वाचकांचे प्रश्न
इब्रीयांस ११:२६ मध्ये मोशेला “ख्रिस्त” यासारखे संबोधले आहे का, किंवा तो येशू ख्रिस्ताचा नमुना होता?
मोशेच्या विश्वासाची चर्चा करतांना प्रेषित पौलाने लिहिले: “ख्रिस्ताचा अपमान सोसणे ही मिसर देशाच्या धननिधीपेक्षा उत्तम संपत्ति आहे असे त्याने गणिले; कारण त्याची दृष्टि प्रतिफळावर होती.” (इब्रीयांस ११:२६) यावरून असे कळते की पौल मोशेचा उल्लेख जणू “ख्रिस्ता” सारखा किंवा अभिषिक्त जन म्हणून करीत होता.
अशा रितीने, मोशेने अनेक बाबतीत येणाऱ्या मशीहासाठी नमूना ठेवला होता. मोशे स्वतः एक संदेष्टा होता, तरी त्याने ‘त्याच्यासारखा’ मोठा संदेष्टा येण्याविषयी भाकीत केले. पुष्कळ यहुद्यांनी येशू हा “एक संदेष्टा” होता असा अर्थ घेतला व याची त्याच्या अनुयायांना खात्री होती. (अनुवाद १८:१५-१९; योहान १:२१; ५:४६; ६:१४; ७:४०; प्रे. कृत्ये. ३:२२, २३; ७:३७) मोशे हा नियमशास्त्र कराराचा मध्यस्थ देखील होता, परंतु येशूला महिमायुक्त नवा करार, “अधिक चांगल्या कराराचा मध्यस्थ,” म्हणून “अधिक श्रेष्ठ सेवा” मिळाली. (इब्रीयांस ८:६; ९:१५; १२:२४; गलतीकर ३:१९; १ तिमथ्य २:५) यास्तव काही अंशी मोशेला येणाऱ्या मशीहाचा नमुना म्हणता येईल.
तथापि, इब्रीयांस ११:२६ चा तसा प्राथमिक अर्थ होत नाही असे दिसते. मोशेला ख्रिस्ताविषयी सविस्तर माहिती होती व त्याला मिसरात जो अनुभव आला तो मशीहाखातर किंवा त्याचा प्रतिनिधी म्हणून होता अशी त्याला जाणीव होती असे काही दिसत नाही.
काहींनी असे सुचविले की, इब्रीयांस ११:२६ मधील पौलाचे शब्द ख्रिश्चनांनी “ख्रिस्ताची दुःखे” सहन केली या त्यानेच केलेल्या विवेचनासारखा अर्थ ध्वनित करतात. (२ करिंथकर १:५) अभिषिक्त ख्रिश्चनांना हे माहीत होते की येशूने दुःख सहन केले त्यांनी जर ‘त्याच्याबरोबर दुःख भोगले’ तर त्यांची स्वर्गात महिमा होणार होती. तथापि मोशेला येणाऱ्या मशीहाला कोणते दुःख भोगावे लागणार होते हे माहीत नव्हते, त्याचप्रमाणे मोशेला स्वर्गीय आशाही नव्हती.—रोमकर ८:१७; कलस्सैकर १:२४.
मोशेने “ख्रिस्ताचा अपमान सोसणे धननिधीपेक्षा उत्तम संपत्ती कशी आहे” हे समजले होते ते कळण्यास अगदी सोपे आहे.
इब्रीयांस ११:२६ मध्ये पौलाने “ख्रिस्ताचा” असे लिहिले, त्याने ख्रि․स्तोऊ,ʹ हा ग्रीक शब्द वापरला तो इब्री शब्द म․शीʹहाक किंवा मशीहा याच्या तुलनेत सारखाच होता. “मशीहा” आणि “ख्रिस्त” दोन्हींचा अर्थ “अभिषिक्त जन” असा होतो. यास्तव, पौल मोशेविषयी, की त्याने ‘अभिषिक्त जनाचा अपमान उत्तम गणला’ असे लिहित होता. मोशेला स्वतःला “अभिषिक्त जन” म्हणता येईल का?
होय. पवित्र शास्त्र काळी एखाद्या व्यक्तिच्या डोक्यावर तेल ओतून त्याला खास नेमणूकीसाठी मान्यता मिळत असे. “मग शमुवेलाने तेलाची कुपी घेऊन [शौलाच्या] मस्तकावर ओतिली.” “मग शमुवेलाने तेलाचे शिंग हाती घेऊन त्याच्या भावांमध्ये [दाविदाचा] अभिषेक केला. आणि परमेश्वराचा [यहोवा न्यू. व.] आत्मा दाविदाच्या ठायी जोराने संचरु लागला.” (१ शमुवेल १०:१; १६:१३; पडताळा निर्गम ३०:२५, ३०; लेवीय ८:१२; २ शमुवेल २२:५१; स्तोत्रसंहिता १३३:२.) तथापि, अलिशा संदेष्टा व अरामाचा राजा हजाएल यांचा “अभिषेक” झाल्याचे वर्णन मिळते परंतु खरोखरचे तेल त्यांच्यावर ओतून अभिषेक केल्याचा पुरावा मिळत नाही. (१ राजे १९:१५, १६; स्तोत्रसंहिता १०५:१४, १५; यशया ४५:१) अशाप्रकारे, एखाद्याची निवड करण्याद्वारे किंवा त्याला खास नेमणूक देण्यामुळे तो “अभिषिक्त जन” बनू शकतो.
वस्तुतः मोशे हा स्वतः देवाचा अभिषिक्त जन होता, व काही पवित्र शास्त्र इब्रीयांस ११:२६ चा अनुवाद “देवाचा अभिषिक्त जन” किंवा “अभिषिक्त जन” असा देतात. मोशेला देवाचा प्रतिनिधी व मिसरातून इस्राएलांना काढून त्यांचे नेतृत्व करण्याची आज्ञा दिली होती. (निर्गम ३:२-१२, १५-१७) मोशेची वाढ मिसराच्या धनसंपत्तीत व वैभवात झाली होती, तरी त्याला मिळालेल्या कामास त्याने उत्तम समजले व त्याचा स्वीकार करुन ते पूर्ण केले. म्हणूनच पौल मोशेविषयी लिहू शकला की “खिस्ताचा अपमान सोसणे ही मिसर देशाच्या धननिधी पेक्षा उत्तम संपत्ती” असे त्याने समजले.