“खोट्या कहाण्यांपासून दूर राहा”
पवित्र शास्त्र, लोकांचे अनुभव व कहाण्यांनी पूर्ण भरलेले आहे. त्यांच्या वाचनामुळे आम्हाला केवळ आनंदच मिळत नाही तर, त्यापासून आम्हाला फायदाही होतो. प्रेषित पौलाने रोममधील ख्रिस्ती मंडळीला लिहिले: “धीराच्या व शास्त्रापासून मिळणाऱ्या उत्तेजनाच्या योगे आपण आशा धरावी म्हणून जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपल्या शिक्षणाकरिता लिहिले.”—रोमकर १५:४.
पौलाने स्वतः अनुभव सांगण्यात सहभागिता केली. पौल आणि बर्णबा यांच्या पहिल्या मिशनरी यात्रेच्या समारोपाबद्दल पवित्र शास्त्र म्हणते: “तेथे [सूरियाच्या अंत्युखियास] पोहचल्यावर त्यांनी मंडळी जमवून आपण देवाच्या सहवासात असताना देवाने कायकाय केले आणि परराष्ट्रीयांकरता विश्वासाचे दार कसकसे उघडले, हे सांगितले.” (प्रे. कृत्ये १४:२७) या अनुभवांद्वारे बांधवांना अधिक उत्तेजन मिळाले असेल यात काही संशय नाही.
परंतु, सर्वच अनुभव उभारणीकारक नाहीत. पौलाने प्रेरणेद्वारे तीमथ्याला सावध केले: “अनीतीच्या व आयाबायांच्या [खोट्या] कहाण्यांपासून दूर राहा.” (१ तीमथ्य ४:७) शिवाय, तीताला त्याने लिहिले की प्रामाणिक ख्रिश्चनांनी “यहूदी [कल्पित, NW] कहाण्या आणि सत्यापासून बहकलेल्या माणसांच्या आज्ञा ह्यांकडे” लक्ष देऊ नये.—तीत १:१४.
काही खोट्या किंवा कल्पित कथा कोणत्या होत्या? या दोन्ही संज्ञा, ग्रीक मीʹथोस (“दंतकथा”) यापासून आल्या आहेत. द इंटरनॅशनल स्टॅण्डर्ड बायबल एन्साक्लोपिडीया सांगतो की, हे शब्द वर्णन करत असलेल्या “(धार्मिक) कहाण्यांचा वास्तविकतेशी काही संबंध नाही.”
पौलाच्या काळातील जग अशा कहाण्यांनी पूर्ण भरलेले होते. एक उदाहरण म्हणजे संशयात्मक विश्वसनीयतेचे तोबित पुस्तक होय, ज्याचे लिखाण कदाचित पौलाच्या समयाच्या दोनशे वर्षांआधी झाले असावे. ही कहाणी तोबित याविषयी सांगते, तो एक धर्मनिष्ठ यहुदी होता, त्याच्या डोळ्यात पक्षाची विष्ठा पडली तेव्हा तो अंधळा झाला. नंतर, कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी तो त्याचा पुत्र तोबायस याला पाठवतो. मार्गावर असताना, देवदूताच्या मार्गदर्शनाखाली तोबायस माशाचे हृदय, यकृत, आणि पित्त मिळवतो. पुढे, त्याची भेट एका विधवेशी होते, जिने सात वेळा विवाह केलेला असला तरी ती कुमारी राहिलेली असते, कारण दुरात्म्याने तिच्या प्रत्येक नवऱ्याला विवाहाच्या रात्रीच मारलेले असते. देवदूताच्या प्रेरणेमुळे तोबायस तिच्याबरोबर विवाह करतो व माशाचे हृदय व यकृत जाळून दुरात्म्याला घालवून देतो. नंतर माशाच्या पित्ताने तोबायस त्याच्या पित्याची दृष्टी परत मिळवून देतो.
ही कथा सत्य नाही हे स्पष्टच आहे. त्यात काल्पनिक स्वरुप आणि अंधश्रद्धेचे अपील असले तरी चुका आहेत. उदाहरणार्थ, अहवाल म्हणतो की, उत्तरेकडील गोत्रांचे बंड तसेच निनवेत हद्दपार केलेले इस्राएली या दोन्ही गोष्टींना तोबित याने पाहिले होते, इस्राएलांच्या इतिहासातील घटनांमध्ये २५७ वर्षांचे अंतर होते. तरीदेखील, ही कथा सांगते की तोबित मरण पावला तेव्हा त्याचे वय ११२ वर्षांचे होते.—तोबित १:४, ११; १४:१, द जरूसलेम बायबल.
अशा काल्पनिक कथा देवाच्या विश्वासू सेवकांनी घोषित केलेला “सुवचनांचा नमुना” यापासून वेगळ्या होत्या. (२ तीमथ्य १:१३) त्या कथा, कल्पना, ऐतिहासिक वास्तविकतेच्या विपरीत, भक्तीहीन म्हाताऱ्या आयाबायांनी सांगितलेल्या गोष्टी आहेत. ह्या कथांपासून ख्रिश्चनांनी दूर राहावयाचे होते.
सत्याच्या शब्दांची पारख करणे
आजही विपुल प्रमाणात अशाच प्रकारच्या कथा आहेत. पौलाने लिहिले: “ते [लोक] सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत, परंतु . . . सत्य ऐकण्यापासून फिरतील, व कल्पित कहाण्यांकडे वळतील, अशी वेळ येईल.” (२ तीमथ्य ४:३, ४) पृथ्वीवरील विशिष्ट भागात, अलौकिकतेच्या अनेक कथा असून त्या लोकप्रिय देखील आहेत. यास्तव ख्रिश्चन, त्या धार्मिक कथा, पवित्र शास्त्राच्या एकतेत आहेत का हे पाहण्यासाठी सुज्ञपणे त्यांच्या “शब्दांची पारख” करतात.—ईयोब १२:११.
अनेक कथा पवित्र शास्त्राच्या ऐक्यतेत नाहीत हे स्पष्टच आहे. उदाहरणार्थ, जगातील अनेक भागांमध्ये मानवी आत्मा अमर असतो या कल्पनेला पुष्टी देणाऱ्या अनेक कथा ऐकणे सर्वसाधारण आहे. या कथा, मनुष्य कसा मरतो, पुन्हा दिसण्यासाठी तो एकतर, नवीन जन्मलेल्या बालकाच्या, प्राण्याच्या शरीरात आत्म्याच्या रुपाने किंवा वेगळ्या ठिकाणातील मनुष्याच्या रुपाने दिसतो याचे वर्णन करतात.
परंतु, देवाचे वचन मानवी जीव अमर नसल्याचे दाखवते; जीव मरतो. (यहेज्केल १८:४) शिवाय, पवित्र शास्त्र सांगते की, मृत कबरेत निर्जीव असतात, विचार करु शकत नाहीत, बोलू किंवा काहीही करू शकत नाहीत. (उपदेशक ९:५, १०; रोमकर ६:२३) अशाप्रकारे, मानवी आत्मा अमर असतो या कल्पनेला चेतवणाऱ्या खोट्या कथांनी फसविले गेलेले, पौलाने म्हटल्याप्रमाणे पवित्र शास्त्राच्या “सुशिक्षणापासून” ‘दूर झालेले’ आहेत.
अलौकिकतेच्या कथा
इतर कथा, चेटकी व जादूगारांच्या कृत्यांविषयी आहेत. उदाहरणार्थ, आफ्रिकेच्या काही भागात, या दुष्टांच्या प्रतिनिधींजवळ भयानक शक्ती असते असे म्हटले जाते, ते स्वतःचा किंवा दुसऱ्यांचा सरपटणाऱ्या प्राण्यांत, माकडात, आणि पक्षाच्या रुपात बदल करु शकतात; त्यांचे कार्य साध्य करण्यासाठी ते हवेत उडू शकतात; प्रकट व नाहीसे होऊ शकतात; भिंतीमधून पलीकडे जाऊ शकतात; व जमिनीत गाडलेल्या गोष्टींना ते पाहू शकतात.
अशा विपुल प्रमाणात असलेल्या कथा व सोबत त्यांच्यावर केला जाणारा अधिक विश्वास, त्या कथा खऱ्या असल्याचा विश्वास ठेवण्यासाठी ख्रिस्ती मंडळीतील काहींवर प्रभाव पाडू शकतात. ते कदाचित असा तर्क करतील की, सामान्य मनुष्य अशा काही गोष्टी करू शकत नसल्यामुळे, आत्मिक प्राण्यांकडून, म्हणजे दुरात्म्यांकडून मिळालेल्या अलौकिक शक्तीमुळे ते अशा गोष्टी करू शकतील. अशा निष्कर्ष काढण्यासाठी वाटणारा आधार २ थेस्सलनीकाकर २:९, १० हा आहे, ते म्हणते: “ज्यांचा नाश होत चालला आहे त्यांनी आपले तारण साधावे म्हणून सत्याची आवड धरावयाची ती धरली नाही, त्यामुळे त्याच्यासाठी सैतानाच्या कृतीप्रमाणे सर्व प्रकारची खोटी महत्कृत्ये, चिन्हे, अद्भुते आणि सर्व प्रकारचे अनीतिजनक कपट ह्यांनी युक्त असे त्या अनीतिमानाचे येणे होईल.”
शक्तीशाली कृत्ये करण्यास सैतान समर्थ असल्याचे हे शास्त्रवचन सांगत असले तरी, सैतान हा “खोटी महत्कृत्ये आणि चिन्हे,” तसेच “अनीतिजनक कपट” ह्यांचा जनक असल्याचा उल्लेख ते करते. पवित्र शास्त्र सतत दाखवते की, सैतान हा आद्य फसविणारा आहे व तो ‘संपूर्ण जगाला ठकवीत’ आहे. (प्रकटीकरण १२:९) सत्य नसलेल्या गोष्टींवर लोकांना विश्वास ठेवण्यास कारणीभूत करण्यामध्ये तो प्रवीण आहे.
यामुळे, भूतविद्या व चेटक्यांमध्ये सापडलेल्यांची साक्ष व कबुली अनेकदा विश्वास ठेवण्यापलीकडील असते. असे लोक, त्यांनी पाहिलेल्या, ऐकलेल्या, किंवा अनुभवलेल्या एखाद्या गोष्टीवर प्रामाणिकपणे विश्वास ठेवतात; तरीपण, वस्तुतः ते तसे नसते. उदाहरणार्थ, मृत लोकांच्या आत्म्याबरोबर संपर्क केल्याचा विश्वास बाळगणारे असेही काही आहेत. परंतु ते गैरसमज झालेले, फसवले गेलेले, सैतानी लबाडीला बळी पडलेले आहेत. पवित्र शास्त्र सांगते की, “मेलेले निःशब्दस्थानी उतर”तात.—स्तोत्रसंहिता ११५:१७.
फसवण्याविषयी दियाबलाच्या इतिहासाला विचारात घेतल्यावर, अलौकिकतेच्या कथांची सत्यता संशयास्पदच वाटते. बहुतेक कथा, अंधश्रद्धेच्या कल्पनांनी शोधून काढल्या आहेत व त्यांना सतत सांगण्यामुळे त्यांचा अतिरेकीपणा होतो.
अशा काल्पनिक कथांना वारंवार सांगितल्यामुळे लबाडाचा बाप, दियाबल सैतानाच्या आवडीला प्रेरणा दिली जाते. (योहान ८:४४) यहोवाला घृणास्पद वाटणाऱ्या गूढ प्रघातांच्या आवडीला ते प्रेरणा देते. (अनुवाद १८:१०-१२) ते लोकांना भय आणि अंधश्रद्धेच्या जाळ्यात गुरफटते. यामुळेच, पौलाने ख्रिश्चनांना सल्ला दिला, “(खोट्या) कहाण्यांकडे . . . लक्ष देऊ नको,” हे आश्चर्याचे नाही.—१ तीमथ्य १:३, ४.
दुरात्म्यांच्या साक्षीला नाकारणे
एखादी कथा खरी वाटत असली तर त्याबद्दल काय? काही वेळा, दुरात्मे किंवा भुताटकी करणाऱ्यांनी यहोवाच्या सर्वश्रेष्ठतेला व त्याच्या साक्षीदारांचे खरेपण कबूल केल्याचे अनुभव कथन केले जातात. ख्रिश्चनांनी अशा कथांना पुन्हा कथित करावे का?
नाही, त्यांनी तसे करू नये. पवित्र शास्त्र सांगते की, दुरात्मे, येशू हा देवाचा पुत्र आहे असे ओरडले तेव्हा, तो “त्यांना सारखे निक्षून सांगत असे की मला प्रगट करू नका.” (मार्क ३:१२) अशाचप्रकारे, दैवप्रश्न सांगणाऱ्या दुरात्म्याने, एका मुलीला पौल आणि बर्णबा “परात्पर देवाचे दास” असल्याचे व “तारणाचा मार्ग” घोषित करणारे असल्याचे ओळखण्यास प्रवृत्त केले तेव्हा पौलाने तिच्यातील दुरात्म्याला काढून टाकले. (प्रे. कृत्ये १६:१६-१८) येशू, पौल किंवा कोणत्याही पवित्र शास्त्राच्या लेखकाने देवाच्या उद्देशाची किंवा त्याच्या निवडलेल्या सेवकांची साक्ष देण्यास दुरात्म्यांना परवानगी दिली नाही.
येशू पृथ्वीवर येण्याआधी आत्मिक क्षेत्रात राहिला होता हे देखील उल्लेखनीय आहे. त्याला सैतानाची वैयक्तिकपणे ओळख होती. तरीदेखील, येशूने त्याच्या शिष्यांना सैतानाच्या कार्यांच्या कथा सांगून त्यांची करमणूक केली नाही, किंवा दियाबल काय करु शकतो किंवा काय करु शकत नाही हे देखील सविस्तरपणे सांगितले नाही. सैतान आणि त्याचे दुरात्मे येशूचे मित्र नव्हते. ते बाहेर टाकलेले, बंडखोर, जे पवित्र आहे त्याचा द्वेष करणारे, व देवाचे शत्रू होते.
आम्हाला जे माहीत असण्याची गरज आहे ते पवित्र शास्त्र आम्हाला सांगते. ते दुरात्मे कोण आहेत, ते लोकांची कशी दिशाभूल करतात, आणि त्यांना आम्ही कसे टाळू शकतो याचे स्पष्टीकरण देते. ते दाखवते की, यहोवा आणि येशू दुरात्म्यांपेक्षा अधिक शक्तीशाली आहेत. ते आम्हाला शिकवते की, आम्ही यहोवाची प्रामाणिकपणे सेवा केल्यास, दुरात्मे कोणतीही कायमची इजा आम्हाला करू शकत नाहीत.—याकोब ४:७.
तर मग, या चांगल्या कारणामुळे, ख्रिश्चनांनी खोट्या कहाण्यांपासून, म्हणजे देवाचा विरोध करणाऱ्यांच्या आवडीला चेतवणाऱ्या कहाण्यांपासून दूर राहण्यास हवे. येशूने जशी ‘सत्याविषयी साक्ष दिली’ त्याप्रमाणे त्याचे अनुयायी आज देत आहेत. (योहान १८:३७) ते पवित्र शास्त्रातील सल्ला सुज्ञपणे ऐकतात: “जे काही सत्य . . . त्यांचे मनन करा.”—फिलिप्पैकर ४:८.
[३१ पानांवरील चित्रं]
खऱ्या ख्रिश्चनांनी गूढ असलेल्या सर्व आविष्कारांना पूर्णपणे टाळले पाहिजे