ख्रिस्ती कुटुंब आध्यात्मिक गोष्टींना प्रथम स्थानी ठेवते
“शेवटी, तुम्ही सर्व एकचित्त, समसुखदुःखी, बंधुप्रेम करणारे, नम्र मनाचे व्हा.”—१ पेत्र ३:८.
१. कोणती निवड आम्हा सर्वांपुढे आहे आणि आमच्या निवडीचा परिणाम भवितव्यावर कसा होतो?
मानवजातीची सर्वात जुनी संस्था—कुटुंब, याला वरील वचन किती उचितपणे लागू होते बरे! आणि या बाबतीत पालकांनी पुढाकार घेणे किती महत्त्वपूर्ण आहे! पालकांचे सकारात्मक आणि नकारात्मक गुण मुलांमध्ये बहुधा सहजपणे दिसून येतील. तथापि, निवड करण्याची सुसंधी ही कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर अवलंबून आहे. ख्रिस्ती या नात्याने आम्ही आध्यात्मिक व्यक्ती किंवा दैहिक व्यक्ती असण्याची निवड करु शकतो. आम्ही देवाला खूष किंवा नाखूष करण्याची निवड करु शकतो. त्याचे पर्यवसान सार्वकालिक जीवन आणि शांतीच्या आशीर्वादात—किंवा कायमचा मृत्यू या शापामध्ये होऊ शकते.—उत्पत्ती ४:१, २; रोमकर ८:५-८; गलतीकर ५:१९-२३.
२. (अ) पेत्राने कुटुंबासाठी असलेली त्याची काळजी कशी दाखवली? (ब) आध्यात्मिकता काय आहे? (तळटीप पहा.)
२ पती आणि पत्नींना उत्तम सल्ला दिल्यानंतर लगेचच १ पेत्र ३रा अध्याय व ८व्या वचनातील प्रेषिताचे शब्द आले. पेत्र ख्रिश्चन कुटुंबाच्या कल्याणासाठी खरोखरच आस्थेवाईक होता. त्याला माहीत होते की ऐक्याच्या दयाळू आणि मायाळू कुटुंबाची बळकट आध्यात्मिकता ही गुरूकिल्ली आहे.a अशाप्रकारे, ७व्या वचनात त्याने दर्शवले की जर पतींना दिलेल्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले तर त्याचा परिणाम पती आणि यहोवा यांच्यामध्ये एक आध्यात्मिक अटकाव होऊ शकतो. पतीने त्याच्या पत्नीच्या गरजांकडे दुर्लक्ष केले किंवा तिला निष्ठुरपणे चिरडले तर त्याच्या प्रार्थनांना अडथळा येऊ शकतो.
ख्रिस्त—आध्यात्मिकतेचे परिपूर्ण उदाहरण
३. कुटुंबासाठी पौलाने ख्रिस्ताच्या उदाहरणाची स्पष्टता कशी केली?
३ कुटुंबाची आध्यात्मिकता चांगल्या उदाहरणावर अवलंबून असते. पती ख्रिस्तीत्त्वाचे अनुकरण करीत असतो तेव्हा आध्यात्मिक गुणांना प्रदर्शित करण्यात तो उदाहरण मांडतो. ख्रिस्ती विश्वासात नसणारा पती असल्यास, मुलांची आई सामान्यपणे ती जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रयत्न करते. दोन्हीही परिस्थितीत येशू ख्रिस्ताने अनुसरण करण्यासाठी परिपूर्ण उदाहरण मांडले आहे. त्याची वर्तणूक, बोलणे आणि विचारसरणी सर्वदा उभारणीकारक आणि तजेला देणारी होती. पुनःपुन्हा, प्रेषित पौल वाचकांना ख्रिस्ताच्या प्रेमळ नमुन्याकडे निरवतो. उदाहरणार्थ, तो असे लिहितो: “कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे, तसा पती पत्नीचे मस्तक आहे. शिवाय ख्रिस्त हाच शरीराचा तारणारा आहे. पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा; ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःस तिच्यासाठी समर्पण केले.”—इफिसकर ५:२३, २५, २९; मत्तय ११:२८-३०; कलस्सैकर ३:१९.
४. येशूने आध्यात्मिकतेचे कोणते उदाहरण मांडले?
४ येशूने प्रीती, दया आणि कृपाळूपणा दाखवल्यामुळे आध्यात्मिकता आणि मस्तकपदाचे तो एक उल्लेखनीय उदाहरण होता. तो चैनबाज नव्हता तर स्वार्थत्यागी होता. त्याने सर्वदा त्याच्या स्वर्गीय पित्याची महिमा केली आणि मस्तकपदाचा आदर केला. त्याने त्याच्या पित्याच्या मार्गदर्शनाचे अनुसरण केले, म्हणून तो म्हणू शकला की: “मला स्वतः होऊन काही करता येत नाही; जसे मी ऐकतो तसा न्यायनिवाडा करतो; आणि माझा निवाडा यथार्थ आहे; कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावयाला पाहतो.” “मी आपण होऊन काही करत नाही तर मला पित्याने शिकवल्याप्रमाणे मी ह्या गोष्टी बोलतो.”—योहान ५:३०; ८:२८; १ करिंथकर ११:३.
५. येशूने त्याच्या अनुयायांची भरवणूक करण्यासाठी कोणते उदाहरण पतींसाठी मांडले?
५ पतींसाठी याचा काय अर्थ होतो? सर्व गोष्टीत त्यांनी ख्रिस्ताने घालून दिलेल्या आदर्शाचा अवलंब करायला हवा, कारण तो सर्वदा त्याच्या पित्याच्या अधीन होता. उदाहरणार्थ, यहोवाने जसे पृथ्वीवरील सर्व जिवंत जीवांना अन्न पुरविले आहे तसेच येशूने त्याच्या अनुयायांना अन्न पुरविले. त्याने त्यांच्या आवश्यक भौतिक गरजांकडे दुर्लक्ष केले नाही. चमत्काराद्वारे त्याने ५,००० आणि नंतर ४,००० मनुष्यांना भोजन दिले, तो त्यांची काळजी घेण्याचा व त्याच्या जबाबदारीची जाणीव असल्याचा पुरावा होता. (मार्क ६:३५-४४; ८:१-९) त्याचप्रमाणे आज, जबाबदार कुटुंब प्रमुख त्यांच्या कुटुंबाच्या शारीरिक गरजांची काळजी घेतात. परंतु ही जबाबदारी तेथेच संपते का?—१ तीमथ्य ५:८.
६. (अ) कुटुंबाच्या कोणत्या महत्त्वपूर्ण गरजा पुरविल्या पाहिजेत? (ब) पती आणि पिता समजदारी कशी दाखवू शकतात?
६ येशूने दाखविल्याप्रमाणे, कुटुंबाच्या इतर देखील महत्त्वाच्या गरजा असतात. त्यांना आध्यात्मिक आणि भावनात्मक गरजा आहेत. (अनुवाद ८:३; मत्तय ४:४) आम्ही कुटुंबात आणि मंडळीमध्ये एकमेकांबरोबर देवाणघेवाण करीत असतो. उभारणीकारक असण्यासाठी आम्हाला चांगल्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते. या बाबतीत पती आणि पित्याला मोठी भूमिका पार पाडावी लागते—आणि ते वडील किंवा सेवासेवक असल्यास त्यापेक्षाही अधिक करावे लागते. एक-पालकीय कुटुंबातील पालकाला, त्यांच्या मुलांना मदत करण्यासाठी अशाचप्रकारच्या गुणांची आवश्यकता असते. पालकांनी, कुटुंबाच्या सदस्यांनी काय म्हटले केवळ तेच नव्हे तर जे अध्याहृत आहे ते देखील समजले पाहिजे. असे करण्यासाठी समजबुद्धी, वेळ, आणि धीराची आवश्यकता असते. पतींनी आपल्या स्त्रियांबरोबर सुज्ञतेने सहवास ठेवला पाहिजे असे पेत्र का म्हणू शकला त्याचे हे एक कारण आहे.—१ तीमथ्य ३:४, ५, १२; १ पेत्र ३:७.
टाळावयाचे धोके
७, ८. (अ) आध्यात्मिक जहाज तुटण्याचे टाळण्यासाठी कुटुंबाला कशाची आवश्यकता आहे? (ब) ख्रिस्ती कार्यात चांगली सुरवात करुन देखील कशाची गरज आहे? (मत्तय २४:१३)
७ कुटुंबाच्या आध्यात्मिकतेकडे लक्ष देणे इतके महत्त्वाचे का आहे? याच्या स्पष्टीकरणासाठी आपण विचारु शकतो, जहाजाच्या नावाड्याने उथळ पाण्यातून जहाज नेताना आपल्या नकाशाकडे अधिक लक्ष देण्याची गरज का आहे बरे? ऑगस्ट १९९२ मध्ये समुद्रपर्यटनात, क्वीन इलिझाबेथ २ (QE२) या जहाजाला धोकेदायक वाळूचे बंधारे आणि खडक असणाऱ्या ठिकाणी जेथे सामान्यपणे नौकापर्यटनाच्या त्रुटी आहेत अशा ठिकाणाहून नेण्यात आले होते. एका स्थानिक रहिवाशाने यावर मत मांडले: “त्या भागात काही चुका केल्यामुळे अपघात झाले ज्यामुळे अनेक नावाड्यांना त्यांच्या कामाला मुकावे लागले.” QE२ हे जहाज पाण्याच्या आतील खडकाच्या कंगोऱ्यावर आदळले. व याचा परिणाम मोठे नुकसान घडण्यात झाला. जहाजाच्या सांगाड्याच्या तृतीयांश भागाचे नुकसान झाले व जहाजाला बाहेर काढून दुरुस्त करण्यासाठी अनेक आठवडे घालवावे लागले.”
८ अशाचप्रकारे, कुटुंबाच्या “नावाड्याने” जर काळजीपूर्वक नकाशा, म्हणजे देवाचे वचन पडताळले नाही, तर त्याच्या कुटुंबाला सहजपणे आध्यात्मिक हानी सहन करावी लागू शकते. याचा परिणाम वडील किंवा सेवासेवकांचे मंडळीतील विशेषाधिकार गमावण्यात तसेच इतर कौटुंबिक सदस्यांना गंभीर हानी होण्याप्रत होऊ शकतो. यास्तव, प्रत्येक ख्रिश्चनाने मागील अभ्यासाची चांगली सवय आणि आवेश यांना गृहीत धरून आध्यात्मिकतेत आत्मसंतोषी राहण्यापासून खबरदारी घेतली पाहिजे. आमच्या ख्रिस्ती कार्यात, केवळ चांगली सुरवात करणेच पुरेसे नाही; तर हा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला पाहिजे.—१ करिंथकर ९:२४-२७; १ तीमथ्य १:१९.
९. (अ) वैयक्तिक अभ्यास किती महत्त्वपूर्ण आहे? (ब) आम्ही स्वतःला कोणते समर्पक प्रश्न विचारू शकतो?
९ आध्यात्मिक उथळपणा, खडक आणि वाळूचे बंधारे टाळण्यासाठी आम्हाला आमचा “नकाशा”, देवाच्या वचनाचा नियमित अभ्यास करण्याद्वारे अद्ययावत असण्याची आवश्यकता आहे. ज्या मूलभूत अभ्यासाने आम्हाला सत्यात आणले त्यावरच आम्ही विसंबून राहू शकत नाही. आमचे आध्यात्मिक बळ, अभ्यासाच्या आणि सेवेच्या नियमित आणि समतोल कार्यक्रमावर आधारित असते. उदाहरणार्थ, हे मासिक हातात घेऊन जेव्हा आम्ही मंडळीच्या टेहळणी बुरुज अभ्यासाला उपस्थित होऊ, तेव्हा आम्ही स्वतःला विचारु शकतो, “मी किंवा कुटुंब या नात्याने आम्ही सर्वांनी, शास्त्रवचनांना पडताळून व त्याच्या अवलंबावर मनन करण्याद्वारे या लेखाचा अभ्यास खरेपणाने केला आहे का? किंवा आम्ही केवळ उत्तरांनाच अधोरेखीत केले आहे? सभेला उपस्थित राहण्यापूर्वी कदाचित आम्ही त्या लेखाचे वाचनही करण्याकडे दुर्लक्ष केले आहे का?’ या प्रश्नांच्या प्रामाणिक उत्तरांनी आम्हाला आमच्या अभ्यासाच्या सवयीवर गंभीरपणे विचार करायला प्रवृत्त केले पाहिजे व—त्याची गरज भासल्यास सुधारण्याच्या इच्छेला प्रज्वलित केले पाहिजे.—इब्रीयांस ५:१२-१४.
१०. स्वःपरीक्षण महत्त्वाचे का आहे?
१० असे आत्मपरीक्षण करणे का महत्त्वाचे आहे? कारण सैतानाच्या आत्म्याचे वर्चस्व असणाऱ्या जगात आपण राहात आहोत, अशा या जगात अनेक धूर्त मार्गाद्वारे, आमचा देवावरील आणि त्याच्या अभिवचनावरील विश्वास उलथून पाडण्याचे प्रयत्न तो करीत आहे. हे असे जग आहे जे आम्हाला इतके व्यग्र ठेवते की ज्यामुळे आध्यात्मिक गरजांकडे लक्ष देण्यासाठी वेळच उरत नाही. यास्तव, आम्ही स्वतःला विचारु शकतो, ‘माझे कुटुंब आध्यात्मिकतेत बळकट आहे का? मी पाहिजे तितका बळकट पालक आहे का? आम्ही कुटुंब या नात्याने धार्मिकता आणि निष्ठावंतपणावर आधारित असलेले निर्णय घेण्यास मदत मिळण्यासाठी मनाला प्रवृत्त करणाऱ्या आध्यात्मिक शक्तीला वाढवित आहोत का?’—इफिसकर ४:२३, २४.
११. ख्रिस्ती सभा आध्यात्मिक लाभाच्या का असतात? एक उदाहरण द्या.
११ आमची आध्यात्मिकता, आम्ही उपस्थित राहत असलेल्या प्रत्येक सभेने दृढ केली पाहिजे. सैतानाच्या प्रतिकूल जगात टिकून राहण्याचा प्रयत्न करताना व्यतित केलेल्या दीर्घ तासांनंतर राज्यसभागृहातील किंवा मंडळीच्या पुस्तक अभ्यासातील ते बहुमोल तास, तजेला देण्यात आमची मदत करतात. उदाहरणार्थ, सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य या पुस्तकाचा अभ्यास करणे हे किती उत्साहवर्धक आहे! हे आम्हाला येशूची, त्याच्या जीवनाची, व त्याच्या सेवेची उत्तम समज प्राप्त करण्यासाठी मदत करील. आम्ही काळजीपूर्वक उद्धृत केलेली शास्त्रवचने वाचली आहेत, वैयक्तिक संशोधन केले आहे, आणि यास्तव येशूने मांडलेल्या उदाहरणापासून पुष्कळ शिकलो आहोत.—इब्रीयांस १२:१-३; १ पेत्र २:२१.
१२. क्षेत्रकार्य आमच्या आध्यात्मिकतेची पारख कशी करते?
१२ आमच्या आध्यात्मिकतेची चांगली परीक्षा म्हणजे आमची ख्रिस्ती सेवा होय. आमचे औपचारिक आणि अनौपचारिक साक्षीकार्य करीत राहण्यासाठी, अनेकदा आम्हाला उदासिनता किंवा विरोधी जनतेचा सामना करावा लागतो, अशावेळी देवावरील आणि शेजाऱ्यावरील प्रीती या योग्य मनोवृत्तीची आवश्यकता आहे. अर्थातच, नकार केल्याचा आनंद कोणालाही होत नसतो व तेच आमच्या क्षेत्रसेवेत होऊ शकते. परंतु तेव्हा आम्हाला हे लक्षात ठेवले पाहिजे की आम्हा वैयक्तिकाचा नव्हे तर सुवार्तेला देखील त्यांनी नाकारलेले आहे. येशूने म्हटले: “जग जर तुमचा द्वेष करते तर तुमचा करण्यापूर्वी त्याने माझाही केला आहे हे तुम्हाला माहीत आहे. तुम्ही जगाचे असता तर जगाने स्वकीयांवर प्रेम केले असते; परंतु तुम्ही जगाचे नाही. मी तुम्हाला जगातून निवडले आहे, म्हणून तुमचा द्वेष करते. . . . परंतु ते माझ्या नावाकरता हे सर्व तुम्हाला करतील, कारण ज्याने मला पाठवले त्याला ते ओळखीत नाहीत.”—योहान १५:१८-२१.
शब्दांपेक्षा कृती जास्त बोलते
१३. एक व्यक्ती कुटुंबाच्या आध्यात्मिकतेचा ऱ्हास कसा करु शकतो?
१३ कुटुंबातील एका सदस्याव्यतिरिक्त सर्वचजण घरातील व्यवस्थितपणा आणि नीटनेटकेपणाकडे लक्ष देत असल्यास काय होऊ शकते? पावसाळ्यात, घरात चिखल न आणण्याविषयी विसराळू व्यक्तीला सोडून बाकी सर्वचजण काळजी घेतात. सर्व ठिकाणी असलेली चिखलाची ती पावले, त्या व्यक्तीचा निष्काळजीपणाचा पुरावा देतात, यामुळे इतरांसाठी अधिक काम होत असते. हेच आध्यात्मिकतेच्या बाबतीतही खरे आहे. केवळ एक स्वार्थी किंवा गाफील व्यक्ती कुटुंबाच्या नावलौकिकावर कलंक लावू शकतो. केवळ पालकच नाहीत तर कुटुंबातील सर्वांनीच ख्रिस्ताची मनोवृत्ती प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सार्वकालिक जीवन दृष्टिसमोर ठेवून सर्वांनी मिळून कार्य केले तर ते किती उत्साहवर्धक ठरेल! त्या कुटुंबाची मनोवृत्ती (स्व-धार्मिक नव्हे) तर आध्यात्मिक आहे. अशाप्रकारच्या कुटुंबात आध्यात्मिक दुर्लक्षतेचे क्वचितच मागमूस राहतात.—उपदेशक ७:१६; १ पेत्र ४:१, २.
१४. सैतान आमच्या मार्गावर कोणत्या भौतिक मोहांना टाकतो?
१४ आम्हा सर्वांच्या मूलभूत गरजा आहेत, प्रतिदिवशी आमच्या जीवाचे भरणपोषण करण्यासाठी त्या पूर्ण केल्या पाहिजेत. (मत्तय ६:११, ३०-३२) परंतु अनेकदा आमच्या गरजांपेक्षा इच्छांना अधिक महत्त्व दिले जाते. उदाहरणार्थ, सैतानाची व्यवस्था प्रत्येक प्रकारचे साधन आणि उपकरण सादर करते. आमची मागणी प्रत्येक गोष्टीमध्ये आधुनिक आणि फॅशनेबल असण्याची असली तर आम्ही कधीही तृप्त होणार नाही, कारण जे आधुनिक आहे ते लवकरच जुने होते व नवीन उत्पादने दिसून येऊ लागतात. व्यापारी जगाने एक असे चक्र तयार केले आहे जे कधीही थांबत नाही. आमच्या अधिक वाढत असणाऱ्या इच्छा तृप्त करण्यासाठी अधिक पैसा मिळवण्याच्या जाळ्यात आम्हाला ते पाडते. आम्हाला ते “मूर्खपणाच्या व बाधक वासना,” किंवा मूर्खपणाच्या व धोकादायक आकांक्षा”कडे निरवते. आध्यात्मिक कार्याकडे कमीत कमी वेळ देण्याच्या असमतोलपणात याचे पर्यवसान होऊ शकते.—१ तीमथ्य ६:९, १०; मराठी कॉमन लँग्वेज बायबल.
१५. कोणत्या मार्गाने कुटुंब प्रमुखाचे उदाहरण महत्त्वपूर्ण आहे?
१५ येथे देखील ख्रिस्ती कुटुंब प्रमुखाने उदाहरण मांडणे अत्यंत आवश्यक आहे. त्याच्या ऐहिक आणि आध्यात्मिक जबाबदाऱ्यांसंबंधी असलेल्या समतोल मनोवृत्तीने कुटुंबातील इतर सदस्यांना प्रेरित केले पाहिजे. जर एखाद्या पित्याने तोंडी उत्कृष्ट शिक्षण दिले परंतु त्यानुसार चालण्यात त्याला अपयश आले तर ते निश्चितच हानीकारक होऊ शकेल. कारण मुले सत्य परिस्थितीचे आकलन करत असतात, म्हणून ‘लोकां सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण,’ असे असू नये. अशाचप्रकारे, वडील किंवा सेवासेवक घरोघरच्या कार्यात भाग घेण्यासाठी इतरांना उत्तेजन देतो परंतु, त्याच्या कुटुंबासोबत तो क्वचितच त्या कार्यात भाग घेत असल्यास लवकरच कुटुंबात आणि मंडळीत तो विश्वसनीयता गमावतो.—१ करिंथकर १५:५८ पडताळा मत्तय २३:३.
१६. आम्ही स्वतःला कोणते प्रश्न विचारले पाहिजे?
१६ याप्रकारे, आम्ही लाभासाठी आमच्या जीवनाचे परीक्षण करु शकतो. आध्यात्मिक प्रगतीकडे दुर्लक्ष करून आम्ही ऐहिक यश प्राप्त करण्यात अधिक व्यग्र आहोत का? आम्ही जगीक कार्यात प्रगती करीत आहोत मात्र मंडळीत परागतीला जात आहोत का? पौलाचा सल्ला आठवा: “कोणी अध्यक्षाचे काम करु पाहतो तर तो चांगल्या कामाची आकांक्षा धरतो, हे वचन विश्वसनीय आहे.” (१ तीमथ्य ३:१) आमच्या कामात आम्हाला बढती मिळण्यापेक्षा, मंडळीतील जबाबदारीची जाणीव आध्यात्मिकतेचे हे सूचक आहे. आम्ही यहोवाला नाही तर आमच्या मालकांना समर्पण केले आहे त्याप्रमाणे ते आमच्यावर नियंत्रण ठेवू नये म्हणून एक काळजीपूर्वक समतोल आम्ही ठेवला पाहिजे.—मत्तय ६:२४.
अर्थपूर्ण दळणवळण आध्यात्मिकतेला वाढविते
१७. कुटुंबात खरे प्रेम कशाने वाढविले जाते?
१७ लाखो घरे आज, केवळ झोपण्यापुरती उपयोगी आहेत. कशारितीने? कौटुंबिक सदस्य घरी केवळ झोपण्यासाठी, खाण्यासाठी येतात आणि नंतर लवकरच बाहेर निघून जातात. सर्वजन एकत्र बसून भोजनाचा आनंद क्वचितच घेतात. कुटुंबात सलगीची प्रेमळ भावना नाही. याचा परिणाम? तेथे दळणवळणाची कमतरता असते व अर्थपूर्ण संभाषण होत नाही. याचा परिणाम इतर सदस्यांच्या बाबतीत कमी आस्था दाखविण्यात, कदाचित खऱ्या कळकळीची उणीव दाखवण्यात होऊ शकतो. एकमेकांवर प्रीती करतो तेव्हा, आम्ही संभाषण करण्यासाठी व ऐकण्यासाठी वेळ काढतो. आम्ही उत्तेजन देतो व मदत करतो. आध्यात्मिकतेच्या या दृष्टिकोनात जोडप्यातील तसेच पालक आणि मुलांमधील अर्थपूर्ण दळणवळणाचा समावेश होतो.b आम्ही एकदुसऱ्याच्या मनातील आमचे आनंद, अनुभव आणि समस्या सांगण्याची सहभागिता करण्यासाठी वेळ आणि कसब याची आवश्यकता असते.—१ करिंथकर १३:४-८; याकोब १:१९.
१८. (अ) दळणवळणात अनेकदा कोणता मोठा अडथळा असतो? (ब) अर्थपूर्ण नातेसंबंध कशावर उभारलेला असतो?
१८ चांगल्या दळणवळणासाठी वेळ आणि परिश्रमाची आवश्यकता असते. याचा अर्थ बोलण्यासाठी आणि एकदुसऱ्यांचे लक्षपूर्वक ऐकण्यासाठी बाजूला वेळ काढून ठेवणे होय. यासाठी असणारा सर्वात मोठा अडथळा—अनेक घरात आदराची जागा पटकावून बसलेले व आमचा वेळ घेणारे उपकरण—दूरदर्शन आहे. ते एक आव्हान प्रस्तुत करते: दूरदर्शन तुमच्यावर नियंत्रण ठेवतो की तुम्ही त्याच्यावर नियंत्रण ठेवता? दूरदर्शनवर नियंत्रण ठेवण्यासाठी दृढ निश्चयाची जरुरी असते—बंद करण्यासाठी इच्छाशक्तीचा देखील यात समावेश असतो. परंतु असे केल्याने आम्हाला कुटुंबातील सदस्यांप्रमाणे किंवा आध्यात्मिक बंधू, बहिणीप्रमाणे असण्यासाठी आमचा मेळ बसविण्यास मार्ग मोकळा करील. अर्थपूर्ण नातेसंबंधात चांगले दळणवळण, एकदुसऱ्यांना समजून घेणे, आमच्या गरजा आणि आनंद, तुम्ही केलेल्या दयाळू कामाची किती गुणग्राहकता बाळगतो हे सांगण्याची देखील आवश्यकता असते. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास, अर्थपूर्ण दळणवळण दाखवते की इतरांचे आम्ही ऋणी आहोत व आम्ही त्यांना मोलाचे समजतो.—नीतीसूत्रे ३१:२८, २९.
१९, २०. आम्ही कुटुंबातील सर्वांची काळजी घेतल्यास, काय करु?
१९ यास्तव, कुटुंबात आम्ही एकदुसऱ्यांची काळजी घेत असलो—आणि यात ख्रिस्ती विश्वासात नसणाऱ्या कौटुंबिक सदस्याचा देखील समावेश असला तर—आम्ही आमच्या आध्यात्मिकतेची उभारणी करण्यात अधिक काही करीत असतो. कौटुंबिक परिस्थितीत, आम्ही पेत्राच्या सल्ल्याचे पालन करीत राहू: “शेवटी, तुम्ही सर्व एकचित्त, समसुखदुःखी, बंधुप्रेम करणारे, कनवाळू, नम्र मनाचे व्हा; वाईटाबद्दल वाईट, निंदेबद्दल निंदा असे करु नका; तर उलट आशीर्वाद द्या; कारण आशीर्वाद हे वतन मिळण्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे.”—१ पेत्र ३:८, ९.
२० आम्ही आमची आध्यात्मिकता राखण्याचा प्रयत्न केल्यास आता यहोवाचे आशीर्वाद आमच्यावर राहू शकतील; यामुळे भवितव्यात नंदनवनमय पृथ्वीवर सार्वकालिक जीवनाची देणगी मिळाल्यावर आशीर्वादाचे वारस होण्याप्रत ते कार्य करु शकते. आध्यात्मिकतेत एकदुसऱ्यांना मदत करण्यासाठी इतर काही गोष्टी आहेत ज्या कुटुंब या नात्याने आम्ही करु शकतो. कुटुंब या नात्याने कार्य केल्याच्या फायद्यांची चर्चा पुढील लेखात केली जाईल.—लूक २३:४३; प्रकटीकरण २१:१-४.
[तळटीपा]
a आध्यात्मिकतेची परिभाषा “धार्मिक मूल्याची संवेदनक्षमता किंवा जिव्हाळा; आध्यात्मिकतेचा गुण किंवा तशी स्थिती” अशी केली आहे. (वेबस्टर्स नाईन्थ न्यू कॉलेजिएट डिक्शनरी) आध्यात्मिक व्यक्ती ही दैहिक, पशुवृत्ती पेक्षा वेगळी असते.—१ करिंथकर २:१३-१६; गलतीकर ५:१६, २५; याकोब ३:१४, १५; यहूदा १९.
b कौटुंबिक दळणवळण यावरील पुढील सल्ल्यासाठी सप्टेंबर १, १९९१, च्या द वॉचटावर मधील पृष्ठे २०-२ पहा.
तुम्हाला आठवते का?
▫ आध्यात्मिकता काय आहे?
▫ कुटुंबाचा प्रमुख ख्रिस्ताच्या उदाहरणाचे अनुकरण कसे करु शकतो?
▫ आमच्या आध्यात्मिकतेच्या धोक्यांना आम्ही कसे टाळू शकतो?
▫ कुटुंबाच्या आध्यात्मिकतेचा ऱ्हास कशामुळे होऊ शकतो?
▫ अर्थपूर्ण दळणवळण महत्त्वपूर्ण का आहे?
[५ पानांवरील चित्रं]
मंडळीच्या पुस्तक अभ्यासाला उपस्थित राहिल्याने कुटुंबाची आध्यात्मिकता बळकट होते