संपूर्ण जगभरातील यहोवाचे साक्षीदार थायलंड
“स्वतंत्रांची भूमी.” थायलंड या नावाचा असा अर्थ होतो. येथील ५,७०,००,००० सौम्य, कष्टाळू रहिवाशी विविध धार्मिक कल्पना पाळतात. बुद्ध धर्माचे प्राबल्य असले तरी, या आग्नेय आशिया राष्ट्रात, ख्रिस्ती धर्मजगतातील धर्मांचे देखील पालन केले जाते. या सर्व लोकांनी देवाच्या राज्याची सुवार्ता ऐकण्याची गरज आहे.—मत्तय २४:१४.a
निर्वासित सुवार्ता ऐकतात
म्यानमारच्या सीमेच्या बाजूने थायलंडच्या पर्वतांमध्ये पसरलेल्या छावण्यातील, १०,००० करेन निर्वासितांमध्ये पवित्र शास्त्राचे सत्य मूळ धरत आहे. त्या भागात राहणाऱ्या एका करेन कुटुंबातील सदस्य यहोवाचे साक्षीदार आहेत. ते सुवार्ता निर्वासितांमध्ये पसरवत आहेत. त्यांचे कार्य कसे सुरू झाले?
अनेक वर्षांआधी एका तरुण माणसाने, अँग्लिकन चर्चसोबतचे त्याचे सर्व नातेसंबंध तोडून टाकले आणि यहोवाचा एक साक्षीदार बनला. पाळकाच्या टोमण्यांमुळे त्याच्या नातेवाईकांनी त्याचा विरोध केला. परंतु, त्याने सबुरीने हे सर्व सहन केले, आणि त्याच्या कुटुंबाचा विरोध हळूहळू कमी झाला. अँग्लिकन चर्चच्या पाळकांनी उपहास करण्याचे चालूच ठेवले. दोन वर्षांनी त्यांना अनैतिक वागणूकीमुळे त्यांच्या कार्यालयातून काढून टाकण्यात आले. मग त्यांच्या चर्चचा कोणी पाळक नसल्यामुळे, साक्षीदाराच्या कौटुंबिक सदस्यांना आणि इतर नातेवाईकांना धक्का बसला, आणि असाहाय्य असे वाटू लागले. अकरा जणांनी चर्चला राजिनामा दिला आणि त्या साक्षीदाराला त्यांच्यासोबत पवित्र शास्त्र अभ्यास करण्याची विनंती केली.
हा अभ्यास चांगला चालला होता. इतर निर्वासित देखील या अभ्यासात भाग घेत होते. सत्य इतक्या झटपट पसरल्यामुळे, निर्वासित छावणीच्या शेजारून वाहणाऱ्या नदीत १७ नव्या साक्षीदारांचा बाप्तिस्मा झाला. त्यांच्यामधील एका ८८ वर्षांच्या आजीला पाण्यात बाप्तिस्मा घेतानाचे ते दृश्य किती आनंददायक होते!
व्हिडिओ आस्थेची ठिणगी टाकते
निर्वासितांमध्ये आणखी वाढ होण्याचा संभव आहे. १९९३ मध्ये, स्मारकविधीला ५७ लोक उपस्थित होते. त्याच वर्षी झालेल्या विभागीय पर्यवेक्षकांच्या भेटी दरम्यान ६७ लोक त्यांनी दिलेल्या भाषणातील एक भाषण ऐकण्यासाठी उपस्थित राहिले होते. वॉचटावर संस्थेचा, जेहोवाज विटनेसेस—द ऑर्गनायझेशन बिहाइन्ड द नेम हा व्हिडिओ पाहण्यासाठी २५० लोक जमले होते.
निर्वासितांच्या छावणीतील एका बॅप्टिस्ट पाळकाची पत्नी, यहोवाच्या साक्षीदारांनी योजलेल्या पवित्र शास्त्राच्या भाषणाला उपस्थित राहिली व तेथे चर्चिलेल्या पवित्र शास्त्र वचनांची तिने नोंद घेतली. तिने तिच्या पतीला सांगितले की, चर्चमधिल तेचतेच प्रवचन ऐकून तिला कंटाळा आला होता. परंतु त्याने आक्षेप घेतला, व म्हटले की जर ती यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना जाऊ लागली तर, परगण्यातील इतर रहिवासी तिच्या मागे जातील. ती दुसऱ्या वेळेला सभेला परत उपस्थित राहिली तेव्हा, तिच्या पतीने चाकू घेऊन तिचा पाठलाग केला आणि सभेच्या तिच्या टीपा व पवित्र शास्त्र साहित्य जाळून टाकले. हे सर्व झाल्यावरही, व्हिडिओ पाहण्यासाठी ती पुन्हा आली. नंतर तिने जे काही पाहिले होते ते तिच्या पतीला सांगितले. आता त्याची मनोवृत्ती बदलली, आणि त्यालाही तो व्हिडिओ पाहायचा होता. त्याने तिच्या टीपा आणि पवित्र शास्त्र साहित्य जाळून टाकले होते याबद्दल त्याला खेद वाटला.
तर अशाप्रकारे लोक थायलंडमध्ये सुवार्ता ऐकत आहेत. तसेच ते “स्वतंत्रांच्या भूमीत” राहून आध्यात्मिक स्वातंत्र्य प्राप्त करत आहेत.—योहान ८:३२.
[तळटीपा]
a अधिक माहितीसाठी यहोवाच्या साक्षीदारांची १९९४ ची दिनदर्शिका (इंग्रजी) पाहा.
[२४ पानांवरील चौकट]
राष्ट्राचे पार्श्वचित्र १९९३ सेवा वर्ष
साक्ष देणाऱ्यांचा उच्चांक: १,४३४
प्रमाण: ४०,२९९ जणांसाठी १ साक्षीदार
स्मारक विधीची उपस्थिती: ३,३४२
पायनियर प्रचारकांची सरासरी: २३२
पवित्र शास्त्र अभ्यासांची सरासरी: १,४८९
बाप्तिस्मा घेतलेल्यांची संख्या: ९२
मंडळ्यांची संख्या: ३९
शाखा दप्तर: बँकॉक
[२५ पानांवरील चित्रं]
राज्य उद्घोषक आवेशाने सुवार्तेचा प्रचार करत आहेत
[२५ पानांवरील चित्रं]
१९४७ मधील पहिले शाखा दप्तर
[२५ पानांवरील चित्रं]
फेब्रुवारी ८, १९९२ रोजी समर्पण झालेले, बँकॉक मधील नव्या शाखा दप्तराच्या समोर उभे राहिलेले बेथेल कुटुंब