ही खरीच चोरी आहे का?
अबिओदुन, नायजेरिया येथील एका मोठ्या हॉटेलमध्ये, मुख्य वाढपी होता. एके दिवशी संध्याकाळी मेजवानीच्या खोलीच्या दरवाज्याला कुलूप लावताना त्याला, १,८२७ अमेरिकेतील डॉलर इतक्या किंमतीची रक्कम असलेली एक थैली सापडली. त्याने ती रक्कम, वेळ न दवडता परत केली. ती रक्कम त्या हॉटेलमध्ये पाहूणी म्हणून आलेल्या एका स्त्रीच्या मालकीची होती. हॉटेलच्या व्यवस्थापकांनी अबिओदुनची बढती केली आणि त्याला त्या “वर्षाचा सर्वात उत्तम कामगार” हे पारितोषिक दिले. ती रक्कम जिची होती त्या व्यक्तिने देखील त्याला बक्षीस दिले.
क्वालिटी नावाच्या एका स्थानिक वृत्तपत्राने, अबिओदुनला “चांगला शमरोनी” असे संबोधून ही कहाणी सादर केली आहे. क्वालिटीच्या वार्ताहारांनी, अबिओदुनला विचारले की, त्याला ते पैसे स्वतःसाठी ठेवून घ्यायचा मोह झाला नाही का, तेव्हा त्याने म्हटले: ‘मी एक यहोवाचा साक्षीदार आहे. यास्तव, माझ्या मालकीची नसलेली कोणतीही वस्तु मला सापडल्यास मी ती माझ्या मालकांना पुन्हा परत करतो.’
अबिओदुनचा प्रामाणिकपणा पाहून समाजातील अनेक जण अचंबित झाले. अबिओदुनचे सहसाक्षीदार जे घडले ते पाहून आनंदित झाले, परंतु त्यांना त्याचे आश्चर्य वाटले नाही. संपूर्ण जगभरात यहोवाचे साक्षीदार त्यांच्या उच्च तत्त्वांसाठी ओळखले जातात. त्यांच्यामध्ये प्रामाणिकपणा, ही काही अपवादात्मक गोष्ट नाही; तो एका कायदा आहे, खऱ्या ख्रिश्चनत्त्वाचा सर्वात आवश्यक भाग आहे.
परंतु कधीकधी, काही परिस्थितींमुळे, प्रामाणिकपणा काय आहे व काय नाही यामधील फरक ओळखण्यास कठीण जाते. ह्या परिस्थितीचा जरा विचार करा. फेस्टस, जो पश्चिम आफ्रिकेतील यहोवाच्या साक्षीदारांच्या एका मंडळीत देणग्या आणि जमाखर्चाचा कारभार सांभाळत होता, त्याला एकदा पैशांची खूप गरज होती.a त्याच्या पत्नीची एक गंभीर शस्त्रक्रिया करायची होती, व डॉक्टरांनी म्हटले होते की त्याला उशीर लावता कामा नये. त्या इस्पितळाने अर्धी रक्कम आगाऊ मागितली.
फेस्टसकडे इतके पैसे नव्हते. त्याने अनेकांकडे कर्ज मागितले पण त्याला कोणीही द्यावयास तयार नव्हते. तेव्हा, त्याच्याकडे जे पैसे सांभाळण्यासाठी होते, त्यांनाच खर्च करण्याचा त्याने विचार केला आणि असा तर्क केली की, ‘माझ्या पत्नीला मरणाच्या धोक्यापासून टाळण्यासाठी माझ्यामध्ये सामर्थ्य असतानाही मदत न करणे योग्य ठरेल का? मंडळीच्या रक्कमेतून थोडे पैसे “उसने” का घेऊ नये? लोकांनी माझ्याकडून घेतलेले पैसे मला पुन्हा दिल्यानंतर मी हे पैसे पुन्हा देऊ शकेन.’
फेस्टसने जे पैसे त्याच्या मालकीचे नव्हते ते इस्पितळाची रक्कम भरण्यासाठी वापरले. त्याचा हा युक्तीवाद बरोबर होता का? त्याने ज्या तातडीच्या परिस्थितीचा सामना केला त्या दृष्टिकोनातून पाहता त्याचे हे कृत्य समर्थनीय होते का?
ते पैसे कोणाचे आहेत?
या प्रश्नांचे परीक्षण करत असताना, फेस्टसने जे पैसे घेतले त्यांचा स्त्रोत व कोणत्या उद्देशास्तव वापरले जातात याविषयीच्या काही मुद्यांवर आपण संक्षिप्त रूपाने उजळणी करू या. ही निधी, स्वेच्छेने दान करणाऱ्या मंडळीतील त्या सदस्यांकडून येते ज्यांना यहोवाची शुद्ध भक्ती वाढवण्याची इच्छा आहे. (२ करिंथकर ९:७) ती रक्कम पगार देण्यासाठी वापरली जात नाही, कारण मंडळीतील कोणालाही ते जे काही काम करतात त्याबद्दल वेतन दिले जात नाही. उलटपक्षी, वर्गणीचा तो पैसा खासकरून एकत्र मिळण्याचे ठिकाण, सामान्यपणे एक राज्य सभागृह प्राप्त करण्यासाठी व त्याचा सांभाळ करण्यासाठी वापरला जातो. यामुळे, तरूण आणि वृद्ध, श्रीमंत आणि गरीब लोक, पवित्र शास्त्रीय शिक्षणासाठी एकत्र येऊ शकतील असे सोईस्कर, आणि आरामशीर ठिकाण मिळते.
ते पैसे कोणाचे आहेत? सामुदायिकपणे, ते मंडळीचे असतात. कोणीही सदस्य, ते पैसे कसे वापरावेत याचा व्यक्तिगतरीत्या निर्णय करू शकत नाही. वडील वर्ग मंडळीच्या नित्याच्या खर्चावर निर्देश करीत असले तरी, नेहमीपेक्षा निराळा खर्च आल्यावर, ती गोष्ट मान्यतेसाठी संपूर्ण मंडळीसमोर मांडतात.
उसने घेणे की चोरी?
हे घेतलेले पैसे लवकरात लवकर परत करण्याची योजना असल्यामुळे, फेस्टसने त्याच्या कृत्याकडे उसने घेण्याच्या दृष्टिने पाहिले. परंतु, वेबस्टर्स न्यू डिक्शनरी ऑफ सिनॉनम्स, “दुसऱ्याच्या मालकीची मालमत्ता सामान्यपणे चोरी करून अथवा त्याला माहीत नसताना, शिवाय बहुतेकवेळा त्याच्या संमतीविना घेणे किंवा काढून घेणे” यासाठी दुसरे शब्द वापरते. ते शब्द “चोरी” व “चोर” हे आहेत. फेस्टसने मंडळीच्या मालकीचे ते पैसे कोणाच्याही संमतीविना किंवा अधिकाराविना घेतले. याकारणास्तव, त्याच्यावर चोरी केल्याचा आरोप होता. तो एक चोर होता.
चोरी करण्यामागील प्रेरणेमध्ये, दोषास्पद प्रमाण असतात हे निश्चित. हे आम्ही यहुदा इस्कर्योतच्या उदाहरणावरून पाहू शकतो, ज्याच्याकडे येशू आणि त्याच्या विश्वासू प्रेषितांनी सुपूर्त केलेले पैसे होते. पवित्र शास्त्र म्हणते की: “तो [यहुदा] चोर असून त्याच्याजवळ डबी होती, व तिच्यात जे टाकण्यात येई ते तो चोरून घेई.” (योहान १२:६) सदोषी हृदय आणि पूर्णपणे लोभाने प्रवृत्त होऊन, यहुदा अधिकच वाईट झाला. सरतेशेवटी त्याने स्वतःला नैतिकरीत्या इतके नीच केले की, देवाच्या पुत्राचा, केवळ ३० चांदीच्या नाण्यांसाठी विश्वासघात केला.—मत्तय २६:१४-१६.
परंतु, फेस्टस त्याच्या आजारी बायकोच्या काळजीमुळे प्रवृत्त झाला होता. याचा अर्थ असा होतो का की तो दोषरहीत होता? मुळीच नाही. पवित्र शास्त्र, दुसरी एक तातडीची परिस्थिती असू शकणाऱ्या चोरीविषयी काय म्हणते ते पाहा: “चोर भुकेला असल्यामुळे त्याने आपला जीव शांत करण्याकरीता चोरी केली. तर त्याला लोक तुच्छ मानीत नाहीत. पण तो सापडला तर सातपट परत देईल; तो आपल्या घरची सर्व मत्ता देईल.” (नीतीसूत्रे ६:३०, ३१) दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर, पकडल्यावर, त्या चोराला नियमानुसार असलेली पूर्ण शिक्षा भोगावी लागत होती. मोशेच्या नियमशास्त्रानुसार, चोराला त्याने केलेला गुन्हा भरून काढावा लागत असे. याकारणास्तव, चोरी करण्याला उत्तेजन देणे किंवा समर्थन करणे यापेक्षा, पवित्र शास्त्र ताकीद देते की आकस्मिक निकडीच्या परिस्थितीत असताना चोरी केल्याचा परिणाम आर्थिक हानी, लाजिरवाणी गोष्ट, आणि त्याहूनही अधिक म्हणजे, देवाची कृपापसंती गमावणे यात होऊ शकतो.
यहोवाचे साक्षीदार या नात्याने, सर्व खऱ्या ख्रिश्चनांनी, विशेषकरून मंडळीमध्ये अधिक जबाबदाऱ्या सांभाळत असलेल्यांनी, उदाहरणीय, “अदुष्य” असे असले पाहिजे. (१ तीमथ्य ३:१०) फेस्टसला तो अपेक्षित असलेले पैसे मिळाले नाही आणि म्हणूनच तो देखील जी रक्कम त्याने घेतली होती ती पुन्हा देऊ शकला नाही. त्याचे हे कृत्य जाहीर झाले. त्याचे काय झाले? तो जर एक अपश्चातापी चोर असता तर, त्याला शुद्ध ख्रिस्ती मंडळीतून बहिष्कृत करण्यात आले असते. (१ पेत्र ४:१५) परंतु त्याच्या अंतःकरणाला तीव्र खेद झाला आणि त्याने पश्चाताप केला. यामुळेच, त्याने सेवेतील त्याचे सर्व विशेषहक्क गमावले असले तरी, तो मंडळीत राहू शकला.
देवावर भाव ठेवणे
प्रेषित पौलाने इशारा दिला की, यहोवाची सेवा करण्याचा दावा करणाऱ्या व्यक्तिने चोरी केली तर, देवाच्या नावावर आणि त्याचे नाव धारण करणाऱ्या लोकांवर निंदा येऊ शकते. पौलाने लिहिले: “दुसऱ्याला शिकविणारा तू स्वतःलाच शिकवीत नाहीस काय? चोरी करू नये अशी घोषणा करणारा तू स्वतःच चोरी करितोस काय? ‘तुम्हांमुळे परराष्ट्रीयांमध्ये देवाच्या नावाची निंदा होत आहे.’”—रोमकर २:२१, २४.
प्राचीन काळच्या आगूर नावाच्या एका सुज्ञ व्यक्तिने हाच मुद्दा स्पष्ट केला. त्याने त्याच्या प्रार्थनेत अशी विनवणी केली की, ‘दरिद्री राहून चोरी करून [त्याच्या] देवाच्या नामाची निंदा’ होऊ नये. (नीतीसूत्रे ३०:९) या सुज्ञ मनुष्याने कबूल केले की, दारिद्य्र अशी परिस्थिती आणू शकते ज्यामुळे एखादा नीतीमान व्यक्ती देखील चोरी करण्याच्या मोहात पडू शकतो. होय, खडतर काळ, एखाद्या ख्रिश्चनाचा यहोवाजवळ त्याच्या लोकांच्या गरजा पुरविण्याची क्षमता आहे या त्याच्यावरील विश्वासाची पारख घेऊ शकतील.
तरीही, यहोवाच्या निष्ठावान साक्षीदारांचा, ज्यामध्ये गरीबांचा देखील समावेश आहे, देवावर विश्वास आहे की, “त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे.” (इब्रीकरास ११:६) त्यांना हे माहीत आहे की, यहोवा त्याच्या विश्वासू जणांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करून प्रतिफळ देतो. येशूने त्याच्या डोंगरावरील प्रवचनात ही गोष्ट स्पष्ट केली, जेव्हा तो म्हणाला: “ह्यास्तव, काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे, असे म्हणत चिंता करत बसू नका . . . तुम्हाला ह्या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील.”—मत्तय ६:३१-३३.
ख्रिस्ती मंडळीतील गरजवंताना देव कशारीतीने पुरवतो? अनेक मार्गांनी. एक मार्ग म्हणजे, सहविश्वासूंद्वारे. देवाचे लोक एकमेकांसाठी खरी प्रीती प्रदर्शित करतात. ते पवित्र शास्त्रीय सल्ला गांभीर्याने घेतात की: “जवळ संसाराची साधने असून व आपला बंधू गरजवंत आहे हे पाहून जो स्वतःला त्याचा कळवळा येऊ देत नाही त्याच्या ठायी देवाची प्रीती कशी राहणार? मुलांनो, आपल्या शब्दांनी किंवा जिभेने नव्हे तर कृतीने व सत्याने आपण प्रीती करावी.”—१ योहान ३:१७, १८.
संपूर्ण जगभरात, ७३,००० पेक्षा अधिक मंडळ्यांमध्ये, पंचेचाळीस लाखांहून अधिक यहोवाचे साक्षीदार देवाच्या नीतीमान तत्त्वांनुरूप त्याची सेवा करण्यासाठी झटतात. त्यांना हे माहीत आहे की, देव त्याच्या निष्ठावान जणांचा कधीच त्याग करणार नाही. यहोवाची सेवा अनेक वर्षांपासून करत असलेले, राजा दाविदाच्या आवाजाच्या एकवाक्यतेत त्यांचा सूर मिळवतात, ज्याने लिहिले: “मी तरूण होतो आणि आता म्हातारा झालो; तरी नीतिमान निराश्रीत झालेला किंवा त्याची संतती भिकेस लागलेली मी पाहिली नाही.”—स्तोत्रसंहिता ३७:२५.
चोरी करण्याच्या मोहात पडून अनंतकाळासाठी देवाची पसंती गमावण्यापेक्षा, त्या शब्दांना प्रेरित करणाऱ्या देवावर विश्वास ठेवणे किती उत्तम ठरेल!—१ करिंथकर ६:९, १०.
[तळटीपा]
a नाव बदलले आहे.