओ साहित्यासोबत, कारखान्यात लिफ्ट, छपाई यंत्रे, लॉन्ड्रीतील साहित्य, तेलाचे कंदिल, या सर्व वस्तू होत्या. त्या कंदिलात वीजेच्या तारा असल्या तर मी त्या दुरूस्त करत होतो.
परंतु, बेथेल केवळ एक कारखाना नव्हता. प्रत्येक पुस्तक, पत्रिका, नियतकालिक बनवण्याच्या कामात नम्र, कष्टाळू सेवकांचा हात होता. जगामध्ये नावलौकिक व ओळख मिळवण्याचे त्यांचे ध्येय नव्हते. उलटपक्षी, त्यांना केवळ प्रभूचे कार्य पूर्ण करण्याची इच्छा होती—आणि त्या कार्यात पुष्कळ करण्यासारखे होते!
बंधू रदरफोर्ड यांच्या सहवासात
मला, संस्थेचे दुसरे व्यवस्थापक जोसफ एफ. रदरफोर्ड यांच्यासोबत काम करण्याच्या विशेषहक्काचा मोठा लाभ झाला. ते जवळजवळ सहा फुट उंच, व जाड नव्हे तर सुदृढ बांध्याचे होते. बेथेलमधील पुष्कळ तरुण बांधव, त्यांच्यासोबत ओळख होईपर्यंत काहीसे घाबरूनच होते. ते सतत अभ्यास करत, लेखी साहित्य तयार करण्यात गुंग असत.
बंधू रदरफोर्ड विनोदी स्वभावाचे होते. बेथेल कुटुंबात, बंधू रसेलच्या काळापासून असलेल्या दोन वृद्ध अविवाहीत बहिणी होत्या. त्या फार कडक होत्या आणि त्यांना वाटत असे की, कोणतीही मजेशीर गोष्ट झाली तरी मोठ्याने हसणे बरोबर नाही. कधीकधी, बंधू रदरफोर्ड जेवताना एखादी मनोरंजक गोष्ट सांगत ज्यामुळे कोणालाच हसू आवरत नसे, आणि यामुळे त्या दोन बहिणी चिडत असत. परंतु ते जेवणाच्या वेळी गंभीरपणे पवित्र शास्त्र चर्चा चालू करत.
बंधू रदरफोर्ड उत्तम आचारी होते आणि मित्रांसाठी जेवण बनवण्यास त्यांना फार आवडत होते. एकदा, बेथेलमधील आचाऱ्यांनी कोंबडी कापताना कोंबडीच्या हड्डींचा चुरा केला. ते थेटपणे टांगा टाकीत स्वयंपाकघरात गेले आणि तेथेच कोंबडी कशाप्रकारे कापायची ते त्यांना दाखवले. त्यांना त्यांच्या जेवणात, हड्ड्यांचे बारीक बारीक झालेले तुकडे मुळीच आवडत नसे!
मी, बंधू रदरफोर्ड यांच्यासोबत औपचारिक गोष्टीत, जसे की आमचे रेडिओ केंद्र, डब्लूबीबीआर, किंवा स्टेटन बेटावर असलेल्या त्यांच्या अभ्यासाच्या खोलीत नेहमी होतो. ते नम्र गृहस्थ होते आणि ज्याचा प्रचार करीत त्यानुसार वागणारे होते. स्वतः ज्या गोष्टी करत नव्हते त्यांची अपेक्षा ते इतरांकडून कधीच करत नसत. दुसऱ्या इतर धार्मिक संस्थांमधील जबाबदार व्यक्तींप्रमाणे नसून, बंधू रदरफोर्ड उच्च आध्यात्मिक आणि नैतिक वर्तणूकीचे होते. ते पूर्णपणे यहोवाच्या राज्यासाठी जगत होते.
कठीण आर्थिक काळ
मी बेथेलमध्ये आल्यावर काही वर्षांनीच, जागतिक महामंदी आली. व्यापारी मालाची किंमत ढासळली. वित्तीय बाजारपेठ देखील खालावली. नोकरी मिळणे कठीण झाले आणि भांडवल मर्यादित झाले. बेथेल कुटुंबाचा खर्च अंशदान केलेल्या निधींवर चालत होता, आणि कार्याची देखरेख करण्यासाठी सर्व काही पुरेसे आहे याची यहोवा काळजी घेत होता. आम्हा प्रत्येकाला आमच्या आवडीनिवडी नुसार मिळत नसले तरी आम्ही कधीही उपाशी राहिलो नाही. आम्ही होता होईल तितकी काटकसर करत होतो, आणि बेथेलच्या बाहेर राहणाऱ्या बांधवांनी त्यांना जमेल तशी आर्थिक मदत आम्हाला दिली.
१९३२ मध्ये, आमच्या कारखान्याचे विश्वासू पर्यवेक्षक, बंधू रॉबर्ट मार्टिन यांचे निधन झाले. सत्तावीस वर्षांचे नेथन नॉर यांना त्यांच्या जागी नियुक्त करण्यात आले. ते खरोखर कार्यक्षम तरुण बंधू होते. कारखान्याचे पर्यवेक्षक म्हणून त्यांचा स्वीकार करण्यास कोणालाही कठीण वाटल्याचे मला आठवत नाही. इतर विश्वासू बंधूंपैकी, जॉन कर्जन, जॉर्ज केली, डेग गलब्रेथ, राल्फ लेफलर, व एड बेकर—सर्व माझे प्रिय सहकर्मचारी—या सर्वांनी राज्य सेवेत स्वेच्छापूर्वकतेने कारागिरीचे काम आणि कौशल्य खर्च केले.—पडताळा निर्गम ३५:३४, ३५.
रेडिओसोबत काम करणे
आमची संस्था उपलब्ध होईल त्या मार्गाने पूर्णपणे सुवार्तेचा प्रचार करण्यास समर्पित होती. संपूर्ण जगाला देवाच्या राज्याविषयी जाणायचे होते, परंतु आम्ही तर थोडकेच होतो. पहिल्या महायुद्धानंतर रेडिओचे तंत्रज्ञान वाढीच्या प्राथमिक अवस्थेत होते. परंतु, सूक्ष्मदर्शी बांधवांना वाटले की दळणवळणाची ही पद्धत त्याकाळी यहोवाने पुरवल्यासारखी आहे. याकारणास्तव, १९२३ मध्ये त्यांनी, न्युयॉर्क शहराच्या पाच राजनैतिक विभाजनातील एक, स्टेटन बेटावर डब्लूबीबीआर रेडिओ केंद्राचे बांधकाम सुरु केले.
काही वेळा, आमच्या रेडिओ केंद्राचा चालक मी एकटाच असे. मी स्टेटन बेटावर राहत होतो परंतु विद्युतविषयक किंवा यांत्रिक कामासाठी नावेने आणि भुयारी मार्गाने तीन तास प्रवास करून ब्रुकलिन येथील कारखान्यात येत होतो. आमच्या रेडिओ केंद्राला खासपणे स्वयंपूर्ण करण्यासाठी, आम्ही डिझेलवर चालणारे विद्युतजनित्र बसवून घेतले. स्टेटन बेटावर आमच्या स्वतःच्या पाण्याच्या विहिरी होत्या. तेथील छोट्याशा कुटुंबाला आणि ब्रुकलिन येथील बेथेल परिवाराला अन्न पुरवणारी एक बाग होती.
अनेक वर्षांनंतर आणखी मदत येईपर्यंत, रेडिओ कार्याच्या जबाबदारीमुळे मला केवळ सभांना व क्षेत्र सेवेला उपस्थित राहता येत होते. आमच्या वार्षिक सुट्यांव्यतिरिक्त सामाजिक समारंभ किंवा सप्ताहांताच्या सहलींसाठी मुळीच वेळ नव्हता. एकदा असेच एकाने मला विचारले: “इतका तंतोतंत आराखडा असताना, बेथेल सोडून द्यायचा तुम्ही कधी विचार केला नाही का?” मला प्रामाणिकपणे “नाही” असे म्हणावे लागले. इतक्या प्रिय बंधू आणि भगिणींसोबत राहण्याचा आणि काम करण्याचा सुहक्क आणि आनंद मला मिळाला आहे. शिवाय नेहमीच काही ना काही तरी काम, कोणते तरी नवे प्रकल्प करण्याची आवश्यकता होती.
आम्ही उत्तेजनकारक रेडिओ नाटके निर्माण करून प्रसारित केली. ध्वनिमुद्रण करण्याचे साहित्य उपलब्ध नसल्यामुळे आम्हाला आमच्या स्वतःच्या पद्धतींची योजना करावी लागली. आम्ही असे एक यंत्र बनवले जे मंजूळ किंवा खवळलेल्या वाऱ्याचा आवाज निर्माण करू शकत होते. नारळाच्या कवटीला एकावर एक आपटल्याने दगडी रस्त्यावरील घोड्यांच्या टापांचा आवाज येई. प्रत्येक नाटक नेत्रदीपक परंतु जोखमीचे काम होते. लोकांनी ते ऐकले. त्याकाळी मन विचलित करणाऱ्या गोष्टी कमी असल्यामुळे, पुष्कळ लोक शांत बसून लक्षपूर्वकतेने ऐकत होते.
१९२० आणि १९३० च्या सुरवातीला, संस्थेने रेडिओच्या क्षेत्रात इतिहास घडविला. एकाच कार्यक्रमाला प्रसारित करण्यासाठी रेडिओ आणि दूरध्वनी तारांनी सर्वात अधिक केंद्रांना जोडले. अशाप्रकारे राज्याची सुवार्ता जगभरात लाखो लोकांप्रत पोंहचली.
ग्रामोफोन
१९३० च्या दशकाच्या मध्यात आणि १९४० च्या दशकाच्या सुरवातीला, आम्ही खासकरून रेडिओ प्रसारणासाठी असलेल्या ग्रामोफोन तबकड्या, ग्रामोफोन आणि इतर ध्वनिसाहित्यांची रचना करून तयार केले. एका खास लेथ मशीनच्या साहाय्याने, आम्ही आरशासारख्या गुळगुळीत मेणाच्या चपट्या वर्तुळातून फोनोच्या मूळ तबकड्या कापल्या. त्यानंतर आम्ही प्रत्येक तबकडी, ती निर्दोष आहे याची खात्री करण्यासाठी सूक्ष्मदर्शकाच्या खाली अतिशय बारकाईने परीक्षण केले. जर त्यामध्ये काही दोष असले, तर ध्वनिमुद्रणाचे काम पुन्हा करावे लागत व दुसरी तबकडी बनवावी लागत होती. यानंतर आम्ही ती मेणाची तबकडी ध्वनिमुद्रण कंपनीला पाठवली, ज्यांनी ग्रामोफोन आणि नक्कल रेकॉर्ड बनवल्या.
मला आठवत असलेली सर्वात रोमांचकारी घटना, १९३३ मध्ये बंधू रदरफोर्ड यांनी “पवित्र वर्षाचा शांती आणि समृद्धतेवर परिणाम” हे शीर्षक असलेले भाषण दिले, ती होती. पोपनी ते वर्ष “पवित्र वर्ष” म्हणून घोषित केले होते, आणि रेडिओ व ग्रामोफोनद्वारे आम्ही त्यातील काहीच पवित्र निघणार नाही हे उघड केले. हिटलरने त्या वर्षी कॅथलिक चर्चच्या पाठिंब्याच्या आधारे सत्ता हाती घेतली तेव्हा तेच निष्पन्न झाले. शांतीच्या जितक्या आशा मनी बाळगल्या होत्या त्या सर्वांचा चुराडा झाला.
अमेरिकेत, कॅथलिक ॲक्शन नावाची एक संस्था, चर्च जे काही इच्छिते ते पूर्ण करण्यासाठी प्रस्थापित करण्यात आली. त्यांनी त्यांच्या चर्चच्या काही लोकांना, वृत्तपत्र, मासिके, आणि पुस्तकांचे प्रकाशन करणाऱ्या संपादक मंडळात नियुक्त केले. ते राजकारणात लुडबुड करत होते आणि आमची पवित्र शास्त्र भाषणे जर कोणी रेडिओ केंद्रांवरून प्रसारित केली तर त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात येईल अशी धमकी त्यांनी दिली. पुष्कळ साक्षीदारांवर, विशेषकरून न्यूजर्सी नजीक कॅथलिक ॲक्शनच्या गटाने जमाव करून हल्ला केला. ते खरोखर खळबळजनक दिवस होते!
क्षेत्रातील आनंदी कार्य
१९५० च्या मध्यापर्यंत, वाढत्या प्रमाणाचे राज्य प्रचारक, त्यांच्या घरी जाऊन जास्तीतजास्त लोकांच्या भेटी त्यांच्या घरी थेटपणे घेत होते. हे, रेडिओद्वारे लोकांना पवित्र शास्त्र सत्य समजावून सांगण्यापेक्षा किती तरी अधिक पटीने प्रभावकारी ठरले. यास्तव, १९५७ मध्ये डब्लूबीबीआर विकण्याचे व आमची साधनसंपत्ती इतर राष्ट्रातील विस्तृत मिशनरी कार्यात उपयोगात आणण्याचे ठरवण्यात आले.
१९५५ मध्ये माझी ब्रुकलिन येथील बेडफोर्ड मंडळीत नेमणूक करण्यात आली, जेथे मी नियमितपणे टेहळणी बुरुज अभ्यास चालवत होतो. संस्थेने मला उत्तरेकडील न्यूयॉर्क, पेन्सिल्व्हानिया, कनेक्टीकट, आणि न्यूजर्सी येथे प्रवासी व्यक्ता म्हणून देखील पाठवले. बेडफोर्ड मंडळीत नेमणूक मिळाल्यावर, मी स्वतःला म्हटले, ‘माझी पन्नाशी उलटली आहे. आत्ताच मी, मला होईल तितके क्षेत्र सेवेत भाग घेणे उत्तम. नंतर कदाचित मला कटिवात होईल आणि तितका आनंद घेता येणार नाही.’
राज्याच्या बीजाचे प्रसारण रेडिओद्वारे करण्याचे तांत्रिक काम इतक्या वर्षांसाठी केल्यावर, लोकांच्या मनात प्रत्यक्षात पवित्र शास्त्राच्या सत्याचे बीज पेरून पाणी घालण्यात मला खरा आनंद मिळाला. मंडळीसोबत काम करण्यास मला आनंद वाटला. वेगवेगळ्या बंधू आणि भगिणींनी मला त्यांच्या कुटुंबाचा एक भाग म्हणून स्वीकारले. त्यांच्या सहवासात मला हलके व आरामशीर असल्यासारखे जाणवले. त्याकाळी लहान असलेली मुले, जी आता मोठी झाली आहेत, अजूनही मला आजोबा म्हणतात. ३० वर्षांसाठी आम्ही क्षेत्र सेवेमध्ये आनंदाने एकत्र होतो. परंतु त्यानंतर माझे पाय आणि तळपायात दुखणे आल्यामुळे मी पायऱ्या चढू शकलो नाही किंवा भुयारी मार्गाने देखील प्रवास करू शकलो नाही. १९८५ मध्ये माझी, बेथेलमध्येच एकत्र होणाऱ्या ब्रुकलिन हाईटस् मंडळीत बदली झाली.
यहोवाची संस्था जसजशी मोठ्या विस्ताराचा आनंद लुटत होती, तसे मला व्यक्तिगतरीत्या, दूरच्या राष्ट्रांमध्ये यहोवाच्या साक्षीदारांच्या मोठमोठ्या अधिवेशनांना उपस्थित राहिल्यावर, विदेशी क्षेत्रांमध्ये त्याचा आशीर्वाद पाहण्याची सुसंधी मिळाली. सरतेशेवटी मला जगाचा प्रवास करण्यास मिळाला! हा प्रवास १९५० च्या दशकात सुरु झाला. आमच्यातील काही बेथेल सदस्यांना लंडन, पॅरिस, रोम, नुरेमबर्ग, व कोपनहेगन येथील दृश्ये पाहण्यास मिळाली. पूर्वी बाँबफेकी करीत असलेल्या विमानांचे रूपांतर, प्रवाश्यांना नेणाऱ्या विमानात केले आणि अशा विमानातून, नावेतून आणि रेलगाडीने आम्ही प्रवास केला. आमच्या ह्या सहली नैसर्गिक देखाव्यासंबंधी होत्या हे निश्चित, परंतु सर्वात रमणीय दृश्य, आमचे उबदार, स्वागत करणाऱ्या बांधवांच्या झुंडीचे होते. त्यानंतरच्या दशकात आम्ही पूर्वेकडे, पुन्हा एकवार पश्चिम युरोप आणि अलिकडेच पूर्व युरोपात प्रवास केला. पोलंड, जर्मनी, आणि चेकोस्लोवाकियामधील सुंदर अधिवेशने भारावून टाकणारी होती. मी आमच्या ह्या ईश्वरकृत कुटुंबाचा भाग बनलो तेव्हा पासून ते किती वाढत आहे!
ईश्वरी मार्गदर्शन
संस्था जी लहान पाऊले उचलत आहे असे वाटत होते, त्यांचा नंतर प्रचंड लाटात बदल झाला. आम्ही जेव्हा नव्या उपक्रमांवर काम करत होतो, तेव्हा साक्षकार्य करण्यास आम्हाला मदत करणाऱ्या उचित साहित्यांची इतकी प्रचंड वाढ होईल याचे पूर्वदर्शन कधी कोणाला झाले असते का? आम्ही यहोवाच्या नेतृत्वाला प्रतिसाद देत, विश्वासात पुढे प्रगमन करत आहोत.
ही प्रगतीशील संस्था, उपलब्ध असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास किंवा जगव्याप्त क्षेत्राची काळजी घेण्यासाठी स्वतःचे तंत्रज्ञान निर्माण करण्यास घाबरत नाही. राज्याच्या घोषणेत वाढ करण्याच्या पद्धतींमधील काही, घरोघरचे प्रचारकार्य, रेडिओ नेटवर्क, ग्रामोफोनद्वारे साक्ष व लोकांच्या घरी जाऊन पवित्र शास्त्राभ्यास चालवणे या आहेत. सुरवातीच्या दिवसांमध्ये आपल्या स्वतःची छपाई व्यवस्था बनवणे व आता संगणकाच्या साहाय्याने फोटोटाईपसेटींग व अनेक भाषांमध्ये प्रतिरूप मुद्रण छपाई पद्धतींचा वापर करणे ही काही लहान साध्यता नाही. वॉचटावर बायबल गिलियड प्रशाला, ईश्वरशासित सेवा प्रशाला, आणि नियमित होणाऱ्या अधिवेशनांनी यहोवा देवाला आणि त्याच्या पुत्राला वैभव आणण्यात भूमिका पार पाडल्या. या सर्व घटनांना पाहण्याचे आणि त्यांच्यामध्ये भाग घेण्याचा मला सुहक्क प्राप्त झाला आहे.
यहोवाच्या आत्म्याने निदेशित पृथ्वीवरील संघटनेला, कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत व त्या कशा करायच्या याबद्दल मार्गदर्शन मिळते हे आता मला स्पष्ट झाले आहे. त्याची संपूर्ण सार्वत्रिक संघटना, दृश्य आणि अदृश्य, एकत्र कार्य करते.
तरुण असताना समुद्रावर प्रवास करण्याच्या माझ्या योजनांना हातचे घालवून दिले याचा मला कधीच पस्तावा झाला नाही. अहो, जगातील सर्वात उत्तेजक, अर्थभरीत वाढ, यहोवाच्या संघटनेतच होत आहे! यास्तव, “वरील पाचारण” असलेल्या मार्गावरचा माझा प्रवास, खेदांनी नव्हे तर, खूप खूप आनंद आणि आशीर्वादांनी उल्लेखनीय आहे.—फिलिप्पैकर ३:१३, १४.
मी नेहमी तरुण लोकांना १९१४—म्हणजे, स्तोत्र १९:१४ वचनाची आठवण करून देतो, जे म्हणते: “हे परमेश्वरा, [यहोवा, NW] माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असोत.” आम्हाला सर्व बाबतीत यहोवाला खूष करायचे आहे आणि दाविदाने प्रार्थना केली त्याप्रमाणे आपणही केली पाहिजे की: “हे परमेश्वरा, [यहोवा, NW] तुझे मार्ग मला दाखीव; तुझ्या वाटा मला प्रगट कर. तू आपल्या सत्पथाने मला ने, मला शिक्षण दे, कारण तूच माझा उद्धारक देव आहेस; मी तुझी नित्य प्रतीक्षा करितो.” (स्तोत्र २५:४, ५) या शब्दांमध्ये खूप काही अर्थ आहे. त्यांची आठवण केल्याने ते आम्हाला योग्य मार्गावर राहण्यास, यहोवाच्या प्रगतीशील संघटनेच्या एकवाक्यतेत, योग्य दिशेने जाण्यास मदत करील.
[२३ पानांवरील चित्रं]
बंधू रदरफोर्ड यांना मित्रांसाठी जेवण बनवण्यास आवडत असे
[२५ पानांवरील चित्रं]
रॉबर्ट हॉट्सफेल्ड रेडिओ स्टेशन डब्लूबीबीआरवर नियंत्रण ठेवताना
[२६ पानांवरील चित्रं]
बंधू हॉट्सफेल्डचा अलिकडे घेतलेला फोटो