तुम्हाला सहनशीलता बाळगता येईल का?
यहोवाने अब्रामास सांगितले: “तू आपला देश . . . सोडून मी दाखवीन त्या देशांत जा; मी तुजपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन; मी तुला आशीर्वाद देईन; तुझे नाव मोठे करीन.” (उत्पत्ती १२:१, २) अब्राम तेव्हा ७५ वर्षांचा होता. त्याने आज्ञापालन केले आणि त्याच्या उरलेल्या आयुष्यात यहोवावर विसंबून राहून सुज्ञपणे सहनशीलता व्यक्त केली.
अखेरीस, देवाने सहनशील अब्राहामला (अब्राम) हे अभिवचन दिले: “मी तुला आशीर्वाद देईनच देईन व तुला बहुगुणित करीनच करीन.” प्रेषित पौलाने आणखी असे म्हटले: “अब्राहामने धीर [सहनशीलता, NW] धरिला म्हणून त्याला अभिवचनानुसार लाभ झाला.”—इब्रीयांस ६:१३-१५.
सहनशीलता काय आहे? शब्दकोश त्याची व्याख्या, “कशासाठी तरी शांतपणे थांबून राहण्याची” क्षमता किंवा “डिवचल्यावर वा दबावाखाली असताना तक्रार न करता वाट पाहण्याचा गुण” अशाप्रकारे करतात. तर मग, तुम्हाला कोणासाठी किंवा कशासाठी तरी थांबून राहायचे आहे वा तुम्ही चिडलेले किंवा दबावाखाली असता, तेव्हा तुमच्या सहनशीलतेची परीक्षा होत असते. अशा परिस्थितींमध्ये एक सहनशील व्यक्ती शांत राहते; परंतु अधीर व्यक्ती घाई करते आणि चिडखोर होते.
आमचे अधीर आधुनिक जग
विशेषकरून, अनेक नागरी क्षेत्रांमध्ये सहनशीलतेला नव्हे तर गतीला उत्तेजन दिले जाते. गजबजलेल्या शहरांत राहणाऱ्या लाखो लोकांचा प्रत्येक दिवस, सकाळचा गजर झाल्यावर सुरू होतो. तेव्हापासून, कोठे तरी जाण्याची, कोणाला तरी भेटण्याची, काही तरी साध्य करण्याची उन्मत शर्यत सुरू होते. अशा परिस्थितीत अनेक लोक तणावाखाली व अधीर असतात यात काही आश्चर्य करण्यासारखे आहे का?
इतरांच्या कमतरतांचा तुम्ही सामना करता तेव्हा तुम्ही अस्वस्थ होता का? अल्बर्ट नावाची एक व्यक्ती म्हणते, “मला उशीर केलेला मुळीच आवडत नाही.” अनेक जण कबूल करतील की एखाद्या व्यक्तीला उशीर होत आहे व ती खासकरून नेमून दिलेल्या वेळेत येत नाही तेव्हा कंटाळवाणे वाटते. १८ व्या शतकातील, ब्रिटिश मुत्सद्दी न्यूकॅसलच्या सरदाराविषयी असे म्हटले जात असे: ‘ते दररोज सकाळी अर्धा तास वाया घालवतात. शिवाय सबंध दिवसभर तो वाया घालवलेला तास मिळवण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यांना ते जमत नाही.’ तुम्हाला जर का दररोज अशा प्रकारच्या व्यक्तीवर अवलंबून राहायचे असते तर, तुम्ही सहनशील राहिला असता का?
वाहन चालवताना, तुम्ही रागावता का, थांबून राहण्याची नाराजी दाखवता का, आणि तुम्हाला होता होईल तितक्या वेगाने प्रवास करण्याचा मोह होतो का? अशा परिस्थितींमध्ये, अनेकदा अधीर झाल्यामुळे अपघात होतात. १९८९ च्या दरम्यान, पूर्वीच्या पश्चिम जर्मनीत, ४,००,००० पेक्षा अधिक हमरस्त्यावरील अपघातांचा इजा आणि मृत्यू हा परिणाम झाला. या सर्वात, ३ अपघातांतील १ अपघात, समोरच्या गाडीच्या अगदी जवळून किंवा अगदी वेगाने गाडी चालवल्यामुळे झाला. अशाप्रकारे, अधीर झाल्यामुळे, काही मर्यादेपर्यंत, १,३७,००० व्यक्तींना झालेली इजा किंवा मृत्युला कारणीभूत ठरले. अधीर झाल्यामुळे किती मोठी किंमत द्यावी लागली!
“प्रत्येक वेळा जर कोणी मध्येच नाक खुपसत असेल किंवा बढाई मारत असेल तर, मला अधिक वेळपर्यंत सहनशील राहणे कठीण जाते,” अशी तक्रार ॲन करते. कार्ल हर्मन म्हणतात की, “वयस्करांबद्दल आदर न दाखवणाऱ्या युवकांद्वारे,” त्यांचा धीर पणाला लावला जातो.
या आणि इतर परिस्थिती तुम्हाला अधीर बनवू शकतात. तर मग, तुम्ही आणखी सहनशीलता कशी विकसित करू शकता?
यहोवा तुमच्या सहनशीलतेला दृढ करू शकतो
अनेक लोक असा विचार करतात की सहनशीलता, अस्थिरता किंवा अशक्तपणाला सूचित करते. परंतु, यहोवासाठी ते सामर्थ्याचे सन्मानचिन्ह सूचित होते. तो स्वतः “सहनशील आहे . . . कारण कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे.” (२ पेत्र ३:९) यास्तव, तुमच्या स्वतःची सहनशीलता दृढ करण्यासाठी, यहोवाला जडून राहा आणि पूर्ण अंतःकरणाने त्याच्यावर विसंबून राहा. देवासोबतचे तुमचे नातेसंबंध बळकट करणे हे, सहनशील प्रवृत्ती विकसित करण्याकडचे केवळ एकच महत्त्वाचे पाऊल आहे.
शिवाय, पृथ्वी आणि मानवजातीसाठी असलेला यहोवाचा उद्देश जाणणे महत्त्वाचे आहे. अब्राहाम “पाये असलेल्या व देवाने योजलेल्या व बांधलेल्या नगराची [देवाचे राज्य] वाट पाहत होता.” (इब्रीयांस ११:१०) तसेच, ईश्वरी अभिवचनांचा स्पष्ट दृष्टिकोन ठेवणे व यहोवावर विसंबून राहण्याचे समाधान या गोष्टी लाभदायक ठरतील. तेव्हा तुम्हाला याची जाणीव होईल की सहनशीलता, अनिश्चिततेला दर्शविण्यापेक्षा, वास्तविकतेत लोकांना खरी भक्ती करण्याकडे मन वळवतो. यास्तव, “प्रभूची सहनशीलता तारणच आहे असे समजा.”—२ पेत्र ३:१५.
तुमची व्यक्तिगत परिस्थितीच तुमच्या सहनशीलतेची असाहाय्य परीक्षा घेत असेल तर काय? ख्रिस्ती विश्वासात नसलेले लोक तुम्हाला दुःखित तणावाखाली ढकलतात का? तुम्ही असमाप्य अशा दीर्घ काळासाठी आजारी आहात का? अशा बाबतीत, शिष्य याकोबाने जे लिहिले ते लक्षपूर्वक ऐका. संदेष्ट्यांनी व्यक्त केलेल्या सहनशीलतेच्या नमुन्याला दर्शविल्यानंतर, त्याने तीव्र तणावाखाली असताना शांती टिकवून ठेवण्याचे गुपित प्रकट केले. याकोब म्हणाला: “तुम्हांपैकी कोणी दुःख भोगीत आहे काय? त्याने प्रार्थना करावी.”—याकोब ५:१०, १३.
तुमच्या सहनशीलतेला दृढ करण्यासाठी आणि परीक्षेत असताना तुमच्या आत्म्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी देवाकडे कळकळीची प्रार्थना करा. वारंवार यहोवाकडे वळा, आणि तो तुम्हाला त्या परिस्थितीला किंवा तुमच्या मनाच्या स्थिरतेला धोका आणणाऱ्या इतरांच्या सवयींना ओळखण्यास मदत करील. संभाव्य असाहाय्य स्थिती येण्याआधी प्रार्थना केल्याने शांत राहण्यास तुम्हाला मदत मिळू शकेल.
स्वतःविषयी आणि इतरांविषयीचा योग्य दृष्टिकोन
सौम्य मनःस्थिती राखण्यासाठी, तुम्ही स्वतःला आणि इतरांना योग्य दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. हे पवित्र शास्त्राच्या अभ्यासाद्वारे शक्य आहे, कारण ते, सर्वांना अपूर्णतेचा वारसा मिळाल्याने वैगुण्य असल्याचे दाखवते. शिवाय, पवित्र शास्त्रीय ज्ञान तुम्हाला प्रीती वृद्धिंगत करण्यासाठी मदत करील. हा गुण, इतरांसाठी सहनशीलता व्यक्त करण्यास महत्त्वपूर्ण आहे.—योहान १३:३४, ३५; रोमकर ५:१२; फिलिप्पैकर १:९.
तुम्ही खवळल्यावर, प्रीती आणि क्षमा करण्याची उत्कट इच्छा तुम्हाला शांत करील. तुम्हाला कोणाच्या सवयींबद्दल चीड वाटत असेल तर, प्रीती तुम्हाला आठवण करून देईल की, तुम्हाला केवळ त्या व्यक्तीच्या सवयी नापंसत आहेत, ती व्यक्ती नव्हे. तुमच्या स्वतःच्या अपूर्णता, देवाच्या सहनशीलतेवर किती परिणाम करीत असेल व इतरांना प्रक्षुब्ध करीत असतील याचा विचार करा.
स्वतःविषयीचा योग्य दृष्टिकोन तुम्हाला सहनशीलतेने थांबून राहण्यासाठी मदत करील. उदाहरणार्थ, तुम्ही यहोवाच्या सेवेत तुम्ही विशेषहक्क मिळवण्याचा प्रयत्न करीत आहात का आणि शेवटी निराशाच मिळते का? वाळूच्या घड्याळातील वाळूचा शेवटचा कण जसा घरंगळत जातो तशी तुमची सहनशीलता संपत चालली आहे का? तसे आहे तर मग, अधीरतेचे मूळ गर्वात असते हे लक्षात ठेवा. शलमोनाने म्हटले: “उन्मत्त मनाच्या इसमापेक्षा सहनशील मनाचा इसम बरा.” (उपदेशक ७:८) होय, सहनशीलतेला वाढवताना गर्व हा प्रमुख अडथळा आहे. एखाद्या नम्र व्यक्तीला शांतपणे थांबून राहणे सोपे जाते हे खरे नाही का? यास्तव, नम्रता विकसित करा आणि मग तुम्ही मनाच्या शांतीने दिरंगाई सहन करू शकाल.—नीतीसूत्रे १५:३३.
सहनशीलता समृद्ध प्रतिफळ देते
अब्राहाम प्रामुख्याने त्याच्या विश्वासासाठी प्रसिद्ध आहे. (रोमकर ४:११) तरीही, सहनशीलतेने त्याच्या विश्वासाला टिकाऊ बनवले. यहोवावर विसंबून राहिल्यामुळे त्याला काय प्रतिफळ मिळाले?
यहोवाचा अब्राहामावरील पूर्ण विश्वास वाढता होता. याचकारणास्तव, अब्राहामाचे नाव महान झाले आणि त्याचे वंशज एक बलाढ्य राष्ट्र झाले. पृथ्वीवरची सर्व रा त्याच्या संतानाद्वारे स्वतःला आशीर्वादित करू शकतात. अब्राहामाने देवाचा प्रवक्ता आणि निर्माणकर्त्याचे प्रतिरूप म्हणून काम केले. अब्राहामाला त्याचा विश्वास आणि सहनशीलतेसाठी यापेक्षा कोणते महान प्रतिफळ मिळू शकले असते का?
जे ख्रिस्ती, सहनशीलतेने छळाचा सामना करतात त्यांच्याकरीता “प्रभू [यहोवा, NW] फार कनवाळू आहे.” (याकोब ५:१०, ११) अशाप्रकारच्या व्यक्ती, त्याची इच्छा पूर्ण केल्यामुळे शुद्ध विवेकाचा आनंद लुटतात. तुमच्या बाबतीत, तुम्ही जर यहोवावर विसंबून राहिलात आणि सहनशीलतेने छळाचा सामना केला, तर या तुमच्या सहनशीलतेचा परिणाम, यहोवाची स्वीकृती आणि आशीर्वाद असा होईल.
सहनशीलता देवाच्या लोकांना, जीवनाच्या प्रत्येक पैलूत मदत करते. ख्रिश्चन आणि ॲग्नेस नावाच्या यहोवाच्या दोन सेवकांना, त्यांनी त्यांचा वाङनिश्चय करण्याचा निर्णय घेतला तेव्हा हे कळून आले. ख्रिश्चनच्या पालकांना ॲग्नेसचा स्वभाव जवळून पाहायचा होता यासाठी त्यांनी वाङनिश्चय लांबणीवर टाकला. या योजनेचा काय परिणाम झाला?
“आमची सहनशीलता आमच्या पालकांसाठी किती अर्थ राखून होती हे आम्हाला नंतर कळून आले. सहनशीलतेने थांबून राहिल्याने माझे आणि माझ्या पत्नीचे नातेसंबंध नाहीसे झाले नाहीत. परंतु तो माझ्या पालकांसोबतचा आमचा पहिला उभारणीकारक नातेसंबंध होता.” होय, सहनशीलता समृद्ध लाभांश देतो.
सहनशीलता शांती वाढवितो. तुम्ही जर कौटुंबिक सदस्यांच्या आणि मित्रांच्या प्रत्येक चुकांचा पराचा कावळा केला नाही तर, ते तुमचे फार कृतज्ञ राहतील. इतरजण चुका करतात तेव्हा तुमच्या शांततेमुळे आणि समजूतदारपणामुळे लाजिरवाणा तमाशा टळेल. एक चीनी म्हण अशी आहे: “रागाच्या क्षणी दाखवलेली सहनशीलता तुमचे त्राग्याचे शंभर दिवस टाळील.”
सहनशीलता तुमचे व्यक्तिमत्त्व वाढवून इतर उत्तम गुणांना चकाकत ठेवण्यासाठी टिकाऊपणाचा लेप लावते. ती तुमच्या विश्वासाला टिकाऊ, तुमची शांती कायम, आणि तुमची प्रीती अढळ बनवते. सहनशीलता तुम्हाला दयाळूपणा, चांगुलपणा, आणि सौम्यता या गोष्टींचे आचरण करताना आनंदी होण्यास मदत करील. सहनशीलता विकसित केल्यामुळे, सोशिकपणा आणि आत्मसंयम वाढवण्यासाठी लागणाऱ्या सामर्थ्याला बळकटी येते.
यहोवाची अभिवचने पूर्ण होण्यासाठी सहनशीलतेने थांबून राहा, म्हणजे, तुम्हाला एका आश्चर्यकारक भवितव्याची खात्री मिळेल. अब्राहामासारखे, तुम्ही “विश्वासाने व धीराने अभिवचनांचा वारसा उपभोगावा.”—इब्रीयांस ६:१२, NW.
[२३ पानांवरील चित्रं]
यहोवासोबतचा जवळचा नातेसंबंध तुम्हाला, अब्राहामासारखीच सहनशीलता व्यक्त करण्यास मदत करील