युवकांनो—तुम्ही कोणाच्या शिक्षणाकडे लक्ष देता?
“कित्येक लोक, . . . भुतांच्या शिक्षणाच्या नादी लागून विश्वासातून बाहेर जातील.”—१ तीमथ्य ४:१, NW.
१. (अ) युवकांना कोणती निवड करता येते? (ब) यहोवा कसे शिकवतो?
युवकांना उद्देशून येथे विचारलेला प्रश्न असा आहे की, तुम्ही कोणाच्या शिक्षणाकडे लक्ष देता? यावरून असे सूचित होते की तुम्हा युवकांना निवडण्याची संधी आहे. ती निवड, ईश्वरी शिक्षणाला प्रतिसाद देणे किंवा भुतांच्या (दुरात्म्यांच्या) शिक्षणाला अनुसरणे यामधील आहे. यहोवा, त्याचे वचन पवित्र शास्त्र याच्याद्वारे शिकवतो. तो त्याच्या पृथ्वीवरील प्रतिनिधींच्या सेवाकार्यातून देखील शिक्षण प्रदान करतो. (यशया ५४:१३; प्रे. कृत्ये ८:२६-३९; मत्तय २४:४५-४७) परंतु दुरात्मेसुद्धा शिकवतात हे जाणण्यास तुम्हाला आश्चर्य वाटते का?
२. दुरात्म्यांच्या शिक्षणापासून विशेषकरून ह्या समयात दूर राहणे का महत्त्वपूर्ण आहे?
२ प्रेषित पौलाने लिहिले: “पुढील काळी विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील; फुसलाविणाऱ्या आत्म्यांच्या व भुतांच्या शिक्षणाच्या नादी लागतील.” (१ तीमथ्य ४:१) आम्ही “शेवटल्या काळी” जगत असताना, सैतान आणि त्याचे दुरात्मे विशेषरीतीने सक्रिय आहेत, तेव्हा तुम्ही कोणाच्या शिक्षणाकडे लक्ष देता असा प्रश्न आम्ही का विचारतो हे तुम्हाला समजले का? (२ तीमथ्य ३:१-५; प्रकटीकरण १२:७-१२) सैतान आणि त्याचे दुरात्मे त्यांच्या कार्यपद्धतींमध्ये अतिशय कावेबाज, व फुसलावणारे असल्यामुळे, तुम्ही या प्रश्नाचा लक्षपूर्वक विचार करणे फार महत्त्वाचे आहे.—२ करिंथकर ११:१४, १५.
दुरात्मे आणि त्यांचे शिक्षण
३. दुरात्मे कोण आहेत, त्यांचा हेतू काय आहे, आणि ते तो साध्य करण्याचा प्रयत्न कसा करतात?
३ हे दुरात्मे एकेकाळी, यहोवाचे देवदूत होते. परंतु, त्यांनी त्यांच्या निर्माणकर्त्याविरूद्ध बंड केले आणि अशारीतीने सैतानाच्या टोळीला जाऊन मिळाले. (मत्तय १२:२४) लोकांना भ्रष्ट करून देवाची सेवा करण्यापासून बहकविण्याचा त्यांचा हेतू आहे. ते साध्य करण्यासाठी हे दुरात्मे, यहोवाने धिक्कारलेली स्वार्थी, अनैतिक जीवन शैली वाढविण्यासाठी मानवी शिक्षकांचा उपयोग करतात. (पडताळा २ पेत्र २:१, १२-१५.) एकेकाळी विश्वासू असलेले हे देवदूत दुरात्मे कसे झाले याची उजळणी केल्याने तुम्हाला त्यांचे शिक्षण आणि ते शिक्षण वाढवत असलेल्या जीवन शैलीला ओळखण्यास मदत मिळेल.
४. (अ) नोहाच्या दिवसांमध्ये आज्ञाभंजक देवदूत पृथ्वीवर का आले? (ब) जलप्रलयाच्या वेळी दुष्ट देवदूतांचे आणि त्यांच्या अपत्यांचे काय झाले?
४ नोहाच्या दिवसांमध्ये, काही विशिष्ट देवदूत देखण्या मानवकन्यांना पाहून इतके आकर्षित झाले की, या आत्मिक प्राण्यांनी स्वर्गातील त्यांचे वस्तीस्थान सोडले व ते पृथ्वीवर आले. या स्त्रियांसोबत लैंगिक संबंध ठेवल्यामुळे त्यांना जी मुले झाली ती मिश्रजातीय अपत्य होती, ज्यांना नेफिलिम असे म्हणण्यात येते. आत्मिक प्राण्यांनी मानवांसोबत सहवास ठेवणे ही अनैसर्गिक गोष्ट असल्यामुळे, त्या आज्ञाभंजक देवदूतांनी या स्त्रियांसोबत जे काही केले ते सदोम येथील मुलांनी आणि पुरूषांनी पुरूषगमनाचे जे कृत्ये केले त्यासारखेच चुकीचे होते. (उत्पत्ती ६:१-४; १९:४-११; यहूदा ६, ७) त्या देवदूतांच्या बायका आणि त्यांची मुले जलप्रलयात नाश झाली. परंतु, त्या दुष्ट देवदूतांनी धारण केलेली त्यांची मानवी शरीरे टाकून दिली आणि ते स्वर्गात पुन्हा गेले. तेथून पुढे ते दियाबल सैतानाचे दुरात्मिक साथीदार झाले.—२ पेत्र २:४.
५. दुरात्मे कोणत्या प्रकारचे प्राणी आहेत, आणि ते देवाच्या नियमाला उलथून पाडण्याचा कसा प्रयत्न करत आहेत?
५ या ऐतिहासिक पार्श्वभूमीच्या दृष्टिकोनातून पाहिल्यावर, हे दुरात्मे खरोखर कोण आहेत हे तुम्हाला कळाले का? ते लैंगिकतेचा विपर्यास करणारे आहेत. ते अदृश्यपणे या जगाला, लैंगिकतेने वेडेपिसे बनवून कळसूत्री बाहुल्यांसारखे नाचवत आहेत. आता त्यांना मानवी शरीरे धारण करता येत नाहीत हे खरे आहे. तरीही ते, पृथ्वीवर भ्रष्ट करू शकणाऱ्या लोकांकडून लैंगिकतेचा दुरूपयोग करून हा आनंद मिळवत आहेत. (इफिसकर ६:११, १२) हे दुरात्मे, शुद्धता आणि नैतिकतेविषयी असलेले यहोवाचे नियम विनाकारण बंधनकारक आहेत, असे भासवून त्यांना उलथून पाडण्याचा प्रयत्न करतात. हे दुष्ट दुरात्मे, लैंगिक अनैतिकता जीवनाची सामान्य आणि सुखकारक शैली म्हणून त्याचे समर्थन करतात.
दुरात्म्यांचे शिक्षण वाढविणे
६. दुरात्मे त्यांच्या शिक्षणाला कपटी मार्गाने वाढवत आहेत याचे आम्हाला आश्चर्य का वाटू नये?
६ दुरात्मे त्यांचे शिक्षण कपटी मार्गाने वाढवितात याचे आम्हाला आश्चर्य वाटू नये. काही झाले तरी, त्यांचा नेता, दियाबल सैतान याने देखील हव्वेला फसविताना याच पद्धतीचा उपयोग केला होता. तो तिची मदत करू इच्छित आहे, अशारीतीने तो तिच्यासोबत बोलला याची आठवण करा. सैतानाने विचारले, “तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हास सांगितले हे खरे काय?” मग त्याने, अतिशय धूर्तपणे देवाच्या शिक्षणाला क्षीण करण्याचा प्रयत्न केला. त्याने हव्वेला सांगितले की, तिने जर मना केलेल्या झाडाचे फळ खाल्ले तर तिला त्याचा लाभ होईल. “तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील; आणि तुम्ही देवासारखे बरेवाईट जाणणारे व्हाल.” (उत्पत्ती ३:१-५) अशारीतीने हव्वा भूलवली गेली. होय, ती फसली, आणि तिने देवाची अवज्ञा केली.—२ करिंथकर ११:३; १ तीमथ्य २:१३, १४.
७. दुरात्म्यांच्या कपटी शिक्षणाचा काय परिणाम झाला आहे, आणि ते कशाचा इशारा देते?
७ अलिकडच्या काळातही अनेक लोक फसले आहेत. दुरात्म्यांनी लैंगिक अनैतिकतेला इतक्या कावेबाजपणे चेतविले आहे की, जे लोक पूर्वी त्याचा धिक्कार करत होते ते आज त्याला स्वीकारत आहेत. उदाहरणार्थ, अमेरिकेतील एका प्रसिद्ध सल्ला स्तंभलेखिकेला, अविवाहित लोकांनी लैंगिक संबंध ठेवण्याच्या विषयावर आलेल्या एका पत्राचे उत्तर द्यावयाचे होते. तिने अशाप्रकारे ते लिहिले: “या विषयावरचे माझे मत मी बदलेन असा मी विचार देखील करू शकले नाही, परंतु आता माझा असा समज आहे की, जे जोडपे विवाह करण्याचा गंभीर निर्णय घेतात त्यांनी त्यांच्या सुसंगतीची परीक्षा घेण्यासाठी काही सप्ताहांत एकमेकांसोबत सहलीला जाऊन घालवले पाहिजे.” आणि ती पुढे म्हणते, “हे मी लिहिले आहे असा मला माझ्यावरच विश्वास बसत नाही!” तिने व्यभिचाराची शिफारस केली होती यावर देखील तिचा विश्वास नव्हता. पण वास्तविकतेत तिने ती केली होती! स्पष्टतः, मग देव ज्या गोष्टींचा निषेध करतो त्याबद्दलच्या आमच्या दृष्टिकोनावर दुरात्म्यांच्या शिक्षणाचा परिणाम होऊ न देण्याची खबरदारी आम्ही घेतली पाहिजे.—रोमकर १:२६, २७; इफिसकर ५:५, १०-१२.
८. (अ) पवित्र शास्त्रात “जग” हा शब्द कसा वापरला आहे? (ब) जगावर कोण राज्य करत आहे, आणि येशूच्या शिष्यांनी जगाकडे कोणत्या दृष्टीने पाहिले पाहिजे?
८ सैतान “ह्या जगाचा अधिपती आहे” हे आम्ही कधीच विसरून चालणार नाही. वास्तविक पाहता प्रेषित योहानाने म्हटले की, “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” (योहान १२:३१; १ योहान ५:१९) हे खरे की, काही वेळा येशूने “जग” हा शब्द मानवजातीला सूचित करण्यासाठी वापरला आहे. (मत्तय २६:१३; योहान ३:१६; १२:४६) परंतु पुष्कळदा, त्याने “जग” हा शब्द, खऱ्या ख्रिस्ती मंडळीच्या बाहेर असलेल्या सर्व संघटित मानवी समाजाला सूचित करण्यासाठी वापरला. उदाहरणार्थ, येशू म्हणाला की, त्याच्या शिष्यांनी ‘ह्या जगाचे (अधार्मिक मानवी समाज) भाग होऊ नये’ आणि ते या जगाचे नाहीत म्हणून जग त्यांचा द्वेष करते. (योहान १५:१९; १७:१४-१६) पवित्र शास्त्राने हा इशारा दिला आहे की, सैतान राज्य करत असलेल्या जगाचे मित्र होण्याचे आम्ही टाळले पाहिजे.—याकोब ४:४.
९, १०. (अ) कोणत्या जगीक गोष्टी अयोग्य लैंगिक इच्छांना चेतवितात? (ब) जगाचे मनोरंजन जे शिकवते त्याच्यामागे कोण आहे हे ओळखणे कसे शक्य आहे?
९ प्रेषित योहानाने आग्रह केला: “जगावर आणि जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका.” त्याने असेही म्हटले: “जगात जे सर्व आहे ते, म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी, ही पित्यापासून नाहीत तर जगापासून आहेत.” (१ योहान २:१५, १६) याचा विचार करा. आज जगामध्ये कोणत्या गोष्टींमुळे चुकीच्या इच्छेला उत्तेजन दिले जाते, उदाहरणार्थ, बेकायदेशीर लैंगिकता? (१ थेस्सलनीकाकर ४:३-५) जगाच्या संगीताविषयी काय? एका कॅलिफोर्निया पोलिस परिविक्षा स्त्री अधिकारीने म्हटले: “मूलभूतपणे, संगीत असे शिकवते की, तुम्हाला तुमच्या पालकांचे ऐकण्याची काही गरज नाही, आणि तुम्ही तुमच्या मनाला वाटेल तसे जीवन जगले पाहिजे.” अशा प्रकारचे संगीत जे शिक्षण देते त्या उगमाला आता तुम्ही ओळखले का?
१० वस्तुतः, सैतानाने हव्वेला जे सांगितले ते आठवा: ‘तू काही तरी गमावत आहेस. तुला हवे तसे तू जीवन जग. चांगले काय आणि वाईट काय याचा तूच निर्णय घे. देवाचे ऐकण्याची तुला गरज नाही.’ (उत्पत्ती ३:१-५) जगाच्या बहुतेक संगीतांमध्ये हाच संदेश दिला जात नाही का? परंतु, दुरात्मे केवळ संगीताद्वारेच शिकवीत नाहीत. ते व्यावसायिक दूरदर्शन कार्यक्रम, चित्रपट आणि व्हिडिओ यांचा शिकवण्यासाठी उपयोग करतात. ते कसे? जगाचे दळणवळणाचे मार्ग, मनोरंजनाला अशा रीतीने सादर करतात की, जे देवाचे नैतिक शिक्षण दडपशाहीचे आहे असे दाखवतात. व्यभिचारावर जोर देऊन व त्याला आकर्षक असे बनवून ते त्याचे समर्थन करते.
११. नैतिकरीत्या बोलायचे झाले तर, दूरदर्शन बहुधा काय शिकवते?
११ यु. एस. न्युज ॲण्ड वर्ल्ड रिपोर्ट या नियतकालिकाने असे म्हटले: “१९९१ मध्ये, [अमेरिकेच्या] तीन दूरदर्शन प्रसारित केंद्रांनी, संध्याकाळच्या वेळी म्हणजे रात्री ७ ते ११ च्या दरम्यान १०,००० पेक्षा अधिक वेळा लैंगिक कृत्याचे प्रसंग दाखविले; प्रत्येक दृश्यात विवाहित सोबत्यांमधील तसेच अविवाहितांमधील लैंगिक संबंधाची १४ दृश्ये दाखवली.” एका वर्षात, ९,००० बेकायदेशीर लैंगिक कृत्य संध्याकाळच्या वेळी दाखवल्याने, तुम्हाला दूरदर्शन काय शिकवत आहे असे वाटते? बॅरी एस. सापॉलस्की ज्यांनी “सेक्स इन टेलिव्हिजन: १९७९ वर्सस १९८९” हा अहवाल लिहिण्यात लेखकाला मदत केली असे म्हणतात: “कुमारावस्थेत असलेल्यांनी जर अनेक वर्षांपासून प्रणयचेष्टेचे किंवा उघडपणे लैंगिकतेच्या वागणूकीचे कार्यक्रम सतत पाहिले तर, लैंगिकता सुखकर आहे—व यामध्ये कोणतेही दुष्परिणाम नाहीत हेच वर्षभरातील ही हजारो चित्रे त्यांना शिकवतील.” याबद्दल कोणताही प्रश्न नाही की: जगाचे मनोरंजन तरुणांना शिकवते की, कोणतेही नियम नाहीत, व्यभिचार स्वीकारणीय आहे, आणि देव ज्या गोष्टींचा निषेध करतो त्यानुसार जीवन जगल्याने कोणतेही वाईट परिणाम होणार नाहीत.—१ करिंथकर ६:१८; इफिसकर ५:३-५.
१२. जगाचे मनोरंजन खासकरून ख्रिस्ती तरुणांसाठी धोक्याचे का आहे?
१२ जगाचे संगीत, चित्रपट, व्हिडिओ आणि दूरदर्शनचे कार्यक्रम युवकांच्या आकर्षणासाठी बनवलेले आहेत. ते दुरात्म्यांच्या भ्रष्ट शिक्षणाला फैलावत आहेत! पण ही गोष्ट आम्हाला आश्चर्याची वाटावी का? त्याबद्दल विचार करा. जर खोटा धर्म आणि राजकारण सैतानाच्या जगाचे भाग आहेत—आणि ते खरोखर आहेतच—तर, जग ज्याप्रकारचे मनोरंजन सादर करते ते दुरात्म्यांच्या प्रभावापासून मुक्त असेल असा विश्वास करण्यात काही तथ्य आहे का? तुम्हा तरुणांना विशेषतः, “जगाला त्याच्या साच्यात बसवू” न देण्यासाठी सांभाळून राहण्याची गरज आहे.—रोमकर १२:२, द न्यू टेस्टमेंट इन मॉर्डन इंग्लिश, जे. बी. फिलिप्स.
आत्म-परीक्षण करा
१३. कोणते आत्म-परीक्षण केले पाहिजे?
१३ तुम्ही कोणाच्या शिक्षणाला अनुसरता हे केवळ तुमच्या बोलण्याद्वारे नव्हे तर, तुमच्या कृतीद्वारे देखील ठरवता येते. (रोमकर ६:१६) त्यामुळे, स्वतःला विचारा, ‘जगाच्या प्रचाराच्या माध्यमाद्वारे मी जे काही शिकतो त्याचा परिणाम माझ्या मनोवृत्तीवर आणि जीवनाच्या चालीवर तर होत नाही ना? दुरात्म्यांचे शिक्षण माझ्या जीवनात मूळ धरू लागले आहे का?’ अशा प्रश्नांचे उत्तर शोधण्यास तुम्हाला मदत करण्यासाठी, तुम्ही, पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्यास, ख्रिस्ती सभांना उपस्थित राहण्यास, आणि इतरांसोबत देवाच्या राज्याविषयी बोलण्यासाठी जो वेळ आणि प्रयत्न खर्च करता त्याची तुलना, दूरदर्शन पाहण्यात, संगीत ऐकण्यात, तुमच्या आवडत्या खेळात भाग घेण्यात, किंवा याच प्रकारच्या कार्यहालचालींमध्ये भाग घेण्यात जो वेळ घालवता त्याच्याशी का करू नये बरे? तुमचे जीवनच धोक्यात असल्यामुळे, प्रामाणिकपणे आत्म-परीक्षण करा.—२ करिंथकर १३:५.
१४. आमच्या आध्यात्मिक आरोग्यावर कशामुळे परिणाम होईल, आणि विचार करण्याजोगी कोणती वस्तुस्थिती आम्ही आमच्या मनात ठेवली पाहिजे?
१४ तुम्ही हे पूर्णपणे जाणून आहात की, जे शारीरिक अन्न तुम्ही खाता त्याचा परिणाम तुमच्या शारीरिक आरोग्यावर नक्की होतो. त्याचप्रकारे, तुम्ही तुमच्या मनात आणि हृदयात ज्या गोष्टी भरवता त्याचा परिणाम तुमच्या आध्यात्मिक आरोग्यावर होतो. (१ पेत्र २:१, २) तुमच्या खऱ्या आवडीनिवडी काय आहेत याविषयी तुम्ही स्वतःला फसवू शकता, परंतु तुम्ही आपला न्यायाधीश, येशू ख्रिस्त याला फसवू शकत नाही. (योहान ५:३०) यास्तव, स्वतःला विचारा, ‘येशू ह्या पृथ्वीवर असता व त्याने मी जे संगीत ऐकतो व जे पाहतो तेच ऐकले व पाहिले तर मला लाजिरवाणे वाटणार नाही का?’ विचार करण्याजोगी वस्तुस्थिती ही आहे की, येशू तुम्हाला पाहत आहे आणि आमची सर्व कामे त्याला माहीत आहेत.—प्रकटीकरण ३:१५.
दुरात्म्यांच्या शिक्षणाचा प्रतिकार करा
१५. दुरात्म्यांच्या शिक्षणाचा प्रतिकार करण्यासाठी जोरदारपणे लढत का दिली पाहिजे?
१५ दुरात्मे, त्यांच्या शिक्षणाला अनुसरण्यासाठी तरुण लोकांवर जो दबाव टाकतात तो प्रचंड आहे. हे दुष्ट आत्मे, जीवनाची तात्कालिक संतुष्टता वाटणारी, मौजमजा आणि सुख सादर करतात. देवाला संतुष्ट करण्यासाठी, प्राचीन काळच्या मोशेने फारोच्या घराण्यात प्रमुख सदस्य म्हणून “पापाचे क्षणिक सुख भोगण्यास” नाकारले. (इब्रीयांस ११:२४-२७) दुरात्मे जे सादर करतात ते नाकारणे इतके सोपे नाही, आणि म्हणूनच तुम्हाला जे बरोबर आहे ते करण्यास लढत दिली पाहिजे. हे खासकरून खरे आहे कारण, आमच्यामध्ये वारशाने मिळालेले पाप आहे आणि आमच्या अंतःकरणाला जे वाईट आहे तेच करण्याची ओढ लागते. (उत्पत्ती ८:२१; रोमकर ५:१२) पापी प्रवृत्तीमुळे, प्रेषित पौलाला देखील स्वतःसोबत कडक राहून त्याच्या शारीरिक अभिलाषांना त्याच्यावर वर्चस्व गाजवू न देण्यासाठी प्रयत्न करावे लागले.—१ करिंथकर ९:२७; रोमकर ७:२१-२३.
१६. अनैतिक वर्तणूकीत गुंतण्याच्या दबावाचा प्रतिकार युवकजन कसा करू शकतात?
१६ तुम्हाला, ‘दुष्कर्म करण्यास प्रवृत्त होणाऱ्या बहुजनसमाजाच्या’ मागे जाण्याचा मोह झाला तरी, देव तुम्हाला, तुमच्या समवयस्कांकडून त्यांच्या चुकीच्या मार्गाचा पाठलाग करण्यास येणाऱ्या दबावाचा प्रतिकार करण्यासाठी मदत करू शकतो. (निर्गम २३:२; १ करिंथकर १०:१३) परंतु, तुम्ही देवाचे निर्देशन ऐकले पाहिजे. त्याचे म्हणणे तुमच्या अंतःकरणात जोपासून ठेवले पाहिजे. (स्तोत्रसंहिता ११९:९, ११) तुम्ही हे जाणणे जरूरीचे आहे की जेव्हा तरुण लोक स्वतःला दुसऱ्यापासून एकाकी करतात तेव्हा, लैंगिक इच्छा वाढते आणि देवाचा नियम मोडण्याकडे निरवते. “मी माझ्या प्रियकरासोबत एकांतात असते तेव्हा माझे शरीर काही तरी करू इच्छिते आणि माझे मन मला दुसरी गोष्ट करण्यास सांगते,” असे एका तरुणीने कबूल केले. यास्तव, तुमच्या मर्यादा जाणून घ्या आणि तुमचे हृदय कपटी आहे हे ओळखा. (यिर्मया १७:९) स्वतःला एकाकी करू नका. (नीतीसूत्रे १८:१) आपुलकीच्या आविर्भावांवर मर्यादा ठेवा. शिवाय विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे, यहोवावर प्रीती करणारे व त्याच्या नियमांबद्दल गाढ आदर राखणाऱ्यांबरोबरच जवळचा सहवास ठेवा.—स्तोत्रसंहिता ११९:६३; नीतीसूत्रे १३:२०; १ करिंथकर १५:३३.
१७. दुरात्म्यांच्या शिक्षणाचा प्रतिकार करण्यासाठी लागणारी शक्ती प्राप्त करण्यासाठी ख्रिस्ती युवकांना काय मदत करू शकते?
१७ तुमची आध्यात्मिकता मजबूत करण्यासाठी रचलेल्या ख्रिस्ती प्रकाशनांचा लक्षपूर्वक अभ्यास तुम्हाला मदत करू शकतो. उदाहरणार्थ, द वॉचटावर आणि अवेक! मधील अनेक लेख, शिवाय तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल या पुस्तकातील, “योग्य ते करण्यासाठी द्यावा लागणारा लढा” ह्या धड्याचा विचार करा. पुरविलेल्या शास्त्रवचनीय सूचना तुमच्या मन व अंतःकरणात खोलवर जावोत, म्हणजे ते तुम्हाला मजबूत करील. एक वस्तुस्थिती तुम्ही विसरू नये ती ही की, या दुरात्म्यांच्या नियंत्रणाखालच्या जगात, बरोबर ते करणे इतके सोपे नाही. त्यासाठी जोरदारपणे लढत द्या. (लूक १३:२४) तुमचे आध्यात्मिक बळ दृढ करा. जनसमूहाला अनुसरणाऱ्या दुर्बळ, भेकड, लोकांचे अनुकरण करू नका.
ईश्वरी शिक्षणाकडून लाभ मिळवा
१८. ईश्वरी शिक्षणाला अनुसरल्याने कोणते फायदे मिळतील?
१८ यहोवाच्या शिक्षणाला अनुसरल्यामुळे तुम्ही कोणतीही योग्यतेची गोष्ट गमावणार नाही, हेही लक्षात असू द्या. तो तुमच्यावर खरोखर प्रीती करतो, आणि म्हणूनच तो ‘जे हितकारक आहे तेच शिकवतो.’ (यशया ४८:१७) यास्तव, यहोवाच्या शिक्षणाला अनुसरा, आणि भग्न विवेक, स्वाभिमान गमावणे, लैंगिकरित्या होणारे गुप्तरोग, नको असलेले गरोदरपण आणि आणखी अशा अनेक विपत्तींना टाळा. मानव, परीक्षेत असताना देवाला कधीच विश्वासू राहणार नाहीत असे सैतानाने आव्हान केले होते. परंतु, यहोवाचे सेवक त्या आव्हानाला उत्तर देतात तेव्हा तो खूप आनंदित होतो. (ईयोब १:६-१२) यहोवाला विश्वासू राहिल्याने तुम्ही त्याचे हृदय आनंदी करू शकता. अशाप्रकारे, जेव्हा तो या जगाविरूद्ध प्रतिकूल न्यायदंड बजावेल व त्याच्या नियमांचा उद्दामपणे विरोध करणाऱ्यांचा नाश करील तेव्हा तुमचा बचाव होईल.—नीतीसूत्रे २७:११; १ करिंथकर ६:९, १०; १ योहान २:१७.
१९. यहोवाच्या शिक्षणाच्या फायद्यांची गुणग्राहकता बाळगणाऱ्यांसोबत सहवास राखण्याचे काय महत्त्व आहे?
१९ तुम्ही जर, यहोवाने त्यांच्यासाठी जे काही केले आहे त्याची गुणग्राहकता बाळगणाऱ्या अशा लोकांसोबत जवळचे नातेसंबंध ठेवले तर, तुम्हाला त्यांच्या अनुभवातून पुष्कळ गोष्टी शिकता येतात. पूर्वी व्यसनाधीन असलेल्या आणि अनैतिकता आचरणाऱ्या एका स्त्रीने म्हटले: “मी जर यहोवाचे ऐकले नसते तर मी मेले असते. मी ज्याच्याबरोबर विवाह करणार होते तो एड्समुळे मरण पावला. माझे पूर्वीचे सर्व जगिक मित्र एडस्मुळे मरण पावले आणि काहीजण मरणाच्या मार्गावर आहेत. मी त्यांना अनेक वेळा रस्त्याच्या कडेला पडलेले पाहते, आणि मी प्रत्येक दिवशी यहोवा देवाचे त्याच्या नियमांकरता आभार मानते जे त्याच्या लोकांवर प्रभाव करतात. आम्ही त्यांचे पालन केले तरच ते आम्हाला पवित्र राखतात. मी माझ्या जीवनामध्ये ह्या पूर्वी कधीही इतकी आनंदी, समाधानी आणि सुरक्षित नव्हते.” खरेच, यहोवाच्या शिक्षणाचे अनुकरण नेहमीच आम्हाला लाभदायक ठरते!
योग्य निवड करा
२०, २१. (अ) युवकांना कोणत्या दोन निवडी आहेत? (ब) ईश्वरी शिक्षणाला अनुसरल्याने कोणते चिरकाल फायदे मिळतील?
२० तुम्हा तरुणांना आम्ही आग्रह करतो की: यहोवाची सेवा करण्याची योग्य निवड करा. तसेच त्या निर्णयाला जडून राहण्यासाठी दृढनिश्चयी बना. (यहोशवा २४:१५) खरे पाहता, तुम्ही दोनातून एकच निवड करू शकता. येशूने म्हटले की, एक रुंद आणि पसरट मार्ग आहे—मनाला येईल तसे वागण्याचा तो सोपा मार्ग आहे. तो मार्ग धोक्याकडे, विनाशाकडे निरवतो. दुसरा मार्ग अरुंद आहे. ह्या अनैतिक, दुरात्म्यांच्या नियंत्रणाखालच्या जगात राहत असताना या मार्गावरून प्रवास करणे फार कठीण आहे. परंतु त्यावरून प्रवास करणाऱ्यांना तो मार्ग अखेरीस, देवाच्या आश्चर्यकारक नव्या जगात नेतो. (मत्तय ७:१३, १४) तुम्ही कोणत्या मार्गाने जाल? तुम्ही कोणाच्या शिक्षणाला अनुसराल?
२१ यहोवा, ती निवड करण्याचे तुमच्यावर सोपवून देतो. त्याची सेवा करण्याची तो तुमच्यावर जबरदस्ती करत नाही. ‘जीवन व मरण मी तुझ्यापुढे ठेवले आहे,’ असे देवाचा संदेष्टा मोशे म्हणाला. त्याने आर्जविले: “जीवन निवडून घे.” ही निवड, ‘आपला देव यहोवा ह्याच्यावर प्रीती केल्याने, त्याची वाणी ऐकल्याने व त्याला धरून राहिल्याने’ केली जाते. (अनुवाद २९:२; ३०:१९, २०) तुम्ही सुज्ञपणे ईश्वरी शिक्षणाला अनुसरण्याचे निवडावे व देवाच्या वैभवी नव्या जगात अनंतकाळच्या जीवनाचा आनंद लुटावा असे होवो.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
▫ दुरात्मे कोण आहेत, आणि ते काय शिकवतात?
▫ आज दुरात्मे त्यांचे शिक्षण कसे वाढवत आहेत?
▫ दुरात्म्यांच्या शिक्षणाचा प्रतिकार कशारीतीने शक्य आहे?
▫ यहोवाच्या शिक्षणाला अनुसरल्याचे कोणते फायदे आहेत?
[१६ पानांवरील चित्रं]
जलप्रलयाच्या आधी, आज्ञाभंजक देवदूत आणि त्यांच्या अपत्यांनी हिंसा आणि विषयासक्ती वाढवली
[१८ पानांवरील चित्रं]
येशूने तुमचे आवडते संगीत ऐकले तर तुम्हाला लाजिरवाणे वाटले असते का?