प्रभूचे सांजभोजन तुम्हासाठी अर्थपूर्ण का आहे
येशू ख्रिस्ताने आपल्या जीवनाच्या शेवटल्या रात्री प्रभूच्या सांज भोजनाची प्रस्थापना केली. ती मार्च ३१, गुरूवारची सायंकाळ होती; आणि येशू शुक्रवार एप्रिल १ रोजी दुपारी वारला. वस्तुतः यहूद्यांच्या पंचागात दिवस सायंकाळपासून सुरु होऊन तो दुसऱ्या दिवसापर्यंत चालत असल्यामुळे हे प्रभूचे सांजभोजन व येशूचा मृत्यु या दोन्ही गोष्टी निसान १४, इ. स. ३३ रोजी येतात.
येशूने या भोजनाची का प्रस्थापना केली? त्याने वापरलेल्या भाकर व द्राक्षारसाचा काय अर्थ होतो? यामध्ये कोण सहभागिता घेऊ शकतो? या भोजनाचे आचरण कितीदा व्हावयास पाहिजे? आणि ते तुम्हासाठी कसा अर्थ राखू शकते?
प्रस्थापना का केली?
प्रभूच्या सांजभोजनाबद्दल येशूने आपल्या प्रेषितांना म्हटलेः “माझ्या स्मरणार्थ हे करा.” आणखी एका अनुवादात त्याने असे म्हटलेः “माझी आठवण म्हणून असे करीत जा.” (१ करिंथकर ११:२४; द न्यू इंग्लिश बायबल, मराठी कॉमन लँग्वेज) खरे म्हणजे प्रभूच्या सांज भोजनाला बहुधा ख्रिस्ताच्या मृत्युचे स्मरण असे संबोधले जाते.
येशू सात्त्विकता राखून मेला. त्याने त्याद्वारे यहोवाच्या सार्वभौमत्वाचे समर्थन केले आणि सैतान हा लबाड, निंदक असल्याचे सिद्ध करून दाखवले; कारण सरळ जन देवाची सेवा निव्वळ स्वार्थी कारणांमुळे करतात हा सैतानाचा दावा होता. (ईयोब २:१-५) येशूच्या मृत्युने देवाचे अंतःकरण आनंदीत केले.—नीतीसूत्रे २७:११.
येशूने परिपूर्ण मानव या अर्थाने मृत्यु सहन केल्यामुळे “बहुतांच्या खंडणीसाठी आपला जीव” दिला. (मत्तय २०:२८) पहिल्या मानवाने देवाविरुद्ध पाप करून परिपूर्ण मानवी जीवन व त्याला अनुलक्षून असणारे भवितव्य गमावले. तरीपण, “देवाने [मानवजातीच्या] जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला; यासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” (योहान ३:१६) होय, “पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभु येशू ख्रिस्तामध्ये सर्वकालचे जीवन आहे.”—रोमकर ६:२३.
“प्रभूपासून मिळाले”
ख्रिस्ताच्या मृत्युच्या स्मरणाबद्दल प्रेषित पौलाचे शब्द अधिक प्रकाश पाडणारे आहेतः “जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगून दिले की, ज्या रात्री प्रभु येशू धरून दिला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली; ईशोपकारस्मरण करून ती मोडिली, आणि म्हटलेः ‘तुम्हांसाठी जे माझे शरीर ते हे आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा.’ मग भोजन झाल्यावर प्याला घेऊन त्याने तसेच केले, आणि म्हटलेः ‘हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे; जितकेदा तुम्ही हा पिता तितकेदा माझ्या स्मरणार्थ हे करा.’ कारण जितकेदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितकेदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करिता.”—१ करिंथकर ११:२३-२६.
वस्तुतः पौल इ. स. ३३च्या निसान १४ रोजी येशू व त्याच्या प्रेषितांसोबत उपस्थित नव्हता, त्यामुळे त्याला ही माहिती “प्रभूपासून मिळाले”ली, प्रेरित प्रकटीकरणाद्वारे प्राप्त झालेली असावी हे स्पष्ट आहे. येशू यहूदाद्वारे “ज्या रात्री . . . धरुन दिला” जाऊन यहूदी धार्मिक शत्रूंकडे सोपवला जाणार होता त्या रात्री त्याने या स्मारकाची प्रस्थापना केली. यहूद्यांनी ख्रिस्ताला वधस्तंभी देण्यासाठी रोम्यांना चिथावले. जे चिन्हरुपे भाकर व द्राक्षारस यांची सहभागिता घेण्यास लायक होते असेच केवळ त्याच्या स्मरणार्थ ते करू शकत होते.
कितीदा आचरावा?
पण पौलाच्या या शब्दाचा काय अर्थ होतो की, “जितकेदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितकेदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता”? विश्वासू अभिषिक्त ख्रिस्ती स्मारकविधीच्या बोधचिन्हात आपल्या मरणापावेतो “तितकेदा” सहभागिता घेत राहतील, नंतर यांचे स्वर्गीय जीवनासाठी पुनरुत्थान होईल. हे, देव व जगापुढे, यहोवाने येशूच्या यज्ञार्पणाची जी व्यवस्था केली तिजवरील आपला विश्वास नेहमी जाहीर करीत राहतील. पण किती काळ? “तो येईपर्यंत,” असे जे पौलाने म्हटले, त्याचा उघड अर्थ हा आहे की, येशू ख्रिस्त त्याच्या अभिषिक्त अनुयायांना त्याच्या “उपस्थिती”मध्ये पुनरूत्थानाद्वारे स्वर्गात घेण्यासाठी परत येईपर्यंत हा विधी चालू राहील. (१ थेस्सलनीकाकर ४:१४-१७) हे ख्रिस्ताने, त्याच्या ११ निष्ठावंत प्रेषितांना म्हटलेल्या उद्गाराच्या सहमतात आहे की, “मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुनः येऊन तुम्हांस आपल्याजवळ घेईन; यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे.”—योहान १४:३.
मग, ख्रिस्ताच्या मृत्युचे स्मरण प्रतिदिवशी किंवा कदाचित दर आठवडी व्हावे का? खरे म्हणजे, येशूने प्रभूच्या सांज भोजनाची प्रस्थापना वल्हांडणाच्या दिवशी केली व त्याच दिवशी त्याला ठार करण्यात आले. इस्राएलांची मिसरी दास्यातून झालेल्या सुटकेच्या स्मरणार्थ ते लोक वल्हांडण साजरा करीत. आणि तसे पाहता, येशू हा ख्रिश्चनांसाठी वधलेला कोकरा असल्यामुळे ख्रिस्ताला “आपला वल्हांणाचा यज्ञपशु” असे म्हटले गेले आहे. (१ करिंथकर ५:७) वल्हांडण वर्षातून एकदाच म्हणजे निसान १४ रोजी आचरीत. (निर्गम १२:६, १४; लेवीय २३:५) यामुळे, येशूच्या मृत्युचे स्मरण देखील वल्हांडणाप्रमाणे वर्षातून एकदा होण्यास हवे हे समजते, दर दिवशी किंवा दर आठवडी नव्हे.
ख्रिस्ती असल्याचा दावा करणाऱ्यांनी कित्येक शतके येशूच्या मृत्युचे स्मरण वर्षातून एकदाच केले. हे ते निसान १४ रोजी करीत होते त्यामुळे यांना चतुर्दशीचे लोक म्हणजे “चौदावा” पाळणारे म्हणत. यांच्याबद्दल इतिहासकार जे. एल. व्हॉन मोशेईम यांनी लिहिलेः “आशिया मायनर येथील ख्रिस्ती लोक, प्रभूच्या प्रस्थापित सांज भोजनाचे स्मरण देणारे हे पवित्र भोजन व येशू ख्रिस्ताचा मृत्यू, यहुदी लोक वल्हांडणाचा कोकरा खात त्याच वेळी म्हणजे पहिला महिना [निसान] याच्या चौदाव्या दिवसाच्या सायंकाळी करीत असत. . . . कायदा पालनासारखे यांना ख्रिस्ताच्या उदाहरणाचे अनुकरण करण्याचे बंधन वाटत होते.”
चिन्हांची अर्थपूर्णता
पौलाने म्हटले की, येशूने “भाकर घेतली; ईशोपकारस्मरण करून ती मोडिली.” ती कुरकुरीत भाकर पीठ व पाण्याच्या मिश्रणाने व कसल्याही प्रकारचे खमीर न घालता भाजली होती; ती खाण्यासाठी तोडण्यात आली. पवित्र शास्त्रात खमीर हे पाप किंवा भ्रष्टता याला सूचित करण्यात आले आहे. एका अनैतिक माणसाला मंडळीतून घालवून देण्याबद्दल करिंथमधील ख्रिश्चनांना आर्जवताना पौलाने म्हटलेः “थोडे खमीर सगळ्या गोळ्याला फुगविते हे तुम्हांस ठाऊक नाही काय? तर जुने खमीर काढून टाका, यासाठी की तुम्ही जसे बेखमीर लोक आहा तसे तुम्ही नवा गोळा व्हावे; कारण आपला वल्हांडणाचा यज्ञपशु जो ख्रिस्त त्याचे अर्पण झाले. यास्तव जुन्या खमिराने, अगर वाईटपणा व दुष्टपणा यांच्या खमिराने नव्हे, तर सात्विकपणा व खरेपणा या बेखमीर भाकरींनी आपण सण करावा.” (१ करिंथकर ५:६-८) जसा थोडासा आंबटपणा पिठाच्या सगळ्या गोळ्याला फुगवतो, तसे पापीष्ठ माणसाच्या भ्रष्टाचारी प्रभावास काढून न टाकल्यास मंडळी देवाच्या नजरेत अशुद्ध अशी दिसू शकते. जसे, वल्हांडणानंतर बेखमीर भाकरीच्या सणात इस्राएली लोक आपल्या घरात कसलेही खमीर ठेवत नसत तसेच यांनी देखील आपणामधून “खमीर” काढून टाकण्यास हवे होते.
स्मरणविधीतील बेखमीर भाकरीबद्दल येशूने म्हटलेः “तुम्हासाठी जे माझे शरीर ते हे आहे.” (१ करिंथकर ११:२४) भाकर येशूच्या परिपूर्ण दैहिक शरीराचे प्रतिनिधित्व करीत होती, याबद्दल पौलाने लिहिलेः “तो जगात येतेवेळेस म्हणालाः ‘“यज्ञपशु व अन्नार्पण यांची तुला इच्छा नाही, तू माझ्यासाठी शरीर तयार केले आहे. होमांनी व पापाबद्दलच्या अर्पणांनी तुला संतोष झाला नाही. यावरून मी म्हणालोः “पाहा, हे देवा, ग्रंथपटात मजविषयी लिहून ठेविले आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे करावयासाठी मी आलो आहे.”’ . . . त्या ‘इच्छेने’ आपण येशू ख्रिस्ताच्या शरीराच्या एकदाच झालेल्या अर्पणाच्या द्वारे पवित्र केलेले आहो.” (इब्रीयांस १०:५-१०) येशूचा परिपूर्ण मानवी देह निष्कलंक होता व त्याने मानवजातीसाठी खंडणीचे यज्ञार्पण पुरवले.—इब्रीयांस ७:२६.
कसलीही भेसळ नसलेल्या तांबड्या द्राक्षारसाच्या प्याल्यावर आशीर्वाद मागितल्यावर येशूने म्हटलेः “हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे.” (१ करिंथकर ११:२५) आणखी एक अनुवाद सांगतोः “हा पेला माझ्या रक्ताने स्थापन झालेला नवा करार आहे.” (मोफॅट; मराठी, कॉमन लँग्वेज) बैल व बकऱ्यांच्या रक्ताने जसे देव व इस्राएल लोक यांजमधील नियमशास्त्र कराराला प्रस्थापित केले गेले तसेच येशूने आपल्या मृत्युत सांडलेल्या रक्ताद्वारे नव्या कराराला स्थापन केले. नवा करार असा उल्लेख केला असल्यामुळे स्मारक चिन्हातील सहभागिता घेण्यास पात्र असणाऱ्या लोकांची ओळख होण्याला आपली मदत मिळते.
सहभागिता कोणी घ्यावी?
नव्या करारात असणारे येशूचे अभिषिक्त अनुयायी, स्मारक चिन्हांमध्ये उचितपणे सहभागिता घेऊ शकतात. हा करार देव व आध्यात्मिक इस्राएल यांजमध्ये केलेला आहे. (यिर्मया ३१:३१-३४; गलतीकर ६:१६) पण हाच नवा करार सर्व आज्ञाधारक मानवांवर आशीर्वाद आणणार आहे; यामुळे तुम्ही त्या आशीर्वादाला पात्र असणाऱ्यांपैकी एक असू शकता.
स्मारक चिन्हात सहभागिता घेणाऱ्यांनी येशूने राज्याबाबत केलेल्या व्यक्तीगत करारात समाविष्ट असण्यास हवे. भोजनाची प्रस्थापना करतेवेळी येशूने त्याच्या निष्ठावंत प्रेषितांना म्हटलेः “जसे माझ्या बापाने मला राज्य नेमून दिले तसे मीही तुम्हांस नेमून देतो.” (लूक २२:२९) देवाने दावीद राजासोबत केलेला राज्याचा करार, पुढे स्वर्गीय राज्यात सदासर्वकाळ राज्य करणाऱ्या येशूच्या आगमनाकडे निर्देश करीत होता. त्याच्यासोबत या अधिकारात सहभागी होणाऱ्या १,४४,००० जणांना सियोन या स्वर्गीय डोंगरावर कोकरा, येशू ख्रिस्त याच्याबरोबर उभे असलेले दाखवण्यात आले आहे. हे ख्रिस्तासोबत त्याचे सहराजे व सहयाजक म्हणून अधिपत्य करतील. (२ शमुवेल ७:११-१६; प्रकटीकरण ७:४; १४:१-४; २०:६) या कारणामुळे जे नव्या करारात तसेच येशूसोबत व्यक्तिगत करारात आहेत तेच केवळ प्रभूच्या सांज भोजनात योग्यपणे सहभागिता घेऊ शकतात.
देवाचा आत्मा या अभिषिक्तांच्या आत्म्याशी साक्ष देतो की ते देवाची मुले व ख्रिस्तासोबत सहवारीस आहेत. पौलाने लिहिलेः “तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की, आपण देवाची लेकरे आहोत; आणि जर लेकरे तर अर्थात वारीसही आहोत, म्हणजे देवाचे वारीस, ख्रिस्ताबरोबर एकत्रातील वारीस असे आहो.” (रोमकर ८:१६, १७) देवाचा पवित्र आत्मा किंवा त्याची क्रियाशील शक्ती या अभिषिक्त जनांना, ते स्वर्गीय जीवनासाठी नियुक्त झाले आहेत अशी खात्री देते. शास्त्रवचने स्वर्गातील जीवनाबद्दल जे काही सांगतात ते सर्व आपल्याला अनुलक्षून आहे असे ते समजतात आणि त्यामुळे ते सर्व भौतिक गोष्टी, मानवी जीवनदेखील त्यागण्याची इच्छा करतात. पृथ्वीवरील नंदनवनात मिळणारे जीवन मनोरम असले तरी या अभिषिक्तांना ती आशा नाही. (लूक २३:४३) खोट्या धार्मिक दृष्टीकोणांवर आधारित नसलेली अशी निश्चित व अटळ स्वर्गीय आशा यांना स्मारक चिन्हांची सहभागिता घेण्यास लायक बनवते.
स्वर्गीय राजा व याजक होण्याचे आमंत्रण एखाद्याला नाही, तरी जो स्वतःला तसे असल्यासारखे भासवतो, त्याच्यावर यहोवाची मर्जी राहणार नाही. (रोमकर ९:१६; प्रकटीकरण २२:५) कोरहाने उद्दामपणे स्वतःला याजक बनवण्याचा प्रयत्न केला तेव्हा देवाने त्याजवर न्यायदंड बजावला. (निर्गम २८:१; गणना १६:४-११, ३१-३५) तेव्हा जर, कोणा माणसाने जोरदार भावना किंवा पूर्वीच्या धार्मिक कल्पनांमुळे चुकीने स्मरणविधी चिन्हांमध्ये सहभागिता घेतली तर काय? तसे असल्यास, त्याने किंवा तिने सहभागिता घेण्याचे थांबवावे व देवाला क्षमेसाठी नम्रतेने प्रार्थना करावी.—स्तोत्रसंहिता १९:१३.
तुम्हावर कसा परिणाम होत आहे
येशूच्या खंडणी यज्ञार्पणाकडून लाभ मिळवता यावा आणि पृथ्वीवरील चिरकालिक जीवन प्राप्त व्हावे यासाठी कोणी स्मरणविधी चिन्हांमध्ये सहभागिता घेण्याची गरज नाही. कारण, उदाहरणार्थ, अब्राहाम, सारा, इसहाक, रिबका, बवाज, रुथ आणि दावीद यासारखे देवभिरू लोक अशा चिन्हांची सहभागिता घेतील असे काही पवित्र शास्त्र सूचित करीत नाही. पण यांनी तसेच या गोलार्धावर अविनाशी जीवन मिळवण्याची इच्छा धरणाऱ्या सर्वांनी देव व ख्रिस्त तसेच यहोवाने येशूच्या खंडणी यज्ञार्पणाची जी तरतुद केली आहे तिजवर विश्वास प्रदर्शित केलाच पाहिजे. (योहान ३:३६; १४:१) ख्रिस्ताच्या मृत्युचे वार्षिक आचरण हे त्या मोठ्या यज्ञार्पणाचे स्मरण देणारे ठरते.
येशूच्या यज्ञार्पणाचे महत्त्व केवढे आहे ते प्रेषित योहानाच्या लिखाणात सांगितले आहे. तो म्हणतोः “तुम्ही पाप करू नये म्हणून हे मी तुम्हांस लिहितो. जर कोणी पाप केलेच, तर धार्मिक असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे; तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित्त आहे; आणि आपल्याच पापांबद्दल केवळ नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे.” (१ योहान २:१, २) येशू हा “आपल्या पापांबद्दल प्रायश्चित्त आहे,” असे अभिषिक्त ख्रिस्ती म्हणू शकतात. तथापि, तो सर्व जगाच्याही पापांबद्दल प्रायश्चित्त असून, आज्ञाधारक मानवजातीला अगदी जवळ, हाताशी आलेल्या नंदनवनात चिरकालिक जीवन मिळवण्याची शक्यता साध्य करून देणार आहे.
ख्रिस्ताच्या मृत्युच्या स्मरणविधीला उपस्थित राहण्यामुळे तुम्हाला तेथे दिल्या जाणाऱ्या विचारप्रवर्तक पवित्र शास्त्रीय भाषणाद्वारे लाभ मिळू शकेल. आपल्यासाठी यहोवा देव व येशू ख्रिस्त यांनी काय काय केले आहे त्याचे स्मरण तुम्हाला तेथे मिळू शकेल. देव व ख्रिस्त आणि येशूच्या खंडणी यज्ञार्पणाबद्दल खोल निष्ठा राखणाऱ्या लोकांसोबत एकत्रित होण्याद्वारे आध्यात्मिक रितीने लाभ मिळेल. तो प्रसंग तुम्हाला देवाच्या विपुल दयेला पात्र होण्यासाठी व चिरकालिक जीवनाकडे जाण्यासाठी आपली इच्छा अधिक दृढ करण्याची बळकटी देईल. या कारणामुळे आम्ही तुम्हाला, यहोवाच्या साक्षीदारांसोबत एप्रिल ६, १९९३ रोजी सूर्यास्तानंतर येशू ख्रिस्ताच्या मृत्युचे स्मरण करण्यासाठी येण्याचे हे हार्दिक निमंत्रण देत आहोत. कारण प्रभूचे सांज भोजन तुम्हासाठी खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण होऊ शकते.