अनुकरण करण्यासाठी लीनतेची उदाहरणे
“तुझी लीनता मला थोरवी प्राप्त करून देईल.”—स्तोत्रसंहिता १८:३५, न्यूव.
१. वॉचटावर संस्थेच्या माजी अध्यक्षात लीनतेचा कोणता पुरावा पाहण्यास मिळतो?
जोसेफ एफ. रदरफोर्ड यांचे छाप पाडणारे व्यक्तिमत्त्व होते, त्यांची उंची सहा फुटापेक्षा अधिक व वजन ९० किलोग्रॅम पेक्षा अधिक होते. त्यांचा आवाज देखील फार प्रभावकारी होता, व त्याचा उपयोग त्यांनी, यहोवाच्या नावाची ओळख पूर्वी कधीही दिली नव्हती अशाप्रकारे देण्यासाठीच केवळ केला नाही, तर ख्रिस्ती धर्मजगतातील धार्मिक पुढाऱ्यांच्या लबाडीला देखील उघड करण्यासाठी केला. व त्यांनी त्यांच्या धर्माला “पाश व चैनीचे जीवन” ही संज्ञा दिली. त्यांची भाषणे प्रभावकारी होती तरी देखील, मुख्यालयातील बेथेल कुटुंबासोबत त्यांनी प्रार्थना केल्या तेव्हा, एखादा लहान मुलगा त्याच्या वडिलासोबत बोलत आहे असे वाटत होते, यास्तव याद्वारे त्यांनी त्यांच्या निर्माणकर्त्याबरोबरील सलगीचा संबंध व त्यांच्या लीनतेचा पुरावा दिला. होय, ते लहान मुलासारखे लीन होते.—मत्तय १८:३, ४.
२. कोणत्या विशिष्ट गोष्टीच्या बाबतीत यहोवाचे साक्षीदार जगातील लोकांपेक्षा ठळकपणे वेगळ्या भूमिकेत आहेत?
२ निश्चितच, यहोवाचे सर्वच खरे सेवक लीन आहेत. याबाबतीत ते, पूर्वीपेक्षा अधिक गर्विष्ठ लोकांनी भरलेल्या आजच्या जगामध्ये ठळकपणे दिसतात. उच्च आणि सामर्थ्यवान लोक, श्रीमंत व विद्वान, तसेच पुष्कळ गरीब व इतर मार्गात हानी झालेले सर्वच गर्विष्ठ आहेत.
३. गर्वाच्या फळांविषयी काय म्हटले जाऊ शकते?
३ गर्वामुळे झगडे आणि दुर्दशा अधिक होत असते. वस्तुतः एक देवदूत गर्विष्ठ झाल्यामुळे विश्वातील सर्वच अनर्थाला सुरवात झाली, जी उपासना केवळ निर्माणकर्त्या, यहोवा देवालाच द्यावयाची होती त्याप्रकारे स्वतःची उपासना केली पाहिजे अशी त्याची इच्छा होती. (मत्तय ४:९, १०) शिवाय, गर्वाच्या आकर्षणाद्वारे, पहिली स्त्री हव्वा हिला फसवण्यात यश मिळालेला व ज्याने स्वतःला दियाबल व सैतान बनवले तो आहे. हव्वाने मना केलेले फळ खाल्ल्यावर तिला बरे वाईट माहीत होऊन ती देवासारखी होऊ शकते याचे अभिवचन त्याने दिले. हव्वा लीन असती तर, तिने म्हटले असते की, ‘मी देवासमान होण्याची इच्छा तरी का धरावी?’ (उत्पत्ती ३:४, ५) मानवजात आज शारीरिक, मानसिक, आणि नैतिकतेच्या ज्या दुर्दैवी स्थितीत आहे त्याचा विचार केल्यावर, मानवाला गर्व दाखवण्याची कोणतीही सबब राहत नाही! यहोवा, “गर्व व अभिमान” यांचा द्वेष करतो असे आम्ही वाचतो तेव्हा यात काही आश्चर्य नाही! (नीतीसूत्रे ८:१३) सर्व गर्विष्ठ जनांच्या तुलनेत लीनतेची उदाहरणे देवाचे वचन, पवित्र शास्त्र यात सापडतात.
यहोवा देव लीन आहे
४. यहोवा लीन आहे हे कोणती शास्त्रवचने दाखवतात?
४ यहोवा देव, परात्पर, विश्वाचा सार्वभौम, अनंतकाळचा राजा, लीन आहे. (उत्पत्ती १४:२२) हे, असे असू शकते का? होय, निश्चितच! स्तोत्रसंहिता १८:३५ मध्ये नमूद केल्यानुसार दावीद राजाने म्हटले: “तू मला आपली तारणरूपी ढाल दिली आहे, आपल्या उजव्या हाताने मला उचलून धरले आहे, तुझ्या लीनतेमुळे मला थोरवी प्राप्त झाली आहे.” स्वतःच्या थोरवीचे श्रेय दाविदाने यहोवाच्या लीनतेला दिले हे स्पष्टच आहे. पुन्हा एकदा आम्ही स्तोत्रसंहिता ११३:६ मध्ये वाचतो की यहोवा, “आकाश व पृथ्वी ह्यांचे अवलोकन करण्यास लवतो.” दुसऱ्या भाषांतरात असे वाचले जाते, तो “पाहण्यासाठी खाली वाकतो,” (न्यू इंटरनॅशनल व्हर्शन) “खाली लवून पाहतो.”—मराठी कॉमन लँग्वेज भाषांतर.
५. यहोवाच्या लीनतेबद्दल कोणत्या घटना साक्ष देतात?
५ यहोवा देवाने सदोम आणि गमोरा या दुष्ट नगरांचा नाश करण्याचा निश्चय केला तेव्हा अब्राहामाला त्याच्या धार्मिकतेवर प्रश्न करण्यासाठी त्याने अनुमती देऊन, अब्राहामासोबत ज्यारीतीने व्यवहार केला त्याद्वारे असे दिसते की, तो निश्चितच निरभिमानी देव आहे.a (उत्पत्ती १८:२३-३२) तसेच एके प्रसंगी मूर्तीपूजा, व दुसऱ्या प्रसंगी बंड केल्यामुळे, यहोवाने इस्राएल राष्ट्राचा नाश करण्याविषयी त्याचे मत व्यक्त केले तेव्हा या दोन्ही प्रसंगी मोशेने जणू एखाद्या मानवासोबत बोलावे त्याप्रमाणे यहोवासोबत तर्क केला. परिणामतः, या प्रत्येक वेळी यहोवाने अनुकूल प्रतिसाद दिला. त्याच्या इस्राएल लोकांच्याबाबतीत, मोशेची विनवणी ऐकण्यासाठी त्याने लीनता दाखवली. (निर्गम ३२:९-१४; गणना १४:११-२०) मानवासोबत, व्यक्तिगतरित्या यहोवाची लीनतेने वागण्याविषयीची पूर्वीसारखी इतर उदाहरणे आहेत, जी, शास्ते ६:३६-४० व योना ४:९-११ मध्ये नमूद केल्याप्रमाणे गिदोन व योना यांच्याबाबतीत पाहावयास मिळतात.
६. यहोवाचे आणखी कोणते वैशिष्ट्य त्याच्या लीनतेला प्रकट करते?
६ वस्तुतः यहोवा, “मंदक्रोध” आहे असे कमीत कमी नऊ वेळा म्हटले आहे.b यहोवा अपरिपूर्ण मानवप्राण्यांसोबत व्यवहार करताना, हजारो वर्षांपासून सहनशील, मंदक्रोध आहे हा त्याच्या लीनतेचा आणखी एक पुरावा आहे. गर्विष्ठ लोक अधीर, त्वरीत क्रोध व्यक्त करणारे, मुळीच सहनशील नसणारे असतात. यहोवाची लीनता अपरिपूर्ण मानवांच्या गर्वाला कशी असमंजस बनवते! आम्हाला ‘देवाची प्रिय मुले या नात्याने अनुकरण करणारे होण्यासाठी’ सांगितले असल्यामुळे, आम्ही लीन असले पाहिजे, कारण तो देखील लीन आहे.—इफिसकर ५:१.
ख्रिस्ताचे लीनतेचे उदाहरण
७, ८. येशू ख्रिस्ताच्या लीनतेविषयी शास्त्रवचने काय सांगतात?
७ आम्ही अनुकरण करण्याजोगे लीनतेचे दुसरे अतिशय उल्लेखनीय उदाहरण १ पेत्र २:२१ मध्ये उद्धृत केले आहे: “कारण ह्याचकरिता तुम्हास पाचारण करण्यात आले आहे, कारण ख्रिस्तानेही तुम्हासाठी दुःख भोगले आणि तेणेकरून तुम्ही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुम्हाकरिता कित्ता घालून दिला आहे.” पृथ्वीवर मानव या नात्याने येण्याच्या बऱ्याच आधी, त्याच्याविषयी जखऱ्या ९:९ मध्ये भविष्यवाणी केली होती: “यरूशलेम कन्ये, गजर कर. पाहा! तुझा राजा तुजकडे येत आहे. तो न्यायी व यशस्वी आहे; तो लीन आहे, गाढवावर, गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे.” येशू ख्रिस्त, गर्विष्ठ असता तर, दियाबलाने त्याला देऊ केलेले जगाचे राज्य त्याने उपासनेच्या एका कृत्याच्या बदल्यात नक्कीच स्वीकारले असते. (मत्तय ४:९, १०) त्याच्या शिकवणीबद्दल सर्व श्रेय त्याने यहोवाला देण्याद्वारे लीनता दाखवली, तो म्हणाला: “जेव्हा तुम्ही मनुष्याच्या पुत्राला उंच कराल तेव्हा तुम्हाला समजेल की तो मी आहे, आणि मी आपण होऊन काही करीत नाही; तर मला पित्याने शिकविल्याप्रमाणे मी ह्या गोष्टी बोलतो.”—योहान ८:२८.
८ तो त्याच्या ऐकणाऱ्यांना यथायोग्यपणे म्हणू शकला की: “मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जूं आपणावर घ्या व माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जिवास विसावा मिळेल.” (मत्तय ११:२९) तसेच मानव या नात्याने प्रेषितांबरोबरील त्या शेवटच्या संध्याकाळी, त्यांचे पाय धुण्याद्वारे त्याने लीनतेचे किती उत्तम उदाहरण मांडले! (योहान १३:३-१५) यथायोग्यपणे, फिलिप्पैकर २:३-८ मध्ये प्रेषित पौल, उदाहरण म्हणून येशू ख्रिस्ताला उद्धृत करत, ख्रिश्चनांनी “लीन” असावे म्हणून त्यांना सल्ला देतो: “अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायीही असो, तो देवाच्या स्वरूपाचा असूनही, देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही. तर त्याने स्वतःला रिक्त केले म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. आणि मनुष्यप्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले.” त्याच्या जीवनातील मोठ्या त्रासाचा सामना करताना, येशूने लीनतेने त्याच्या पित्याला प्रार्थना केली: “माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” (मत्तय २६:३९) निसंशये, येशू ख्रिस्ताचे अनुयायी होण्यासाठी, त्याच्या पावलांचे जवळून अनुकरण करण्यासाठी आम्ही लीन असले पाहिजे.
प्रेषित पौल, लीनतेचे एक उत्तम उदाहरण
९-१२. प्रेषित पौलाने कशाप्रकारे लीनतेचे उत्तम उदाहरण मांडले?
९ प्रेषित पौलाने लिहिले: “जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करणारा आहे, तसे तुम्हीही माझे अनुकरण करणारे व्हा.” (१ करिंथकर ११:१) प्रेषित पौलाने लीन होऊन येशूच्या उदाहरणाचे अनुकरण केले का, की जेणेकडून लीनतेचे आणखी एक उदाहरण अनुकरण करण्यासाठी तो आम्हाला देतो? निश्चितच त्याने तसे केले. प्रथमतः तो येशू ख्रिस्ताचा दास आहे असे त्याने लीनतेने मान्य केले. (फिलिप्पैकर १:१) तो इफिसमधील वडिलांना, ‘नम्रपणे आसवे गाळीत आणि यहुद्यांच्या कटामुळे आलेली संकटे सोशीत प्रभुची सेवा’ केल्याबद्दल सांगतो. (प्रे. कृत्ये २०:१७-१९) तो लीन नसता तर त्याने रोमकर ७:१८, १९ मधील शब्दांना कधीच लिहिले नसते: “कारण मला ठाऊक आहे की, माझ्या ठायी म्हणजे माझ्या देहस्वभावात काही चांगले वसत नाही . . . कारण जे चांगले करावेसे मला वाटते ते मी करीत नाही, तर करावेसे वाटत नाही असे जे वाईट ते मी करतो.”
१० तसेच करिंथमधील ख्रिश्चनांना १ करिंथकर २:३ मध्ये पौलाने जे लिहिले होते, त्यावरून त्याच्या लीनतेची सूचकता दिसते: “मी तुमच्याजवळ अशक्त, भयभीत व अतिकंपित असा आलो.” ख्रिस्ती होण्याअगोदरच्या त्याच्या गतकाळातील अनुभवाला निर्देश करत लीनतेने त्याने लेखबद्ध केले: “मी . . . पूर्वी निंदक, छळ करणारा व जुलमी होतो. . . . ख्रिस्त येशू पापी लोकांना तारावयास जगात आला. त्या पापी लोकांपैकी मी मुख्य आहे.”—१ तीमथ्य १:१३, १५.
११ त्याच्या प्रयत्नांमुळे मिळालेल्या सर्व यशाचा संबंध यहोवा देवाबरोबर दाखवून त्याने पुढे लीनता प्रदर्शित केली. त्याच्या सेवेविषयी त्याने लिहिले: “मी लावले, अपुल्लोसाने पाणी घातले, पण देव वाढवीत गेला. म्हणून लावणारा काही नाही आणि पाणी घालणाराही काही नाही; तर वाढविणारा देव हाच काय तो आहे.” (१ करिंथकर ३:६, ७) शिवाय, आम्ही इफिसकर ६:१८-२० मध्ये वाचतो त्यानुसार, चांगल्यारीतीने साक्ष देता यावी म्हणून त्याच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी त्याने बांधवांना सांगितले: “माझ्यासाठीही विनवणी [प्रार्थना] करत राहा . . . [सुवार्तेचे पवित्र] रहस्य उघडपणे कळविण्यासाठी मी तोंड उघडीन तेव्हा मला शब्द सुचावे ह्यासाठी की जसे बोलावयास हवे तसे मला उघडपणे बोलता यावे.”
१२ पौलाने त्याची लीनता, इतर प्रेषितांना सहयोग देण्याद्वारे देखील दाखवली: “याकोब, केफा व योहान . . . त्यांनी मला व बर्णबाला भागीपणाचे उजवे हात दिले, यासाठी की आम्ही राष्ट्रांच्या लोकांकडे, व त्यांनी सुंता झालेल्याकडे जावे.” (गलतीकर २:९, पं. रमाबाई भाषांतर) शिवाय, चार मनुष्यांसोबत तो मंदिरात गेला व ते, व्रत पूर्ण करीत असताना त्यांचा खर्च देण्याकरवी यरूशलेम येथील वडिलांसोबत सहकार्य देण्याची स्वेच्छा त्याने दाखवली.—प्रे. कृत्ये २१:२३-२६.
१३. पौलाच्या लीनतेला कशाने उल्लेखनीय बनवले?
१३ यहोवा देवाने, पौलाचा उपयोग किती मोठ्या प्रमाणात केला याकडे लक्ष दिल्यावर त्याची लीनता अधिकच उल्लेखनीयरितीने दिसून येते. उदाहरणार्थ, आम्ही वाचतो की, “देवाने पौलाच्या हातून असाधारण चमत्कारही घडवले.” (प्रे. कृत्ये १९:११, १२) यापेक्षाही अधिक म्हणजे, त्याला अलौकिक दृष्टांत व प्रकटीकरणे दिली गेली. (२ करिंथकर १२:१-७) ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांच्या २७ पुस्तकांपैकी १४ पुस्तके (मुळात पत्रे) लिहिण्यासाठी त्याला ईश्वरी प्रेरणा मिळाली होती, याकडेही आम्ही दुर्लक्ष करू नये. एका अर्थी, या सर्वांमुळे तो उद्धट झाला नाही. त्याने स्वतःला लीन ठेवले.
आधुनिक-दिवसातील उदाहरणे
१४-१६. (अ) कशाप्रकारे वॉचटावर संस्थेचे पहिले अध्यक्ष लीनतेचे उत्तम उदाहरण होते? (ब) त्यांचे उदाहरण कोणाच्या तुलनेत ठळकपणे विरूद्धतेत असल्याचे दिसते?
१४ इब्रीयांस १३:७ मध्ये आपण प्रेषित पौलाचा सल्ला वाचतो: “जे तुमचे अधिकारी होते ज्यांनी तुम्हाला देवाचे वचन सांगितले त्यांची आठवण करा, त्यांच्या वागणूकीचा परिणाम लक्षात आणून त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा.” या तत्त्वाला अनुसरून आम्ही आधुनिक दिवसातील उदाहरण या दृष्टीने, वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीचे पहिले अध्यक्ष चार्लस् टेझ रसेल, यांच्या विश्वासाचे अनुकरण करू शकतो. ते लीन होते का? होय निश्चितच! त्यांच्या स्टडीज् इन द स्क्रिपचर्स या ३,००० पृष्ठे असलेल्या सहा खंडातील लिखाणाचे निरिक्षण केल्यावर, त्यात त्यांनी स्वतःविषयी केलेला उल्लेख एकदाही आढळत नाही. वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीची प्रकाशने लेखाच्या लेखकांची ओळख न देण्याद्वारे मनुष्याकडे लक्ष आकर्षित करत नाही, या तत्त्वाचे आज अनुकरण करतात.
१५ एकदा वॉचटावर मध्ये रसेल यांनी लिहिले की त्यांचे विरोधक वापरत असलेल्या “रसेलिझम” व “रसेलाइट” या संज्ञांविषयी त्यांना काहीही माहीत नाही, व त्यांनी निक्षून त्याचा नकार केला. त्यांनी लिहिले: “आमचे काम . . . विखुरलेल्या व अर्धवट सत्याला एकत्र आणून प्रभुच्या लोकांपुढे सादर करण्याचे आहे—ते नवे म्हणून नव्हे, आमचे स्वतःचे नव्हे, परंतु प्रभुचे. . . . प्रभु ज्या कामात आमची लीन बुद्धी वापरण्यासाठी संतुष्ट आहे ते काम, पुनर्बांधणी, सुव्यवस्था व मेळ घालणे या कामांपेक्षाही कमी उपक्रमाचे आहे.” खरेच, त्यांचे विचार १ करिंथकर ३:५-७ मधील प्रेषित पौलाच्या विचाराप्रमाणेच होते.
१६ त्यांची मनोवृत्ती चार्लस् डार्विनपेक्षा पूर्णपणे वेगळी होती. डार्विनच्या द ओरिजिन ऑफ स्पिशिज् (प्राण्यांच्या वर्गाच्या प्रकाराचा प्रारंभ, इंग्रजी) या १८५९ मधील पहिल्या आवृत्तीत, उत्क्रांतीविषयी त्याच्याआधी, इतरांनी काही लिहिले होते त्याकडे दुर्लक्ष करत त्याने अनेकदा, “माझा” सिद्धांत, असा उल्लेख केला आहे. त्या शतकातील नावाजलेला लेखक, सॅम्युएल बटलर यांनी डार्विनला, असे म्हणून बरेच खडसावले की, उत्क्रांतीचा मूळ आरंभ डार्विन कधीही नव्हता; त्याच्या आधी अनेकांनी उत्क्रांतीविषयी अनुमान काढले होते.
१७. बंधू रदरफोर्ड यांच्या लीनतेविषयी आणखी कोणती उदाहरणे आहेत?
१७ सुरवातीस उल्लेख केलेला, आणखी एक विश्वासू सेवक जोसेफ एफ. रदरफोर्ड यांचा आधुनिक दिवसात यहोवा देवाने अधिक मोठ्या प्रमाणात उपयोग केला. ते पवित्र शास्त्र सत्याची, विशेषपणे यहोवा देवाच्या नावाची घोषणा करण्यात धाडसी होते. त्यांना सर्वत्र न्यायाधीश रदरफोर्ड असे ओळखले जात असतानाही, ते स्वभावानेच फार लीन होते. उदाहरणार्थ, एकदा त्यांनी, १९२५ मध्ये ख्रिश्चनांनी कशाची अपेक्षा केली पाहिजे याविषयी काही निश्चित स्वरुपाची विधाने मांडली होती. त्यांनी अपेक्षा केलेल्या गोष्टींना, घटनामुळे यश आले नाही तेव्हा, त्यांनी लीनतेने त्यांच्या निर्णयशक्तीच्या उणीवेबद्दल ब्रुकलिन बेथेल कुटुंबाला सांगितले. बंधू रदरफोर्डसोबत घनिष्ट संगतीत असणाऱ्या अभिषिक्त ख्रिश्चनाने, त्यांनी [बंधू रदरफोर्ड] समविश्वासू ख्रिश्चनाला अव्यवहारी वक्तव्याने इजा केल्यामुळे मत्तय ५:२३, २४ च्या अनुषंगाने जाहीरपणे व व्यक्तिगतपणे क्षमा मागितल्याचे अनेकदा ऐकले असल्याचा पुरावा दिला. अधिकाराच्या पदावर असणाऱ्या व्यक्तीला त्याच्या अधीन असणाऱ्या लोकांची क्षमा मागण्यासाठी लीनतेची जरुरी लागते. मंडळीतील पर्यवेक्षक, फिरते पर्यवेक्षक असोत की संस्थेच्या शाखांमध्ये काम करणारे असोत या सर्वांसाठी बंधू रदरफोर्ड यांनी उत्तम उदाहरण घालून दिले आहे.
१८. संस्थेच्या तिसऱ्या अध्यक्षांनी व्यक्त केलेल्या कोणत्या शब्दांनी त्यांच्या मनाची लीनता दिसून येते?
१८ वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीचे तिसरे अध्यक्ष, नेथन एच. नॉर यांना देखील, यहोवाच्या लोकांत प्रमुख असतानाही, त्यांच्या पदामुळे ते इतरांपेक्षा उच्च आहेत असे वाटले नाही. व्यवस्था करण्याच्या व जाहीर भाषण देण्याच्या क्षमतेत ते वरचढ होते तरी, इतरांनी जे काम केले त्याबद्दल त्यांना खोल आदर होता. यास्तव, एकदा लेखन विभागातील एका सदस्याच्या कार्यालयाला भेट दिली तेव्हा त्यांनी म्हटले: “हा एक असा विभाग आहे की जेथे अतिशय महत्त्वपूर्ण, तसेच अतिशय कठीण काम चालते. या कारणामुळे मी यातील फारच कमी काम करतो.” होय, ‘लीनतेने एकमेकांना आपणांपेक्षा श्रेष्ठ माना,’ या फिलिप्पैकर २:३ मधील सल्ल्याचे अनुकरण ते लीनतेने करत होते. संस्थेचे अध्यक्ष या नात्याने सेवा करणे महत्त्वपूर्ण होते तरी, इतर कामे देखील महत्त्वपूर्ण होती, म्हणून त्यांनी गुणग्राहकता बाळगली. अशाप्रकारे विचार करण्यासाठी व तो अगदी स्पष्टपणे व्यक्त करण्यासाठी त्यांना लीनतेची गरज होती. सर्वांना, विशेषकरून देखरेखीचे प्रमुख स्थान असणाऱ्यांना अनुकरण करण्यासाठी ते आणखी एक उत्तम उदाहरण होते.
१९, २०. (अ) संस्थेच्या चवथ्या अध्यक्षांनी लीनतेचे कोणते उदाहरण प्रस्तुत केले? (ब) लीनता दाखवण्यासाठी पुढील लेख आम्हाला कोणती मदत पुरवील?
१९ संस्थेचे चवथे अध्यक्ष फ्रेड डब्ल्यू. फ्रांज देखील लीनतेचे आणखी एक उत्तम उदाहरण होते. संस्थेचे ३२ वर्षे उपाध्यक्ष असताना, मासिके आणि अधिवेशनाच्या कार्यक्रमाचे त्यांनी अधिक लिखाण केले होते; तरी त्यांनी सर्वदा स्वतःस मागे ठेवले व कधीही स्वतःवर लक्ष केंद्रित होऊ दिले नाही. अशाप्रकारचे प्राचीन काळातील उदाहरण उद्धृत केले जाऊ शकते. यवाबाने अम्मोनी लोकांचा राब्बा मध्ये पराभव केला तेव्हा, त्या विजयाचे श्रेय दावीद राजाला मिळण्याची खात्री त्याने केली.—२ शमुवेल १२:२६-२८.
२० खरेच, लीन राहण्यासाठी, गतकाळातील तसेच वर्तमान काळातील अनेक उत्तम उदाहरणे आम्हासाठी सबळ कारणे पुरवतात. तथापि, आम्ही लीन असावे यासाठी अनेक कारणे आहेत, ही कारणे तसेच लीन असण्यासाठी मदत करणाऱ्या गोष्टींचा पुढील लेखात विचार केला जाईल.
[तळटीपा]
a “निरभिमानी,” या शब्दाचा अर्थ अनेकदा, “श्रेष्ठपणाचा आव धरण्यासंबंधी,” वापरला जातो. परंतु त्याचा मुख्य अर्थ, व न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन मधील अर्थ—“मोकळेपणाने वागणे,” “उच्च विशेषाधिकारांना सोडून देणे” असा होतो.—पाहा वेबस्टर्स नाइन्थ कॉलिजिएट डिक्शनरी.
b निर्गम ३४:६; गणना १४:१८; नहेम्या ९:१७; स्तोत्रसंहिता ८६:१५; १०३:८; १४५:८; योएल २:१३; योना ४:२; नहूम १:३.
तुम्हाला आठवते का?
▫ गर्वाची फळे कोणती आहेत?
▫ लीनतेचे सर्वोत्कृष्ट उदाहरण कोणी प्रस्तुत केले?
▫ लीनतेचे दुसरे उत्कृष्ट उदाहरण कोण होते, हे कशामुळे समजते?
▫ लीनतेचे कोणते उत्तम उदाहरण पौलाने मांडले होते?
▫ आधुनिक दिवसात लीनतेची कोणती मुख्य उदाहरणे आम्हाजवळ आहेत?
[७ पानांवरील चित्रं]
येशूने लीनतेचे उत्कृष्ट सोदाहरण दिले
[८ पानांवरील चित्रं]
पौलाने लीनतेचे उत्तम उदाहरण मांडले
[९ पानांवरील चित्रं]
बंधू रसेल यांनी लिहिलेल्या गोष्टींचे श्रेय स्वतःकडे घेतले नाही