वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w93 १०/१ पृ. १३-१७
  • “हे देवा, माझी झडती घे”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “हे देवा, माझी झडती घे”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • देवाचे संकल्प किती मोलवान्‌ आहेत!
  • यहोवा ज्याचा द्वेष करतो त्याचा द्वेष करणे
  • देव आमची झडती घेतो तेव्हा
  • देव वास्तविकपणे तुम्हाला ओळखतो का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • यहोवाच्या मनासारखे हृदय संपादन करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • आपल्या हृदयाचे रक्षण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • आपली ‘अद्‌भुत रीतीने घडण’ झाली आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
w93 १०/१ पृ. १३-१७

“हे देवा, माझी झडती घे”

“हे देवा माझी झडती घेऊन माझे हृदय जाण; . . . मला सनातन मार्गाने चालीव.” —स्तोत्रसंहिता १३९:२३, २४.

१. यहोवा त्याच्या सेवकांबरोबर कसा व्यवहार करतो?

आम्हा सर्वांना वाटते की आमच्याशी व्यवहार करणारा कोणीतरी व्यक्‍ती समजदार, आमची परिस्थिती विचारात घेणारा, आम्ही चूक करतो तेव्हा आम्हाला मदत करणारा, आमच्या शक्यते पलिकडील गोष्टींची मागणी न करणारा, असा कोणीतरी असावा. यहोवा देव त्याच्या सेवकांबरोबर तसा व्यवहार करतो. स्तोत्रसंहिता १०३:१४ म्हणते: “तो आमची प्रकृती जाणतो, आम्ही केवळ माती आहो हे तो आठवतो.” आणि येशू ख्रिस्त आपल्या पित्याला पूर्णपणे प्रकट करतो, तो हार्दिक निमंत्रण देतो: “अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जूं आपणावर घ्या [किंवा, “माझ्या जूं खाली माझ्याबरोबर या,” रेफरन्स बायबल तळटीप] व माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जिवांस विसावा मिळेल; कारण माझे जूं सोयीचे व माझे ओझे हलके आहे.”—मत्तय ११:२८-३०.

२. (अ) येशू ख्रिस्त, आणि (ब) येशूचे अनुयायी, यांच्याबाबतीत यहोवाच्या आणि मानवाच्या दृष्टिकोनातील तफावत दाखवा.

२ यहोवाचे त्याच्या सेवकांविषयी असलेले दृष्टिकोन मानवापासून वेगळे आहेत. तो एखाद्या गोष्टीला विशिष्ट दृष्टिकोनातून पाहतो व इतरांना त्याविषयी काहीही माहीत नसेल अशा गोष्टीला तो विचारात घेतो. येशू ख्रिस्त या पृथ्वीवर असताना, “तुच्छ मानलेला, मनुष्यांनी टाकलेला” असा होता. तो मशीहा आहे असा ज्यांनी त्याच्यावर विश्‍वास ठेवला नाही, “त्यांनी त्याला मानले नाही.” (यशया ५३:३; लूक २३:१८-२१) तथापि, देवाच्या नजरेत तो “[देवाचा] प्रिय पुत्र,” होता, त्याविषयी पित्याने म्हटले होते की: “तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.” (लूक ३:२२; १ पेत्र २:४) येशूच्या अनुयायांमधील काही लोक, भौतिकरीत्या गरीब आणि अनेक संकटात धीराने टिकून राहिल्यामुळे त्यांना कनिष्ठ लेखले जात आहे. तथापि, यहोवा देव आणि त्याच्या पुत्राच्या नजरेत असे लोक श्रीमंत आहेत. (रोमकर ८:३५-३९; प्रकटीकरण २:९) या दृष्टिकोनात फरक का आहे?

३. (अ) लोकांविषयीचा यहोवाचा दृष्टिकोन मानवांपेक्षा अनेकदा वेगळा का आहे? (ब) आम्ही अंतरी कोण आहोत त्याचे परीक्षण करणे आमच्यासाठी का महत्त्वाचे आहे?

३ यिर्मया ११:२० याचे उत्तर देते: ‘अंतर्याम आणि हृदय पारखणारा परमेश्‍वर [यहोवा, न्यूव.] आहे.’ इतरांच्या नजरेपासून आमच्या व्यक्‍तिमत्त्वाचे पैलू गुप्त असले तरी तो आम्ही अंतरी कोण आहोत हे पाहत असतो. त्याच्या परीक्षणात, तो त्याच्याबरोबर चांगल्या नातेसंबंधासाठी आवश्‍यक असणारे गुण आणि परिस्थितीवर, आमच्यासाठी चिरकालिक लाभाच्या असणाऱ्‍या गोष्टीवर प्रामुख्याने जोर देतो. आम्हाला हे माहीत असणे धीर देणारे; तसेच विचारीपणाचे आहे. आम्ही अंतरी कोण आहोत याकडे यहोवा लक्ष देत असल्यामुळे, त्याच्या नव्या जगात त्याला कोणत्या प्रकारचे लोक पाहिजेत त्याप्रमाणे आम्ही स्वतः आहोत, हे शाबीत करण्यासाठी स्वतःचे परीक्षण करणे महत्त्वाचे आहे. असे परीक्षण करण्यास त्याचे वचन आम्हाला मदत करते.—इब्रीयांस ४:१२, १३.

देवाचे संकल्प किती मोलवान्‌ आहेत!

४. (अ) देवाचे विचार त्याच्यासाठी मोलवान्‌ होते असे म्हणण्यास स्तोत्रकर्ता कशाने प्रवृत्त झाला? (ब) आमच्यासाठी ते मोलवान्‌ का असले पाहिजेत?

४ देवाच्या सेवकांविषयी देवाच्या ज्ञानाची रुंदी आणि खोली यावर, तसेच त्यांना कोणत्याही मदतीची आवश्‍यकता भासल्यास ती देण्याची त्याची असामान्य क्षमता यावर मनन केल्यानंतर, स्तोत्रकर्ता दावीद याने लिहिले: “मला तुझे संकल्प किती मोलवान्‌ वाटतात! (स्तोत्रसंहिता १३९:१७अ) त्याच्या लिखित वचनात प्रकट केलेले त्याचे संकल्प, मानवांच्या कल्पना कितीही बुद्धिमानीच्या वाटत असल्या तरी त्यापेक्षा वरचढ आहेत. (यशया ५५:८, ९) देवाचे विचार, जीवनातील अधिक महत्त्वाच्या गोष्टीवर आमचे लक्ष ठेवण्यास व आवेशाने त्याची सेवा करण्यासाठी मार्गदर्शित करतात. (फिलिप्पैकर १:९-११) एखाद्या गोष्टीकडे देव जसा पाहतो त्याप्रमाणे पाहण्यासाठी ते दाखवतात. स्वतःशी प्रामाणिक असण्यासाठी आम्ही हृदयात कशाप्रकारची व्यक्‍ती आहोत हे प्रामाणिकपणे कबूल करण्यास ते आम्हाला मदत करते. तसे करण्यासाठी तुम्ही इच्छुक आहात का?

५. (अ) “सर्व रक्षणीय वस्तुंपेक्षा” कशाचे रक्षण करण्यास देवाचे वचन आम्हाला आर्जवते? (ब) पवित्र शास्त्रात काईनाविषयी असलेल्या वृत्तांताचा आम्हाला कसा फायदा होऊ शकतो? (क) आम्ही मोशेच्या नियमशास्त्राच्या अधीन नसलो तरी, यहोवाला काय संतोषविते ते समजण्यास आमची कशी मदत होते?

५ मानवांचा, बाहेरील स्वरूपावर अधिक जोर देण्याचा कल असतो परंतु शास्त्रवचने आम्हाला सल्ला देतात की: “सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर.” (नीतिसूत्रे ४:२३) कृती आणि उदाहरणाद्वारे पवित्र शास्त्र आम्हाला तसे करण्यासाठी मदत करते. ते आम्हाला सांगते की, काईनाने देवाला वरकरणी बलिदान अर्पण केले पण त्याचवेळी तो त्याचा भाऊ हाबेल याच्याविरूद्ध संतापाने हृदयात क्षुब्ध झाला व द्वेष वाढवीत राहिला. आम्ही त्याच्यासारखे होऊ नये म्हणून ते आम्हाला आर्जवते. (उत्पत्ती ४:३-५; १ योहान ३:११, १२) आज्ञाधारकपणाबद्दल मोशेच्या नियमशास्त्राच्या गरजांचा ते अहवाल देते. परंतु नियमशास्त्रातील प्रमुख आवश्‍यकतेवर देखील ते जोर देते की, जे यहोवाची उपासना करतात त्यांनी यहोवावर पूर्ण हृदयाने, मनाने, जीवाने आणि शक्‍तीने प्रीती केली पाहिजे; आणि दुसरी आज्ञा होती की जशी स्वतःवर तशी त्यांच्या शेजाऱ्‍यावर त्यांनी प्रीती करावयाची होती.—अनुवाद ५:३२, ३३; मार्क १२:२८-३१.

६. नीतीसूत्रे ३:१ वचनाचा अवलंब करताना, कोणते प्रश्‍न आम्ही स्वतःला विचारले पाहिजे?

६ नीतीसूत्रे ३:१, आम्हाला आर्जवते की केवळ देवाच्या आज्ञांचे पालन करणेच पुरेसे नाही तर आज्ञाधारकपणा जी खरेपणाने आमच्या हृदयात असलेली एक अभिव्यक्‍ती आहे त्याची खात्री आम्ही केली पाहिजे. वैयक्‍तिकपणे आम्ही स्वतःला असे विचारण्याची गरज आहे, ‘देवाच्या गरजांसाठी माझी आज्ञाधारकता खरी आहे का?’ काही गोष्टीत आमची मनोवृत्ती किंवा विचारसरणी अर्धवट आहे आणि आम्ही निर्दोष आहोत असे आमच्यातील कोणीही म्हणू शकत नाही, तर आम्ही स्वतःला असे विचारण्याची गरज आहे की, ‘परिस्थिती सुधारण्यासाठी मी काय करत आहे?’—नीतीसूत्रे २०:९; १ योहान १:८.

७. (अ) मत्तय १५:३-९ मध्ये येशूने परूशांवर जो दोषारोप लावला तो आम्हाला आमच्या हृदयाचे रक्षण करायला कशी मदत करू शकतो? (ब) कोणती परिस्थिती, आमच्या मनाला आणि हृदयाला कडक शिस्त लावण्याची मागणी करू शकते?

७ यहुदी परूशांनी, स्वतःच्या स्वार्थाच्या चालीरीतीला धूर्तपणे चालना देत असताना त्यांनी देवाचा आदर करत असल्याचे ढोंग केले, तेव्हा येशूने त्यांना ढोंगी संबोधून त्यांचा धिक्कार केला आणि त्यांची उपासना व्यर्थ असल्याचे त्याने दाखवले. (मत्तय १५:३-९) येशूने इशारा दिला की, हृदय पारखणाऱ्‍या देवाला संतुष्ट करत असताना, वासनेच्या सुखाचा अनुभव घेण्यासाठी, आम्ही नेहमी अनैतिक असणाऱ्‍या विचारात गढून जात असलो तर असे दिखाऊ नैतिक जीवन जगणे पुरेसे नाही. आमच्या मनाला आणि हृदयाला शिस्त लावण्यासाठी आम्ही कडक पावले उचलली पाहिजे. (नीतीसूत्रे २३:१२; मत्तय ५:२७-२९) आमच्या प्रापंचिक कामाच्या बाबतीत, शिक्षणातील आमच्या ध्येयासंबंधाने, किंवा करमणूकीच्या निवडीच्या बाबतीत आम्ही जगाचे अनुकरण करायला लागलो, आणि त्याच्या दर्जाप्रमाणे आम्ही स्वतःची घडण होऊ देण्यास त्याला अनुमती दिली तर अशाच प्रकारच्या शिस्तीची आम्हाला गरज आहे. जे देवाचे आहेत असा दावा करतात, पण ज्यांची जगाचे मित्र होण्याची इच्छा आहे, त्यांना शिष्य याकोब “व्यभिचारी” असे संबोधतो हे आम्ही कधीही विसरू नये. का बरे? कारण “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.”—याकोब ४:४; १ योहान २:१५-१७; ५:१९.

८. देवाच्या मोलवान्‌ विचारांपासून पूर्ण फायदा करून घेण्यासाठी आम्हाला काय करण्याची गरज आहे?

८ या आणि इतर विषयाच्या बाबतीत देवाच्या विचारापासून पूर्ण लाभ प्राप्त करून घेण्यासाठी, आम्ही त्यांचे वाचन करण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी वेळ बाजूला काढून ठेवला पाहिजे. याहीपेक्षा अधिक म्हणजे आम्ही त्याचा अभ्यास केला पाहिजे, त्याविषयी बोलले पाहिजे आणि त्यावर मनन केले पाहिजे. द वॉचटावरचे अनेक वाचक, यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळीच्या सभेला नियमित उपस्थित राहातात, जेथे पवित्र शास्त्रावर चर्चा केली जाते. असे करण्यासाठी ते इतर गोष्टीमधून वेळ बाजूला काढतात. (इफिसकर ५:१५-१७) आणि त्यातून त्यांना जे प्राप्त होते ते भौतिक संपत्तीपेक्षा बहुमोलाचे असते. असेच तुम्हालाही वाटत नाही का?

९. ख्रिस्ती सभांना उपस्थित असणारे काही जण इतरांपेक्षा लगेच प्रगती का करतात?

९ तथापि, उपस्थित राहणाऱ्‍या इतरांपेक्षा काही जण अधिक लवकर आध्यात्मिक प्रगती करतात. त्यांच्या जीवनात ते सत्याला पूर्णपणे लागू करतात. कशामुळे ते असे करू शकतात? अनेकदा त्याची प्रमुख गोष्ट, परिश्रमपूर्वक केलेला वैयक्‍तिक अभ्यास ही आहे. आम्ही केवळ भाकरीने जिवंत राहणार नाही; तर शारीरिक भोजनाप्रमाणे आध्यात्मिक भोजन नियमितपणे प्रत्येक दिवशी घेणे महत्त्वाचे आहे याची ते गुणग्राहकता बाळगतात. (मत्तय ४:४; इब्रीयांस ५:१४) यामुळे, पवित्र शास्त्राचे किंवा त्याचे [पवित्र शास्त्राचे] स्पष्टीकरण देणाऱ्‍या साहित्याचे वाचन करण्यासाठी प्रत्येक दिवशी ते काही वेळ घालवण्याचा प्रयत्न करतात. ते दिलेल्या साहित्याचा अगाऊ अभ्यास करण्याद्वारे आणि शास्त्रवचने पडताळण्याद्वारे मंडळीच्या सभांची तयारी करतात. ते साहित्याचे केवळ वाचन करण्यापेक्षा अधिक काही करतात; म्हणजे त्यावर मनन करतात. त्यांच्या अभ्यासाच्या सवयीमध्ये, जे काही शिकत असतात त्याचा प्रभाव त्यांच्या स्वतःच्या जीवनावर कसा झाला पाहिजे याचा ते गंभीरपणे विचार करतात हे यात समाविष्ट आहे. त्यांची आध्यात्मिकता जशी वाढते, तसे त्यांना स्तोत्रकर्त्याप्रमाणे वाटते, ज्याने लिहिले: “तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे! . . . तुझे निर्बंध आश्‍चर्यकारक आहेत.”—स्तोत्रसंहिता १:१-३; ११९:९७, १२९.

१०. (अ) देवाच्या वचनाचा अभ्यास किती काळापर्यंत करणे लाभदायक आहे? (ब) शास्त्रवचने हे कसे प्रकट करतात?

१० देवाचे विचार आम्हाला बहुमोल असल्यास, आम्ही त्याच्या वचनाचा अभ्यास एक वर्ष, ५ वर्षे, किंवा ५० वर्षे केलेला असला तरीही, त्याची केवळ पुनरावृत्ती होत असल्याचे आम्हाला कधीही वाटणार नाही. आम्हापैकी काहीजण शास्त्रवचनांपासून कितीही शिकले असले तरी, आम्हाला माहीत नाही असे पुष्कळ काही आहे. दाविदाने म्हटले: “हे देवा, त्यांची संख्या किती मोठी आहे? ते मी गणू लागलो तर वाळूच्या कणांपेक्षा अधिक ठरतील.” देवाच्या विचारांची गणती करणे आमच्या क्षमतेपलिकडील आहे. देवाच्या विचारांची गणती आम्ही दिवसभर केल्यावर गाढ झोपी गेलो, आणि सकाळी पुन्हा उठलो तरी विचार करण्यासाठी आणखी पुष्कळ बाकी असेल. यास्तव, दाविदाने लिहिले: “मला जाग येते तेव्हाही मी तुझ्याजवळच असतो.” (स्तोत्रसंहिता १३९:१७, १८) यहोवा आणि त्याच्या मार्गांविषयी आम्हाला शिकण्यासारखे काही अनंतकाळापर्यंत असेल. आम्हाला सर्वच माहीत आहे याप्रत आम्ही कधीही पोहचू शकणार नाही.—रोमकर ११:३३.

यहोवा ज्याचा द्वेष करतो त्याचा द्वेष करणे

११. देवाचे विचारच केवळ माहीत असणे पुरेसे नाही तर त्याच्या भावनांची सहभागिता करणे का महत्त्वाचे आहे?

११ देवाच्या वचनाचा अभ्यास म्हणजे केवळ वास्तविकतांनी आमचे डोके भरवणे असे नाही. देवाचे विचार जसे आम्ही आमच्या हृदयात जाऊ देतो तसे आम्ही देवाच्या भावनांची सहभागिता करण्यास सुरवात करतो. ते किती महत्त्वाचे आहे बरे! पण तशी भावना आम्ही वाढू दिली नाही तर, त्याचा परिणाम काय होऊ शकतो? पवित्र शास्त्र काय म्हणते हे आम्ही पुनः सांगत असलो तरी, मना केलेल्या गोष्टी इष्ट आहेत किंवा मागणी केलेले ओझ्यासमान आहे अशा दृष्टीने आपण त्याकडे पाहू लागतो. जे चुकीचे आहे त्याचा आम्ही द्वेष केला तरी, मानवी अपरिपूर्णतेमुळे आम्हाला झगडावे लागत आहे हे खरे आहे. (रोमकर ७:१५) परंतु आम्ही अंतरी कोण आहोत त्याचा मेळ जे बरोबर आहे त्याप्रमाणे करण्यासोबत घालण्याचा परिश्रमपूर्वक प्रयत्न केला नाही तर ‘हृदये पारखणाऱ्‍या’ यहोवा देवाला संतुष्ट करण्याची आम्ही अपेक्षा करू शकतो का?—नीतीसूत्रे १७:३.

१२. ईश्‍वरी प्रीती आणि ईश्‍वरी द्वेष किती महत्त्वपूर्ण आहे?

१२ ईश्‍वरी प्रीती जे बरोबर ते करण्यासाठी आनंदाचे बनविते तसे, ईश्‍वरी द्वेष वाईट काम करण्याविरूद्ध शक्‍तीशाली संरक्षण आहे. (१ योहान ५:३) वारंवार शास्त्रवचने आम्हाला प्रीती आणि द्वेष दोहोंना वाढवण्यासाठी आर्जवितात. “अहो परमेश्‍वरावर [यहोवा, न्यूव.] प्रीती करणाऱ्‍यांनो वाईटाचा द्वेष करा.” (स्तोत्रसंहिता ९७:१०) “वाईटाचा वीट माना [तिटकारा करा, न्यूव.] बऱ्‍याला चिकटून राहा.” (रोमकर १२:९) आम्ही ते करीत आहोत का?

१३. (अ) दुष्टांच्या नाशाबद्दल दाविदाच्या कोणत्या प्रार्थनेशी आम्ही पूर्ण सहमतात आहोत? (ब) दाविदाच्या प्रार्थनेत दाखवल्याप्रमाणे, दुष्ट लोक कोण होते की ज्यांचा नाश करण्याची त्याने देवाला प्रार्थना केली?

१३ दुष्टांना पृथ्वीवरून नाश करण्याविषयी तसेच नव्या पृथ्वीवर धार्मिकता वास करण्याविषयी त्याचा उद्देश यहोवाने स्पष्टपणे नमूद केला आहे. (स्तोत्रसंहिता ३७:१०, ११; २ पेत्र ३:१३) धार्मिकतेचे प्रेमी तो काळ येण्याची वाट पाहून आहेत. ते स्तोत्रकर्त्या दाविदाबरोबर पूर्णपणे सहमतात आहेत, ज्याने प्रार्थना केली: “हे देवा, तू दुर्जनांस ठार मारून टाक; अहो रक्‍तपात करणाऱ्‍यांनो, माझ्यापासून दूर व्हा. ते तुझ्याविरूद्ध कपटाने बोलतात, तुझे वैरी तुझे नाव व्यर्थ घेतात.” (स्तोत्रसंहिता १३९:१९, २०) अशा दुष्ट लोकांचा स्वतः नाश करण्याची दावीद वाट पाहून नव्हता. त्यांना यहोवाकडून शिक्षा मिळण्यासाठी त्याने प्रार्थना केली. (अनुवाद ३२:३५; इब्रीयांस १०:३०) ज्यांनी दाविदाला वैयक्‍तिकपणे दुःख दिले असे ते लोक नव्हते. त्यांनी देवाचे नाव व्यर्थ घेऊन देवाचा विपर्यास केला होता. (निर्गम २०:७) त्याची सेवा करण्याचा त्यांनी लबाडीने दावा केला, परंतु त्यांच्या स्वतःच्या योजनांना चालना देण्यासाठी ते त्याच्या नावाचा वापर करीत होते. देवाचा शत्रू होण्याची जे निवड करतात त्यांच्याविषयी दाविदाला कसलेही प्रेम नव्हते.

१४. ज्यांना मदत केली जाऊ शकेल असे दुष्ट लोक आहेत का? असल्यास, कशाप्रकारे?

१४ करोडो असे लोक आहेत जे यहोवाला ओळखत नाहीत. अनेक लोक, अजाणतेत देवाच्या वचनात सांगितलेल्या वाईट गोष्टीचे आचरण करतात. असे करणे त्यांनी चालू ठेवल्यास, मोठ्या संकटात नाश होणाऱ्‍यांमधील ते देखील असतील. तथापि, यहोवा देव दुष्टाच्या मरणाने आनंदी होत नसल्यामुळे आम्ही देखील आनंदी होऊ नये. (यहेज्केल ३३:११) वेळ अनुमती देत आहे तोवर, आम्ही अशा लोकांना यहोवाचे मार्ग शिकण्यासाठी आणि त्यांचा अवलंब करण्यास मदत केली पाहिजे. परंतु यहोवासाठी काही लोक तीव्र द्वेष दाखवत असल्यास काय?

१५. (अ) स्तोत्रकर्त्याने ‘खरे शत्रू’ मानलेले लोक कोण होते? (ब) यहोवाविरूद्ध जे बंडाळी करतात अशांचा आम्ही “द्वेष” करतो हे आज आम्ही कसे दाखवू शकतो?

१५ त्यांच्याविषयी स्तोत्रकर्त्याने म्हटले: “तुझा द्वेष करणाऱ्‍यांचा मी का द्वेष करू नये? तुझ्यावर उठणाऱ्‍यांचा मला वीट [तिटकारा, न्यूव.] का येऊ नये? मी त्यांचा पराकाष्ठेचा द्वेष करतो; मी त्यांना आपले शत्रू मानतो.” (स्तोत्रसंहिता १३९:२१, २२) त्यांनी यहोवाचा तीव्रपणे द्वेष केल्यामुळे दाविदाने त्यांचा तिटकारा केला. यहोवाविरुद्ध बंडाळी करण्याद्वारे त्याचा द्वेष प्रकट करणाऱ्‍यांमध्ये धर्मत्यागी लोकांचा देखील समावेश होतो. धर्मत्याग हा खरेपणाने यहोवा देवाविरूद्ध केलेले एक बंड आहे. काही धर्मत्यागी लोक, ते देवाला ओळखतात आणि त्याची सेवा करतात असा दावा करतात, परंतु त्याच्या वचनात नमूद केलेल्या शिकवणी आणि गरजांना मात्र ते नाकारतात. इतरजण पवित्र शास्त्रावर भरवसा ठेवत असल्याचा दावा करतात, परंतु ते यहोवाच्या संस्थेचा नकार करतात आणि तिचे कार्य थांबवण्यासाठी ते सक्रियपणे प्रयत्न करतात. जे बरोबर आहे ते माहीत झाल्यावर जाणूनबुजून वाईट करण्याची जे निवड करतात, तसेच वाईट त्यांच्या स्वभावातच रुजून एक अतुट भाग बनते तेव्हा वाईटाशी अतुट संबंध असणाऱ्‍यांचा ख्रिश्‍चनांनी द्वेष (या शब्दाच्या पवित्र शास्त्रीय अर्थानुसार) केला पाहिजे. अशा धर्मत्यागी लोकांविरूद्ध खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी यहोवाची भावना ठेवली पाहिजे; म्हणजे ते धर्मत्यागी कल्पनाविषयी जिज्ञासू नाहीत. उलटपक्षी, ज्यांनी स्वतःला देवाचा शत्रू बनविले आहे अशांचा त्यांना “तिटकारा” आहे, परंतु सूड घेण्याचे ते यहोवावर सोडून देतात.—ईयोब १३:१६; रोमकर १२:१९; २ योहान ९, १०.

देव आमची झडती घेतो तेव्हा

१६. (अ) यहोवाने त्याची झडती घ्यावी अशी अपेक्षा दावीद का करत होता? (ब) आमच्या हृदयाच्या बाबतीत असे काय आहे की ज्याचे मर्म ओळखण्यासाठी आम्ही देवाकडे विचारणा केली पाहिजे?

१६ काही झाले तरी दुष्टासारखे होण्याची दाविदाची इच्छा नव्हती. अनेक लोक त्यांच्या आतील व्यक्‍तिमत्त्वाला गुप्त ठेवतात, परंतु दाविदाने नम्रपणे प्रार्थना केली की: “हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण; मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण. माझ्या ठायी दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पाहा. आणि मला सनातन मार्गाने चालीव.” (स्तोत्रसंहिता १३९:२३, २४) दाविदाने त्याच्या हृदयाचा उल्लेख केला तेव्हा तो शारीरिक इंद्रियाविषयी बोलत आहे असा त्याचा अर्थ नव्हता. त्या शब्दप्रयोगाच्या लाक्षणिक अर्थानुरूप त्याने त्याच्या आतील व्यक्‍तिमत्त्वाचा उल्लेख केला. आम्ही देखील आमच्या मध्ये चुकीच्या अभिलाषा, आपुलकीची भावना, उद्देश, विचार किंवा काही प्रवृत्त्या आहेत का याविषयी आमच्या हृदयाची झडती घेतली पाहिजे. (स्तोत्रसंहिता २६:२) यहोवा आम्हाला निमंत्रण देतो: “माझ्या मुला, तू आपले चित्त [हृदय, न्यूव] मला दे, माझे मार्ग तुझ्या दृष्टीला आनंद देवोत.”—नीतीसूत्रे २३:२६.

१७. (अ) अस्वस्थ करणाऱ्‍या विचारांना गुप्त ठेवण्याऐवजी, आम्ही काय केले पाहिजे? (ब) आमच्या हृदयात चुकीच्या प्रवृत्त्या आढळल्यास त्यामुळे आम्हाला आश्‍चर्य वाटावे का, आणि त्याविषयी आम्ही काय करावे?

१७ आम्हामध्ये चुकीच्या अभिलाषांमुळे किंवा चुकीच्या प्रवृत्त्यांमुळे किंवा आम्ही केलेल्या गैरवर्तनामुळे काही गुप्त दुःखदायक, अस्वस्थ करणारे विचार असतील तर, त्यांना सुधारण्यासाठी यहोवाने आम्हाला मदत करावी अशी इच्छा बाळगली पाहिजे. “दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती” या शब्दाऐवजी, मॉफेट भाषांतर “चुकीचा मार्ग” असा शब्दप्रयोग वापरते; न्यू इंग्लिश बायबल म्हणते: “त्याला [देवाला] दुःखित करणारा कोणताही मार्ग.” आम्हा स्वतःला देखील आमचे अस्वस्थ विचार स्पष्टपणे समजत नसतील आणि म्हणून देवाला आमची समस्या कशी सांगावी हे आम्हाला कळत नसेल, परंतु तो आमची परिस्थिती समजतो. (रोमकर ८:२६, २७) म्हणून आमच्या हृदयात वाईट भावना असल्यास आम्हाला आश्‍चर्य वाटू नये; तथापि, आम्ही त्यांची सबब देखील सांगू नये. (उत्पत्ती ८:२१) त्यांना समूळ काढून टाकण्यासाठी आम्ही देवाची मदत घेतली पाहिजे. यहोवा देवावर आणि त्याच्या मार्गावर आम्ही खरेपणाने प्रीती करीत असल्यास, “आपल्या मनापेक्षा [अंतःकरण, न्यूव.] देव थोर आहे; त्याला सर्व काही कळते” हा भरवसा ठेवून आम्ही त्याच्याकडे मदतीसाठी गेले पाहिजे.—१ योहान ३:१९-२१.

१८. (अ) यहोवा आम्हाला सनातन मार्गाने कसे चालवतो? (ब) आम्ही यहोवाच्या निर्देशनांचा अवलंब सतत केल्यास, कोणती हार्दिक प्रशंसा आम्हाला मिळेल याची आम्ही अपेक्षा करू शकतो?

१८ यहोवा त्याला सनातन मार्गाने चालवणार, या स्तोत्रकर्त्याच्या प्रार्थनेच्या अनुषंगाने, निश्‍चितच यहोवा त्याच्या नम्र, आज्ञाधारक सेवकांना चालवत आहे. दीर्घकाळच्या जीवनाचा अर्थ, दुष्कृत्यामुळे त्यांचा अकाली नाश होऊ नये असा नाही तर तो त्यांना सार्वकालिक जीवनाच्या मार्गाने चालवतो असा आहे. पापाच्या प्रायश्‍चितासाठी येशूच्या बलिदानाच्या मूल्याची गरज आहे हे तो आमच्या मनावर बिंबवतो. त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो त्याचे वचन आणि संस्थेद्वारे आम्हाला आवश्‍यक माहिती पुरवितो. आमचे बाहेरील व्यक्‍तिमत्त्व आम्ही ज्याप्रकारे प्रदर्शित करतो तसेच अंतरी देखील असले पाहिजे म्हणून त्याच्या मदतीला आम्ही प्रतिसाद देण्याच्या महत्त्वावर तो जोर देतो. (स्तोत्रसंहिता ८६:११) एकाच खऱ्‍या देवाची सेवा करण्यासाठी, एका धार्मिक नव्या जगात, अनंतकालच्या जीवनासोबत परिपूर्ण स्वास्थ्याच्या भवितव्याविषयी तो आम्हाला उत्तेजन देतो. त्याच्या मार्गदर्शनांना जर आम्ही निरंतर निष्ठावंतपणे प्रतिसाद दिला, तर त्याने त्याच्या पुत्राला: “तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे” असे जे म्हटले, तेच आमच्याही बाबतीत तो म्हणू शकेल.—लूक ३:२२; योहान ६:२७; याकोब १:१२.

तुमचे विवेचन काय आहे?

▫ यहोवाचा दृष्टिकोन त्याच्या सेवकांविषयी मानवांपेक्षा अनेकदा वेगळा का आहे?

▫ देव आमच्या हृदयाचे परीक्षण करताना काय पाहतो हे ओळखण्यासाठी आम्हाला काय मदत करु शकते?

▫ वास्तविकतेविषयी शिकण्यासाठी आणि आमच्या हृदयाचे रक्षण करण्यासाठी कशाप्रकारचा अभ्यास आम्हाला मदत करतो?

▫ देव काय म्हणतो केवळ तेच माहीत असणे पुरेसे नाही तर त्याच्या भावनांची सहभागिता करणे महत्त्वाचे का आहे?

▫ आम्ही वैयक्‍तिकपणे, “हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण” अशी प्रार्थना का केली पाहिजे?

[१४ पानांवरील चित्रं]

अभ्यास करताना, देवाचे विचार आणि भावना स्वतःची करण्यासाठी प्रयत्न करा

[१५ पानांवरील संक्षिप्त आशय]

यहोवाचे विचार “वाळूच्या कणांपेक्षा अधिक आहेत”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा