मनाचे रुपातंर करा आणि अंतःकरणात प्रज्वलित व्हा
“मी हे म्हणतो व प्रभूमध्ये निश्चितार्थाने सांगतो की, परराष्ट्रिय भ्रष्ट मनाने चालत आहेत त्याप्रमाणे तुम्ही ह्यापुढे चालू नये.”—इफिसकर ४:१७.
१. आमचे मन व अंतःकरण आम्हाकरता काय करतात?
मानवांना मन व अंतःकरण अशा दोन आश्चर्यकारक शक्तींनी युक्त केलेले आहे. त्यांच्या कृती अनेक बाबतीत वेगवेगळ्या असल्या तरी, ते एकमेकांत ऐक्य राखून आहेत. आपले मन व हृदय ज्या मार्गाने कृती करते ते, आपले व्यक्तिमत्त्व, बोलणे, वर्तणूक, भावना आणि मोल यावर परिणामित होत असते.
२, ३. (अ) “हृदय” व “मन” या संज्ञांचा उपयोग पवित्र शास्त्र कसा करते? (ब) आम्ही मन व हृदय या दोहोंविषयी काळजी का करावयास हवी?
२ पवित्र शास्त्रात, “हृदया”चा संदर्भ सर्वसाधारणपणे प्रवृत्ती, भावना व अंतरिक जाणीव याबाबतीत आला आहे आणि “मन” हे बुद्धी व विचार करण्याच्या सामर्थ्याच्या संदर्भात अवतरीत केले आहे. तरीही, ते एकमेकांपासून वेगळे नाहीत. उदाहरणार्थ, मोशेने इस्त्राएलांना आर्जविलेः “हे समजून घ्या आणि ध्यानात ठेवा की, [तळटीप, “आपल्या हृदयात ठसवून घ्या,” पंडिता रमाबाई] यहोवा हाच देव आहे.” (अनुवाद ४:३९) येशूने त्याच्याविरुद्ध कट करणाऱ्या शास्त्र्यांना म्हटलेः “तुम्ही आपल्या मनात वाईट कल्पना का आणता”?—मत्तय ९:४; मार्क २:६, ७.
३ मन व हृदय यांचा एकमेकांशी घनिष्ठ सबंध आहे हे यावरून दिसून येते. ते एकमेकांसोबत मिळून काम करतात, कधीकधी तर संघटितपणे काम करण्याकरता ते एकमेकांना मजबूतही करतात. तथापि, वर्चस्व चालवण्यासाठी अनेकदा ते एकमेकांसोबत लढाई करतात. (मत्तय २२:३७; पडताळा रोमकर ७:२३.) या कारणास्तव, यहोवाची कृपापसंती मिळविण्यास, केवळ आपल्या मन व हृदयाच्या स्थितीचीच खात्री न बाळगता, त्यांना एकाच मार्गाने व एकत्र ऐक्याने काम करण्याची तालीम आम्ही देण्यास हवी. आम्ही आमच्या मनाचे रुपातंर व अंतःकरणाला प्रज्वलित करावयास हवे.—स्तोत्रसंहिता ११९:३४; नीतीसूत्रे ३:१.
‘परराष्ट्रीय चालत असलेला मार्ग’
४. सैतानाने लोकांच्या मनावर व हृदयावर कसा प्रभाव पाडला, आणि त्याचा परिणाम काय आहे?
४ कपट व लबाडी करण्यात सैतान कुशल आहे. लोकांवर स्वामित्त्व मिळवण्यासाठी त्यांचे मन व हृदय यांना निशाण बनवावे लागते हे त्याला ठाऊक आहे. मानवाच्या इतिहासाच्या सुरुवातीपासूनच, हे ध्येय गाठण्यासाठी तो या किंवा त्या अशा युक्त्यांचा वापर करीत आहे. याच्या परिणामात, “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” (१ योहान ५:१९) वस्तुतः सैतानाने जगातील लोकांच्या मन व हृदयावर इतका यशस्वी परिणाम घडवून आणला आहे की त्यामुळे पवित्र शास्त्र त्यांना “कुटिल व विपरीत पिढी” असे म्हणते. (फिलिप्पैकर २:१५) या कुटिल व विपरीत पिढीच्या मन व हृदयाच्या स्थितीचे प्रेषित पौल अगदी स्पष्टपणे वर्णन करतो आणि त्याचे शब्द आज देखील आम्हा सर्वांकरता इशाऱ्यासमान आहेत. उदाहरणार्थ, कृपया इफिसकर ४:१७-१९ वाचा आणि याचा रोमकर १:२१-२४ मधील पौलाच्या शब्दांशी पडताळा करा.
५. पौलाने इफिसकरांना इतका कडक सल्ला का लिहिला?
५ नैतिकतेच्या ऱ्हासाने कुविख्यात असलेले व मुर्तीपूजेसाठी प्रसिद्ध असलेले इफिस शहर जेव्हा आम्हाला आठवते तेव्हा पौलाने तेथील ख्रिश्चनांना इतक्या कडक शब्दात का लिहिले असावे याची गुणग्राहकता आम्ही राखू शकतो. ग्रीकचे जरी प्रसिद्ध विचारवंत व तत्त्वज्ञानी असले तरी हे दिसते की ग्रीक शिक्षणाने पुष्कळ लोकांना पापी कृत्यांसाठी सामर्थ्य पुरविले, आणि त्यांच्या संस्कृतीने त्यांच्या दुर्गुणांना आणखी चकचकीत बनवले. अशा वातावरणात राहणाऱ्या सहख्रिश्चनांबाबत पौलाला तीव्र चिंता वाटत होती. त्याला माहीत होते की यापैकीचे अनेक लोक पूर्वी राष्ट्रांप्रमाणे वागणारे व “ह्या जगाच्या रहाटीप्रमाणे चालणारे होते.” पण त्यांनी आता सत्य स्वीकारले होते. त्यांच्या मनाचे रुपातंर होऊन अंतःकरण प्रज्वलित झाले होते. शिवाय मुख्यतः, त्यांनी “झालेल्या पाचारणास शोभेल असे चालावे” अशी पौलाची अपेक्षा होती.—इफिसकर २:२; ४:१.
६. पौलाच्या शब्दामध्ये आम्ही आस्था का राखून असावी?
६ आजची परिस्थिती देखील त्यासमान आहे. आम्हीही विकृत असलेल्या, नैतिकतेत भिकेस लागलेल्या आणि खोट्या धर्माच्या वहिवाटीत असलेल्या जगात जगत आहोत. आमच्यातील पुष्कळजन पूर्वी या जगाच्या व्यवस्थिकरणाप्रमाणे जगत होते. आमच्यातील अनेकांचा प्रत्येक दिवशी जगाशी जवळचा संपर्क येतो. जेथे जगीक आत्मा वर्चस्व राखून आहे अशा घरात काही राहतात. यास्तव, पौलाच्या शब्दांचा अर्थ जाणून घेऊन त्याच्या सल्ल्याचा फायदा करुन घेणे फार अगत्याचे आहे.
अंधकारमय व भ्रष्ट मनाचे
७. “भ्रष्ट मनाचे” या शब्दप्रयोगात पौलाने कोणता अर्थ सूचित केला आहे?
७ ख्रिश्चनांनी, “परराष्ट्रीय . . . चालत आहेत त्याप्रमाणे . . . ह्यापुढे चालू” नये असे ख्रिश्चनांना आवर्जून सांगताना, पौलाने प्रथम “भ्रष्ट मनाचे” याचा उल्लेख केला. (इफिसकर ४:१७) त्याचा अर्थ काय होतो? द अँकर बायबल प्रमाणे “भ्रष्ट” या शब्दाचे भाषांतर “पोकळपणा, निष्क्रियता, कुचकामीपणा, मुर्खता, उद्देशहिनता व वैफल्य” असे केले आहे. अशा तऱ्हेने, पौल हे सूचित करत होता की ग्रीक व रोमी लोकांचे नावलौकिक व गौरव जरी जगासमोर प्रभाव टाकणारे होते तरीपण, त्यांचा पाठलाग करणे म्हणजे निव्वळ पोकळतेचे, मुर्खतेचे व उद्देशहिनतेचे होते. ज्यांनी कोणी असा लौकिक व गौरव मिळविण्याची तीव्र इच्छा बाळगली त्यांच्या पदरी वैफल्य व निराशेशिवाय काहीही पडणार नव्हते. हेच तत्त्व आजच्या जगातही सत्य आहे.
८. जगाचे प्रयत्न कोणत्या मार्गी निष्फळ बनले आहेत?
८ सर्वसाधारण लोक जीवनाचा उगम व उद्देश आणि मानवजातीचे दैव (विधीलिखीत) अशासारख्या गूढ प्रश्नांच्या उत्तरासाठी जगाच्या अत्यंत बुद्धिमान व हुशार लोकांकडे जातात. पण त्यांच्याकडे कोणती समजबुद्धी व मार्गदर्शन आहे जी ते सादर करु शकतात? नास्तिकवाद, अज्ञेयवाद, उक्रांतीवाद आणि इतर खूप गोंधळात टाकणाऱ्या व विरोधात्मक कल्पना व सिद्धातांनी पूर्वीच्या धार्मिक विधी व अंधविश्वास याचे अज्ञान काढून टाकू शकले नाही. अनेक जगीक ध्येये काही प्रमाणात समाधान व परिपूर्ति प्रस्तुत करीत असल्याचे दिसतात. विज्ञानातील प्रगती, कला, संगीत, खेळ, राजकारण आणि अशा इतर गोष्टींतील यशस्वीतेबद्दल लोक बोलतात. त्यांच्या गौरवाच्या क्षणभंगूरतेमध्येही ते खुश होत आहेत. पण, इतिहासातील प्रतिवार्षिक वृत्तांत तसेच लोकांनी गाठलेल्या उद्दिष्ठांची माहिती देणारी पुस्तके अशा पराक्रमी नावांनी भरलेली आहेत, ज्यांचा आज पूर्णपणे विसर पडला आहे. हे सर्व केवळ पोकळपणा, निष्क्रियता, कुचकामीपणा, मुर्खता, उद्देशहिनता व वैफल्य याशिवाय काहीही नाही.
९. कोणत्या निष्फळ प्रयत्नांमागे अनेकजन वळत आहेत?
९ अशा प्रयत्नातील निष्फळतेला जाणून पुष्कळजन भौतिकतेचा पाठलाग करण्याकडे वळतात—पैशांचा ढीग करतात व पैशाने जे काही घेता येते ते सर्व घेतात—आणि याच गोष्टींना आपल्या जीवनाचे ध्येय बनवितात. संपत्ती, मालमत्ता आणि सुख याद्वारेच सौख्यानंद मिळतो असा त्यांचा विश्वास आहे. या मध्ये केवळ त्यांचे मनच गुरफटत नाही तर, सर्वस्व—आरोग्य, कुटुंब आणि विवेक सुद्धा अर्पिण्याची त्यांची तयारी असते. याचा परिणाम काय दिसतो? समाधान मिळण्याऐवजी, “त्यांनी स्वतःस पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतले आहे.” (१ तिमथ्यी ६:१०) त्यामुळे परराष्ट्रीय चालतात त्या भ्रष्ट विचारसरणीच्या रोखाने चालू नका, अशी पौलाने सहख्रिश्चनांना जी ताकीद दिली त्यात काही आश्चर्याचे नाही.
१०. जगाचे लोक “अंधकारमय बुद्धी”चे कसे आहेत?
१० जगाकडे हेवा वाटावा अशा योग्यतेचे किंवा अनुकरणीय असे काहीही नाही हे दाखविताना, पौल पुढे म्हणतो, “त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे.” (इफिसकर ४:१८) खरे पाहता, जगातील जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात हुशार आणि ज्ञानी लोक आहेत. तरी सुद्धा, पौल म्हणतो की ते मानसिकरित्या अंधारात आहेत. का बरे? तो त्यांच्या कुशल बुद्धीसंबंधी अथवा क्षमतेविषयी बोलणी करीत नाही. “मन” हा शब्दप्रयोग मानवाची एकंदर आकलन शक्ती, आतंरिक मनुष्यपण याला समजण्याच्या कुवतीलाही सूचित करतो. ते अंधकारात आहेत कारण मार्गदर्शनाचा प्रकाश किंवा प्रयत्नांना दिशा दाखवण्याची समजबुद्धी त्यांच्याकडे नाही. बरोबर की चूक यासंबंधी त्यांच्यात झालेल्या गोंधळामुळे हे दिसून येते. आज लोक विचार करीत आहेत की, कोणतीही न्याय्य नसलेली अथवा काहीही चालेल अशी मनोवृत्ती तेजोमय करते, पण पौलाच्या मते हीच खरी अंधकारमय मनोवृत्ती आहे. आध्यात्मिकरित्या, ते निबिड अंधकारात चाचपडत आहेत.—ईयोब १२:२५; १७:१२; यशया ५:२०; ५९:६-१०; ६०:२; पडताळा इफिसकर १:१७, १८.
११. जगाच्या अंधकारमय बुद्धीचे कारण काय आहे?
११ तथापि, अनेक गोष्टीत अत्यंत बुद्धिमान व अतिशय हुशार असलेले लोक, आध्यात्मिक अंधकारात का असतात बरे? २ करिंथकर ४:४, मध्ये पौलाने आम्हास याचे उत्तर दिले आहेः “त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने ह्या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत. अशा हेतुने की, देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये.” वैभवी सुवार्तेचा स्वीकार केल्यामुळे ज्यांच्या मनाचे रुपातंर व अंतःकरण प्रज्वलित झाले आहे त्यांना केवढ्या बहुमूल्य आशीर्वादाची प्राप्ती झाली आहे बरे!
अज्ञानी व भावनारहित हृदय
१२. हे जग कोणत्या मार्गी “देवाच्या जीवनाला पारखे” झाले?
१२ आमच्या मनाचे रुपातंर व अंतःकरण प्रज्वलित करण्याची का आवश्यकता आहे हे समजण्यासाठी पौल आमचे लक्ष वस्तुस्थितीकडे, म्हणजे जगाच्या मार्गाकडे वळवितो जे की, “देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहेत.” (इफिसकर ४:१८) ते लोक देवावर विश्वास ठेवत नाही किंवा ते जवळजवळ पूर्णपणे नास्तिक बनत चालले आहेत असे नाही. एक वर्तमानपत्राचा स्तंभलेखक अशाप्रकारे ही गोष्ट मांडतोः “नास्तिक या शब्दाऐवजी आपण एक नवीन शब्द शोधू तो म्हणजेः देवावर कमी भाव असलेला. असे लोक देवावर विश्वास ठेवण्याचे श्रेय स्वतःला लावून घेतात, पण सोबतच त्याला एखाद्या पेटीत जणू बंद करून ठेवतात. त्याला ते फक्त रविवारच्या सकाळी बाहेर काढतात पण त्यांच्या वैयक्तिक जीवनात किंवा जगीक राजकीय दृष्टिकोनात कोणताही भाग घेण्याची त्याला इतर दिवशी परवानगी देत नाहीत. ते देवावर थोडा बहुत विश्वास ठेवतात, पण आधुनिक समाजाला सांगण्यासारखे त्याच्याकडे काही नाही असा ते विचार करतात.” पौलाने रोमकरांस पत्र लिहिताना हीच गोष्ट अशाप्रकारे मांडली: “देवाला ओळखून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचे गौरव केले नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत.” (रोमकर १:२१) आपल्या जीवनमानात देवाचा कधी विचार न करणारे लोक, आपण दररोज पाहतो. खात्रीने ते त्याचे गौरव करीत नाहीत अथवा आभार मानत नाहीत.
१३. “देवाचे जीवन” काय आहे?
१३ “देवाच्या जीवनाला” हा अगदी सार्थ शब्दप्रयोग आहे. तो, लोकांच्या मूल्य जाणण्याच्या कुवतीत मानसिक व आध्यात्मिक अंधकारामुळे कसा गोंधळ उडतो हे आणखी स्पष्ट करतो. वाईन्स एक्सपोजीटरी डिक्शनरी ऑफ ओल्ड ॲन्ड न्यू टेस्टमेंन्ट वर्डस् नुसार “जीवन” यासाठी येथे भाषांतरीत करण्यात आलेला ग्रीक शब्द बायऑस (ज्यापासून “बायोलॉजी,” “बायोग्राफी” यासारखे शब्द आले) हा नाही, ज्याचा अर्थ जीवनाचा मार्ग, किंवा जीवनीपद्धत असा होतो. उलटपक्षी, तो शब्द झूअ (ज्यापासून “झू,” “झूऑलॉजी” यासारखे शब्द आले) असा आहे. ज्याचा अर्थ “जीवन म्हणजे एक तत्त्व, एक पूर्ण जाणीव, देवाचे जीवन असा आहे. . . . पापात पडल्याच्या परिणामामुळे मानवाची या जीवनापासून फारकत झाली.” यास्तव, पौल आम्हास हे सांगतो की मानसिक व आध्यात्मिक अंधकार हा जगाच्या लोकांना केवळ देहाच्या विनाशाकडेच निरवितो इतकेच नव्हे तर देवाने राखून ठेवलेल्या सार्वकालिक जीवनाच्या आशेपासूनही वेगळे करतो. (गलतीकर ६:८) असे का? पौल त्याची कारणे आम्हास पुढे सांगत आहे.
१४. देवाच्या जीवनाला हे जग पारखे होण्याचे एक कारण काय आहे?
१४ सर्वात प्रथम तो म्हणतो, ह्याचे “कारण त्यांच्यात अज्ञान उत्पन्न” झाले आहे. (इफिसकर ४:१८) “त्यांच्यात” हा शब्दप्रयोग ह्यावर जोर देतो की त्यांच्यातील अज्ञानाचे कारण, त्यांना संधी मिळत नाही म्हणून नव्हे तर ते जाणूनबुजून देवाच्या ज्ञानाचा धिक्कार करतात यामुळे आहे. या शब्दप्रयोगाचे भाषांतर इतर असे करतातः “देवाची ओळख ही मूळातच नाकारणे” (द अँकर बायबल); “ज्ञानाअभावी, कारण यासाठी त्यांनी आपली अंतःकरणे बंद करुन घेतली आहेत.” (जरुसलेम बायबल). देवाच्या अचूक ज्ञानाला त्यांनी धिक्कारल्यामुळे किंवा झिडकारल्यामुळे यहोवाने, त्याच्या पुत्रावर विश्वास प्रदर्शित करतील अशांसाठी जे जीवन राखून ठेवले आहे ते मिळवण्याचा कोणताही आधार त्यांना राहात नाही. त्याबद्दल तो पुत्र म्हणतोः “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला, व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.”—योहान १७:३; १ तीमथ्य ६:१९.
१५. हे जग देवाकडिल जीवनाला पारखे होण्यामध्ये कशाचा सहभाग आहे?
१५ पौलाच्या मतानुसार, देवाच्या जीवनाला सर्वसाधारण जग पारखे होण्याचे दुसरे कारण म्हणजे “त्यांचे मन निर्ढावल्यामुळे” होय. (इफिसकर ४:१८ कॉमन लँगवेज) ‘निर्ढावणे’ याचा मूलभूत अर्थ कठीणपणा, कडक थर चढणे असा होतो. आम्हा सर्वांना जाड थर कसा तयार होतो हे माहीत आहे. त्वचा प्रथम मऊ व संवेदनशील असते पण कालातंराने नेहमीच्या दबावाने अथवा घर्षणाने ती जाड व कठीण बनते. त्यानंतर तिला कोणतीही संवेदना होत नाही. याप्रमाणेच, देवाबद्दलची निष्ठुरता ही आपोआप येण्याकरता लोक काही कठीण व निर्ढावलेल्या अंतःकरणाने जन्माला येत नाहीत. पण आपण या जगात राहातो व त्याचा आत्मा प्रदर्शित करतो या कारणाने, जर सावधगिरी बाळगली नाही तर आमचे अंतःकरण कठीण होण्यास अथवा निर्ढावण्यास फारसा वेळ लागणार नाही. याकरताच पौलाने इशारा दिला: “जपा . . . यासाठी की पापाच्या ठकविण्याने तुमच्यातला कोणी कठीण होऊ नये.” (इब्रीकर ३:७-१३; पंडिता रमाबाई; स्तोत्रसंहिता ९५:८-१०) यास्तव, आमच्या मनाचे रुपातंर होणे व अंतःकरण प्रज्वलित करण्याची ही केवढी निकडीची वेळ आहे बरे!
“कोडगे झाल्याने”
१६. जगाच्या अंधकारमय बुद्धिचा व देवाकडिल जीवनाला पारखे होण्याचा परिणाम काय?
१६ असा अंधकार व पारखेपणा याच्या परिणामाचा सारांश पौलाच्या पुढील शब्दात आहेः “ते कोडगे झाल्यामुळे त्यांनी हावरेपणाने सर्व प्रकारची अशुद्धता करण्यासाठी स्वतःला कामातुरपणास वाहून घेतले आहे.” (इफिसकर ४:१९) “कोडगे झाल्यामुळे” या शब्दप्रयोगाचा अक्षरशः अर्थ नैतिक वेदनांची, “वेदनांची जाणीव थांबविणे,” असा होतो. यामुळे अंतःकरण कठीण बनते. एकदा का त्याने देवाविषयीच्या जबाबदारीची जाणीव आणि विवेक सतावण्याची जाणीव थांबविली, तर नंतर मात्र त्याला कधी ताब्यात ठेवता येत नाही. यास्तव, पौल म्हणतो की, ‘कामातुरपणास व अशुद्धतेस त्यांनी “स्वतःस वाहून घेतले.” हे बुद्धिपुरस्सर व स्वेच्छेने उचलेले पाऊल आहे. पवित्र शास्त्रात वापरलेला “कामातुरपणा,” ह्या शब्दाचा अर्थ निर्लज्ज व उद्धट वागणूक असा होतो. जो अधिकार व नियम यांचा तिरस्कार करतो. अशाचप्रकारे, “सर्व प्रकारची अशुद्धता” यात केवळ लैंगिक विकृतीच नव्हे तर धर्माच्या नावाखाली चाललेल्या नैतिकदृष्ट्या बिघडलेल्या गोष्टी, जसे की जनन संस्कार आणि इफिस येथील अर्तमीच्या मंदिरात केले जाई असे धार्मिक विधींचे संस्कार, ज्यांच्याशी पौलाचे वाचक चांगलेच परिचित होते, अशाचाही समावेश होतो.—प्रे. कृत्ये १९:२७, ३५.
१७. नैतिकतेची पातळी ओलांडणाऱ्यांना “हावरेपणाने” पाप करणारे असे पौलाने का म्हटले?
१७ कामातुरपणा व अशुद्धतेचे सर्व प्रकार यांचा अनिर्बंध उपभोग घेणे हे इतके वाईट नव्हे म्हणून की काय, पौल यात भर घालून पुढे म्हणतो की, अशा व्यक्ती “हावरेपणा”ची कृत्ये करतात. जे लोक काही प्रमाणात अजूनही पापाची समजबुद्धी बाळगून आहेत त्यांना निदान त्या कृत्यांचा पश्चात्ताप तरी वाटतो व परत तेच कृत्य होऊ नये यासाठी ते कठोर परिश्रम करतात. पण जे पापात “कोडगे बनले आहेत” ते “हावरे” (“आणखी जास्तीची अपेक्षा करतात,” द अँकर बायबल) बनतात. एक रेडिओ भाष्यकर्ता एकदा असे म्हणालाः “तुम्हाला जर आज मनसोक्त आनंदाचा अनुभव घेता आला तर तुम्ही उद्याही अधिक आनंदाची अपेक्षा कराल.” ते अगदी उतावळीने दुर्गुणांच्या चक्रव्यूहात उतरतात व दुष्टपणात खोलवर रुतत जातात—आणि याला अगदी क्षुल्लक लेखतात. “परराष्ट्रीयांना आवडणारी कृत्ये” यांचे हे किती समर्पक वर्णन!—१ पेत्र ४:३, ४.
१८. जगाच्या मानसिक व आध्यात्मिक स्थितीचे चित्रण सारांशात पौलाने कसे केले आहे?
१८ पौलाने इफिसकर ४:१७-१९, या केवळ तीन वचनात जगाच्या खऱ्या नैतिक व आध्यात्मिक स्थितीस उघड केले आहे. त्याने हे दाखवून दिले की जगाच्या विचारवंताकडून ज्या कल्पना आणि जे सिद्धांत पुरविले जातात ते, तसेच संपत्ती व सुखाचा जो निष्ठूरपणे पाठलाग केला जातो हे सर्व अगदीच निष्फळ आहे. त्याने हे स्पष्ट केले की मानसिक व आध्यात्मिक अंधकारात असल्यामुळे हे जग नैतिकतेच्या दलदलीत आहे व खोल बुडत आहे. शेवटी, अज्ञान व चेतनाहीन वृत्ती स्वतःवर लादल्यामुळे ह्या जगाची देवाकडिल जीवनाच्या आशेपासून फारकत झाली आहे. खात्रीने, जग चालते त्याप्रमाणे न चालण्यास आपल्याला हे एक चांगले कारण आहे!
१९. कोणत्या मूलभूत प्रश्नांचा अजूनही विचार करावयास हवा?
१९ जगाने यहोवा देवापासून दुरावण्याचे कारण मन व अंतःकरणातील अंधकार हे आहे. मग, आमच्या मनातील व हृदयातील संपूर्ण अंधकार आम्ही कसा दूर करु शकतो? होय, प्रकाशाची प्रजा या नात्याने चालण्यास आणि देवाची कृपापसंती मिळवण्यास आम्ही काय करावयास हवे? याचा विचार पुढील लेखात केला आहे.
तुम्ही सांगू शकता का?
▫ इफिसकरास ४:१७-१९ मध्ये पौलाने कोणता जोरदार सल्ला उद्युक्त केला आहे?
▫ जगाचे मार्ग निष्फळ व अंधकारात का आहेत?
▫ “देवाच्या जीवनाला पारखे” झालेले या वाक्यप्रयोगाचा काय अर्थ होतो?
▫ अंधकारमय मन व भावनारहित हृदय याचा परिणाम काय?
[चित्रं]
इफिस शहर त्याच्या नैतिक अधःपतनाविषयी व मूर्तीपूजेविषयी कुप्रसिद्ध होते
१. इफिसमधील रोमी योद्धा
२. अर्तमीचे उद्ध्वस्त देऊळ
३. इफिस येथील नाट्यगृह
४. इफिस येथील अर्तमी, जननक्षमतेची देवता
[चित्र]
जगाच्या उच्चभ्रू लोकांकडे सादर करु शकण्यासारखी कोणती समजबुद्धि आहे?
निरो